वचन

Submitted by मोहना on 31 January, 2018 - 10:47

अभिनंदनाच्या वर्षावात वेदांगी न्हाऊन निघत होती. प्रत्येकाच्या नजरेत कौतुक तर होतंच पण त्यापेक्षाही आश्चर्य जास्त होतं. का वेदांगीला ते तसं वाटत होतं? कदाचित जे घडलं ते घडलं नसतं तर हे यश ती मिळवू शकली नसती याबद्दल वेदांगीच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती.
"आईला किती आनंद होईल ना बाबा?" तिचा स्वर आनंदाने भिजला होता.
"हो. तुझ्या आईइतकाच आनंद मलाही झालाय वेदू." बाबांच्या प्रेमळ स्वराने वेदांगी हेलावली.
"तसं नाही बाबा. परीक्षेला बसायचं नाही या माझ्या हट्टापुढे तुम्ही नमलात पण आई ठाम राहिली. म्हणून म्हटलं मी तसं."
"ममताचं म्हणणं तिच्यादृष्टीने रास्त होतं. पण मला तुझ्यावर दबाब येऊ द्यायचा नव्हता. त्या त्या वेळेला प्रत्येकाचंच बरोबर होतं." वेदांगीने मान डोलवली. गेल्या आठ महिन्यातल्या उतार चढावांचा लंबक दोघांच्याही मनात वर खाली होत राहिला. दोघांनाही प्रसंग आठवत राहिले. काही ममताने उभ्या केलेल्या आठवणी, काही अनुभवलेले, शब्द, प्रसंग सगळंच...

टेबलावर आडव्या पडलेल्या ममताला डॉक्टर पुन्हा पुन्हा स्तनाच्या एका भागावर जोर देत होत्या ते जाणवत होतं. ती अस्वस्थ झाली.
"तुम्हाला जाणवतंय का?" तिचा हात त्यांना जिथे गाठ वाटत होती त्या भागावर त्यांनी ठेवला. तिला नाही म्हणावंसं वाटत होतं पण लागत होती गाठ. का डॉक्टरांनी म्हटल्यामुळे वाटत होतं?
"जाणवतंय." कसाबसा तिच्या तोंडातून शब्द फुटला. डॉक्टर पुढे काही बोलल्या नाहीत. पुन्हा पुन्हा खात्री मात्र करत राहिल्या. त्यांचा हात थांबला तशी ती उठून बसली.
"मेमोग्राम करून घ्या. डायग्नॉस्टीक."
"बरं. पण मागेही एकदा असं झालं होतं. निष्पन्न काहीच झालं नाही." डॉक्टर हसल्या,
"निष्पन्न काही झालं नाही हे चांगलंच नाही का? पण शंका आली की निरसन झालेलं बरं." ती गप्प झाली. आणखी काही न बोलता तिने डॉक्टरांनी दिलेला कागद घेतला. आता हा डायग्नॉस्टीक मेमोग्राम होईपर्यंत चैन नाही पडणार. शंका आली म्हणून करा म्हणायला काय जातंय? उगाच किती पैसा घालायचा? मनातल्या विचाराने तिची तीच दचकली. म्हणजे इतके पैसे घालायचे मग त्यातून काहीतरी निघायला हवं असाच याचा अर्थ होतो. तिने विचार झटकून टाकल्यासारखी मान हलवली. पण आता तो डायग्नॉस्टीक मेमोग्राम होईपर्यंत कुठेही लक्ष लागणार नाही हे तिचं तिलाच जाणवलं. संध्याकाळी प्रसाद घरी आल्यावर तिने त्याला सांगितलं. त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
"प्रसाद, मला भिती वाटायला लागली आहे. खरंच कॅन्सर असेल तर?"
"असला तर काय करणार. आहे ते आहे."
"कमालच करतोस तू. निदान माझ्या समाधानासाठी तरी म्हण ना नसेल असं काही." प्रसाद हसला.
"ठीक आहे. नसेल तसं. झालं समाधान? आणि मागे पण झालंय ना असं. डेन्स टिश्युमुळे शंका येते डॉक्टरांना. वेळीच तपासलेलं बरं एवढाच अर्थ त्याचा." त्याने विषय संपवला. पण तिला झोप आली नाही. वेदांगीशी बोलावं? नकोच. तिचं १० वीचं वर्ष. कशाला आतापासून तिच्या मनावरचा ताण वाढवायचा. आणि खरंच कॅन्सर असेल तर? देवा रे, एवढं वर्ष जाऊ दे. वेदांगीची महत्त्वाची परीक्षा होऊन जाऊ दे. मग माझं जे काय व्हायचं ते होवो. तिच्या भवितव्यात माझ्या दुखण्याचा अडथळा नको. त्याच त्याच विचारांनी शीणवटा आला तसं तिने जे होईल ते होईल असं मनाशी म्हणत बरीच कामं काढली. घर आवरायलाच घेतलं तिने. मनातल्या विचारांच्या हेलकाव्याबरोबर कामांचा वेग वरखाली होत होता. सहा महिन्याची कामं एका दिवसात केल्यासारखं वाटायला लागलं ममताला. थकलीच ती आणि गाढ झोपलीही.

