पाकशास्त्र, पाककला आणि गुलाबजाम.

Submitted by सई केसकर on 20 February, 2018 - 01:39

सुगरणींची (सुगरणांची ) आणि एकूणच पाककौशल्याची दोन टोकं असतात. एका टोकावर स्वयंपाक ही एक कला आहे असे मानणारे लोक असतात आणि दुसऱ्या टोकावर स्वयंपाक हे एक शास्त्र आहे असे मानणारे लोक असतात. या दोन टोकांच्या मध्ये झोके घेणारे माझ्यासारखे बरेच असतात. स्वयंपाक ही एक कला आहे मानणारे लोक मला लहानपणीच खूप भेटले. पण ते सगळे अगदी निरागस होते.
"वैनी, भाजी कशी केली?" या प्रश्नाला फक्त हाताचा आधार घेऊन उत्तर देणाऱ्या बायका मी बघितल्या आहेत.
"एवढं एवढं आलं" (स्वतःच्या तर्जनीची दोन पेरं दाखवत)
"एवढ्या एवढ्या लसणीच्या कुड्या" (त्याच हाताच्या बोटांचा चिऊच्या चोचीसारखा चंबू करत)
"एवढं एवढं तिखट" (त्याच हाताची चार बोटं चिकटवून दुसऱ्या पेरांवर अंगठा टेकवत, आणि मनगटाला भरतनाट्यम शैलीत एक मुरका देत)
"एवढासा गूळ" (मागल्या मुद्रेतील अंगठा पहिल्या पेरावर सरकवत)
"पाच सहा टप्पोरी वांगी" (यातील "टप्पोरी" वर जरा जास्त भर देऊन)
"चार बोट तेल"
अशी एकहस्त पाककृती ऐकून तोंडाला इतकं पाणी सुटायचं की कृती गेली उडत, आधी जेवायला वाढा अशा वाक्यानी त्या कृतीची (आणि माझ्या उत्साहाची) सांगता व्हायची.

पुण्यात मात्र काही खडूस सुगरणी भेटल्या ज्या मुद्दाम दुष्टपणे कृती सांगायच्या नाहीत.
हे चिरोटे कसे केले? या प्रश्नाला अगदी गालाला खळी बिळी पडून, "अगं काही विशेष नाही त्यात" असे म्हणण्यात यायचे.
आणि पुढे सगळ्या जिन्नसांच्या आधी "थोडं" हे एकच प्रमाण लावून कृती सांगण्यात यायची.
"पण न तळता हे असे कसे झाले? तुम्ही बेक केले का?" या प्रश्नावर, "अरे हो की! तळायचे हे सांगायला विसरूनच गेले!" असं अगदी सहज उत्तर यायचं.

काही काही मात्र अगदी दिलसे धांदरट सुद्धा भेटल्या. एखादी चिमणी झाडावर बसून खायला किडे, आणि तिला खाणारी मांजर या दोन्हीचा सारखा अंदाज घेताना जशी वागेल ताशा या कृती सांगायच्या.
"साधारण एवढा एवढा मैदा घे" (हाताचा द्रोण करून)
"बरं"
"किंवा दीड वाटी घेतलास तरी चालेल, कारण आपण एक पूर्ण वाटी तूप घेणार आहोत"
"बरं"
"पण तू मैद्याप्रमाणे तूपही कमी करू शकतेस म्हणजे. कसंही. आणि हो. गरम तुपाचं मोहन पण आहे. त्यासाठी साधारण एवढं तूप" (परत हाताचा छोटा द्रोण करून"
"बरं"
"पण साखर किती घालणारेस त्यावर पण अवलंबून आहे. तुला गोडाचे आवडतात का माध्यम गोड?"
"ताई मी जाते. वाटेत चितळे लागेल. तिथून विकतच घेते"

ताया आणि आज्यांकडून स्वयंपाक शिकत असतानाच माझ्या आयुष्यात रुचिरा आलं. आणि ओगले आजींनी माझ्या बऱ्याच शंकांचे निरसन केले. त्यातही एकदा मठ्ठ्याच्या कृतीत "ताकाला आलं लावा" या वाक्यानी माझ्या डोळ्यासमोर, मी निव्हियाच्या डबीतून आल्याचे वाटण ताकाच्या गोऱ्या गोऱ्या गालांना लावते आहे असे दृश्य आले.

