वेडा

Submitted by ऑर्फियस on 12 November, 2017 - 01:10

शहराच्या कडेचा भाग, अगदी गर्दीचा नाही पण सुनसानही नाही. रात्रीची मात्र जास्त वर्दळ असायची. सर्व गर्दी ट्रक ड्रायव्हर्सची. लांबच्या पल्ल्याच्या गाड्या जाणारा मुख्य रस्ता जवळच होता. फेटे घातलेली, दाढी राखलेली, रगेल पण कळकट माणसे तेथे येत. बाजुलाच जुनाट वस्ती होती. अगदी झोपड्या म्हणता येणार नाही पण पत्र्याची बर्‍यापैकी बांधलेली घरे होती. बहुतेक जण गोदामात काम करणारे कामगार. समोरच्या रेल्वे यार्डात मालगाड्या येत. तेथे हमालकाम करणारे. खाक्या चड्ड्या आणि बनियन घालून दिवसभर राबल्यावर शिणवटा घालवण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला काहीसे आत असलेले रंगरावचे हॉटेल. ऐसपैस. आत बाहेर भरपूर जागा. आणि सारे काही पुरवणारे. सात नंतर अंधारल्यावर येथे उजेड पडत असे. ट्रक थांबवून आत आलेली घामट वासाची माणसे आधी कोपर्‍यातल्या नळापाशी जाऊन नळाखाली डोकेच धरीत. त्यानंतर गल्ल्यावर बसलेल्या रंगरावकडे पाहून हात हालवित. अक्कडबाज मिशांच्या, आडव्या अंगाच्या, पिंगट केस रंगवलेल्या रंगरावला कुठल्या गिर्‍हाईकाला काय हवे असते याचा अचूक अंदाज असे. मग सस्त्या गावठी दारूच्या ग्लासापासून ते आत झगमगणार्‍या, नारिंगी पाण्याने शोभणार्‍या नखरेल काचेच्या बाटलीपर्यंत सारी सोय रंगराव करीत असे. अंगाला घाम फोडणारी तिखटजाळ कोंबडी दारुबरोबर ओरपली की अनेकांची दुसरी भूक जागी होत असे. मग नाकावर बोट टेकून इशारे केले जात. त्यासाठी मात्र रंगरावने जरा दूर व्यवस्था केली होती. एका चाळवजा इमारतीत त्याचा हा धंदा चाले. त्याबरोबर ज्याला गांजा पाहिजे त्याची ती देखील गरज भागवली जात असे. बाजूने गाडी गेली कि तिच्या उजेडात झक्ककन रंगवलेले चेहरे खिडकीत दिसत. पुन्हा अंधार होत असे. अगदी पहाटे आपले सारे शौक भागलेली माणसे ट्रक घेऊन पुढच्या मार्गाला लागत. रंगरावच्या बुडाखाली नोटांची पुडकी वाढत. असला धंदा करताना सारे काही आलबेल असणे शक्यच नव्हते. यासाठी जरूर असणारा निर्घृणपणा रंगरावाकडे पुरेपूर होता.