दोन दिवसांनी डायग्नॉस्टीक मेमोग्रामचं काम झालं. प्रसाद आला तर बरं होईल असं वाटत होतं. पण स्वत:हून तिने त्याला विचारलं नाही. तोही कामाच्या व्यापात विसरुन गेला असेल याची तिला खात्री होती. वेदांगीला तिने सांगितलंच नव्हतं. मन सैरभैर झालं होतं. गाडी न घेता रिक्षाने जाऊन रिक्षाने परत आली ती. इतरवेळेसारखं वाटेतली कामं उरकू हा विचारही तिच्या मनात डोकावला नाही. आता या मेमोग्राम मधून काय निष्पन्न होतंय ते समजलं की मोठं ओझं उतरेल मनावरचं. तिच्या वागण्यातला बदल वेदांगीच्या लक्षात आला होता का? आला असावा. काल म्हणालीही ती,
"आई एकदम सुधारलीसच तू."
"सुधारले?" तिने आश्चर्याने विचारलं.
"अख्खा दिवस अभ्यासाचा धोशा नाही लावलास. प्रश्नावली आली नाही समोर." ती हसली.
"प्रश्नावली?"
"कुठे निघालीस, कधी येणार, काय काम आहे? आता हा कोण नवीन मित्र? इतका उशीर का होणार आहे? अभ्यासाचं काय?...." वेदांगीच्या हसण्यात तिने सूर मिसळला तरी तिचा जीव गलबलला. तिच्या चेहर्‍याकडे लक्ष गेल्यावर वेदांगी हसली.
"अगं वैतागले तरी अशी काळजी करतेस ते आवडतं म्हणूनच जाणवलं ना मला. दे गं आई तू त्रास. जितका द्यायचा तितका दे त्रास तू हक्काने." त्यांच्या चेष्टामस्करीत नुकताच घरी आलेला प्रसादही सामील झाला आणि वेदांगी विषय विसरुन गेली. पण खरंच असा त्रास द्यायला मी राहिलेच नाही तर? कसं होईल वेदांगीचं? कोण घेईल काळजी? ममताने काळीज कुरतडून टाकणार्‍या विचारांना थाराच दिला नाही. तिला खात्री होती पुन्हा डेन्स टिश्युच असणार. उद्यापर्यंत धीर धरण्याशिवाय पर्याय नव्हता.

रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडून आलेली ममता सैरभैर होती. सुन्न. सहा महिने जास्तीत जास्त. हे असं ठरवून मरायचं? का म्हणतात मग जन्ममरणाची वेळ हातात नसते. आणि ही बाई डॉक्टर कशाला झाली कुणाला वाचवता येत नसेल तर? वा, म्हणे, ’देव करो आणि एवढे दिवस तरी जावो’. दरवेळी डॉक्टरांना शंका आली की करत होते ना त्यांचं ते डायग्नोस्टिक मेमोग्राम? उशीर केलात म्हणाल्या डॉक्टर. उशीर केला? ती चपापली. गाठ असल्यासारखं वाटतं म्हणून तपासणीला जायचं, मग दुसर्‍या डॉक्टरकडे रवानगी. पुन्हा डेन्स टिश्यु... नकोच ते. असा विचार करून गेलं वर्ष तिने दुर्लक्षच केलं होतं. स्वत:च्या थाडथाड थोबाडीत मारुन घ्याव्याशा वाटत होत्या ममताला. उपचारांबद्दल डॉक्टर बरंच बोलल्या पण ते सारं वेदना सहन होण्याबाबत होतं. काय फरक पडणार होता? तिने कानावर आणि मनावरही पडदाच ओढून घेतला. त्यामागचा अंधार तिला हवाहवासा वाटत होता. सारं या क्षणाला संपून जावं, त्या अंधाराच्या पोकळीत गुडुप व्हावं इतकंच तिच्या मनाने घेतलं होतं. किती काय काय ऐकलं होतं कॅन्सरबद्दल. नको होतं ते तिला तिच्या वाट्याला. इथेच आत्ता या क्षणी पूर्णविराम मिळू दे. काय करायचं? जीव द्यायचा? नेटाने आला दिवस ढकलायचा की उरलेले दिवस आनंदात घालवायचे? वेदांगी, प्रसाद, आई, बाबा इतकीच माणसं तिला हवी होती. फक्त त्यांचा सहवास हवा जितके दिवस आहेत तितके दिवस. त्याच मन:स्थितीत ती घरी पोचली. घर नेहमीप्रमाणे शांत होतं. प्रसाद कामावर. वेदांगी यायची होती. ती निमूट बसून राहिली. आता? आवराआवरीला लागायचं? काय करायचं म्हणजे? चार दिवस प्रवासाला जाऊन परत येण्यासारखं नव्हतं हे. काय घेऊन जायचं तिकडे? एरवी ४ दिवस कुठे एकटीने जायचं म्हटलं की इथली व्यवस्था लावून ठेवायचं काम ती आधी करायची. आता काय करायची व्यवस्था? कशाला? परत आलं की सारं सुरळीत चाललंय हेच पाहण्यासाठी ना? पण आता परत कुठे यायचं होतं. डाव्या स्तनावरची ती गाठ पुन्हा पुन्हा चाचपत राहिली. बोटाच्या दाबाने प्रत्येकवेळेला तिला वेगळं वाटत होतं. एकदा वाटत होतं, गाठ लागत नाही, निदान चुकलंच डॉक्टरांचं. पुन्हा तो काय तो डायग्नॉस्टीक मेमोग्राम करायला हवा . तेवढ्यात ती गाठ मोठी व्हायला लागली आहे असंही वाटत होतं. कितीतरी वेळ ती गाठ चिमटीत धरुन ती दाबत राहिली. कमी होईल असं केलं तर? तिच्या खुळेपणाचं तिचं तिलाच हसायला यायला लागलं. हसता हसता तिच्या छातीत कळ आली. श्वासही घेता येईना. थोडावेळ ती जोरजोरात श्वास घेत राहिली. कॅन्सर झालेलं माणूस घरात कसं सांगतो? वेदांगी आणि प्रसाद आले की एकदमच सांगायचं की आधी प्रसादला सांगायचं आणि मग तो सांगेल वेदांगीला? उगाचच ती चित्रपटातले असे प्रसंग आठवायला लागली. तिचं तिलाच हसायला आलं. या अशा क्षणी चित्रपटातला प्रसंगाची आठवण? ती जोरजोरात हसायला लागली. थांबता येईचना तिला. असं हसायला का येतंय प्रत्येक गोष्टीचं? ते हसणं तिचं तिलाच केविलवाणं वाटायला लागलं. कधी एकदा प्रसाद आणि वेदांगी येईल असं होऊन गेलं तिला. ती दोघांची वाट पाहत राहिली. तिला वाटत होतं. त्या दोघांपैकी कुणीतरी येईल. धीर देतील. ती यातून बरी होईल याची खात्री देतील. ती रडेल, मोकळी होईल आणि प्रवास सुरू होईल ती बरी होण्याचा. तिला तिच्या या विचाराचंही हसू यायला लागलं. हसून हसून ती थकली. काही वेळाने तिची तीच तोंड धुऊन ताजीतवानी झाली ममता. रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

