आज ८मे २०१६.माझी ट्रीटमेंट संपून आज दहा वर्षे पूर्ण झाली.असं म्हणतात की 'काळ हे उत्तम औषध आहे'. जसाजसा काळ जातो, तसे तुम्ही तुमची दुःख, तुमच्या यातना सगळं हळूहळू विसरता. राहतात, मागे उरतात त्या फक्त आठवणी ! आज पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
गेल्या दहा वर्षांतला प्रत्येक दिवस मी आज पर्यंत कित्येक वेळा अनुभवला आहे. एखाद्या flashback सारखे ते सगळे प्रसंग, त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरुन सरकत जातात.
'३ नोव्हेंबर २००५' ही तारीख आणि भाऊबीजेचा तो दिवस माझ्या आयुष्यात बरंच काही बदलून गेला- खरं तर माझं सगळं आयुष्यच बदलून गेला.
त्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मी जोधपूर (राजस्थान) च्या military hospital मधे radiologist च्या समोर बसले होते. त्यांचा चिंतातूर चेहरा आणि एकंदर body language बघून मला कल्पना आली होती की माझे सोनोग्राफी चे रिपोर्ट्स नॉर्मल नाहीएत. त्यांच्या पुढच्या प्रश्नानी माझी शंका खरी असल्याची खात्री झाली. त्यांनी विचारलं," Mam, is your husband there with you?" मी म्हणाले," काय असेल ते मलाच सांगा. कारण ते आत्ता बाहेर गावी गेले आहेत. मी एकटीच आले आहे." त्यांची द्विधा मनस्धिती माझ्या लक्षात आली. मी त्यांना म्हणाले,"माझे रिपोर्ट्स नॉर्मल नाहीत याची मला कल्पना आली आहे. जे काही असेल ते तुम्ही मलाच सांगा. After all this is my body and I must know what is wrong with it."
देवदयेनी माझ्या दिवंगत आई चा 'मनाच्या खंबीरपणाचा' वारसा माझ्या कडे आहे त्यामुळे मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली. डॉक्टर म्हणाले,"मँम, तुमचे हे रिपोर्ट्स ठीक नाहीत. This could be serious." मी पुन्हा विचारलं,"How serious? आणि नक्की काय झालंय मला?"
त्यांनी सांगितलं," तुमच्या दोन्ही ovaries मधे ट्यूमर्स आहेत आणि मला वाटतं की ते malignant आहेत. मला आणखी भीती आहे की या malignant cells आता फक्त ovaries पर्यंत सीमित नसाव्यात. पण त्या कुठपर्यंत पोचल्या आहेत हे आत्ता सांगणं कठीण आहे. त्यासाठी तुम्हांला PET CT Scan करून घ्यावा लागेल."
हे सगळं ऐकून मी माझं मन आणखी घट्ट करून विचारलं," कुठली स्टेज आहे? माझे husband दोन दिवसांनंतर येणार आहेत. जर खूप सिरियस असेल तर मी त्यांना आजच परत यायला सांगते."
पण त्याची गरज नव्हती. २-३ दिवसांनी फारसा फरक पडणार नव्हता. म्हणून मी या बाबतीत दोन दिवस गप्प राहायचं ठरवलं.
कारण मी जर फोन करून हे सगळं नितिन ला( माझ्या नवऱ्याला) सांगितलं असतं तर तो नक्कीच पुढची फ्लाईट घेऊन जोधपूरला परत आला असता.पण त्या दिवशी भाऊबीज होती आणि बऱ्याच वर्षांनंतर तो ही भाऊबीज त्याच्या बहिणी बरोबर साजरी करत होता. माझ्या डोळ्यांसमोर माझे सासू-सासरे, माझी नणंद,नितिन यांचे उत्साही, आनंदी चेहरे झळकले. माझ्या आजाराची बातमी आजच त्यांना सांगून त्यांचा हा आनंद हिरावून घेणं योग्य नाही, असा विचार करून मी गप्प बसायचं ठरवलं.पण सगळ्यात आधी ही बातमी मला नितिन बरोबर share करायची होती म्हणून मग मी कुणालाच काही सांगितलं नाही.
पण आधी ठरल्या प्रमाणे जर मी नितिन ला फोन करून रिपोर्ट्स बद्दल कळवलं नसतं तर त्याला कदाचित शंका आली असती म्हणून मग मी ठरल्याप्रमाणे दुपारी घरी गेल्यावर त्याला फोन केला आणि सांगितलं,"डॉक्टर आज सुट्टी वर आहेत, म्हणून त्यांनी चार दिवसांनंतरची appointment दिली आहे. पण प्राथमिक परीक्षेत तरी काळजीचं काही कारण नाहीये." खोटं बोलल्या बदल मनोमन देवाची क्षमा मागितली.
