मायबोलीवर आवडत्या लेखकाचे चाहते (Followers/Following) होण्याची सोय

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
<1’

मायबोलीवर आवडत्या लेखकाचे/लेखिकेचे चाहते (Followers/Following) होण्याची नवीन सुविधा सुरु झाली आहे.

चाहते कसे व्हायचे?
मायबोलीवर प्रत्येक पानावर खाली लेखकाचे नाव, प्रोफाईल चित्र आणि लेखकाने दिले असल्यास छोटा मजकूर असतो. त्या खाली "यांचे चाहते व्हा" असे बटन असेल ते वापरून कुठल्याही लेखकाचे चाहते होता येईल. चाह्ते झाल्यावर ते बटन त्या ठिकाणी दिसणार नाही. चुकून मोबाईलवर unfollow होऊ नये म्हणून हे केले आहे. Follow/Unfollow ही सुविधा एकाच Toggle होणार्‍या बटनाने प्रत्येक व्यक्तिच्या प्रोफाईलमधेही आहे. तिथूनही Follow/Unfollow करता येईल.

तुम्ही एखाद्या लेखकाचे चाहते झाल्यावर तिथेच त्या व्यक्तीचे किती चाहते आहेत त्याचा आकडा दिसू लागेल. ज्याना ० चाहते आहेत तिथे काहीच दिसणार नाही. म्हणजे यांचे ० चाहते आहेत असे नविन लेखकांच्या प्रोफाईलवर दिसणार नाही.

तुम्ही चाहते झाल्यावर तुमच्या प्रोफाईलमधे "आवडते" अशी टॅब आहे तिथे तुम्हाला आवडणार्‍या सगळ्या लेखकांची (तुम्ही ज्यांचे चाहते आहात त्यांची) यादी दिसेल. ती वापरूनही तुम्ही एखाद्या लेखकाला आवडत्या यादीतून काढू शकाल.

तुमच्या प्रोफाईलमधे "चाहते" अशी टॅब आहे तिथे तुम्हाला तुमचे एकूण चाहते आणि त्यांची यादी दिसेल.


मी कुणाचा चाहता /चाहती झाल्याचा मला काय फायदा?

१. तुमच्या आवडत्या लेखक्/लेखिकेला प्रोत्साहन हा सगळ्यात मोठा उघड फायदा आहे. इथे मायबोलीवर तुम्हाला विनामूल्य चांगलं वाचायला मिळतं, ते आवडतंय हे त्या लेखक / लेखिकेला आपण प्रतिसादातून सांगतोच, पण मी तुमचा/तुमची अगदी पंखा आहे हे कळाल्यावर त्याला/तिला नवीन लेखनाला अजून उत्साह येईल. या बरोबर आणखी फायदे आहेत.
२. सध्या तुम्ही ज्या ग्रूपचे सभासद आहात, त्यातलेच नवीन लेखन "अजून वाचायचंय" मधे दिसते. पण तुमच्या आवडत्या लेखकाने , तुम्ही ज्याचे सभासद नाही अशा ग्रूपमधे लेखन केले तर ते "अजून वाचायचंय" मधे दिसत नाही. पण या नवीन सुविधेमुळे तुमच्या आवडत्या लेखकाचे लेखन ७ दिवस (किंवा तुम्ही वाचेपर्यंत) "अजून वाचायचंय" मधे वर दिसत राहील. उदा. तुम्हाला राजकारणाच्या ग्रूपमधे सामील होण्याची इच्छा नाही पण तिथे "लोकमान्य " हि आयडी खूप छान लिहिते तर फक्त त्याच आयडीचे चाहते होऊन त्यांचे नवीन लेखन तुम्हाला कळू शकेल.
३. मायबोलीवरंच सगळंच वाचायला आपल्याला नेहमीच वेळ नसतो. आणि असला तरी सगळं सगळ्याना वाचायला आवडतं अस नाही. या सोयीमूळे "जो जे वांछिल तो ते लाहो" च्या थोडे जवळ आपण जातो आहोत.

मला आवडीच्या लेखकाचं नवीन ते वाचायचंय. जुनं मुद्दाम वर काढलेले नको.

