वैद्यकीय 'मेवा'!

Submitted by अँड. हरिदास on 8 December, 2017 - 07:08

वैद्यकीय 'मेवा' !
डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे. वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही. नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले. रुग्नाची लुबाडणूकच नाही तर सामाजिक संकेत पायंदळी तुडवून अवैध गर्भपातासारखे कृत्य करण्यासही मग हि मंडळी मागे राहिली नाही. रुग्नांच्या सुविधेसाठी आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी केल्या जाऊ लागला.लिंगचाचणी स्त्री भ्रूणहत्या सारखे प्रकार समोर येऊ लागले. त्यामुळे कायद्यानेही या क्षेत्राकडे आपले डोळे वटारले. वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी विविध नियम कायदे बनविल्या गेले. मात्र मेव्याच्या लोभापुढे कायदेही खुजे पडत असल्याचे दिसत आहे. लोणार येथील अवैध गर्भपाताची घटना, तद्वातच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे उघडकीस आलेलं बेकायदेशीर गर्भपात केंद्र, या घटना वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

भ्रूणहत्या,अवैध गर्भपाताच्या समश्येचं एक आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा आणि सुरक्षित गर्भपात कायदा येऊन वीस वर्षांहून अधिक काळ गेला. मात्र त्याचा गैरवापर अजूनही थांबलेला नाही, हे वास्तव आहे. आठ दिवसापूर्वी लोणार तालुक्यात अवैध गर्भपातादरम्यान एका १५ वर्षीय मुलीचा मृत्य झाल्याची घटना समोर आली. या बातमीची शाली वाळते ना वाळते तोच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बेकायदेशीर गर्भापात केंद्र सूर असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. जिल्हा श्यल्य चिक्तिस्तकांनी या दवाखान्यावर छापा टाकला असता याठिकाणी राजरोसपणे गर्भापात केले जात असल्याचे समोर आले. गर्भपातासाठी लागणारे साहित्य, औषधें, किट असे भले मोठे साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. गर्भ अथवा भ्रूण अस्तित्वातच सजीव अवस्थेत येतो, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..गर्भ पूर्णत्वास येऊन सजीव म्हणून जन्माला येण्याच्या प्रक्रियेवर प्रहार करण्याची क्रिया म्हणजे एकप्रकारे त्या सजीवाची हत्याच म्हटली पाहिजे. अपवाद वगळल्यास प्रत्येक गर्भाला जन्माला येण्याची संधी देणेच कायद्याला अभिप्रेत आहे. त्यासाठीच गर्भपात कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. गर्भपात करायचा असेल तर त्यासाठी काही नियम कायद्याने घालून दिले आहेत.. त्यानुसार गर्भपात करता येतो. मात्र तरीही लोक अवैध गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर गर्भपात करतात. यासाठी जेवढा दोष डॉक्टरांना दिला जातो, तितकाच दोष त्यांच्याकडे जाणाऱ्यानाही दिला गेला पाहिजे.

कुठल्याही अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा पुरेसा नसतो तर त्याला समाजाचा धाकही आवश्यक असतो. लिंगनिदान, स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भपात सारख्या सामाजिक समश्याना प्रतिबंध घालण्यासाठी समाजालाच पुढाकार घ्यावा लागेल. मानसिकतेत बदल झाल्याशिवाय या समश्या संपणार नाहीत. त्यासाठी व्यापक मोहीम उघडण्याची गरज आहे. अर्थात, याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागरन केल्या गेले, आजही केल्या जात आहे. मात्र अपेक्षित यश अजून दृष्टीक्षेपात आलेलं नाही. मध्यंतरी जिल्ह्यात 'लेक माझी' नावाने मोठी मोहीम उभारली गेली होती. समाजसेवी डॉक्टर, सामाजिक कार्यकतें यांच्या या टीमने अनेक अवैध सोनोग्राफी केंद्राचा परदाफाश केला. परंतु कालांतराने 'लेक माझी' चळवळ ही थंडावली. शासनाच्याही विविध मोहिमा निघाल्या, पण त्यांचाही अपेक्षित परिणाम समोर आला नाही. एखादी अशी घटना समोर आली कि दोन दिवस त्यावर चर्चा होते. तपासण्या कारवाईच्या एक दोन मोहिमा पार पडतात. आणि पुन्हा काहीजण आपला गोरखधंदा सुरु करतात, हे उघड गुपित आहे. रोहिणखेडच्या घटनेनंतर बेकायदेशीर गर्भपाताच्या माहिती देणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत तीन पटीने वाढ करत ही रक्कम एक लाख करण्यात आली आहे. निश्चितच यामुळे अजून काही अशी बेकायदेशीर केंद्रे उघड होण्यास मदत होईल. परंतु समश्या संपणार नाही.

'तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाही वाद आपणासी' या वचनातून तुकाराम महाराजांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला आज समाजाने तद्वातच डॉक्टर मंडळींनी आत्मसात करण्याची गरज आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत का ? याचा शोध घेतलेला तर उत्तर सहजपणे सापडू शकेल. अर्थात, संपूर्ण समाजाचं भ्रष्ट होत चालला असताना, आम्ही एकट्यानेच सोवळे का राहायचे, असा सवाल काही डॉक्टर मंडळी उपस्थति करतीलही, पण अशानी वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य लाखात घेतले पाहिजे. डॉक्टर होतेवेळी घेतलेल्या शपथेचेही समरण केलं तर पुरेसं ठरेल. 'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद अंगीकारून, व्यवसाय नव्हे तर एक मिशन म्हणून काम करणाऱ्या ध्येयनिष्ठ डॉक्टरांची संख्या आजही कमी नाही. त्यामुळे समाज आजही डॉटरांना देवच मानतो. पण अशा काही अपप्रवृत्तीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे बोट दाखविल्या जाते, हे दुर्दैव.. त्याचमुळे वैद्यकीय 'सेवा' करणाऱ्या डॉक्टरांनी मेव्याची अभिलाषा ठेवणाऱयांचा प्रतिबंध घालण्यासाठी येणाऱ्या काळात पुढाकार घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी आता या क्षेत्रातील डॉक्टरांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.!!doctor-new.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले,
नीतिमत्तेचे सर्व संकेत गुंढाळून रुग्नाचा खिसा कापण्याचे उद्द्योग या क्षेत्रात इमाने-इतबारे सुरु झाले.

रुग्नांच्या सुविधेसाठी आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग पैसा कमविण्यासाठी केल्या जाऊ लागला.
अवैध गर्भपाताची घटना, तद्वातच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे उघडकीस आलेलं बेकायदेशीर गर्भपात केंद्र, या घटना वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

हे लेखक म्हणत आहे.

बरं ते घाऊक वैद्यकिय क्षेत्र म्हणत आहेत. ज्यात केंद्रिय आरोग्यमंत्र्यापासून एमआर पर्यंत, एमडीपासून वॉर्डबॉय पर्यंत सगळेच आलेत की...?

लेखाचा 'आशय'आणि 'विषय' यावरच फ़क्त प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो..

जोवर मुलगा म्हणजे वंशाचा दिवा वगैरे समज समाजातून दूर होत नाहीत तोवर हे सगळं चालूच रहाणार. त्याकरता नुसत्या डॉक्टरांना दोष देऊन बदल होणार नाही..

--- डॉक्टर यांना दोष दिला नाही. जी अपप्रवृत्ति या क्षेत्रात आहे, त्यावर भाष्य केल आहे.. इतरांचा दोष ही यात नमूद आहे.. कृपया आशय लक्षात घ्यावा. प्रत्येक मुद्दा पूर्णपणे विश्लेषित करने लेखात तरी शक्य नसते. शब्द मर्यादा असते.. त्यामुळे लेखाचा आशय लक्षात घ्यावा.

हीरा यांच्या प्रतिसादालाही उपरोक्त ओळी लागू होतील.
सर्व डॉक्टरांना एकाच कुंचल्याने रंगवायचा अट्टाहास समजेपलीकडचा आहे.
>> हे कुठे दिसले आपणास?
---नानाकळा यांनी उपस्थित केलेला प्रश्न माझ्याही मनात लेख पोस्ट केल्यापासून उठत आहे.