त्या संध्याकाळी मी माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स घेऊन एका civilian डॉक्टर कडे गेले.. second opinion साठी. त्यांनीही bilateral ovarian cancer असल्याचं सांगितलं.पण त्याची severity काय आहे हे फक्त CT Scan च्या रिपोर्ट्स नंतरच स्पष्ट होणार होतं.
But at the end of the day, I knew that I had advanced cancer of ovaries. And it was 'serious'. पण किती सिरियस हे त्या क्षणी कुणीच सांगू शकत नव्हतं.
रात्री मुलींना झोपवल्यानंतर मी डोळे मिटून थोडा वेळ शांतपणे बसले. मन सैरभैर होत होतं त्याला आवरायचा प्रयत्न केला. सगळयात आधी ठरवलं,"Why me? मी कुणाचं काय वाकडं केलं होतं? मग माझ्या बरोबर च असं का झालं?" असा विचारही अजिबात मनात आणायचा नाही. कारण आजपर्यंत माझ्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना घडल्या तेव्हा तर मी कधीही नव्हतं विचारलं देवाला,"Why me? माझ्याच आयुष्यात इतक्या चांगल्या घटना का?" ते सगळं मी आनंदानी स्वीकारलं, मग आत्ता या प्रसंगी मी असा प्रश्न का विचारू?
आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादी परिस्थिती किंवा वस्तुस्थिती बदलू शकत नाही तेव्हा त्या बद्दल मनस्ताप करून घेण्यात काही अर्थ नाही. उलट त्या परिस्थिती ला स्वीकारून त्यातून पुढे कसा मार्ग काढायचा हा विचार केला पाहिजे. मी ही माझ्या मनाची तयारी केली. कागद आणि पेन घेऊन बसले. एका त्रयस्थाप्रमाणे मी स्वतःच माझी situation assess केली.
माझ्या समोरचा प्रॉब्लेम होता 'माझा आजार' आणि माझं ध्येय होतं -या आजारावर मात करून त्याला कायमचं नेस्तनाबूत करणं ! पण सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे माझ्या आजाराचं गांभीर्य मला अजुन पर्यंत कळलं नव्हतं. रोग शरीरात पसरला असण्याची दाट शक्यता होती... नव्हे जवळ जवळ खात्रीच होती. पण तो किती आणि कुठे कुठे पसरला आहे हे अजून कळलं नव्हतं.
एकदम मनात विचार आला,' अजून किती महिने असतील माझ्या कडे? महिने तरी असतील ना...का आता फक्त दिवसच मोजायचे?'
दोन तीन दिवसांपूर्वीच मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले होते तेव्हा तिच्या ओळखीत एका बाईला लास्ट स्टेजचा ब्लड कँसर असल्याचं कळलं होतं. तिला डॉक्टर नी जेमतेम महिन्याभराचा अवधी दिला होता. "माझ्या बाबतीत पण असंच काही असलं तर?" असा प्रश्न हळूच मनात डोकावला. पण मी लगेचच तो विचार झटकून टाकला. जर तितकंच सीरियस असतं तर डॉक्टर नी सांगितलं असतं .. नक्कीच. तशा परिस्थितीत ही आशेचा एक किरण दिसला.
पण मी या शक्यतेवर ही विचार सुरू केला. कारण मला माहीत होतं की जर मी याचा सोक्षमोक्ष नाही लावला तर हा विचार सारखा डोकं वर काढत राहील आणि ते मला मान्य नव्हतं.
मी नेहमी प्रमाणे या situation बद्दल चे positive आणि negative पॉइंट्स लिहायला सुरुवात केली. आणि त्या विचार मंथनातून एक नवीनच thought process सुरू झाली.
अचानक वाटलं की 'देवाची आपल्यावर जरा जास्त च मेहेरनजर आहे! त्यामुळेच कदाचित त्यानी मला हा पुढच्या काही दिवसांचा ग्रेस पीरिएड दिलाय. तो मला सांगतोय की ,'तुला जे काही करावंसं वाटतंय ते करून घे. तुझ्या मुलींच्या भविष्याबद्दल काही प्लॅन करायचं असेल तर ते कर." त्या क्षणी मनोमन देवाचे आभार मानले.. त्यानी दिलेल्या या ग्रेस पीरिएड साठी. हो ना! जर त्यानी मनात आणलं असतं तर मलाही इतर अनेक जणांसारखं all of a sudden घेऊन गेला असता ... without prior notice.... But now, even in this situation, I had the advantage. आता त्या बाबतीतली uncertainty नाहीशी झाली आणि मी इतर issues वर लक्ष् केंद्रित केलं.
