हरता आलेच पाहिजे!!

Submitted by सुमुक्ता on 7 December, 2017 - 07:59

काही दिवसापूर्वी आम्ही आमच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याचा १०-१२ वर्षाचा मुलगा बॅडमिंटन स्पर्धेत दुसरा आला होता. आम्हीं त्याचे खूप कौतुक करत होतो. थोड्या वेळानी तो मुलगा आपल्या खोलीत निघून गेला आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा तो मित्र म्हणाला "अरे कसलं कौतुक करताय?? बॅडमिंटनचे टूर्नामेंट वगैरे काही नव्हती. २ मुलांच्या मॅचमध्ये हा हरला म्हणून दुसरा आला!!!" मित्र पुढे म्हणाला "मुलांना तुम्ही हरलात हे म्हणायचे नाही असे शाळेने सांगितले आहे. तसे म्हटले की मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून तो त्याच्या खोलीत गेल्यावर हे तुम्हाला सांगितले" मी अवाकच झाले. हरलेल्याला हरला असे म्हणायचे नाही तर दुसरा आला असे म्हणायचे. हे असले नवीन पद्धतीचे पालकत्व काही माझ्या पचनी पडेना. मी ह्या गोष्टीवर खूप विचार करत राहिले.

आयुष्यामध्ये आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कित्येक आव्हाने आपल्यापुढे उभी असतात ती स्वीकारून मार्ग काढायचा असतो. कित्येक वेळा आपल्या मनासारखे होते तर कितीतरी वेळा हार पत्करावी लागते. ती हार आनंदाने स्वीकारून पुढे जायचे असते. आपल्या अपयशाची जबाबदारी घेऊन पुन्हापुन्हा प्रयत्न करायचा असतो. आयुष्याचे हे तत्व आपल्याला आपल्या शिक्षणाने शिकविले पाहिजे. शाळेमध्ये, महाविद्यालयात, विद्यापीठात ज्ञान प्राप्त करायचे असते त्या ज्ञानाचा वापर पुढील आयुष्यात कसा करायचा हे शिकायचे असते. त्याचप्रमाणे संकटांचा/आव्हानांचा सामना कसा करायचा हे ही शिकायचे असते. आपण तेच शिकविण्यात कमी पडतो आहोत का? तसे असेल तर मग भविष्यात थोडेसे अपयश आले तरी हातपाय गाळून बसणारे युवक/युवती वाढीला लागतील. भविष्यातील समाजासाठी हे फारच चिंताजनक असेल.

तुझे अपयश हे अपयश नाहीच हे म्हणणे म्हणजे खोटे बोलणे नव्हे का? मुलांना मी हरलो असलो तरीही पुन्हा प्रयत्न करेन हा आत्मविश्वास द्यायचा की तू हरला नाहीसच असे म्हणत त्यांचा फाजील आत्मविश्वास वाढीस लावायचा? नापास झालास!! हरकत नाही पुन्हा प्रयत्न कर, परत अभ्यास कर असे म्हणायचे की तू नापास झालाच नाहीस असे म्हणायचे? अपयश आले म्हणून मुलांची खिल्ली उडवू नये, त्यांना रागावू नये, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत त्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवे. खोटा आत्मविश्वास देण्याऐवजी जास्त महत्वाचे आहे चुकांची जाणीव करून देणे, चुका कशा सुधारायच्या ह्याचे मार्गदर्शन करणे आणि चुकांची जबाबदारी घ्यायला शिकविणे. आपल्या लहानपणी आपल्याला "अपयश ही यशाची पहिली पायरी आहे" असे शिकवले जायचे. त्यातून हेच सूचित होते की यश मिळविण्यासाठी अपयश पचवता आलेच पाहिजे. पण अपयश पचविण्यासाठी ते आधी स्वीकारायला लागते.