माझा पीएचडी सुपरवायझर म्हणायचा, "प्रयोगाची कृती अशी लिहावी जशी चांगली पाककृती".
यात जिन्नसांची (केमिकल) ची यादी कृतीत सगळ्यात आधी काय लागणार आहे पासून सगळ्यात शेवटी काय लागणार आहे अशी असावी. आणि प्रत्येक जिन्नसांपुढे कंसात त्याचे एकाच प्रकारे माप असावे. म्हणजे वाचणाऱ्याला त्या वस्तू तशा क्रमवार लावून ठेवल्या की पाककृती (प्रयोग) करताना पाठोपाठ घेता येतील. हे त्याचे वाक्य ऐकल्यावर मी प्रयोगांकडेच नव्हे तर पाककृतींकडे सुद्धा नव्याने बघू लागले. आणि हाच अभ्यास करता करता मी दुसऱ्या टोकाला कधी पोचले माझे मलाच कळले नाही.

सुरुवातीला बेकिंग, कलेच्या टोकावर राहून करायचा प्रयत्न केला. इंटरनेटवर घाईघाईत वाचलेल्या पाककृतीचे, मनातल्या मनात आत्मविश्वासाने अघळपघळ मराठीकरण केल्यामुळे मी बरेच लादे कचऱ्यात फेकून दिले. मग लक्षात आले की अंडी कशी फेटली यानेही या पदार्थांमध्ये फरक पडतो. हळू हळू स्वयंपाकाचे शास्त्र शिकायला सुरुवात केली. गरीब विद्यार्थिनी दशेत असताना पाश्चात्य पाककलेत वापरण्यात येणारी भारी भारी उपकरणे नव्हती. पण ओट्यावर कोपऱ्यात जिन्नस मोजायचा एक गोंडस वजनकाटा मात्र आवर्जून घेतला. आणि त्यातही अमेरिकेतील पाककृती स्वतःचा वेगळा मोजमापाचा झेंडा घेऊन आल्या, म्हणून कप, औन्स वगैरे मापं वजनाच्या मापात लिहून ठेवली. पण एकदा एका फ्रेंच पुस्तकात कुठल्याश्या द्रवपदार्थाचं माप डेसीलिटर मध्ये दिलेलं पाहिलं आणि कपाळावरची शीरच तडकली.

फ्रेंच पदार्थ करून बघताना जो काही आनंद मिळायचा (पदार्थ बिघडला तरी) तो अनुभवून आपण नक्कीच कलेमधल्या आणि गणितामधल्या एका उंबरठ्यावर उभे आहोत असे वाटायचे. साखरेला आणि अंड्याला कुठल्या कुठल्या रूपात बघता येईल याचे उत्तम उदाहरण फ्रेंच पाककलेमध्ये मिळते. कधी साखर मुरवून, कधी नुसती भुरभुरून, कधी त्याचे फक्कडसे आयसिंग बनवून, तर कधी थेट साखर जाळून. रसायनशास्त्र कमी पडेल इतके साखरेचे अलोट्रोप फ्रेंच पाकशास्त्रात बघायला मिळतात. तसेच तापमानात बदल करून, एकाच पदार्थाची केलेली वेगवेगळी रूपं सुद्धा बघायला मिळाली. कधी थंडगार चॉकलेट मूस, तर कधी गरम गरम हॉट चॉकोलेट.

फ्रेंच लोक व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोस्कोप घेऊन स्वयंपाक करतात असा निष्कर्ष मी काढणार इतक्यात माझ्या आयुष्यात एलोडी नावाची एक फ्रेंच मुलगी आली. अमेरिकेत असताना एकदा थँक्सगिव्हिंगला आम्ही दोघीच शहरात उरलो होतो. बाकीचे सगळे मित्र मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा तिनी फारच सुंदर स्ट्रॉबेरी टार्ट बनवून आणला होता. त्याची कृती विचारली असता तिनी आधी, "सोप्पीये" असे उद्गार काढले. आणि पुढे म्हणाली, "थोडा मैदा, थोडं बटर, थोडं अंडं कालवायचं. मग ते "फतफत" करून एका फॉईलवर थापायचं. त्यात स्ट्रॉबेरी आणि साखर ओतायची. आणि ते ओव्हनमध्ये टाकायचं. नंतर क्रीम घालून खायचं."
तिचे हे वर्णन ऐकून फ्रेंच पाककृतींची पुस्तके लिहिणाऱ्यांना फ्रेंच रेव्होल्यूशन झाल्याचे कळले नाही की काय असा मला संशय आला. नंतर तिनी एका बैठकीत तो अक्खा टार्ट संपवून, फ्रेंच बायकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दलचा माझा भ्रम सुद्धा तोडून टाकला.

