योग ध्यानासाठी सायकलिंग ७: सज्जनगड- ठोसेघर- सातारा

Submitted by मार्गी on 9 November, 2017 - 12:19

ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर

योग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई

योग ध्यानासाठी सायकलिंग ५: चौथा दिवस- वाई- महाबळेश्वर- वाई

योग ध्यानासाठी सायकलिंग ६: पाचवा दिवस- वाई- सातारा- सज्जनगड

७: सज्जनगड- ठोसेघर- सातारा

ह्या मोहीमेचा संबंध ध्यान- योगाशी कशा प्रकारे आहे, हे इथे वाचता येईल.

३ ऑक्टोबरची पहाट. सकाळच्या वेळेत सज्जनगडवरून दिसणारा नजारा! चांगला आराम झाल्यामुळे मस्त वाटतंय. सकाळी साडेसहाला निघालो. निघताना छोटी देणगीही दिली. रात्री मोठा पाऊस झालाय, सायकल नीट असेल ना? सायकल नीटच आहे. लगेचच निघालो. पण दृश्य इतकं सुंदर आहे की, फोटो घेण्यासाठी परत परत थांबतोय. लवकरच मुख्य रस्त्याला लागलो. आता पहिला टप्पा- ठोसेघर धबधबा इथून जेमतेम दहा किलोमीटर पुढे आहे. पण हा सर्व चढ आहे. रस्ता फारच मस्त आहे आणि त्यात सकाळची निर्जन शांतता! इतक्या दूर अंतरावर असलेले चढाचे रस्ते बघताना लदाख़ची आठवण येते आहे. चढाचा काहीच त्रास नाही, आरामात जातोय. सगळीकडे अवाक् करणारे नजारे!

सलग चढ असल्यामुळे वेग थोडा कमी आहे. एका ठिकाणी चहा- बिस्किटाचा नाश्ता केला. इथे ब-याच पवनचक्क्या आहेत. थोडा जास्त वेळ लागला, पण आरामात ठोसेघरला पोहचलो. पावसाळा संपला असल्यामुळे धबधब्यात पाणी थोड कमी आहे. तरीही सुंदर दृश्य आहे. काही फोटो घेतले व परत निघालो. इथून सातारा पंचवीस किलोमीटर. आता थोडा चढ व नंतर मोठा उतार! किती डोंगराळ मुलुख आहे हा! अशा पहाड़ी निसर्गामुळेच सातारा जिल्ह्यातील इतके युवक मिलिटरीत जात असावेत. निसर्गाप्रमाणेच तिथले माणसंही घडतात. इतके डोंगर आहेत, तर लोकही‌ तसेच रांगडे व काटक असणार आणि मग ते आर्मीत जाणारच! शिवाजी महाराजांचे मावळेही असेच लोक तर होते.

ह्या पूर्ण प्रवासात असे डोंगर आणि सज्जनगड, अजिंक्यतारा व रोहीडेश्वर असे किल्ले बघताना शिवाजी महाराजांचं कर्तृत्व विशेष आठवतंय. त्यांनी हे सगळं कसं उभं केलं असणार! आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वत्र शत्रू होते, दिल्लीच्या औरंगजेबाची सेनाही विरोधात होती! तरीही त्यांनी ह्याच सह्याद्रीच्या मदतीने संघर्ष केला व यशस्वीही झाले! हा सगळा इतिहास माहित असल्यामुळे त्या वेळची स्थिती आठवतेय. आणि हे किल्ले- हे नेहमी स्वराज्यात होतेच, असं नाही. अनेक युद्धं इथे झाली आहेत. खूप मोठं बलिदान झालं आहे. समोर दिसतोय तो अजिंक्यतारा किल्ला! तो मराठी स्वराज्याची चौथी राजधानी होता! पहिली राजधानी राजगड, नंतर रायगड, तिसरी चेन्नैजवळची जिंजी जेव्हा सर्व स्वराज्य मुगलांनी घेतलं होतं व फक्त चारच किल्ले वाचले होते! आणि मग ही चौथी राजधानी झाली व महाराणी ताराबाईंच्या काळात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे स्वराज्य नव्याने आकाराला आलं आणि दूर पानिपतापर्यंत विस्तारलं. एका वेळेस तर त्याची‌ सीमा आज पाकिस्तान व अफघनिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटक गावापर्यंत होती! असो.

अजिंक्यता-याच्या आधी टनेल क्रॉस केला व साता-याला पोहचलो. इथे एका ओळखीच्या सरांकडे थांबेन. उद्याही त्यांच्याकडेच थांबेन. सातारा गावातही छोटे चढ आहेत. आज सहावा दिवसही योजनेनुसारच गेला. आता साता-यातच असलेला अजिंक्यतारा बघायचा आहे. पण संध्याकाळी त्याच सरांच्या कॉलेजात माझ्या सायकलिंग अनुभव कथनाचा एक छोटा कार्यक्रम झाला. सायकल चालवण्यापेक्षाही कठीण काम मला करावं लागलं- लोकांसमोर येऊन बोलावं लागलं. तिथे जातानाही सायकलवर गेलो, त्यामुळे एकूण सायकलिंग ४२ किमी झालं. आता अजिंक्यतारावर उद्या किंवा परवा जाईण. उद्या आधी कास पठारला जाईन. तिथे रस्ता खचला आहे, पण वन वे ट्रॅफिक सुरू आहे. काही अडचण येणार नाही. सरांकडे थांबल्यामुळे चांगला आराम झाला. ह्या मोहीमेच्या सुरुवातीपासून मनात एक टेंशन मुक्कामाची जागा शोधण्याचं होतं. काही तास सायकल चालवल्यानंतर हॉटेल शोधणं सोपं गेलं नसतं. पण ह्या वेळी प्रत्येक वेळेस मुक्कामाची काहीच अडचण आली नाही.

आजचा चढ ८४८ मीटर

पुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग ८: सातारा- कास पठार- सातारा

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत- www.niranjan-vichar.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

नेहमीचाच रस्ता आहे त्यामुळे पाठ आहे.मस्त वाटली टूर ,ठोसेघरच्या पूढे चाळकेवाडीला गेला असतात तर शेकडो पवनचक्क्या बघता आल्या असत्या.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!!