कारल्याची चटणी

Submitted by लालू on 20 March, 2009 - 11:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ कारली
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
१ चमचा मीठ
१ मोठा चमचा तिखट
१ चमचा साखर
थोडी हळद
तेल (२-३ मोठे चमचे लागेल)

क्रमवार पाककृती: 

कारली धुवून घ्यावीत. उभी चिरुन आतल्या बिया काढून टाकाव्यात. मग मोठेच तुकडे ठेवून मीठ लावून ५-१० मिनिटे ठेवावी. नंतर सुटलेले पाणी काढून टाकून किसून घ्यावीत. फूड प्रोसेसर मधून काढली तरी चालेल. अगदी बारीक करु नये. फूड प्रोसेसर मधून काढल्यास थोडा रस निघतो तो राहू द्यावा. नंतर सगळा निघून जातो.

एका मायक्रोवेवसाठी चालणार्‍या पसरट भांड्यात १ चमचा तेल घालावे. ते १५-२० सेकंद मायक्रोवेव मध्ये गरम करुन घ्यावे. त्यात मोहरी, जिरे, हळद घालावी आणि पुन्हा १५-२० सेकंद गरम करावे. मग त्यात किसलेली कारली घालून नीट मिसळावे आणि २ ते ३ मिनिटांसाठी मायक्रोवेव करावे. मग बाहेर काढून हलवावे. असे मिश्रण कोरडे होऊ लागेपर्यंत करावे. मधूनमधून थोडे तेल वरुन घालावे. मायक्रोवेवच्या पॉवरप्रमाणे अंदाज घेऊन वेळ कमी-जास्त करावा. कोरडे होऊ लागले की मीठ, साखर, तिखट, थोडे तेल घालावे आणि पुन्हा चटणी पूर्ण कोरडी होईपर्यंत मायक्रोवेव करावे. थंड झाल्यावर डब्यात भरुन ठेवावी. कोरड्या हवेत बाहेर ठेवली तरी टिकते. भाकरी किंवा चपातीबरोबर खावी. खाताना वरुन कच्चे तेल किंवा दही घ्यावे.

(चटणीचा फोटो टाकते लवकरच. )

वाढणी/प्रमाण: 
३-४ कारल्यांची १ वाटीभर चटणी होईल. कीस जास्त दिसला तरी चटणी कमी होते.
अधिक टिपा: 

ही चटणी मायक्रोवेवमध्ये करणे सोपे आहे. गॅसवरही करता येईल पण बराच वेळ लक्ष देऊन कारले खाली लागू न देता परतत रहावे लागेल.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालू
सोपी आहे की कृती. आता करुन बघेन मी ही चटणी. कारल्याचे पाणी न काढता तसेच ठेवले तर चटणी जास्त कडू लागत नाही का?

कडवट नाही होता का फार? फार झटपट लिहून काढलीस. केवढे हे मृप्रेम Happy

कडू होत नाही. आधी मीठ लावून ठेवून पाणी काढले आहे. नकोच असेल तर काढू शकता. पण कारल्याच्या कडूपणातच त्याची खरी गोडी आहे. Happy LOL

लालू, ही चटणी विकांताला करणेत येईल. माझा नवरा तुला असंख्य दुवा देईल Lol

लालू, कारल्यांची खडबडीत पाठ ठेवून द्यायची?

हो.

क्लास रेसिपी आहे. उद्या भाकरी बरोबर करणार. भरली वांगी , चटणि भाकरी आणि ताक.
जमल तर फोटो टाकीन.
................................................................................................
रोज ४ च पोस्ट लिहिणार. सेव्ह ग्रीन. Proud

मुंबईला माटूंगा भागात, कारल्याच्या सुकवलेल्या चकत्या मिळतात, त्या वापरून फार झटपट होईल हि चटणी. ( तामिळ लोकात अशी भेंडी, कारली, गवारी वाळवून ठेवायची पद्धत आहे )

मी पण बघेन करुन नक्की ही चटणी. सोप्पी वाटतेय.