मनात एकदम आमच्या मुलींचा विचार आला. दोघींच्या खोलीत जाऊन बघितलं. माझ्या दोन्ही मुली-ऐश्वर्या ( वय वर्षे ११) आणि स्रुष्टी (वय वर्षे ६) शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्या आईच्या आणि पर्यायाने त्यांच्या आयुष्यात आलेल्या या वादळाची त्यांना तीळमात्र ही कल्पना मी होऊ दिली नव्हती. मी दोघींच्या डोक्यावरुन हात फिरवला. मनोमन देवाची प्रार्थना केली. म्हटलं,"देवा, माझ्या मुलींना त्यांच्या आयुष्यात नीट सेटल झालेलं बघायचं आहे मला. आणि त्यासाठी मला या आगंतुक संकटावर मात करणं आवश्यक आहे.इतक्या गुणी आणि समजुतदार मुली आहेत माझ्या, मी खूपच नशिबवान आहे म्हणून मी 'त्यांची' आई झाले.They have made my life complete and so they also deserve the best in their life. आणि कुठल्याही मुलांकरता त्यांच्या आई वडीलांपेक्षा बेस्ट दुसरं काहीच नसतं. त्या क्षणी मी ठरवलं- हा कँसर माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. त्याला माझ्या आयुष्यात स्थान नाही. मी या रोगावर मात करीन. माझ्या मुलींना त्यांची आई मिळेल... नक्की!
अचानक मनातलं वादळ शांत झालं आणि विचारांना एक नवी दिशा मिळाली. परत आमच्या खोलीत येऊन बसले. मनातले विचार कागदावर उतरवायला सुरुवात केली. कागदावर मधोमध एक उभी रेघ आखली...एका बाजूला होता माझा आजार-कदाचित 'जीवघेणा'. आणि दुसऱ्या बाजूला लिहित गेले- माझे आई बाबा आणि सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद, नितिन ची साथ, आप्त स्वकीयांच्या सदिच्छा आणि प्रार्थना, मुलींचं निर्व्याज प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजारावर मात करायची माझी जिद्द आणि देवावर असलेली माझी असीम श्रद्धा..... लिस्ट वाढतच होती. तेव्हा लक्षात आलं - शत्रू कडे एकच हत्यार आहे पण माझ्याकडे ..... !
अचानक माझ्या या शत्रुवर मला खूप दया आली. वाटलं-'बिच्चारा! याला माहिती नाहीये यानी कुणाशी पंगा घेतलाय!' त्या परिस्थितीतही चेहऱ्यावर एक मंद हसू आलं 'विजयाचं हसू'.डोळ्यांसमोर एक द्रुश्य दिसलं-
माझा आजार (एक vague आकार) घाबरून माझ्या पासून लांब पळत सुटलाय आणि मी मात्र एके ठिकाणी ठामपणे उभी आहे-माझ्या पाठीशी (वर लिहीलेली) माझी सगळी सेना घेऊन...
त्या दिवसापासून आजपर्यंत मी हे चित्र माझ्या मनात कोरून ठेवलंय.
परत एकदा हातातल्या कागदाकडे पाहिलं आणि सिनेमात दाखवतात तसं माझं दुसरं मन म्हणालं,"पण जर असं नाही झालं तर?" म्हणतात ना-Hope for the best but be prepared for the worst. मी ही तेच करायचं ठरवलं. दुसरा कागद घेतला, लिहायला सुरुवात केली... माझ्या नंतर काय आणि कसं होऊ शकतं? नितिन ची नोकरी अशी आहे की घरात मुलींना सांभाळायला कायम कुणीतरी असणं आवश्यक आहे. त्या दोघी अजून लहान आहेत. नितिन कामानिमित्त तीन तीन महिने बाहेरगावी असतो. आणि जेव्हा त्याची फील्ड पोस्टींग येईल तेव्हा तर तो मुलींना बरोबर घेऊन नाही जाऊ शकणार. मग त्यावेळी मुली कुठे राहतील?
पहिला पर्याय होता- मुलींना होस्टेल मधे ठेवायचं. खरं तर सगळयात practical मार्ग तोच होता पण माझ्या मनाला तो पटत नव्हता. दोघींच्या मनावर याचा काय आणि कसा परिणाम होईल? आई अचानक गेली आणि आता बाबा ही जवळ नाहीत! छेः ....... कल्पनाच खूप भयावह होती.
दुसरा मार्ग म्हणजे- नितिन नी आर्मी सोडून सिव्हिल मधे नोकरी करायची किंवा त्यानी योग्य अशी जोडीदार शोधून दुसरं लग्न करायचं. पण हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. यावर सर्व द्रुष्टीनी विचार करायची गरज होती. त्यमुळे हे सगळं नितिन बरोबर सविस्तर बोलायचं ठरवलं आणि मी होस्टेल च्या पर्यायावर विचार सुरू केला. राहून राहून मुलींचे निरागस चेहरे डोळ्यांसमोर येत होते. त्याच रात्री त्यांनी दोघींनी माझ्या साठी एक grand dinner प्लॅन केला होता.