जी शिक्षणपद्धती मुलांना सत्य स्वीकारायला शिकवत नाही तिला सकारात्मक तरी कसे म्हणायचे? सत्याकडे पाठ फिरविण्यापेक्षा दुसरी मोठी नकारात्मक गोष्ट कोणतीही नसेल!! लहानपणी आई-वडील, शिक्षक त्यांची समजूत काढतील, त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी मदत करतील पण पुढे त्यांचे आयुष्य त्यांना स्वत:च जगायचे आहे. तेव्हा एक पालक म्हणून आपल्या मुलांना अधिकाधिक कणखर बनविणे हे आपले काम आहे असे मला वाटते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या मुलांना प्रमाणाबाहेर संरक्षण देऊन त्यांना कोशातच ठेवून आपण त्यांना कमकुवत तर बनवित नाही ना हे बघणे खूप महत्वाचे आहे.

जीवघेणी स्पर्धा कधीही वाईटच पण जीवघेणे संरक्षणही तितकेच किंवा त्याहूनही अधिक वाईट आहे. प्रत्यक्ष आयुष्य फार कठीण आहे तिथे कोणालाही मुभा मिळत नाही. तिथे जीवघेणी स्पर्धा आहे. कितीही नाकारा ती आहेच!!! कोणत्याही क्षेत्रात जा; यशाची कोणतीही परिमाणे घ्या; स्पर्धा ही आहेच. यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवातीला अपयश, अपमान आणि टक्केटोणपे हे सगळेच सोसावे लागतेच!! अतीव संरक्षित कोशात वाढलेली मुले मग मोठे होऊन हे घाव सोसू शकतील का?

खूप वेळा मी हा ही युक्तिवाद ऐकला आहे की मुलांवर लहानपणापासून दडपण आणणे योग्य नाही. स्पर्धेत/परीक्षेत भाग घेणे यश किंवा अपयशापेक्षा जास्त महत्वाचे असते. त्यामुळे आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद लुटणे शिकता येते. पण आपण जर अपयशी होण्याला इतका नकारात्मक रंग दिलाच नाही; अपयश हे स्वत:मधील उणीवा समजण्यासाठी आणि स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मिळालेली एक उत्तम संधी आहे असे मानले तर मुलांना अपयशाचे दडपण येणार नाही आणि स्पर्धेचा आनंदसुद्धा लुटता येईल. हेच वय असते जिथे छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना पुढच्या आयुष्यासाठी प्रशिक्षित करता येते. जोपर्यंत अपयश स्वीकारता येत नाही तोपर्यंत स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणता येत नाही. आणि जोपर्यंत सुधारणा घडत नाही तोपर्यंत यशस्वी होता येत नाही. विवेकाने हार स्वीकारता येणे खूप महत्वाचे आहे. सकारात्मक पद्धतीने, सत्याकडे पाठ न फिरविता मुलांना हे शिकविता येणार नाही का?

माझा मुलगा अजून लहान आहे, शाळेतही जात नाही पण अशा शिक्षणपद्धतीमुळे त्याला ग्रेसफुली हरता येईल का? ते मी त्याला कसे शिकवू हाच विचार मी सतत करत असते!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद नानबा

personally I don't see a need to be at top >>> आपण प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक वेळेस टॉपवर असूच शकत नाही. There always will be a bigger fish. तसेच प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक वेळेस लूजर पण असू शकत नाही. नानाकळांनी जसे लिहिले आहे तसे "आपण रोज हरणार नाहीये, रोज जिंकणारही नाहीये. पण आपण तयारी करत राहीली पाहिजे. "

नानाकळा पोस्ट आवडल्या.

मुलांना निराशा आल्यास धीर देऊन एवढेच सांगावे की आजचा दिवस संपला, आता उद्या दुसरा दिवस दुसर्‍या शक्यता घेऊन येणार आहे. आपण रोज हरणार नाहीये, रोज जिंकणारही नाहीये. पण आपण तयारी करत राहीली पाहिजे. तयारी करणे हे आपले कर्तव्य आहे. यश त्यातूनच जन्म घेतं.>>>> वा! हे नेहमीच लक्षात ठेवेन.

