नकारात्मक प्रतिसादांना सामोरे जाताना ......

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 December, 2017 - 14:29

कोणे एके-47 काळी मी "अखिल मायबोली धागाकर्ता मंडळ" काढायचा प्रस्ताव मांडला होता. ही त्याची लिंक - https://www.maayboli.com/node/56708

ते आले की नाही, का बारगळले, की त्यावर गुप्त पद्धतीने काम चालू आहे, हा वेगळा मुद्दा झाला.
पण मधल्या काळात मायबोलीवरील एखाद्या धाग्यावर येणारे नकारात्मक वा प्रतिकूल प्रतिसाद आणि त्यामुळे लेखकांचे होणारे हिरमोड वगैरे पाहून मला त्या अनधिकृत धागाकर्ता मंडळाचा स्वयंघोषित संस्थापक म्हणून प्रतिकूल प्रतिसादांशी डील कसे करावे यावर चार शब्द मांडावेसे वाटतात. ज्याचा फायदा सर्वच धागाकर्त्यांना होईल. माझे काही चुकत असेल तर सुधारणा जरूर करा. धाग्यांवर प्रतिसाद देणारेही आपला दृष्टीकोन मांडू शकता, मिळून चर्चा करूया. माझे खालचे मुद्दे धागाकर्त्याच्या नजरेतून धागाकर्त्यांसाठी लिहिले आहेत.

तर.........
जेव्हा आपल्या एखाद्या न जमलेल्या लेखावर तो न आवडल्याचे प्रतिसाद येतात तेव्हा ते ढोबळमानाने ५ प्रकारचे असतात... हितचिंतक, तटस्थ, जगावेगळे, कळकळ, मळमळ.!

१) हितचिंतक - ज्यांना धागाकर्त्याचे ईतर लिखाण आवडत असते ते हितचिंतक बनून त्यांना न आवडलेले, न पटलेले सांगतात आणि लेखातील खटकणार्‍या बाबी धागाकर्त्याच्या निदर्शनास आणून देतात. आपल्या लेखात काय फसले आहे याचे लेखकाने आत्मपरीक्षण करून पुढच्यावेळी चांगलेच लिहावे असा त्यांचा चांगलाच हेतू असतो.

२) तटस्थ - हे लोकं चांगल्याला चांगले बोलतात आणि वाईटाला वाईट. यांचा हेतू चांगला-वाईट असा काही नसतो. धागाकर्ता यांच्या आवडीचा-नावडीचा असा कोणी नसतो. यांना बस रोखठोकपणे आपले प्रामाणिक मत मांडायचे असते. यांनी केलेली टिका कधी सौम्य भाषेतही असू शकते, तर कधी हार्श भाषेतही असू शकते, कारण आपले प्रामाणिक मत मांडताना हे नेहमीच समोरच्याच्या भावनांचा विचार करतीलच असे नाही. पण हेतूपूर्वक समोरच्याला दुखावणे वा बॅश करणे असले प्रकार हे करत नाहीत.

३) जगावेगळे - यांना मुद्दामच जगावेगळे मत मांडायची खोड असते. दहा लोकं एखाद्या गोष्टीला चांगले म्हणत आहेत हे बघून हे उगाचच खुसपट काढणार. किंवा सारेच तुमच्या लेखातील एखाद्या मुद्द्याला अनुमोदन देत असताना हे हिरो (पण तुमच्यासाठी व्हिलन) बनत त्या विरोधात तावातावाने भांडणार. अमुकतमुक लेखकाचे अमुकतमुक प्रकारचे लेखन हे सर्वांना आवडते तर ते कसे सो कॉल्ड मास दर्जाचे आहे आणि आपला क्लास वेगळाच असल्याने आपल्याला ते आवडत नाही हे त्यांच्याच धाग्यावर आवर्जून सांगणार.

