विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)

Submitted by अमितव on 19 March, 2018 - 18:04

पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.

ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.

कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.

अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.

काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी

१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.

२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.

३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.

४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.

५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.

६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.

७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.

८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.

१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.

११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.

१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.

इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन Submitted by विक्षिप्त_मुलगा on 10 April, 2018 - 14:45

येता जाता भारतीयांवर अवांतर तुच्छतेच्या पिचकार्‍या मारणार्‍या तुमच्यातही तोच गुण आहे हे इथे सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन!

मेडल द्या यांला कुणीतरी, पद्मभुषण द्या!

नवीन Submitted by विक्षिप्त_मुलगा on 10 April, 2018 - 14:45

येता जाता भारतीयांवर अवांतर तुच्छतेच्या पिचकार्‍या मारणार्‍या तुमच्यातही तोच गुण आहे हे इथे सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन!

मेडल द्या यांला कुणीतरी, पद्मभुषण द्या!
>>>
विमु ने काही खोटं लिहिलय असं वाटत नाही, नाहीतर आयटी पार्कच्या चकचकीत लिफ्ट मध्ये पिचकार्‍या दिसल्या नसत्या. शिवाय हूच्च शिक्षित लोक्स सुद्धा मेन्स युरिनल मध्ये च्युंइगम थुंकताना पहिलेत. एक महाभाग तर तंबाखु खाउन डेस्क खालच्या डस्ट्बिन मध्ये थुंकताना पाहिलय.

@ अग्निपंख, धन्यवाद! तुम्हाला कळले आहे मला नेमके काय म्हणायचे आहे ते!

येता जाता भारतीयांवर अवांतर तुच्छतेच्या पिचकार्‍या मारणार्‍या तुमच्यातही तोच गुण आहे हे इथे सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन!>>>>>
मी ही भारतीयच आहे, फक्त मला थुंके, फुंके आणि झिंगे (सार्वजनिक ठिकाणी गुटखा, पान खाऊन थुंकणारे, सिगारेट फुंकणारे आणि दारू पिऊन झिंगणारे) यांच्याविषयी प्रचंड तिटकारा आहे. (आणि यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.)(एखाद्याने त्याच्या घरी काय करावे, याबाबत मी कधीही मतप्रदर्शन करत नाही.)

मी भारतीयांचा नाही तर आपणा भारतीयांना असलेल्या काही वाईट सवयींचा द्वेष करतो. जसे की, सार्वजनिक जीवनात शिस्त न पाळणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, विनाकारण दर १०० मीटरला हॉर्न वाजवणे, बस-ट्रेन मध्ये मोबाईलवर मोठ्याने बोलणे, कचरा कोठेही टाकणे इ.

.........आणि विषयांशी संबंध नसलेल्या पिंका नको त्या चर्चेत टाकणे... जसे तुम्ही केले!

खूप माहितीपुर्ण धागा अमितव! एसेमेस चूकून आलाय बतावणी करून पैसे उकळणे, हे माहित नव्हते, धन्यवाद मी_अनु.
माझ्या माहितितले प्रकारः माझि १ खूप हुशार चाणाक्ष वगैरे मावशी आहे, तिला कमी भावात बासमती तान्दुळ देते सान्गुन १ स्त्री ने लुबाडले होते, १० किलो सान्गुन फक्त ४ किलो तान्दुळ ठेउन गेली. २-३ वेळा मावशीने स्वतः च्या मापातून मोजून घेतले होते.
माझ्या आईसाठी पण घेऊ का म्हणुन फोन केला तर आई नाही म्हणाली, मग हा सर्व प्रकार झाल्याचे कळाले, आई म्हणाली, १० किलो तान्दुळ घेऊन एखादी बाई एकटी ४ मजले वर चढून कशी येईल? Happy

२रा किस्सा: माझी चुलत जाऊ, घरात सासू असुन ही, बाहेर दारात पत्ता विचारणार्या माणसाला हातातील २ सोन्याच्या बा.न्गड्या काढून दिल्या, म.न्गळसुत्राला हात घालून काढतच होती, एकदम फिल्मी स्टाईल सारखे सासुने मोठ्याने हाक मारली, सम्मोहन उतरले, पण माणुस पळुन गेला