वेदांगी आणि प्रसाद आले तेव्हा कुठल्याही वादळाची खूण नव्हती. नेहमीप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या सोयीने जेवून घेतलं आणि प्रसाद सोफ्यावर पाय पसरुन बसला. वेदांगी अभ्यासाचं पुस्तक घेऊन तिच्या खोलीत निघणार तेवढ्यात ममताने तिला थांबवलं.
"आता नको ना गं. तुला येऊन जाऊन माझ्या अभ्यासाच्या वेळेलाच सुचतं का गं बोलायचं?" वेदांगीने चिडचिड केली.
"वेदू पुरेऽऽऽ" ती इतक्या जोराने ओरडली की प्रसादनेही चमकून पाहिलं.
"चीलऽ आई." सहजस्वरात वेदांगी म्हणाली पण तिलाही आईच्या ओरडण्याचा धक्का बसला होता. आईची चिडचिड सवयीची होती पण इतक्या तारस्वरात ओरडलेलं तिने कधीच ऐकलं नव्हतं. ती मुकाट्याने बसली.
"टी. व्ही. बंद कर." दरडावल्यासारखी ती प्रसादच्या अंगावर खेकसली. वेदांगी आणि प्रसादने एकमेकांकडे टाकलेल्या कटाक्षाकडे तिचं लक्ष नव्हतं. त्याने मुकाट्याने टी. व्ही. बंद केला आणि ममता धाय मोकलून रडायला लागली. दोघं गोंधळले. एकमेकांकडे पाहायला लागले. अचानक प्रसादच्या लक्षात आलं ती डायग्नॉस्टीक मेमोग्रामला जाणार होती. त्याच्या छातीत धस्स झालं. पुढे होऊन त्याने ममताला जवळ घेतलं. कशाचीही काहीही कल्पना नसलेली वेदांगीही तिला चिकटली.
"हे बघ, तू शांत हो आधी." तो तिच्या पाठीवर थोपटत राहिला. वेदांगीने समंजस मुलीसारखं स्वयंपाकघरात जाऊन पटकन पाणी आणलं.
"अगं तू एकटी का गेलीस? " ती काहीच बोलली नाही.
"निदान रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेलीस तेव्हा तरी..." प्रसाद चांगलाच दुखावला गेला होता.
"मला खात्री होती मागच्यावेळेसारखंच असणार. डॉक्टरही तुला बोलावून घे म्हणत होत्या पण मीच नकार दिला."
"बरं, आता पुढे काय?" त्याने शांतपणे विचारलं.
"काही नाही. म्हणजे आहे. करायचं आहे. पण त्याला काही अर्थ नाही."
"म्हणजे? अगं हल्ली कॅन्सर बरा होतो. अगदी सहज."
"उशीर झालाय." प्रसादला तिच्या बोलण्याचा रोख नक्की कळत नव्हता.
"तू नीट सांगतेस का? नाहीतर मी डॉक्टरांना फोन करतो."
"उशीरा समजलंय. सहा महिने आहेत हातात. कदाचित थोडं मागे पुढे." तिच्या पाठीवर फिरणारा त्याचा हात थबकला. वेदांगी पुतळ्यासारखी बसून राहिली. तिची अवस्था पाहून ममताच उठून तिच्यासमोर उभी राहिली. वेदांगीने आधी तिला ढकललंच.
"असं काय करतेस वेदू?" ममताच्या तोंडून शब्द फुटेना.
"आई, अगं बाबाला निदान तू डॉक्टरकडे जाणार एवढं तरी माहीत होतं गं. मला तू...."
"अगं, तुझ्या अभ्यासात नसत्या चिंता नकोत म्हणून नाही सांगितलं. तू असं ढकलू नकोस वेदू. आता जाणारच आहे मी." वेदांगीने तिच्या कमरेला विळखा घातला आणि तिघांचे हुंदके एकमेकांचे आधार शोधत राहिले. बराचवेळ. हुंदक्याचे आवाज विरले आणि वेदांगी एकदम बाजूला झाली. ममताने चमकून पाहिलं तोपर्यंत वेदांगी आतल्या खोलीकडे वळलीही. ममता तिच्यामागे धावली.
"जाऊ दे तिला." प्रसादने ममताला थांबवलं. दोघं तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे विषण्ण नजरेने पाहत राहिले.

वेदांगीने खोलीचा दरवाजा बंद केला आणि हुंदक्यांचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून उशीत तोंड खुपसलं. आईबद्दल प्रचंड राग मनात जमा झाला होता तिच्या. अशी कशी जाणार सोडून? का? कुणी दिला तिला हा हक्क? तिलाही नव्हतं राहायचं इथे आता. आई जिथे जाईल तिथे जायचं होतं. आईचं घट्ट धरलेलं बोट आता सुटणार या विचारानेच जत्रेत हरवलेल्या मुलीसारखी तिची अवस्था झाली. जोरजोरात रडावं, किंचाळावं, आईला घट्ट धरावं असं वाटायला लागलं. का नाही गेली वेळेवर डॉक्टरांकडे? का? का? का? आता कसं लक्ष केंद्रित करु मी अभ्यासावर आणि कशासाठी? कुणासाठी? का करायचं सगळं? आईच नसेल इथे तर नकोच आता काही. रडून रडून डोकं दुखायला लागलं तशी ती उठून बसली. नकळत तिने बाजूचा दिवा लावला. २ वाजून गेले होते. बाहेरच्या खोलीतला दिवाही जळताना दिसत होता. आई, बाबा दोघंही झोपलेले नाहीत हे कळत होतं. पण ती पुन्हा बाहेर गेली नाही. त्या दोघांनी यावं, आपल्याला कुशीत घ्यावं असं एकीकडे वाटत होतं तर कुणी नाही आलं तर बरं असंही वाटत होतं. बाजूच्या टेबलावरची वही तिने ओढली. त्यात डोकं खुपसलं. अचानक तिच्या रागाचा पारा चढला. वहीची पानं टराटरा फाडत भिरकावत राहिली ती इकडे तिकडे. वहीत एकही कागद शिल्लक राहिला नाही तशी बसल्याबसल्या खोलीत विखुरलेल्या त्या तुकड्यांकडे ती निर्विकारपणे पाहत राहिली. मध्येच कधीतरी थकव्याने तिचं डोकं टेबलावर विसावलं. डोळे मिटता मिटता उद्या उजाडूच नये अशी मनोमन प्रार्थना करत राहिली ती.