४) कळकळ - तुमच्या लिखाणातील विषय एखाद्यासाठी संवेदनशील असू शकतो, एखाद्याची ती दुखरी नस असू शकते, आणि त्यावर तुम्ही त्यावर मांडलेला विचार हा त्यांच्या मताच्या विरुद्ध असू शकतो. त्यामुळे अचानकच ते (बरेचदा स्वत:च्याही नकळत) तुमच्यावर तुटून पडू शकतात.

५) मळमळ - हे लोकं संधी शोधत असतात. हे एखाद्यावर वैयक्तिक आकसातून डूख धरून असतात, किंवा कुठे आधीचा स्कोअर सेटल करायचा असतो. तर कुठे एखाद्याला मिळणारे कौतुक यांना सलत असते किंवा आणखी अशी बरीच कारणे असतात जी त्यांनाच ठाऊक असतात. यांचा "टारगेट" लेखक चांगले लिहित असताना हे पृथ्वीतलावरून गायब असतात. पण त्याचा एखादा लेख फसताच हे लोकं समुद्री शेवाळासारखे उगवतात. आणि तुमची घसरण होत अजून अध:पतन होईल हे बघतात.

आता ईथे एक लक्षात घ्यायला हवे, एकच व्यक्ती एका लेखकासाठी टाईप १ प्रतिसादक असेल तर दुसर्‍यासाठी टाईप २ तर आणखी कोणासाठी टाईप ४ ही असू शकते. एखादा प्रतिसादक सर्वांसाठीच टाईप १ चाच वा टाईप २ चाच वा, टाईप ३, ४, ५ चाच असेल असे गरजेचे नाही. बहुतांशवेळा तसे नसतेच. त्यामुळे लेखकाने आपल्या धाग्यावर येणारे प्रतिसाद कोणत्या टाईप्सचे आहेत आणि तो प्रतिसादक आपल्यासाठी कोणत्या टाईप्समध्ये मोडतो, हे त्या प्रतिसादांचा पॅटर्न बघून आपले आपण ठरवावे.

तर, आता या प्रतिसादांना कसे घ्यावे..

टाईप १ - हितचिंतक प्रतिसाद - हे त्या लोकांकडून आलेले असतात ज्यांचे चांगलेचुंगले प्रतिसाद मिळवण्यासाठी तुम्हाला मायबोलीवर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. अश्या हितचिंतकांच्या मताची कदर करून पुढचा त्यांच्या आवडीचा चांगला लेख लिहायचे लवकरात लवकर मनावर घ्यावे. तुमचा पुढचा जमलेला लेख हाच त्यांचा आनंद असतो. त्यांना तो लवकरात लवकर मिळेल हे बघावे Happy

टाईप २ तटस्थ - या प्रामाणिक प्रतिसादांना गुरुस्थानी मानावे. त्यांचा आदर करून आपल्या लेखाचे आत्मपरीक्षण करावे. जर त्या टिकेत तथ्य आढळले तर त्यातून शिकून चुका सुधाराव्यात. तथ्य न आढळल्यास ओके बोलून पुढे जावे.
काही वेळा हे प्रतिसाद हार्श भाषेत येतात असे मी वर म्हणालो आहे. तर अश्यावेळी संयम राखावा. जेवढ्या रोखठोकपणे त्यांनी तुमच्या फसलेल्या लेखावर प्रतिसाद दिला असतो, तेवढेच कौतुकाने त्यांनी तुमच्या चांगल्या लेखालाही कधी चांगले म्हटलेले असते. ते आठवावे. न आठवल्यास पुढे जाऊन चांगले कसे म्हणतील हे बघावे. जसे क्रिकेटमध्ये म्हणतात ना, गोलंदाजाशी वाद न घालता त्याला आपल्या बॅटने उत्तर द्यावे तसे ईथे आपल्या लेखणीने उत्तर द्यावे. फक्त ते टिकाकार आपले प्रतिस्पर्धी वा विरोधक असल्याची भावना मनात असू नये. कारण चाहत्यांपेक्षा अश्या लोकांनी केलेले कौतुक आपल्याला जास्त आनंद देऊन जाते हे हुमायुन नेचर आहे Happy