३रा किस्सा: ओळखीतले १ काका गळ्यातली चेन, अन्गठी, घड्याळ सर्व कुणा माणसाला देऊन फूटपाथ वर बसलेले आढळले Sad ३ तास

सोन्याच्या बांगड्या घरी येऊन पॉलिश करून देणारी एक टोळी
अंगावर घाण पडली आहे असे सांगून रोख रक्कम चोरणे.
बँकेत पैसे मोजून देतो म्हणून रक्कम लंपास करणे..
हे प्रकार बऱ्याच जणांनी ऐकले असतील. छान आहे धागा Happy

वीस वर्षांपुर्वी माझ्या जवळचा नातेवाईक, जो आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आहे त्याच्या सांगण्यावरून चैतन्य टिक प्लांटेंशन, पुणे इथे एका झाडात पैसे गुंतवले ( तेव्हढेच पैसे होते त्यावे़ळी माझ्याकडे) पूण्यातील डीएसके टाइप दिग्गज लोक त्यांच्या डायरेक्टर बोर्ड वर होते, जागा पानशेत कि भोर इथं कुठंतरी होती (ते दाखवत असायचे, पण वेळे अभावी स्वःत पाहिली नाही) फार विश्वास बसला त्याच्यावर !
पुढं ...पुढं काय.... पैसे बुडले !

त्या सागवानाच्या बागेत फार लोकांनी पैसे बुडवले आहेत.
यात तुमच्या श्रद्धास्थानाने कमाई केली नाही असं दिसतंय. सो कदाचित त्यांनी त्यांच्या त्यावेळच्या आकलनानुसार जेन्युइन सल्ला दिलाही असेल.

विश्वास संपादन करून विणलेली फसवणूक जर खरेच अनुभवायची असेल, तर आजकाल लोकांचा विश्वास संपादन करून सत्तेवर आलेली भाजपा नक्की काय करतेय ते बघा Wink

साधारण ७-८ वर्षांपुर्वीची गोष्ट...

सासुबाई मुलीला घ्यायला गाडीने गेल्या. ठाण्याला नौपाड्याला शाळे जवळ गाडी उभी होती. वेळ होता म्हणुन त्यन्नी ड्रायव्हर ला औषध आणायला पाठवले. ह्या गाडीत एकट्याच. पर्स शेजारी. एक माणुस आला व खिड्की वर टकटक करायला लागला. ह्यन्नी खिड्की उघडली. तर म्हणे, तुमचे सुटे पैसे खाली पडले आहेत ते घ्या. आणि चालु पडला. ह्यान्चा विश्वास बसला आणि त्यान्नी दार उघडुन खाली पाहिले. तर खरच २० रुपये होते. कदाचित ड्रायव्हर ला पैसे देताना पडले असतिल असे समजुन त्या ते घ्यायला खाली उतरल्या. तेवढ्यत शेजारचा दरवाजा उघडुन एका माणसाने त्यन्ची पर्स घेउन पोबारा केला.
पर्स मधे फारशी रक्कम नव्हती पण दुसर्‍या गाडी ची चावी, घराच्या चाव्य, क्रेडिट कार्ड, पॅन कार्ड, बॅन्क पास बुक, आधार कार्ड हे सगळे होते. मग त्यान्नी घरी येउन खुप बोलणी खाल्ली. आम्ही पटापट कार्ड ब्लॉक केली. घराचे मेन कुलुप दुसरे लावले. मुख्य चिन्ता पॅन व आधार ची होती.....

सन्ध्याकाळी फोन आला.... तुमची पर्स पीटर इंग्लन्ड च्या दुकाना पाशी आहे. ओळख पटवुन घेउन जा. आम्ही गेलो. तर फक्त पैसे काढुन बाकी पर्स फेकुन दिलेली होती. बेवारशी म्हनुन मग त्या दुकानदाराने पोलीस ला बोलावले होते. शेवटी मिळाले सगळे.

नंतर पेपर मधे वाचले की अशी टोळीच होती त्यन्ची ठाण्यात सक्रिय. तिच्यातिल काहीना पकडण्यात पोलीसाना यश आले होते.

असे सान्गुन लुटताना हे चोर मुख्य्त्वे म्हातार्‍या माणसां ना टार्गेट करतात. जे पटकन विश्वास ठेवतिल.

