पाकशास्त्र, पाककला आणि गुलाबजाम.

Submitted by सई केसकर on 20 February, 2018 - 01:39

सुगरणींची (सुगरणांची ) आणि एकूणच पाककौशल्याची दोन टोकं असतात. एका टोकावर स्वयंपाक ही एक कला आहे असे मानणारे लोक असतात आणि दुसऱ्या टोकावर स्वयंपाक हे एक शास्त्र आहे असे मानणारे लोक असतात. या दोन टोकांच्या मध्ये झोके घेणारे माझ्यासारखे बरेच असतात. स्वयंपाक ही एक कला आहे मानणारे लोक मला लहानपणीच खूप भेटले. पण ते सगळे अगदी निरागस होते.
"वैनी, भाजी कशी केली?" या प्रश्नाला फक्त हाताचा आधार घेऊन उत्तर देणाऱ्या बायका मी बघितल्या आहेत.
"एवढं एवढं आलं" (स्वतःच्या तर्जनीची दोन पेरं दाखवत)
"एवढ्या एवढ्या लसणीच्या कुड्या" (त्याच हाताच्या बोटांचा चिऊच्या चोचीसारखा चंबू करत)
"एवढं एवढं तिखट" (त्याच हाताची चार बोटं चिकटवून दुसऱ्या पेरांवर अंगठा टेकवत, आणि मनगटाला भरतनाट्यम शैलीत एक मुरका देत)
"एवढासा गूळ" (मागल्या मुद्रेतील अंगठा पहिल्या पेरावर सरकवत)
"पाच सहा टप्पोरी वांगी" (यातील "टप्पोरी" वर जरा जास्त भर देऊन)
"चार बोट तेल"
अशी एकहस्त पाककृती ऐकून तोंडाला इतकं पाणी सुटायचं की कृती गेली उडत, आधी जेवायला वाढा अशा वाक्यानी त्या कृतीची (आणि माझ्या उत्साहाची) सांगता व्हायची.

पुण्यात मात्र काही खडूस सुगरणी भेटल्या ज्या मुद्दाम दुष्टपणे कृती सांगायच्या नाहीत.
हे चिरोटे कसे केले? या प्रश्नाला अगदी गालाला खळी बिळी पडून, "अगं काही विशेष नाही त्यात" असे म्हणण्यात यायचे.
आणि पुढे सगळ्या जिन्नसांच्या आधी "थोडं" हे एकच प्रमाण लावून कृती सांगण्यात यायची.
"पण न तळता हे असे कसे झाले? तुम्ही बेक केले का?" या प्रश्नावर, "अरे हो की! तळायचे हे सांगायला विसरूनच गेले!" असं अगदी सहज उत्तर यायचं.

काही काही मात्र अगदी दिलसे धांदरट सुद्धा भेटल्या. एखादी चिमणी झाडावर बसून खायला किडे, आणि तिला खाणारी मांजर या दोन्हीचा सारखा अंदाज घेताना जशी वागेल ताशा या कृती सांगायच्या.
"साधारण एवढा एवढा मैदा घे" (हाताचा द्रोण करून)
"बरं"
"किंवा दीड वाटी घेतलास तरी चालेल, कारण आपण एक पूर्ण वाटी तूप घेणार आहोत"
"बरं"
"पण तू मैद्याप्रमाणे तूपही कमी करू शकतेस म्हणजे. कसंही. आणि हो. गरम तुपाचं मोहन पण आहे. त्यासाठी साधारण एवढं तूप" (परत हाताचा छोटा द्रोण करून"
"बरं"
"पण साखर किती घालणारेस त्यावर पण अवलंबून आहे. तुला गोडाचे आवडतात का माध्यम गोड?"
"ताई मी जाते. वाटेत चितळे लागेल. तिथून विकतच घेते"

ताया आणि आज्यांकडून स्वयंपाक शिकत असतानाच माझ्या आयुष्यात रुचिरा आलं. आणि ओगले आजींनी माझ्या बऱ्याच शंकांचे निरसन केले. त्यातही एकदा मठ्ठ्याच्या कृतीत "ताकाला आलं लावा" या वाक्यानी माझ्या डोळ्यासमोर, मी निव्हियाच्या डबीतून आल्याचे वाटण ताकाच्या गोऱ्या गोऱ्या गालांना लावते आहे असे दृश्य आले.