टाईप ३ जगावेगळे - यांचा वापर करावा आणि आपल्या धाग्याचा टीआरपी वाढवावा Happy

टाईप ४ कळकळ - या प्रतिसादांमागील भावना समजून घ्याव्यात. त्यांचे मत न पटल्यास वाद जरूर घालावा. पण तो या धाग्यावरून त्या धाग्यावर घेऊन जाऊ नये. डोक्यात घालून घरी तर मुळीच नेऊ नये.

टाईप ५ मळमळ - जर या स्वत:च्याच आयुष्याला वैतागलेल्या प्रतिसादांचा आनंद लुटणे, त्यांना एंजॉय करणे जमले, तर क्या बात! क्या बात !! क्या बात !!!
पण न जमल्यास यांना ओळखून ईग्नोर मारायला जमायलाच हवे. तुमची होणारी चीडचीड हाच यांचा आनंद असतो. त्यांना तो कधीच मिळू नये हे नेहमी बघावे Happy

ईथे एक विशेष सूचना - जेव्हा आपल्याला चोहीबाजूने कौतुकाची सवय लागलेली असते तेव्हा एखादा नकारात्मक प्रतिसाद पाहता हा टाईप ५ मळमळच असणार मेला, असा निष्कर्श आपले मन सहज काढते. एखाद्यावर पटकन असा शिक्का मारून स्वत:चेच मन कलुषित करू नये.

जाताजाता, आपले लिखाण हे लेखक म्हणूनच नव्हे तर वाचक म्हणूनही सर्वप्रथम आपल्यालाच आनंद मिळवून देईल हे बघावे. लेख लिहून झाल्यावर एकदा तो वाचून बघावा. जर तो वाचताना आपल्याला आनंद आला, तर मात्र येणार्‍या प्रतिसादांची काही एक चिंता न करता बिनधास्त प्रकाशित करावा. जसा मी हा केला Happy

अखिल मायबोली धागाकर्ता मंडळाचा एक सामान्य सभासद / युवा कार्यकर्ता
आपलाच,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलं आहेस. तुझ्या नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जाण्याच्या कलेवरच इथले अनेकजण फिदा आहेत. अर्थात तू डूआयडी घेतला असलास तरी लोक अक्कल काढायला लागले की चवताळून प्रतिसाद द्यायचा मोह होऊ शकतो जो तू अगदी खेळकरपणे टाळतोस. तुझ्याकडून हे खरंच शिकण्यासारखं आहे.

तुमच्याकडून खुप काही शिकतोय आम्ही

माबोच हे तत्वज्ञान आवडंल आपल्याला किंबहुना तुमच्यामुळेच इथे टीकून लिहतोय....

बरं आजकाल काय खाताय ?

लई भारी भारी ईषयावर बोलू राहीले टाईपू राहीले तुम्ही..

मनीमोहोर, पियु धन्यवाद Happy

अजय चव्हाण, हो. हे लिहिताना सध्याच्या एका तात्कालिक घटनेसोबत आपलाही एक किस्सा डोक्यात घोळत होताच. आणि रिसेंट काळात घडलेले ईतरही एकदोन..
आपल्या केसमध्ये कमीअधिक प्रमाणात सर्व प्रकारचे प्रतिसादक धाग्यावर हजर होते. किंबहुना प्रकार ५ चा समाजकंटक एखादाच असतो. पण होते काय, जर प्रकार ४ चा प्रतिसादक ज्याच्यासाठी तो विषय संवेदनशील असेल तो तिथे आपल्याला विरोध करत असेल तर प्रकार ५ चा सभासद त्या प्रकार ४ ला चिथवून आणखी गोंधळ होईल हे बघतो. शक्य झाल्यास प्रकार २ आणि ३ ला देखील काडी लावतो. जर धागाकर्त्याला यातील फरक कळला नाही तर तो सर्वांनाच आपले शत्रू समजून सर्वांनाच एका प्रकारे प्रत्युत्तर द्यायला जातो आणि परीस्थिती आणखी बिघडवून ठेवतो, किंवा सर्वांचेच प्रतिसाद एकसारखेच मनाला लाऊन घेतो आणि दुखी होतो.
प्रत्येकाची आपापली कारणे असताना विरोधी प्रतिसाद द्यायची आणि ईथे कोणीही आपले हाडाचा वैरी नाहीये हे पहिले धागाकर्ता म्हणून आपणही समजून घेतले पाहिजे Happy

