नाळ ©

Submitted by onlynit26 on 2 February, 2018 - 01:01

नाळ ©

"बाबा जरा हात लाव रे" व्हनीआजी डोक्यावरील ओझे सांभाळत बोलली.
ती घामाने पुर्ण निथळली होती. गावातून चालत बाजारात पोचायला एक तास लागायचा. गावातून येणारी सकाळची गाडी गावात येईपर्यंत फुल व्हायची . त्यामुळे थांबत नसे. मग तिला रिक्षा किंवा चालत जावे लागायचे. रिक्षाचे भाडे परवडत नव्हते. एक शॉर्टकट होता. त्यासाठी नदी पार करायला लागायची. नदीवर बंधारा होता पण पावसाळ्यात खुप पाऊस झाला की तो मार्गही बंद व्हायचा. तसं पण ती पावसात सहसा घराबाहेर पडत नसायची.
आज मात्र डोक्यावरचे ओझे आणि उन यामुळे ती पुरती थकून गेली होती. ती बाजारात पोचली तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. आज बाजाराचा दिवस होता. खरं तर लवकर यायला हवं होतं पण हल्ली सकाळी लवकर उठायला होत नसे. तिने आपली बसायची जागा साफ केली आणि शेजारच्या दुकानात ठेवलेली मोठी छत्री आणि इतर सामान घेवून आली. सदाने तिला चहाची ऑफर केली पण ती नको बोलली. अगोदरच दूकान लावायला उशीर झाला होता. तिने दूकान लावायला सुरूवात केली तशी एक भटकी गाय तिथे आली आणि उभी राहीली. तीचा हा नित्यक्रमच होता. तिच्याकडचे काही खाल्ल्या शिवाय ती पुढे जायची नाही. तिने भाजीची एक जुडी पुढे केली तशी मान हलवत खात निघून गेली. एरव्ही व्हनीआजी खुप काटकसर करायची पण गायीला एक जुडी देऊनच तीच्या धंद्याला सुरूवात करायची. हा नित्यक्रम ना आजीने चुकवला ना गायीने.
आजीचे दुकान लावून झाले होते. घरातून किटलीतून आणलेली कोरी चहा पिऊन ती भाजी विकायला लागली.
" लाल भाजी कशी दिलं गे?" एक बाई आपले सामान सांभाळत बोलली.
" दहा रूपयाक एक जुडी" भाजीची जुडी उचलून ती बोलली.
" वालीच्यो दोन जुडयो पण दी, आज मुंबैयसून आज झील इलो हा तेका वालीची भाजी लय आवाडता" त्याबरोबर तिने दोन वालीच्या जुड्या आणि लाल माठाची भाजीची एक जुडी देवून पैसे घेतले. आजीची बोहनी तर झाली होती. तिने आज रोजच्यापेक्षा जास्त भाजी विकायला आणली होती.
'आज झील इलो हा' हे वाक्य मात्र तिच्या कानात घुमत राहीले. तिचा एकुलता एक मुलगा, नवरा असे छान त्रिकोणी कुटूंब होते. दोन वर्षापुर्वी किरकोळ आजाराने तीचे यजमान देवाघरी गेले आणि वर्षभराने तिचा मुलगाही मुंबईला निघून गेला. तो गेला तेव्हा तिला खुप वाईट वाटले होते. शेजारच्या वाडीत मुंबईहून आलेल्या मुलगीच्या प्रेमात पडून तिच्या सोबत तो निघून गेला होता. खरं तर तिला त्याला पाठवायचे नव्हते. त्याच्याशिवाय तिला जवळचे कोणी नव्हते. तिने वयाची साठी गाठली होती. बरं त्याला मुंबईला राहायला जागा पण नव्हती. कुठे राहायचा ते देखील कळवले नव्हते. सुरूवातीला खुशाली घ्यायचा नंतर तीही बंद झाली. एका मुलीसाठी जन्मदातीला विसरला होता. गेल्यापासून एकदाही गावी फिरकला नव्हता. ती मात्र त्याच्या वाटेकडे थकलेले डोळे लावून असायची. रोज सदा दुकानदाराला मुलाने दिलेला फोन नंबर लावायला सांगायची. फोन कधी लागायचा नाही लागायचा तो जीव टांगणीला. घरी गेली की घर खायला यायचं. एवढ्या मोठ्या घरात पण तीचा जीव गुदमरून जायचा. नाही बोलायला एका मांजराची सोबत असायची. तिचा आजीवर खुप लळा होता. घरात नवऱ्याच्या आणि मुलाच्या आठवणी घायाळ करायच्या. लग्नानंतर खुप वर्षानी नवसाने मुलगा झाला होता. तेव्हा दोघांना खुप आनंद झाला होता. पण ती जास्त काळ मातृत्व सुख उपभोगू शकली नाही . याच उतार वयात तिला साथीची गरज होती.
दुपार होत आली होती. भाजी अजून बरीच शिल्लक होती. संध्याकाळ पर्यंत सगळी भाजी विकली गेली तर थोडाफार फायदा होणार होता. म्हातारीला जोराची भुक लागली होती. तिने रूमालात बांधून आणलेली भाकरी काढली. गिऱ्हाहीकाकडे लक्ष ठेवत भाकरी चघळू लागली. सकाळी भाजून आणलेली भाकरी थोडी कडक झाली होती. शेवटी सगळी भाकरी कुस्करून खोबऱ्याच्या चटणीत टाकून थोडावेळ भिजत ठेवली.
दिवस कलत चालला होता. अजूनही थोडी भाजी विकायची बाकी होती. एवढ्यात एक सुशिक्षित बाई भाजी घेण्यासाठी तिच्या जवळ आली. पैसेवाली दिसत होती. पण भाजीचा भाव करू लागली. अगदी दोन तीन रूपयासाठी भाजी न घेता जाऊ लागली. मग व्हनीआजीचाही नाविलाज झाला. बाईने केलेल्या भावात विकली. घासाघीशीचा आनंद बाईच्या चेहऱ्यावर उमटला आणि आजीच्या मनात मात्र किती नुकसान झालं याची आकडेमोड सुरू झाली. थोड्याच वेळात दिवस मावळणार होता. व्हनीआजीला कसंही करून शेवटची वस्तीची गाडी पकडने गरजेचे होते. थोडा माल शिल्लक राहीला तो द्यायला हॉटेलकडे निघाली. हॉटेलचा मालक चांगला होता . तिला त्याने सांगूनच ठेवले होते दिवसाअखेर भाजी शिलक राहीली आपल्याकडे ठेऊन जात जा, तसेच तिला त्या बद्दलचा योग्य तो मोबदलाही मिळायचा. असं असून देखील ती शेवटच्या क्षणापर्यंत भाजी विकायची. हॉटेलवाल्याने दिलेल्या सवलतीचा फायदा घेत नव्हती. आज पण शिल्लक राहीलेली थोडी भाजी घेऊन हॉटेलात गेली. एका टेबलावर मघासशीच घासाघीस करणारी बाई चांगली दहा रूपयाची टिप ठेवताना दिसली. दोघांची नजरानजर झाली. त्याची बाईची नजर मात्र खाली गेली.

