नकारात्मक प्रतिसादांना सामोरे जाताना ......

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 December, 2017 - 14:29

कोणे एके-47 काळी मी "अखिल मायबोली धागाकर्ता मंडळ" काढायचा प्रस्ताव मांडला होता. ही त्याची लिंक - https://www.maayboli.com/node/56708

ते आले की नाही, का बारगळले, की त्यावर गुप्त पद्धतीने काम चालू आहे, हा वेगळा मुद्दा झाला.
पण मधल्या काळात मायबोलीवरील एखाद्या धाग्यावर येणारे नकारात्मक वा प्रतिकूल प्रतिसाद आणि त्यामुळे लेखकांचे होणारे हिरमोड वगैरे पाहून मला त्या अनधिकृत धागाकर्ता मंडळाचा स्वयंघोषित संस्थापक म्हणून प्रतिकूल प्रतिसादांशी डील कसे करावे यावर चार शब्द मांडावेसे वाटतात. ज्याचा फायदा सर्वच धागाकर्त्यांना होईल. माझे काही चुकत असेल तर सुधारणा जरूर करा. धाग्यांवर प्रतिसाद देणारेही आपला दृष्टीकोन मांडू शकता, मिळून चर्चा करूया. माझे खालचे मुद्दे धागाकर्त्याच्या नजरेतून धागाकर्त्यांसाठी लिहिले आहेत.

तर.........
जेव्हा आपल्या एखाद्या न जमलेल्या लेखावर तो न आवडल्याचे प्रतिसाद येतात तेव्हा ते ढोबळमानाने ५ प्रकारचे असतात... हितचिंतक, तटस्थ, जगावेगळे, कळकळ, मळमळ.!

१) हितचिंतक - ज्यांना धागाकर्त्याचे ईतर लिखाण आवडत असते ते हितचिंतक बनून त्यांना न आवडलेले, न पटलेले सांगतात आणि लेखातील खटकणार्‍या बाबी धागाकर्त्याच्या निदर्शनास आणून देतात. आपल्या लेखात काय फसले आहे याचे लेखकाने आत्मपरीक्षण करून पुढच्यावेळी चांगलेच लिहावे असा त्यांचा चांगलाच हेतू असतो.

२) तटस्थ - हे लोकं चांगल्याला चांगले बोलतात आणि वाईटाला वाईट. यांचा हेतू चांगला-वाईट असा काही नसतो. धागाकर्ता यांच्या आवडीचा-नावडीचा असा कोणी नसतो. यांना बस रोखठोकपणे आपले प्रामाणिक मत मांडायचे असते. यांनी केलेली टिका कधी सौम्य भाषेतही असू शकते, तर कधी हार्श भाषेतही असू शकते, कारण आपले प्रामाणिक मत मांडताना हे नेहमीच समोरच्याच्या भावनांचा विचार करतीलच असे नाही. पण हेतूपूर्वक समोरच्याला दुखावणे वा बॅश करणे असले प्रकार हे करत नाहीत.

३) जगावेगळे - यांना मुद्दामच जगावेगळे मत मांडायची खोड असते. दहा लोकं एखाद्या गोष्टीला चांगले म्हणत आहेत हे बघून हे उगाचच खुसपट काढणार. किंवा सारेच तुमच्या लेखातील एखाद्या मुद्द्याला अनुमोदन देत असताना हे हिरो (पण तुमच्यासाठी व्हिलन) बनत त्या विरोधात तावातावाने भांडणार. अमुकतमुक लेखकाचे अमुकतमुक प्रकारचे लेखन हे सर्वांना आवडते तर ते कसे सो कॉल्ड मास दर्जाचे आहे आणि आपला क्लास वेगळाच असल्याने आपल्याला ते आवडत नाही हे त्यांच्याच धाग्यावर आवर्जून सांगणार.

४) कळकळ - तुमच्या लिखाणातील विषय एखाद्यासाठी संवेदनशील असू शकतो, एखाद्याची ती दुखरी नस असू शकते, आणि त्यावर तुम्ही त्यावर मांडलेला विचार हा त्यांच्या मताच्या विरुद्ध असू शकतो. त्यामुळे अचानकच ते (बरेचदा स्वत:च्याही नकळत) तुमच्यावर तुटून पडू शकतात.

