जर्मनी : लिंडरहॉफ पॅलेस आणि ओबरआमेरगॉव (म्युनिक- नॉईश्वानस्टाईन कॅसल डे टूर - भाग १)

Submitted by निरु on 25 February, 2018 - 05:57

जर्मनी : लिंडरहॉफ पॅलेस आणि ओबरआमेरगॉव
(म्युनिक- नॉईश्वानस्टाईन कॅसल डे टूर - भाग १)

Germany : Linderhof Palace And Oberammergau
(Munich-Neuschwanstein Castle Day Tour – Part 01)
मुखपृष्ठ – ००१
Will Update Picture Soon

जर्मनीला जायचं ठरल्यावर कुठल्या कुठल्या ठिकाणी भेटी द्यायच्या त्याचं Planning सुरु झालं. बरेच पर्याय पुढे आले. त्यातले काही मागे गेले,काही वगळले गेले. पण त्या सगळ्यात कायम आघाडीवर, अगदी पहिल्या नंबरवर राहिला तो म्हणजे जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा किल्ला आणि जर्मनीमधली सर्वात जास्त भेट दिली जाणारी इमारत आणि ती म्हणजे परिकथेतला नॉईश्वानस्टाईन कॅसल.

हा किल्ला जर्मनीमधल्या बव्हेरिया या परगण्यात आहे आणि शेजारी देश ऑस्ट्रियाच्या अगदी बॉर्डर (हद्दी) जवळ आहे.

आमच्या या जर्मनी टूर मध्ये म्युनिक या जर्मन शहरात आम्ही ५ दिवस होतो. एक अपार्टमेंटच बुक केलं होतं . त्यापैकी एक दिवस या प्रख्यात किल्ल्याच्या भेटीसाठी राखून ठेवला होता.

म्युनिक रेल्वे स्टेशनच्या बाहेरून बऱ्याच खाजगी कंपन्यांच्या आरामदायक बसेस या किल्ल्याची डे टूर घडवून आणतात.

या डे टूर मध्ये म्युनिक रेल्वे स्टेशनबाहेरून पिक अप, लुडविग-II या जर्मन राजाचा लिंडरहॉफ राजवाडा, ओबरआमेरगॉव हे गांव , नॉईश्वानस्टाईन किल्ला ज्या गांवात वसलेला आहे ते होहेनश्वांगॉव गांव , तिथे दुपारचे जेवण,नॉईश्वानस्टाईन किल्ला अथवा होहेनश्वांगॉव राजवाडा/ किल्ला या दोघां पैकी एका किल्ल्याला आपल्या मर्जीनुसार भेट (चॉईस दिला होता) आणि बसमधून परतीचा प्रवास. पण ड्रॉप मात्र म्युनिक रेल्वे स्टेशनऐवजी तिथल्याच एक प्रख्यात बीअर गार्डन जवळ, असा डे टूरचा भरगच्च प्रोग्राम होता.

या भागात आपण लिंडरहॉफ पॅलेस आणि ओबरआमेरगॉव हे चित्र रंगवलेल्या भिंतीच प्रसिद्ध गाव पहाणार आहोत. (खरं तरं या दोन ठिकाणांबाबत आधी आम्हाला नीटशी माहिती नव्हती. मूळ किल्ल्याबरोबर डे टूर मध्ये Part of the Package आहेच म्हणून घेतलं. पण प्रत्यक्ष पाहिल्यावर ही दोन्ही ठिकाणं म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्काच ठरला).

आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळीच या टूरचं पुढच्या दिवसासाठी बुकींग केले होतं . त्यांच्या सूचनेनुसार सकाळी ८. १५ वाजता आम्ही म्युनिक स्टेशनच्या बाहेरच्या त्यांच्या बस स्टॉपपाशी पोहोचलो. तिथे आमच्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन २ x २ बसेस उभ्या होत्या. त्यापैकी पहिल्या बसमधे आमचा नंबर लागला. बसमध्ये बसल्यावर जरा वेळातच बस निघाली आणि आमच्या डे टूरची सुरुवात झाली .

बराचसा प्रवास हायवेने (ए-९५) होता. काही छोटीशी जर्मन शहरं ,गावं आणि बराचसा अतिशय विरळ वस्तीचा, हिरव्या कुरणांचा प्रदेश यामधून आमचा प्रवास चालू होता.