व्हनीआजी घरी पोचली तेव्हा घराच्या पडवीत कोणीतरी बसल्याचे दिसले. तो माणूस पाठमोरा असल्यामुळे दिसत नव्हता. ती पडवीत आली तसा तो वळला. त्याला पाहून तिचा चेहरा खुलला. तिचा मुलगा सुहास होता. तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्याला कुरवाळत पटापटा मुके घेऊ लागली आणि त्याला कुशीत घ्यायचा प्रयत्न केला पण त्याला ते आवडले नसावे. तीला अडवत आपण दमलो असल्याचे बोलला . त्याच्या आगमनाने तीचे सारे श्रम विरून गेले होते. पटापट दरवाजा उघडून घरात आली. तिच्यात जणू हत्तीचे बळ आले होते. मुलगा मात्र पायरीवर बसून राहीला. आईने घरातून आणून दिलेले पाणी प्याला. थोड्यावेळात ती कोरा चहा आणि सकाळची भाकरी गरम करून आणली. ती त्याला देत कौतुकाने बघत राहीली. चहाचा एक घोट घेत पेला बाजूला ठेवला. तो आल्या पासूनच गप्प होता. फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे देत होता. आजीची मात्र बडबड चालू होती. आता दोन दिवस कामाला सुट्टी घेणार होती. पोराला गोडधोड करून घालणार होती. चांगल्या कपड्यात आलेल्या आपल्या मुलाकडे बघून तीला खूप बरे वाटले होते. घरात जाऊन त्यातल्या त्यात बरी साडी नेसून आली होती. कहीवेळाने सुहास त्या मित्रांसोबत वाडीत निघून गेला.
व्हनीआजीने ट्रंकेतून सुके काजूगर काढून भिजत घातले आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागली. सुहासने फारसे सामान आणले नव्हते. पाठीवरची बँग तेवढीच दिसत होती. तिला गुड डे बिस्कीट्स खुप आवडायची. सुहास लहान असताना त्याला कोणी बिस्कीट दिले तर तो घरी घेऊन यायचा. आज मात्र हात हलवतच आला होता. बँग उघडून पाहीली म्हणून सुहास रागवेल. तिने झालेला मोह आवरला.
रात्रीचे दहा वाजले तरी सुहास घरी आला नव्हता. तीला खुप भुक लागली होती. श्रमाने झोपही येत होती. इतक्यात बाहेर पावले वाजली. तो आला होता. पण लटपटत होता. तो काय करून आला ते ओळखले पण त्याला काही बोलली नाही.

