लेख - “वेळा अमावास्या” सण

Submitted by भागवत on 17 December, 2017 - 21:46

सण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. भारतीय शेतकऱ्याची शेतीशी नाळ जोडलेली आहे. शेतकरी विविध सण साजरे करून निसर्गाशी आपले नाते दृढ करत असतो. या सणाला रब्बीची पार्श्वभूमी आहे. या दिवसात रब्बीचा हंगाम जोरात असतो. मराठवाडाच्या भूमीत अनेक सण, परंपरा, चाली रीती साजऱ्या केल्या जातात. सणाची नावे जरी वेगवेगळी असली तरी त्यात कुटुंबा सोबत साजरा करण्याची वेगळीच मज्जा आहे.

त्यामधीलच एक “येळवस” हा सण आहे. हा सण मार्गशीर्ष महिन्याच्या “दर्शवेळा अमावास्या” साजरा केला जातो. साधारण हा सण डिसेंबराच्या दुसर्‍या पंधरवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात येतो. “दर्शवेळा अमावास्या” मुळे ग्रामीण भागात याला “वेळा अमावस्या”, “येळ अमावस्या” असे म्हटले जाते. प्रामुख्याने हा सण मराठवाडा भागातील लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि आजूबाजूचा कर्नाटक लगत सीमावर्ती भागात उत्साहात फार पूर्वी पासून साजरा केला जातो. मा‍झ्या मते हा सण अन्नदाती भूमातेची (काळ्या आईची) पूजा करण्यासाठी केला जातो.

दसरा, दिवाळी नंतर हा माझा तिसरा सर्वात आवडता सण आहे. “येळवसच्या” दिवशी लहानपणी मी बैलगाडीतून जात असे. बैलगाडीतून जाण्या सारखी मज्जा कुठेच नाही. सोबत मौज मस्ती आणि सगळी घरातील सगळी असत. आम्ही शेतात मोकळ्या जागेत ५-७ कडब्याच्या पेंड्या गोळा करत असू. एका मोठ्या झाडाखाली पेंड्याना खोप केल्यासारखे ३ बाजूने मांडावे. खोपेचा आकार गोल करावा आणि उभी करावी. खोपेची समोरची बाजू मोकळी सोडावी. खोपेला छान शाल पांघरावी. सगळ्यांनी मिळून ५ लक्ष्म्या बनवाव्यात. लक्ष्मीला फक्त खाली मातीवर कसे ठेवणार मग त्याच्या साठी लहान मातीचा छोटा ओटा करावा. लक्ष्मीच्या बाजूला फळ म्हणून ताजी बोर, घाटे, ऊस ठेवावा. मनोभावे पूजा करून लक्ष्मीला ब्लाऊज पीसने ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. परंपरा म्हणून खोपेला ५ फेऱ्या मारतात आणि “वलग्या वलग्या सालम पलग्या” असे म्हटले जाते. हा कन्नड वाक्य आहे. कन्नडात “वलगे वलगे सालम पलगे" असा उच्चार होतो. त्याचा अचुक अर्थ "वांग्याची भाजी आणि पोळी तुम्हाला(लक्ष्मीला) अर्पण करतो. तुम्ही आम्हा वर अनुग्रह करा." असा होतो.

ज्यांच्या घरी शेत आहे ते तर उत्साहाने ही परंपरा साजरी करतात. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना जरूर बोलावतात. दुपार नंतर गावात तर उस्फुर्त बंद सारखे वातावरण असते. या सणाला शासकिय सुट्टी नसते पण व्यापारी प्रतिष्ठान, शाळा आणि व्यवहार हे दुपारी मंदावतात. सगळ्यांची एकच ओढ आणि लगबग असते शेतात जाऊन येळवस साजरी करण्यासाठी.