माझा पीएचडी सुपरवायझर म्हणायचा, "प्रयोगाची कृती अशी लिहावी जशी चांगली पाककृती".
यात जिन्नसांची (केमिकल) ची यादी कृतीत सगळ्यात आधी काय लागणार आहे पासून सगळ्यात शेवटी काय लागणार आहे अशी असावी. आणि प्रत्येक जिन्नसांपुढे कंसात त्याचे एकाच प्रकारे माप असावे. म्हणजे वाचणाऱ्याला त्या वस्तू तशा क्रमवार लावून ठेवल्या की पाककृती (प्रयोग) करताना पाठोपाठ घेता येतील. हे त्याचे वाक्य ऐकल्यावर मी प्रयोगांकडेच नव्हे तर पाककृतींकडे सुद्धा नव्याने बघू लागले. आणि हाच अभ्यास करता करता मी दुसऱ्या टोकाला कधी पोचले माझे मलाच कळले नाही.

सुरुवातीला बेकिंग, कलेच्या टोकावर राहून करायचा प्रयत्न केला. इंटरनेटवर घाईघाईत वाचलेल्या पाककृतीचे, मनातल्या मनात आत्मविश्वासाने अघळपघळ मराठीकरण केल्यामुळे मी बरेच लादे कचऱ्यात फेकून दिले. मग लक्षात आले की अंडी कशी फेटली यानेही या पदार्थांमध्ये फरक पडतो. हळू हळू स्वयंपाकाचे शास्त्र शिकायला सुरुवात केली. गरीब विद्यार्थिनी दशेत असताना पाश्चात्य पाककलेत वापरण्यात येणारी भारी भारी उपकरणे नव्हती. पण ओट्यावर कोपऱ्यात जिन्नस मोजायचा एक गोंडस वजनकाटा मात्र आवर्जून घेतला. आणि त्यातही अमेरिकेतील पाककृती स्वतःचा वेगळा मोजमापाचा झेंडा घेऊन आल्या, म्हणून कप, औन्स वगैरे मापं वजनाच्या मापात लिहून ठेवली. पण एकदा एका फ्रेंच पुस्तकात कुठल्याश्या द्रवपदार्थाचं माप डेसीलिटर मध्ये दिलेलं पाहिलं आणि कपाळावरची शीरच तडकली.

फ्रेंच पदार्थ करून बघताना जो काही आनंद मिळायचा (पदार्थ बिघडला तरी) तो अनुभवून आपण नक्कीच कलेमधल्या आणि गणितामधल्या एका उंबरठ्यावर उभे आहोत असे वाटायचे. साखरेला आणि अंड्याला कुठल्या कुठल्या रूपात बघता येईल याचे उत्तम उदाहरण फ्रेंच पाककलेमध्ये मिळते. कधी साखर मुरवून, कधी नुसती भुरभुरून, कधी त्याचे फक्कडसे आयसिंग बनवून, तर कधी थेट साखर जाळून. रसायनशास्त्र कमी पडेल इतके साखरेचे अलोट्रोप फ्रेंच पाकशास्त्रात बघायला मिळतात. तसेच तापमानात बदल करून, एकाच पदार्थाची केलेली वेगवेगळी रूपं सुद्धा बघायला मिळाली. कधी थंडगार चॉकलेट मूस, तर कधी गरम गरम हॉट चॉकोलेट.

फ्रेंच लोक व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोस्कोप घेऊन स्वयंपाक करतात असा निष्कर्ष मी काढणार इतक्यात माझ्या आयुष्यात एलोडी नावाची एक फ्रेंच मुलगी आली. अमेरिकेत असताना एकदा थँक्सगिव्हिंगला आम्ही दोघीच शहरात उरलो होतो. बाकीचे सगळे मित्र मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा तिनी फारच सुंदर स्ट्रॉबेरी टार्ट बनवून आणला होता. त्याची कृती विचारली असता तिनी आधी, "सोप्पीये" असे उद्गार काढले. आणि पुढे म्हणाली, "थोडा मैदा, थोडं बटर, थोडं अंडं कालवायचं. मग ते "फतफत" करून एका फॉईलवर थापायचं. त्यात स्ट्रॉबेरी आणि साखर ओतायची. आणि ते ओव्हनमध्ये टाकायचं. नंतर क्रीम घालून खायचं."
तिचे हे वर्णन ऐकून फ्रेंच पाककृतींची पुस्तके लिहिणाऱ्यांना फ्रेंच रेव्होल्यूशन झाल्याचे कळले नाही की काय असा मला संशय आला. नंतर तिनी एका बैठकीत तो अक्खा टार्ट संपवून, फ्रेंच बायकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दलचा माझा भ्रम सुद्धा तोडून टाकला.