लालू छान आहे चटणी.करून बघीन.

२००९ मध्ये करुन बघेन म्हटलेलं. २०११ संपायला आलं तरी मुहूर्त लागलेला नाही. Wink

मस्त लागली ही चटणी! ३ कारल्यांची केली नी एकटीनेच फस्त करून टाकली. आता पुढल्या वेळी डझनभर कारल्यांची करेन!

परवा एवेएठिला बिल्वाने सगळ्यांना खाऊ म्हणून ही चटणी दिली ती आज खाऊन बघितली. अप्रतिम चव. लगेच करुन बघणार.

वॉव....कसली सही आहे रेसिपी......नवरोबा खुश होईल एकदम Happy

भारी होते ही चटणी. कालच केली. दोन कारल्यांची अर्धी वाटी चटणी झाली. कारले चक्क मिक्सरवर फिरवले. मायक्रोवेव्हमध्ये साधारण आठ-दहा मिनिटं. मस्त कुडकुडीत झाली होती. वरुन दही घालून खाल्ली.
धन्यवाद लोला Happy

मी ही काल केली. मी साधारण ७,८ कारली घेऊन किसली आणि नंतर पिळून न काढल्याने मायक्रोवेवमध्ये काही खुटखुटीत होईना तेव्हा शेवटी तासभर बारीक गॅसवर परतलं. चव छान आहे. मी फोडणीत थोडे तीळही घातले.
रेसिपीकरता थॅन्क्स लोला.

बर्‍याच जणांना मुहूर्त मिळालेला दिसतो. धन्यवाद.

कीस जास्त असेल तर मायक्रोवेवमध्ये मोठ्या भांड्यात पसरुन ठेवावा. त्यामुळे लवकर होईल. थराची जाडी जास्त असेल तर वेळ लागेल. २-३ बॅचेसमध्ये करुन घेतली तरी चालेल.

फारच छान होते ही चटणी. आजच केली. अगदी सोपी कृती. मी किसल्यावर पाणी पिळून काढलं. अगदी पटकन झाली. Thanks लालू.

परवा हा बाफ वर आला तेव्हा पाहिला. याआधी मी कशी काय नव्हती पाहिली ही चटणी कोणास ठाऊक. आम्ही कर्नाटकात गेलो होतो तिथे 'कारल्याचं सासम' खाल्लं होतं. अतिशय चविष्ट पदार्थ होता तो. पाकृ विचारली तर कारल्याचे तुकडे तळून काढायचे असं म्हणाला तो खानसामा... मग तिथल्या तिथेच रद्द केली ती पाकृ. पण ही पाकृ वाचल्यावर एकदम ते सासमच आठवलं आणि मग काल करूनच टाकलं. कारली मायक्रोवेवात कुरकुरीत करायची युक्ती एकदम भारी आहे. १०० पैकी १०० मार्क. सासम करण्यासाठी दही फेटून त्यात मीठ, जरा जास्तच साखर, जीरेपूड घालून ठेवायची. आणि आयत्यावेळी वर लिहिल्याप्रमाणे कुरकुरीत कारली (कीस नाही, बिया काढून पातळ काचर्‍या करून त्याला हळद, मीठ, लाल तिखट, साखर आणि जरा जरा तेल घालून कुरकुरीत करायची) घालायची, सगळं नीट एकत्र करून त्यात साजूक तुपाची हिंग जिर्‍याची फोडणी घालायची.

गेल्या वेळेला मावेत करायचा प्रयत्न केला तो फसला होता पण आजचा एकदम यशस्वी. गेल्या वेळी कारली हातानेच किसली आणि यावेळी फुप्रोमध्ये किसून पिळून पाणी काढल्यावर मस्त कोरडी झाली.
त्यामुळे फुप्रोतच किसावीत.