जसे माझे "स्विस स्केप्स: आगगाडीच्या रुळांवरून" यामधले फोटो ट्रेन मधून काढलेले होते तसे ह्या प्रवासातले फोटो चालत्या बसमधून, काचेमधून काढलेले आहेत आणि म्हणूनच थोडे ब्लर, थोडे अनक्लिअर आहेत.
मात्र बसच्या काचेच्या आतून ही छायाचित्रे टिपली असल्यामुळे तो एक काचेचा अडसर आणि त्या काचेमधील प्रतिबिंब (Reflection) तुम्हाला ह्यातल्या काही क्षण चित्रात आढळेल. पण लेखाला पूरक ठरतील म्हणून इथे दिले आहेत.

प्रचि ०१: म्युनिक मधून बाहेर पडल्यावर मध्यम किंवा विरळ लोकवस्तीची अशी दृश्य दिसायला लागतात. पण प्रत्येक ठिकाणी एखादं चर्च किंवा चॅपेल हे दिसतंच दिसतं . दृश्य साधारणपणे स्विझर्लंडमधल्या ग्रामीण भागासारखंच. . . . .कारण देशाच्या सीमा बदलल्या तरी प्रदेश सारखाच. . . वातावरणही सारखंच आणि आल्प्सचं सान्निध्य ही सारखंच.

प्रचि ०२: आल्प्सची पार्श्वभूमी...

प्रचि ०३: विरळ लोकवस्ती आणि गवता-कुरणांचा प्रदेश -०१

प्रचि ०४: गवता-कुरणांचा प्रदेश -०२

प्रचि ०५: लिंडरहॉफ पॅलेसकडे नेणारा प्रवेश रस्ता

प्रचि ०६: राजवाड्याकडे जाताना उजव्या हाताला लागलेलं हे तळं आणि पाठीमागे आल्प्सची पार्श्वभूमी. . . . सगळ गवत हिरव्या कंच रंगाचं आणि दाट झाडांच्या सावलीने वेढलेलं. इथल्या कुठल्या तरी झाडाखालच्या सावलीत ह्या गवतावर पहुडावं, मनमुराद लोळावं अशी इच्छा प्रत्येकालाच होत असणार. मला तर नक्कीच झालेली. (नशीब माझं कि मी हरिण किंवा ससा नव्हतो. . . . कि दुर्देव माझं कि मी हरिण किंवा ससा नव्हतो...?)

प्रचि ०७: राजवाड्याकडे . . . . सगळ्या हिरवाईत हे एक लाल पानांचं झाड

प्रचि ०८: राजवाड्याच्या रस्त्यावर. . . .अजून एक, खर तर दोन लाल पानांची झाडं

आमचं टूर मधलं पहिलं ठिकाण होतं राजा लुडविगने बांधलेला लिंडरहॉफ पॅलेस .

राजा लुडविग -II याने ३ राजवाडे बांधले, त्यातला हा सर्वात लहान राजवाडा. आणि हा एकमेव राजवाडा जो लुडविग पूर्ण झालेला पाहू शकला. खरं तर सन १८८६ मध्ये हा राजवाडा त्याच्या सर्व वैभवासह पूर्ण झाला आणि त्याच वर्षी नंतर राजा लुडविग-II दुर्दैवी, अकाली, अनपेक्षित आणि रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावला.

पण हा राजवाडा म्हणजे आधीच्या वास्तूचे भव्य राजवाड्यामध्ये रूपांतर असल्यामुळे राजाला ह्या राजवाड्यात रहाता तरी आले.

मोठा झाल्यावर लुडविग राजाचं जास्तीत जास्त वास्तव्य ह्याच राजवाड्यात असे.

हा राजा ज्याला वेडा राजा (Mad King Ludwig) म्हणून ओळखलं जातं, तो स्वतः कलासक्त मनाचा होता. सुंदर इमारती बांधण्यात त्याला रुची आणि गती होती. बांधकामाच्या आराखड्यात आणि बाह्यरूपात बाह्यसौंदर्यात त्याला रस होता. या सर्वांमध्ये त्याचा सहभाग असे तसंच तो त्यात हस्तक्षेपही करी आणि हा हस्तक्षेप कलात्मक दृष्टीने चांगलाच असे हे त्याने उभारलेल्या इमारतींवरून सिद्ध झालेले आहे.
या राजाला त्याच्या इमारती एखाद्या आधी झालेल्या , त्याला आवडलेल्या इमारतीच्या संकल्पनेवर डिझाईन करायची, ती संकल्पना फुलवायची सवय होती.