छान अनेलिसिस, मला वाटते हे सगळ्याच क्रिएटिव्ह क्षेत्रांनालागु पडते. जो व्यक्ती जितका प्रसिद्ध असतो, तेव्हडीच टिका होण्याचे चान्सेस जास्त. याच कारण लोकांना (ईथे वाचकांना) तुमच्याकडून जास्त अपेक्षा निर्माण झालेल्या असतात. पण हे सगळे समजून घेऊन आपण नित्य नवीन प्रयोग करत रहावे. केवळ लोकांना आवडते म्हणून तोचतोचपणा करू नये.

चांगले लिहिलेय.

एखादी चर्चा सुरू असताना प्रतिसाद देताना माझ्या हातून खूपदा टीकात्मक लिहिले जाते कारण पूर्ण विचार न करता प्रतिसाद दिलेला असतो. काही वेळ जाऊ दिल्यानंतर तो माझाच प्रतिसाद मला एकांगी व अनावश्यक टीका केल्यासारखा वाटतो.

म्हणून कुठलाही प्रतिसाद देताना, विशेषतः चर्चा सुरू असताना थोडा थोडा ब्रेक घेऊन , डोके थोडे थंड झाल्यावर प्रतिसाद दिलेला बरा हेमावैम.

छान लिहिलंय. एवढया वर्षांच्या अनुभवातून कमावलेले ज्ञान कोणतंही हातचं न राखता आपण वाटताय, हे खरोखरच आदरणीय आहे. आमच्यासारख्या नवलेखकांना वाट दाखवणारा आणि आधार देणारा हा लेख आहे.

ऋ भाऊ खरच छान आवडले . (टाईप २)
आजचे तुमचे लिखाण खरच संयमित आहे. सर्व बाजूंनी विचार करून लिहिले आहे. (टाईप ४)
पण तुमची एक गोष्ट खटकली नेहमीप्रमाणे आपलेच घोडे दामटवत स्वतःला संस्थापक अध्यक्ष करून टाकले (टाईप ५)
असेच लिहीत रहा पुलेशु (टाईप १)
असा वेगळा प्रतीसाद देऊन आता मला हा धागा हायजॅक करायचा आहे (टाईप ३)
Rofl

आपले लिखाण हे लेखक म्हणूनच नव्हे तर वाचक म्हणूनही सर्वप्रथम आपल्यालाच आनंद मिळवून देईल हे बघावे.<<<< हेच म्हणतो. किंबह्य्ना ह्यापुढेही जाऊन म्हणेन की आपले लेखन आपल्याला लेखक म्हणून कमी आवडायला हवे आणि वाचक म्हणून पुरेसे आवडायला हवे.

गेल्या काही महिन्यात हेही प्रतिसाद दिसू लागले आहेत. हे सहसा तुमचे लेखन मायबोलीवर लोकप्रिय होऊ लागले की दिसू लागतात. १ ते ५ प्रकारचे प्रतिसाद हे बहुतेक वेळा वैयक्तिक असतात (त्या त्या व्यक्तिने स्वतंत्रपणे केले असतात). पण ६ आणि ७ प्रकारचे प्रतिसाद संघटितपणे , प्लॅन करून केले जातात. जे लेखक लोकप्रिय नाही त्यांना सहसा याचा अनुभव येत नाही. काही लेखकांनी आम्हाला कळवल्यामुळे हे माहिती झाले आहेत.