कसल्या तरी आवाजाने सुहासची झोप चाळवली. पहाट झाली असावी. त्याचवेळी कोंबडा आरवला. नंतर त्याच्या लक्षात आले आई दळण दळत होती.
त्या आवाजाने तो डिस्टर्ब होत असावा. डोक्यावरून पांघरून घेत झोपी गेला. तिला वाटत होतं आपला मुलगा दळताना एक हात लावायला येईल जसा लहानपणी यायचा.

तो सकाळी उठला तेव्हा आजी गरम पाण्याचा तांब्या घेऊन समोर उभी होती. तो कधी उठतो त्याचीच वाट पाहत असावी. तिने त्याच्या साठी न्याहरीला घावने आणि काजुगराची भाजी केली होती. तिने खुप दिवसानी घरात सण केला होता. मुलगा बाहेरून येवून चुलीजवळ बसला, तिने भाजीसोबत दिलेले घावने खाऊ लागला.
"आये, तिठ्यावरची जमिन इकूचा म्हणतय, मुंबैक खोली घेवची हा" तो चाचरत बोलला.
हे ऐकून तीला आपला मुलगा गावाला का आला ते कळले .
"ह्या बघ झीला, मी आसापरयात तरी ती जमिन इकूक देवचय नाय" तिने ठाम शब्दात नकार दिला.
"अगे पण , माका पैशाची नड हा, थय मुंबैत कसो ऱ्यवतय तो माझो माका म्हायत हा"
"अरे झीला , आपली जमिन जास्त नाय आसा, जो हा तो पण तुकडो इकलस तर मी खाव काय? त्या टुकड्याच्या जीववरच जीता हय ना, दोन वर्षात मेलय का जिता हय ता एकदा तरी बघूक इलस काय? आणि आता पैशाची नड पडली तसो गाव आणि आवस बरी आठावली" असे बोलून तिने डोळ्याला पदर लावला. तो खाणे अर्धवट टाकत बाहेर निघून गेला. आपला मुलगा बदलला? माझे थकलेले शरीर, लागलेली आस, क्षणोक्षणी व्यक्त होणारे प्रेम काहीच कसं दिसत नाहीये त्याला ? आपली आई एकटी कशी राहत असेल? असं एकदाही कसं मनात नाही आले त्याच्या? खरचं हा माझ्याच पोटचा गोळा आहे ना? त्याचे माझे रक्त एक आहे तर का घेत नाहीये ते ओढ? तिच्याही घश्याखाली एकही घास उतरला नाही. पुढ्यातल्या घावण्याचा तुकडा मांजराने तोडला तेव्हा ती भानावर आली.

