बदलांना सामोरे जा

Submitted by Pradipbhau on 20 February, 2018 - 11:22

बदलांना सामोरे जा
एकवीसाव्या शतकाकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. एका बाजूला डिजिटल क्रांतीची स्वागतार्ह भाषा सर्वत्र केली जात आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक बदलाच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 21 व्या शतकातील सर्वात मोठा धोका कोणता असेल तर तो कौटुंबिक नाती टिकविण्याचा. जीवनात आपणास सर्व काही हवे तसे मिळत नाही. सर्वच अपेक्षांची पूर्तता कधी होत नाही. जे मिळाले आहे ते मनापासून स्वीकारणे. जे मिळाले नाही ते आपल्या नशिबात नाही असे समजून वाटचाल करणे गरजेचे ठरणार आहे. काही प्रसंगी मनाला मुरड घालता आली पाहिजे. आपल्यापेक्षा गरीब
असलेल्या कुटुंबाकडे आपण पाहण्यास शिकले पाहिजे. म्हणजे जीवनात मनस्ताप दुःख रहात नाही. वरच्या थरातील लोकांकडे पाहून मनस्ताप करून घेण्यात काय अर्थ आहे. ?
आज कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस आली आहे. कौटुंबिक नाती टिकवण्यासाठी समायोजन करण्याची आवश्यकता आहे. आज हा अत्यंत गंभीर प्रश्न बनत चालला आहे. कौटुंबिक नाती अबाधित रहाण्यासाठी काय उपाय योजना करावी लागेल. याचा सर्व पातळीवर विचार होण्याची गरज आहे. घराघरातून किरकोळ कारणातून वादाचे प्रसंग उदभवत आहेत. विभक्त कुटुंब पद्धती त्यात दोघेही नोकरी करणारे त्यामुळे मुलाकडे लक्ष देण्यास कोणाला सवड नाही. त्यातूनच युवकांच्या आत्महत्या वाढत आहेत.
आज समाजात बदल झपाट्याने होत आहेत. कोणत्याही क्षेत्रात बदल अपेक्षित असतात. त्या बदलांना कोणी रोखू शकत नाही. काळाची पावले ओळखून ते स्वीकारावे लागतात.
21 व्या शतकात अनुरूप विवाह ही संकल्पनाच बदलते कि काय असे आता वाटू लागले आहे. एका बाजूला मुलिंची घटत चाललेली संख्या तर दुसऱ्या बाजूला अनुरूप जोडीदार याचा मेळ कठीण होऊन बसणार आहे. मुलापेक्षा मुलीच्या अपेक्षा वाढत आहेत. एकुलता एक मुलगा हवा चांगली नोकरी हवी पुण्या मुंबईत स्वतःचा फ्लॅट हवा सासरी फार माणसे नकोत अशा अटी आता पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मुळातच लग्न जमणे अवघड. जमलेच तर दोन्ही बाजूनी ते टिकणे त्यापेक्षाही अवघड होऊन बसणार आहे. पूर्वी जन्मोजन्मी हाच किंवा हीच मिळावी अशी धारणा होती. आज तरूण पिढीची मानसिकता बदलत चालली आहे. विचारांच्या आदान प्रदानात मतभेदाचे अडथळे येत आहेत. दोघाचे विचार पटत असतील तर एकत्र रहा अन्यथा फारकत घ्या असा नवा विचार रुजू लागला आहे. आत्त्तापासूनच त्याची सुरवात झाली आहे. आणखी काही वर्षात त्याची तीव्रता अधिक खोल होणार आहे. किरकोळ वादातून घटस्फोट करणाऱ्या मुलीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुझ्याप्रमाणे मी देखील कमावते असा अहंभाव त्याच्या मनात रुजू लागला आहे. मिळवत्या व्यक्तीचे घरात वर्चस्व असा सूर फार पूर्वीपासून चालत आहे. त्याला छेद बसण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. मी देखील कमवते मग का सहन करेन अशी मुलीची धारणा बनत चालली आहे.
सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर त्यामुळे नातेसंबंध दुरावत आहेत. पूर्वीच्या लोकात बदल वृत्ती होती.स्वातंत्र्याच्या नावाखाली आज कोणी सहजासहजी बदलास तयार होत नाही. वादामुळे घरातील संवादच संपला आहे. टीव्ही वरील मालिका घरगुती वादाला प्राधान्य देत आहेत. खत पाणी घालत आहेत. सासू सुनाचा वाद, नवऱ्याचं बाहेरवालीच लफडं, मुलांसमोर मद्याचे घोटअसे विकृत चित्रण होत आहे. माणसं जेवायला विसरतील पण मालिका चुकवणार नाहीत हे आजचे वास्तव चित्र आहे. चंगळ संस्कृती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुलामुलीच्या लग्नानंतर त्यांच्या संसारातील आई वडिलांचा हस्तक्षेप कमालीचा वाढताना दिसत आहे. कोणी कोणाचे ऐकायचे कोणी बदलायचे यातून नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यात वादाची दरी वाढत आहे.समज, गैरसमज, संशयी वृत्ती, व्यसन, हेकेखोर यामुळे सतत वादाच्या ठिणग्या उडत आहेत.
मेड फॉर इच आदर असे म्हणून एकत्र कुटुंब पद्धती कधीही टिकणार नाही. घराघरातील मनमोकळा संवाद हरवला आहे. दबक्या आवाजातील सूर गैरसमज वाढवत आहेत. एखादी गोष्ट पटली नाही तर घरातील मंडळी स्पष्टपणे बोलत नाहीत. घरातील मोकळेपणा हरवत चालला आहे. नको त्या गोष्टीत स्पर्धा केली जात आहे. ती थांबण्याची गरज आहे.
माहेर चांगलं सासर वाईट ही भावना बदलण्याची गरज आहे. माहेरची माणसं की खुषीका मोहोल मात्र सासरची माणसं आली की कपाळाला आठया हे दृश्य आजही पहावयास आहे. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तर लगेच ब्रेकअप चा विचार डोकावत आहे.
नातेसंबंध सुधारावे वाटतअसेल तर कोणीही प्रतिष्टे चा प्रश्न करता कामा नये. अहंकार दूर करून बदलाची भूमिका स्वीकारलीपाहिजे. वाद किती ताणायचे याची एक सीमारेषा आखण्याची गरज आहे. कोणतेही प्रश्न वादाने सुटत नाहीत तर ते संवादाने सोडवावे लागतात. याची जाण ठेवण्याची आज गरज आहे. पूर्वी घर कसे भरलेले होते. आजी आजोबा मुले नातवंडे सुना असा मोठा परिवार एकत्र रहात होता. काळ बदलला. हम दो हमारे दो च्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. त्यातून काही चांगल्या बाबी घडल्या तशा समस्याही निर्माण झाल्या.
बदलांना सामोरे जाण्याची भाषा ज्यावेळी आपण करतो त्यावेळी सामाजिक रचनेचा मूळ उद्देश विसरला जाता कामा नये हेही विचारात घेतले पाहिजे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख आवडला।
सामाजिक रचनेचा मूळ उद्देश विसरला जाता कामा नये हेही विचारात घेतले पाहिजे. >>>+१

