चिंता

Submitted by विद्या भुतकर on 27 September, 2017 - 23:21

काल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,"झोप आता सकाळी उठत नाहीस". काही वेळाने म्हणाला,"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. ". म्हटलं,"मग?". म्हणे,"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही." त्याला विचारलं,"तू घरी आणलं होतंस का?". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं. एकतर बाकीचे व्याप कमी असतात म्हणून या सर्व गोष्टींचेही लक्षात ठेवायचे?

त्यात कालच आम्ही गावातल्या लायब्ररीची पुस्तके परत करून आलो होतो, तीही २४ होती. अचानक नवऱ्याला आठवलं की परत देताना २५ दिली आहेत. आता तो तरी किती लक्षात ठेवणार? एकूण काय की आम्ही हे अशी पुस्तके सांभाळणे आणि वेळेत परत देणे यात बरेच घोळ करतो त्यामुळे शाळेतून अजून घेऊन न येणे हेच उत्तम असं मुलीला सांगितलं आहे. पण स्वनिकचा शाळेतील पहिलाच महिना आहे त्यामुळे त्याला हे सर्व नवीनच. आता त्याला अजूनच चिंता पडली की ते पुस्तक गावातल्या लायब्ररीत गेलंय. आता तेही नाही मिळालं तर पुढे काय? बिचारा चांगलाच काळजीत होता. शेवटी मी त्याला समजावलं, आपण उद्या जाऊन घेऊन येऊ आणि मग तू शाळेत दे. त्याला हे लगेच पटलं नाहीच. दोन चार वेळा समजावून सांगितल्यावर झोपून गेला.

आज पुस्तक आणून दिलं आणि ते त्यानं लगेच बॅगमध्येही टाकलं. झोपताना त्याला म्हटलंही,"आता नाही वाटत ना काळजी? झोप निवांत.". "हो झोपतो, आता मी काळजी नाही करतेय", असंही म्हणाला.

किस्सा छोटाच आणि त्यात झालेला घोळही लहान. उलट आज गावातल्या लायब्ररीतून ते पुस्तक आणायला गेल्यावर नवऱ्याला कळलं की हे असं नेहमी होतं आणि ते लोक दार महिन्याला अशी जमा झालेली पुस्तकं शाळेला परत नेऊन देतातही. आता हे सर्व पाहिलं तर किती सोप्प वाटतं. पण काळ रात्री स्वनिकच्या जीवाला किती घोर लागला होता. मला अजूनही आठवतं शाळेचं किंवा लायब्ररीचं पुस्तक मिळत नाहीये म्हणून चिंतेत कितीतरी रात्री मी अशा घालवल्या आहेत. एका बाईंचं,'शामची आई' सापडत नव्हतं मला. कितीतरी महिने मला त्याची चिंता पडली होती. आता हे सर्व खूप वेडं वाटतं, पण त्या वयात ती किती मोठी काळजी होती.

चप्पल हरवली, शाळेला उशीर झाला, गृहपाठ झाला नाहीये, डबा शाळेतच राहिला, डबा घरी राहिला, पेपरला अभ्यास झाला नाहीये, केसांना काळ्या रिबिन्स हव्या होत्या-लालच लावल्या आहेत, अशा कितीतरी चिंता घेऊन जगले. निदान त्यांनी तरी तसं राहू नये असं वाटतं. पोरांना या वयात खरंच अशा छोट्या गोष्टींची चिंता करावी लागली की वाईट वाटतं. ते जुने दिवस आठवतात. अशावेळी आपण केवळ त्यांना शांतपणे समजावून तो प्रश्न सोडवून दिला तरी किती दिलासा मिळतो बिचाऱ्यांना, नाही का?

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला लेख,
खरेच आपण कधी कधी किती शुल्ल्क गोष्टींच टेंशन घेतो पण ते शुल्लक आहे हे नंतर कळ्ते पण जोवर ते सगळे निस्तरत नाही किंवा काही ऊपाय सापडत नाही तोवर मनाची खुप घालमेल होते.

खरेच आपण कधी कधी किती शुल्ल्क गोष्टींच टेंशन घेतो पण ते शुल्लक आहे हे नंतर कळ्ते पण जोवर ते सगळे निस्तरत नाही किंवा काही ऊपाय सापडत नाही तोवर मनाची खुप घालमेल होते. >>+१

मी शाळेत जायच्या दिवसात निबंधाच्या वह्या वेगळ्या असायच्या. अधून मधून 'उद्या निबंधाच्या वह्या आणा'0 ही सूचना आदल्या दिवशी बाई द्यायच्या. मी हमखास विसरायचे. वर्गात गेल्यावर इतरांच्या वह्या बघितल्या की ट्यूब पेटायची आणि मी भयंकर घाबरायचे. घाबऱ्याघुबऱ्या होऊन अजून कोणी आणली नाही याची चौकशी व्हायची. कोणीच असे नसेल तर आता एकटीनेच वर्गासमोर उभे राहून शिक्षा भोगायची या कल्पनेने अजून जीव घाबरा व्हायचा. कधी कधी बाई विसरून जायच्या, तो पूर्ण तास बाईंना आठवलं तर.. या धाकधूकीत जायचा..... आता हसायला येते.