सकाळी जाग आली तेव्हा ती गळून गेली होती. डोळे चोळत बाजूचं घड्याळ ओढून तिने पाहिलं. ९ वाजून गेले होते आणि तरीही घरात इतकी शांतता? आईच्या हाका नाहीत, बाबांची बडबड नाही. की गेले कामावर? ती झटकन उठलीच. दोघंही दिसत नव्हते. तिने खोलीत डोकावलं. म्लान चेहर्‍याने भिंतीकडे नजर लावून पडलेल्या आईला पाहून वेदांगीच्या पोटात कालवलं.
"आई" तिने हळुवार हाक मारली. डबडबलेल्या डोळ्यांनी ममताने तिच्याकडे पाहिलं.
"मला माफ कर वेदू."
"माफ?"
"बघ ना, मुहूर्त शोधून काढल्यासारखा आजार आला हा. तुझं महत्वाचं वर्ष आहे हे."
"आई नको ना गं असं बोलू."
"वेदू, किती दिवस उरले आहेत माझे हे माहीत नाही. पण तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. माझं आजारपण तुझ्या परीक्षेच्या आड येता कामा नये."
"हो ना? मग ऊठ आधी तू. इतके दिवस बरी होतीस. पण काल कॅन्सरचं समजलं तसं आज झोपून? एका दिवसात नाही जाणार गं तू. कळतंय का तुला? ऊठ आणि नेहमीसारखा चहा पिऊ आपण दोघी एकदम. थोडासा बदल होईल त्यात. आज तुझ्याऐवजी चहा मी करणार. घाबरु नकोस. तेवढं येतं मला. आणि या पुढे तू करतेस ना ती सगळी कामं मी करणार आहे. समजलं? तू कशाला हातही लावायचा नाहीस.
"अरे वा, म्हणजे राणीसारखा आराम करायचा तर मी. वाईटातून चांगलं निघतं ते हे असं."
"आईऽऽऽ" आपल्या भावना समजून न घेता आईने हे बोलावं याचा रागच आला वेदांगीला. कळल्यासारखं ममतानेही माघार घेतली.
"अगं गंमत केली. चला, चहापासून सुरुवात होऊ दे."
" वेदांगीने उठून बसलेल्या तिच्या आईच्या खांद्याभोवती हात टाकले आणि दोघी खोलीतून बाहेर पडल्या.
"बाबा?"
"रजाच टाकली आहे आज त्यांनी. सकाळीच डॉक्टरांकडे गेले आहेत." ममताने पुसटसं हसत म्हटलं.
"आई, मी परीक्षा नाही देत या वर्षी." चहाचा कप पुढे करत वेदांगी म्हणाली. हातातून पडणारा कप कसाबसा सावरला ममताने.
"का?"
"मला तुझ्या बरोबर वेळ घालवायचा आहे. एक वर्ष फुकट गेलं तर असा काय फरक पडतोय माझ्या आयुष्यात? पण तुझ्या बरोबरचा माझा प्रत्येक दिवस मला अविस्मरणीय करायचाय आई. मजा करु आपण. कसली चिंताच नको. तुझ्या आवडीचे पदार्थ करेन मी. खरेदी करु मनसोक्त. नाटकं पाहू, हुंदडू इकडे तिकडे. तुला आमचा वेळ मिळत नाही म्हणतेस ना? आता कंटाळा येईल इतका वेळ देणार आहे मी तुला. बाबांनाही आपल्याबरोबर ठेवू सतत. तू, मी आणि बाबा. सगळं जग विसरुन आपलं तिघांचं विश्व उभारु."
"मला समजतायत वेदू तुझ्या भावना. पण हळूहळू माझी ताकद कमी होत जाणार गं. उपचारांना शरीर किती साथ देतंय त्यावरही अवलंबून आहे सारं.
"नाही गं. तू होशील बरी. आणि नको असं बोलूस तू. नाही ऐकवत मला." वेदांगीचा वेदनेने झाकोळलेला चेहरा पाहून काही क्षण ममता गप्प झाली.
"वेदू, तुला जर खरंच मला आनंदी पाहायचं असेल तर अभ्यास कर, परीक्षा दे. नाहीतर सहजासहजी नाही गं जाऊ शकणार मी."
"माझ्या कुठल्याही गोष्टीला तू कधी पटकन होकार देत नाहीसच. मी बाबांना सांगते. ते ऐकतील माझं." वेदांगीला आईचा राग आला. रात्रभर विचार करून तिने हे ठरवलं होतं आणि एका झटक्यात त्यावर पाणी पडलं.
"बोल तू बाबांशी. पण वेदू आता तुझी बाबांना मदत लागेल. चिडचिड न करता करायचं सारं. एवढ्या तेवढ्याला रागावतेस ते बरं नाही." ममताच्या शांत स्वराने वेदांगी वरमली.
"करेन मदत मी बाबांना. आपण आजीला बोलवून घेऊ या का?" ममता हसली.
"माझ्यासाठी वर्ष फुकट घालवायला तयार होतीस. आणि मदत म्हटल्यावर आजी आठवली." ती पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात प्रसाद आला.
"आजीला का बोलवायचं?" चप्पल काढता काढता त्याने विचारलं.
"मदतीला. मी पण हे वर्ष घरीच राहते म्हटलं आईला तर तयार नाही ती."
"आजीला बोलवून घ्यावं लागेलच. लगेच उपचार सुरु करायचे आहेत. आणि वर्ष फुकट घालवून तू काय करणार? अभ्यासात व्यग्र राहिलीस तर आईच्या मागची भुणभूण कमी होईल. निघा आता. शाळेला दांडी नका मारु." वेदांगी नाराजीचा कटाक्ष टाकत तिथून उठली. ती शाळेत निघून जाईपर्यंत प्रसादने दोन्ही घरच्या माणसांना कल्पना दिली होती. त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकत ममता तिथेच सोफ्यावर टेकली. तिला आईच्या कुशीत लपावंसं वाटत होतं. तिच एक जागा होती. सुरक्षित. ब्रम्हदेवसुद्धा आईच्या कुशीतून तिला ओढण्याचं धाडस करणार नाही याची तिला खात्री होती. पण ती फोनवर कुणाशीच बोलली नाही. सोफ्यावर लवंडून कपाळावर हात टाकून ती पडून राहिली.