सहमत आहे. हल्ली मॉडर्न शिक्षणपद्धतीच्या नावावर काही अनावश्यक गोष्टींचे फ्याड आलेय. हे त्यातलेच एक वाटतेय. हरण्यातील दुख नाही समजले तर जिंकण्यातील मजा कशी येणार. इर्ष्या कुठून वाढीस लागणार. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सर्व भावभावनांचा अनुभव हवा. सगळं हाताळायला शिकायला हवं >> +१

मुलांना निराशा आल्यास धीर देऊन एवढेच सांगावे की आजचा दिवस संपला, आता उद्या दुसरा दिवस दुसर्‍या शक्यता घेऊन येणार आहे. आपण रोज हरणार नाहीये, रोज जिंकणारही नाहीये. पण आपण तयारी करत राहीली पाहिजे. तयारी करणे हे आपले कर्तव्य आहे. यश त्यातूनच जन्म घेतं>>>+१

मुलांना निराशा आल्यास धीर देऊन एवढेच सांगावे की आजचा दिवस संपला, आता उद्या दुसरा दिवस दुसर्‍या शक्यता घेऊन येणार आहे. आपण रोज हरणार नाहीये, रोज जिंकणारही नाहीये. पण आपण तयारी करत राहीली पाहिजे. तयारी करणे हे आपले कर्तव्य आहे. यश त्यातूनच जन्म घेतं>>> अनुमोदन, आवडले हे वाक्य

अशी कोणती स्पर्धा ज्यात दोनच स्पर्धक होते?
फायनल तर नव्हती? >>>> Rofl नाही फायनल नव्हती. २ मुलांमध्ये कुठलीतरी रँडम मॅच होती बहुधा. आम्हाला आधी फायनल वाटली म्हणून तर कौतुक केले आम्ही Happy

मुळात 'हारणे' म्हणजे नक्की काय हे ठरवले पाहिजे. माझा अनुभव सांगते. मुलगा ३-४ वर्षाचा असल्यापासून खेळात हरला की चिड्चिड करतो. आणि तो जोवर जिंकत नाही तोवर आम्हाला खेळायला सांगतो. अशावेली 'हारणे' हे त्याला जमले पाहिजे. कारण मग उद्या खेळात हरला आणि असेच केले तर शाळेत चिडवणारी मुलेही असतात्च. आपल्याला 'चिडका बिब्बा'म्हणायचे ना? तसे. तर अशा ठिकाणी 'सोअर लूजर' न होणे जमले पाहिजे.
आता अभ्यास आणि त्यातील यश यावर सांगायचं तर, त्यांच्या शाळेत, प्रत्येक वर्गात आठवड्यात चांगले काम केले की एक-दोन मुलांना एक कार्ड मिळते. आता ते कार्ड मिळाले हेच आमच्यासाट्।ई पुरेसे असते. पण शुक्रवारी तीच कार्ड एका पेटीत जातात आणि त्यातून एका मुलाची लॉटरी निघते ज्याला अजुन एक बक्षिस मिळते. आता इथे दर वेळी मुलाला अपेक्षा असते की त्याला ते ज्यादा बक्शिस मिळेल. तो नाराज होतोच पण तिथे त्याला आम्ही समज्वात राह्तो की कार्ड मिळणे हे जास्त महत्वाचे आहे कारन त्यातून काही चांगले काम केले आहेस हे कळते, पुढे दुसरे बक्षिस नाही मिळाले तरि चालेल. त्यामुळे त्याने चांगले वागत राहणे गरजेचे आहे बाकी काही मिळाले नाही तरी.
मला वाटते, वेगवेगळ्या ठिकाणी लागू होणारे नियम थोदेफार बदलत राहतात पण मुलांना असं 'हरता' आलं पाहीजे नाहीतर पुढे अजून त्रास
होईल.

नाही फायनल नव्हती. २ मुलांमध्ये कुठलीतरी रँडम मॅच होती बहुधा. आम्हाला आधी फायनल वाटली म्हणून तर कौतुक केले आम्ही Happy
नवीन Submitted by सुमुक्ता on 8 December, 2017 - 06:
>>> स्कोर काय होता.. जर थोड्याश्या फरकाने हरला असेल तर कशाला त्याला म्हणायव्हे हरला म्हणून. वलम्पिक स्पर्धा थोडीच आहे. दुसरा आला म्हटल्यावर तो नेक्स्ट वेळी नक्कीच पहिला यायचा प्रयत्न करेल ना.

जर थोड्याश्या फरकाने हरला असेल तर कशाला त्याला म्हणायव्हे हरला म्हणून.

