गाव कात टाकतय

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 October, 2017 - 03:26

गाव कात टाकतय

खरं का खोटं पण
काय तरी घडतय
गाव कात टाकतय

ट्रॅक्टरच्या चकारीत
गोधुली शोधतय
गाव कात टाकतय

वसुबारसीलाही
चित्रातली गाय पुजतय
गाव कात टाकतय

मोटंवरचं गाणं
इंजिन धडधडतयं
गाव कात टाकतय

विहीर झाली पालथी
शेततळ पाणी झिरपतय
गाव कात टाकतय

मर्दानी कुस्त्या छबिने
सिनेमापुढं धापतय
गाव कात टाकतय

देवळं पडली वस
बार लई फुलारतय
गाव कात टाकतय

आरोग्य सेवेचं तीनतेरा
म्हातारं सैराट खोकतय
गाव कात टाकतयं

ढोल लेजीम बस्त्यात
बेंजो जोरात वाजतय
गाव कात टाकतय

बेकार पोरगं गावभर
विद्वतेची सेल्फी मारतय
गाव कात टाकतय

पाऊस नाय पाणी नाय
थेंबासाठी तहाणतय
गाव कात टाकतय

संडासात पाणी नाय
हागणदारीमुक्त व्हतय
गाव कात टाकतय

रामराम नमस्काराच
गूड मॉर्निंग वंदन करतय
गाव कात टाकतय

टीव्हीला डोळं लावून
घर घराशी बोलतय
गाव कात टाकतय

एक मेका धरुन होतं
गिरणीला जातं खटकतय
गाव कात टाकतय

कर्जाच्या मुंडावळयात
लग्नमंडप सजतय
गाव कात टाकतय

रीन काढून सण
असं समदं चालतय
गाव कात टाकतय

शहरी पोषाखातही
दु:खच चौरी ढाळतय
गाव कात टाकतय

खांबावरचं खंदील
अंधारच बरसतय
तरी गाव कात टाकतय

पिकलं तरी
ना पिकलं तरी
गाव रोजचं वशाळतय
कधी ढगाकडं
कधी राजाकडं
भीक घाल म्हणतय
गाव कात टाकतय

आधार असून
सर्वच निराधार
गाव टीपं गाळतय
गाव कात टाकतय

जोडणाऱ्या सडका
वाहून गेल्या
इमानाच पाणी गळतय
तरी गाव कात टाकतय

आंधळं दळतय
अन कुत्र पीट खातय
तरी गाव कात टाकतय

शब्दार्थ :-

लई = खूप
वस = ओस
खंदील = कंदील
फुलारतय = बहरतय
बस्त्यात = बांधून ठेवले
वशाळतय = ओशाळतय

दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

व्वा! सुरेख!
खरंतर 'कात टाकणे' म्हटल्यावर (मलातरी) एक चांगला बदल असंच चित्र डोळ्यांसमोर येतं पण या कवितेत तो अगदी उलट्या अर्थानं वापरला आहे.. मला हा प्रयोग (?) छान वाटला... Happy
बादवे, गोधुली म्हणजे नाही समजलो.

अप्रतीम !
विद्वतेची सेल्फी..... वा !

दत्तात्रयजी तुमच्या कल्पनाशक्तिला सलाम Happy
अतिशय मार्मिक आणि परखड वास्तव मांडलय

राहुल धन्यवाद !
माझ्या कवितेची सुरुवात
खरं का खोटं पण
काय तरी घडतय
गाव कात टाकतय

अशी आहे त्यामुळे वर वर चांगले बदल खरच चांगले आहेत का? की केवळ सूज आहे ? मतपेटी धार्जिण्या राजकारणात शेतकरी भणंग होतोय . पुढची पिढी शेती करायला उत्सुक नाही . शहरी लोक सुध्दा भाज्या किराणा घेताना विचार करतात . पण पेट्रोल, हॉटेल, नाटक , सिनेमा इत्यादी साठी पैसे येतात . शेतमालाच्या किमती उत्पादन खर्चावर आधारित नसतात .
गोधुली - सायंकाळी गाई घरी येताना उडालेली धूळ . नष्ट होत चाललेल्या गोधना विषयी आलेली ओळ .
असो हे मी व्यंगात्मक दृष्टीकोणातून लिहिले आहे .

कालाय तस्मै नमः

चांगलं चितारलंय.... गावाचं कात टाकणं...

राहुल , वैभव, शशांकजी खूप धन्यवाद !

हे असेच राहिले तर अनंतजीच्या विस्कळखाइच्या आधी ही विस्कळखाइ होइल असे वाटते .