टाईप ६ : तळतळ
यात काही प्रतिसाद , लेखक / लेखिकेची चिडचिड होईल असे मुद्दाम टाकले जातात. त्यानंतर त्याच संघटित ग्रूपमधल्या इतर एकदोन व्यक्ती ईमेल वर किंवा मायबोलीच्या बाहेर फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपवर संपर्क करून सहानुभूती व्यक्त करतात. मायबोली आता पूर्वीसारखी राहिली नाही, अमुक एका ग्रूपचे वर्चस्व झाले आहे, अ‍ॅडमीन /वेमा मुद्दाम दुर्लक्ष करतात तेंव्हा तुम्ही आता मायबोलीबाहेर अमुक वेबसाईटवर लिहायला लागा असे मागे लागतात.

टाईप ७ अ आणि ब : छनछन
७-अ: टाईप ६ प्रकारे सुरुवात पण नंतर तुम्ही अमुक साईट वर लिहिले तर तुम्हाला पैसे देऊ, किंवा पुस्तक काढू असे सांगितले जाते. सहसा त्यांना तुमच्या लेखन कौशल्यापेक्षा, नवीन लेखनापेक्षा, इथले लेखन काढून दुसरीकडे द्या अशी मागणी असते. नंतर पैसे वगैरे काही मिळत नाही. असे एक प्रकाशक दिवाळखोरी काढून गायब आहेत असे कळाले आहे.
७ बः टाईप ६ प्रकारे सुरुवात होऊ शकते. पण बर्‍याचदा जेनुईन असल्याने उगीच वाईट प्रतिसाद द्यायची यांना गरज नसते. त्यांना तुमच्या लेखनाची , चाहत्यांची किंमत असते आणि खरोखर पैसे देतातही. लेखक म्हणून तुमची किंमत त्याना पटली असल्यामुळे खास त्यांच्यासाठी नवीन लेखन केलेलं (जे आधी प्रसिध्द नाही) त्यांना जास्त हवं असतं.
इतर लेखकांना विचारून हे ७-अ नाही याची खात्री करून घ्या. आणि ते नक्की ७-ब असतील तर तुम्ही यापुढे कुठेही ऑनलाईन लिहण्याअगोदर काळजी घ्या ज्यामुळे तुमचे लेखन कुणी चोरून स्वतःच्या नावावर खपवणार नाही.

७-ब, खरतर या धाग्यावर (नकारात्मक प्रतिसादांना सामोरे जाताना ) योग्य नाही कारण हा एक सकारात्मक टप्पा आहे. तुमच्या लेखनाला कुणी पैसे देत असेल तर ते चांगलेच आहे. पण काही ७-अ प्रकारांमुळे काही मायबोलीकरांचे हात पोळले गेले आहेत म्हणून ७ अ आणि ७ ब मधला फरक डोळे उघडून लक्षात घ्या आणि खरोखर तुम्हाला तुमचा ठरलेला मोबदला मिळेल याची काळजी घ्या.

हे इथं लिहायचं कारण म्हणजे नकारात्मक प्रतिसाद हा वर दिलेल्या १ ते ५ कारणांमुळे नसून तुम्ही इथे लिहू नये यासाठी केलेला संघटीत प्रयत्न असू शकतो.

ऋ, हे तुझे मुद्दे पटले. मी जरी ५ वर्षांपूर्वी मायबोलीचं सदस्यत्व घेतलं होतं तरीही गेल्या दोनेक महिन्यांपूर्वी इथे नियमितपणे यायला सुरुवात केली. पण काही प्रतिसाद मात्र लिहायचे टाळले. आणि ऋ, तुझी प्रतिसादांना हाताळायची शैली पाहून गंमत वाटली, व नंतर हुरुप येऊन मी आता धाग्यांवर प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. या बाबतीत तुझे श्रेय मानले च पाहिजे मला.