>>
Dom: What are you smiling about?
Brian: Dude, I almost had you!
Dom: You almost had me? You never had me! You never had your car! Granny shiftin', not double clutchin' like you should. You're lucky that hundred shot of NOS didnt blow the welds on the intake. Almost had me? Now me and the mad scientist gotta rip apart the block, and replace the piston rings you fried! Ask any racer, any real racer, it don't matter if you win by an inch or a mile. Winning's winning.

10 वर्षाचा आहे हो तो नाना. कसली उदाहरणे देताय.
पुढचा मुद्दा तुम्हाला उद्देशून नाहीय- पण
ही असली मेंटलिटी असते पालकांची म्हणून 12 वि ला मुले सुसाईड करतात मार्क्स कमी मिळणार हे समजते पेपर दिल्यावर आणि पालक टोचून बोलतील म्हणून.

च्रप्स, टोचून बोलणारे पालक, मार्कांचे टेन्शन घेणारे पालक स्वतःच गॉन केस असतात.. आणि असे गॉन केस लोक्स फक्त पालकच असतात असे नव्हे. ज्या ज्या क्षेत्रात मी मुशाफिरी करतोय तीथे तिथे असे त्या त्या विशिष्ट क्षेत्रातले गॉन केस लोक्स भेटले आहेत. ते संख्येने खुप असतात. त्याची कारणमीमांसा वेगळी आहे. (असे गॉन केस शेतकरी तर ढिगाने आहेत, काही उपयोग असो वा नसो, केवळ 'करमत नाही' म्हणून तिसर्‍या दिवशी पिकांवर गरज नसतांना औषध फवारणी करणारे नग शेकड्याने भेटलेत)

ते जिंकण्यासाठी काही विशेष प्रयत्न करत नसतात, त्यांना जिंकण्यासाठी काय करायचे असते हेच माहित नसते. ते केवळ ऐकिव माहितीवर ढोबळमानाने अंदाज बांधून यशाचा कार्यक्रम, ध्येय फिक्स करतात आणि गुराप्रमाणे मेहनत करायच्या मागे लागतात, अशांना यश मिळत नाहीच, मुळात यश काय हेच माहित नसते. त्या दुसर्‍या कोणाला मिळालेले मार्क्स, प्रवेश, नोकर्‍या, पॅकेज, बंगले, गाड्या इत्यादी म्हणजे यश एवढीच यांची अक्कल असते. त्यांना फक्त दुसर्‍याचे यश बघून कॉपी करायचे असते.त्यामागच्या कार्यकारणभावात, खोलात जायची इच्छाही नसते व बुद्धिमत्ताही नसते. जसे एका लेखात मी सांगितले की इंग्रजी आले की यश मिळते असे सुलभीकरण करुन आज सगळे इंग्रजी शाळेच्या मागे लागलेत. तसेच हेही.

आयआयटी च्या तयारीसाठी मोठा खर्च करुन कोट्याला मुलांना पाठवणारे तिथला केवळ. ०.६% लागणारा निकाल बघत नाहीत. त्या ०.६% मध्ये आपलाही मुलगा लागेलच असा विश्वास कुठून येतो काय माहित? अनेक क्लासवाले सांगतात की तुमच्या मुलाचं अ‍ॅप्टिट्युड नाहीये तरी त्याला जबरदस्ती टाकून, "त्याला करुन तर बघू दे, जातील काही पैसे वाया" असे म्हणतात आणि मग, गावभर बोंबलत फिरतात की आमच्या मुलाला कोट्याला टाकलंय, आपसूक रिजल्टचे समाजातून प्रेशर आले की मग मुलावर जबरदस्ती सुरु होते की इतका पैसा खर्च करतोय, इतका त्याग करतोय त्याची लाज राखायला आयआयटीला नंबर लाव. नाहीतर आम्ही बोलणारच नाही तुझ्याशी. इकडे आड, तिकडे विहिर असलेली ही कोवळी पोरं, जीव देण्याशिवाय पर्याय काय राहतो त्यांच्याकडे?