५) मळमळ - हे लोकं संधी शोधत असतात. हे एखाद्यावर वैयक्तिक आकसातून डूख धरून असतात, किंवा कुठे आधीचा स्कोअर सेटल करायचा असतो. तर कुठे एखाद्याला मिळणारे कौतुक यांना सलत असते किंवा आणखी अशी बरीच कारणे असतात जी त्यांनाच ठाऊक असतात. यांचा "टारगेट" लेखक चांगले लिहित असताना हे पृथ्वीतलावरून गायब असतात. पण त्याचा एखादा लेख फसताच हे लोकं समुद्री शेवाळासारखे उगवतात. आणि तुमची घसरण होत अजून अध:पतन होईल हे बघतात.

आता ईथे एक लक्षात घ्यायला हवे, एकच व्यक्ती एका लेखकासाठी टाईप १ प्रतिसादक असेल तर दुसर्‍यासाठी टाईप २ तर आणखी कोणासाठी टाईप ४ ही असू शकते. एखादा प्रतिसादक सर्वांसाठीच टाईप १ चाच वा टाईप २ चाच वा, टाईप ३, ४, ५ चाच असेल असे गरजेचे नाही. बहुतांशवेळा तसे नसतेच. त्यामुळे लेखकाने आपल्या धाग्यावर येणारे प्रतिसाद कोणत्या टाईप्सचे आहेत आणि तो प्रतिसादक आपल्यासाठी कोणत्या टाईप्समध्ये मोडतो, हे त्या प्रतिसादांचा पॅटर्न बघून आपले आपण ठरवावे.

तर, आता या प्रतिसादांना कसे घ्यावे..

टाईप १ - हितचिंतक प्रतिसाद - हे त्या लोकांकडून आलेले असतात ज्यांचे चांगलेचुंगले प्रतिसाद मिळवण्यासाठी तुम्हाला मायबोलीवर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. अश्या हितचिंतकांच्या मताची कदर करून पुढचा त्यांच्या आवडीचा चांगला लेख लिहायचे लवकरात लवकर मनावर घ्यावे. तुमचा पुढचा जमलेला लेख हाच त्यांचा आनंद असतो. त्यांना तो लवकरात लवकर मिळेल हे बघावे Happy

टाईप २ तटस्थ - या प्रामाणिक प्रतिसादांना गुरुस्थानी मानावे. त्यांचा आदर करून आपल्या लेखाचे आत्मपरीक्षण करावे. जर त्या टिकेत तथ्य आढळले तर त्यातून शिकून चुका सुधाराव्यात. तथ्य न आढळल्यास ओके बोलून पुढे जावे.
काही वेळा हे प्रतिसाद हार्श भाषेत येतात असे मी वर म्हणालो आहे. तर अश्यावेळी संयम राखावा. जेवढ्या रोखठोकपणे त्यांनी तुमच्या फसलेल्या लेखावर प्रतिसाद दिला असतो, तेवढेच कौतुकाने त्यांनी तुमच्या चांगल्या लेखालाही कधी चांगले म्हटलेले असते. ते आठवावे. न आठवल्यास पुढे जाऊन चांगले कसे म्हणतील हे बघावे. जसे क्रिकेटमध्ये म्हणतात ना, गोलंदाजाशी वाद न घालता त्याला आपल्या बॅटने उत्तर द्यावे तसे ईथे आपल्या लेखणीने उत्तर द्यावे. फक्त ते टिकाकार आपले प्रतिस्पर्धी वा विरोधक असल्याची भावना मनात असू नये. कारण चाहत्यांपेक्षा अश्या लोकांनी केलेले कौतुक आपल्याला जास्त आनंद देऊन जाते हे हुमायुन नेचर आहे Happy

टाईप ३ जगावेगळे - यांचा वापर करावा आणि आपल्या धाग्याचा टीआरपी वाढवावा Happy

टाईप ४ कळकळ - या प्रतिसादांमागील भावना समजून घ्याव्यात. त्यांचे मत न पटल्यास वाद जरूर घालावा. पण तो या धाग्यावरून त्या धाग्यावर घेऊन जाऊ नये. डोक्यात घालून घरी तर मुळीच नेऊ नये.

टाईप ५ मळमळ - जर या स्वत:च्याच आयुष्याला वैतागलेल्या प्रतिसादांचा आनंद लुटणे, त्यांना एंजॉय करणे जमले, तर क्या बात! क्या बात !! क्या बात !!!
पण न जमल्यास यांना ओळखून ईग्नोर मारायला जमायलाच हवे. तुमची होणारी चीडचीड हाच यांचा आनंद असतो. त्यांना तो कधीच मिळू नये हे नेहमी बघावे Happy

ईथे एक विशेष सूचना - जेव्हा आपल्याला चोहीबाजूने कौतुकाची सवय लागलेली असते तेव्हा एखादा नकारात्मक प्रतिसाद पाहता हा टाईप ५ मळमळच असणार मेला, असा निष्कर्श आपले मन सहज काढते. एखाद्यावर पटकन असा शिक्का मारून स्वत:चेच मन कलुषित करू नये.