आठदहा दिवसांपूर्वी दिल्लीच्या एका नंबरवरून फोन आला. हिंदीभाषी स्त्री आवाज.
मी केंद्र सरकारच्या अमुक एका संस्थेतून तुमचुआ इन्व्हेस्ट मेंट्सबद्दल फोन करतेय. तुमच्या गुंतवणुकीवर सरकार तुम्हाला लॉयल्टी बोनस देते आहे. तुमची फाइल माझ्याकडे आहे. तुमचे पैसे सहा महिने झाले, आमच्याकडे पडून आहेत.
मी - हो का ? मला कोणी कळवलंच नाही.
ती - आम्ही तुमच्या लोकल गर्व्हन्मेंटच्या करवी तुम्हाला कळवलं होतं.
मी - नाही बुवा.
मग तिने बोनसची रक्कमही सांगितली एक लाख पस्तीस हजार अशी काहीतरी. गुंत णूक म्हणजे विमा पॉलिसी, बाँड्स असलं काय काय.

मी ज्यांच्या माध्यमातून ही गुंतवणूक केली त्यांच्याच माध्यमातून तुम्ही हा बोनस का देत नाही, असं विचारल्यावर तुम्ही त्यांना जाऊन विचारा असं उत्तर मिळालं.

व्हेरिफिकेशनसाठी म्हणून गुंतवणू क की नोकरी संदर्भात एक प्रश्न विचारला. मी म्हटलं. माझ्या नावावर असलेल्या नंबरवर तुम्ही फोन करताय, तर तुम्हाला कशाला हवं व्हेरिफिकेशन? उलट तुम्ही जेन्युइन आहात हे मी व्हेरिफाय करायला हवं म्हणून तुम्हीच मला ते डिटेल्स द्या.
बाईंनी रागाने काहीतरी बोलून फोन कट केला.

एल आयसीच्या बोनससाठी ही एक फोन गेल्या वर्षी कधीतरी आला होता. कोणती पॉलिसी, काय मुदतीची, किती रकमेची असं मी विचारल्यावर माझा फोन त्या बाप्याने त्याची सीनियरला दिला. आणि सी नियरने मीच त्यांच्या मागे लागल्यासारखं चिडून काहीतरी उद्धट उत्तर देऊन फोन कट केला.

घरी येऊन सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या प्रकाराला माझ्या नात्यातील एक ज्ये ना महिला बळी पडली. सुदैवाने अंगावरच्या दागि न्यांवरच निभावलं.

ओह्ह..
गेल्या काही दिवसांत आयआरएसचे दोन चारदा फोन येऊन गेले. हल्ली रेकॉर्डेड मेसेज वाजतो, तुम्हाला लाईव्ह एजंटशी बोलायचं असेल तर एक दाबा वगैरे सांगतात. मग आपलाही बिलकुल वेळ जात नाही. Happy

अरे माझा नेटफ्लिक्स अकाउंट हॅक झालेला आणि तो ज्याला मिळालेला त्याने मला समजुन कॉल सेंटरला फोन करुन अ‍ॅक्शन घेण्याचा एनर्शिआ गेल्यावर.. म्हणजे साधरण आठवड्याभरात टीव्ही शोज/ मूव्हीज बघितलेले. चिप्पाडपणाची हाईट होती ती! करुन करुन १० रुपयाचा नेटफ्लिक्स हॅक केला! Proud

मला "तुमचे सोशल सिक्युरिटी अकाउंट संशयास्पद अ‍ॅक्टिविटीज मुळे कायमचे बंद करण्यात येत आहे" असा फोन खूप वेळा येतो.
माझा एक कलीग असले कॉल आले की मुद्दाम चित्र विचित्र माहिती देऊन त्या लोकांना इरिटेट करतो. स्वतःचे नाव मायकल जॅक्सन सांगणे, घरचा पत्ता व्हाइट हाउस चा देणे, मधेच बोलताना मॉम, इज दॅट यू ? असे काहीतरी बोलणे इ. Lol त्याने काही नंबर्स ना कॉल बॅक करून करून असे २०-२५ दा इरिटेट केल्यानंतर त्या लोकांनी एकदा वाईट वाईट शिव्या दिल्या आणि डोन्ट कॉल हिअर अगेन यू अ‍ॅ***** म्हणून त्याचा नंबर ब्लॉक केला! Lol

लेटेस्ट आयओएस अपडेट आल्यापासुन फोन आपोआप फिल्टर होतात, पण अजुनहि माझ्या नातेवाईकांची अनेक देशांत असलेली संपत्ती क्लेम करा असे विनंतीवजा इमेल्स येतात. त्यांना अन्सब्स्क्राय्ब करणं म्हणजे आपला इमेल आय्डी नव्याने एक्स्पोज करण्याचा प्रकार आहे...