मला अजूनही आठवतं शाळेचं किंवा लायब्ररीचं पुस्तक मिळत नाहीये म्हणून चिंतेत कितीतरी रात्री मी अशा घालवल्या आहेत. > +१

चप्पल हरवली, शाळेला उशीर झाला, गृहपाठ झाला नाहीये, डबा शाळेतच राहिला, डबा घरी राहिला, पेपरला अभ्यास झाला नाहीये, केसांना काळ्या रिबिन्स हव्या होत्या-लालच लावल्या आहेत, अशा कितीतरी चिंता घेऊन जगले. निदान त्यांनी तरी तसं राहू नये असं वाटतं. पोरांना या वयात खरंच अशा छोट्या गोष्टींची चिंता करावी लागली की वाईट वाटतं. >>>+१

चांगलं लिहिलंय. रीलेट झालं.

छान लिहिले आहे. लहान मुलांचे विश्व लहान असते. आपल्याला ज्या चिंता छोट्या वाटतात त्या त्यांना खूप मोठ्या वाटतात. त्यांना वाटणार्‍या चिंता हे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठीचे ट्रेनिंग असते.

त्यांना वाटणार्‍या चिंता हे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठीचे ट्रेनिंग असते.>> +1
किती त्या पोराची चिंता तुम्हाला ☺

छान लेख !

त्यांना वाटणार्‍या चिंता हे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठीचे ट्रेनिंग असते. >>> +७८६ त्यांच्या चिंता शेअर करून हलक्या कराव्यात, त्यांचा सर्वस्वी भार वाहायची चिंता करू नये. तुम्ही आयुष्यभरासाठी पुरत नाही त्यांना, आणि मग अचानक मोठे होण्यापेक्षा त्यांना हळूहळू मोठे होऊ द्यावे

त्यांना वाटणार्‍या चिंता हे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठीचे ट्रेनिंग असते.>> +1

इथुनच तर सुरुवात होते 'डिल' करण्याला Happy

>>चप्पल हरवली, शाळेला उशीर झाला, गृहपाठ झाला नाहीये, डबा शाळेतच राहिला, डबा घरी राहिला, पेपरला अभ्यास झाला नाहीये, <<<<
ह्या सगळ्यात मला तर अजूनही, पेपरला अभ्यास झाला नाही असे स्वप्न अजूनही पडते जर मी कुठल्याही चिंतेत झोपले तर...
अगदी दरदरून घाम फुटून झोपेतून उठून आठवते की, मी परीक्षेच्या हॉल मध्ये नाही आहे ना...
अर्ध्या अधिक जनतेचे हे कॉमन स्वप्न असेल....

कायच्या काय चिंता व्ह्यायची मला अभ्यास न केल्याने .. तरी अभ्यास नाही करायचा पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत हि सवय काही सुटली नाही. खास करून इतिहासाचा पेपर मला कधीच आवडला नाही.... कोण काय कधी जगले, मेले इतकं बोरींग होते ना... Proud

>ह्या सगळ्यात मला तर अजूनही, पेपरला अभ्यास झाला नाही असे स्वप्न अजूनही पडते
हे मलाही पडते. मला वाटायचे इतक्या वर्षांनी मलाच का पडत असावे. पण तो नेहमीच ईंजिनियरींगचा गणिताचा पेपर असतो ( M3) आणि स्वप्न संपताना दरदरून घाम वगैरे फुटत नाही पण यावर्षी परत एकदा द्यावा लागणार , म्हणजे परत त्याचा अभ्यास करणे आले, असे वाटत राहते.

परीक्षेचे स्वप्न जवळपास प्रत्येकाला पडते. हा स्वतण्त्र धाग्याचा विषय ठरावा. काढूया का?

ह्या सगळ्यात मला तर अजूनही, पेपरला अभ्यास झाला नाही असे स्वप्न अजूनही पडते
हे मलाही पडते.>> मलापण. आणि नेमका गणिताचाच पेपर असतो स्वप्नातही Sad

सगळ्यात कठीण म्हणजे शाळेतून आले की बागडायचे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी अभ्यास बाकी म्हणून टिचर्स रागावणार म्हणून आपले डोके खायचे. Lol

खरेच आपण कधी कधी किती
शुल्ल्क गोष्टींच टेंशन घेतो पण
ते शुल्लक आहे हे नंतर कळ्ते पण
जोवर ते सगळे निस्तरत नाही
किंवा काही ऊपाय सापडत
नाही तोवर मनाची खुप
घालमेल होते. >>>+१
खरंय