योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

Submitted by मार्गी on 9 October, 2017 - 05:55

अपयशातून शिकताना

रामराम! सायकल नव्याने सुरू करून चार वर्षं झाली आहेत. सायकलीच्या सोबतीत इतकं काही शिकायला मिळालं, नवी दृष्टी मिळाली! ह्या पूर्ण प्रवासात सायकलसह अनेक दिग्गज सायकलपटू, फिटनेस क्षेत्रातील मातब्बर आणि प्रेरणा देणारे लोक सतत भेटत आहेत! हे निवेदन सुरू करण्यापूर्वी ह्या सर्वांना एकदा नमन करतो.

माझी मागची शेवटची सायकल मोहीम किंवा मोठी राईड २०१५ डिसेंबरमध्ये होती. तेव्हा दुस-याच दिवशी मी पूर्ण गळून गेलो होतो. वाटलं होतं की, सायकलिंग सोडूनच द्यावं. प्रत्येक सायकलिस्टला हा अनुभव अनेकदा येतोच. पण असो, सायकल काही सुटली नाही. काही दिवसांनंतर परत मोठ्या मोहीमेची स्वप्नं पडायला लागली. २०१५ मध्ये लदाख़ची अर्धवट राहिलेली मोहीम केली होती. तेव्हा वाटलं २०१६ मध्ये परत एकदा प्रयत्न करावा. आधीच्या अनुभवांपासून धडा घेऊन चांगली तयारी सुरू केली. ह्या वेळी फिटनेस व स्टॅमिना वाढवण्यासाठी रनिंग सुरू केलं. रनिंग सुरू करणंही कठिणच गेलं. शारीरिक दृष्टीने नाही तर मानसिक दृष्टीने. अनेक दशकांपूर्वी जेव्हा शाळेत कधी पळालो असेन, तेव्हा सगळे चिडवायचे की कसा पळतोय हा! ती गोष्ट अजूनही मनात आहे. त्यामुळे सुरुवातीला वाटलं की, पहाटेच्या अंधारातच पळावं. पण पहाटे अंधारात पळण्यासाठी फारच लवकर उठावं लागतं! आणि ते शक्यतो तर जमायचंच नाही. पण तरीही हळु हळु पळायला सुरुवात केली. पहिले दोन दिवस तर पाच किलोमीटर चाललो आणि मध्ये मध्ये फक्त शंभर- शंभर मीटर पळत होतो. लगेच धाप लागत होती. मग काही वेळ उभं राहून परत थोडं पळायचो. त्याला खरं तर चालणं आणि थोडसं जॉगिंगच म्हणायला पाहिजे. असे २-३ दिवस गेल्यानंतर हळु हळु पूर्ण पाच किलोमीटर जॉगिंग करू शकलो. तेव्हाही अनेकदा थांबावं लागत होतं. पण हळु हळु काही आठवड्यांमध्ये वेग वाढला आणि सोपंही झालं. असं करत करत मग एका वेळेस दहा किलोमीटर पळालो. सायकलिंगच्या सोबत हेही जमलं! आरोग्य व फिटनेसच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली.

पण २०१६ मध्ये लदाख़ला सायकलवर नाही जाता आलं. तयारी बरीच केली, खूप योजना बनवली. पण तरीही सायकलिंगचा तितका सराव करता आला नाही. आणि एका मोठ्या राईडनंतर तर गुडघेच (खरोखर) टेकले! तेव्हा ठरवलं की, आता लदाख़ला नाही जाणार. पण तरी २०१६ च्या पावसाळ्यात दिवास्वप्न पडत होती. इकडे जाईन, तो भाग बघेन. पण कुठेच जाऊ शकलो नाही. फक्त काही प्रॅक्टीस राईडस झाल्या व क्वचित पळत होतो. एका अर्थाने मन सांगत होतं की, लांबच्या मोहीमा सायकलवर करणं तुला जमणारं नाहीय! असो.

पण खरोखर असे किती चांगले लोक आहेत जे सतत दुस-यांना प्रेरणा देतात! अनेक सायकलिस्टचे वर्णनं बघायचो. एकदा तर वाटलं की, जाऊ दे ना, आता हे वाचायचं तरी कशाला. पण नाही. सायकलीसोबतचं नातं टिकून राहिलं आणि थोडी सायकलिंग सुरूच राहिली. त्याला बळ २०१७ मे मध्ये मिळालं व ठरवलं की, २०१७ च्या पावसाळ्यात कुठे ना कुठे सायकलवर जायचंच. मेपासूनच छोट्या प्रॅक्टीस राईडस नव्याने सुरू केल्या. मध्ये मध्ये थोडा पळायला लागलो. कारण हे तर कळालंच होतं‌की, स्टॅमिना/ फिटनेस वाढवायचा असेल तर तो मार्ग रनिंगमधूनच मिळेल. कारण सायकलिंगच्या तुलनेत रनिंग जास्त थकवणारा व्यायाम आहे. त्यामुळे जर मी काही अंतर रनिंग़ करू शकलो- १० किंवा १५ किमी पळू शकलो, तर त्यामुळे माझा स्टॅमिना वाढेल व सायकलिंग सोपं होईल. लवकर थकणार नाही. त्या विचाराने रनिंग सुरू केलं होतं. मन त्याला अनुकूल झालं होतं.