"पाक" शब्दापुढे कला कधी लावायचे आणि शास्त्र कधी याचा आता थोडा थोडा अंदाज येऊ लागला आहे.
गोळीबंद "पाक" करायचे शास्त्र आहे. तसंच खुसखुशीत पाय क्रस्ट तयार करणे पण शास्त्रातच मोडते. चकली, स्वयंपाक हे शास्त्र आहे हे पटवून द्यायचे उत्तम उदाहरण आहे. पाकसिद्धीचे प्रॅक्टिकल असते तर चकली चांगली चाचणी ठरली असती. चकली चुकली, डिग्री हुकली. कारण चकली इतक्या प्रकारे चुकू शकते की प्रत्येक वेळी चकली करताना मी मास्टरशेफच्या फायनल मध्ये घड्याळ लावून भाग घेते आहे असे मला वाटते.
मऊ मऊ, लुसुशीत घडीच्या पोळ्या मात्र कला क्षेत्रात जातात. तसेच नाजूक पाऱ्या असलेले मोदकही. मटणाचा रस्सा नाक लाल होईल इतका झणझणीत, पण तरीही परत परत घ्यावासा वाटेल असा करणे ही कला आहे. पण पाकातले रव्याचे लाडू वळणे हे कला आणि शास्त्र दोन्हीमध्ये मोडते. तसेच यीस्ट वापरून बनवायचे सगळे गोड पदार्थही दोन्हीकडे बसतात. केळफुलाची/फणसाची भाजी ही मात्र नुसती हमाली आहे. ती दुसऱ्यांनी आयती आणून दिली तरच तिला कला वगैरे म्हणता येईल.
----------------------------------------------------

हे सगळे विचार मनात ताजे करणारा सिनेमा म्हणजे गुलाबजाम.
एखादं हॉटेल काढायचं म्हणजे मोजमाप करून स्वयंपाक आला पाहिजे. पण चांगला स्वयंपाक, नुसतं मोजमाप करता येणाऱ्यांना येईलच असे नाही. खाऊ घालणारी व्यक्ती प्रत्येक पदार्थावर तिची/त्याची स्वाक्षरी करत असते. आणि कुणी त्या चवीला असं मोजमापात करकचून बांधू शकत नाही.
कधी कधी, आपण आपल्या कामातून आपलं अस्तित्व शोधत असतो. जे आपल्या आजूबाजूला आपल्याला मिळत नाही, ते स्थैर्य, शांतता आपण जे काही करत असतो त्यातून मिळत असते. राधा आगरकरला (सोनाली कुलकर्णी) ती स्वयंपाकातून मिळते. पण मग तिला आदित्यसारखा (सिद्धार्थ चांदेकर) सवंगडी मिळतो आणि दोघांच्या आयुष्यातल्या बऱ्याच सैरभैर गोष्टी मार्गी लागतात. त्यांचं हे एकमेकांच्या आधाराने (पण एकमेकांमध्ये गुंतून न जाता) मार्गी होणं अतिशय सुंदर मांडलं गेलं आहे.

खादाडी आणि स्वयंपाक आवडणाऱ्यांनी, आवर्जून पाहावा असा हा सिनेमा आहे. सोनाली कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर, दोघांचीही आजपर्यंतची सगळ्यात सुंदर कलाकृती. ज्यांना मध्यंतरी कुंडलकरांचा राग आला होता, त्यांनी तो (थोडावेळ) बाजूला ठेवून पाहण्यासारखा नक्कीच म्हणता येईल.
-----------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मि_अनु +१.
त्रुटी आहेत नक्कीच पण स्तुत्य प्रयत्न होता.
सस्पेन्डर्स, शेवटच्या सीनमधला अजिबात फिट न होणारा चष्मा माफ करून टाकला.
सोकु च्या मित्राबद्दल ही थोडीफार सहमत.
त्या गर्लफ्रेण्ड ला अजून वेळ नव्हता हेच बरं झालं. काय मठ्ठ कॅरॅक्टर होतं ते!