अशा पालकांना तुम्ही सांगाल की बाबांनो पोरांना काहीसुद्धा बोलु नका, फुलासारखं जपा. तर त्यांच्या बुद्धिप्रमाणे ते त्याचाही अतिरेक करतील. हे होतांना का दिसत नाही? दिसतेच आहे. ज्यांचे बालपण दबावाखाली, अब्युजखाली गेले, अभावात गेले ते मुलांना त्यापासून इतक दूर ठेवतात की गरिबी, अभाव, अ‍ॅडज्स्टमेंट, अब्युज, काहीसुद्धा त्यांना कळूच नये. ओवरप्रोटेक्टीव.

मला अशा पालकांना काही सांगायची इच्छा होत नाही कधीच. कारण ते ऐकून घेत नाहीत. त्यांचा समजून घेण्याचा स्पॅन फार लिमिटेड असतो. ते स्टॉक आरजीबीत विचार करणारे असतात, आपण ६५के मध्ये. (आरजीबी = तीन मूळ रंग, ६५के= ६५ हजार रंग)

"हरता आलेच पाहिजे" हे शिर्षक वाचुन थोडा अचंबित झालो होतो पण लेखाचा गाभा "हार पचवता आली पाहिजे" अस्ल्याने जीव भांड्यात पडला. थोडावेळ वाट्लं आता "हरण्याचं" फॅड आलंय कि काय? Happy

वरच्या उदाहरणातला हरणार्‍याला दुसरा नंबर देणं हे इकडे कॉमन आहे. आपण हरलो यापेक्षा जिंकण्यासाठी थोडा कमी पडलो हि भावना त्याच्यात रुजावी हा हेतु आहे. त्यात काहिहि गैर नाहि...

लेख आवडला
नानाकळा छान पोस्टी >> +१११

सुंदर आणि प्रासंगिक लेख..
पालकत्वाच्या आणि मुलांच्या मनोवृत्ती भूमिकेतून या लेखावर विस्तृत चर्चा वाचली..परंतु लेखिकेने शिक्षण पध्दती बाबत ही लेखात भाष्य केल आहे.. जे शिक्षण मुलांना अपयश पचविन्याची शिकवण देत नाही, त्याचा काय उपयोग? हा प्रश्न जितका मार्मिक तितकाच अंतर्मुख करणारा आहे.. आजच्या शिक्षण पध्दतीत काय शिकवले जाते, आणि मुलाना काय शिकवले पाहिजे. यावर खर तर अजुन शिक्षण खात्यातील तथाकथित तज्ञांचच एकमत झालेल दिसत नाही.. कधी यांना मूल्य शिक्षण महत्वाच् वाटत तर कधी सामाजिक शिक्षण..
वास्तविक संस्कार, साक्षरता, भावनांची अभिव्यक्ती व परिसर – निरीक्षण शिक्षणाच् उद्दिष्ट असले पाहिजे. सोबतच जीवनाला उपयोगी पडणार्‍या विषयांचे शिक्षण, विचारांना चालना देणार, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणार, सामाजिक कर्तव्यांची जाणीव करून देणारं व्यवसायाभिमुख शिक्षण मुलाना सक्षम बनवु शकेल.. अगदी नर्सरी पासून टप्या टप्प्याने याची सुरुवात झाली पाहिजे.. शाळेत जावून नुसता डबा खाने, तीच ती अर्थहीन गाने म्हणणे, चित्रांची पुस्तके चाळने, आणि घरी येणे. यातून साध्य तरी काय होणार?

पण लेखाचा गाभा "हार पचवता आली पाहिजे" अस्ल्याने जीव भांड्यात पडला. >>> +१२३

वरच्या उदाहरणातला हरणार्‍याला दुसरा नंबर देणं हे इकडे कॉमन आहे. आपण हरलो यापेक्षा जिंकण्यासाठी थोडा कमी पडलो हि भावना त्याच्यात रुजावी हा हेतु आहे. त्यात काहिहि गैर नाहि... >>> +१२३

काही मुलांना जिंकण्याची किंवा प्रगतीची इतकी सवय झालेली असते की त्यांना हार पचवता येत नाही. ते बरोबर नाही. दोन्हीची सवय हवी. मुलांना प्रगतीसाठी प्रोत्साहनही दिले पाहीजे आणि हारणे - जिंकणे हा सृष्टीचा नियमच आहे हे समजावलेही पाहीजे.

Pages