जाताजाता, आपले लिखाण हे लेखक म्हणूनच नव्हे तर वाचक म्हणूनही सर्वप्रथम आपल्यालाच आनंद मिळवून देईल हे बघावे. लेख लिहून झाल्यावर एकदा तो वाचून बघावा. जर तो वाचताना आपल्याला आनंद आला, तर मात्र येणार्‍या प्रतिसादांची काही एक चिंता न करता बिनधास्त प्रकाशित करावा. जसा मी हा केला Happy

अखिल मायबोली धागाकर्ता मंडळाचा एक सामान्य सभासद / युवा कार्यकर्ता
आपलाच,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कुठल्या गटात येते ते तपासुन बघते. तुला कळलं असेल तर सांग मला. Happy
Submitted by सस्मित on 18 December, 2017 - 11:09
>>>
सस्मित तुम्ही माझ्यासाठी हितचिंतक गटात आहात Happy ईतर कोणासाठी तटस्थ गटात असाल. मुळात पाचव्याचा (आणि वेमांनी सागितलेल्या टाईपसचा) अपवाद वगळता ईतर कोणते टाईप्स वाईट नाहीयेतच. पाचव्या टाईप्सचे प्रतिसादक देखील बरेचदा केवळ एखाद्या ठराविक व्यक्तीसाठीच वाईट असू शकतात. ते टाळायला हवे. पण ईतरांसाठी ते चांगले असू शकतातच..

त्यामुळे बेसिकली हे कोण्या प्रतिसादकाला चांगले वाईट ठरवायला लिहिले नसून नकारात्मक प्रतिसादांना धागाकर्त्याने कसो सामोरे जावे याचसाठी लिहिले आहे.

असो, प्रतिसादात कौतुक झाले की मी संकोचून गायबतो म्हणून आपल्या पोस्टला हे लेट उत्तर Happy

छान लेख आणि उत्तम अनालिसिस, इमोशनल इंटेलिजन्स १०१
मायबोलीवरच नव्हे तर रोजच्या जीवनात सुद्धा या पद्धतीचा अवलंब सर्वानी जरूर करावा.

मायबोलीवर प्रवेशाचा फॉर्म भरणार्‍या एका टीन एजरचे त्याच्या अनुभवी दादाशी झालेले संभाषण आमच्या गुप्त व्हिडीओ कॅमे-याने टिपले आहे.

दादाच्या चेहर्‍यावर काळजीचे भाव दिसताहेत. टीन एजर बेफिकीर आहे अजूनही. त्याला हे प्रकरण इतर साईट्सप्रमाणेच साधे वाटतेय.

" टीए बेटा,माझं ऐक, तू या भानगडीत पडूच नकोस "
" अरे दादा , पण मी मोठा झालोय. का घाबरतोस एव्हढा ?"
" ते तसं शब्दात नाही सांगता येणार "
" अरे हे बघ मी घेतले पण सदस्यत्व. हा पहा माझा आयडी. पाच दिवस झालेत "

यानंतरचे तीन दिवसांनतरचे रेकॉर्डिंग मधले फुटेज
" काय रे काय झाले ?"
" दादा , माझी टिंगल करतात काही जण "
" कोण आहेत ?"
" कळत नाही. कोल्हा, लांडगा, तरस आणि भोकर असे आयडीज घेतलेत. साळींदर १३ असा ही एक आयडी आहे "
" तुला सांगितलेलं ना ?"
" अरे पण दादा, हे कसले आयडीज ? इथे मी नाव , गाव सगळं व्यवस्थित दिलंय. काहींना फोन नंबर सुद्धा दिलाय. आणि हे बिननावाचे प्राणी कोण आहेत ?"
" गेल्या काही दिवसात कुणाशी खटके उडाले होते का ?"
" नाही "
" अरे आठवून पहा. डिबेट मधे ?"
" ओह ! ते एका वादात चुकीची बाजू लिंका देऊन दाखवली होती "
" चुकलास ना ?"
" नाही दादा. बरोबर होतं. मी कन्फर्म पण केलेलं आमच्या सरांबरोबर बोलून "
" अरे आपला मुद्दा बरोबर आहे कि नाही याच्याबद्दल नाही चाललेलं. बरोबर मुद्दा सुद्धा आपल्या आयडीने लिहीण्याची चूक केलीस त्याबद्दल चालले आहे. "
" म्हणजे ? फेक आयडीने लिहायचे ? "
" हो "
" पण का ?"
" अनुभवाने कळते. पण तोपर्यंत आपला मूळ आयडी गेलेला असतो. इथे नशीब समज तुला वेळीच सावध करतोय "