आणखी एक. इतके दिवस मत होते की हा माणूस फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी धागे काढत सुटतो आणि जिथे तिथे प्रतिक्रिया (बर्याच वेळा अवांतर) देत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून तुझ्या लिखाणात एक परीपक्वता, समजुतदारपणा दिसत आहे. हा बदल सुखद आहे. आणि कारण जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

वेमा, जबरदस्त प्रतिसाद.रुन्मेष, या धाग्यावर बरेच उपयोगी विचार मंथन होऊ शकेल.प्रत्येक सिच्युएशन चा नवा धागा निर्मिती साठी वापर करण्याची तुमची वृत्ती आणि या धाग्यातून एक चांगले विचार मंथन होईल असे वळण देण्याची तुमची हातोटी स्तुत्य आहे. ☺️☺️

(पुढे लांबलचक प्रतिसाद अलर्ट☺️☺️)

असे अनुभव येतात.कधीकधी हे आय ओपनर पण असतात.प्रत्येक मंचाचा ऑडियन्स वेगळ्या पातळीचा, वेगळ्या भावनिक पानावरचा असतो हा मुख्य मुद्दा प्रतिसाद वाचून कळतो. .फेसबुकवर जे नियमित लिहितात त्यांचा रिच खूप वेगवेगळ्या कटेगरीतले लोक असतात.केअरिंग नातेवाईक, लॉंग लॉस्ट फ्रेंड्स, कलीग्स. तुम्ही लिहिता,व्यक्त होता हे त्यांना आवडते.जुना हरवलेला संपर्क, कम्युनिकेशन मिळाल्या सारखे वाटते.मुक्तपीठ वर भावनिक अनुभवांना जास्त मागणी असते.मराठी संकेतस्थळ खूप मुरलेल्या लोकांचे, वाचकांचे, अभ्यासकांचे, लेखकांचे व्यासपीठ असते.एखाद्या गोष्टीत रिडींग बिटवीन लाईन्स करणे हे ते खूप चांगल्या प्रकारे करतात.कधीकधी लेखक खूप लिहिता झाला की त्याच्या लिखाणातून त्याचे घरदार, त्याचे काम, त्याचा स्वभाव ओळखीचे होऊन नंतर नंतर लिखाणा ऐवजी लेखकच जास्त जज केला जातो.आणि बरेच लेखक या फेज ला नाउमेद होतात.तसे न होता निगेटिव्ह प्रतिसादातला पॉईंट घेऊन बाकी जंक सोडून देऊन मूव्ह ऑन करता आले पाहिजे(हे पूर्ण जमत नाही.मनात थोडा ग्रज राहतो.पण पुढच्या वेळी त्याच्या लिखाणा वर प्रतिसाद देताना मनातला ग्रजर दाबून 'मिस्टर तटस्थ' वर येऊ देणे गरजेचे असते.)

बरेच वर्षांपूर्वी 'गाथा माझ्या गझलेची' लिहिला होता.तेव्हा मी खरंच गझल लिहिण्याचा मनापासून प्रयत्न करत होते. त्या लेखाला बराच बरा प्रतिसाद होता.त्यानंतर मी अजून एक दोन विनोदी गझला केल्या.नंतर एकदा मला एका ज्येष्ठ स्नेहीनचा 'अगं आता बास कर की गझल.त्याच चक्रात अडकू नकोस.' असा फोन आला. ☺️☺️☺️☺️ 'गोपाळकाला' लिहिला होता तेव्हा एकांचा 'तुमचं तुम्ही वाचताय का काय लिहिताय ते?आधीचे लिखाण वाचा आणि हे वाचा किती दर्जात फरक आहे ते' असा संपर्क आला.मध्यंतरी एका चांगल्या लेखकाने आणि वाचकाने 'आयटी वरच जास्त लिहिलं जातंय' अश्या अर्थाचा फीडबॅक दिला.जनरली आपण सर्वाना एकावेळी आवडेल असं लिहू शकत नाही.तसं टेलर्ड लिहायला गेलो तर त्यातल्या भावना, आत्मा हरवतो.पण हे फीडबॅक आपल्याला विचार करायला नक्की लावतात.आपण कुठल्या तरी साच्यात अडकतोय का, मूळ लिखाण शैली कायम ठेवून थोडा अभ्यास आणि प्रयत्न वाढवून या साच्यातून बाहेर येऊ शकतो का याचा शोध घेता येतो.