कॅरेक्टर्स, त्यांचे प्रॉब्लेम्स हे 'स्किन डीप'च ठेवायचे आणि 'अगंबाई, इतकं सोप्पं तर होतं सगळं!' अशा नोटवर सुटलेले दाखवायचे >>> +१११ अगदी अगदी Happy

सिनेमा अजुन पाहिलेला नाहि. सोनालीताई खुप खाष्ट वगैरे दाखवलेल्या असल्याने त्यांची हि किर्ती ऐकुन, (घाबरुन) आपली प्यांट वेळीच सांभाळता यावी या हेतुने आपला हिरो एक खबरदारी म्हणुन सस्पेंडर्स + बेल्ट घालुन गेला असावा... Proud

राधा पूर्वी कविता लिहीत असे - आणि बेडरूममधल्या सैल फरशीखाली त्या लपवून ठेवत असे असा उल्लेख येतो, पण सापडलेल्या कवितांतला एखादाही नमुना प्रेक्षकांना चाखायला मिळत नाही.

त्याऐवजी अन्य एका प्रसंगात ‘कांद्या रे कांद्या’ की तत्सम काहीतरी बडबडगीत तेवढं पानात पडतं. Lol

राज, Lol

***** स्पॉयलर अलर्ट******* ( पिक्चर बघितलेला नसेल तर पुढे वाचू नका!)
*****
*****
*****
>> (घाबरुन) आपली प्यांट वेळीच सांभाळता यावी या हेतुने आपला हिरो एक खबरदारी म्हणुन सस्पेंडर्स + बेल्ट घालुन गेला असावा... Proud
स्ट्रेन्जली (जस्ट फॉर द सेक ऑफ इट किंवा प्रिया बापट ला आणायचं म्हणून?) दॅट्स हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स! Happy

>>स्ट्रेन्जली (जस्ट फॉर द सेक ऑफ इट किंवा प्रिया बापट ला आणायचं म्हणून?) दॅट्स हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स!>> म्हणजे?

पिक्चर बघण्यापूर्वी सायली राजाध्यक्षांच्या ब्लॉगवर फूड डिझायनिंगबद्दल वाचून उत्सुकता चाळवली होती. आज पुन्हा तेच वाचताना इतकी भांडी, इतके विचारपूर्वक प्लॅन केलेले पदार्थ कधी येऊन गेले पिक्चरमध्ये असा प्रश्न पडला. जर पिक्चर कुकिंगबद्दल आहे तर त्या दोघांनी एकत्र जेवण बनवताना किंवा सोकु त्याला काही शिकवताना वगैरे दाखवायला हवं होतं.

सई मस्त लिहिले आहे
एकदम खुसखुशीत

रच्याकने भरली भेंडी असेल तर त्यावर खोबरे घालतात की,

***** स्पॉयलर अलर्ट******* ( पिक्चर बघितलेला नसेल तर पुढे वाचू नका!)
*****
*****
*****

>> म्हणजे?
सायो, सोकु सगळ्यात क्लोज आदित्य ला असते / होते असं दाखवलं आहे. तिचा सगळ्यात जास्त विश्वास त्याच्यावर असतो. आणि सटली तिच्यातलं आदित्य बदलचं थोडं अ‍ॅट्रॅक्शन दाखवलं आहे. मग जरा ड्रामा व्हावा म्हणून आदित्य तिला तिच्या वयाला साजेसा दुसरा हिरो शोधून आणतो आणि स्वतः सटकतो. कन्व्हिनिअन्टली टू फॉलो हिज ड्रीम्स / पॅशन (अँड ऑल्सो मीट समवन यंगर दॅन सोकु Wink )

मै आणि स्वातीला अनुमोदन. पदार्थ अजिबातच आवडले नाहीत बघायला. शेवटी केलेले गुजा तळताना पिवळे, मध्येच लाल रंगावर आणि शेवटी अगदी गडद आहेत. कांद्याची भजी , वडे दाखवलेत ते पण एकसारख्या रंगावर नाहीत. उकडीचे मोदक फारच निराशा करतात. बाकी सोनाली कुलकर्णीची वेशभुषा, मेक-अप आवडला. पण तिचं पात्र आणि त्या योगानं अभिनय फार इनकन्सीस्टन्ट वाटलं. अगदी पहिल्याच सीनमध्ये ती घरात चोर शिरलाय या समजुतीनं गरम उचटणं हातात घेऊन भयंकर त्वेषात बोलते आणि त्याच सीनमध्ये १-२ वाक्य झाल्यावर लगेच जोशीकाकूंनी चिंटुला लटकं रागवावं तशा सुरात्/शब्दात बोलायला लागते. तिथूनच रसभंग व्हायला सुरूवात झाली. बर्‍याच गोष्टी खटकल्या तसं की आदित्यनं 'तुला माझ्याविषयी बर्‍याच गोष्टी माहिती नाहीत' असं म्हणून एकच बडिलांनी रागावलेला प्रसंग सांगणं. तो क्रीपी मित्र.

