हरता आलेच पाहिजे!!

Submitted by सुमुक्ता on 7 December, 2017 - 07:59

काही दिवसापूर्वी आम्ही आमच्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याचा १०-१२ वर्षाचा मुलगा बॅडमिंटन स्पर्धेत दुसरा आला होता. आम्हीं त्याचे खूप कौतुक करत होतो. थोड्या वेळानी तो मुलगा आपल्या खोलीत निघून गेला आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा तो मित्र म्हणाला "अरे कसलं कौतुक करताय?? बॅडमिंटनचे टूर्नामेंट वगैरे काही नव्हती. २ मुलांच्या मॅचमध्ये हा हरला म्हणून दुसरा आला!!!" मित्र पुढे म्हणाला "मुलांना तुम्ही हरलात हे म्हणायचे नाही असे शाळेने सांगितले आहे. तसे म्हटले की मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून तो त्याच्या खोलीत गेल्यावर हे तुम्हाला सांगितले" मी अवाकच झाले. हरलेल्याला हरला असे म्हणायचे नाही तर दुसरा आला असे म्हणायचे. हे असले नवीन पद्धतीचे पालकत्व काही माझ्या पचनी पडेना. मी ह्या गोष्टीवर खूप विचार करत राहिले.

आयुष्यामध्ये आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कित्येक आव्हाने आपल्यापुढे उभी असतात ती स्वीकारून मार्ग काढायचा असतो. कित्येक वेळा आपल्या मनासारखे होते तर कितीतरी वेळा हार पत्करावी लागते. ती हार आनंदाने स्वीकारून पुढे जायचे असते. आपल्या अपयशाची जबाबदारी घेऊन पुन्हापुन्हा प्रयत्न करायचा असतो. आयुष्याचे हे तत्व आपल्याला आपल्या शिक्षणाने शिकविले पाहिजे. शाळेमध्ये, महाविद्यालयात, विद्यापीठात ज्ञान प्राप्त करायचे असते त्या ज्ञानाचा वापर पुढील आयुष्यात कसा करायचा हे शिकायचे असते. त्याचप्रमाणे संकटांचा/आव्हानांचा सामना कसा करायचा हे ही शिकायचे असते. आपण तेच शिकविण्यात कमी पडतो आहोत का? तसे असेल तर मग भविष्यात थोडेसे अपयश आले तरी हातपाय गाळून बसणारे युवक/युवती वाढीला लागतील. भविष्यातील समाजासाठी हे फारच चिंताजनक असेल.

तुझे अपयश हे अपयश नाहीच हे म्हणणे म्हणजे खोटे बोलणे नव्हे का? मुलांना मी हरलो असलो तरीही पुन्हा प्रयत्न करेन हा आत्मविश्वास द्यायचा की तू हरला नाहीसच असे म्हणत त्यांचा फाजील आत्मविश्वास वाढीस लावायचा? नापास झालास!! हरकत नाही पुन्हा प्रयत्न कर, परत अभ्यास कर असे म्हणायचे की तू नापास झालाच नाहीस असे म्हणायचे? अपयश आले म्हणून मुलांची खिल्ली उडवू नये, त्यांना रागावू नये, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत त्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवे. खोटा आत्मविश्वास देण्याऐवजी जास्त महत्वाचे आहे चुकांची जाणीव करून देणे, चुका कशा सुधारायच्या ह्याचे मार्गदर्शन करणे आणि चुकांची जबाबदारी घ्यायला शिकविणे. आपल्या लहानपणी आपल्याला "अपयश ही यशाची पहिली पायरी आहे" असे शिकवले जायचे. त्यातून हेच सूचित होते की यश मिळविण्यासाठी अपयश पचवता आलेच पाहिजे. पण अपयश पचविण्यासाठी ते आधी स्वीकारायला लागते.

