योग ध्यानासाठी सायकलिंग ९ (अंतिम): अजिंक्यतारा किल्ला व परत

Submitted by मार्गी on 29 December, 2017 - 04:41

ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर

योग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई

योग ध्यानासाठी सायकलिंग ५: चौथा दिवस- वाई- महाबळेश्वर- वाई

योग ध्यानासाठी सायकलिंग ६: पाचवा दिवस- वाई- सातारा- सज्जनगड

योग ध्यानासाठी सायकलिंग ७: सहावा दिवस- सज्जनगड- ठोसेघर- सातारा

योग ध्यानासाठी सायकलिंग ८: सातारा- कास पठार- सातारा

९ (अंतिम): अजिंक्यतारा किल्ला व परत

ह्या मोहीमेचा संबंध ध्यान- योगाशी कशा प्रकारे आहे, हे इथे वाचता येईल.

५ ऑक्टोबरची सकाळ. ह्या सायकल मोहीमेचा आज शेवटचा दिवस. आज अजिंक्यतारा किल्ला बघून परत जायचं आहे. काल- परवा ह्या किल्ल्याच्या जवळून जाताना ह्याचं दृश्य बघून भिती वाटत होती. पूर्वी एकदा मोटरसायकलवर किल्ल्यावर आलो होतो, तेव्हा जेमतेम पहिल्या गेअरवर बाईक चढली होती. अर्थात् गेले काही दिवस रोज चढ व घाट चढलो असल्यामुळे फार काही वाटत नाहीय. सकाळी हा किल्ला बघून लवकरच परत जायचं आहे.

गावात एका जागी किल्ल्याचा रस्ता विचारून लवकरच किल्ल्याच्या पायथ्याला पोहचलो. अनेक जण मॉर्निंग़ वॉक/ जॉगिंग करताना दिसत आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी भटक्या- विमुक्तांवर काम करणा-या अनेक संस्था दिसल्या. हळु हळु पुढे गेलो. किल्ला किती विस्तीर्ण आहे, हे कळत गेलं. एका वळणानंतर तीव्र चढ सुरू झाला. संपूर्ण मोहीमेत हाच चढ जास्त कठिण वाटतोय. अर्थात् सायकल चालवणं जमणार नाही, असं कुठेच वाटलं नाही. ह्या चढाचा आनंद घेत हळु हळु पुढे जातोय. रस्ता मध्ये दाट झाडीतून जातोय. रस्त्याच्या अगदी वर एका उंच झाडावर मोराचा केकारव ऐकू येतोय. पण चढ तीव्र असल्यामुळे फोटोसाठी थांबता आलं नाही. ह्या दोन- अडीच किलोमीटरच्या चढाला पंचवीस मिनिट लागले.

वर पोहचताना एका ठिकाणी पायवाट रस्त्याला येऊन मिळते. ह्या वाटेवरूनही लोक चढत आहेत! ही पायवाट जवळ जवळ साठ अंशाच्या कोनातून किल्ल्यावर चढते आहे! इथून दूरवरचा नजारा दिसतोय. अजिंक्यतारा किल्ला! मराठ्यांच्या इतिहासातला एक दीपस्तंभ! फोटो घेऊन लगेच परत निघालो. परत जाताना तो मोर नाही दिसला.


वरून दिसणारा नजारा

आता ज्यांच्याकडे थांबलो आहे, तिथे जाऊन सामान घेऊन परत निघायचं आहे. इतके दिवस निर्जन रस्त्यांवर सायकल चालवल्यानंतर गर्दीत सायकल चालवताना वेगळंच वाटतंय. शहराच्या गर्दीत वाहन चालवताना नेहमीच थोडा त्रास होतो. दर वेळी लगेच आपलं मन म्हणतं आंधळा आहे का हा, दिसत नाही का? आपल्याला नेहमी‌ वाटतं की, काही लोक समोर न बघताच गाडी चालवत असतात. पण अशा वेळेस हेही बघायला पाहिजे की, आपलंही‌ लक्ष कुठे आपल्या चालवण्याकडे आहे! आपलंही लक्ष भरकटलं आहे आणि समोरचा माणूस काय करतोय, इकडे आपलं लक्ष आहे. जर आपण थोडे जागरूक झालो व लक्ष स्वत:कडे ठेवलं; आपल्या चालवण्याकडे दिलं; तर कितीही गर्दी असो, आपल्याला ती अस्वस्थ नाही करू शकत. ह्यावरून एक गोष्ट आठवते.