संथ्याकाळी दोघींनी मला सांगितलं,"आई, आज बाबा आत्याकडे खूप छान पार्टी करत असतील ना म्हणून आम्ही पण तुला पार्टी देणार आहोत. सगळं आम्ही दोघीच करणार. तू अजिबात किचन मधे नाही यायचं."
माझ्यासाठी त्यांनी एक मेन्यु कार्ड तयार केलं. Candlelight dinner साठी टेबल सेटिंग केलं. डिनर चा मेन्यु होता- soft drink, potato chips आणि दोन प्रकार ची सँडविघेस्.. जँम आणि सॉस सँडविच. इतका स्पेशल डिनर मी आजपर्यंत नाही खाल्ला. दोघींना खूप आनंद झाला कारण मी ताटातलं सगळं संपवलं. त्यांच्या मते 'सगळं संपलं' म्हणजे आईला खरंच खूप आवडलं. पण ते जेवण मी कसं खाल्लं ते माझं मलाच माहिती आहे. एकीकडे खात होते आणि दुसरीकडे डोळ्यांतून पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न करत होते.
हे सगळं आठवत, मुलींचा विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. दुसरा दिवस म्हणजे ४ नोव्हेंबर असाच विचारात आणि पुढची प्लॅनिंग करण्यात गेला. बोलता बोलता मुलींसमोर होस्टेल चा विषय काढला. त्या बद्दल खूप उत्साहानी बोलायला सुरुवात केली. तिकडे गेल्यावर त्यांना दोघींना किती मजा येईल, वगैरे वगैरे.. पण मुलींना तो विचार काही फारसा पटला नाही. मीही जास्त फोर्स नाही केलं. जी कल्पना मुळात मलाच पटत नव्हती ती मी मुलींना कशी पटवणार ? मी ते सगळं देवावर सोपवलं.
५ नोव्हेंबर चा दिवस उजाडला. नितिन परत आला घरी. बाबा येणार म्हणून दोघी मुली खूप खुश होत्या. मला म्हणाल्या,"आज बाबांच्या आवडीचा स्वैपाक कर हं आई." पण स्वैपाक करताना अचानक मनात विचार आला-' या पुढे कधी ह्या तिघांसाठी असा स्वैपाक करणं असेल का माझ्या नशीबात !' पण मी लगेच तो विचार झटकला आणि माझ्या दोलायमान मनाला दटावलं.
दुपारचं जेवण होईपर्यंत मी नितिन ला काहीच सांगितलं नाही..पण योग्य वेळ बघून मग मी त्याला सगळं सविस्तर सांगितलं. ट्रीटमेंट साठी दिल्ली ला किंवा पुण्याला जायला लागणार होतं. कारण तिथल्या मिलिटरी हॉस्पिटल मधेच oncology departments आणि कँसर स्पेशालिस्ट्स होते. माझं माहेर पुण्यात असल्यामुळे आम्ही साहजिकच पुण्याला जायचा निर्णय घेतला.
७ नोव्हेंबर ला सकाळी CT Scan साठी हॉस्पिटलमध्ये गेले. नितिन होताच बरोबर. आजपर्यंत ब्लड टेस्ट, सोनोग्राफी आणि एक्स रे या शिवाय मी कुठलीच इनव्हेस्टिगेशन नव्हती केली. कधी गरजच नाही भासली. पण त्या दिवशी CT Scan च्या त्या अवाढव्य मशीन समोर उभी होते तेव्हा मनात विचार आला- या स्कँन मधे काही शारीरिक वेदना किंवा त्रास होत असेल का? पण मग एकदम लक्षात आलं की माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. मला या रोगावर मात करायची होती आणि त्यासाठी आधी मला त्याची पूर्ण माहिती असणं आवश्यक होतं.
'अगर दुश्मन को हराना है, तो पहले उसे पूरी तरह से जान लो, समझ लो। फिर उसकी हार और तुम्हारी जीत - पक्की।
CT Scan ची पूर्ण प्रक्रिया साधारण एक तास भर चालू असावी. पण मला मात्र प्रत्येक क्षण युगासारखा भासत होता. पण मनात एकच विचार चालू होता-'या रोगावर मात करायला जे जे करावं लागेल ते सगळं मी करीन. जितका त्रास, वेदना होतील, ते सहन करीन. कारण मला खात्री होती की या वेदना काही वेळापुरत्याच आहेत. मी लवकरच या सगळ्यांतून बाहेर पडेन आणि माझं आयुष्य पुन्हा नव्या जोमानी जगेन.
रेडिऑलॉजिस्ट म्हणाले," Mam, stay still. तुम्ही जितक्या स्थिर राहाल तितका स्कँन स्पष्ट येईल." इतक्या वेदनांमधे हात पाय न हलवता स्थिर राहाणं आणि तेही तासभर..... अवघड होतं.. पण तितकंच आवश्यक ही होतं. म्हणून मग मी शारीरिक शक्तीला माझ्या मनाच्या शक्तीची साथ दिली आणि scan पूर्ण होईपर्यंत निभावून नेलं.