फ्रान्सचा राजा १४वा लुई हा राजा लुडविग II चा आदर्श होता. आणि १४व्या लुईचा पॅरिसचा व्हर्सायचा राजवाडा हा लुडविगचे लिंडरहॉफ राजवाडा बांधण्यामागचे प्रेरणास्थान होते.

त्यामुळे दोघांच्या आकारमानात खूप फरक असला तरी व्हर्सायच्या राजवाड्यातील आणि त्याच्या परिसरातील सूर्य-प्रतिमा, किंग्ज कॉटेज, आईने महल, ह्या गोष्टींचा वापर लिंडरहॉफ राजवाड्यातही झालेला दिसतो.

प्रचि ०९ : राजवाड्याचे पहिले दर्शन...

प्रचि १०: राजवाड्याचे प्रवेश द्वार. तीन कमानीच्या मधून प्रवेश आणि कमानींच्या बाजूंवर चार सशक्त पुरुषांच्या शिल्पाकारातील दगडी ब्रॅकेट वर तोललेला सज्जा.
सज्जाचे रेलिंग आणि कठडा काळ्या आणि सोनेरी रंगाच्या अतिशय डेकोरेटिव्ह बिडाच्या जाळीमध्ये....

प्रचि ११: दगडी पुरुष शिल्प (अॅटलस) : जवळून

प्रचि १२: मात्र राजवाड्यात प्रवेश करण्यापूर्वी टूर गाईड आपल्याला राजवाड्या समोरचे कारंज पाहायला आणि तिथून वर जाणाऱ्या पायऱ्या चढून वर जायला सांगतो. कॅमेराही कॅरी करायला सांगतो. कारण हि एक अशी जागा आहे जिथून अख्खा राजवाडा त्याच्या सभोवतालासह, कारंजासह, विविध दगडी शिल्पांसह, वर खाली जाणाऱ्या सुरेख रेखीव पायऱ्यांसह आणि मागे चढत जाणाऱ्या हिरवळीच्या पार्श्वभूमीसह आपल्या नजरेच्या कवेत येतो.
आणि ते समोरचं दृश्य पाहिलं की मग लुडविग -II ने निर्मिलेली लिंडरहॉफ राजवाडा हि एक उत्कृष्ट, रमणीय आणि अविस्मरणीय वास्तू आहे, असं का म्हटलं आणि मानलं जातं त्याचा आपल्याला प्रत्यय येतो.

Will Update Picture Soon

लहान लुडविग खरं तर त्याच्या बाबांबरोबर शिकारीसाठी ह्या किंग्ज कॉटेज नावाच्या गवताळ कुरणं असलेल्या आणि जंगल- डोंगराच्या सानिध्यातील प्रॉपर्टीमध्ये यायचा.

हि जागा, हा परिसर आवडल्यामुळे त्याने हेच कॉटेज लहानपणी लुडविग इथे ज्या फाॅरेस्टर्स हाऊस (Royal Hunting Lodge) मधे रहायचा ते मोठा झाल्यावर त्याने वाढवलं.
नंतर हळूहळू त्यात त्याने टप्प्याटप्प्याने (Phase Wise) खोल्यांची भर घातली... आणि मग मूळ Lodge संपूर्ण पणे काढून टाकलं..
त्यामुळे म्हटलं तर त्याने मूळ इमारतीत भर घातली आणि म्हटलं तर जुनी इमारत संपूर्ण पणे पाडून टाकली..
आणि याचमुळे तो ह्या राजवाड्यात बराच काळ राहू शकला.

हा राजवाडा आर्किटेक्चरच्या रोकोको स्टाईलमधे बांधला आहे.