लेखात दिलेली उदाहरणे फक्त बेकायदा गर्भपात /लिंगनिदान अशा आऊटराईट याची आहेत, लेखक असे सुचवू पाहत आहेत की (काही) डॉक्टर्स या बेकायदा प्रकारांचे समर्थन करतात? जे हे प्रकार करतात ते गुन्हेगार आहेत, त्यांना क्षणभर बाजूला ठेऊ, पण गुन्हा न करणारे डॉक्टर्स पण या प्रकाराची तरफदारी करतात असा अर्थ लेखकाच्या विधानातून काढता येतो, आणि जो निश्चितच चुकीचा संदेश देतो....

----सिंबा जी, जे डॉक्टर बेकायदा कृत्य करतात त्यांच्या विरोधासाठी सन्माणीय डॉक्टर मंडळी नी समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केलि आहे.. चुकीच्या कृत्याच् समर्थन डॉक्टर करतात.. अस कुठ निदर्शनास आल आपल्या.

------ असे कुठले क्षेत्र आहे ज्यात अप-प्रवृत्ती नाही आहे? मग वैद्यकीय क्षेत्र त्याला अपवाद कसा असेल?

------ उदय जी, आपला हा मुद्दा लेखात तर नाही पण एका प्रतिसादात मीच उपस्थित केला आहे.. आज चांगल काय यापेक्षा कमी वाईट काय हे निवडण्याची पाळी आपल्यावर आली.. हा त्याचा आशय

नका ना जाऊ अशा डॉक्टरांकडे. सरकारी आरोग्यसेवेचा पर्याय आहे की तुमच्याकडे...
---- मार्मिक गोडसे जी, खासगी दवाखाने बंद झाली तर हाच पर्याय उपलब्ध राहणार आहे.. यासाठी आपण काही पुढाकर घेणार आहत का??

-------
वकील आणि डॉक्टर यांची तुलना मी कधीच केली नाही.. फ़क्त मी वकील असल्याने अनेकांनी दोन्ही क्षेत्राची तुलना सुरु केली आहे.. पुन्हा स्पष्ट करतो जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणावर प्रांसगिक लेख लिहला आहे.. अन्य क्षेत्रामधे ज्या काही चुकीच्या बाबी असतील यावरही प्रसंगानुरूप लिखाण सुरूच राहील.. अर्थात ज्याना वकिली वर लेख लिहायचे आहेत.. त्यांचे स्वागत आता कितिदा करू..

त्यात ते खाजगी आणि सरकारी असा काही भेद करत आहेत का?

जागोजागी मेव्याचा उल्लेख दिसतोय. सरकारी आरोग्य यंत्रणांचा उल्लेख आढळला नाही.

मार्मिक गोडसे जी, खासगी दवाखाने बंद झाली तर हाच पर्याय उपलब्ध राहणार आहे..

असं तुम्हाला का वाटतंय ?

यासाठी आपण काही पुढाकर घेणार आहत का??

मी माझे अनुभव नक्कीच शेअर करीन.

हे लेखक म्हणत आहे...

मार्मिक गोडसे जी, पहिल्याच वाक्यात 'काही लोक' म्हटल.. यात सर्व कसे येतील..

सेवा करण्यासाठी नाही तर 'मेवा' खान्यासाठी आहे... याठिकानी ही "असा समज करणारे" हे वाक्य आल आहे.. म्हणजेच सर्व नाही..जे असा समज करुण काम करतात ते..

आजच टाइम्स ऑफ इंडिया मध्ये पहिल्या पानावर कवर स्टोरी आलीय. लॅनसेट ग्लोबल हेल्थ मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार भारतात दर वर्षी १.६ कोटी गर्भपात होतात आणि त्यातले ८०% घरच्या घरी होतात. चारपैकी तीन प्रेग्नन्सीज घरच्या घरीच गर्भपाताच्या गोळ्या घेऊन टर्मिनेट केल्या जातात. फक्त १४% टक्के गर्भपात सर्जिकल असतात आणि उरलेले ५% टक्के गर्भ इतर मार्गांनी पाडले जातात. ही औषधे केमिस्ट किंवा इनफॉर्मल वेंडॉर्सकडून मिळवली जातात.
आता यात 'मेवा' कुणाला मिळत असेल?