रेडिऑलॉजिस्ट नी थोड्याच वेळात आम्हांला बोलावलं. म्हणाले,"पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मधले oncologist surgeon सध्या टेम्पररी ड्यूटी वर इथे आले आहेत. आत्ता ऑपरेशन थिएटर मधे आहेत. तुम्ही स्कँन ची फिल्म घेऊन जा आणि त्यांना दाखवा. सविस्तर रिपोर्ट्स मी संध्याकाळ पर्यंत देतो.
आम्ही लगेच जाऊन त्या सर्जन ला भेटलो. त्यांनी स्कँन पाहिला आणि म्हणाले,"Mam, I will not say you have come early..... but you are not late also."
त्यांचं हे वाक्य ऐकलं आणि मला जग जिंकल्याचा आनंद झाला. मी त्या क्षणी ठरवलं- मी या रोगावर मात करणारच. ते पुढे म्हणाले,"तुम्ही कन्सल्टिंग रूम मधे बसा. मी एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर संपवून येतो." थोड्या वेळानी ते आले आणि त्यांनी पुन्हा एकदा स्कँन नीट अभ्यासला. माझी प्राथमिक शारीरिक तपासणी केली आणि म्हणाले," मँम, तुमच्या दोन्ही ओव्हरीज् मधे malignant tumors आहेत. पण आता ते फक्त ओव्हरीज् पर्यंत सीमित नाही राहिले. डाव्या ओव्हरी मधला ट्यूमर खालच्या दिशेने वाढत जाऊन रेक्टम ला चिकटला आहे आणि आता तिथे आतपर्यंत पसरला आहे. In fact, now it is difficult to differentiate between the organ and the tumor.. उजव्या ओव्हरी मधला ट्यूमर वरच्या बाजूला वाढून diaphragm ला चिकटला आहे आणि हळूहळू तिकडे पसरतो आहे. दोन्ही ट्यूमर्स प्रत्येकी साधारणपणे ९.५ सें मी ते १० सें मी इतके लांब आहेत. तुमचा कँसर तिसऱ्या स्टेज मधे आहे- स्टेज '3-C' to be precise. कँसर cells शरीरात इतर ठिकाणी पोचल्या असण्याची देखील शक्यता आहे.म्हणूनच मी मगाशी म्हणालो की you have not come early. पण काळजी करू नका. We will manage this." मग नितिन कडे बघून ते म्हणाले," Patient is very positive. त्यांच्या body language वरूनच कळतंय. आणि त्यांची ही सकारात्मक भूमिका त्यांना नक्कीच मदत करेल."
मग त्यांनी आम्हांला ट्रीटमेंट चा आराखडा समजावून सांगितला - आथी तीन केमोथेरपी सेशन्स मग सर्जरी आणि मग उर्वरित तीन केमोथेरपी. सर्जरी मधे ओव्हरीज् बरोबरच गर्भाशय आणि fallopian tubes पण काढून टाकण्यात येणार होत्या.
हे सगळं ऐकत असताना एक प्रश्न वारंवार माझ्या मनात येत होता. मी डॉक्टर ना म्हणाले,"मगाशी मी वेटिंग रूम मधे बसले होते तेव्हा तिथल्या एका पोस्टरवर 'how to detect cancer या हेडिंग खाली signs and symptoms of cancer अशी एक लांबलचक लिस्ट होती. पण माझ्या बाबतीत त्यातली कुठलीच लक्षणं नाही आढळली. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा रोग माझ्या शरीरात शिरून पसरतो आहे पण मला कसलाही त्रास किंवा वेदना नाही जाणवल्या. अगदी कॉमन असणारे weight gain किंवा weight loss वगैरे पण नाहीत. असं कसं? "
यावर ते म्हणाले," मँम, ओव्हेरियन कँसर च्या पेशंट्स मधे बऱ्याच वेळा असं होतं. सुरुवातीच्या काळात पेशंटला कसलाच त्रास जाणवत नाही. म्हणूनच या कँसरला बरेच लोक silent killer असंही म्हणतात."
घरी गेल्यावर देवा समोर उभी राहिले. हात जोडून त्याचे आभार मानले... दोन गोष्टीं साठी- पहिली म्हणजे 'मला वेळेतच माझा आजार लक्षात आला, अगदी just in time. (कारण आणखी काही दिवस उशीर झाला असता तर कँसर चौथ्या स्टेज मधे पोचला असता आणि मग त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्य झालं असतं.)
आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'माझ्या शरीरातलं कुठलंही vital organ रोगग्रस्त झालं नव्हतं.
अचानक विचारांना नवीन दिशा मिळाली -"God wants me to live" ! देवाची अशी इच्छा आहे की मी या आजारातून सुखरुप पणे बाहेर पडावं आणि म्हणूनच त्यानी मला वेळेत सावध केलं.
