कळी आणि भुंगा

Submitted by अभिगंधशाली on 17 February, 2018 - 10:07

एक होती रमणीय बाग. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी भरलेल्या त्या बागेत एक सुंदर कोमल कळी वाऱ्यवर आनंदाने झुलत होती. काहीवेळाने तिथे एक भुंगा आला. रंगाने काळा पण सप्तरंगी पारदर्शक पंखांचा. त्याने साऱ्या बागेत फेरफटका मारला.

त्याची नजर त्या कोमल कळीवर गेली अन् त्याला सगळ्याचा विसर पडला. तिच्या सौंदर्याची त्याला भुरळच पडली. तो आपोआप त्या कळी भोवती गुंजरव करु लागला. ती कळी अल्लड कळीही त्याला न्याहाळू लागली. त्याचा पुरुषी रांगडेपणा तिला मोहिनी घालत होता. तिच्या तनामनातून काहीतरी उमलत होते .

असे सारे स्वप्नवत असताना अचानक भुंगा विचार करु लागला, " मी हा असा राकट, कृष्णवर्णी आणि ही कळी इतकी सुंदर, कोमल ! कसं जमणार आमचं ?" नकोच ते असं म्हणत, तो माघारी जाऊ लागला.

इतक्यात " काय झालं ? ", आर्त पण कोमल स्वर त्याच्या कानी पडले. त्याने वळून बघितले तर तिनेच साद घातली होती.

"नाही काही नाही. मी तुझ्या रुपावर इतका भाळलो की मला वास्तवतेचे भानच राहिले नाही."

" वास्तव ? कसले वास्तव ? "

"अगं तू इतकी सुंदर ! मी हा असा काळा. तू किती कोमल! मी हा असा राकट. माझ्या स्पर्शानेही तुला इजा व्हायची म्हणून मोह आवरला."

तिला त्याचे बोलणे ऐकून हसू आले. हसताना ती अधिकच मोहक दिसत होती.

"यात हसण्यासारखे काय ?" त्याचा प्रश्न.

"हसू नको तर काय करु. तुला जे प्रश्न वाटले नेमकं तेच मला भावले. तुझा रांगडेपणा मला मोहवून गेला. तुझ्या कृष्णवर्णाला त्या सप्तरंगी पंखांनी अधिक आकर्षक केलं आहे आणि तुझे मधुर गुंजन तर स्वर्गसुखच." ती उत्तरली.

तिच्या बोलण्यामुळे तो सुखावला पण मनात अजूनही किंतू होताच.
तिच्यासाठी पुन्हा एकदा मधुर गुंजन करु लागला. त्या प्रेमगीताने ती फुलू लागली आणि तिचे सौंदर्य अधिकच बहरु लागले, पण तो अजूनही अंतर ठेवूनच होता.

इतक्यात एक भुकेला पक्षी त्याच्या दिशेने झेपावला. कळीने क्षणाचाही विलंब न करता त्याला आपल्या कोमल दलांमधे ओढले. तो नको म्हणत असताना काही होणार नाही, असे त्याला आश्वस्त करत आपले दल मिटून घेतले.

सारी रात्र सरली. त्याच्या प्रेमात ती आकंठ बुडाली. त्यांच्या प्रणयाच्या खुणा तिच्या नाजूक पाकळयांवर उमटल्या. ते बघून त्याला अपराधी वाटू लागले, पण तीने त्याला काही वेळ थांबायला सांगितले.

जरावेळाने बागेचा माळी आला आणि एकेक सुंदर फूल तोडून आपल्या परडीत भरु लागला, कळीच्या पाकळ्यांवरचे डाग बघून तिला जाणीवपूर्वक नाकारले.

ती हसत म्हणाली, "बघितलस तुझ्या खुणांनीच मला जीवदान दिले."

भुंगा आनंदाने कळी भोवती गुंजराव करु लागला आणि ती त्याच्या प्रेमाने अधिकच बहरु लागली.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे हे! आवडलं..
एक दुरूस्ती, गुंजरव→ गुंजारव !
पुलेशु.
बायदवे, आपण हे लेखन 'लेखनाचा धागा' ऐवजी 'वाहते पान' वर केल्याने तीसहून अधिक प्रतिसाद आल्यास आधीचे प्रतिसाद वाहून (निघून) जातील.
खालील लिंक वर जाऊन वेबमास्टर यांना विनंती करून सेटींग बदलून घेता येईल.
https://www.maayboli.com/user/1/guestbook