"कालीदास" ही आयडी खूप छान कविता करते /करायची. तुम्ही त्यांचे चाहते झालात. पण बर्‍याच वर्षात त्यांनी मायबोलीवर काही लिहले नाही. अचानक काही नवीन मायबोलीकरांना त्यांच्या कविता सापडल्या आणि त्यांनी भराभर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. किंवा स्वतः कालीदासांनीच प्रतिभा आटल्यामुळे नुसत्या प्रतिक्रिया देऊन ते लेखन वर आणायचा प्रयत्न केला. तर ते लेखन वर येईल का?
नाही. लेखन केल्यावर फक्त ७ दिवसच ते "अजून वाचायचंय" मधे वर दिसेल. आणि तुम्ही त्या पानाला भेट दिली की त्याची लिंक "अजून वाचायचंय" टॅबवर दिसायची बंद होईल. मूळ ग्रूपमधे लेखकाचा मूळ धागा पूर्वीप्रमाणेच कायमचा दिसत राहिल.

या सोयीत आवडीच्या लेखकाचे नवीन लेखन असेल तरच दिसते. ज्या पानावर लेखकाच्या नुसत्या नवीन प्रतिक्रिया आहे ती पाने या सोयीत दिसत नाहीत. प्रतिक्रिया मायबोलीवरच्या इतर सोयीत पूर्वीसारख्याच दिसतील. त्यात बदल नाही.

"माझ्यासाठी नवीन" मधे कधी दोन तर कधी एक भाग दिसतो. थोडे स्प्ष्ट कराल का?

वरचा भाग
आवडत्या लेखकांचं कुठल्याही ग्रूपमधलं (तुम्ही ग्रूप सभासद असा वा नसा) , न वाचलेले, सार्वजनिक लेखन
खालचा भाग
तुम्ही सभासद असलेल्या ग्रूपमधलं (लेखक तुमचा आवडता असो वा नसो), न वाचलेले, सार्वजनिक+खाजगी लेखन
(यात बदल नाही. सध्याची सुविधा. तुम्ही अजून कुणाचे चाहते नसाल तर पूर्वीप्रमाणे फक्त हाच भाग दिसत राहील)

ही सुविधा वाचकाला "माझ्यासाठी नवीन" टॅब अधिक उपयोगाची व्हावी म्हणून आहे. "मायबोलीवर नवीन" या टॅबवर सगळे लेखन पूर्वीप्रमाणेच कालमानानुसार दिसत राहील. त्यात काही बदल नाही.

लेखकांसाठी आपले कुणीतरी नुसते वाचकच नाहीत तर चाहते आहेत ही एक सुखावह भावना असते. या सुविधेमुळे त्या चाहत्यांपर्यत पोहोचायची आणखी एक सुविधा आपण लेखकांना देतो आहोत. या सुविधेला येणारा प्रतिसाद पाहून भविष्यात चाहत्यांना नोटीफिकेशन मिळेल असे करायचा मानस आहे. त्यामुळे जे नियमीत मायबोलीवर येऊ शकत नाहीत अशा चाहत्यानाही आवडत्या लेखकाचे नवीन लेखन कळू शकेल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अरे किती तो विचार करायचा.. उसासे टाकणे सोडा, लिहायला लागा गुपचूप..... इथे लिहिणे, व्यक्त होणे प्राथमिकता आहे की चाहते मिळवण्याची स्पर्धा आहे? जो इतकाही छोटासा विचार करु शकत नाही त्याने न लिहिलेले बरे....

<एखाद्याने लेखन केलाय पण त्याचा एकही चाहता नाहीये त्यांना वाईट पण वाटू शकत. कदाचित औदासिन्य पण येऊ शकेल "अरे मी एवढे लेख लिहिले आणि माझा एकही चाहता नाही "हि गोष्ट एखाद्याच्या मनाला पण लागू शकते .>

याच लॉजिकने अमक्याला त्याच्या लेखनावर किती प्रतिसाद मिळतात. मला मिळत नाहीत, म्हणूनही औदासीन्य येईल, मनाला लागेल. तेव्हा प्रतिसादसुद्धा फक्त लेखकाला आणि त्या त्या प्रतिसाददात्यालाच दिसावेत.