दुसऱ्या दिवशी मुलगा मुंबईला निघून गेला आणि व्हनीआजीचेही झगडणे सुरू झाले. आता झगडणे शारीरिक न राहता मानसिकही झाले होते. तिचे कामात मन लागत नव्हते. झाकली मुठ सव्वा रूपयाची पण उरली नव्हती.
असेच काही महीने गेले. संध्याकाळी शेतातून घरी आली तेव्हा सुहास आलेला दिसला. तिच्या चेहऱ्यावरची रेषा हलली पण तेवढ्यापुरतीच. विचारपुस झाली. पण त्यात प्रेम नव्हते. एवढ्यात त्याने ती बसली असताना तिच्या गळ्यात हात टाकले आणि मुंबईहून आणलेली साडी व आवडीचा बिस्कीटचा पुढा समोर धरला. म्हातारीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आपले गाऱ्हाने देवाने ऐकले होते. त्याचा चेहरा हातात घेत खूप वेळ बघत राहीली. स्वताला चिमटाही काढून पाहीला. सारं काही सत्य होतं. चार दिवस मुलासोबत सुखाने राहीली. तो परत मुंबईला निघून गेला पण त्यानंतरचे तिचे दिवस सुखात जाऊ लागले. तो वरचेवर गावी येऊ लागला. म्हातारीचे दिवस पालटले होते. मुलगा आला की त्याला चांगलं चुंगलं करून घालत होती. त्यासाठी चांगलं राखून ठेवत होती. स्वताचे मन मारून त्याची हौसमौज करत होती. आपला मुलगा बायकोला घेऊन गावातच स्थायीक होणार हे जेव्हा मुलाने तिला सांगीतले तेव्हा किती आनंद झाला होता. त्याच्यासोबत एक दोन वेळा कचेरीतही जाऊन आली होती. दारीद्ररेषेखालच्या योजनेतून कर्ज घेवून काहीतरी व्यवसाय करेन असंही बोलत होता. खरचं व्हनीआजीच्या जीवनात खुप छान होणार होतं.

अशातच चार महीने होऊन गेले होते. मुलगा मुंबईला गेला होता तो आला नव्हता. एप्रिल महीण्याचे दिवस होते. व्हनीआजी तिठ्या कडच्या जमिनीत भाजी साठी गादीवाफे बनवत होती. सकाळचे ११ वाजले असतील. तिने सोबत आणलेले पाणी देखील संपले होते. शेवटचा एक वाफा करून ती घरी जायला निघणार होती. इतक्यात तिठ्यावर एक गाडी थांबली . दोन माणसे उतरली आणि ती तिच्याच दिशेने शेतात येऊ लागली. माणसे अगदी सुटाबुटात होती. म्हातारीला आपल्या फाटक्या बोंदराची लाज वाटली.
"आजी, उगाच का कष्ट घेताय?" असे बोलून एका माणसाने बँगमध्ये हात घातला.
"बाबानू आता कष्ट नाय घीतलय तर पावसाडी खाव काय? मातीचे हात बोंदराला पुसत बोलली.
"तसं नव्हे कष्ट करा पण इथे नको, ही जमिन आम्ही विकत घेतलीय" त्याने तिच्या समोर जमिनीचे कागद धरले.
" काय बोलतास? परत बोला" व्हनीआजी थरथरत बोलली.
"अहो आजी तुमच्या मुलाने ही जमिन चार महीण्यापूर्वीच आम्हाला विकलीय. आम्ही विहीर पण खोदायला सुरूवात करणार आहोत" हे ऐकूनच तिला भोवळ आली. तिथल्या तिथे म्हातारी कोसळली.

तिला जाग आली तेव्हा आजुबाजूला काळोख होता. तिने आपण कुठे आहोत त्याचा अंदाज घेतला. ती तीच्या घरातल्या डाळीवर (बांबुच्या काठीपासून विणलेली चटई) होती. काहीवेळ तशीच पडून राहीली. जीवनातल्या अंधारापेक्षा हा अंधार बरा वाटत होता. तसं पण हा घरातला अंधार तरी पुढे मिळेल की नाही तेही माहीत नव्हते. जमिनीसारखे घरही विकले असेल तर? तिचे घर गावात एका बाजूला असल्यामुळे कोणी फिरकत नसे. त्यामुळे उठलीय की झोपलीय हे बघायला देखील कोणी येण्याची शक्यता नव्हती. तशीच उठून चुलीकडे गेली. चुलीच्या पाटनावरची माचीस चाचपत घासलेटची बत्ती पेटवली. तो उजेड पण नकोसा वाटला. सकाळी केलेली भाकरी तशीच कडक होऊन गेली होती. सकाळपासून तिच्या पोटात अन्नाचा कण देखील गेला नव्हता. तरीही अन्नावरची वासना उडाली होती. किंबहूना जीवनावरची आसच संपली होती. स्वताच्या पोटच्या गोळ्यानेच विश्वासघात केला होता तो पण गोड बोलून. गावी इतक्या फेऱ्या का मारत होता हे तिला आता कळत होते. कर्जाच्या कागदावर म्हणून घेतलेला अंगठा आपण कोणत्या कागदावर दिला हे तिच्या लक्षात आले. आठवल्या त्या कचेरीच्या फेऱ्या. तीला पहील्यांदाच आपण निरक्षर असल्याची लाज वाटली आणि पश्चाताप झाला मुल असल्याचा. चुलीकडच्या मिणमिणत्या प्रकाशात आसवं ढाळत राहीली. सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून ओघळणारी आसवंही हळूवार ओघळत होती. तिला त्या आसवांचा डोळ्यापासून मानेपर्यंतचा हळूवार प्रवास मोठ्या दुख:ची जाणीव करून देत होता. ती आसवं पुसायला देखील कोणी नव्हते. एक मांजर सोडले तर त्या घरात कोणीही नव्हते. ते मात्र तीला प्रेमाने घासू लागले. त्याबरोबर तिचे हूंदके अजूनच वाढले. अशी ती दोघं एकमेकांना बिलगून कितीतरी वेळ तशीच पडून राहीली. त्या रात्री कोणी जेवले नाही.

