विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)

Submitted by अमितव on 19 March, 2018 - 18:04

पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.

ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.

कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.

अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.

काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी

१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.

२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.

३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.

४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.

५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.

६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.

७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.

८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.

१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.

११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.

१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.

इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> when things are too good to be true, they probably are.

+१११ बनावट जॉब ऑफर्स स्कॅम अनेक वर्षे सुरु आहे. अशा इमेल्स सायबर क्राईम कडे व जिथे म्हणून शक्य आहे तिथे रिपोर्ट कराव्यात.

@रानभुली: हे फारच धक्कादायक आणि चीड आणणारे आहे. मी अशा साईट्स शॉर्ट फिल्म्स च्या सबमिशन्ससाठी बनवलेल्या पाहिल्या आहेत. खोटे शॉर्ट फिल्म्स महोत्सव:

http://www.showmeshorts.co.nz/avoiding-fake-film-festivals/

जॉब ऑफर ३ वाजता मिळाल्यावर ३:३० ला कॅनेडीयन दूतावासाचे विसासाठीचे आमंत्रणाचा मेल > स्वीगी किंवा झोमॅटोबरोबर टायअप केला असेल मेल डिलिव्हरीसाठी Happy

मोबाइलवरून आलेला फोन.अॅक्सिस बॅंकेतून बोलतोय.
तुमच्या क्रेडिट कार्ड वापरासाठी तुम्हांला मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स तुम्ही वापरत नाही. त्याबद्दल तुम्हांला cash back मिळू शकेल.

माझ्या डोक्यात edge reward points. हे वापरायला पैसा खर्च करावा लागतो. मग डिस्काउंट मिळतो. त्या वस्तू आणि सेवा माझ्या गरजेच्या नसतात.
एक gas stove तेवढा घेतलाय फुकटात.
तो - ते वेगळे. ते तुमच्या प्रोफाइलला असतात. हे तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरासाठी मिळतात.
( खरं म्हणजे तेच वापरासाठी मिळतात)
हे पॉइंट्स रिडीम करायला टेलिबॅंकिंगद्वारे यूजर आयडी आणि पासवर्ड जनरेट करावा लागेल. पहिलं रिडेम्प्शन फोनवरून. मग online.

मी - मला हे संशयास्पद वाटतंय.
तो - तेपण मी नाही करणार. तुमच्या कार्डावर छापलेल्या टेलिबॅंकिंग नंबरवरूनच फोन येईल. मी कार्डामागे छापलेला तीन आकडी क्रमांक किंवा तुमच्यासाठीच नाव विचारणार नाही.

मी - हे पॉइंट्स आणि cash back ची माहिती website वर मला कुठे दिसेल?
हे परत परत विचारल्यावर
तो - हे तुमच्या एक्सपायरी झालेल्या पॉइंट्स बद्दल आहे. ते रिडीम करायचा आज शेवटचा दिवस आहे. तुमच्या क्रेडिट कार्डाच्या बिलातून ते उणे होतील. ६०००० पॉइंट्सला ३००० रुपये असा काही हिशोबही सांगितला.
ही माहिती online नाही कारण आताच हे सुरू केलंय आणि तुम्हांला असा फोनही कधी आला नसेल.
शेवटी माझे ते पॉइंट्स फुकट जाऊ दे असं सांगितल्यावर, त्याने मी तशी नोंद करतो असं सांगितलं आणि फोन ठेवला.

मी खूप थोडक्यात लिहिल़ंय. फोन दहा मिनिटे चालला.

कॉल संपल्यावर ट्रू कॉलरला "फ्रॉड" दिसलं.

