एक कागद

Submitted by गबाळ्या on 11 December, 2017 - 12:50

एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ।। धृ ।।

एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।

उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।

वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।

इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।

गगन ठेंगणे खुणवी तारे
मांजा परी तो रोखुनी धरे
दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।।

उंच उंच तो जातच राही
स्वानंदी मग तल्लीन होई
कासावीस ते बालक धावे, कैसे कळणे त्याला ।। ६ ।।

सोसाट्याचा सुटला वारा
कधीच मुकला परी आधारा
भरकटलेला गोंधळलेला, लटके बाभळीला ।। ७ ।।

धावत धावत बालक येई
अलगद त्यासी कवेत घेई
घाव पुसुनि तया मनीचे, सज्ज करी उडण्याला ।। ८ ।।

उंची कितीही गाठो कोणी
बाहुबली वा अगाध ज्ञानी
मातीशी या नाळ तोडुनी, सफल न कोणी झाला ।। ९ ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

भास्कराचार्य , दत्तात्रय साळुंके, अक्षय दुधाळ, धन्यवाद!!
प्रतिक्रियांबद्दल खुप आभारी आहे.

आपली कविता आवडली. वाचुन कवि अनिल आठल्ये यांच्या कवितेची ओळ आठवली--

कुणी सहज उचलुनी दगड फेकला व्योमी
दगडास वाटले उंच किती चढलो मी
परि अतर्क्य घडले बघतां बघतां वरती
त्या दगडा दिसली फिरुन धुळकट माती

मकरन्द वळे , धन्यवाद !
आणि अनिल आठल्ये च्या ओळींबद्दल धन्यवाद. सुंदर आहेत त्या.