जी शिक्षणपद्धती मुलांना सत्य स्वीकारायला शिकवत नाही तिला सकारात्मक तरी कसे म्हणायचे? सत्याकडे पाठ फिरविण्यापेक्षा दुसरी मोठी नकारात्मक गोष्ट कोणतीही नसेल!! लहानपणी आई-वडील, शिक्षक त्यांची समजूत काढतील, त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी मदत करतील पण पुढे त्यांचे आयुष्य त्यांना स्वत:च जगायचे आहे. तेव्हा एक पालक म्हणून आपल्या मुलांना अधिकाधिक कणखर बनविणे हे आपले काम आहे असे मला वाटते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या मुलांना प्रमाणाबाहेर संरक्षण देऊन त्यांना कोशातच ठेवून आपण त्यांना कमकुवत तर बनवित नाही ना हे बघणे खूप महत्वाचे आहे.

जीवघेणी स्पर्धा कधीही वाईटच पण जीवघेणे संरक्षणही तितकेच किंवा त्याहूनही अधिक वाईट आहे. प्रत्यक्ष आयुष्य फार कठीण आहे तिथे कोणालाही मुभा मिळत नाही. तिथे जीवघेणी स्पर्धा आहे. कितीही नाकारा ती आहेच!!! कोणत्याही क्षेत्रात जा; यशाची कोणतीही परिमाणे घ्या; स्पर्धा ही आहेच. यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवातीला अपयश, अपमान आणि टक्केटोणपे हे सगळेच सोसावे लागतेच!! अतीव संरक्षित कोशात वाढलेली मुले मग मोठे होऊन हे घाव सोसू शकतील का?

खूप वेळा मी हा ही युक्तिवाद ऐकला आहे की मुलांवर लहानपणापासून दडपण आणणे योग्य नाही. स्पर्धेत/परीक्षेत भाग घेणे यश किंवा अपयशापेक्षा जास्त महत्वाचे असते. त्यामुळे आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद लुटणे शिकता येते. पण आपण जर अपयशी होण्याला इतका नकारात्मक रंग दिलाच नाही; अपयश हे स्वत:मधील उणीवा समजण्यासाठी आणि स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मिळालेली एक उत्तम संधी आहे असे मानले तर मुलांना अपयशाचे दडपण येणार नाही आणि स्पर्धेचा आनंदसुद्धा लुटता येईल. हेच वय असते जिथे छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना पुढच्या आयुष्यासाठी प्रशिक्षित करता येते. जोपर्यंत अपयश स्वीकारता येत नाही तोपर्यंत स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणता येत नाही. आणि जोपर्यंत सुधारणा घडत नाही तोपर्यंत यशस्वी होता येत नाही. विवेकाने हार स्वीकारता येणे खूप महत्वाचे आहे. सकारात्मक पद्धतीने, सत्याकडे पाठ न फिरविता मुलांना हे शिकविता येणार नाही का?

माझा मुलगा अजून लहान आहे, शाळेतही जात नाही पण अशा शिक्षणपद्धतीमुळे त्याला ग्रेसफुली हरता येईल का? ते मी त्याला कसे शिकवू हाच विचार मी सतत करत असते!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

लहान मुलांना तु हरलास ,यु आर ए लुजर असे स्पष्ट सांगितल्याने काय मिळणार?.नाजुक मनावर एक ओरखडा उठेल व निगेटीवीटी डेव्हलप होईल.मुलं स्ट्रेसच्या दृष्टीकोणानातून बरीच सेन्सिटीव्ह असतात.लहाणपणीचे स्ट्रेस बुद्धीमत्तेच्या विकासावर पण परिणाम करतात असे मध्यंतरी वाचले होते.
उगाच काहीही मतं विकसित करुन घेऊ नका व तुमच्या मुलावर तर अजिबातच लादू नका.

