राखण

Submitted by दत्तात्रय साळुंके on 16 September, 2017 - 07:30

राखण

हिरवच लुगडं तिनं, चापुनचोपुन नेसलं
तंग हिरवीच चोळी, मना हिदोंळं बसलं

असं गोंधनं बाई, ताटी ज्वारीच्या गोंधलं
पळ्हाटीच्या पोटी, दिसा चांदण दाटलं

नवी नवरी हळद, अंग पिवळं अजून
तालेवाराची लेक, जाई मळा थिजून

असं रुपडं साजिरं, वारा झोंबाझोंबी करी
रानपाखराची उगा, मळयावर भिरभिरी

दांडातलं उनाड पाणी, रोजचचं सोकावलं
रुप मादक पहाया, झुकू , झुकू डोकावलं

सोनसळसळ अशी, बेहोषी पानोपानी
नार नवतीची उभार, कशी करावी राखणी

दत्तात्रय साळुंके

शब्दार्थ : -
गोंधनं = गोंदणे ( टॅटू )
गोंधलं = गोंदूण घेतले
नार = स्री
नवती = नव युवती
चापुनचोपुन = व्यवस्थित अंग झाकेल असे घट्ट
पळ्हाट = कपाशी
ताट = बुंध्यापासून कणसा पर्यंतचा भाग
दांड = शेताला पाणी घालणारा पाट
सोनसळसळ = पानांची सोनेरी उन्हातली सळसळ , सोन्यासारख्या पानांची सळसळ .

Group content visibility: 
Use group defaults

राहुलजी खूप , खूप धन्यवाद उत्तम प्रतिसादासाठी, या पुढे शशांकजीचे अनुकरण करेल . काही शब्दार्थ येथे देत आहे . गोधनं हा शब्द ग्रामीण भागात गोंदणे ( टॅटू सारखे ) या अर्थी वापरतात. गोंधलं हे गोंदूण घेतले या अर्थी वापरतात . पळ्हाट = कपाशी .