कितीही दारु झोकली तरी पैशाच्या बाबतीत चलाखी करण्याची त्या रगेल ट्रकड्रायव्हर्सचीही छाती नव्हती. रंगराववर दारुच्या नशेत चाकू काढून चाल केलेला ट्रक ड्रायव्हरने सपाटून मार खाल्ल्याच्या कथा लोकांमध्ये अजुनही घोळून घोळून सांगितल्या जात. आणि तो ट्रकड्रायव्हर पुढे नाहीसाच झाला होता. त्याचे काय झाले याबद्दल नाना प्रवाद होते. कुणी त्याचे प्रेत रेल्वे रुळावर पाहिल्याचे सांगत. कुणी त्याचे गाडीने अनेक तुकडे झाल्याचे सांगत. तेव्हापासून रंगरावची त्या भागात जबरदस्त दहशत निर्माण झाली होती. चाळीतली रंगरंगोटी केलेली एकही मुलगी पळून जाण्याचे धाडस करीत नसे. आजवर एकाच मुलीने ते धाडस केले होते. लांबचा शहरात जाऊन रंगरावने तिला धरून आणले होते. सर्वांसमक्ष तिचे डोके भादरून तिला विरूप केले होते. भेदरून हा प्रकार पाहणार्‍या बाकीच्या मुलींना जर कुणी पुन्हा असे केले तर डोक्यावर चालणारा वस्तरा गळ्यावर चालेल असा सज्जड दम दिला होता. वस्तीतली माणसे रंगरावच्या वाटेला जात नसत. रंगराव काय करेल याचा नेम नसे. घरातल्या बायका, मुली तर त्याला घाबरूनच असत. अशातच तो वेडा तेथे बसू लागला होता. रंगरावच्या हॉटेलसमोअरच्या वडाच्या झाडाखाली, जणू वडातूनच उगवल्यासारखा. कुठून आला कुणालाच ठावून नव्हते आणि कळणेही शक्य नव्हते. तो बोलत नसे. काही विचारल्यास फक्त खिदी खिदी हसत असे. रस्त्याने वा़जंत्री जात असताना त्यासोबत याचाही नाच सुरु होई. वाजंत्री निघून गेल्यावरदेखील हा नाच बराचवेळ सुरु राहात असे. ट्र्क आले, गाड्या आल्या की धावत धावत जाणे, गाड्यांची साफसफाई करणे, पाण्याने धुणे, पुसणे ही कामे करण्याइतकी त्याला अक्कल होती. हातात पाचदहा रुपये पडले की स्टेशनपलिकडे रुळ ओलांडून गेले की एका वडेवाल्याकडे जाऊन चार दोन वडापाव घेऊन वचावचा खाणे हे त्याचे जेवण. पुन्हा परत वडाखाली बस्तान. चार दोन दिवसांनी कधीतरी स्टेशनातल्या नळाखाली अंघोळ. पावसाळ्यात पुन्हा स्टेशनच. स्टेशनच या वेड्याचे घर होते.

नाही म्हणायला रंगरावच्या चाळीतली एक मुलगी त्याला कधीतरी जेवण देऊन जात असे. हा वेडा म्हणजे रंगरावचा एक विरंगुळा होता. रंगरावला हुक्की आली म्हणजे तो वेड्याला बोलावत असे आणि हॉटेलातल्या ग्रामोफोनवर ढोलकीच्या तालावरची रंगेल गाणी वाजवित असे. त्यावर वेड्याचा नाच बघणे ही तिथल्या गिर्‍हाईकांची एक करमणून होती. मग कुणी एखादे फडके त्याच्या डोक्याला पदरासारखे गुंडाळीत. याचे बाईप्रमाणे हावभाव सुरु होत. त्याच्याबरोबर झोकांड्या देत इतर जण नाचत. रस्यावर कसलिच शाश्वती नसलेल्यांच्या आयुष्यातला तो रंगरावसारखाच एक विरंगुळा होता. मात्र जेवण आणणार्‍या मुलिला ते पाहवत नव्हते. आजदेखील तसेच झाले. "कशाला नाचतोच असं हिजड्यावानी? काय मिळतं तुला हे सगळं करून?" ती चिडून म्हणाली. खी खी खी खी करून वेडा फक्त हसला. ती हताश होऊन गप्प झाली. बोलून काहीच उपयोग नव्हता. रंगरावला काही सांगण्याची मात्र तिच्यात हिम्मत नव्हती. भादरलेल्या डोक्याच्या जखमा अजून ताज्या होत्या. वस्तर्‍याच्या स्पर्शाच्या आठवणीने आजही अंगावर काटा उठत होता. डोक्यावरचा वस्तरा कधीही गळ्याशी आता असता. दूरच्या शहरातून पत्ता काढल्यावर रंगरावने पुन्हा चाळीत आणण्याआधी तिच्या घरातच आपली सर्व माणसे गिधाडासारखी तिच्यावर सोडली होती. हे कुणालाही माहित नव्हते. त्या धसक्याने आजारी आईने आठ दिवसात मान टाकली होती. बाजूच्या खेडेगावात मजूरी करून पोट जाळणार्‍या भावाने येऊन पुढे सर्व कसेबसे उरकले होते. रंगरावकडे पाहताच तिच्या शरीरात संतापाने आग पेटत असे. पण पुन्हा वस्तर्‍याच्या थंड स्पर्शाने आग विझून जात होती. कायदा खिशात बाळगलेल्या रंगरावने अवतीभवती त्याच्यासारख्याच पाशवी माणसांचा ताफाही बाळगला होता. त्याला हात लावणे अशक्य होते. मात्र तिला संताप येईल अशा गोष्टी घडत होत्या हे मात्र खरे. एक दिवस सर्वांसमोर रंगरावने चमेली अत्तराची बाटली वेड्याच्या डोक्यावर रिकामी केली. "रोज आंघोळ करायची आणि हे लावायचं" तो पोक्तपणे म्हणाला आणि बाजुची गिर्‍हाईके फिदीफिदी हसली.

त्यानंतर हे रोजचेच झाले. वेडा स्टेशनापलिकडे संध्याकाळी अंघोळ करून रंगरावकडे येत असे. मग तो त्याच्यासमोर अगदी वाकून नमस्कार करून उभा राही. रंगराव अत्तराची बाटली काढून त्याच्या डोक्यावर शिंपडत असे. गिर्‍हाइ़के ते पाहून पुन्हा फिदीफिदी हसत. चमेलिच्या घमघमाटात वेड्याची रात्र सरत असे. आज मात्र या वेड्याबरोबर मस्ती करायला रंगरावला वेळ नव्हता. एक नविन पाखरु येणार होतं. पन्नास हजारात सौदा पक्का झाला होता. स्टेशनपलिकडे गाडीतून मुलिला आणणार होते. आजवर अनेकदा हे काम केले तरी दरवेळी रंगरावला हे काम करताना ताण जाणवत असे. पैसे देऊन मुलिला आणायला इतर कुणालाही त्याने कधीही सांगितले नव्हते. तो खास त्याचा प्रांत होता. त्याबाबत तो काय करतो, कुणाशी सौदा करतो, कुठुन मुलि मिळवतो कुणालाच माहित नव्हते. तो अंधार पडण्याची वाट पाहात होता. तेवढ्यात कुठुनतरी वेडा टपकला. रंगरावचे आधी लक्षच नव्हते. मग त्याने पाहिलं बराच वेळ कुणीतरी समोर मान वाकवून उभे आहे. त्याने खिशातली बाटली काढून त्याच्या डोक्यावर ओतली. "चल पळ. याच्या बानं ठेव ठेवलीय माझ्याकडे याला रोज अत्तर लावायला" इतरांकडे पाहात हसण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला. तो खेळ पाहात असलेली माणसे यावरही हसली. वेडा निघून गेला. रंगरावने गल्ल्यावर एकाला बसवले. खिशातली पन्नास हजाराची पुडकी चाचपली. आता मिट्ट काळोख पडायला झाला होता. हळुहळु ट्रकची रांग लागु लागली होती. अंधारातला अघोरी खेळ रंगणार होता आणि कुणालाच न कळता एक कोवळे आयुष्य विखरून जाणार होते. रंगराव स्टेशनकडे चालु लागला. वेडा बसत असलेला वड ओलांडला की लांबवर गेलेल्या रुळाच्या दोन रांगा दिसत. त्यापलिकडे छोटीशी टेकडी होती. तेथेच गाडी येणार होती. रंगराववर चाकू घेऊन चाल करून आलेल्या ड्रायव्हरचे मुंडके तुटलेले प्रेत रात्री रुळावर धावताना दिसते असे अनेकांनी छातीठोकपणे पाहिल्याचे सांगितले होते. तेव्हापासून संध्याकाळी तेथे चिटपाखरूही फिरकत नसे. ते रंगरावच्या पथ्यावरच पडलं होतं. रंगराव चालत असतानाच मिशीवर हात फिरवून जुन्या आठवणीने हसला.