हिरा, तो मेवा कुणाला मिळतो हे आपण नंतर बघू. आधी हे सांगा की हे ८०% गर्भपात घरच्याघरी कसे केले जातात? का केले जाता? डॉक्टर कडे न जाता परस्पर केमिस्टकडून औषधे घेण्याचे काय कारण आहे?

नानाकळा, घरच्याघरी गर्भपाताची कृती इथे अपेक्षित आहे काय? गेली शेकडो वर्षे अनैतिक आणि अवांच्छित गर्भ अशा तऱ्हेने खुडले जात आले आहेत, हे आपणास ठाऊक नसावे हे दुर्दैवी आहे. केमिस्टकडे नऊ आठवड्यांच्या आतील गर्भाच्या पतनास साहाय्यकारी ड्रग्स खुलेआम मिळतात. शिवाय आयुर्वेदिक आणि युनानी जडीबूटी असतातच. डॉक्टरबिकटरकडे जाऊन बोभाटा कशाला आणि समजा अधिक वाढीच्या गर्भापातनास डॉक्टरांनी नकार दिला तर म्हणून ही कामे चार भिंतींच्या आत गुपचूप उरकली जातात.

>>डॉक्टरबिकटरकडे जाऊन बोभाटा कशाला >> एक्झॅक्टली. हे सगळ्यात महत्वाचं कारण.
पुन्हा डॉक्टरकडे जाऊन गर्भपाताचा खर्च करणं सगळ्यांना परवडेलच असही नाही.

Submitted by हीरा on 12 December, 2017 - 14:05<<

>> हा अहवाल खरा मानला तर.. जे १४ टक्के प्रमाण सर्जिकल च आहे त्यात 'मेवा' येतो.. शिवाय ५ टक्के इतर कारणांमधेही मेवा संदर्भ लागू होईल..

फ़क्त माहितसाठी..

१९७१ साली वैद्यकीय गर्भपात कायदा अस्तितवात आला. या अंतर्गत एखादी महिला जर गरोदर राहिली तिला ते गरोदरपण नको असेल तर ती गर्भपात करू शकते असा अधिकार कायद्यान्वये प्राप्त झाला. यासाठी तिचा पती, घरचे नातेवाईक यांच्या परवानगीची गरज नाही. मात्र येणाऱ्या जीवामुळे तिच्या आयुष्यमानाला काही धोका उद्भवू शकतो, बाळात काही व्यंग असेल, स्त्रीवर अत्याचार झाले असतील किंवा गर्भनिरोधक वापरूनही गर्भधारणा झाली तर याच परिस्थितीत वैद्यकीय मान्यतेने तिला गर्भपात करता येऊ शकतो. सर्व सरकारी आरोग्य केंद्र तसेच सरकारमान्य खासगी दवाखान्यात गर्भपाताची सुविधा उपलब्ध आहे. साधारणत: पहिल्या टप्प्यात सात आठवडय़ाच्या आत एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत तर दुसऱ्या टप्प्यात १२ आणि तिसऱ्या टप्प्यात २० आठवडय़ांचा कालावधी असल्यास दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गर्भपाताची शस्त्रक्रिया पार पडते.

या नियमाना डावलुन जे गर्भपात होतात त्यांना अवैध म्हणावे लागेल.. आणि आशा घटनांमधे मेवा मोठ्या प्रमाणावर येतो..