वेमा, 7अ आणि 7ब मधला फरक ओळखण्या बद्दल काही गाईड लाईन्स देऊ शकाल का?एका मायबोलीशी आणि मराठी लिखाणाशी अजिबात संबंधित नसलेल्या 7अ चा अनुभव मागच्या वर्षी येऊन गेला आहे.

mi_anu , प्रतिसाद अतिशय उत्तम आणि तंतोतंत आहे. सर्वच पटले.

आंतरजालावरील लेखकांत मला जव्हेरगंज व अभ्या..(मिपावर) खूप आवडतात कारण ते अस्सल लेखक आहेत. (म्हणजे बाकीचे नकली आहेत असे नव्हे) अस्सल का तर ते दोघेही, 'लोक काय विचार करतील' याबद्दल अजिबात न विचार करता आपल्याला वाटेल ते आणि तसं लिहून मोकळे होतात. लोकप्रियतेचा विचार न करता आपली कलाकृती घडवणे ही खरी कला. अन्यथा याला आवडेल का त्याला कसे वाटेल अशा विचारांच्या चौकटीत राहून केलेला पॉप्युलिस्ट लिखाणाचा प्रयत्न कालांतराने बेगडी आणि प्राणहीन वाटू लागतो. कौतुक झाले तर ज्यासाठी कौतुक झाले तेच व तसेच परत लिहिण्याची उर्मी असेल तर हे कमर्शियल आर्ट झाले. म्हणजे लेखकाला स्वतःला हवे असलेले कौतुक मिळवण्यासाठी वाचकाला जे हवे ते देणे. तिथे लिहिणे मरते आणि लेखक फक्त जीवंत राहतो असे मला वाटते.

आंतरजालाची सुविधा अशी की इथे खरे नाव-गाव न लावता मनाला येतील त्या कथा लेख आपण लिहू शकतो. आणि तसेच करावे असे मला वाटते. प्रत्येक वाचकांत एक लेखक दडलाय, हजारो कथा-किश्शांचं एक चालतंफिरतं गाठोडं असतो प्रत्येक माणूस. पण ते कधीच लिहित नाहीत. त्यांनी टिका होईल म्हणून न घाबरता, लिहायला हवे आहे. ठोकळेबाज फॉर्मुला झालेल्या लेखनापेक्षा ह्या अशा अस्सल माणसांच्या अस्सल आयुष्यातल्या अस्सल कथा वाचायच्या आहेत.

साक्षात वेमांनी येऊन धाग्यावर सकारात्मक प्रतिसाद द्यावा याहून मोठे प्रशस्तिपत्रक कोणते असणार? वेमांच्या दृष्टीने तुम्ही 'दखलपात्र' आहात ही तुमची स्वकष्टार्जित कमाई आहे.
मलाही तुमचे निर्विष लिखाण आणि प्रतिसाद आवडतात. कमरेखालचा 'लो' चेंडूही व्यवस्थित तटवता तुम्ही. एल्बी डब्ल्यु न होता उलट चौकार षटकार मारता त्या चेंडूवर. कधी कधी 'टंग इन चीक' फुली फुली विनोद अवतरतोही, पण राग येण्याऐवजी उलट हसू येते इतका तो सूक्ष्म असतो.
मध्ये काही बाष्कळ लेख अवतरले होते आणि काहींनी तुम्हांला झोडपलेही होते. पण त्यातही तुम्ही कधी उद्धट उलट उत्तर, तिरमिरीने वा चिडीने लिहिले नाहीत.
लगे रहो.