फोनवरचं बोलणं आटोपलं आणि प्रसाद आत निघून गेला. तो जवळ येऊन बसेल, धीर देईल, डॉक्टरांशी काय बोलणं झालं ते सांगेल ही आशा फोल ठरली होती. कपाळावरचा हात काढत ती डोळ्यातून घळघळा वाहणारे अश्रू पुसत राहिली. त्याच्या अंगावर खेकसावं, जाब विचारावा असं वाटत होतं. पण तितकं त्राण उरलंय असं वाटतंच नव्हतं. हे धन्वंतरी तुम्ही आता मरणार असं सांगून आधीच मारुन टाकतात असा विचार डोकावला तिच्या मनात आणि तिचं तिलाच हसायला आलं. स्वत:ला सावरत ती उठली. खोलीच्या दाराशी आली आणि थबकली. प्रसाद पलंगावर बसून रडत होता. लहान मुलासारखा दोन्ही हातांनी डोळे पुसत होता. तिच्या पोटात माया दाटून आली. त्याला इतकं केविलवाणं तिने कधीच पाहिलं नव्हतं. कालही पहिला आवेग ओसरल्यावर तो शांत होता. तिची समजूत घालत होता. आणि आता काय हे? कॅन्सरने माणसाला इतकं हतबल करावं? ती तशीच मागे फिरली. आवडलं नसतं त्याचा रडका चेहरा तिने पाहिलेला त्याला. काय झालं होतं हे? एका क्षणाने घरातला आनंद हिरावून घेतला होता. आपण वेळेवर का नाही गेलो डॉक्टरांकडे म्हणून ती स्वत:ला बोल लावत राहिली. आता कदाचित काही दिवस, महिने...नक्की वेळ नाही ना सांगू शकत धन्वतंरीसुद्धा. त्यांनी आता माझं भवितव्यं परमेश्वराच्या हाती सोपवलं आहे. चाळीशी देखील ओलांडणार नाही. कसं होणार माझ्याशिवाय या दोघांचं? का? का आली ही वेळ माझ्यावरच. कितीतरी तास उत्तरं नसलेले प्रश्न ती स्वत:ला विचारत होती. अश्रूही आटले होते. हळूहळू तिची तिच सावरली. आता जे होईल त्याला तोंड द्यायचं. हसतमुखानं. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. वेदूसाठी, प्रसादसाठी चेहर्‍यावर प्रसन्नतेचा मुखवटा चढवायचा. ती खरंच उत्साहाने उठली. आवरायला हवं होतं. आई कोणत्याही क्षणी येईल याची खात्री होती तिला. तिने खरंच निश्चयाने सारं आवरलं. प्रसादला बाहेरुनच हाक मारुन तयार व्हायला सांगितलं. एका नाटकाला सज्ज झाली ती. आयुष्याच्या रंगमंचावरचं अखेरचं नाटक. कसलेल्या नटीचा अभिनय ती आल्यागेल्यांसमोर करणार होती. आता निरोप घ्यायचा तो हसतमुखानेच. सार्‍यांच्या स्मृतीत तसंच राहायचं. ठरवलं तशी ती वागलीही. माहेरची सगळी आली तेव्हा कोसळू की काय असं वाटत होतं पण जमलं तिला, तिने जमवलं. तो आठवडा गडबडीचाच गेला. दोन्ही घरची माणसं जाऊन येऊन होती. तिच्या डॉक्टरांकडच्या खेपा चालू झाल्या होत्या. स्तन काढून टाकल्यावर अपंग झाल्याच्या भावनेने, नैराश्याने घेरलं तिला पण सावरली ती त्यातून. आता एकेक गोष्टी हातातून निसटणार हे स्वीकारल्यासारखं स्वत:च्याच वेदनांकडे तटस्थतेने पाहायला ती हळूहळू शिकत होती. वेदांगीच्या अभ्यासाची आठवण करून द्यायला विसरत नव्हती. कितीतरी दिवसांनी घर ’भरलं’ होतं. ममता आनंदात होती. नंतरही दोन्ही घरच्या माणसांनी आपापसतात सारं ठरवून टाकलं. सतत तिच्या मदतीला येऊन जाऊन कुणी असेल याची व्यवस्था झाली. आणि भेटायला येणार्‍यांची ये - जा वाढत राहिली. दिवसागणिक ममता भरल्या घरात एकटी पडायला लागली. वेदांगी अभ्यासात बुडालेली, प्रसाद तिच्या उपचारांच्या खर्चासाठी मार्ग शोधण्यात. त्या दिवशी कितीतरी दिवसांनी ती तिघं घरात होती. प्रसादच्या चेहर्‍यावरची चिंता वाचता येत होती. अचानक प्रसादने कपाटाचं दार उघडत जोरात हाक मारली तशी दचकून दोघीही खोलीच्या दारात येऊन उभ्या राहिल्या.
"हे पैसे कुठून आले?"
"कुठले?" त्याच्या हातातल्या पाकिटाकडे बघूनही ममताच्या लक्षात येईना.
"२५,००० आहेत. मी बँकेतून काढले नव्हते." ममताला काय प्रकार असावा ते लक्षात आलं.
"ताईने ठेवले असणार."
"तू मागितलेस?" प्रसादच्या कपाळावर आठी उमटली.
"नाही. मी कसे मागेन? ती देत होती. मी घेतले नाहीत. तुला आवडणार नाही असंच सांगितलं. त्यामुळे ठेवून गेली असेल."
"देऊन टाक तिला परत." रागारागाने त्याने पाकीट तिच्या हातात कोंबलं आणि तो बाहेरच्या खोलीत जाऊन बसून राहिला. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली.
"प्रसाद नको ना रे रागावू. मला कळतंय आहे त्या परिस्थितीत तू मार्ग काढतोयस. पण मलाही आता कंटाळा यायला लागलाय. माझ्या उपचारांच्या खर्चाचा ताण मला नाही पेलवत. वाढत्या खर्चाने हिरावलंय तुला माझ्यापासून. तुमच्या दोघांसाठी जितके दिवस जास्त इथे राहता येईल तेवढा प्रयत्न करतेय मी. इच्छाशक्ती इच्छाशक्ती म्हणतात ना ती पणाला लावतेय. पण या सगळ्या चित्रात मी फक्त आपण तिघंच पाहत होते. पण ते चित्र उलटं पालटं झालंय. भेटीला येणार्‍यांच्या गर्दीत मी एकाकी पडलेय. शोधत राहतेय तुम्हाला दोघांना. तुम्ही सापडत नाही तसं जी येतात त्यांच्या डोळ्यात खोल खोल पाहत राहते. छंदच जडलाय तो मला. नजरा किती बोलक्या असतात ना? हे बहुतेक आपण शेवटचं पाहतोय एकमेकांना ही नजर बोचते मला, बिच्चारी, नेमकं मुलीचं दहावीचं वर्ष, आई वडिलाचं काय होत असेल हेच वाचते मी प्रत्येकाच्या चेहर्‍यावर. काही ठरवून माझ्या आजाराबद्दल बोलत नाहीत पण त्यांना त्याचा किती त्रास होतो ते दिसत राहतं मला. कॅन्सरने मेलेल्या माणसांची यादीच ऐकवतात लोक. ती ऐकवता ऐकवता काहीतरी चमत्कार होऊन मी जगेन असा दिलासाही देतात. मी सगळं आता थोडेच दिवस तर सहन करायचं आहे, या वेदना आणि अशी माणसं असं स्वत:ला बजावत आली ’माणसं’ साजरी करते. माणसांच्या त्या गर्दीत मी, ’मीच का?’ हा प्रश्न निरर्थक असला तरी विचारत राहते. कुणाकडून तरी जीवन हुसकावून घेता येत असेल तर घ्यावं असंही वाटतं. आयुष्य किती सुंदर असतं हे आत्ता पटतंय रे. आला क्षण उपभोगा म्हणतानाच आपण किती पडझड करून टाकतो त्या क्षणांची. आनंदाचे क्षण अळवाच्या पानावरच्या थेंबासारखे अलगद निसटून जाऊ देतो आणि वेदनेचे व्रण आपल्या बरोबर कायमचे वास्तव्याला आपणच आणतो. पण आता नाही मला तसं होऊ द्यायचं. मला माझ्या आजूबाजूला प्रसन्न वातावरण हवं आहे. फुलांचा सुवास हवा आहे, त्या सुगंधाप्रमाणे मन ताजंतवानं करणारं निखळ हसू हवं आहे. खरं काय वाटतं आहे ते लपवून कुणीतरी मला हसवावं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन मीही खूप हसावं, खिदळावं अशी उत्कट इच्छा आहे. तुमचा सर्वांचाच युद्ध पातळीवर शारीरिक, आर्थिक, मानसिक झगडा चालू आहे आणि सार्‍या वेदना सोसत आनंदीपणाचा मुखवटा पांघरण्याचा माझा. दोन्ही घरच्यांना माझं गेल्या जन्मीचं देणं असल्यासारखं ओलीस धरलं आहे या कॅन्सरने. आर्थिक भार पेलण्यासाठी ही संस्था, ती संस्था सारं तू करतोयस ते कळतं रे मला. मग घरच्यांनी मदतीसाठी पुढे केलेला हात स्वीकारायला काय हरकत आहे? शारीरिक, आर्थिक जी जमेल ती मदत ते ममताला करतायत, तुला नाही असं समज आणि सार्‍यांची मनं राख. तुझ्या स्वाभिमानी मनाला काय यातना होत असतील ते कळतं रे मला पण नको रागावू माझ्यावर. फार ओशाळं व्हायला होतं मला."
"ममता..." प्रसादला काय बोलावं ते कळेना.
"बोलू दे मला. एकदाच आणि शेवटचं. पुन्हा या विषयावर काही बोलणार नाही. देवाला मी सारखं विचारते की आपण असा काय गुन्हा केला की वेदूवर इतक्या लहान वयात आईच्या प्रेमाला पारखं होण्याची वेळ आणलीस? सगळे देव कुठेतरी बुडवून टाकावेसे वाटतात. कधीतरी वाटतं, रोज कणाकणाने मरण्यापेक्षा पटकन मोकळं व्हावं आणि सोडवावं सगळ्यांनाच अंत माहिती असलेल्या धडपडीतून. पण जीव अडकतोय तो वेदूसाठी. सकाळी डोळे उघडते ते तुम्हा दोघांना पाहण्यासाठी. वेदूच्या महत्त्वाच्या वर्षात या आजाराने फार व्यत्यय आणलाय रे. नाही सहन होत मला ते." इतका वेळ दाराआड उभं राहून अश्रू थोपवीत राहिलेली वेदांगी पुढे झाली. तिने आईला घट्ट मिठी मारली.
"अगं, अगं वेदू." कसंबसं ममताने तिला बाजूला केलं.
"वेदू, ताकद नाही गं माझ्या अंगात म्हणून बाजूला केलं तुला. आणि रडू नको बाळा. किती रडशील. वेदू, अगं ऐक ना मी काय म्हणतेय. शांत हो." ती बराचवेळ वेदांगीला थोपटत राहिली. वेदांगी सावरली आहे असं वाटल्यावर ममताने मन मोकळं केलं.
"तू कुशीत येऊन झोपतेस ना तेव्हा वाटतं तुला अलगद लपेटून घ्यावं अंगाशी, हृदयात जपून ठेवावं कायमचं. ह्या कॅन्सरने मलाच पोखरलं असतं तर माफ केलं असतं मी या आजाराला, पण त्याने तुझा अल्लडपणा माझ्या देखत हिरावून घेतलाय वेदू. या अपराधाला माफी नाही. बाळा, तू डोळ्यातले अश्रू लपवीत मला घट्ट धरुन ठेवतेस ना तेव्हा या जगातून मी जाऊ नये म्हणून तू मला धरलं आहेस असं वाटत राहतं. तुझी ही धडपड माझं हृदय पिळवटून टाकते, काळीज कापते, रक्तबंबाळ होतं मन. मग वेदना सोसायची ताकद माझी मीच नव्या दमाने जोखायला लागते. तुझं अकाली मोठं होणं, माझी आई बनणं, नाही गं पेलवत मला. कोणत्या पापाची शिक्षा भोगते आहे मी ही?" प्रसाद मायलेकीचं संभाषण डोळ्यातले अश्रू न लपविता ऐकत राहिला. वेदांगी काहीतरी बोलणार तेवढ्यात ममताच म्हणाली.
"वेदू, तुला हे कितपत कळेल माहीत नाही पण सतत काय वाटत असतं ते सांगून टाकते तुम्ही दोघंही इथे आहात तर. जीवन म्हणजे अज्ञाताच्या दिशेने चालताना वाटेत लागणारा थांबा. त्या थांब्यावर काहीजणं खूप वेळ विसावतात, काही ना फार घाई असते पुढे निघून जायची. विसावा संपून माझा प्रवास कदाचित पूर्णत्वाच्या दिशेने असेल. त्यालाच मृत्यू म्हणायचं का? तो कसा येतो? कुठे घेऊन जातो? काय होणार मृत्यूनंतर? पुनर्जन्म? खूप प्रश्न सतावतात मला. अध्यात्म वाचायच्या आधीच जायची वेळ आली ना त्यामुळे अचानक वास केलाय माझ्या मनात या प्रश्नांनी. खूप भितीही वाटते. जन्माला आल्याआल्या आईचं बोटं धरलं होतं. आता ते सुटलं तर मी हरवेन अशी भिती वाटतेय. आईचा हात घट्ट धरुन ठेवते तेव्हा ही भिती तिच्यापाशी व्यक्त करावीशी वाटते. पण मी काहीच बोलत नाही. नुसतं साठवून घेते तिला माझ्या नजरेत. माझ्या शेजारी उसनं अवसान आणून ती बसते तेव्हा तिला थोपटून धीर द्यावासा वाटतो. जशी तू माझी आई झाली आहेस ना वेदू तसं मला माझ्या आईचं आई व्हावंसं वाटतं. पण तेवढं त्राणच नाही उरलं आता अंगात." ममता मन मोकळं करत होती. अखेरचं. वेदांगी, प्रसाद तिचा प्रत्येक शब्द आसुसून ऐकत होते. तिला थोपटत होते. आपल्या स्पर्शाने, इच्छाशक्तीने ती बरी व्हावी असं दोघांनाही वाटत होतं. ममता शांत झाली. सुन्न शांततेने मनाला, खोलीला विळखा घातला.
" वेदू, मला एक वचन दे." ममताने अचानक विषय बदलला. वेदांगी हसली,
"आई, तू कधीपासून वचन मागायला लागलीस गं? शपथ, वचन असलं काही खरं नाही म्हणतेस ना तू."
"तरी." कसंबसं हसत तिने हात पुढे केला.
"बरं चल. दिलं. काय हवं तुला माते?" नाटकीपणाचा आव आणत वेदांगीने वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला.
"मला ठाऊक आहे. बाबांशी बोलून तू परवानगी मिळवली आहेस परीक्षेला न बसण्याची. मी आनंदाने इथला निरोप घ्यावा असं वाटत असेल तर परीक्षा दे. नुसती परीक्षा देऊ नकोस. असं यश मिळव की सारे अचंबित झाले पाहिजेत, कौतुकाच्या वर्षावात तू न्हाऊन निघाली पाहिजेस. तुझ्या जिद्दीची प्रशंसा जेव्हा होईल ना तेव्हा माझं अकाली जाणं अर्थपूर्ण होईल. सार्थकी लागेल."
"आई, मी परीक्षा द्यायची नाही म्हणत होते ते तुझ्यासाठी. पण आता तुझ्यासाठी मी रात्रीचा दिवस करून अभ्यास करेन. मिळवेन मी यश, करेन मी सारं अर्थपूर्ण. आणि ते पाहायला तू असशील. अशी सहजासहजी नाही जाऊ देणार मी तुला." वेदांगीने वचन दिलं पण ती तिथे थांबली नाही. डोळ्यातले आसू पुसत प्रसादने ममताला अलगद जवळ घेतलं. इतका वेळ बळ आणून बोलत राहिलेली ममता प्रसादच्या हळुवार स्पर्शाने कोसळली,
"प्रसाद, तू तरी सांग ना त्या यमादूताला परत जायला. मला अजून जगायचं आहे, खरंच मला अजून जगायचं आहे..."