सकाळ झाली. उन्हं वर आली तरी व्हनीआजीला उठावेसे वाटत नव्हते. ती खुप उशीराने उठली. आता तर कुठलीच घाई नव्हती. भाजीचे शेतच राहीले नव्हते तर भाजी कुठून येणार होती. मनात नको नको ते विचार येत होते. पण धीर काही होत नव्हता. तिला काहीतरी आठवले तिने पत्र्याची ट्रंक उघडली. आतले विस्कटलेले कपडे तिला सारं काही सांगून गेले. ट्रंकेतले पैसेही गायब होते. पावसाळ्याचा निर्वाह त्याच्यावरच तर अवलंबुन होता. आपला मुलगा इतक्या खालच्या पातळीचे काम करेल असं तिला स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यानंतर कामासाठी दारोदार फिरली पण कोणी काम देत नव्हते. काही दिवस बाहेरून येणारी भाजी विकून पाहीली , त्यात तीला तोटाच होऊ लागला. अशातच एक महीना निघून गेला. दुकानाचे सामान विकून काही पैसे आले ते देखील संपत आले होते. कमाईचा काहीच मार्ग दिसत नव्हता. भीक मागीतल्याशिवाय तिच्या कडे काहीच मार्ग दिसत नव्हता. पण ते ती जीव गेला तरी करणार नव्हती. पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते. अशातच एक वाईट घटना घडली तिला सोबत देत असलेली मांजर अचानक विषबाधा होऊन मेली. त्याचा दोषही स्वताला देऊ लागली. घरात खायला मिळेना म्हणून ती बाहेर गेली आणि सरपटणाऱ्या प्राण्याची शिकार झाली असावी असे तीला वाटले. आपल्या हातून पाप घडलेय याची भावना तिचं मन खावू लागली. आपली पण अशीच अवस्था होणार आहे. मांजराला मुठमाती देताना तिला खुप वाईट वाटले.

दुसऱ्या सकाळी आंघोळ करून घरातून बाहेर पडली ती परत येण्यासाठीच. घरातल्या आठवणी तिला धड जगू ही देत नव्हत्या आणि मरू ही. एका हातात गाठोड आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन बाबांच्या भेटीला निघाली.
ती मठात पोचली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. ती खुप थकली होती. मठाबाहेरच्या कोपऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा चेहऱ्यावर मारल्यावर तिला बरे वाटले. तिने आत जाऊन बाबांचे दर्शन घेतले. तिथे तिला खुप छान वाटत होते. मठातील चैतन्यमय वातावरणात कधी नव्हे ती मनाला शांती मिळत होती. ती बाहेर येऊन पिंपळाच्या झाडाखाली बसली. बसल्या जागी तिला ग्लानी आली . थंडगार सावलीत तिला शांत झोप लागली. खुप वेळाने पायाला कोणीतरी चाटतयं याची जाणीव झाली. उठून बघते तर तीच बाजारातील गाय तीचे पाय चाटत होती. तिची वात्सल्यानी भरलेली नजर पाहून व्हनीआजीच्या डोळ्यात पाणी तराळले. आपल्या थरथरत्या हाताने तीचे तोंड हातात घेवून आसवांना वाट करून दिली.
व्हनीआजी आता मठाच्या आसपासच राहू लागली. पिंपळाचा पारावरच झोपत असे. गायचा मुक्काम पण तिथेच होता. मठात तिची खायची सोय सहज होऊन जायची. ती बसलेली पाहून काही लोकं भीक म्हणून पुढ्यात पैसे ठेवायची पण ती त्यांना हात लावत नसे. लोकांच्याही ही गोष्ट लक्षात आली. ते तिला खायच्या वस्तू देऊ लागले. ती रोज सकाळी उठून झाडू घेऊन मठाचा परीसर स्वच्छ करू लागली. तो तिचा दिनक्रमच झाला होता. ही बाब मठाच्या ट्रस्टींच्या लक्षात आली त्यानी तिला मठातल्या हॉलमध्ये रात्रीच्या झोपायची तात्पुरती सोय करून दिली. देव दूर नसतो. ज्या दिवशी ती मठाच्या हॉलमध्ये झोपली त्याच दिवशी रात्री जोराचा पाऊस झाला. ती रात्र गायने मात्र मठाच्या ओसरीला काढली.