आणि मिक्सर सुद्धा न घेणारी सोकु हळकुंड दळून न आणता बाजारातली पाकिटबंद हळद वापरते?

आणि मिक्सर सुद्धा न घेणारी सोकु हळकुंड दळून न आणता बाजारातली पाकिटबंद हळद वापरते?>>>>> घरोघरी अंबारीची जाहिरात: Lol Proud

बर्‍याच गोष्टी खटकल्या तसं की आदित्यनं 'तुला माझ्याविषयी बर्‍याच गोष्टी माहिती नाहीत' असं म्हणून एकच बडिलांनी रागावलेला प्रसंग सांगणं.

हो हे मलाही जाणवलं. त्याची झोपेच्या गोळ्यांची सवय वगैरे..मला वाटलं होतं थोडी अजून इन्टेन्स हिस्टरी असेल.
पण अगेन, सोकु ची भूमिका,तिच्याविषयीचं कथासूत्र आणि तिचं डेव्हलप केलेलं पात्र यासाठी मी सगळं विसरायला तयार आहे. तिचे डायलॉग्स डायरीत लिहीण्याइतके आवडलेत मला.आणि तिचं स्ट्रेट फॉरवर्ड, वरकरणी खडूस, नंतर थोडं गोंधळलेलं आणि तरीही कायम आपल्याला वाटतं ते स्पष्ट सांगणारं पात्र मला खूप आवडलंय.
कपाटातलं मांजर आणि मला आठवणी नाहीत हे डायलॉग मी परत परत ऐकायला तयार आहे.(मूळ कथा न कळेल अश्या प्रकारे) हे डायलॉग ट्रेलर चा भाग हवे होते.तसेच आजींचा पार्ट पण.
फूड लोकांना जितकं नावडलं तितकं मला नावडलं नाही. (सध्याच्या स्वयंपाक कौशल्याची परमसीमा रोज भाजी पोळी आणि सॅलड इतकी असल्याने असेल Happy )

मला हा सिनेमा आवडला.
भेंडीच्या भाजीवर मी जरी खोबरं वगैरे घालत नसले तरी ते दिसायला छान दिसलं मला. म्हणूनह्च प्रेझेंतेशनचे मार्क दिले असतील.
सुरळीच्या वड्या छान नाही दिसल्या तर खुप्तय आणि भाजी छान दिसली तरी खुपतय..मै, काय हे Happy Light 1

गर्ल्फ्रेम्ड फार अनॉयिंग होती हे १००% खरं. त्या सोकु च्य मित्रापेक्षा हजारो पटीने त्रासदायक.

एप्रन घालून स्कूटरवर हिंडणे मला पण फनी वाटले. एखादा पदार्थ नीट खोलात जाउन शिकलेला/शिकवलेला दाखवायला हवा हे खूप वाटलं.
वरण-भात हा हाटेलात खायचा पदार्थच नाही तेव्हा त्याच्या चौकोनी मूदी पाडल्या काय की गोल पाडल्या काय..कैकाकरेनात्तिकडे..

आवांतर - मला श्रीखंडात उगाच बेदाणे-मनूका-बदामाचे काप किंवा पिस्त्याची पूड घातले की वैताग येतो. आळूच्या भाजीत दाण्यांऐवजी काजू घातले की सुद्धा वैताग येतो.