म्हणजे तो तुमचे पॉईंट वापरणार/ चोरणार होता का? बहुतेक मला नीटसं समजलं नाहीये नक्की कसा फ्रॉड होतोय ते.
त्यावरुन,
गेल्या महिन्यात असाच एक प्रकार दिसला.
'मी तुमच्या क्रेडिट कार्ड सिक्युरिटी डिपार्टमेंट मधुन बोलतोय, तुमचं कार्ड xyz देशात 'abc' किंमत्तीसाठी वापरलं गेलं आहे. ते आमच्या सिस्टिमने फ्रॉड म्हणून फ्लॅग केलं आहे. ते तुमचं नाही हे कन्फर्म करायच होतं.' असा कॉल आला.
मी: मी असं काहीही केलेलं नाही. कृपया ते ट्रॅन्झॅक्शन ऑनर करू नका.
ती: ते करण्यापूर्वी मला (तिला) ते कार्ड तुमचंच आहे याची खात्री करायची आहे. मला तुमचा कार्ड नंबर सांगा.
मी: (इथे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मोबाईलवर फोन आलेला नंबर माझ्या बॅकेंचा म्हणून मला दिसलेला न्हवता. एरिआ कोडही लोकल होता. १-८६६ इ. न्हवता.) मी तुम्हाला माझा कार्ड नंबर सांगणार नाही.
ती: सगळा कार्ड नंबर नाही सांगितलात तरी चालेल. पहिले चार अंक सांगा.
मी: तुम्हाला माझ्या कुठल्या कार्ड बद्दल ही अ‍ॅक्टिव्हिटी दिसली? ते कुठल्या बँकेचे आहे?
ती: तिने मला शेवटचे चार अंक सांगितले. (ज्याचं कार्ड माझ्याकडे आहे. ते बरोबर होते)
मी: पण हे कुठल्या बँकेचं कार्ड आहे?
ती: तिने चार बँकांची नावं घेतली, आणि या पैकी एक आहे असं सांगितलं. ( इथे परत काळंबेरं जाणवलं आणि खात्री पटली)
मी: तुम्ही माझ्या बँकेतून बोलत आहात यावर माझा विश्वास नाही. तुम्हाला फ्रॉड अ‍ॅक्टीव्हिटी सापडली आहे तर ती डॉसओन करा. मी माझी माहिती देणार नाही.
ती: (आता स्वरातील प्रेमळपणा/ प्रोफेशनलपणा जाऊन स्वर बदलेला होता) हे तुमच्याच भल्यासाठी आहे. तुम्ही हे दिलं नाही तर आम्ही मदत करू शकणार नाही.
मी: ओके. मी माझं निस्तरेन. आणि फोन बंद केला.

मग ऑनलाईन जाऊन कार्ड अ‍ॅक्टिव्हिटी बघितली. काही अनयुज्वल दिसलं नाही. असलेल्या क्रेडीट कार्ड कस्टमर सर्विसला फोन केला. त्यांनी हेच सांगितलं की आम्ही नंबर कधीही विचारणार नाही. फोन ठरविक नंबर वरुन येईल. इ. इ.

मला वाटलं माझ्या अकाऊंटमधून किंवा क्रेडिट कार्डातून पैसे काढणार असता. कसं ते कळायला मला मी जाळ्यात सापडतोय असं दाखवावं लागलं असतं.

लॉकडाउनमध्ये फोनवरून मद्य मागवणाऱ्यांना ठकवल्याचे प्रकार झालेत.

या पुढल्या प्रकारच्या दोन बातम्या वाचल्यात
- फेसबुक किंवा डेटिंग साइटवरून मुलीने संदेश पाठवणे. आपले न्यूड फोटो शेअर करणं किंवा व्हिडियो कॉल करणं.
मग आता दोघेपण न्यूड कॉल करू म्हणून फशी पाडणं.
त्या कॉलचं रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल

मी तुमच्या क्रेडिट कार्ड सिक्युरिटी डिपार्टमेंट मधुन बोलतोय >>> Happy अमित तिने आधीच बँकेचे किंवा कार्ड कंपनीचे नाव सांगितले नाही का? तोच एक मोठा रेड फ्लॅग आहे Happy हे लोक स्पेसिफिक कंपनीचे नाव न घेता एकदम जेनेरिक पण भारदस्त वाटणारे नाव सांगतात. Credit Card Security Department किंवा Insurance Department वगैरे. जणू काही अशी कंपनी-अ‍ॅग्नॉस्टिक डिपार्टमेण्ट्स असतात मंडईसारखी - कोणीही आपला माल विकावा Happy

बाकी माहिती देण्यापेक्षा "मागणे", तीही फोन वर आणि बोलण्यातील अर्जंन्सी - हे ही दोन्ही रेड फ्लॅग्ज आहेतच.

माझ्याबरोबर असा एक फ्रॊड होता होता राहिला. जुना सोफा olx वर विकायला टाकला, दुसर्याच मिनिटाला फोन आला की मला हवाय पैसे पेटिएम करतो लांब राहतोय, आजच सोफा घेऊन जाईन वगरै, नवर्याला काही माहिती न्हवत त्याने हो म्हटले. मग फोन आला की काहीतरी इशु येतोय मी स्क्यान कोड पाठवतो तो बघा तुम्हाला पैसे मिळले की सांगा असं.
मी मग त्याला दाखवलं की तो कोड पे चा नसून रीसिव्ह चा आहे. पैसे वाचले आमचे

फा, अगदी बरोबर.
असे फोन सकाळी कामाच्या वेळी येतात. कानाला फोन आणि नजर स्क्रीनवर असं काम चालू असतं. कोण बोलतंय, कुठून बोलतंय त्यात रेड फ्लॅग रजिस्टर होईस्तोवर फ्रॉड शब्द मेंदूत घुसतो आणि आपण डिफेंसिव्ह मोड मध्ये जातो. क्रेडिट कार्ड वर फ्राड झाला तर आपण हुक वर नसतो हे डोक्यात फिट्ट बसले पाहिजे सगळ्यांच्या.