एकदा गौतम बुद्ध प्रवचन करत होते. त्यांच्या सोबत आनंद होते आणि तीन जण प्रवचन ऐकत होते. त्यांचं लक्ष बुद्धांकडे नव्हतं. म्हणून बुद्ध परत परत सांगत होते. हे बघून आनंदला राहावलं नाही आणि त्याने बुद्धांना म्हंटलं, भंते, ह्या लोकांचं आपल्याकडे लक्षच नाहीय. तरीही आपण का बोलत आहात? त्यावर बुद्धांनी म्हंटलं की, त्यांचं लक्ष नाहीय, म्हणून तर त्यांच्याशी परत परत बोलतोय. पण तुला काय झालं की तूही त्यांच्याकडेच लक्ष देतोय. ते ऐकत असतील किंवा नसतील, तुला काय त्याचं? आणि तूसुद्धा तर त्यांच्याकडेच लक्ष देत होतास, तू तरी कुठे ऐकत होतास?

ह्यामुळे नेहमी एक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा गर्दीत असताना मनात विचार येतो की, किती आंधळ्यासारखं‌ कोणी चालवतंय, तेव्हा लगेचच स्वत:ला समजावयाचं की, आपणही आंधळेच तर आहोत, त्यामुळेच तर आपलं लक्ष त्यांच्याकडे गेलंय! जर आपलं लक्ष आपल्या चालवण्यावर असतं तर त्यांचं मध्ये येणंही कळालं नसत! असो.


पायवाट!


ये अजिंक्यतारा वो सातारा

बघता बघता आठ दिवसांची ही सायकल मोहीम पूर्ण झाली! अजिंक्यतारा किल्ला क्लायमॅक्स होता आणि सज्जनगड, मांढरदेवी घाट, स्वप्नवत् कास पठार आणि इतर अनेक अविस्मरणीय नजारे! एका बाजूला अजून विश्वास बसत नाहीय. पण आता परत जायची वेळ आली. दोन दिवस ज्यांच्याकडे राहिलो आणि ह्या प्रवासात ज्या ज्या लोकांनी मदत केली, त्यांना धन्यवाद देऊन परत निघालो. सातारामधले मित्र बस स्टँडवर सोडवायलाही आले. परत एकदा बसमधून सायकल नेण्याची कवायत केली. सायकल चालवणे म्हणजे फक्त पेडल मारणेच नाही! त्यासोबत इतरही अनेक उपद्व्याप करावे लागतात! असो. आणखी एकाला ह्या मोहीमेबद्दल धन्यवाद द्यायलाच हवेत. माझी सायकल! सात दिवसांमध्ये ३५० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर अनेक घाट व चढ- उताराच्या रस्त्यांवर सायकल चालवता आली! ह्या मोहीमेने सायकलिंगचा आत्मविश्वास मिळाला आहे. महाराष्ट्रातले अनेक घाट व मोठे चढ पार केल्यानंतर आता ह्याहून मोठा पर्वत खुणावतो आहे! शेवटपर्यंत तर इतकी सायकल चालवून झाली की, सायकल चालवणं जणू जाणवतच नाहीय! आपोआप मनात येतंय- इतकी सायकल चालवली, बरं मग? सो व्हॉट!


अजिंक्यतारा किल्ल्याचा रूट


चढ- ज्यात एका किलोमीटरमध्ये १२० मीटर चढ आहे

पुढील मोहीमेपर्यंत आपला निरोप घेतो! हे वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत- www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults