याद

Submitted by अतुलअस्मिता on 30 October, 2017 - 12:22

कवितेचे नाव: याद

वीज कडाडली अघोरी पाऊस

पिंपळ पाणावर घसरे तुषार

उतार पाण्याला की मनाला लहान

कोरड गडाडली का अवेळी तहान

आली जोरात जशी धरणफुटी

प्रसरून रंध्रात कशी पाझरली

उजाळून क्षण कशी भरली ओटी

आठवण तुझी तशी दाटून ओसरली

- अतुल चौधरी.
-------------------- --------------- -----------------------------

रसग्रहण:

वरकरणी पाहता सर्वसामन्यपणे आयुष्य जरी हसरे आणि समाधानी असे कुठल्याही तिऱ्हाईताला जाणवेल इतके सरळ भासत असले तरी काही जुन्या अशा असह्य व बोचऱ्या पराभूतातील आठवणींच्या भावनिक उमाळ्यात स्वतःचा सततच स्वतःशीच कडाडून असा संघर्ष चालू असतो. ह्या आठवणींची नकोशी असणारी पुनरावृत्ती कधी तरी मेंदूच्या कप्प्यातील आवर्तनांना हादरवून त्या अभेद्य मेंदुकवचाला मात देऊन हृदयात येऊन अंतरते तेव्हा वीज कोसळताना होणाऱ्या लखलखाटीप्रमाणे हृदयात अंधाराने प्रयत्नांती झाकून ठेवलेला तो कप्पा क्षणभर उजाळून निघतो आणि त्याच्या त्या असह्य गडगडाटीने अवेळी आलेल्या आठवणींच्या पावसामुळे मनाचा अंतर्गत ताबा ढळतो.

पिंपळपान हे विस्तीर्ण आहे, सर्व वृक्षांच्या विराटतेचे प्रतीनिधी असलेले हे ओंजळभर पिंपळपान त्या मेघवर्षावातील फक्त काहीसे मोजके असे थोडेच तुषार रोखून धरतो. त्या मेघवर्षावाच्या तुलनेत या तुषारांचे मूल्य अगदीच नगण्य परंतु तेव्हढ्यानेच विस्तीर्ण पिंपळपानाला जसा हरित ओलावा येतो तसाच या हृदयातील अचानक उचंबळून आलेल्या आठवणींनी संकुचित झालेले मन तहानेने व्याकुळ होते; फक्त आर्द्रता निर्माण करणाऱ्या त्या तुषारांनी घशाची कोरड अजूनच ठणकते, आणि मन भूतकाळात रुतून त्या तुषारांना सांधणाऱ्या मेघवृष्टीत सामावून वाहून जाते.

धरण फुटल्यानंतर तीव्र वेगाने वाहणारा पाण्याचा भरधाव व अगणित वाहू शकणारा लोंढा सर्व निर्बंध तोडून खडकावर , पाषाणावर आदळत असला तरी ज्या अनेक छोट्या बिंदूंच्या अनंत तुषारांनी ही धरणफुटीची वेळ आली ते बिंदू व तुषार मनातील सुप्त कप्प्यात सुखरूप असतात, निर्बंध नसलेल्या धरणफुटीतील पाण्याप्रमाणे त्या सगळ्याच काहीवाहून जाऊ शकत नाहीत.

धरणफुटीमुळे ह्या आठवणी काही प्रमाणात उफाळून जरी बाहेर फेकले गेल्या असे मानले तरी ते पाणी ज्या आवेगाने धारणाखाली असलेल्या दगडावर पाहिले पाझरते अन मग कोसळते, त्याप्रमाणेच या आठवणी रंध्रात प्रसरुन चिकटून बसतात अन मग थोड्या फार बाहेर येतात. हेच चिकट व चिवट क्षण पूर्वसंघर्षाची ग्वाही पटवतात. कधीतरी हा उमाळा अंधारतो व तिऱ्हाईताला पुन्हा समाधानकारक आयुष्यचा भास होतो. आठवणींच्या या धरणफुटीमुळे आंतरीक आयुष्य गहिवरून जाते, अशा आठवणींवर मात करून पुढील भवितव्याची वाटचाल सुरू करण्यापूर्वी ही याद ओसरून परत हृदयातून मेंदूच्या कप्यात जाऊन स्थिरावते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

☺️