त्या दिवसानंतर वेदांगीने झपाटल्यासारखा अभ्यास केला. ममता किती दिवसाची सोबती आहे हे जसं कुणालाच ठाऊक नव्हतं तसंच ती परीक्षेचा पहिल्याच दिवशी जाईल हेही. ८ महिन्यांचा अथक प्रवास संपायची वेळ आली. तीन आठवडे फक्त वेदना कमी होण्याची औषधं चालू होती. ममताला होणारा त्रास पाहून प्रसाद, वेदांगीलाच पळ काढावा असं वाटायचं, कधी वाटायचं देवाने थोडीतरी दया दाखवावी आणि सोडवावं तिला, तर कितीदा तरी काही तरी आश्चर्य घडेल आणि ममता बरी होईल ही आशा बळावयची. येणारा प्रत्येक दिवस असाच जात होता. परीक्षेला आईचा आशीर्वाद घेऊन गेलेली वेदांगी घरी आली ती जणू जात्या जिवाला निरोप देण्यासाठीच. वेदांगीने जवळ बसत पहिलाच पेपर अगदी सोप्पा गेल्याचं सांगितलं आणि ममताच्या डोळ्यातलं पाणी खिळेना.
"वेदू, आता नाही गं थांबता येणार मला. तू परीक्षा देतेयस ही खात्री करायची होती म्हणून कशीतरी थांबले. आता जाऊ दे मला. आणि सगळे पेपर उत्तम दे...." हे एवढं वाक्य म्हणायला ममताला १५ मिनिटं लागली. पण कुणीच तिला थांबवलं नाही. तिच्या अंगावर हळुवार हात फिरवीत वेदांगी आश्वासन देत राहिली. आणि त्या आश्वासक स्पर्शाच्या सोबतीने ममताने डोळे मिटले. कायमचे. पण वेदांगीचा मनोनिग्रह थक्क करून टाकणारा होता. दिवसकार्य चालू असताना फक्त एकदाच ती तिच्या बाबांच्या आणि आजीच्या गळ्यात पडून रडली होती. हमसाहमशी. हाक मारायला येणार्‍यांच्या, दिवसकार्यांच्या धावपळीत तिला फक्त तिची आई, परीक्षा आणि तिला दिलेलं वचन इतक्याच गोष्टी दिसत होत्या.