"पाक" शब्दापुढे कला कधी लावायचे आणि शास्त्र कधी याचा आता थोडा थोडा अंदाज येऊ लागला आहे.
गोळीबंद "पाक" करायचे शास्त्र आहे. तसंच खुसखुशीत पाय क्रस्ट तयार करणे पण शास्त्रातच मोडते. चकली, स्वयंपाक हे शास्त्र आहे हे पटवून द्यायचे उत्तम उदाहरण आहे. पाकसिद्धीचे प्रॅक्टिकल असते तर चकली चांगली चाचणी ठरली असती. चकली चुकली, डिग्री हुकली. कारण चकली इतक्या प्रकारे चुकू शकते की प्रत्येक वेळी चकली करताना मी मास्टरशेफच्या फायनल मध्ये घड्याळ लावून भाग घेते आहे असे मला वाटते.
मऊ मऊ, लुसुशीत घडीच्या पोळ्या मात्र कला क्षेत्रात जातात. तसेच नाजूक पाऱ्या असलेले मोदकही. मटणाचा रस्सा नाक लाल होईल इतका झणझणीत, पण तरीही परत परत घ्यावासा वाटेल असा करणे ही कला आहे. पण पाकातले रव्याचे लाडू वळणे हे कला आणि शास्त्र दोन्हीमध्ये मोडते. तसेच यीस्ट वापरून बनवायचे सगळे गोड पदार्थही दोन्हीकडे बसतात. केळफुलाची/फणसाची भाजी ही मात्र नुसती हमाली आहे. ती दुसऱ्यांनी आयती आणून दिली तरच तिला कला वगैरे म्हणता येईल.
----------------------------------------------------

हे सगळे विचार मनात ताजे करणारा सिनेमा म्हणजे गुलाबजाम.
एखादं हॉटेल काढायचं म्हणजे मोजमाप करून स्वयंपाक आला पाहिजे. पण चांगला स्वयंपाक, नुसतं मोजमाप करता येणाऱ्यांना येईलच असे नाही. खाऊ घालणारी व्यक्ती प्रत्येक पदार्थावर तिची/त्याची स्वाक्षरी करत असते. आणि कुणी त्या चवीला असं मोजमापात करकचून बांधू शकत नाही.
कधी कधी, आपण आपल्या कामातून आपलं अस्तित्व शोधत असतो. जे आपल्या आजूबाजूला आपल्याला मिळत नाही, ते स्थैर्य, शांतता आपण जे काही करत असतो त्यातून मिळत असते. राधा आगरकरला (सोनाली कुलकर्णी) ती स्वयंपाकातून मिळते. पण मग तिला आदित्यसारखा (सिद्धार्थ चांदेकर) सवंगडी मिळतो आणि दोघांच्या आयुष्यातल्या बऱ्याच सैरभैर गोष्टी मार्गी लागतात. त्यांचं हे एकमेकांच्या आधाराने (पण एकमेकांमध्ये गुंतून न जाता) मार्गी होणं अतिशय सुंदर मांडलं गेलं आहे.

खादाडी आणि स्वयंपाक आवडणाऱ्यांनी, आवर्जून पाहावा असा हा सिनेमा आहे. सोनाली कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर, दोघांचीही आजपर्यंतची सगळ्यात सुंदर कलाकृती. ज्यांना मध्यंतरी कुंडलकरांचा राग आला होता, त्यांनी तो (थोडावेळ) बाजूला ठेवून पाहण्यासारखा नक्कीच म्हणता येईल.
-----------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ शुम्पी

टेक्ससमध्ये इडलीचं पीठ फुगत नाही? कमाल आहे!!
आता इडलीच्या पिठाचे शास्त्र जेपी नावाच्या कंपनीने टेकओव्हर केलय. Wink

@सशल
माझं लिखाण माझ्या अनुभवांपुरतंच मर्यादित आहे. त्यामुळे मी गूगलवर वाचून इतर क्विझिन्समधले शाश्त्र लिहिले तर ते माझे लिखाण राहणार नाही.

