पाऊस, भूमी आणि मैथिली

Submitted by उपेक्षित on 2 November, 2017 - 03:02

*पाऊस, भूमी आणि मैथिली*

-----------------------------------------------------------------------------------------------------------

कधीपासून पावसाची झड लागलीये, हा कोकणातला पाऊस सुद्धा इथल्या माणसांसारखाच वेडा, एकदा जीव टाकला कि पूर्ण बरसूनच जाणार...

पावसाची झड अजूनही चालूच आहे, थोडी वाढल्यासारखी वाटत्ते आहे का ? असेल कदाचित. हि कातर संध्याकाळ या धो धो पडणार्या पावसाने अजूनच कातर भासत आहे. आतून कुठूनतरी गझलेचा आवाज येत आहे पण पावसाच्या जोराबरोबर तो आवाजही कमी जास्त होतोय... मेहंदी हसनचे रंजिश हि सही चालू आहे नीटसे ऐकू नाही येते पण हो तेच चालू आहे, त्यातल्या नाजूक जागा त्या दैवी मेहंदी हसनने अशा काही घेतल्या आहेत कि बास. समोर वाफाळता चहा पण गाण्याच्या नादात थोडा गार झालाय का तो ? असेल असेल कदाचित त्या मेहंदी हसनचा आवाज ऐकून तो सुद्धा शांत झाला असावा.
तू मुझसे खफा है तो, जमाने के लिये आ... वाह मजा आला बेहद्द

गाण ऐकतानाच कसलीतरी आठवण आली धावत गेलो आणि आलमारी मधले ‘भूमी’ काढले ‘परत’. कितव्यांदा वाचतोय हे मी ? छे असा कोण हिशोब ठेवतोय होय वाचण्याचा ? पण या पुस्तकाशी आपले काहीतरी नाते आहे हे नक्की.

चेन्नई जवळच्या छोट्या गावातली ती छोटी मैथिली आणि तिचे भावविश्व. पण भावविश्व तरी कसे म्हणू याला ? सामान्य मैथिलीतले असामान्यपण उलगडण्याचा हा खर तर प्रवास आहे असेच मला वाटत्ते पण हे वाटणे पण नेहमी वेगळे-वेगळे असते साला आपले मन आपल्याला हमखास धोका देते अशावेळी.

‘भूमी’ वाचताना नेहमी आत, खोलवर काहीतरी निसटून जातेय असे वाटत राहते, तरीही का वाचतो मी हे साधे, छोटेसे पुस्तक ? कि ते पुन्हा पुन्हा निसटून जात आहे ते पकडण्यातच मला सुकून वाटतो आहे ? माहित नाही...

हि लहानगी मैथिली कधी मोठी होऊच नये असे वाटते कारण जर ती मोठी झाली तर आपल्यासारखीच निरागसपणा हरवून व्यवहारी बनेल असे वाटत राहते.

मैथिली, तिची नर्स असलेली आई, मैथ्युज अंकल, पुट्टू, सेतुपती यांच्याबरोबर मी जगतोय असेच वाटत राहते इतकी ती पात्रे जिवंत आहेत. असे वाटते कि वेड्यासारखा बॉलच्या मागे समुद्रात जाणारा सेतुपतीचा तो वेडा कुत्रा मीच होतो कि काय ? इतके ते मला रिलेट होते.

निरागस पण तितकीच आपल्या मतावर ठाम असणारी मैथिली तिचे ते अवेळी समंजस होत जाणे, आईच्या मोठ्या आजारपणात तिचे जमेल तसे करणारी लहानगी आणि शूर मैथिली. किती आणि काय बोलावे तिच्याबद्दल ?

साला माझी आणि माझ्या बायकोची एक कॉमन मैत्रीण होती (म्हणजे आहे) ती पण मैथिलीच मग ती पण या मैथिली सारखीच असेल काय ? तिच्याही डोळ्यात न बोलता बरेच काही दिसायचे मला, ती पण अशीच अवेळी ‘मोठी’ झाली होती.
तिचा मुलगा आणि माझा मुलगा एकाच शाळेत आहे पण गेल्या ४ वर्षात फ़क़्त एकदाच ती आम्हाला दोघांना भेटली आहे.
का टाळत असेल ती आम्हाला ? दोन-तीनदा विचारायचा प्रयत्न देखील केला फोन वर पण समोरून काहीच प्रतिसाद नाही.

अरे ? अचानक उडत असलेल्या पाण्याने विचारांची तंद्री भंगली, रेडियो वर ‘हूर-हूर असते तीच उरी...’ लागले होते बाहेर पावसाचा जोर जास्तच वाढला आहे, नजर जाताच काळीज हलेल असा अगदी बेभान होऊन कोसळत होता तो.
छे ... कोकणातला पाऊसच असा, इथल्या माणसांसारखा, पूर्ण बरसूनच जातो...

उपेक्षित....
----------------------------------------------
टीप:- खरे तर भूमी आणि मैथिलीविषयी खूप काही भरभरून बोलायचे असते मला नेहमी पण साला शब्दच सापडत नाही कधी असो.

जाता जाता – परवा २ तारखेला जन्मलेल्या कन्येचे नाव मिथिला ठेवले आहे, भूमीचा परीणाम दुसरे काय ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा सरमिसळ झाल्ये.
भूमी बद्दल अजून विस्तारपुर्वक लिहिलेलं वाचायला आवडेल.

@ हर्पेन,

बरोबर आहे तुमचे पण साला असेच होते नेहमी भूमी बद्दल लिहायला घेतले कि किती लिहू आणि किती नको तेच समजत नाही.

किती लिहू आणि किती नको तेच समजत नाही >>>
लिहा की भरपूर
पुस्तक पहिल्यांदा कधी वाचले, काय आणि का आवडलं? मैथिलीचेच पात्र का भावले वगैरे वगैरे.

आम्हालाही कळेल उपेक्षिताचे अंतरंग Happy

जरूर,

प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद हर्पेन भाऊ