बाकी ते एक केळकर आजोबा पूर्ण सिनेमाभर गॅलरीत बसलेले दिसतात येताजाता, आणि शेवटी पाऊस पडायला लागतो तेव्हा उठून उभे राहतात, त्याचा काही सिग्निफिकन्स कळला नाही. कुंडलकरचा युरोपियन टच की काय म्हणतात तो तोच असावा. Proud

राधा बहिणीसमोर इतकी घाबरून का जाते कळलं नाही. मोजता येत नसताना रोज बरोब्बर अमुक इतके (चाळीस ना?) डबे कसे करते हेही. अपघातानंतर कॉन्फिडन्स गेला आहे म्हणावं तर ते (मनातून घाबरलेली पण वरकरणी शूरपणाचा आव असं) पुसटसंसुद्धा आदित्य प्रथम घरात घुसतो तेव्हा दिसत नाही. सरावाच्या जागी/व्यक्तींबरोबर तिला एव्हाना कॉन्फिडन्ट वाटतं म्हणावं तर बहिणीसमोर आपल्याच घरात घाबरी होते.

सिनेमा खूप जणांना आवडला नसल्याचं वाचून मी एकटीच नाहीये न आवडलेली ह्या विचाराने बरं वाटतय.

सगळ्या जणी का नाही आवडला त्याच विश्लेषण छान करताय.जे मला जाणवत होतं पण लिहायला जमत नव्हतं

सुरळीच्या वड्या! (हे 'पाळीव प्राणी' मधल्या 'सिंडरेला!' चालीत वाचावं) शुम्पी, बरी आठवण दिलीस. विस्कटलेल्या आहेत वड्या Sad

>>> आळूच्या भाजीत दाण्यांऐवजी काजू घातले की सुद्धा वैताग येतो
आँ?! टीपापात ये, तुला घा.पा. बोलते. इथे नको. Proud

शूम्पी +१
तो राजवाडे अँड सन्स आणि मग पहिला तासभर अय्या बघून कुंडलकर बद्दल अगदीच अनफेव्हरेबल मत झालं होतं. गुलाबजाम मुळे ते मत थोऽऽडंसं फेव्हरेबल कडे शिफ्ट झालं.

बाकी ते एक केळकर आजोबा पूर्ण सिनेमाभर गॅलरीत बसलेले दिसतात येताजाता, आणि शेवटी पाऊस पडायला लागतो तेव्हा उठून उभे राहतात, त्याचा काही सिग्निफिकन्स कळला नाही. कुंडलकरचा युरोपियन टच की काय म्हणतात तो तोच असावा.
>> देवाची शप्पथ, मी खूप विचार केल अयावर पण मग ठरवलं की मला काव्यमयता/तरलता सिनेम्यांतली प्रतिके विषयी पुरेशी समज नाही त्यामुळे मला त्यात लपलेला गहन अर्थ समजत नसणार. पण तुम्हालाही नाही कळला म्हणजे मला आता जरा कमी मठ्ठ वाटतय. शिवय पहिल्याम्दा ते आजोबा दाखवतात त्यांच्या हातातले ते पुस्तकाचे नाव स्पष्टपणे फ्रेम मध्ये येते त्याला सुद्धा काहितेरी अर्थ असणार असं मनाशी नोंदलं होतं पण नंतर काय धागेदोरे जुळवलेले आढळले नाहीत किंवा परत तेच मला समजच कमी आष(श?)य/अभिव्यक्ती बाबत..

आदित्य जाताना तिच्यासाठी इतके गुलाबजाम का करतो? ती एकटी किती खाणार? उद्या डब्यात देईल असा विचार असेल का? आणि ती त्यातले दोन गुलाबजाम हा ता ने खाते? ती इतकी निगुतीची बाई असून?!

आदित्य त्याच्या आयुष्यात जे काही सुरू असतं त्याला कंटाळलेला आहे - देश, नोकरी, भावी बायको - यातला बहुधा कोणताच निर्णय 'पूर्णपणे' त्याचा नव्हता - आयदर त्याच्यावर निर्णय लादणारे कुटुंबीय किंवा याच्यातच निर्णयक्षमतेचा अभाव किंवा दोन्ही असावं. 'हे नको आहे' इतकं समजलंय, पण काय हवं आहे ते सापडलेलं नाही, आणि राधाच्या डब्यातला गुलाबजाम खाताना ते सापडतं - असं बघायला जास्त विश्वसनीय वाटलं असतं मला. ती दिशाहीन अवस्था एखाद्याला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागण्याइतकी छळू शकते. एखादा समर्थ दिग्दर्शक तो छळ नीट मांडू शकतो. इथे तो 'स्किन डीप'चा नियम आड आला असावा. असो.