@स्मिता,
धन्यवाद. Happy

सगळ्यांचे मनापासून आभार.

पण भारतीय पाककलेतही एकाच पदार्थाची विविध रूपे बघायला मिळतात. साधा नारळ खवून घातला आहे, की नारळाचं दूध वापरलंय, की खोबरं आहे, त्यात परत ओलं की सुकं आहेच, ह्यावर पदार्थाची चव बदलते. बहुधा पदार्थाची ओळख किती आहे त्यावर त्याकडे कुठल्या परिप्रेक्ष्यातून पाहावे हे ठरत असावे. "एवढं एवढं तिखट" (त्याच हाताची चार बोटं चिकटवून दुसऱ्या पेरांवर अंगठा टेकवत, आणि मनगटाला भरतनाट्यम शैलीत एक मुरका देत) किंवा "एवढासा गूळ" (मागल्या मुद्रेतील अंगठा पहिल्या पेरावर सरकवत) असे वाक्प्रचार फ्रेंच भाषेतही असतील. एलोडीने केलेल्या वर्णनातून हेच जाणवते. कदाचित ओगले आज्जींची पुस्तकं एलोडीने वाचली, तर तिलाही तुझ्यासारखं वाटेल. त्यामुळे फ्रेंच क्विझिन किंवा कुठल्याही क्विझिनला असं काही झुकतं माप देणं विचित्र वाटतं.

अतिशय सुरेख लिहिलंय.
गुलाबजामचा पॅरा सोडल्यास एक स्वतंत्र लेख म्हणुन्ही उत्तम लेख आहे.

चित्रपट बघणार.

सुंदर लिहिलं आहेस सई.
फ्रेंच स्वैपाकाला लेखिकेने झुकतं माप दिलं आहे असं वाचताना वाटलं नाही. तिने तिचा अनुभव लिहिला आहे एवढंच.

बाकी मला असं वाटत असे पूर्वी की 'बेसिक' स्वैपाकाला काही विशेष लागत नाही. तो कोणालाही जमतो. पण आमच्या फिलिपिनो घरसहाय्य्क काकुंनी हा समज सप्रमाण धूळीत मिळवला. एकेकाला नाहीच जमत स्वैपाक आणि तो शिकल्यावाचून अडत काहीच नाही. सुखी असतात लोकं. इतरेजन चवींची गुलामगिरी पत्करतात आणि सोपं आयुष्य अवघड करुन घेतात. Happy

मी लिहीलेल्या प्रतिसादावरून वाद वाढायला नको म्हणून स्पष्टीकरण.
प्रतिसाद लिहीताना एव्हढाच विचार मनात होता की आपण सर्व भारतीय संस्कृतीत वाढलो तर आपला भारतीय स्वैपाक (की स्वयंपाक ) सुद्धा कन्व्हेन्शनली नावारूपाला असलेल्या फ्रेन्च क्विझीन एव्हढाच कला आणि शास्त्र ह्याचं सुरेख मिश्रण दाखवतो. मग माझं मलाच वाटलं कशाला इतका दुराभिमान फक्त भारतीय स्वैपाकाबद्दल? म्हणून मग जनरल मत दिलं की तुम्हाला जर पाककलेत/शास्त्रात इंटरेस्ट असेल तर सगळीच क्विझीन्स तशीच आहेत कमी अधिक प्रमाणात हे नक्कीच जाणवेल.

पण ह्यामुळे उगीचंच सगळं भरकटणार असेल तर मी नक्कीच तो भाग डिलीट करेन.

@सशल
डिलीट वगैरे करायची गरज नाही. असं काही आक्षेपार्ह नाहीये तुमच्या म्हणण्यात.
मी मराठी, आणि फ्रेंच पदार्थ बरेच करून बघितले आहेत म्हणून त्या दोन्हीचे वर्णन आहे.
हातात बसलेली पाककृती असली की त्याबद्दल सहज लिहिता येते. म्हणून.