सायंकाळचे फुटेज
" दादा, एक सांग "
" काय ?"
" काय वाचताय वर मी स्वीट ड्रीम्स या पुस्तकाचे नाव लिहीले तर माझी खिचाई करताहेत लोक "
" अरे ते एका पॉर्न अ‍ॅक्ट्रेसचे आत्मचरित्र ना ? ते कशाला सांगायचेस ?"
" पण दादा, त्यात काय चुकीचे आहे ? जे वाचतोय तेच सांगितलेय ना ?"
" वेडाच आहेस. अरे एखाद्या गंभीर विषयावरचे पुस्तक असेल ते वाचतोय असे लिहायचे. उच्च आवड दिसायला पाहीजे. "
" पण वाचत नसताना ?"
" हो "
" म्हणजे सगळे असेच करतात ?"
" सगळे नाहीत रे. थोडे लोक खरेच वाचतात. बाकीचे त्यांना फॉलो करत असतात. असेच एकाने प्रामाणिकपणे ईब्लिस, ठकठक, पैंजण, चंपक, चांदोबा, डेबोन्यार, फँटसी, चॅस्टिटी, मध्यरात्रीची मुंबई, हैदोस असे लिहीले होते. त्याची इमेजच नंतर अशी झाली कि अनुल्लेख या शस्त्राचा तो शिकार झाला "
" बाप्रे ! म्हणजे इथले लोक या वाटेला पण जात नाहीत ?"
" असा रे कसा वेडा तू ? अरे वाचायचं हेच . पण लिहीताना एखाद्या महान लेखकाचे गाजलेले पुस्तक ठोकून द्यायचे. जे सराईत असतात ते आजच लायब्ररीतून आणले असे म्हणतात. म्हणजे कुणी पुस्तकात काय आहे असे विचारू शकत नाहीत "
" अरे बाप्रे ! म्हणजे असे विचारतावि?"
" हो तर ! म्हणतात ना , चोराच्या वाटा चोराला ठाऊक "

क्रमशः
"

विश्लेषण आवडले.
मी त-ट-स्थ आणि तटस्थ गटाचेच वर्णन मला जास्त आवडले.

छान लेख.
मला पण मी तटस्थ समजतो. पण जगातले यच्चयावत लोक स्वतःला तेच समजत असतील, सो माझ्या तटस्थतेला मी फार सिरियसली घेत नाही. स्वार्थी आणि भंपक मात्र मी नक्की आहे. Proud

चांगला लेख आहे.

यातील तटस्थ कॅटेगरी च्या वर्णनाशी मी सहमत नाही. तटस्थ म्हणजे एकतर स्वत:चे असे काहीच मत नसलेले, किंवा ते व्यक्त न करता बाजूने फक्त चर्चा बघणारे. चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट हे "वस्तुनिष्ठपणे" म्हणणारे तटस्थ नव्हेत. त्यांना स्वतःचा ओपिनियन आहे. पण तो कोणत्या पक्षाला, विचारसरणीशी बांधलेला नाही.

मी या उच्च गटातला आहे हे आडून आडून सांगायचा हा प्रयत्न आहे हे साफ खोटे आहे Wink

धन्यवाद सर्व नवीन प्रतिसादांचे.
शांत माणूस, पुन्हा एकदा धन्यवाद. माझा धागा वर आणलात. वाचायला बरे वाटले. उजळणी झाली Happy

@ फारएण्ड
तटस्थ म्हणजे एकतर स्वत:चे असे काहीच मत नसलेले, किंवा ते व्यक्त न करता बाजूने फक्त चर्चा बघणारे.
>>
हि व्याख्याही योग्य आहे. पण मग असे लोकं या धाग्याशी संबंधितच नाहीत. ना देंगे वो प्रतिसाद, ना जाना पडेगा उनको सामोरे Happy
त्यामुळे ईथे तटस्थ म्हणजे धागाकर्ता कोण आहे याच्याशी काही घेणेदेणे नसलेले ईतकेच साधारण अभिप्रेत होते.

शांत माणूस, पुन्हा एकदा धन्यवाद. माझा धागा वर आणलात. >>> मायबोली असा सर्च दिला होता तेव्हां हे सापडले. मला जे लिहायचे होते त्यासाठी वेगळा धागा नको होता. या धाग्यावर लिहीले तर ते अवांतर नसेल म्हणून लिहीले. त्या वेळी लेखकाचे नावही माहिती नव्हते.

Pages