शूम्पे, हो हो, पुस्तकाचं नाव दाखवलं होतं खरं पण कुठलं ते लक्षात येई ना आता माझ्या.

शूम्पी, ही असली प्रतिकं बरीच दिसतात की.
देऊळ मध्ये नाही का घोंगडं पांघरलेला हिंदाळलेलं मराठी बोलणारा नासिरुद्दीन शाह आणला होता त्या गिकु ला साक्षात्कार होण्याकरता.
तसेच हे आजोबा काहितरी दाखवत असणार. तो आदित्य त्यांनां दाणे पण देतो ना मध्येच.

>> हा ता ने खाते?
आदित्य मुळे राधा थोडी बदलते/खुलते आणि राधामुळे आदित्य एन्हान्स होतो असा साधा सोपा अर्थ मला लागला.

आजोबा उठतात तो सिम्बोलिझम. अनेक वर्ष स्थिर, स्टैगनन्ट असलेल्या गोष्टी हळूहळू बदलू लागल्या(जशी राधा हळूहळू मोबाइल वापरायला शिकली.) इंग्लिश टाइम ट्रेवहल(हा कुत्रा मोबाइल मला गूगल हिंदी वरच आणतोय सारखा) पुस्तक हाही सिम्बोलिझम. काळ बदलला आहे, ही वस्ती वेल ऑफ असेल, एखादा नातेवाईक परदेशी किंवा आजोबा स्वतः खुप हाय फाय कॅम्प च्या कॉलेजात शिकलेलेअसतील.त्याना घरीच आय पैड वर पुस्तकं वाचणं अशक्य नसेल.पण न बदलणं हा या वस्तीचा व्यक्तिगत चॉइस.न उठणं आजोबांचा चॉइस.घरातला रेडियो, खुर्च्या यातलं काहीही न बदलणं हा राधा चा चॉइस.(तिचा डब्याचा धंदा चांगला चालू असावा.पैशाची विवंचना असल्याचं कधी जाणवत नाही.)
मला पिक्चर त्यातल्या त्रुटि आणि लूज लिंक मान्य करूनही खुप आवडला.

कथेत ते आलं की ऑलरेडी - आणखी वर सिम्बॉल्स कशाला? सटल काही सुचवायचं असेल तेव्हा ठीक आहे, इथे सगळा सिनेमाभर ट्रान्स्फॉर्मेशनच सुरू आहे की! Happy

>>> मला पिक्चर त्यातल्या त्रुटि आणि लूज लिंक मान्य करूनही खुप आवडला.
हो, ते लक्षात आलंय. Happy
नाही हो, मी आपली माझी (प्रांजळ उर्फ खवचट) मतं मांडते आहे. तुमचं मतपरिवर्तन व्हावं म्हणून नाही. Happy

मला तरी आवडला हा पिक्चर...
सोकु चं कॅरेक्टर डिटेलींग छान वाटलं... तिचा अगदी सुरूवातीचा बहिण तिला ओढत घेऊन येत असते तेव्हाचा लुक (थोड्या लांड्या सलवार, स्लिपर, कसेतरी बांधलेले तेलकट केस), नंतर थोडं स्वकमावतं झाल्यावरचा लुक, आता जरा बरेसे ड्रेसेस, वेणी, पण कान हात कपाळ भुंडे असणे, मग आदित्यशी ओळख, मग टिकली, गजरा असे अजून होत गेलेले बदल छान दाखवलेत.
काहीकाही ठिकाणी सोकुच्या खडूस कमेंट्स एंजॉय केल्या.. पिठाचे वाळवंट, सांडलेल्या पिठात एक पोळि झाली असती, मला नका शिकवू मी कधी काय शिकवायचं वगैरे वगैरे Proud सेल्फी मधे आपणच दिसतोय चे वाटलेले कुतुहल Happy ते पण आवडलं.
बरेच डायलॉग्स छान आहेत तिचे.