१८ व्या शतकात पॅरिसमध्ये उदय पावलेल्या , नंतर फ्रान्सभर पसरलेल्या आणि नंतर अन्य युरोपियन देशात, विशेषतः ऑस्ट्रिया आणि जर्मनीमध्ये विशेष वाढ झालेल्या Rococo Architectural style मध्ये ह्या राजवाड्याचे बांधकाम आहे. त्यामुळे सहाजिकच ह्या शैलीचे वैशिष्ट्य असलेल्या अतिशय डेकोरेटिव्ह घटकांची यात रेलचेल आहे.

प्रचि १३: राजवाड्याची उजवी बाजू.

हेच डेकोरेटिव्ह घटक राजवाड्याच्या अंतरंग सजावटीतही (Interior) दिसून येतात.
मात्र दुर्दैवाने ह्या राजवाड्याच्या अंतर्भागाचे छायाचित्रण करण्यास मनाई आहे, म्हणून ह्या सर्व प्रतिमा केवळ राजवाड्याला प्रत्यक्ष भेट देऊन अथवा आंतरजालावरतीच पाहता येतात. त्यामुळे प्रत्यक्ष राजवाडा पाहिला तरी फोटो काही काढता आले नाहीत म्हणूनच केवळ वाचकांना थोडीशी कल्पना यावी यासाठी आंतरजालावरून काही प्रचि इथे साभार देत आहे.

प्रचि १४ : आईने महल (Hall of Mirrors) हि ह्या राजवाड्यातील एक अतिशय खास जागा. ही खोली लुडविग ची अतिशय आवडती होती. कारण हा निशाचर राजा दिवसा झोपायचा आणि रात्रभर जागा राहून ह्या खोलीतल्या एखाद्या कोनाड्यात बसून पुस्तकं वाचायचा किंवा बऱ्याच मेणबत्त्या पेटवून आरसे महालातल्या असंख्य आरशांमध्ये त्या ज्योतींच्या अनंत प्रतिमा पहात त्या उजेडात आनंदाने हरवून जायचा. (आंतरजालावरून साभार)

प्रचि १५: सोनेरी रंगाची खुर्ची, सोनेरी मोल्डींग्ज्, मयूर नील रंगाचा (Peacock Blue) रेशमी पडदा आणि गालिचा (आंतरजालावरून साभार)

हे त्याचे खाजगी निवास स्थान असल्याने या राजवाड्यात त्याचे सिंहासन नाही. राजवाड्यामधील एकंदर गोल्ड प्लेटिंगसाठी सुमारे ५ किलो सोन्याचा वापर केलेला आहे.

प्रचि १६: लुडविग राजाची बेडरूम (आंतरजालावरून साभार)

प्रचि १७: ऑडियन्स रूम (आंतरजालावरून साभार)

राजवाड्याच्या परिसरातील बगिचांमध्ये लँडस्केपिंगची आखीव रेखीव आणि भौमितिक स्वरूपाची “बरोक” शैली, इंग्लिश शैली आणि इटालियन रेनेसान्स शैली यांचा सुयोग्य मिलाफ आहे. आणि म्हणूनच या बागा जगातील सर्वात सुंदर बगिच्यांपैकी एक म्हणून गणल्या जातात. ह्या लँडस्केप्ड बागा जवळजवळ सव्वाशे एकरात पसरलेल्या असून सभोवतालच्या नैसर्गिक अल्पाईन लँडस्केप मध्ये त्या छान मिसळून जातील असे त्यांचे डिझाईन आहे.

प्रचि १८: अश्व शिल्प कारंज (Neptune Fountain) आणि पाठीमागे चढावरती दिसणारे Music Pavilion
हे कारंजामधलं पाणी आल्प्स पर्वताच्या उतारावरून वहाणार्या नैसर्गिक झऱ्याचं पाणी आहे.

प्रचि १९: बागेतील पुतळा – ०१

प्रचि २०: निळे स्वछ आकाश...