त्याच सुमारास ऑगस्ट २०१७ मध्ये पुण्यातले दिग्गज धावपटू- हर्षद पेंडसे अर्थात् आपले हर्पेन ह्यांच्या मोहीमेविषयी समजलं. ते खार्दुंगला चॅलेंज अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेत होते व एका संस्थेसाठी मदतही उभी करत होते. आणि ह्या अल्ट्रा मॅरेथॉनसाठी ते एक आठवड्यात १०० किमी पळण्यापासून एका दिवसात ५० किमी इतकं पळत होते! त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. ते आणि डॉ. पवन चांडकांसारखे सायकलिस्ट जे नेहमी त्यांच्या सायकलिंगचे अपडेटस पाठवतात (सगळ्यांना आठवण करून देतात की, रोज सायकल चालवायची आहे). तसंच ते मध्ये मध्ये एखादं सामाजिक काम घेऊनही मोठ्या सायकल मोहीमा करतात. त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. असं वाटलं की, हर्पेन ह्यांना अल्ट्रा मॅरेथॉनसाठी शुभेच्छा देताना मी कमीत कमी हाफ मॅरेथॉन तरी धावलो पाहिजे. आजवर ११ किमीपेक्षा जास्त कधीच पळालो नव्हतो. पण मनाची तयारी झाली. ह्या मंडळींकडून खूप शिकायला मिळत होतं, अनेक गोष्टी कळत होत्या. त्यामुळे मग १५ किमी, मग १८ किमी असं करत लवकरच २२ किलोमीटरही पळालो. ह्याच काळात संजयराव बनसकरांसारखे नवीन मित्रही मिळाले व त्यांच्याकडूनही खूप काही शिकता आलं.

ऑगस्टमध्ये जास्त भर रनिंगवर दिला. सायकल फारच थोडी चालवली. अगदी थोडेच दिवस व तीसुद्धा ११- १५ किलोमीटर इतक्या छोट्या अंतरापर्यंत. पण २२ किमी पळाल्यानंतर (त्यात १९ किमी‌ पळालो व उरलेले ३ किमी चाललो होतो) उत्साह वाढलेला होता. खरं तर ब-याच कमी वेळेत ५ किलोमीटर रनिंगवरून सरळ २२ किलोमीटर पळालो होतो हेही जमलं सायकलिंगमुळेच होतं. शरीर अशा व्यायामासाठी थोडं असेल पण तयार होतं. मग आता ठरलं की, सप्टेंबरमध्ये एक पावसाळी मोहीम करायची. आणि त्यामध्ये काही थीम असली पाहिजे. म्हणून मग ठरवलं की, ह्या वेळेस 'योग- ध्यानासाठी सायकलिंग' अशी थीम घेऊन सायकलिंग करावी. चांगली योजना बनली. सायकल चालवण्याची माझी पात्रता (किंवा हैसियत!) लक्षात घेऊन छोटे टप्पेच ठरवले (अंथरूण पाहून पाय पसरावेत तस!). रोज फक्त ५०- ६० किमी सायकल चालवेन व नंतर लॅपटॉपवर माझं रूटीन कामही करत राहीन, असं ठरवलं.

३ सप्टेंबरला भिमाशंकरला सायकलवर गेलो. ही एक ८२ किमीची राईड होती‌ व त्यामध्ये मोठा घाट व चढ होते. त्यामुळे मला वाटलं की, हे दोन दिवसांमध्ये करावं. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत पोहचावं व दुस-या दिवशी पहाटे तिथून परत यावं. खरं तर त्याच्या आधी २०, ३०, ४० किमीच्या छोट्या राईडस करायला हव्या होत्या. पण मी थेट इकडेच आलो. मन असंच असतं! एकदम ठरवतं आणि निघतं! अशा वेळेस जे होणार होतं, तेच झालं. अतिशय कष्टदायी राईड ठरली. परत एकदा अपयश आलं. वाटलं होतं की, सहा तासांमध्ये हे ८२ किमी पार करेन पण नऊ तास लागले. आणि अवस्था फारच वाईट झाली. अनेक गोष्टी होत्या. पहिले तीन तास मस्त सायकल चालवली. पूर्वीच्या तुलनेत वेगही जास्त मिळत होता. पण नंतरच्या चढाच्या रस्त्यावर थकत गेलो. आणि जो मोठा घाट होता, तो फारच थोडा सायकलवर जाऊ शकलो आणि उरलेलं अंतर तर सायकल अक्षरश: ओढत नेऊन पूर्ण केलं. एकदा तर तेही कठिण झालं होतं.