कर्मा इज अ बिच.

लग्नाच्या बाबतीत प्रचंड चूजी झालेल्या मुलींना आपला फुल्ल सपोर्ट आहे. त्यांना त्यांच्या टर्म्सवर हवे ते मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. आजवर पुरुषांनी खूप माज केला. आता मुलींची बारी.

प्रदीप, तुम्ही मांडलेल्या गोष्टी पटण्या सारख्या आहेत. अशा प्रकारची मत असणारा एक मोठा समाज असावा अस मला एकूण लग्ना संबंधातील लेखन किंवा नाटके यातून वाटते. भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून रहावी यासाठी कुटुंब व्यवस्थे विषयी तळमळ असणारी लोक करत आहेत आणि तो स्तूत्य आहे. मला ही एक भारतातल्या समाजिक बदलाची एक स्थीती आहे अस वाटते. ज्यावेळी अमेरिकेमध्ये स्त्री स्वातंत्र्याची चळवळ सुरु झाली तेव्हा त्याला विरोध असणार्या लोकांनी मागच्या शतकात अस वर्तवले होते कि या पुढे लग्न फारशी टिकणार नाहीत. याचा अर्थ लग्न टिकवण्या साठी स्त्री स्वातंत्र्य नसावे असा नाही. ही एक बदलणारी परिस्थीती आहे.

भारतामध्ये आज पर्यंत लग्ने कुटुंब संस्थेचा एक भाग म्हणून केली जात होती. अजून ती दोन व्यक्तींची गरज म्हणून केली जात नाहीत. ज्यावेळी ती दोन व्यक्तींची सहचर्याची गरज म्हणून केली जातील तेव्हा या समस्या फारशा उद्भवणार नाहीत. जशी भारतात अनेक सामाजिक परिवर्तने आली, तसे ढासळती लग्न व्यवस्था हा एक सामाजिक परिवर्तनाचा भाग म्हणून का नाही स्विकारायचा? असा एक विचार मना मध्ये येतो. सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी या अस्थायी आणि संपणार्या आहेत त्यामुळे आमच्या पालकांच्या काळामध्ये जशी कुटुंब संस्था होती, त्या आठवणी आम्हाला कितीही प्रिय असल्या तरी तशी या पुढे रहायला हवी असा अट्टाहास कशा साठी धरायचा? आम्हाला ज्या प्रमाणात आमच्या पालकांचा लळा होता तो त्या प्रमाणात आमच्या पुढच्या पीढीला असणार नाही कारण आमचे पालक ज्या प्रमाणात व्यक्ती स्वातंत्र्य सोडायला तयार होते त्या प्रमाणात आपली पीढी तयार नाही हे मान्य करायला हवे आणि उद्या आमची पुढची पीढी सुध्दा व्यक्ती स्वातंत्र्या साठी आम्हाला सोडून जाईल त्याचा स्विकार करायला हवा.