प्रचि २१: आखीव रेखीव भौमितिक बाग -०१ (मला स्वतःला लँडस्केपिंगची ही भौमितिक शैली अजिबात आवडत नाही, सगळं फार कृत्रिम वाटतं)

प्रचि २२: आखीव रेखीव भौमितिक बाग -०२


प्रचि २३: आखीव रेखीव भौमितिक बाग -०३

(पॅव्हेलियन आणि त्याच्या वाटेवरील बाण मारणाऱ्या मदनाचे कारंजे) (Cupid Fountain)

प्रचि २४: बागेतील पुतळा – ०२

प्रचि २५: परतीच्या वाटेवरील ताटवा

प्रचि २६: राजा लुडविग II चा ब्राँझ मधला अर्धपुतळा

प्रचि २७: बसकडे जाताना सभोवतालचे Alpine Landscape

लिंडरहॉफ राजवाड्यानंतर आमचे पुढचे ठिकाण होते ओबरआमेरगॉव (Oberammergau).
लिंडरहॉफ पॅलेसमधून जवळच असलेले हे गांव नॉईश्वानस्टाईन किल्ल्याच्या वाटेवरच आहे. हे गाव प्रसिद्ध आहे ते गावातील कोरीव लाकूडकाम करणारे कारागीर, त्यांनी बनवलेल्या कोरीव लाकूड कामाच्या वस्तू , दर १० वर्षांनी होणारे पारंपारिक Passion Plays , Nato School आणि मुख्यत्वे परिकथेतील अथवा धार्मिक चित्रं आणि त्रिमितीय भास होणारी चित्रं रंगवलेली रंगीबेरंगी घरे (Frescoed इमारती) यांसाठी.
म्हणूनच याला " Town of Painted Buildings " असे म्हणतात.

यामधली Architectural चित्रं म्हणजे एखाद्या साध्याशा खिडकीला किंवा दरवाजाला बाजूने एवढं छान रंगीत चित्र काढून Detailing करतात कि ती खिडकी , तो दरवाजा एकदम शाही अथवा विशेष (Special) होऊन जातो. आणि इमारतीचं रुपचं पालटतं.

प्रचि २८: या इमारतीच्या १ ल्या मजल्यावर धार्मिक प्रसंग चितारलेला आहे. उजवी कडचा कोपरा म्हणजे सपाट भिंत असली तरी त्यात चित्र रंगवण्याच्या पध्दतीमुळे कमानदार त्रिमितीय दरवाज्याचा (3 Dimensional Arched Door) भास होतो.

तर डाव्या कोपऱ्यात एखाद्या घराच्या व्हरांडयाचा भाग, पायऱ्या, व्हरांडयाचं छप्पर असा आभास रंगवण्यामधून, त्याच्या लाईट्स आणि शेडमधून होतोय. आणि याच चित्रांसाठी ओबरआमेरगॉव प्रसिद्ध आहे.

प्रचि २९: हे पण एक तिथले टिपिकल उदाहरण. हे चित्र बहुतेक त्यांच्या एखाद्या परिकथेतील असावं. त्याच्या खालच्या खऱ्या खिडक्या साध्या सुध्याच आहेत पण त्यांच्या मध्ये रंगवलेले गोल खांब, त्या खांबाचं सोनेरी, डेकोरेटिव्ह कॅपिटल, खिडक्यांच्या कमानीवरची सोनेरी, वळणदार पानाफुलांच्या डिझाईनची वेलबुट्टी यामुळे खिडक्यांना एक भारदस्तपणा आणि उच्चभ्रू राजेशाही रुप आलं आहे.

ही सुद्धा ओबरआमेरगॉवची खासियत.
या शिवाय याच इमारतीचं (Hotel चं) आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे लाकडापासून बनवलेले गॅलरीचें कठडे.

प्रचि ३०: पार्श्वभूमीवर ओबरआमेरगॉवचा Signature Mountain समजले जाणारे Kofel शिखर.
या शिखराच्या डोक्याचा भाग लक्षात येईल असा पांढरा आहे. शिखराच्या माथ्यापर्यंत साधारणपणे १.० किलोमीटरचा सौम्य चढ असल्यामुळे आणि तिथे टोकाला एक छान सूळ (Cross) असल्यामुळे बरेच ट्रेकर्स याच्या माथ्यापर्यंत जात येत असतात.

प्रचि ३१: Kofel पहाडावरचा सूळ (Cross). शेजारी काही माणसंही दिसतायत.

प्रचि ३२: सुळाचा (Cross) Close Up..

प्रचि ३३: लाकडी कठड्यांची आणि बाल्कनीत लाकडी सूळ असलेली एक इमारत.