त्याने काही नंबर्स ना कॉल बॅक करून करून असे २०-२५ दा इरिटेट केल्यानंतर >>> कॉल बॅक करून त्यांनाच छळणे ही जबरदस्त कल्पना अहे. Happy

'मॅक्स लाईफ'ची पॉलिसी उतरवली आहे. वार्षिक हप्ता आहे. ज्याच्याकडून पॉलिसी घेतली, तो अगदी ओळखीचा. पहिली दोन-तीन वर्षे त्याने हप्त्याची व्यवस्थित आठवण करून दिली. मग तो जरा (छोट्या पडद्यावर) चमकू लागला आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले. पण हप्ता तर भरलाच पाहिजे ना.

गेली दोन वर्षे हप्ता भरण्याच्या महिना-दीड महिना आधी व नंतर मोबाईलवर फोन येतो. तुमचं नाव, पॉलिसी क्रमांक, एजंटाचं नाव अचूक सांगतात. मग विचारतात, 'तुम्हाला अजून बोनस मिळाला नाही का?' स्वाभाविकपणे 'नाही' असं उत्तर दिल्यावर मग ते गळ घालू लागतता. अमक्याला फोन करा, इतक्या दिवसांत करा वगैरे. जी पॉलिसी घेतली, त्यावर कधीही, कुठलाही बोनस मिळणार नाही, हे एजंटाकडून पक्कं माहीत करून घेतलं आहे.

एकाला तर मध्ये सांगितलं की, नको आहे बोनस मला. त्यानं धमकावल्याच्या स्वरातच विचारलं, नक्की नको ना? 'ट्रू कॉलर'वर तपासलं तर ह्या मंडळींना मस्त कंपनीच्या नावाची नोंद केलेली असते.

ह्या सगळ्याचा कंटाळा येऊन मध्यंतरी कंपनीला इ-मेल करून सगळं कळवलं. काही क्रमांकही दिले. त्यांचं म्हणणं तुम्हीच पोलिसात तक्रार करा ना. म्हणजे कंपनीचं नाव बदनाम होत असलं तरी ह्यांना काही देणं-घेणं नाही.

आणखी एक प्रकार - वडील राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झाले. चार-पाच वर्षांपूर्वी खूप फोन आले - तुमच्या वडिलांचे केंद्र सरकारकडून पेन्शनपोटी काही हजार रुपये येणं आहे. रक्कम (अर्थातच ऐकायला) घसघशीत. त्यासाठी मग ह्याला फोन करा आणि आधी एवढे पैसे भरा. असे काही फोन झाल्यावर नंतर एकाला सांगितलं, तुला लागतील तेवढे पैसे काढून घे आणि उरतील तेवढ्याचा चेक पाठवून दे! आता ते फोन येणं बंद झालं.

काही दिवसांपूर्वी मला भारतातून पुतण्याचा email/ WA आले, त्याला सल्ला / मदत हवी होती. त्याला नोकरीचे पत्र ऑफर लेटर मिळाले होते.
सकाळीच या बातमीने खूप प्रसन्न वाटले.

आता काय सल्ला हवा आहे म्हणून फोन केला. पुतण्याने कंपनीचे नाव, कॅनडातला पत्ता सांगितला... त्याला मिळालेले ऑफर लेटर पण त्याने पाठविले.

मी गुगलची मदत घेतली, कंपनी अस्तित्वात होती, काम पण तेच होते. नाव खरे होते.

