कमलताल

Submitted by शिवकन्या शशी on 30 December, 2017 - 02:51

(ताल = सरोवर)

प्रिय कमलताल,

मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते.

कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ.

अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट. शांत शांत आसमंत. एखाद दुसरी घार.अशाच एका वळणावर तुझे दर्शन झाले.... आणि मी थबकले.

तुझे पाण्याचे शरीर. फार विस्तीर्ण नाही, फार छोटे नाही. मध्यम मध्यम. दोन डोळ्यांच्या शामियान्यात सामावणारे. ते ऊन कोवळे कोवळे. जणू कमळाची पावले. तुझे संपूर्ण सजल शरीर कमलपत्रांनी झाकलेले. इथे तिथे, कुठे कुठे, जरा जरा पाणी थरारे.... आणि त्या कमलपत्रांवर कितीतरी कमळांचे मनोहर दर्शन! काही पूर्ण उमललेले. काही अर्धे पेंगुळलेले. काही पानांवर लडिवाळ पहुडलेले. ती फुले इतकी शांत शांत, जणू मौनाचे हळूवार रूप.

कुणीच नव्हते. केवळ तू आणि मी. भवताली हिमालयाचा भक्कम तट. तुझ्यावर एक रेखीव लाकडी पूल होता. मी पुलाच्या टोकाशी गेले. तुझ्यापर्यंत पोहचण्याची इच्छा. किती वेळ तुझ्याकडे एकटक बघत राहिले माहित नाही. तुझे ते पानाफुलांनी व्यापलेले शरीर स्मरते. माझे संचित सुंदर असावे, म्हणून मी तुझ्यापाशी पोहचले. मनातले विचार पांगून गेले. नजर तुझ्या तलम पृष्ठभागावरून फिरू लागली. कशाचा आणि कुणाचाही आठव राहिला नाही. मन तुझ्या सारखे नीरव होऊन गेले. सहस्त्र सुंदर कमळांचे वैभव लेवून घेताना, तू स्वतःला एके ठिकाणी बद्ध करून घेतलेस. किती काळ गेला माहित नाही.

.... अचानक वाऱ्याचा मोठा झोत आला.... आणि जे पाहिले ते केवळ अप्रतिम!..... झोत आला आणि तुझे संपूर्ण शरीर असे काय शहारले.... इथून तिथवर सगळी कमलपत्रं एका दिशेत सरारारा करत गेली.... सगळ्या फुलांचे मौन क्षणभर हसले......तुझ्यातल्या पाण्याने कूस बदलली..... सोनेरी ऊन अल्लड झाले.....उंच उंच शिखरे क्षणभर खाली वाकली.... आणि माझी एकतानता किंचित भंग पावली.....

आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात.

तुझ्या काठी परत येईन. कधी... माहित नाही. पण येईन.

तुझी
शिवकन्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> सगळ्या फुलांचे मौन क्षणभर हसले......तुझ्यातल्या पाण्याने कूस बदलली.....
वाऽऽऽह... क्या बात... अप्रतिम! शब्दशृंगाराने ओथंबून गेलेले लिखाण. याला म्हणतात ललित Happy