मला कालच एक फोन आला होता. क्रेडिट रिपोर्ट सर्विस तुमच्या अमुक अमुक बँकेच्या क्रेडिट कार्डावर मिळणार आहे. पहिला महिना फुकट आणि मग महिन्याला अमुक इतके.
त्या बाईने क्रेडीट कार्ड नंबर मागितला नाही. पण माझा इमेल मागितला. कदाचित जेनुइन सेल्स कॉल असेल बँकेतून. मात्र मी इमेल दिला नाही. जर बँकेतून फोन असेल तर इमेल त्यांच्याकडे आहे तो वापरावा.

क्रेडिट रिपोर्ट सर्विस अनेकदा ज्यांच्याकडून डेटा लीक झाला असेल त्या एंटिटी (जसं मध्यंतरी होम डिपो/ लोज देत होती) देतात. त्यांच्याकडे सगळी माहिती असेलच असं नाही. अर्थात ही आपली फक्त एक शक्यता.

शिल्पा मला सुद्धा olx वर असा अनुभव आला होता. मी सरळ सांगितले paytm , Google pay वापरत नाही. Cash घेऊन या आणि वस्तू घेऊन जा. परत कधीच फोन आलाच नाही.

Cash घेऊन या आणि वस्तू घेऊन जा. परत कधीच फोन आलाच नाही. <<< बेस्ट Lol

मला तरीही olx किंवा तत्सम कधी कंफर्टेबल वाटले नाही.

काही दिवसांपूर्वी माझ्या सासूबाईंना एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या बाईने ती ईपीएफकडून बोलत आहे म्हणून सांगितलं.
माझे सासरे काही वर्षांपूर्वी गेले. त्याआधी काही वर्षांपूर्वी ते एका बँकेतून निवृत्त झाले होते. तर या बाईचं म्हणणं असं होतं की चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी एक ग्रुप इन्शुरन्स घेतला होता जो आता मॅच्युअर झाला आहे आणि त्याचे तीन लाख रुपये आता तुम्हाला मिळतील. त्या बाईने त्यांचा PAN, पेन्शन खात्याचा नंबर, घरचा पत्ता वगैरे बरोबर सांगितला. मग आम्हाला ते खरं वाटलं. शिवाय तिची भाषा टिपिकल सरकारी हिंदी वाटली. तिने एक फाईल नंबर दिला. दोन दिवसांनी तुम्हाला एक फोन येईल, त्यांना हा नंबर सांगा, असं ती म्हणाली. त्याप्रमाणे दोन नाही, पण तीन दिवसांनी एक फोन आला, मात्र तिने म्हटलं की तुम्ही आधी एनओसी, प्रोसेसिंग फी वगैरेसाठी साडेसहा हजार रुपये ट्रान्सफर करा, मग तुम्हाला हे तीन लाख मिळतील आणि नंतर साडेसहा हजारही रिफंड होतील. मग मात्र आम्हाला संशय आला आणि आम्ही काहीच न करण्याचा निर्णय घेतला. दुसरी गोष्ट म्हणजे सासऱ्यांचा स्वभाव बघता, आपण असा इन्शुरन्स घेतलेला होता हे ते विसरून जातील हे जरा कठीण वाटलं. निवृत्त झाल्यावर त्यांनी या पैशांचा आमच्याकडे काही तरी उल्लेख, ईपीएफकडे काही तरी पत्रव्यवहार केला असता.
शिवाय, काही फॉर्म भरा, डेथ सर्टिफिकेट द्या वगैरे वगैरे काहीच त्या बाईने सांगितलं नाही!

अजून तरी परत काही फोन आला नाहीये. ईपीएफच्या ऑफिसमधे याची रीतसर तक्रार नोंदवावी असा विचार आहे.

