रसग्रहण- कुसुमाग्रज - काही बोलायाचे आहे - मी_किशोरी

Submitted by मी_किशोरी on 27 February, 2018 - 09:48

काही बोलायाचे आहे
गीतकार - कुसुमाग्रज

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही

कुसुमाग्रजांच्या कवितेवर काही लिहण्यासाठीची पात्रता तेवढीच मोठी पाहिजे. त्यातली तिळभरही जवळ नसतानाही वर्षानुवर्षे आवडलेल्या, मनात घर करून राहिलेल्या आणि गुंजत राहिलेल्या गाण्याबद्दल लिहण्याचा मोह आवरत नाहीय. सर्वसामान्य रसिक, वाचक, श्रोता म्हणून अतिशय नम्रपणे या गाण्याशी जोडल्या गेलेल्या माझ्या काही भावना, कल्पना लिहण्याचा प्रयत्न.

मी सर्वप्रथम ही कविता वाचली नाही ऐकली, श्रीधर फडकेंच्या आवाजात भावगीताच्या स्वरूपात, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना. त्याआधी आणि नंतरही शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेर कविता, काव्यसंग्रह कधी शोधून वाचणे झाले नाही. वाचन भरपूर असले तरीही पुस्तके शोधताना काव्यसंग्रह थोडासा बाजूला ठेवला गेला. शाळेमध्ये मारून मुटकून कवितांवरच्या प्रश्नांची उत्तरे प्रस्तावना, संदर्भ आणि स्पष्टीकरणासहित लिहायला लागल्यामुळे असेल कदाचित... पण गाण्यांच्या स्वरूपात कविता भेटली की होणारा आनंद तुम्ही सर्वानीच अनुभवला असेल.

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

पहिले कडवे ऐकले तेंव्हा वाटले भक्तिगीत असावे, कवी देवावरच रागावलेला रुसलेला दिसतोय किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी भक्तिच्या आवरणात लपलेल्या दांभिकपणाने दुखावला गेला असावा. पण पुढची कडवी वेगळ्या वाटेने जाताना दिसली.

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही

कल्पनेतलया फुलांचा गंध कवीच्या मनावर दाटला आहे , कवीचे अंतरंग त्या सुवासात रंगले आहे. पण कवी स्वतःच त्या भावनांच्या कळ्यांना फुलणे नाकारतो आहे. अशी काय मजबुरी असेल?

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

एक गूज, कुणाचं तरी गुपित कवीला समजलंय. काही कल्पना नसताना, कशाचाही शोध सुरु नसताना अचानक विलक्षण गोष्ट समोर यावी तसे हे गुपित, नक्षत्रांच्या तोलामोलाचे गुपित त्याला गवसलंय. पण हे गुपित गुपितच राहणार आहे. कवी ते कुणालाही सांगणार नाही. 'परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही' - किती सुंदर लिहलंय हे! कल्पना सुंदर, भावना सुंदर की ज्या शब्दात हे सर्व गुंफले आहे ते शब्द सुंदर हे सांगणं खरंच कठीण आहे.

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

हे रहस्य त्या मेघाचे आहे, जो आकाशाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात एकटाच राहतो आहे. हा मेघ सगळ्यांहून वेगळा आहे, आपल्या जांभळ्या रंगात आपले गुपित लपेटून बसला आहे. पण त्याचे हे गुपित, कधीतरी त्याच्याच डोळ्यांनी बेईमानी केल्यामुळे कवीला कळले आहे. हे गुपित म्हणजे जांभळ्या मेघाची कवीप्रती असलेली भक्तिरूप प्रीती आहे, जी आजपर्यंत अव्यक्त होती पण आज नजरेतून व्यक्त झाली.
कवीच्या या प्रेमिकेला तर स्वतःलाच माहित होते, की आपल्या या प्रेमाला प्रतिसाद मिळणे फार दूरची गोष्ट आहे. शिवाय हे रहस्य कोणाला कळले तरी काही समाजमान्यतांना धक्का बसण्याची शक्यता वाटत असावी. पण प्रेम जडताना तर समाजमान्यतांचा, हिता-अहिताचा विचार करून जडत नाही ना. म्हणूनच आजवर हि प्रीती अव्यक्त राहिली आहे आणि सगळी काळजी घेऊनही ज्याची त्याला कळली आहे.

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही

तिच्या मनातील प्रेमभावनेच्या ओळखीने कवीच्या अंतरात तरंग न उमटतील तरच नवल! कवीही मोहरून गेला आहे, पण काही क्षणांसाठीच. पुढच्याच क्षणी त्याला उमगले, की हे ते दूरच्या किनाऱ्यावर उभे असलेले जहाज आहे, जे रुपेरी तर दिसते आणि मनाला भूल तर घालते आहे पण ते या किनाऱ्यावर कधीच येणार नाहीय.

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही

आता मात्र कवीच्या मनात वणवा पेटतो, एका नजरेच्या कटाक्षाने. तोही कुठलाही विभ्रम निर्माण करणारा कटाक्ष नाही तर भक्तिरूप प्रेम कवीला अर्पण करणारा कटाक्ष आहे. आणि अशा पवित्र प्रेमाचा आपण स्वीकार करू शकत नाही, या जाणिवेने वणवा पेटला आहे. कवीला जाळतो आहे. पण कवी या वणव्याची धग आपल्या त्या प्रेमिकेला लागू न देण्याचा, त्याच्या ज्वाला तिच्यापर्यंत पोहचू न देण्याचा निर्धार करतो आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या भावनांच्या आविष्काराला, सुंदर शब्दचित्राला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी तर स्वरांचा साज चढवला आहे श्रीधर फडके यांनी. त्याआधी अरुण दातेंनीही हे गाणं गायलं आहे. हे दोन्ही माझे आवडते गायक आहेत. हे गाणं आवडणारे माझ्या पिढीतले अनेक मायबोलीकर इथे असतील याची तर खात्री आहेच. मायबोलीकरांच्या नवीन पिढीमध्ये ज्यांनी हे गाणे ऐकले नसेल त्यांनी जरूर ऐकावे. यूटुबवर व्हिडिओज आहेत पण मी विनंती करेन की फक्त ऑडिओ ऐका. व्हिडिओज मलातरी थोडे विसंगत ओरिजिनलची तोडमोड करणारे वाटले.
ज्यांना हे गाणे आधीच आवडतं आहे त्यांनी या गाण्याशी निगडित असे त्यांचे स्वतःचे अनुभव, आठवणी, भावना नक्की लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कविता. तुमच्यामुळे वाचनात आली. रसग्रहण पण अजून लिहीता येइल. सर्व इमॅजरी किती छान आहे.