असेच दिवस चालले होते. एके दिवशी व्हनीआजीची तब्बेत बिघडली. तिला सकाळी उठायला झाले नाही . ती हॉलमध्ये झोपली असल्यामुळे साफसफाईला अडथळा होत होता. आजीला उठायलाही होत नव्हते. अंगात ताप होता. एकादशी असल्यामुळे मठात लोकांची वर्दळही वाढली होती. साफ सफाई करणारे तिच्यावर ओरडू लागले , तिची सोय मठात केल्यामुळे पोटदुखी त्यांची वाढलीच होती. ट्रस्टींचा निर्णय काही लोकांना खटकला होताच. एकजण आजीचे अंथरून पकडून एका कोनात
ओढू लागला त्याबरोबर ती शरीरात त्राण नसताना देखील उठली. अंथरूणाची वळकटी करून ते आतल्या भागत ठेवले आणि मठात आपली अडचण होईल म्हणुन ती पिंपळाच्या पाराजवळ आली. नुकताच पाऊस पडून गेला होता. ओल्या पारावर बसताना तिला कसेतलीच वाटले. डोळ्यातून गरम वाफा निघत होत्या. इतके दिवस अंगावर काढलेले आजारपण आज उफाळून आले होते. तिला डॉक्टरजवळ तरी कोण घेऊन जाणार होतं? अशातच तिला चक्कर आली आणि ती पाराच्या खाली कोसळली. बघ्यांची गर्दी जमली.