हो Happy सरकारी कामे ही अगदी "सर्कारी" असण्याचा हा एक फायदा आहे. फोन बिन करण्याची तत्परता ते दाखवत नाहीत. सावकाश पत्राने ते येते - असा अमेरिकेत तरी अनुभव आहे. भारतात पूर्वी होते. पण आजकाल कॉर्पोरेशन मधून फोन सुद्धा येतो म्हणतात. आमचा पीएमसी चा कर भरायचा राहिला तेव्हा अजूनही लगेच भरलात तर दंड पडणार नाही वगैरे अगदी सौजन्याने सांगितले. आणि तेथेही मला अकाउण्ट नं द्या, पॅन नं द्या वगैरे नाही - जसे नेहमी भरता तसे भरा पण लौकर भरा हे सांगितले. आता पीएमसीची वेबसाइट चांगली असल्याने ते लगेच करता आले.

त्यामुळे फोनवर पैसे मागणे, माहिती मागणे वगैरे बहुतांश गडबडच असेल. त्यांना सांगावे अहो मी निवृत्त आहे. उगाच आज बँकेत जाउन पासबुक अपडेट करण्याऐवजी तुमच्या ऑफिसात येतो. तेवढाच बदल Happy

एक जिम ब्राउनिंग नावाचा युट्युबर आहे. तो कॉल सेंटर स्कॅम्स उघडे पाडतो. काही वेळा स्कॅमर्सचेच संगणक आणि कॅमेरा हॅक करून त्याने बरंच फूटेज आणि माहिती मिळवलेली आहे. त्याचे एकेक व्हिडिओ बघण्यासारखे आहेत. फक्त वाईट गोष्ट ही की त्यातले ९९% स्कॅमर्स् हे भारतात बसलेले असतात. कशी वेगवेगळ्या प्रकारे स्कॅमर्स माहिती काढतात हे बघण्यासारखं आहे.

पण सांगायची गोष्ट अशी की आमचा सोफा olx वरूनच विकला गेला. सो सगळीकडे ठग बसलेले असतातच त्यांना टाळून आपल्या सुविधांचा लाभ घेता आलाच पाहिजे या युगात

हो, आम्ही तेही सांगितलं की आम्ही स्वतः येतो ईपीएफ ऑफिसमध्ये आणि भरतो पैसे. तर म्हणे नाही, ही फाईल आमच्या दिल्ली ऑफिसला आहे. पुण्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेलात तरी तुमचं काम होणार नाही.

https://www.moneycontrol.com/news/business/personal-finance/how-fraudste...

हे एक सापडलं.

आम्ही विशिष्ठ कंपनीची वापरलेली कार शोधतोय. सध्या कारवान सारख्या ऑनलाईन कंपनी पण निघाल्यात. क्रेगलिस्टवर पण गावात शोधताना एक सापडली. ईमेल केल्यावर मालकाचे १२-१३ दिवसांनी उत्तर आले की कार अजुनही उपलब्ध आहे. त्याने हे ही सांगितले की तो दुसरीकडे तात्पुर्ता जॉबमधे अडकला होता म्हणून त्याने ब्रोकरकडे कार विकायला ठेवलीये. मग त्याने कारफॅक्स रिपोर्ट, कारचे फोटो, ब्रोकर वेबसाईट पाठवले. सगळे अगदी व्यवस्थीत.

ब्रोकरशी बोलताना आम्हाला अजून एक चांगले डील दिसले. बोलणे झाल्यावर जवळजवळ घ्यायचे नक्की केले कारण त्यांची ७ दिवस रिटर्न पॉलीसी होती. पण निर्णय घेण्याआधी आम्हाला ते डील अतीजास्त चांगले वाटले. त्यामुळे त्या कंपनीबद्दल गुगलवर शोधले तर काहीच माहिती सापडत नाहीये. त्यामुळे ती खोटी आहे असं समजून विचार रद्द केलाय. गुमान डीलरकडे जाऊनच घेऊ.

इस्टकोस्टमोटर्सब्रोकर.कॉम असे नाव आहे.
मुद्दाम इंग्लीशमधे नाही लिहिले. कोणाला ही कंपनी खरे आहे हे पक्के माहिती असेल तर सांगा म्हणजे प्रतिसाद बदलेन.

युज्ड कार घेताना नीट स्वतः बघून आणि चेक अप करून घेणेच उत्तम. ऑन लाईन कोणालाही पैसे देऊ नयेत. एक हाथ से दे एक हाथ से ले. डीलर असेल तर मग ठीक आहे.

सुनिधी - कारफॅक्सचे रिपोर्ट थेट घेण्यापेक्षा VIN नंबर घेउन स्वतः कारफॅक्स मधून काढलेले चांगले. रिपोर्ट मधे फेरफार होउ शकते. कार्वाना आणि कारमॅक्स त्यामानाने जास्त विश्वासू असावेत. कॉस्टकोसुद्धा ही सर्विस देते असे वाचले आहे.