आणि अर्थातच पारंपरिक भारतीय पाककलेत वैविध्यपूर्ण कृती आहेत.
आणि त्यातील कित्येक भारतात आलेल्या सेटलर्सच्या प्रभावाखाली बदलल्या आहेत. पण या सगळ्यावर अधिकाराने बोलणारे इतर मायबोलीकर (जसे की चिनुक्स) आहेत. त्यामुळे, मी करून न बघितलेल्या गोष्टींवर (किंवा माझा व्यासंग कमी आहे अशा गोष्टींवर) जास्त न लिहिलेलेच बरे.

वाद असा काही नाही. "तुम्हाला जर पाककलेत/शास्त्रात इंटरेस्ट असेल तर सगळीच क्विझीन्स तशीच आहेत कमी अधिक प्रमाणात हे नक्कीच जाणवेल." हे इतकंच म्हणायचं होतं. माझ्या मते तर मानव स्वयंपाक करायला शिकला, हीच अचंब्याची गोष्ट आहे. मुद्दलच ते इतकं मोठं आहे, की पुढे त्याची कला आणि शास्त्र वगैरे विभागणी हे तर सगळं भांबावून टाकणारं व्याज आहे. एक मोठा उंबरठा तिथे ओलांडला गेला आहे.

khupach chhan lihilays sai. gulabjaam nakki baghnar.
tuzhe lekh nehemich avadtat.

MARATHI TYPE KAA HOT NAHIYE? KAAY MAHIT?

माझ्या आईचे एक माप म्हणजे माशीच्या पंखाएवढ मीठ... म्हणजे नक्की किती ते आजवर कळलं नाही.
बाकी लेख एकदम झकास!

छान लिहिलं आहेस सई.

ह्या सिनेमासाठी फूड डिझाएनिंग सायली राजाध्यक्षांनी केलं आहे असं त्यांच्या फेसबूक पोस्टवरून समजलं. तो लेखही खूप छान झाला आहे. मला आवडला.
पण बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न मलाही पडलाय की सिनेमाच्या जाहिरातीत दाखवलेले गुलाबजाम अस्सल खव्याचे का नाहीत? Wink ह्या प्रश्नाचं उत्तर त्या लेखातही नाही मिळालं.

चांगलं लिहिलंयस. Happy
कुंडलकरचा नेहमीच हमखास राग येतो त्यामुळे सिनेमा आवर्जून बघणार. Proud

>>> केळफुलाची/फणसाची भाजी ही मात्र नुसती हमाली आहे.
हाए कंबख़्त, तूने की ही नहीं! निषेध! Proud

छान लिहिले आहे.

पुण्यात मात्र काही खडूस सुगरणी भेटल्या ज्या मुद्दाम दुष्टपणे कृती सांगायच्या नाहीत.
हे चिरोटे कसे केले? या प्रश्नाला अगदी गालाला खळी बिळी पडून, "अगं काही विशेष नाही त्यात" असे म्हणण्यात यायचे.
आणि पुढे सगळ्या जिन्नसांच्या आधी "थोडं" हे एकच प्रमाण लावून कृती सांगण्यात यायची.>>>>आम्हाला तर सरळ सांगायचे कि आमची सिक्रेट रेसिपी आहे, नाही सांगणार Uhoh

लेख आवडला Happy सिनेम्याबद्दल उत्सुकता आहे आणि कुंडलकर बोअर होतात तरी सोकु प्रचंड आवडते त्यामुळे तिच्यासाठी म्हणून सिनेमा नेटफ्लिक्सवर आला तर नक्की बघणार.

शूम्पी, Biggrin

कुरडयांसाठी चीक करणे हे कला, शास्त्र कशात न मोडता 'नसती उठाठेव' या प्रकारात मोडतं Wink

कुरडयांसाठी चीक करणे हे कला, शास्त्र कशात न मोडता 'नसती उठाठेव' या प्रकारात मोडतं >>>>>> Lol असे बरेच पदार्थ या कॅटेगरीत मोडतील Wink

Ramen girl या movie वरून (ढापलाय)काढलाय..
बस तिथे जपानी ramen इथे गुलाबजाम

सायली,
रामेन गर्ल अतिशय वेगळा चित्रपट आहे. या दोन्हीत एकच साम्य आहे, गुरूकडे पदार्थ शिकायला गेल्यावर गुरूने लगेच न शिकवणे.