तिने डोळे उघडले तेव्हा एक मुलगा कॉटशेजारी बसून होता. तिला आपण हॉस्पीटलमध्ये असल्याची जाणीव झाली. पण, इथे मला कोणी आणले असावे हा प्रश्न भेडसावत राहीला.
"आजी कसं वाटतयं, छान ना? तो युवक बोलला.
ती उठायचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तीला अडवले.
" उठायची घाई करायची नाही, काही लागलं तर मला सांगा"
तिची प्रकृती बरीच सुधारली होती. ती हळू हळू कॉटवरच उठून बसली. पण चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. तो युवकच बोलू लागला
"आजी माझं नाव स्वप्नील पाटील , मी कोल्हापुरला असतो. मला कदाचित तुम्ही ओळखणार नाहीत पण मी तुम्हाला ओळखलयं, तो दिवस मी कधीच विसरणार नाही, माझे आईबाबा शिक्षक असल्यामुळे मी शिकायला इथेच होतो. एके दिवशी बहीणीला मुलगा पाहायला जाताना गगनबावडा घाटात माझ्या आईबाबांच्या कारला अपघात झाला, ही बातमी मिळाल्यावर मी इथून बस पकडून कोल्हापुरकडे निघालो होतो, आणि बस मध्ये चढताना माझं पैशाचे पाकीट कोणीतरी मारलं होतं, ते तिकीट काढताना नेमके लक्षात आले, काय करावे मला सुचत नव्हते, कंडक्टरने भर बाजारात मला बसमधुन उतरवून घातले होते आणि ती जागा तुमच्या भाजीच्या दुकानासमोरची होती, माझा चेहरा रडवेला झाला होता. खिशात एक पैसा नव्हता, तुमची नजर माझ्यावर पडली , मी अडचणीत सापडलोय हे तुम्ही जाणलं " त्याला मध्येच तोडत व्हनीआजी बोलू लागली
"आठावला माका, तु अगदी काकुळतेक येवन तुझी परीस्थिती सांगत हूतस , पण तुज्या बोलण्यावर कोणी इस्वास ठेवक तयार नाय हूतो"
"पण तुम्ही मात्र माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलात आणि स्वताजवळचा पुरा गल्ला माझ्या हातात ठेवलात. त्यावेळी नुसते धन्यवाद बोलण्याशिवाय मी काहीही करू शकत नव्हतो. त्यात चांगली गोष्ट म्हणजे एका गायीमुळे ती बस बराच वेळ अडकून राहीली होती आणि मला त्याच बस मधून प्रवास करता आला. मी कोल्हापुरला पोचलो तेव्हा माझे बाबा मला सोडून गेले होते पण आई रूपाने एक आशा हॉस्पीटलमध्ये झुंज देत होती. या गोष्टीला आता दोन वर्षे झाली. मनात असून पण तुम्हाला भेटायला येऊ शकलो नाही. आता माझी आई ठणठणीत बरी झालीय. ही सर्व दत्तगुरू आणि मठास्थित बाबांची कृपा. त्यानी माझी आर्त हाक ऐकली होती. त्यासाठीच आज आईला घेऊन त्यांच्या दर्शनाला आलो होतो. तुम्ही बसायच्या ठीकाणी नजर टाकली पण तिथे तुम्ही नव्हता. मी खुप निराश झालो होतो. तुमचे ऋण घेऊन अजून पुढे जगणे मला कठीण जाणार होते. पण तुमची भेट अशा स्थितीत होईल असे मला वाटले नव्हते. बाबांचे दर्शन घेऊन बाहेर आलो तर पिंपळाच्या पाराशेजारी लोकं जमले होते. मी तिथे येऊन बघतो तर तुम्ही चक्कर येऊन पडला
होता. तुमचा चेहरा कसा विसरणार होतो." आजीच्या डोळ्यातून आसवांची धार लागली होती. स्वप्नीलने पकडलेला हात तीला सोडवत नव्हता.
"आजी तुम्ही दिलेल्या पैशांची किंमत आमच्यासाठी अमुल्य आहे , त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. स्वप्नील वेळेत पोचला नसता तर कदाचित मी या जगात नसले असते." आजीचा दुसरा हात हातात घेत स्वप्नीलची आई बोलली.
"आजी आज हॉस्पिटलमधला आज पाचवा दिवस आहे, पण आम्हाला त्याचे काहीही वाटत नाही. त्या दिवशी जर आम्ही मठात आलो नसतो तर आम्ही आयुष्यभर ऋणात मात्र होरपळत राहीलो असतो." स्वप्नीलला गहीवरून आले.
"हो, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणायला थोडा जरी उशीर झाला असता सगळं संपलं असतं आजी" डॉक्टर तीच्या डोक्याला हात लावत बोलले.
"डॉक्टरसाहेब, आता कशालाच उशीर होणार नाहीये, आजींना आम्ही आमच्यासोबत कोल्हापुरला कायमचे घेऊन जाणार आहोत." आजीच्या गालावरचे अश्रुंचे ओघळ पुसता पुसता स्वप्नील बोलला.
" पण , झिला हयसरला सगळा टाकून कसा येव?
आजी नजर चोरत बोलली.
" आम्हाला सारं कळलयं आजी, तुझं इथे कोणी आणि काहीही नाहीये. घराची आठवण येत असेल तर आपण अधून मधून येत जाऊ, मग तर झालं ना" शेवटचे वाक्य स्वप्नील एवढा गोड बोलला की आजीच्या चेहऱ्यावर लहान मुलाच्या निरागसतेचे हास्य उमटले.
"झिला एक माझी इच्छा हा रे , मठाच्या बाजूक एक गाय हा रे, ती पण माझ्यासारखीच थकली हा आता, तिकाव घरदार नाय आसा, तिची काय तरी निरगत लावन आपण गेलाव तर बरा होयत, तुका ती बस मिळण्यामागे तीचो पण वाटो हा रे, आणि माझ्या सुख दुखा:तली सोबती हा ती, तिची कायतरी सोय करून जावया" आजी हळू हळू बोलत होत्या . स्वप्नील लक्ष देऊन ऐकत होता.
"एक काम करू, तिची सोय आपण गोशाळेत करू, तिथले व्यवस्थापक माझ्या ओळखीचे आहेत. तिचा होणारा खर्च आपण त्यांना देत जाऊ" स्वप्नीलचा समजुतदारपणा पाहून त्याची आई पण गहीवरली. आजीला स्वप्नील तिच्या मुलाच्या वयाचा वाटला.
" झिला तुझो जन्म कधीचो रे? " आजीने न राहवून स्वप्नीलला विचारले.
" माझा जन्म इथल्याच ग्रामीण रूग्नालयातला. २२ डीसेंबर १९८७ चा, बरोबर दत्तजयंतीच्या अगोदरचा दिवस."
" बरा हा " आजी विचार करू लागली. सुहासचा जन्म पण त्याच सालातला. पण नक्की आठवत नव्हते. पण त्याच्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी त्रिंबकरावानी दिलेला दत्तजयंतीचा सुंठवडा आठवला. हॉस्पिटलमध्ये चुकून आपल्या मुलाची अदलाबदल तर झाली नसेल ना? असं तिला वाटून गेलं. पण स्वप्नीलला हे सांगायचा धीर झाला नाही .
तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये खरच बदलला असेल का? स्वप्नील खरा मुलगा नसेल कशावरून? नाहीतर कोण करतं कोणासाठी? नक्की कोणाशी तिची नाळ जोडली होती? प्रश्न संपणारे नव्हते. पण ती स्वप्नीलला पोटच्या गोळ्यापेक्षा कमी समजत नव्हती हे मात्र खरे आणि स्वप्नीलची नाळ मात्र दोन मातांशी जुळली होती.