संध्याकाळ पर्यंत माझ्या आजाराची बातमी आमच्या कॉलनीत पसरली. माझ्या मैत्रिणी, नितिन चे सहकारी, मित्र सगळ्यांनी मदतीची तयारी दाखवली.पण सगळ्यांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं- Of all the people, प्रिया ला कँसर कसा झाला?
कारण ते सगळे जण मला रोज संध्याकाळी एक-एक तास brisk walk करताना बघायचे.आमच्या जोथपूरच्या मिलिटरी स्टेशन मधल्या सगळ्या official आणि cultural कार्यक्रमात मी नेहमी सक्रियपणे सहभागी होत असे. त्यामुळे माझ्या कँसरची बातमी माझ्या इतकीच इतरांसाठी ही धक्कादायक होती.
आता आम्हाला पुढची तयारी करायची होती. ट्रीटमेंट कमीत कमी ६-७ महिने तरी चालणार होती. आणि तेवढा काळ मला पुण्यात राहणं भाग होतं.दोघी मुली अर्थातच माझ्या बरोबर पुण्याला जाणार होत्या. पण त्यात भर म्हणून नितिनची पोस्टिंग ऑर्डर आली होती- त्याला ११ नोव्हेंबर ला पंजाब मधे 'मोगा' ला हजर राहायचे होते.
आम्ही माझ्या CT Scan नंतर सरळ मुलीच्या शाळेत गेलो. त्यांच्या मुख्याध्यापिका ना भेटून सगळं सविस्तर सांगितलं. ऐकून त्यांनाही धक्का बसला. पण त्यांनी आम्हांला पूर्ण सहकार्य दिलं. सहा-सात महिने मुलींची गैरहजेरी लागणार होती. कदाचित त्यांना वार्षिक परीक्षेकरता यायला ही जमणार नाही याची आम्ही पूर्ण कल्पना दिली. पण त्या म्हणाल्या," तुम्ही त्या बाबतीत निर्धास्त रहा. ते सगळं कसं मँनेज करायचं ते मी बघून घेईन. तुमच्या दोन्ही मुलींचा आत्तापर्यंतचा academic performance खूप चांगला आहे त्यामुळे त्यांनी मंथली टेस्ट्स दिल्या नाहीत तरी चालेल. वार्षिक परीक्षेच्या प्रश्णपत्रिका मी तुम्हाला पोस्टानी पाठवीन. तुम्ही मुलींकडून उत्तरपत्रिका लिहून घ्या आणि मला पाठवा. त्या दोघी चीटिंग करणार नाहीत याची मला खात्री आहे. तुम्ही आता फक्त तुमच्या ट्रीटमेंट कडे लक्ष द्या." त्यांच्या या बोलण्यामुळे आमची ती काळजी दूर झाली.
आता अजून एक महत्त्वाचं काम होतं-आणि ते म्हणजे घरातल्या सगळ्या सामानाची आवराआवर आणि पँकिंग.सगळ्यात आधी माझी आणि मुलींची पुण्याला घेऊन जायच्या सामानाची जमवाजमव आणि पँकिंग. त्यात इतर सामानाबरोबर मुलींची अभ्यासाची पुस्तकं पण ठेवली. मग होती स्वयंपाक घर आणि फ्रीजची स्वच्छता, दूधवाला, पेपरवाला, मोलकरीण यांचे हिशोब.
या सगळ्या बरोबर नितिन ची मोगाला जायची तयारी- त्याच्या सामानाचं वेगळं पँकिंग. त्याशिवाय घरातल्या इतर सामानाची पँकिंग पण आवश्यक होती. कारण नितिन ची पोस्टिंग दुसऱ्या गावाला झाल्यामुळे आम्हांला शैक्षणिक वर्ष संपल्यावर (मार्च- एप्रिल च्या सुमारास) हे घर रिकामं करावं लागणार होतं. पण त्यावेळी मी पुण्याहून येऊ शकेन की नाही याची काही खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही चौघांनी मिळून शक्य होईल तेवढं सामान बॉक्सेस् मथे पँक केलं.
नितिन नी इमर्जन्सी कोटा मधून आमची तिघींची पुण्याची तिकिटं रिझर्व्ह केली, आठ नोव्हेंबर ची.