बाकी पदार्थांबद्दल म्हणायचे झाले तर.. जेव्हा त्यांची एंट्री होते हिरोसारखी ते काही फार अपिलिंग दिसले नाहियेत डब्यात... त्यामानाने मला तो शेवटी बाऊल मधे ठेवतो ते गुजा आवडले Happy नंतर मधेअधे दिसलेले बरेच पदार्थ बघुन अहाहा झाले... भेंडीची भाजी (ओलं खोबरं घालणं हे माहित आहे) कांदाभजी, चकल्या, मिरगुंड, अळूवडी, थालिपिठं, वरणफळं निदान हे पिक्चर मधे दिसले तरी... सारखं आपलं ते आलू -मुली के पराठे, गाजर हलवा, बादाम की खीर यांनीच काय ते स्क्रीन गाजवावे Proud

सिद्धार्थ चांदेकरचे पण काम आवडलेय... सुरुवातीला पडेल ते काम करणारा, दाण्यांशी बोलणारा, तुम्ही मला कधी शिकवणार स्वयंपाक करायला असं लाहान मुलासारखं सतत विचारणारा, तिला बरं नसल्यावर स्वतःच पुढाकार घेऊन किचन चा ताबा घेणारा आणि जबरदस्तीने तिला जेवायला लावणारा, तिला पैसे मोजता येत नाही म्हत्ल्यावर तिची मजा उडवणारा, पण असं का हे कळल्यावर तितकंच वाईट वाटून घेणारा आदित्य छान साकारलाय.

रेणूकाने पण छोटासा रोल मस्त केलाय. अशा बायका पाहण्यात आहेत त्यामुळे पटलंच.

न आवडलेल्या गोष्टी: नेहा, तिचा केकाटणारा आवाज, आदित्यला मारलेल्या चपटा सगळंच डोक्यात जाणारं होतं. ते लंडन स्पेशल ससपेंडर्स, चिन्म्यय चं कॅरॅक्टर ही नाही आवडलं. ते एकाच वर्गात असले तरी ती किती मोठी दिसते त्याच्यापेक्षा, मिसमॅच वाटले.

डुलक्या:
जेव्हा रेणूका शहाणे आलेली असते सोकुकडे, तेव्हा सोकु आदित्यला म्हणते चल बाहेर जायचंय आपल्याला, त्यावेळी ती एक सोनार देतात तसली चेनवाली छोटी पर्स घेऊन निघते फक्त असं दिसतं आणि मग थिएटर मधे बसलेले दाखवतात तेव्हा अचानक मोठी पर्स दिसते....

आदित्य जेव्हा तिच्या घरि राहतो तेव्हा तो इंडियन कुर्ता काढतो तेव्हा उघडाच असतो आणि झोपतो तेव्हा काळा बनियन मधे दिसतो... तिच्या घरी ठेवला असेल का एक एक्सट्रॉ Proud

बाकी ते जेव्हा डायल अ शेफ सुरू करतात तेव्हा सगळीकडे एप्रन घालून जातात ते फनी वाटतं बघायला. आणि त्या पिशव्यांमधे ते काय २-४ क्रॉकरी पिसेस कशाला नेतात ते काय कळलं नाही? तेल, दही पण यांनीच न्यायचं ?

असो, पण एकून छान वाटला पिक्चर... Happy

होहो
आय रिस्पेक्ट न आवडलेल्या लोकांचि मतं.(खरं तर दिल्ली पालिका बाजारातून अति फिदा होऊन आणलेली सुंदर चप्पल घरी आल्यावर अनुभवी मंडळीनी किंचित खरवडून यातलं लाकुड़ दाखवावे आणि आपल्याला 'अरे खरंच की कैसे लगेच भाळलो' वाटावं तसं झालंय.
☺️☺️☺️☺️☺️

राजवाड़े न पाहिल्याने ती स्केल समोर नाही.अय्या पाहून विसरायचा ठरवल्याने त्याबद्दल हाघतोंबो.

अंजली, Lol
छान विश्लेषण.

परत पिशवी एकच असते. सामान आवरताना किती दाखवलंय सामान! बॉटम लेस पिशवी होती वाटतं.

रेणुका शहाणे ने कॅमिओ रोल मस्त केलाय. व्यवहारी बाईचा. तीने आधी आश्रय दिला, मग वार्‍यावर सोडून दिलं आणि मग आता बर्‍यापैकी स्थिरस्थावर असतानाही आपल्या जीवनावर असणारा रेणुका शहाणे चा "नकोसा" इन्फ्लुएन्स सोकु ने चांगला दाखवलाय.

हिंदीत "पन्हा" की "पन्ना" असं लिहीतात.
मराठी कुकींग मध्ये मॉकटेलं नाहीत असा संकुचीत विचार केल्यानेच मराठी कुकींग मागे पडलं असणार!

Pages