दुसरा त्रास सामानाचा झाला. दोन दिवसाची राईड म्हणून लॅपटॉपही सोबत ठेवला होता. काही कपडे, पंक्चर किट हेही होतं. कॅरीअरला लावलेली सॅक सारखी निघत होती. तिला ठीक करण्यातच कमीत कमी एक तास गेला असेल. आणि सगळं सामान मागेच ठेवल्यामुळे चढावर सायकल चालवणं कठीण झालं. त्यामुळे कसाबसा भिमाशंकरला पोहचलो. त्या राईडमध्ये फक्त एकच गोष्ट चांगली होती- ढगामधले अप्रतिम नजारे! पण माझं नशीब इतकं वाईत होतं की, पाऊस पडत असल्यामुळे जुन्या मोबाईलने फोटो काढले पण त्याचं मेमरी कार्ड करप्ट झालं होतं! त्यामुळे ते फोटोही गेले. थोडे फोटो आहेत, जे नव्या मोबाईलने पाऊस सुरू व्हायच्या आधी काढले आहेत. असो. पण मग त्याच दिवशी लगेचच बसने परत आलो. कारण दुसरा दिवस वर्किंग डे होता व इतकं सामान व तेही लूज होत असताना मला उतार असूनही आठ- नऊ तास लागले असते. त्यामुळे परत फिरलो. तरीही अनेक महत्त्वाचे अनुभव मिळाले. कसा का असेना, सायकलवर भिमाशंकरला पोहचलो होतो. अतिशय सुंदर नजारे बघायला मिळाले. आणि तिथे सायकल बसवर चढवताना एक जण खूप चांगले भेटले. ते बसचे कर्मचारी नसून व माझ्यासारखेच प्रवासी असूनही त्यांनी मदत केली. सायकल बांधण्यासाठी दोरी आणून दिली. माझी अवस्था वाईतच होती. तेव्हा ते मदतीला आले. असो.


भिमाशंकरचे काही फोटोज

परतल्यावर एक दोन दिवस असंच वाटलं- आता बस्स, फार झालं! पण परत तिस-या दिवशी सायकलीने परत जोर धरला. मनात परत योजना सुरू झाली. सामानाला वेगळ्या प्रकारे बांधून बघितलं व ते मस्त जमलं. मागे कॅरीअरवर फक्त लॅपटॉप त्याच्या केसमध्ये ठेवायचा आणि समोर पंक्चर किट- कपडे इ. ते छान जमलं. एक छोटी‌ राईड त्याच्यासोबत केली. काहीच अडचण आली नाही. अजून काही प्रॅक्टीस राईडस केल्या २५- ३० किलोमीटरच्या. मग सायकलची सर्विसिंगही करून घेतली. आता पक्की योजना डोळ्यापुढे येत गेली. २१ सप्टेंबरला पुण्यात चाकणमधून निघेन, रोज ५० किमी अंतर पार करेन व महाबळेश्वरला जाईन. नंतर सातारामधले रमणीय भाग बघून परत येईन, असं ठरवलं. मध्ये फक्त रविवारी मोठा ८९ किमीचा टप्पा ठरवला.

ज्या दिवशी निघणार होतो, त्याच्या आदल्या दिवशी मोठा पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी रस्ते बंद केल्याच्या बातम्या आल्या. मग वाटलं जाणं कठीण आहे. मग योजना एक आठवडा पुढे ढकलली. हा निर्णयही खूप योग्य ठरला. त्याच दरम्यान एक प्रॅक्टीस राईड केली ७० किमीची. तेव्हा वाटलं की, चार- पाच तास सायकल चालवल्यानंतर आणखी चालवणं कठीण जाईल. त्यामुळे योजना थोडी बदलली. त्याशिवाय "ध्यान योग" लिहिलेले टी- शर्टसही बनवून घेतले. इतर कोणाला काही उपयोग झाला असेल नसेल, पण मला मात्र हा मॅसेज फार उपयोगी पडला. मनोबल वाढण्यासाठी मदत झाली. योग- ध्यानासाठी सायकलिंग ही थीम काय होती, पूर्वी बोललो आहेच.