लेख आवडला.. सहमत..
एक अपयश म्हणजे this is not end of the world हे समजून सांगणे हे आई वडीलांचे काम आहे

सहमत आहे. हल्ली मॉडर्न शिक्षणपद्धतीच्या नावावर काही अनावश्यक गोष्टींचे फ्याड आलेय. हे त्यातलेच एक वाटतेय. हरण्यातील दुख नाही समजले तर जिंकण्यातील मजा कशी येणार. इर्ष्या कुठून वाढीस लागणार. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सर्व भावभावनांचा अनुभव हवा. सगळं हाताळायला शिकायला हवं

हे आधी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय.. किंवा अगदी अश्याच अर्थाचं इथेच वाचल्यासारखं..
:विचारात पडलेली बाहुली:

दुसरा आला म्हटलं त्यात काय वावगं वाटलं समजलं नाही. ' तू हरला आहेस' म्हणण्यापेक्षा 'दुसरा आलास' हे positive नाही वाटत का? दुसरा आलास म्हणजे पहिला आला नाहीस किंवा जिंकला नाहीस हे १०-१२ वर्षाच्या मुलाला नक्की समजलं असेल. सो पुढच्या वेळी तो जास्त प्रयत्न करेल. हरलास सांगितलं असतं तर हिणवलं असं वाटलं नसतं का?

६ वर्षाच्या मुलाबरोबर पुस्तक वाचताना जेव्हा तो चुकीचे शब्द वाचतो तेव्हा त्यातील जो भाग त्याने बरोबर वाचला आहे त्याबद्दल त्याला शाबासकी देऊन उरलेला भाग त्याला साउंड आउट करायला सांगून त्याच्या कडून नीट वाचून घेणे - विरुध्द- तू चुकीचा शब्द वाचलास सांगून बरोबर करणे यात पहिली पद्धत माझ्या स्वतःच्या अनुभवावरून जास्त परिणामकारक आणि त्याला वाचनाची गोडी लावणारी ठरते. लहान लहान गोष्टीत एन्करेजमेंट दिली की मुलं शेफारून नाही जात... तर आणखी चांगलं करायचा प्रयत्न करतात. अर्थात फाजील बढाई तुम्ही मारणार नाही याची काजळी प्रत्येक जण घेतच असेल.

माझ्या वैयक्तिक अनुभवात तरी अपयश हे अपयश आहे हेच हल्ली ही शिकवतात. फक्त त्यातून positive उर्जा मिळण्यासाठी थोडं शुगर कोट करून कोणी देत असेल तर मला तितकंस वावगं वाटत नाही.

मला असे वाटते की दोन्ही बरोबर आहे. वयाच्या ५-६ वर्षे अगोदर शाळेत सांगितले ते बरोबर वाटते. प्रत्येक मुलासाठी ही मर्यादा थोडीफार बदलू शकते. पण एकदा मूल ६-७ वर्षापेक्षा मोठे झाले की तुमचा मुद्दा योग्य वाटतो.
हे माझे वैयक्तीक मत. मुलांच्या संगोपनाबद्दल मला कुठलाही दुसर्‍याना सल्ला द्यावा असा अधिकार नाही किंवा मी त्यातला तज्ञ नाही.

हे आधी कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय.. किंवा अगदी अश्याच अर्थाचं इथेच वाचल्यासारखं..
:विचारात पडलेली बाहुली: >>>> +१११११

चांगला आहे लेख. माझे अनुमोदन.
आमच्या आवडत्या जॉर्ज कारलीन साहेबांचे यावर जबरदस्त विवेचन आहे. लहानपणापासून बाबापुता करून वाढवलेल्या मुलांना मोठेपणी प्रत्यक्ष जॉबवर कोणी बॉस यु आर अ लूजर असे म्हणून ओरडला तर तो धक्का पचवण्याची क्षमता त्याच्यात नसेल, त्याला माहीतच नसेल अपयश कसे हाताळायचे. प्रत्येक गोष्ट शिकवली पाहिजे असे काही नसते, आपण प्राणी आहोत रोबो नव्हे, आपण अनुभवातून शिकत जातो, ते शिकलेले वापरत जातो व उत्क्रांत होतो.

अपयशामुळे धीर गमावणे, नकारात्मक होणे यावर काम करणे जास्त सोपे आहे. पण लहानपणापासून तू विजयीच आहेस म्हणून इगो कुरवळणे जास्त घातक.

सारवायवल ऑफ फिटेस्ट च्या तत्त्वात मी विश्वास ठेवतो. ज्याच्यात दर्जा असेल तोच जगेल....