तिकिटं हातात आल्यावर मी पुण्यातल्या माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला. तिला सगळं सविस्तर सांगितलं. ट्रीटमेंट च्या काळात मी तिच्या घरी राहायचा विचार करत होते. माझा आजार आणि त्याची severity कळल्यावर साहजिकच ती मूळापासून हादरली होती. तिच्या आवाजावरून माझ्या लक्षात आलं. पण स्वतःला सावरून घेत ती म्हणाली," पियु, तू मुलींना घेऊन सरळ माझ्याकडे ये. बाकी कुठलाही विचार करू नको." मी तिला ट्रीटमेंट च्या कालावधीचीही कल्पना दिली. त्यावर ती म्हणाली,"तुला जितके दिवस पाहिजे तितके दिवस तू माझ्याकडे राहू शकतेस." मी तिला ९ नोव्हेंबर करता पुण्यातल्या एखाद्या ऑन्कॉलॉजिस्ट ची अपॉईंटमेंट घेऊन ठेवायला सांगितली - थर्ड ओपिनियन साठी.
दुसऱ्या दिवशी (आठ तारखेला) सकाळी मी माझ्या शाळेत- जिथे मी शिकवत होते - तिकडे गेले. प्रिन्सिपॉल ना सगळं सांगितलं. नोकरीचा राजीनामा लिहून दिला. सगळ्या सहकर्मचार्यांचा निरोप घेतला. त्यांचा कुणाचा या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पण सगळयात अवघड होतं माझ्या वर्गातल्या मुलांना सांगणं. गेल्या काही महिन्यांत त्यांच्या बरोबर एक वेगळाच ऋणानुबंध जुळला होता माझा. मी दुसऱ्या गावाला कामासाठी जाते आहे हे कळल्यावर त्यांचा पहिला प्रश्न होता -" तुम्ही परत कधी येणार?" मी म्हणाले,"लवकरात लवकर." त्यांच्या भाबड्या डोळ्यांमधे अजूनही बरेच प्रश्न होते पण त्यांची उत्तरं कदाचित माझ्याकडे नव्हती. त्या मुलांचं ते निरागस प्रेम बघून मला अजूनच स्फूर्ति मिळाली- या रोगावर मात करायची.
त्याच दिवशी संध्याकाळच्या ट्रेन नी मी आणि दोघी मुली पुण्याला जायला निघालो.
क्रमशः
बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग १)
Submitted by nimita on 4 February, 2018 - 00:40
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Hats off to your rock solid
Hats off to your rock solid positive attitude _/\_
Total respect !!!
Thanks मित
Thanks मित. Will be posting the second part soon.
काय लिहु तेच कळत नाही.
काय लिहु तेच कळत नाही. तुम्ही जो धीर दाखवलात, तुमचे positive विचार याचे खरच खुप कौतुक वाटते. Really Hats off to you!!!
खरोखरच निशब्द....
खरोखरच निःशब्द....
सलाम तुम्हाला.....
_____/\____
हँट्स ऑफ, तुमची सकारात्मक
हँट्स ऑफ, तुमची सकारात्मक द्रुष्टी, परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणे , निर्णयक्षमता सर्वच घेण्यासारखे आहे. तुम्हाला पुढील निरोगी दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा!
Hats off! खरंच तुमची
Hats off! खरंच तुमची सकारात्मक दृष्टी अनुकरणीय आहे.
Hats off to your rock solid
Hats off to your rock solid positive attitude _/\_
Total respect !!!>>अगदी
पण माझ्या बाबतीत त्यातली
पण माझ्या बाबतीत त्यातली कुठलीच लक्षणं नाही आढळली. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा रोग माझ्या शरीरात शिरून पसरतो आहे पण मला कसलाही त्रास किंवा वेदना नाही जाणवल्या. अगदी कॉमन असणारे weight gain किंवा weight loss वगैरे पण नाहीत. >>>मग तुम्हाला काय शंका आली किंवा काय वेगळे जाणवले आणि तुम्ही टेस्ट्स करून घेतल्या ते शक्य असल्यास लिहाल का?
खरंच सलाम तुम्हाला आणि
खरंच सलाम तुम्हाला आणि तुमच्या जिद्दीला. तुमचे सकारात्मक विचार इतरांना पण बळ देणारे आहेत
नमिता, पुढील लिखाणात ते
नमिता, पुढील लिखाणात ते स्पष्ट केले आहे. लवकर च share करीन. ☺️
मस्त. तुमची लेखनशैली आवडलीच
मस्त. तुमची लेखनशैली आवडलीच पण त्याहि पेक्षा एका बिकट समस्येला हँडल करण्याचा पर्स्पेक्टिव अणि बोल्डनेस आवडला. पुढील आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!!
निःशब्द. ग्रेट, Hats off.
निःशब्द. ग्रेट, Hats off.
hats off !! लिखाण पण आवडले.
hats off !!
लिखाण पण आवडले.
Hats off! मला तुमची सुस्पष्ट
Hats off! मला तुमची सुस्पष्ट विचार पद्धत अतिशय आवडली. तुम्ही हे लिहून अनेकांना विश्वास देताय की तेदेखील विजय गाथा लिहू शकतील they too can win this war. हे फार भलं काम करताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
(डिसेंबर २०१७ माझी ट्रिटमेंट संपून १२ वर्षे - १ तप झाले!)