समाप्त.
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
---------------------------------------------------
शब्दांकन
नितीन राणे
सातरल - कणकवली.
९००४६०२७६८

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नितीन, अतीशय सुंदर लिहीलय तुम्ही. वाचतांना खरच खूप दाटुन आले आणी डोळे पण पाणावले. त्या आजीची सोय झालेली पाहुन बरे वाटले. कथा काल्पनीक आहे पण देव जगात कुठेतरी आहे याची पण जाणिव होते.

एवढ्यात एक सुशिक्षित बाई भाजी घेण्यासाठी तिच्या जवळ आली. पैसेवाली दिसत होती. पण भाजीचा भाव करू लागली. अगदी दोन तीन रूपयासाठी भाजी न घेता जाऊ लागली. मग व्हनीआजीचाही नाविलाज झाला. बाईने केलेल्या भावात विकली. घासाघीशीचा आनंद बाईच्या चेहऱ्यावर उमटला आणि आजीच्या मनात मात्र किती नुकसान झालं याची आकडेमोड सुरू झाली. >>>>>>. गरीब पण मेहेनती अशा लोकांशी जेव्हा हे लोक घासाघीस करतात ना तेव्हा त्यांना धरुन कुटावेसे वाटते. कारण असे लोक गरीब लोकांना नाडतात पण हॉटेल मध्ये खातांना, सिनेमे बघतांना हजारोंचा चुराडा आरामात करतात.

सुंदर आहे कथा.
तुमच्या कथांमधला शेवटचा पॉझिटिव्ह टर्न मनाला खूप सुखावतो.
वास्तवातल्या कथा नेहमी तश्या शेवटाला जात नसतीलही पण 'असंही होऊ शकतं' ही शक्यता मनाला उभारी देते.

काय सुंदर लिवतस रे.. नि गावात अशी कोणव बगलली वाटतत..
आमच्याइथुनहि मालवण ६ किलोमीटर आहे.. पण गावातली एक आजी कधी चालत कधी रिक्षेने जावन कधी केळी, कधी वळेसार, गुलाबाची फुलं, आंबे, नारळ विकायला मालवण बाजारात जाते. अगोदर घुमड्यातुन कितीतरी बायका मोळी डोक्यावर घेवुन मालवणात जायच्या चालत..
खुप छान लिवलस .. डोळ्यात्सुन पाणी काढतस नेहमीच आमच्या. कथा बरे सुचतत. Happy

सुंदर आहे कथा.
तुमच्या कथांमधला शेवटचा पॉझिटिव्ह टर्न मनाला खूप सुखावतो. >>> खरं आहे,. +१

खुप छान लिवलस .. डोळ्यात्सुन पाणी काढतस नेहमीच आमच्या. कथा बरे सुचतत.>>>
अगदी अगदी..
मला मालवणी असून ही बोलता येत नाही.
पण तुमच्या लिखाणाच कौतुक वाटतं.
पु.ले.शु.