अपयशामुळे धीर गमावणे, नकारात्मक होणे यावर काम करणे जास्त सोपे आहे. पण लहानपणापासून तू विजयीच आहेस म्हणून इगो कुरवळणे जास्त घातक
>>
आपल्याला हे अगाध ज्ञान कुठे मिळाले नाना,? इमोशनल ट्रॉमा हा प्रकार आपण ऐकला आहे का? चाईडहूड ट्रॉमा तर त्याहुन डेंजर प्रकार आहे.मुलांना कशाचा धक्का बसेल हे सांगता येत नाही त्यामुळे पॉझीटिव्ह ॲप्रोच ठेवने योग्य वाटते.
इयत्ता पाचवीत ६०जणांच्या तुकडीत माझा ४५ वा नंबर आल्यानंतर मला आईवडील ,शिक्षक नातेवाईक यांनी बरेच सुनावले होते.आपण काही हुशार नाही हे तेव्हापासून मनावर कोरले गेले आहे ते आजतागायत.माझ्या बरोबरचे सगळे बर्याच पूढे गेले आहेत ,त्यांच्या तिथपर्यंत मी कधीच पोचू शकत नाही.पण पॉझीटीव्ह वातावरण मिळाले असते तर कदाचित थोडातरी उभा राहू शकलो असतो.सध्या माझी काय अवस्था आहे हे माझे आधीचे धागे वाचून कळेल.

अमितव आणि अजय यांचे प्रतिसाद पटले.
तसेही लहान मुलांच्या स्पर्धात 1 2 3 नम्बर काढून झाले की बाकीच्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देतात की, तो यातलाच प्रकार.
(जाता जाता लिहायचा मोह आवरत नाही, वेस्टर्न कल्चर मध्ये काँसोलेशन प्राइझ देतात, सांत्वनपर बक्षीस, आपल्याकडे प्रोत्साहन म्हणून बक्षीस देतात, बघा आहे की नाही आपले बाल मानसशास्त्र ग्रेट)

तसेही लहान मुलांच्या स्पर्धात 1 2 3 नम्बर काढून झाले की बाकीच्यांना प्रोहोत्साहनपर बक्षिसे देतात की, तो यातलाच प्रकार.
>>>>

ते सगळ्यांन नाही देत. दोघातिघांनाच देतात. थोडक्यात 3 नंबर काढले तिथे पाच सहा नंबर काढले ईतकाच त्याचा अर्थ.

वरील किश्श्यतील दहाबारा वर्षांचे वय हे जास्त घातक वाटतेय. मुलांच्या वाढत्या वयाबरोबर जशी त्यांना समज येते तसे त्यांना द्यायची वागणूक बदलायला हवी.

आजच्या तारखेला मायबोलीवर कोणी आहे का ज्याला हरणे म्हणजे काय असते हे माहीत नाही? अर्थातच शक्यच नाही. एखाद्या वयात प्रत्येकाला हे समजतेच. मग ते वय झाल्यावर कुरवाळण्यात किंवा त्या वयात ती समज येऊच नये हे बघण्यात काय अर्थ आहे?

जगातले सगळे ज्ञान तुमच्याकडेच आहे अक्कलशुन्य, म्हणून तुम्ही आज रडत बसला आहेत आणि मी जातो त्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहे.

परत एकदा सांगतो, सर्वावायल ऑफ द फिटेस्ट, ज्याच्यात धमक असते तो सर्व ऑड्स ना पुरून उरतो, पराभूत मानसिकतेचे लोक मात्र पालक, शिक्षक, परिस्थिती, अशा इतरानाच दोष देत बसतात.