नि:शब्द
नि:शब्द
निमिताजी काय लिहु कळत नाहिये.
निमिताजी काय लिहु कळत नाहिये.. वाचता वाचता छातीत धड-धड वाढतेय हे जाणवत होतं..डोळ्यासमोर चित्र उभं रहात होतं. कौतूक वाटलं तुमचं.
पुढील आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!!
तुम्ही खरोखर महान आहात _/\_
तुम्ही खरोखर महान आहात _/\_
लेख आणि सकारात्मक विचारपद्धती
लेख आणि सकारात्मक विचारपद्धती आवडली.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
सकारात्मक विचारप्रक्रिया
सकारात्मक विचारप्रक्रिया सविस्तर लिहिलीत ते फारच भावलं.
मानलं तुम्हाला! _/\_
स्वतःला झालेल्या या जीवघेण्या
स्वतःला झालेल्या या जीवघेण्या आजाराचे इतके तटस्थपणे आणि संयमितरित्या निरीक्षण करून सकारात्मक परिणाम साधणे ... हे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. फार धीराच्या आहात. !! हे नक्किच इतरानाही प्रेरणादायी ठरो.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ..
तुमच्या जिद्दीला, आशावादी
तुमच्या जिद्दीला, आशावादी स्वभावाला सलाम.
तुमच्या लिखाणातून तुमचा संघर्ष, तुमच्या जवळच्या माणसांबद्दलचं तुमचं प्रेम कळून येतंय.
फार प्रेरणादायी आहे तुमचा एकुणच प्रवास. इथून पुढे आपणास केवळ प्रेम व आनंद लाभो हीच प्रार्थना.
_/\_
अतिशय प्रेरणादायी अनुभव.
अतिशय प्रेरणादायी अनुभव. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.तुझे अनुभव अनेकांना हिंमत देतील.
निमिता तुमच्या लेखाचे शिर्षकच
निमिता तुमच्या लेखाचे शिर्षकच लेखाकडे खेचून आणतेय आणि त्यातला एक न एक शब्द मनाला भिडतोय.
असल्या बिकट मनःस्थितीत इतका सॉर्टेड विचार करणं भल्याभल्यांना जमत नाही, त्यातून तुम्ही एकट्या, पदरात दोन लहान मुली असून तुम्ही जे धैर्य दाखवलंय त्याला तोड नाही.
आपल्याला कॅन्सर आहे हि भावना व्यक्तीला अधिक आजारी करते पण तुम्ही त्या अवस्थेत सुद्धा खंबीर पणे सर्व निर्णय घेतलेत याचं प्रचंड कौतुक वाटतं आहे.
कृपया पुढिल भाग लवकर लिहा.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
सर्वांना मनापासून धन्यवाद.
सर्वांना मनापासून धन्यवाद. पुढील लिखाण लवकरच शेअर करीन
लिहायला शब्द नाहीत. डोळे
लिहायला शब्द नाहीत. डोळे पाणावत होते वाचताना आणि तुमची जिद्द वाचून फक्त ग्रेट लिहावस वाटत.
रिस्पेक्ट.
रिस्पेक्ट.
अश्या स्टोरीज वाचल्या की खरंच बरं वाटतं.
निमिता,कॅन्सरशी तुम्ही
निमिता,कॅन्सरशी तुम्ही निश्चयपूर्वक व जिद्दीने दिलेला लढा एका वीरपत्नीला शोभणाराच आहे.लेखन प्रेरणादायी आहेच. तुमच्यासारख्या सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लढणाऱ्यांच्या बाबतीत उत्तम व चकित करणारे रिझल्टसच दिसतात बहुतेक वेळा.
असं म्हणतात की 'काळ हे उत्तम
असं म्हणतात की 'काळ हे उत्तम औषध आहे'. जसाजसा काळ जातो, तसे तुम्ही तुमची दुःख, तुमच्या यातना सगळं हळूहळू विसरता. राहतात, मागे उरतात त्या फक्त आठवणी ! >>अगदी अगदी.
या situation बद्दल चे positive आणि negative पॉइंट्स लिहायला सुरुवात केली. आणि त्या विचार मंथनातून एक नवीनच thought process सुरू झाली.....
प्रेरणादायी लेखन, खूप धीरच्या आहात तुम्ही. _/\_
मस्त. तुमची लेखनशैली आवडलीच
मस्त. तुमची लेखनशैली आवडलीच पण त्याहि पेक्षा एका बिकट समस्येला हँडल करण्याचा पर्स्पेक्टिव अणि बोल्डनेस आवडला---) +1
पुढील आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!!
लिहायला शब्द नाहीत. डोळे
लिहायला शब्द नाहीत. डोळे पाणावत होते वाचताना आणि तुमची जिद्द वाचून फक्त ग्रेट लिहावस वाटत. >>> + १११
Pages