>>>>वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही<<<<

मूळ लेखातील ह्या विधानांबाबतः

वैद्यकीय क्षेत्र फक्त सेवा करण्यासाठी आहे असे का म्हणावे? हुषारी वापरून व कष्ट करून (आजकाल तर भरमसाठी फियाही भरून) डॉक्टर होणे व एक नावाजलेला डॉक्टर होण्यासाठी अर्धे आयुष्य झगडावे लागणे ह्या दोन्ही प्रकारांमधून गेल्यानंतर डॉक्टरने ह्या क्षेत्राकडे उदरनिर्वाहाचे माध्यम म्हणूनसुद्धा बघू नये का? त्याशिवाय, आज असलेली प्रचंड स्पर्धा पाहता ज्याला आपण 'मेवा'म्हणत आहात तो मिळू लागेपर्यंत गेलेला वेळ, झालेला अमाप खर्च वगैरेचे काय? तिसरे म्हणजे सेवा - व्यवसाय - धंदा असा जो प्रवास आपण लिहिला आहेत तो सरसकट सगळीकडे झालेला नसावा.

आजमितीला डायग्नोस्टिक टेस्ट्ससाठी बर्‍यापैकी पैसे खर्च करू शकणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्णालयात एम आर आय स्कॅनिंग असेल आणि असा रुग्ण आला तर डॉक्टर म्हणतात की सोय उपलब्ध आहे तर योग्य ती चाचणी करून का घेऊ नये. ह्यात जरी रुग्णालयाला पैसे मिळत असले, थोडे भांडवल रिकव्हर होत असले तरी शेवटी ती टेस्ट प्रामाणिकपणेच केली जाते आणि रिपोर्टही योग्यच मिळतो हे तरी खरे ना? शिवाय ती टेस्ट न करण्याचा चॉईसही बरेचदा रुग्णाकडे असतोही. एखादी सर्जरी करण्याआधी फिजिशिअनकडून एन ओ सी आणण्यास सांगणे ह्याला 'कट'म्हणण्यात येऊ नये असेही मला वाटते. त्याचे कारण ते आवश्यक आहे. पण निव्वळ गंडवणारे डॉक्टर्स आहेत हेही खरे आहे व ते नष्टच होतील अशी काही शक्यताही नाही.

काल एका आश्रमातील एका मुलीची केस समजली. आत्ता ती १९ वर्षांची आहे. लहान असताना कोणा मुलाने फसवले. दिवस गेले. तिने ते काही काळ लपवून ठेवले. पोट दिसू लागल्यावर धावपळ झाली. शासकीय रुग्णालयातही फसवणूक झाली. तिचे गर्भाशय काढावे लागेल असे सांगण्यात आले. (तशी आवश्यकता नसताना)!! गर्भाशय काढले. आता तिला अनाथाश्रमात ठेवलेले आहे. लग्न कोण करणार हा प्रश्न पडला आहे घरच्यांना! शासकीय रुग्णालयावर केस ठोकली की नाही हे माहीत नाही. हे असे प्रकार घडतात हे सत्य, पण सरसकट घडतात हे पटत नाही.

डॉक्टरने ह्या क्षेत्राकडे उदरनिर्वाहाचे माध्यम म्हणूनसुद्धा बघू नये का?

महोदय.. वैद्यकीय क्षेत्राला सेवा म्हणण्याचा प्रघात मी घातलेला नाही.. गेल्या अनेक वर्षापसून समाज या क्षेत्राला सेवा म्हणतोय.. प्रत्येक डॉक्टरला नोंदणी करताना शपथ दिली जाते. या शपथमध्ये डॉक्टरांची कर्तव्ये, त्यांचे आचरण, त्यांची रुग्णाप्रती असणारी भावना या गोष्टी असतात. असं मी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.. कदाचित त्यामुळे या क्षेत्राला सेवा म्हणत असावे. अर्थात, यासाठी अनेक इतर कारणेही कारणीभूत असू शकतील.. मुदा हाच कि सेवा म्हणण्याचा नियम मी घातलेला नाही.