नवीन लेखनात आपल्याला आधी काय दिसायला हवंय, याची "चाहते" होणं ही सोय आहे. ती कोणी कशी वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न.

नवीन लेखनात आपल्याला आधी काय दिसायला हवंय, याची "चाहते" होणं ही सोय आहे. ती कोणी कशी वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न.>>म्हणुनच तर मी लिहिलंय <<आणि तसही ज्यांचं लेखन मला आवडत त्यांचा एखादा आवडलेला लेख मी "निवडक दहात " टाकते. अशाने त्यामुळे त्यांच्या प्रोफाइल वर जाणं सुलभ होत आणि त्यांनी लिहिलेले रिसेन्ट ( नवीन ) लेख पण वाचता येतात. त्याकरता मला स्वतःला चाहते ची सोय असावी असं वाटत नाही.>> हा माझा प्रश्न आहे . शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहेच . तुम्हाला वाटत चाहते असावेत मला वाटत गरज नाहीये . विषयच संपला

सुजा,
वेमा नि मागे सांगितले होते की fb -फॉलो फिचर प्रमाणे माबो वर फिचर आणायचा विचार आहे,
म्हणजे मी ज्यांचा चाहता असेन त्याने माबो वर कुठेही प्रतिसाद दिला तर मला इंटिमेशन मिळेल.
या पूर्ण फिचर कडे जाण्याचे पाहिले पाऊल म्हणून "चाहते" ही सोय केली आहे.
ती कदाचित आजच्या स्वरूपात , आजच्या घडीला तुम्हाला खास उपयुक्त वाटत नसेल, पण भविष्यात उपयोगी वाटू शकेल.

सिम्बा अगदीच मान्य . ती सोय ज्यांना उपयुक्त वाटेल ते ती सोय वापरतील ज्यांना उपयुक्त वाटणार नाही ते वापरणार नाहीत . हे इतकं सिम्पल आहे . पण म्हणून एखाद्याने त्याच मत पण व्यक्त करू नये का ? मला ती सोय उपयुक्त वाटत नाही असं मी माझं मत मांडलेलं आहे. बाकी ऍडमिनच ठरवणार आहेत जे काय करायचं आहे ते . हे पण मला माहिती आहे . माझ्यापुरता तरी हा विषय संपलेला आहे Happy

चाहते होणे हा इतका मोठा प्रकार आहे का? मला वाटत नाही की आपण ज्याचे जिचे चाहते आहोत त्यांचे आपण सगळे गोड मानून घेऊ. जर त्या आयडीने काहीतरी विचित्र लिहिले तर चाहते त्याला सूनवणारच. किंवा वाटले की नाही बाबा हा आयडी तेवढा ग्रेट लिहीत तर त्याला अन- चाहता पण करतील.
ही फक्त लिखाण वाचण्याची सोय म्हणूनच मी पाहतो. इतका बाऊ करायची गरज वाटत नाही

वेमा,
चाहते व्हायची सोय दिलीत तशी बहिष्कृत करायची सोय करणे योग्य ठरेल का?
मला माहीती आहे की हा मुद्दा वादग्रस्त आहे. पण बहिष्कृत करणाऱ्यांची नावे जाहीर न करता केवळ आकडा जाहीर करता येईल. आपल्या घसरलेल्या पत मानांकनाने आयडी सुधारतील अशी अपेक्षा बाळगणे योग्य वाटत असेल तर या सुविधेचा विचार व्हावा. सुधारणा दिसल्यास बहिष्कृत अनफाॅलो करून मानांकन सुधारेल ही सुविधाही द्यावी .
ही सुविधा दिल्यास गैरवापर होण्याचाही धोका आहे. तरी साधकबाधक विचार करून या मुद्याचा विचार व्हावा ही विनंती.

सर्वरवर येणार्‍या अपेक्षीत ताणामुळे बहिष्कृत करायची सोय देण्याचा सध्यातरी विचार नाही, हे अगोदर सांगितले आहे.

>> बरं.. मग निदान प्रतिसाददात्याचं नाव प्रतिसादाच्या सुरुवातीला दिसायची सोय?

Pages