वयाच्या ५-६ वर्षे अगोदर शाळेत सांगितले ते बरोबर वाटते. प्रत्येक मुलासाठी ही मर्यादा थोडीफार बदलू शकते. पण एकदा मूल ६-७ वर्षापेक्षा मोठे झाले की तुमचा मुद्दा योग्य वाटतो.>> अजय यांच्या मुद्द्याशी सहमत.
या आशयाची किशोरमधली विजया राजाध्यक्षांची एक कथा कालच वैनिल यांच्या धाग्यामुळे वाचली. असाच एक मोठा होत असलेला मुलगा अजूनही परीकथा वाचण्यात रमलेला असतो आणि एका प्रसंगामुळे तो वास्तवाशी सामना करतो आणि त्याच्या बाबांची काळजी मिटते अशी कथा होती.
मुलांवर जिंकण्यासाठी दबाव आणू नये, पण १०-१२ वर्षांच्या मुलाला शुगरकोटेड सत्य सांगायची काय गरज? तेही खेळाच्या स्पर्धांबद्दल.
मी काल हा लेख आवडल्याचा प्रतिसाद दिला होता तो आज दिसत नाहीये.

सहमत आहे. हल्ली मॉडर्न शिक्षणपद्धतीच्या नावावर काही अनावश्यक गोष्टींचे फ्याड आलेय. हे त्यातलेच एक वाटतेय. हरण्यातील दुख नाही समजले तर जिंकण्यातील मजा कशी येणार. इर्ष्या कुठून वाढीस लागणार. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सर्व भावभावनांचा अनुभव हवा. सगळं हाताळायला शिकायला हवं>><<+१

सर्व प्रतिक्रियांकरिता धन्यवाद!!

पियू, अनुश्री हा लेख थोड्या दिवसापूर्वी मी माझ्या फेसबुक ब्लॉगवर लिहिला होता आणि मैत्रिणवरही प्रकाशित केला होता. तिथे कुठेतरी तुम्ही हा लेख वाचला असण्याची शक्यता आहे. इथे आणायचा राहिला होता. तो काल आणला.

लहान मुलांना तु हरलास ,यु आर ए लुजर असे स्पष्ट सांगितल्याने काय मिळणार? >>> असे मी कुठेच म्हट्ले नाही. माझ्या लेखातील हे वाक्य कदाचित आपण वाचले नसेल "अपयश आले म्हणून मुलांची खिल्ली उडवू नये, त्यांना रागावू नये, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत त्यांना योग्य मार्गदर्शन करायला हवे. खोटा आत्मविश्वास देण्याऐवजी जास्त महत्वाचे आहे चुकांची जाणीव करून देणे, चुका कशा सुधारायच्या ह्याचे मार्गदर्शन करणे आणि चुकांची जबाबदारी घ्यायला शिकविणे. "

तू हरला आहेस' म्हणण्यापेक्षा 'दुसरा आलास' हे positive नाही वाटत का? >>> बॅडमिंटनच्या मॅचमध्ये हरलेल्या मुलाला दुसरा आला हे सांगणे खोटे सांगण्यासारखे नाही काय. परीक्षेत नापास झाले तर काय सांगणार मग??? अपयश आले तर रागावू नका हे मी म्हटलेच आहे परंतु अपयश हे अपयश नाही यश आहे हे सांगणे मात्र चूक वाटते मला.

फक्त त्यातून positive उर्जा मिळण्यासाठी थोडं शुगर कोट करून कोणी देत असेल तर मला तितकंस वावगं वाटत नाही. >>> आयुष्य कोणतेही दु:ख किंवा अपयश आपल्याला शुगरकोट करून देत नाही. आपण लहान मुलांना सकारात्मक उर्जा देतोय की त्यांना फाजील आत्मविश्वास देतोय हे एकदा नक्कीच तपासायला हवे. असा फाजील आत्मविश्वास असणारे अनेक विद्यार्थी विद्यापीठांमधून पाहिले आहे. नापास होणे हे माहितच नसल्यामुळे आपण नापास होऊ शकतो हे त्यांच्या पचनीच पडत नाही. पुढे जाऊन असे विद्यार्थी नोकर्‍या कशा करतात हे मात्र ठाऊक नाही.

सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, ज्याच्यात धमक असते तो सर्व ऑड्स ना पुरून उरतो, पराभूत मानसिकतेचे लोक मात्र पालक, शिक्षक, परिस्थिती, अशा इतरानाच दोष देत बसतात. >>>> ह्याबद्दल प्रचंड अनुमोदन.