>>>वैद्यकीय क्षेत्र 'सेवा' करण्यासाठी नाही तर 'मेवा' खाण्यासाठी असल्याच्या समज असणारे काही लोक या क्षेत्रात आले, आणि वैद्यकीय सेवेचा व्यवसाय केंव्हा बनला, व व्यवसायाचा धंदा केंव्हा झाला, हे कुणालाच कळले नाही<<<<

याचा रोख ज्यांनी डॉक्टर (सेवा नाही व्यवसाय म्हणू) म्हणून पैसे कमविण्यासाठी अनैतिक काम केले त्यांच्याकडे आहे. मूळ लेखाचा विषयच अवैध गर्भपाताचा आहे. जी मंडळी अवैध काम करतात.. याचे दोन उदाहरणेही लेखात आहेत . त्यांच्यावर या वाक्याचा रोख आहे. ज्यांनी डॉक्टर म्हणून नीतिमत्तेचा भंग केला त्यांनी कधी या सेवेला माफ करा व्यवसायाचा धंदा केला असा त्याचा अर्थ आहे.

बाकी, डॉक्टरांनी आपला व्यवसाय कसा करावा.. सेवा करावी कि व्यवसाय करावा याबाबत मांडण्याइतपत माझी पात्रता नाही.

पण सरसकट घडतात हे पटत नाही.

असे प्रकार सरसकट घडतात, असं मी कुठेच मांडलं नाही.. उगा अर्थाचा अनर्थ करू नका.

इतर जे काही मुद्दे आपण प्रतिसादात मांडले त्याचा विषय लेखात नाही.. कट प्रॅक्टिस योग्य कि अयोग्य हा सुद्धा विषय लेखात नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही.

हीरा, मला काय ठावूक आहे आणि काय नाही व ते किती सुदैवी-दुर्दैवी आहे यावर अनावश्यक टिप्पणी करण्याच्या भानगडीत पडू नका. सोडा ते.

माझा प्रश्न फार सरळ होता की ८०% गर्भपात घरी का व कसे केले जातात. तो प्रश्न विचारण्याचे कारण होते की खोलात विचार केलात तर फार साधे कारण आहे हे ८०% गर्भपात घरी होण्याचे. एक तर पाळी चुकल्यावर लगेच गर्भ राहिल्याची शंका येते. त्यामुळे प्रेग्नंसी डिटेक्शन लगेच होतं. आजकाल तर त्यासाठी डॉक्टर कडे जायची गरज नाही. ५०-१०० रुपयाच्या किटने घरीच कळतं. ओके? ८ आठवड्याच्या आतला गर्भ पाडायला एमटीपी किट लागते. ह्यासाठी डॉक्टर चे फक्त कन्सल्टेशन लागते, अ‍ॅक्टीव पार्टिसिपेशन नाही, जे सर्जिकल अबॉर्शन मध्ये लागतं. एमटीपी ने होणार्‍या अबॉर्शनमध्ये एमटीपी किट जे फक्त ४०० रुपयांच येते ते थेट मागच्या दाराने किंवा राजरोस फ्रंट काउंटरवरुन घेता येत असेल तर डॉक्टरकडे जाऊन सायो यांनी म्हटल्याप्रमाणे बोभाटा आणि दहापट पैसे कोण कशाला घालवेल? शेवटी पैसे वाचवणे हा हेतू असतोच पेशंटचा. त्यात गैर काही नाही. उलट कॉम्प्लीकेशन डॉक्टरच्या गळ्यात पडत नसतील आणि पेशंट अंगावर काढून घेत असेल तर काय समस्या - डॉक्टरांना? (मला दिसत नाहीये, डॉक्टरांना माहित असेल तर त्यांनी जरुर सांगावे.)

साधारण छोट्या शहरांत सर्जिकल अबॉर्शनचे५ ते ८ हजार होतात व एमटीपीच्या गोळ्या देऊन होणार्‍या अबॉर्शनचे सगळ्या टेस्ट व डॉक्टर कन्सल्टेशन धरुन पाच-सहा हजार होतात. ओपन-आउट करु शकत नसलेल्या अविवाहित स्त्रियांच्या बाबतीत हा खर्च तिच्या स्वतःच्या लेव्हलवर करणे शक्य नसते. घरी माहिती होऊ द्यायचे नसते कारण इतके पैसे कशाला हवेत हा प्रश्न येतो. त्यामुळे ओवर-द-काउंटर ४००-५००त सुटका होत असेल तर ती तो मार्ग प्रेफर करेल असे मला वाटते. वैदू-युनानी-इत्यादी प्रकरणात किती खर्च येतो ते माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल बोलू शकत नाही.