आणि आज ममताला दिलेलं वचन वेदांगीने पूर्ण केलं होतं. वेदांगी आश्चर्य आणि कौतुकाच्या शब्दात न्हाऊन निघत होती. बापलेकीने एकमेकांकडे पाहिलं.
"जिथे असेल तिथे आई खूश असेल. केलं मी तिला दिलेलं वचन पूर्ण. तोच एक ध्यास होता तिचा शेवटपर्यंत. आईचा आणि तुमचा पेढा." वेदांगीने एकदम दोन पेढे प्रसादच्या तोंडात कोंबले. त्यानेही दोन पेढ्यांचा घास तिला कौतुकाने दिला. दोघांच्या विचारांचा, आठवणींचा थांबा एकच होता. त्या थांब्यावर हेलकावणारा आठवणींचा, प्रसंगाचा लंबक स्थिर झाला. एक अध्याय संपला होता. अकस्मात, अकल्पित. पण पुढची वाट ममताने वेदांगीकडून घेतलेल्या वचनामुळे सुकर होती, यशाची होती. त्या वाटेवर वेदांगीला पाऊल टाकायला प्रसाद मदत करणार होता. नव्या उमेदीने!

गेल्या वर्षीच्या ’प्रसाद’ दिवाळी अंकात ही कथा प्रसिद्ध झाली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

कथेतली वेदना जाणवली. तिघेही डोळ्यासमोर उभे राहिले... अन शेवट आवडला. छान कथा.

गेल्या वर्षीच्या ’प्रसाद’ दिवाळी अंकात ही कथा प्रसिद्ध झाली. >>> नवल नाही, यायलाच हवी. अप्रतिम लेखन.

त्याने <<वेदांगीला>> जवळ घेतलं. कशाचीही काहीही कल्पना नसलेली वेदांगीही तिला चिकटली. >> इथे ममता हवे ना?
कथा छान !!

सुंदर लिहिलंय!
मला ही कथा वाचताना ज्युलिया रॉबर्ट्स च्या ' स्टेपमॉम' या चित्रपटाची आठवण झाली.

मी चौथीत असताना माझी आजी cancer ने गेली. अशीच परीकेशेहून मी घरी आले आणि घरी लोकांची गर्दी - रामनवमीचा दिवस . मी तिची खूप लाडकी होते. chemotherapy मुळे तिचा गच्च अंबाडा विरळ होत गेलेला मी पहिला आहे , एकत्रच राहायचो त्यामुळे खूपच लहान वयात तुम्ही लिहिलेलं खूप सगळं डोळ्यापुढे घडलंय....तुमच्या शब्दांनी ते सगळं आठवलं आणि परत बांध फुटला....

मन हेलावून टाकणारी कथा.
ज्या घरात कॅन्सर चा रुग्ण असेल (खास करून स्त्री रुग्ण) तर ते घर कोणत्या दिव्यातून जात असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही.
मानसिक दोलायमान खूप योग्य शब्दात उतरवलं आहे तुम्ही. असे शेअरिंग रुग्णाच्या घरात झाले तर बाकी सगळे इश्यु दुय्यम वाटू लागतात.

वाचताना अगदी खिळवून ठेवल्यासारखे वाटत ...
खूप हृदयस्पर्शी ...कथेतल्या पात्रांची तगमग , दोलनामय अवस्था , आणि सगळ्यात भारी म्हणजे शेवट .....
शेवट खूप मस्त आहे ...