मी अनू,
छान प्रतिसाद
आणि खालचा मुद्दा विशेष पटला
>>>>>
कधीकधी हे आय ओपनर पण असतात.प्रत्येक मंचाचा ऑडियन्स वेगळ्या पातळीचा, वेगळ्या भावनिक पानावरचा असतो हा मुख्य मुद्दा प्रतिसाद वाचून कळतो.
>>>>>
एकाच लेखाला दोन भिन्न संकेतस्थळावर दोन भिन्न प्रकारच्या प्रतिसादांचे अनुभव येऊ शकतात. मायबोलीचा वाचकवर्ग व्यापक आहे. पण तरीही प्रत्येक वाचकाला ईथे आपल्या आवडीचे लेखन जास्त प्रकाशित व्हावे असे वाटणे साहजिक आहे. सध्या ज्या नवीन सुविधा सुरू झाल्या आहेत त्यातून वाचक-लेखक सर्वांचाच फायदा होईल. आणि निदान हा चॉईसचा प्रश्न तरी काही प्रमाणात सुटेल अशी आशा.

ह्या लेखाची प्रेरणा कळत नव्हती, जस्ट आता समजली. तरी माझी वरची प्रतिक्रिया काकतालिय न्यायाने फिट बसते आहे असे वाटले!

@mi_anu
मी त्याबद्दल अधिक इथे लिहणे विषयांतर होईल. त्या पेक्षा मी काही लेखकांना त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्द्ल वेगळा लेख लिहावा अशी विनंती करतो. तुम्हीही तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल लिहा त्यातून इतरांना मदत होईल.

ऋन्म्या, चांगलं अनलाय्ज केलं आहेस आणि मांडणी हि क्रिस्प आहे. एमेन्सीच्या कार्पोरेट ऑफिसमध्ये गेलास तर खुप पुढे जाशील.

टाइप ५ -> ६ -> ७अ हि लॉजिकल प्रोग्रेशन असावी, उद्देश साध्य न झाल्यास सारासार विचार करायला न लावणारी. असे वर्च्युअल सोश्योपॅथ पाहिलेले आहेत...

साधनाताई, तुझा प्रतिसाद वाचून मला विशेष वाटलं कारण मला तू नेहमी टाईप 2मधली वाटत आलीयेस.
तुझे जवळपास सगळेच प्रतिसाद मला 90% बरोबरच वाटतात

चांगलं लिहिलं आहेस ऋ. तुझं निरीक्षण आणि गणन Happy चांगलं आहे.
आवडलं.
तुला कुठल्या लेखावरुन प्रेरणा मिळालीय हे लिहायला ते माहित आहे मला. Happy
मी कुठल्या गटात येते ते तपासुन बघते. तुला कळलं असेल तर सांग मला. Happy

छान लिहिलंय. ऋन्मेऽऽष यांचे धागे दर वेळी वाचतेच आणि ९९% वेळा त्यांचे लिखाण आवडते. फक्त प्रतीसाद दर वेळी देत नाही.

हा लेख खरोखरंच उत्तम आहे. सगळे मुद्दे पटले.

ऋन्मेऽऽष तुमच्या पेशंस च नेहमी कौतुक वाटतं.

मस्त लिहिले आहे ऋन्मेष. वेमा, मी_अनु, नानाकळा ह्यांच्या पोस्टी आवडल्या

आपल्याला लेखक म्हणून कमी आवडायला हवे आणि वाचक म्हणून पुरेसे आवडायला हवे. >>> अनुमोदन.

Pages