आणि थेट मालकाकडून घेणार असाल तर स्वतः कारफॅक्स रिपोर्ट काढायचा आणि कार सुद्धा स्वतः निवडलेल्या शॉप मधे इन्स्पेक्शन करून घ्यायची.

कधी कधी एकदम सेलर मार्केट मधे हे शक्य नसते पण सध्या तसे वाटत नाही.

सध्या रिसेल कार मार्केट खूप हाइपड आहे. सप्लाय चेन इशुज मुळे नव्या कार कायच्या काय वेळाने मिळत आहेत, त्यामुळे रिसेल ला काय वाट्टेल ते कोट करताहेत असं ऐकून आहे.
टू गुड टुबी ट्रू असेल तर त्यात पडू नका.

कारवाना वापरा... ऑनलाईन कार डिलिव्हरी साठी... मस्त आहे आणि टाईम देतात कार आवडली नाही तर बदलून द्यायला...

टू गूड टू बी ट्रू…. बरोबर. आम्ही अजून गुप्तहेरगिरी केली तेव्हा वर दिलेल्या वेबसाईटवर टीमची नावे व फोटो होते. ती नावे गुगल केल्यावर तेच सगळे फोटो दुसर्‍या वेगळ्या व्यवसायाच्या वेबसाईटवर मिळाले व सर्वांची नावे वेगळीच.
मग ज्याने क्रेगलिस्टवर कार टाकली होती व नाव दिले होते ते शोधले. तो ज्या प्रकारचा डॉक्टर होता हे त्याने ईमेलमधे लिहिले होते, त्याच नावाचे व व्यवसायाचे लिंक्डीन अकाऊंट मिळाले तर त्याचे एकच कनेक्शन होते, फोटोमधे फक्त स्टेथास्कोप घेतलेल्या हाताचा फोटो होता.
मग त्यांचा फोन आला की दुसरे गिर्हाईक आलंय, कार हवी की नको?

असं सगळं झाल्यावर तर पुढे गेलो नाही त्याने फार बरं वाटलं.
आता गावातच वैयक्तिक विकणारे मिळालेत तिथे जाऊन कार चालवुन पाहू, तपासून घेऊ. फारेन्ड, कारफॅक्सचा खोटेपणा माहिती नव्हता.. धन्यवाद, तेही तपासू.
च्र्प्स कारवानावर जरा महाग होत्या. पुन्हा शोधून पहातो.

भामटे लोक नावाजलेल्या कंपन्यांच्या नावासारख्या दिसणार्‍या साइट्स किंवा त्या कंपन्यांचे खोटे फोन नंबर देणारी पेजेस तयार करून त्या द्वारेही लोकांना लुबाडतात. भारतातली पोलिस खात्याची जनहितार्थ जारी केलेली एक जाहिरात पाहिली होती. मिन्ट्राकडून डिलिव्हरी आली नाही, म्हणून
एक मुलगी त्यांचा फोन नंबर गुगल करून शोधत असते. तेव्हा पोलिस तिला आपल्या ऑर्डरच्या कन्फर्मेशनमध्ये आलेल्या इमेलमध्ये दिलेल्या नंबरवर किंवा त्यांच्या साइटवरच्या कस्टमर केअर नंबरवरच फोन करा असं सांगतात.

https://indianexpress.com/article/india/fake-website-offers-to-help-coup...
Fake website offers to help couple move, steals all their belongings
A gang has created a fake website in the name of a well-known movers and packers company, through which it cheats clients.

एक मित्राने सांगितलेला किस्सा.
Google वरून कोणते तरी कर्ज देणारे ॲप डाऊनलोड केले त्या द्वारे झटपट कर्ज घेतले.
पण व्याज सावकारी होते म्हणजे अगदी शेकडा ५ टक्के महिन्याला असे.
ते पण ठीक आहे.
पण दोनतीन महिन्यातच च कर्जाची रक्कम १०० पट्टी नी वाढवून ती लवकर भरा असे कॉल येवू लागले.
म्हणजे पाच हजारा चे पन्नास हजार .
खरी स्टोरी येथून सुरू होते.
त्या कर्ज देणाऱ्या कडे सर्व फॅमिली मेंबर,मित्र ह्यांचे मोबाईल नंबर गेले होते.
ते सर्वांना कॉल करून दमदाटी करायचे.
अगदी व्हॉट्स ॲप वर काय प्रोफाइल फोटो आहे हे पण ते सांगायचे.
प्रश्न हा आहे की ह्या frud करणाऱ्या कडे सर्वांचे मोबाईल नंबर कसे गेले?
त्यांनी मोबाईल कसा हॅक केला असेल.

Pages