प्रचि ३४: ओबरआमेरगॉव मधला एक निवांत रस्ता. रस्त्याला काँक्रीट आणि दगडी पेबल्सचे फूटपाथ.
(हि जागा रुंद रस्त्यावर वसली आहे आणि इथे माणसांची, गाड्यांची अजिबात गर्दी नाही एवढा फरक वगळता जुन्या मुंबईची विशेषतः गिरगाव, कांदेवाडी, फणसवाडी वगैरेंची आठवण करून देणारा परिसर)

प्रचि ३५:अजून एक रंगवलेली इमारत...

प्रचि ३६: हा एक कॅफे. दोन्ही बाजूला परिकथेतील चित्रं रंगवलेला आणि मधल्या खिडक्यांना वर आणि खाली डिझाईनची रंगवलेली पट्टी आणि वर तिरक्या होत जाणाऱ्या कौलारू छपराचा आभास निर्माण करणारं रंगकाम. चित्रात उन्ह जाणवत असलं तरी तापमान १६ ते १८ डिग्री. . . . So Chill . . . .

प्रचि ३७: दुकानासमोरच्या शोभिवंत फुलांच्या कुंड्या...

प्रचि ३८: हे Passion Play होणारं Passion Play Theater. सन १६३४ पासून या प्लेज ना सुरुवात झाली. ज्या वर्षाच्या शेवटी शून्य असते अशा वर्षी म्हणजे दर दहा वर्षांनी हे प्लेज केले जातात. या पुढचा प्ले आता सन २०२० ला आहे. त्या वर्षी ५ महिने हे प्ले केले जातील. ह्या Plays चं बुकिंग आत्तापासूनच सुरु झालयं. . . .

प्रचि ३९: या Play Theater समोर एक छान बाग आहे. जिच्या भोवती खूप छान म्युरल्स , स्कल्प्चर्स ची मांडणी केलेली आहे.

प्रचि ४०: म्यूरल

प्रचि ४१: बसायला छान बाकं असलेल्या या बागेतलं एक महत्त्वाचं स्कल्प्चर : गाढवावरचा ख्रिस्त (Jesus On Donkey)

प्रचि ४२: Close Up of "Jesus On Donkey"

प्रचि ४३: अजून एक म्यूरल : Rottwagen

इथे दुकानात लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंची आणि त्या टिपिकल ककू क्लॉक्सची रेलचेल असते. पण टूरच्या वेळेच्या मर्यादेमुळे ते फार काही बघता आलं नाही.

प्रचि ४४: हि ती टिपिकल ककू क्लॉक्स...

प्रचि ४५: लाकडी कारागिरीच छान उदाहरण: लाकडी घुबड...

यानंतर आम्ही शेवटचं ठिकाण पाहिलं ते म्हणजे "सेंट पीटर व पॉल "चे चर्च.

प्रचि ४६: सेंट पीटर आणि पॉल चर्चचा Bell Tower...

प्रचि ४७: Bell Tower- Close Up

प्रचि ४८: चर्चचा अंतर्भाग....


आता मात्र आमची ह्या गावातली वेळ संपत आलेली म्हणून मग धावत पळत बसपाशी गेलो.
यानंतर आम्ही बसमध्ये चढलो ते या टूरचं सर्वात मोठं आकर्षण असलेला नॉईश्वानस्टाईन कॅसल - एका वेड्या राजाचे स्वप्न पाहण्यासाठी.

(क्रमश:)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा... मेजवानी आहे ही.. एका फटक्यात जेवून उठून चालायचे नाही, एकेक फोटो रेंगाळत नीट निरखून पाहायला हवा....

बाकी, मी मी असते तरी लोळले असते, हरीण किंवा ससा व्हायची इच्छा करत थांबले नसते Happy Happy

साधना, पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल खूप आभार...
आणि हरिण किंवा ससा हे मी ते लुसलुशीत गवत खाण्याच्या संदर्भात म्हणत होतो... Bw

आता निवांत परत वाचले सगळे. फोटो सगळेच सुंदर आहेत. अंतरजालावरून घेतलेले फोटोही छान. राजवाड्यात आत खूप रेलचेल दिसतेय वस्तूंची.