आता इथे बघा आणि ठरवा मेवा कुठे खायला मिळतो व किती मिळतो, कोणाला मिळतो ते.

टिपः माझा प्रतिसाद माझ्या निरिक्षणावर आधारित आहे. डॉक्टर लोकांनी त्यांच्याकडची माहिती सांगितली तर करेक्शन करुन घेईन.

. एमटीपी ने होणार्‍या अबॉर्शनमध्ये एमटीपी किट जे फक्त ४०० रुपयांच येते ते थेट मागच्या दाराने किंवा राजरोस फ्रंट काउंटरवरुन घेता येत असेल>>
असं किट over the counter मिळतं? ? मला खरंच माहीत नव्हतं. मला फक्त i-pill ही गोळी माहिती आहे.

ओवर द काउंटर मिळतं का ह्याचे ऑफिशियल उत्तर नाही देऊ शकत. पण मिळत असेलही, भारत आहे हा, त्यात काय अशक्य आहे का?

आरोग्यक्षेत्रात शिरकाव केलेल्या अपप्रवृत्तींना कसे रोखायचे आणि त्यापासून कसे सावध राहायचे या बद्दल जिथे चर्चा व्हायला हवी होती आणि माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे होती तिथे असे कोण करते, किती करते, का करते, जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ असे भलतेच वाद चालू आहेत....
ऐंशी एक पोस्ट वाचल्या आणि काहीच हाती लागले नाही Sad

मला पर्सनली या विषयावर ऐकायला वाचायला उत्सुकता नेहमीच असते कारण मला माझ्या आयुष्याने हजारो आजार दिले आहेत. त्यातील एक आजार हळूहळू मला मरणाकडे घेऊन जात आहे. ईतर आजार माझ्या मैताला सोबत म्हणून खांद्याला खांदा देऊन आहेतच. त्यामुळे डॉक्टर नामक परमेश्वरावर माझी श्रद्धा आहे. मी जे जगतोय, आणि जे जगणार आहे ते या लोकांच्या भरवश्यावरच. सध्या एक डॉक्टर मला छान ट्रीटमेंट देत आहेत. पण त्यांचे वय पाहता ते मला आयुष्यभर पुरणार नाहीत. मग पुढे मला चांगले डॉक्टर मिळतील की नाही हा प्रश्न कधी कधी मला पडतो कारण परीस्थिती खरेच चिंताजनक आहे. किंबहुना ते भेटायच्या आधी बरेच जणांनी मला वाईटच अनुभव दिलेत. उपचाराच्या नावावर काही हजारोंना लुटलेय. प्रश्न निव्वळ पैश्यांचाही नाहीये, पण तो माझ्या जीवाशी खेळ होता. झेपत नसताना माझ्या आजाराचे निदान आणि त्यावर उपचार करायचा दावा, आणि उगाचच पैसे उकळायला बिनकामी टेस्ट करायला लावणे, ज्याचे कायद्याचा आधार घेत मी खरे तर त्यावर काही करूही शकत नाही..

असो, डॉक्टरांच्या उपचाराचा सर्वाधिक फायदा तेव्हाच होतो जेव्हा रुग्णाचा त्यांच्यावर पुर्ण विश्वास असतो. बहुतांश रुग्ण तो नेहमी दाखवतातच. एखाददुसर्‍या वाईट अनुभवाने लगेच आपली श्रद्धा ढळू देत नाहीत. जसे की एखाद्या पाखंडी बाबाने फसवले म्हणून कोणी देवावरचा विश्वास ढळू देत नाही तसेच हे. पण बोगस अनुभव यायचे प्रमाण वाढू लागल्यास याची खात्री देता येणार नाही. तो विश्वास तसाच राहावा यासाठीचे प्रयत्न समाजात अजूनही बहुसंख्येने शिल्लक असलेल्या चांगल्या डॉक्टरांनीच करायला हवा. ते देखील ते अल्पसंख्यांक बनायच्या आधी करायला हवा.