…. जसा जसा सायकल मोहीम सुरू करण्याचा दिवस जवळ येत गेला, तशा अनेक गोष्टी क्लीअर होत गेल्या. मी ठेवलेलं पूर्वीच्या राईडसचं वर्णन खूप उपयोगी पडलं. कारण पूर्वी मी अनेक मोठ्या राईडस अगदी सहज केल्या होत्या ८०, ९० किंवा १३०, १५० किलोमीटरसुद्धा. मग मी आता कसा ५०- ६० किलोमीटरमध्ये थकतोय? तेव्हा कळालं की, सायकलिंग करताना मी हल्ली तितका चांगला आहार घेत नाही. त्यात सुधारणा करावी लागेल. शिवाय सायकल चालवल्यानंतर चांगला आरामही करता आला पाहिजे. रात्री चांगली झोप घ्यायला पाहिजे. तर मी पुढच्या दिवशी फ्रेश राहीन. शिवाय योगासन- प्राणायाम व स्ट्रेचिंगही आवश्यक आहेच. माझी एकूण तयारी व फिटनेस लक्षात घेता मोहीमेच्या योजनेत थोडा बदल केला आणि वाई- महाबळेश्वर- मेढा- सातारा हा जो ८९ किमीचा टप्पा होता, तो कमी करून वाई- महाबळेश्वर- वाई असा केला. त्याचे दोन फायदे झाले- महाबळेश्वर ह्या मोहीमेचा सर्वोच्च भाग होता, तो मी सामानाशिवाय चढू शकणार होतो व तेही कमी अंतराच्या टप्प्याद्वारे. शिवाय त्या दिवशी नंतर हॉटेल शोधणं हाही त्रास वाचणार होता.

हे तर स्पष्टच झालं आहे की, हे फक्त सायकल चालवणं नाहीय. किंवा फक्त शरीराचं कामही नाहीय. त्यात पूर्ण मन आहे, पूर्ण कॅरेक्टर आहे. सायकल तर चार- पाच तासच चालवेन. खरं मॅनेजमेंट तर नंतरच्या गोष्टींचं आहे. चांगला व पुरेसा आहार, चांगला आराम, मुक्कामाची सोय इ. आहारासंदर्भात अनेक गोष्टी कळाल्या आहेत. चार- पाच तास सायकल चालवायचं असेल तर काय काय आणि किती खाल्लं पाहिजे, हे कळलं आहे. तिथे चूक करणार नाही. वाटेतले हॉल्टही ठरले. पहिल्या दिवशी पुण्यात धायरीला भावाकडे राहीन, दुस-या दिवशी भोरला मित्राकडे जाईन. तिस-या व चौथ्या दिवशी वाईत मुक्काम करावा लागेल. नंतरचं पुढे बघेन.

ऑन पेपर तर सर्व ठीक आहे! पण मला हे जमेल? खरोखर? मनाला कसं समजावू? परत परत मनात एकच विचार येतोय. पण आता ठरवलं की, ह्या वेळी मला दक्षिण आफ्रिकी क्रिकेट टीमचा सदस्य (चोकर) बनायचं नाही. मला तर विराट किंवा धोनीच्या टीमचाच सदस्य बनायचं आहे जो टारगेट आरामात पूर्ण करेल!! जाण्याच्या बरोबर एक दिवस आधी मन शांत झालं. एक सकारात्मक भाव मनात आला की, मी हे करू शकतो. जे काही होईल, तिथे फक्त मन शांत ठेवायचं आहे. काहीही होवो, 'सो व्हॉट?' असं म्हणून पुढे जायचं आहे. सायकल मोहीमेचे सुरुवातीचे दिवस कठीण जातात. उद्या २८ सप्टेंबरला निघायचं आहे. २७ च्या रात्री झोप कष्टाने लागली. आता बघूया काय होतं. मला इतकी मोठी मोहीम खरंच जमेल? का आधी झाली तीच गत ह्यावेळीही होईल? एक गोष्ट नक्कीच थोडा धीर देते आहे की, मी आता चांगली रनिंग करू शकतोय. पूर्वी जे जवळपास अशक्य वाटायचं, ते शक्य झालंय. कधी वाटलं नव्हतं मी इतकं पळू शकेन, पण आता पळतोय. तेव्हा हेही बघूया कसं होतं.

पुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

माझे सर्व लेख एकत्र इथे आहेतः http://niranjan-vichar.blogspot.in/

Group content visibility: 
Use group defaults

मी याची सुरुवात हिंदी मधून वाचली, हिंदी पण लाजवाब आहे भाऊ

एक सूचना देऊ का
१. शक्य असल्यास सायकल बदल,एक चांगली सुटसुटीत हलकी चांगल्या क्वालिटी ची सायकल घे. तुझे बरेच श्रम कमी होतील.
२. चांगले panniar घे. सॅक चा लळा लॉंबा ठेऊ नको. या दोन गोष्टींनी तुझा सायकलिंग चा अनुभव अजून आनंददायी होईल

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!

@ आशूचँप, हो! खरं आहे. बघू कसं जमतंय. Happy

@ हर्पेन (सर/ जी) !! Happy