शेतात पूजा आणि सण साजरा करून झाल्यावर भोजनाची वेळ होते. भोजनासाठी काही विशेष मेनू नसणे हा तर अन्याय आहे. या सणाची खासियत तर विशेष पक्वान्नात आहे. या सणासाठी विशेष पदार्थ भज्जी आणि आंबील तयार करतात. काय म्हणता काय विशेष असते या भज्जीत? सगळेच विशेष असते या भज्जीत. भज्जी मध्ये हरभरे, वाटाणे, तूर, शेंगदाणे, वरण्याच्या शेंगा, गाजर, मेथी, हिरवी चिंच, हरभरा डाळ, गूळ, कोथिंबीर, लसणाची फोडणी(चवी नुसार) एवढा जिन्नस असतो. मी तर म्हणेन याला पिटल्याचा महाराजा म्हणेन. त्या सोबत आंबील म्हणजे झोपेची हमखास हमी. आंबील मध्ये ज्वारीचे पीठ दह्यामध्ये(ताका मध्ये) घट्ट शिजवायचे. त्यात जिरे, मोहरी, अद्रक, कोथिंबीर, तिखट, मीठ घालून तयार झाली आंबील. आंबील म्हणजे ताकाची राणी. आंबील जास्त प्रमाणात घेतली तर गुंगी आलीच म्हणा. मोकळे आकाश, जमिनीचा ऊबदारपणा आणि बसण्यासाठी चटई, जेवणा मध्ये भाकर, आंबील, भज्जी, भज्जी वर कडवलेले तेल, खीर, गोड भात, गुळ पोळी, धपाठ्या सोबत कांदा, मुळा, गाजर, बोर, मिरचीचा ठेचा, लोणचं आणि बरेच काही असा बेत असतो. आणखी काय पाहिजे सर्वांग सुंदर भोजनासाठी.

अलीकडे गाव तळे नंतर आमचे मुख्य शेत, बाजूला आंब्याचे वावर आणि मुख्य आणि आंब्याच्या वावरा मधून वाहणारी लहान नदी. मग काय आम्ही खेळण्यासाठी शेत भर भटकत असू आणि त्यात कोणी तरी झोका बांधून धम्माल करत असू. मग कोणी बोर, घाटे देत असे. मोठी माणसे दुपारची वाम कुशी घेत आणि आई मंडळी नवीन आलेली तूर निवडण्यासाठी घेतात. हा सण प्रत्येकाला काही ना काही देतो. मला आठवण, मोठ्यांना आनंद, लहानांना मज्जा मस्ती, कोणाला निसर्गा हितगुज करण्याची संधी आणि शेतकर्‍याला भूमातेची कृतज्ञता आणि बरेच काही देऊन संध्याकाळी घरी पोहचल्यावर संपतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सन् एकूण होतो.. पण भज्जी आणि आम्बिल ची रेसिपी माहीत नव्हती.. सूंदर आहे.. म्हणजे रेसिपी अशी आहे तर खायला नक्कीच चविष्ट असेल.

प्रतिसादासाठी धन्यवाद अँड. हरिदास!!!
भज्जी आणि आंबील अतिशय सुंदर आणि चविष्ट पदार्थ आहेत ख्याण्यासाठी....

कालच हे पाहिलं टिव्हीवर.. लातुर कडच्या भागातलं दाखवत होते.. छान वाटलं सगळं पाहुन .. मुख्य म्हणजे ते हुर्डा भाजत होते अन मग गरम गरम हातावरच मळुन खायला देत होते.. छान आहे गावाकड्ल्या रितीभाती अन हे सण. Happy

खूप छान वर्णन.

“वलग्या वलग्या सालम पलग्या" चा अर्थ काय?

प्रतिसादासाठी धन्यवाद सुमुक्ता !!!
“वलग्या वलग्या सालम पलग्या" हा कन्नडा शब्द आहे त्यामुळे अचूक अर्थ माहित नाही.
कन्नडात “वलगे वलगे सालम पलगे" असा उच्चार होतो.

@सुमुक्ता “वलग्या वलग्या सालम पलग्या" हा कन्नडा शब्द आहे त्याचा अचुक अर्थ "वांग्याची भाजी आणि पोळी तुम्हाला(लक्ष्मीला) अर्पण करतो. तुम्ही आम्हा वर अनुग्रह करा." असा होतो.

वाह सुंदर वर्णन. काल परवाच abp माझा वर वेळा अमावस्या आणि तुम्ही वर्णन केलेलं सर्व दाखवलं. शेत, लक्ष्मीपुजा, सर्व स्वयंपाक, पंक्ती सर्व त्याबरोबर माहीती सांगितली. मस्त वाटलं बघायला आणि हे वाचायलाही.