लुडविगची भानगड नीटशी लक्षात आली नाही. मूळ इमारत तशीच ठेऊन त्यावर रचना फुलवायला आवडते असे लिहिलेत, त्याने इमारत पूर्ण पाडून परत बांधली असेही लिहिलेत. तो राहत असलेला राजवाडा व पाडून बांधलेली वास्तू वेगवेगळी आहे बहुतेक.

तो एक मधला फोटो, तुम्ही राजवाड्यात जायच्या आधीचा, राहिलाय द्यायचा.

रंगवलेले गाव आवडले. फक्त त्यांनी नाव लहान ठेवले असते तर बरे झाले असते Happy

आर्किटेकटच्या नजरेतून इमारत वर्णन वाचायला मजा येते.

मस्त वर्णन आणि फोटो ही.

मोबाईल मधून आणि चालत्या बस मधून ही किती सुंदर फोटो काढता तुम्ही. स्विस चे फोटो बघितले तेव्हा ही हेच आलं होतं मनात.

@ साधना
<<< लुडविगची भानगड नीटशी लक्षात आली नाही. मूळ इमारत तशीच ठेऊन त्यावर रचना फुलवायला आवडते असे लिहिलेत >>>
असं नाही म्हणायचंय..
दोन गोष्टी बहुतेक एकत्र केल्यात तुम्ही...
लुडविग राजाला त्याच्या इमारती अन्य छान इमारतींच्या संकल्पनेवर, डिझाईन वर बेतायची सवय होती.
ह्या राजवाड्याचे (लिंडरहाॅफ पॅलेस) डिझाईन त्याने फ्रान्समधल्या व्हर्साय च्या राजवाड्यावर बेतले आहे.
१४व्या लुईचा व्हर्सायचा राजवाडा, त्याचे डिझाईन ही त्याची लिंडरहाॅफ पॅलेस बांधण्यामागची प्रेरणा होती..
मात्र बांधकामाचे डिटेल्स जसेच्या तसे वापरण्याऐवजी तो त्यात स्वतःच्या आवडीनुसार फेरबदल करायचा, ते अजून खुलवायचा..

<<< त्याने इमारत पूर्ण पाडून परत बांधली असेही लिहिलेत. तो राहत असलेला राजवाडा व पाडून बांधलेली वास्तू वेगवेगळी आहे बहुतेक. >>>

इथे स्पष्ट करतो आणि लेखात थोडी अधिक माहिती देतो..
लहानपणी लुडविग इथे ज्या फाॅरेस्टर्स हाऊस (Royal Hunting Lodge) मधे रहायचा ते मोठा झाल्यावर त्याने वाढवलं. नंतर हळूहळू त्यात त्याने टप्प्याटप्प्याने (Phase Wise) खोल्यांची भर घातली... आणि मग मूळ Lodge संपूर्ण पणे काढून टाकलं.. त्यामुळे म्हटलं तर त्याने मूळ इमारतीत भर घातली आणि म्हटलं तर जुनी इमारत संपूर्ण पणे पाडून टाकली..
आणि याचमुळे तो ह्या राजवाड्यात बराच काळ राहू शकला.

<<< रंगवलेले गाव आवडले. फक्त त्यांनी नाव लहान ठेवले असते तर बरे झाले असते >>>
हो. मलाही टाईपताना त्रास झाला.. Bw

मंजूताई, मनीमोहोर ...
लेख आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद...

@ मनीमोहोर....
ह्यातले सुरुवातीचे काही फोटो चालत्या बसमधून आणि स्वित्झर्लंड स्विसस्केप्स् लेखातले बरेचसे फोटो जरी चालत्या ट्रेन मधून काढले असले तरी ते मोबाईलवर काढलेले नाहीत.
अर्थात कॅमेरा साधाच Point & Shoot Camera आहे...
(आणि त्या काळात मोबाईल मधला कॅमेरा ही तेवढा प्रगत नसायचा...)

अप्रतिम..
माझे शब्द संपले..
कशाकशाची तारीफ करु कळेना..लिहित राहा..

मध्यंतरी गुगल फोटोजच्या काही सेटींग्जमुळे प्रचि दिसत नव्हते.
आता त्यात बदल केल्यामुळे प्रचि दिसायला लागले आहेत, यासाठी धागा वर काढत आहे..