उत्तम लेख.. पण अजून दोन कॅटेगिरिज राहिल्या असे वाटते. एक म्हणजे जुगाड स्वयंपाक आणि दुसरा म्हणजे मटका स्वयंपाक. शास्त्र नाही आणि कलाही नाही. विद्यार्थी दशेत अत्ता घरात काय आहे तेच घेऊन बनवलेला पदार्थ वा अरे मोहरी नाही आहे पण धने आहेत ना मग घाल की नगाला नग... ह्या पध्धतीने बनवलेला... तर दुसरा ... पाककृती पुर्ण माहिती नाही... प्रमाण नक्की महिती नाही ... पदार्थ स्वतःला आवडत नाही पण दुसर्यासाठी बनवायचा आहे... अशावेळी केलेला पदार्थ... मटका स्वयंपाक!

हाताची चव पण असते ना!!! जरी नाही साग्रसंगीत स्वयंपाक करता आला, जरी नाही पदार्थ सजवता आला तरी जो काही पदार्थ केलाय तो अप्रतिम लागतो. Happy

मस्त लेख.
सोनाली कुलकर्णीचा आवाज अजिबात आवडत नसल्याने तिचे सिनेमे पहाणे बंद केले होते. पण आता वाचुन पाहावा वाटु लागलाय. (ती आवडावी अशी इच्छा आहे म्हणुन पहावासा वाटतोय)

>>पण बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न मलाही पडलाय की सिनेमाच्या जाहिरातीत दाखवलेले गुलाबजाम अस्सल खव्याचे का नाहीत? Wink ह्या प्रश्नाचं उत्तर त्या लेखातही नाही मिळालं.

मेबी खव्याचे गुलाबजाम फोटोजेनिक नसावेत.
बऱ्याचदा आईस्क्रीम वगैरेचं शूटिंग किंवा फोटो काढण्यासाठी रंग घातलेले उकडलेले बटाटे वापरतात कारण ते जास्त फोटोजेनिक असतात.
तसं असू शकेल.

>>>सोनाली कुलकर्णीचा आवाज अजिबात आवडत नसल्याने तिचे सिनेमे पहाणे बंद केले होते.
हो मलाही नाही आवडत. पण या सिनेमात नाही एवढा त्रास झाला. बऱ्याच शॉट्स मध्ये तिला चिडून बोलायचे असल्यामुळे थोडा पीच पण वेगळा आहे.

>>आम्हाला तर सरळ सांगायचे कि आमची सिक्रेट रेसिपी आहे, नाही सांगणार

पण चुकीची सांगून बिघडवण्यापेक्षा ते परवडलं.

>>>कुंडलकरचा नेहमीच हमखास राग येतो त्यामुळे सिनेमा आवर्जून बघणार.
असेही आहेत म्हणजे!

सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. Happy

रंग घातलेले उकडलेले बटाटे वापरतात कारण ते जास्त फोटोजेनिक असतात. >> फोटोजेनिक असतात च्या आधी हुबेहूब दिसतात ते महत्त्वाचं. हुबेहूब दिसले नाही आणि नुसतेच फोटोजेनिक असले तर काय फायदा!

एवढं एवढं .............

हा हा !!!
अजून मी पूर्ण लिखाण वाचलच नाही !!! वरचं एवढं एवढं ... वाचून लॉंग इन करून आलो प्रतिसाद द्यायला ...
मस्तच वर्णन केलंय !!

अशी एकहस्त पाककृती ऐकून तोंडाला इतकं पाणी सुटायचं की कृती गेली उडत, आधी जेवायला वाढा अशा वाक्यानी त्या कृतीची (आणि माझ्या उत्साहाची) सांगता व्हायची. >>>> आणि हे तर एकदमच भारी !!!

आता वाचतो !! Happy

आवडला लेख.
मी लहानपणापासून अन्नपूर्णा पुस्तकाची मदत घेतलेय.

Pages