चालता चालता अचानक रंगराव थबकला. लांबवर कुणाचीतरी चाहूल लागली होती. त्याने झटकन मागे वळून पाहिले तर कुणीच नव्हते. रंगरावने नीट निरखून पाहिले. एक कुत्रे उभे होते. बाजूचाच एक दगड घेऊन "च्या मायला हाड" म्हणत त्याने कुत्र्यावर हाणला. दूरवर सिग्नलचा लालडोळा दिसत होता. आता घाई करायला हवी होती. तो झपझप रुळामधून चालू लागला. पुन्हा थबकला. आपला कुणीतरी नक्की पाठलाग करतंय ही भावना त्याच्या मनात वारंवार डोकावू लागली. आणि कधी नव्हे ते त्याच्या मनाच्या, अगदी कोपर्‍याच्या फटीतून चोरपावलाने भीतीने प्रवेश केला. खरंच लोकांना तो दिसला असेल? मुंडके तुटलेला तो रुळावरून धावत असेल? त्याने पावलाची गती वाढवली. एकदा तर अडखळून तो पडता पडता राहिला. आता मागे वळून बघायचे त्याला धाडस होईना. टेकडी गाठायची, पैसे द्यायचे मुलीला घ्यायचे आणि त्याच गाडीवाल्याला आपल्याला पोचवायला सांगायचे. त्यासाठी हजारभर रुपये कमी करण्याचीही त्याची तयारी झाली. अचानक कुणीतरी जवळ येत असल्यासारखे वाटू लागले. चमेलीचा वास? पण ते कसे शक्य होते? तो? इथे? एकदम कुणीतरी खालून त्याचे पाय पकडून ओढले. रंगराव रुळावर दणदिशी आडवा झाला. अंगाला कापरा सुटला होता. कुणीतरी त्याच्या पाठिवर बसले. हा चमेलिचाच वास होता. त्याने मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या गळ्यात मागुन कुणीतरी दोरी आवळली. फास घट्ट बसला. अंगावरचे ओझे जड होऊ लागले. दोरी घट्ट होऊ लागली. हो नक्कीच चमेलीचा वास. रंगरावाने श्वास घेण्यासाठी तोंड उघडले. मात्र पुरेसा श्वास घेण्याआधीच सारे संपले.

दुसर्‍या दिवशी लोकांना रुळावर वेड्याचे प्रेत पडलेले दिसले. शरीरावरून गाडी निघून गेली होती. अनेक तुकडे झाले होते. चेहरा तर चरकातून काढल्यासारखा ओळखण्यापलिकडे गेला होता. ओळखता येत होते ते फक्त फाटके कपडे आणि चमेलिचा वास. त्या फाटक्या कपड्याच्या खिशात फक्त एक जुनी मळकटलेली राखी मिळाली होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>रंगरावला मारून वेड्याने त्याला स्वतः चे कपडे घातले का?>> मलाही तसंच वाटलं. चमेलीच्या वासावरुन लोकांना वेडा वाटला असावा.

रंगरावाने श्वास घेण्यासाठी तोंड उघडले. मात्र पुरेसा श्वास घेण्याआधीच सारे संपले.>> म्हणजे नक्कीच त्या तिथल्या मुलिच्या भावाने केलं वेडा बनुन राहिला त्याच्यावर पाळत ठेवुन अन वेळ मिळाला तेव्हा मारलंं..
चेहरा तर चरकातून काढल्यासारखा ओळखण्यापलिकडे गेला होता.>> ओळखहि पुसली..
छान लिहिलय... Happy