ऑफर लेटर आणि फोनवरचे त्याच्याशी झालेल्या संभषणातून मला अनेक ठिकाणी रेड फ्लॅग दिसले, त्याला त्वरित सावधान केले.
(अ) ऑफर अत्यंत आकर्षक होती...
अनुभव नसतांनाही पाच आकडी पगार, वर रिलोकेशन, विमा... मुबलक पगारी सुट्या. अगदी खैरात.
(ब) त्याने जॉबसाठी अर्ज केला नव्हता. अनेक ठिकाणी त्याने नाव नोंदवले होते, प्रोफाईल तयार केला होता, पैकी कुठेतरी
" त्यांनी " याचे प्रोफाईल बघितले आणि म्हणून याला मुलाखतीसाठी निवडले.
मुलाखत फोनवरच होणार होती.
(क) नोकरी देणारी कंपनी कॅनडीयन... पण मुलाखत घेणारे भारतीय. बोलणे भारतीयच. शक्य आहे.
(ड) एव्हढ्या मोठ्या पगाराची, आणि जबाबदारीची नोकरी.... पण मुलाखत घेणारी एक (?) व्यक्ती, आणि job interview पण म्हणावा तेव्हढा वेळ चालला नाही.
एक तास ( किंवा ४५ मी.) अशी माझी अपेक्षा होती.
आणि किमान दोन मुलाखती... पहिला स्क्रिनींग ( non technical) आणि मग खोलवर (technical).
मुलाखती मधे कामाशी निगडीत ( technical expert) असे काही प्रश्न विचारले नाही.
मुलाखतीच्या वेळी तुमचा भावी बॉस, ज्याच्या सोबत आणि ज्याच्यासाठी तुम्ही काम करणार हा असतोच असतो... तो नसेल हे क्वचित घडते.

(य) सर्वात महत्वाचे ज्याने माझा संशय घट्ट झाला... जॉब ऑफर ३ वाजता मिळाल्यावर ३:३० ला कॅनेडीयन दूतावासाचे विसासाठीचे आमंत्रणाचा मेल. Happy हे असे कधी होणार नाही.

लोकल टॅलेन्ट वापरल्यावर - हे जॉब ऑफर चक्क बनावट होते, त्या कंपनीचा लोगो कॉपी पेस्ट केला होता. दोन तासांच्या परिश्रमानंतर हा फसवा-फसवीचा प्रकार आहे हे लक्षात आले. पुतण्या थोडा नाराज झाला... पण जाळ्यात अडकला असता तर पुढे काय झाले असते?

sometimes when things are too good to be true, they probably are.

माझ्याही भावाला असच सिंगापुर मधिल कंपनीत ऑफर मिळाली होती. पण फसवणूक दिसते असा सल्ला मी दिला. भाऊ नाराज झाला होता पण अशी फसवणूक टाळणे शक्य असते.

सोशल मीडीयात सध्या इंडीयन आयडॉलच्या धर्तीवर स्पर्धांचे पीक आले आहे. त्यांचे वेब पेज आकर्षक असते. वर्षाचा करार वगैरे पुरस्कारासोबत असे म्हटलेले असते. या स्पर्धांमधे एण्ट्री फीस म्हणून रू २९९९ पासून ते रू ९९९ पर्यंत पैसे घेतात. एका स्पर्धेत तर स्टुडीओज सुद्धा बुक केलेले होते. त्यामुळे अगदी खरंच वाटलं. माझी ऑडीशन होती त्या दिवशी किमान चार पाचशे जण तिथे येऊन गेले. कोविड मुळे प्रत्येकाला वेगवेगळा टाईम स्लॉट दिला आहे असे सांगितले. पण मागाहून लक्षात आले की एकमेकांशी संपर्क होऊ नये म्हणून असेल हे.

तर या स्पर्धेचा निकाल लागला. रँडमली तीन जणांना विजेते घोषित केले गेले की लगेचच त्याच स्पर्धेची दुसरी ऑडीशन सुरू. म्हणजे हा धंदाच झाला की. या सर्व स्पर्धा गेल्या जून पासून डिसेंबरपर्यंत तीन तीन वेळा झाल्या. अजून कुणाचा अल्बम बाहेर आलेला नाही.
मी नंतर त्या स्टुडीओत जाऊन आले तर त्यांनी सांगितले की तुमची गाणी तयार असतील तर रेकॉर्डिंग, मिक्सिंग वगैरेला इतका खर्च येणार नाही. म्हणजे उगीच जे पैसे घालवले त्यात एक अल्बम आला असता. (अर्थात त्याचे मार्केटिंग सोपे नाही हे पण आहेच).

पण कुणाला अशी पेजेस दिसली तर सगळी चौकशी करूनच नाव नोंदवा. लॉकडाऊनचा बरोब्बर फायदा घेतला गेला.

Pages