भारतीय कुटुंब व्यवस्था आणि लग्न संस्था याच्या मुळे माझ्या लहान पणी जडण घडण चांगली झाली असली, माझ्या मनात त्याविषयी खूप चांगल्या आठवणी असल्या तरीसुध्दा, भारतीय कुटुंब व्यवस्था आणि लग्न संस्था हा संस्क्रुतीचा महत्वाचा असला तरीही एक भाग झाला. वस्तूतः सांसारिक सुखात प्रमाणाबाहेर रंगून राहू नये असा उपदेश अनेक संतांनी केला. त्यामुळे लग्न संस्था किंवा कुटुंब संस्था टिकावी यासाठी शक्य तितका प्रयत्न करावा पण ती टिकत नसेल तर वैयत्कीक संसार सुखाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न हा सुध्दा भारतीय संस्क्रुतीचा अविभाज्य भाग आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

स्त्री - पुरुषांच्या बाबतीत बोलयचे झाले तर गेली अनेक वर्ष स्त्री वर्गाने पुरुष प्रधान संस्क्रुतीचे चटके सोसले. आता काही प्रमाणात या सामाजिक बदलाची झळ पुरुषांना बसत आहे, पण येणार्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि स्त्री मुक्तीच्या वार्यांना विरोध करणे योग्य होणार नाही कारण अजूनही एक मोठा अशिक्षीत, दरिद्री मुख्यत्वाने खेड्यातला स्त्री वर्ग अजूनही पुरुष प्रधान संस्क्रुतीचे चटके सोसत आहे. आजचा पुढारलेला शहरातला सुशिक्षीत सधान स्त्रीवर्ग सुध्दा या पाश्चात्य समाजातून येणारा या झंझावाताचे चटके अजून सोसणार आहे जेव्हा पाश्चात्य समाजा सारखा पुरुष वर्ग निर्माण होईल जो फक्त शरीरसुख देत असेल तरच आपली 'डेट' म्हणून स्वीकारेल आणि 'डेट' म्हणून स्विकारले तरच लग्नास तयार होईल. आज एका प्रमाणात शहरी सधन, सुशिक्षीत स्त्रीयांना काही प्रमाणात भारतीय संस्क्रुतीची सावली मिळत आहे, जी पुरुषांना अनेक शतके मिळत आली.

थोडक्यात ही एक सामाजिक बदलाची सुरुवात आहे, अजून पुर्ण वादळ यायचे आहे.

मला लेख खुप एकान्गी वाटला.

<< मुलापेक्षा मुलीच्या अपेक्षा वाढत आहेत. >>
------ हे कसे काय ? त्यान्ना अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे.

<< एकुलता एक मुलगा हवा चांगली नोकरी हवी पुण्या मुंबईत स्वतःचा फ्लॅट हवा सासरी फार माणसे नकोत अशा अटी आता पुढे येऊ लागल्या आहेत. >>
------- शितावरुन भाताची परिक्षा केल्यासारखे आहे, हे असे सर्व ठिकाणी नाही आहे.

<< किरकोळ वादातून घटस्फोट करणाऱ्या मुलीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. >>
------ घटस्फोट दोघान्चा होतो मग दोष मुलीलाच का? वाद किरकोळ आहे हे कसे ठरवायचे ? सर्वस्वाचा त्याग करणे हे केवळ मुलीनेच करायचे का ? थोडी तडजोड मुलाने केली तर घटस्फोट कमी होतील.

<< तुझ्याप्रमाणे मी देखील कमावते असा अहंभाव त्याच्या मनात रुजू लागला आहे. मिळवत्या व्यक्तीचे घरात वर्चस्व असा सूर फार पूर्वीपासून चालत आहे. त्याला छेद बसण्याची शक्यता यामुळे वाढली आहे. मी देखील कमवते मग का सहन करेन अशी मुलीची धारणा बनत चालली आहे. >>
------ असा सुर फार पुर्वीपासुन चालत आहे हे मान्य आहे, पण आज कमावणारी व्यक्ती स्त्री आहे म्हणुन वर्चस्व मान्य करताना त्रास होतो का ?