अन्यथा सारी सिस्टीमच सडकी आहे, एखाद्द्या ईमानदार व्यक्तीला ईतर मगरमछ सुखाने जगू देत नाही, तर त्यालाही भ्रष्ट बनावेच लागते..... हे जे ईतर क्षेत्रात घडते ते वैद्यकीय क्षेत्रात म्हणायची वेळ येऊ नये ईतकीच ईच्छा !

प्रत्येक वेळी डॉक्टर्स, हॉस्पिटल्स यांना दोष देणं सोपं असतं, पण इतर घटकही दोषी असतात हे कुणालाच दिसत नाही का?

आता ही बातमी वाचा:-

https://www.loksatta.com/thane-news/boy-who-injured-in-tanker-accident-d...

संपूर्ण बातमीत फक्त रुग्णालयांवरच कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे. पण खरा दोष शाळेचाच आहे. निदान एका वाचकाने तशी प्रतिक्रिया देत स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असल्याची प्रचीती दिली आहे.

त्याचप्रमाणे धागाविषय अवैध गर्भपातांचा आहे. यात डॉक्टर दोषी असलाच तरी तो या गुन्हेगारांच्या साखळीतला शेवटचा घटक आहे. आधी त्या गर्भधारणेस कारणीभूत असलेले इतर लोकच मोठे गुन्हेगार आहेत. हे म्हणजे असं झालं की डंपिंग ग्राऊंडवर जमा करण्यात आलेल्या प्रचंड कचर्‍याकरिता घंटागाडीला दोषी धरणं. पब्लिकने कचरा केलाच नाही तर घंटागाडी कशाला कचरा वाहील? गर्भाची कचर्‍यासोबत तुलना केल्याने अनेकांना राग येईल पण हा गर्भ पाडण्याची मनीषा बाळगणारेच त्याला कचर्‍याच्या पातळीवर आणून ठेवत आहेत.

जन्माला येणारं अपत्य अगदीच नको असेल तरी त्याला अशा अवैधपणे मारण्यापेक्षा जन्मल्यावर अनाथाश्रमात सोडण्याचा पर्याय आहेच की. नाहीतरी मूल दत्तक हवे असणार्‍यांची प्रतीक्षा यादी बरीच मोठी आहे. जर इतका साधा उपाय केला तरीही अवैध गर्भपाताचा आणि त्याद्वारे डॉक्टरांना मिळणार्‍या मेव्याचा सो कॉल्ड मुद्दा निकाली निघेल.

जन्माला येणारं अपत्य अगदीच नको असेल तरी त्याला अशा अवैधपणे मारण्यापेक्षा जन्मल्यावर अनाथाश्रमात सोडण्याचा पर्याय आहेच की. नाहीतरी मूल दत्तक हवे असणार्‍यांची प्रतीक्षा यादी बरीच मोठी आहे. जर इतका साधा उपाय केला तरीही अवैध गर्भपाताचा आणि त्याद्वारे डॉक्टरांना मिळणार्‍या मेव्याचा सो कॉल्ड मुद्दा निकाली निघेल.

गर्भपात करून मेवा कसा मिळतो? मिळत असेल तर पुण्य मिळत असेल.
आणि गर्भपात ही अगदीच लो टेक शस्त्रक्रिया असणार. त्यातून असे कितीसे पैसे मिळणार???

{{{

बिका, आवरा इथेपण....
नवीन Submitted by नानाकळा on 13 December, 2017 - 11:04 }}}

मायबोलीचे नवीन मालक का?

गर्भपात करून मेवा कसा मिळतो? मिळत असेल तर पुण्य मिळत असेल.
आणि गर्भपात ही अगदीच लो टेक शस्त्रक्रिया असणार. त्यातून असे कितीसे पैसे मिळणार???

>>स्त्रीभ्रूणहत्येसाठीचा गर्भपात.... पैसे जास्तच मिळतात सर्व प्रक्रियेत...

Pages