सर्वायवल *
मोबल्यावरुन टंकताना चूक झाली. Sad

जगातले सगळे ज्ञान तुमच्याकडेच आहे अक्कलशुन्य, म्हणून तुम्ही आज रडत बसला आहेत आणि मी जातो त्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहे.>>>
तुम्ही स्पेस इंडस्ट्रीमध्ये जा ,spacex ,blue originसारखी खाजगी अवकाश संस्था काढावी असे सूचवतो.जिथे जाल तिथे यशस्वी होत असाल तर आम्हालाही भारतीय अवतारातील इलॉन मस्क बघायचा आहे.
णाणा आता ठणाणा करणार(दिवे घ्या)

सुमुक्ता, तुमचे मताशी सहमत आहे. अशा कधीही पराभव न बघितलेल्या व्यक्तींना पुढे एन्टायटलमेंटचा रोग लागतो. नकार पचवू शकत नाहीत. सगळे काही आपल्यासाठी तयारच असते असे समजतात. हार्डशिप्स, डाउनसाईड्स, त्याचे मनावर होणारे परिणाम यातून आपण घडत जातो.

मी जे बघितले ते सांगतो. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये देशभरातून मुले प्रवेशासाठी प्रयत्न करतात. हजारोंमधून फक्त दोनशे जण सिलेक्ट होतात. आणि सिलेक्ट झाल्यावर प्रत्येकजण तोर्‍यातच असतो. एकतर कलाकार, त्यातही टॉप इन्स्टिट्यूटमध्ये निवड झालेला, दुसरे असे की उत्तम कलाकार ही जमातच दुर्मिळ असल्याने लहानपणापासून आजूबाजूला दूरदूरपर्यंत दुसरा कॉम्पिटीटर नसतो, फोकस्ड कौतुक मिळायची सवय लागली असते. त्यामुळे इकडे आले की जमीनीच्या दशांगुळे वरच चालत असतात. पण पहिल्या वर्षभरात आपल्यासारखे आणि आपल्यापेक्षा दिग्गज दिसले की असली औकात कळते. मग काही निराश होतात, काही आपलं स्वत्व शोधतात, काही आहे त्याच मस्तीत दुनियेला फाट्यावर मारुन जगत राहतात. तर इथे एन्टायटलमेन्टचे रोगी बघितले आहेत. पहिल्या वर्षात इतक्या असायनमेंट असतात की जीव घशाला येतो. सगळा अहं मस्त ग्राइण्ड होतो. यातून तावून सलाखून जे निघतात ते यशस्वी होतात. जे होऊ शकत नाहीत त्यांची अवस्था वाईट होते. अवस्था वाईट होणार्‍यांत स्वतःबद्दल अवास्तव कल्पना (पॉजिटिव ऑर निगेटीव) करुन घेतलेले जास्त असतात.

म्हणून म्हणतो की मुलांना हरल्यास दूषणं देऊ नका. त्याच्यात काही कमतरता आहे म्हणून तो अपयशी झाला असे बिंबवू नका. स्वत: जे करु शकलो नाही ते त्याच्याकडून करुन घेण्याच्या ट्रॅप मध्ये अडकू नका. पण त्याला सतत फुलांच्या परडीतही ठेवू नका. जमीनीवर राहायला शिकवावे.

मुलांना निराशा आल्यास धीर देऊन एवढेच सांगावे की आजचा दिवस संपला, आता उद्या दुसरा दिवस दुसर्‍या शक्यता घेऊन येणार आहे. आपण रोज हरणार नाहीये, रोज जिंकणारही नाहीये. पण आपण तयारी करत राहीली पाहिजे. तयारी करणे हे आपले कर्तव्य आहे. यश त्यातूनच जन्म घेतं.

प्रतिसाद आवडला नाना कळा! अच्युत गोडबोल्यांच्या ' मुसाफिर' पुस्तकात त्यांनी आय आय टी मधल्या पहिल्या वर्षात आपल्याला आलेले अनुभव लिहिलेत त्याची आठवण झाली.

सर्वावायल ऑफ द फिटेस्ट, ज्याच्यात धमक असते तो सर्व ऑड्स ना पुरून उरतो, पराभूत मानसिकतेचे लोक मात्र पालक, शिक्षक, परिस्थिती, अशा इतरानाच दोष देत बसतात. >>> +१००

मुलांना निराशा आल्यास धीर देऊन एवढेच सांगावे की आजचा दिवस संपला, आता उद्या दुसरा दिवस दुसर्‍या शक्यता घेऊन येणार आहे. आपण रोज हरणार नाहीये, रोज जिंकणारही नाहीये. पण आपण तयारी करत राहीली पाहिजे. तयारी करणे हे आपले कर्तव्य आहे. यश त्यातूनच जन्म घेतं.

खुपच सुंदर वाक्य आहे हे....नाना

खुपच आवडले आहे

प्रतिसाद आवडला नानाकळा

म्हणून म्हणतो की मुलांना हरल्यास दूषणं देऊ नका. त्याच्यात काही कमतरता आहे म्हणून तो अपयशी झाला असे बिंबवू नका. स्वत: जे करु शकलो नाही ते त्याच्याकडून करुन घेण्याच्या ट्रॅप मध्ये अडकू नका. पण त्याला सतत फुलांच्या परडीतही ठेवू नका. जमीनीवर राहायला शिकवावे. >>> नक्कीच.

आजचा दिवस संपला, आता उद्या दुसरा दिवस दुसर्‍या शक्यता घेऊन येणार आहे. आपण रोज हरणार नाहीये, रोज जिंकणारही नाहीये. पण आपण तयारी करत राहीली पाहिजे. तयारी करणे हे आपले कर्तव्य आहे. यश त्यातूनच जन्म घेतं. >>> खूपच छान वाक्य आहे. मी नक्की उपयोग करीन ह्या वाक्याचा. स्वतःसाठीही आणि मुलासाठीही.

अच्युत गोडबोल्यांच्या ' मुसाफिर' पुस्तकात त्यांनी आय आय टी मधल्या पहिल्या वर्षात आपल्याला आलेले अनुभव लिहिलेत >> वाचायला हवे हे पुस्तक.

My nephew lost scholarship by 1 mark. My cousin said "We all know u have taken efforts. Do you think, u did anything less than required? Also, do you think, if u wud have got one mark more, u would have been more wise & intelligent than u r today? If answer is no, lets go & celebrate for efforts u have taken & for marks u got"

I absolutely loved his attitude!

Of course, this case if different.
We should be okay with losing if that's (activity u r doing) what u r passionate abt & if u have taken right efforts.
I would not call it coming second as well. Its fine to lose, I feel. Also, it toughens you.
Being on top feels good.. but personally I don't see a need to be at top (unless that's what one wants). I prefer to aim at happiness & satisfaction through doing right & taking right efforts & happiness through simpler things in life.
Of course, to each his/her own.

चांगला लेख सुमुक्ता,

दोनच जणांच्या धावण्याच्या स्पर्धेत दुसरा आलो सांगत आलेला मुलगा हे एक जोक म्हणून ऐकले /वाचले होते.

बॅड्मिंटन स्पर्धेत हारल्यावर मुलगा निराश झाला आणि त्याला प्रोत्साहन पर म्हणून दुसरा आला सांगणे वेगळे आणि सरसकट दुसरा आला सांगणे वेगळे

हार स्विकारता यायला जमले पाहिजे. अंगी खिलाडूवृत्ती बाणवता आली पाहिजे. आपण हरलो असताना समोरचा आपल्यापेक्षा वरचढ असू शकतो त्याकरता त्यानेही जीवतोड मेहनत घेतलेली असते हे समजून उमजून स्विकारता आले पाहिजे.

इंग्रजीत ज्याला Carrot and stick policy म्हणतात तशाप्रकारे सम्यकपणे तारतम्याने आपापल्या मुलाशी वागता येणे सहज शक्य आहे.

प्रत्येकवेळी हे टोक नाही तर टोक गाठायलाच हवे असेही नाही.

People may not remember exactly what you did, or what you said, but they will always remember how you made them feel. ...

मुलांकरताही आपण शब्द कोणते वापरतो हे फार महत्वाचे नसावे

Pages