आळवणी

Submitted by पुरंदरे शशांक on 14 September, 2017 - 02:02

आळवणी

तुजविण वाटे । असार संसार । व्यर्थ बडिवार । भोवताली ।।

तुज नाठविता । त्रासले हे मन । व्याकुळले प्राण । तुझ्याविना ।।

सुटू पाहे धीर । भाराभार चिंता । घाला अवचिता । पडिला का ।।

नव्हे अाराणूक । तुजविण देवा । धाव रे केशवा । लागवेगी ।।

धाव धाव अाता । वेगे हात देई । येई लवलाही । ह्रदंतरी ।।

सुखावेल जीव । रूप देखताच । अाळी करी साच । बालकाची ।।

जोडोनिया कर । वंदितो चरणा । गोपिका रमणा । कृपा करी ।।
....................................................
बडिवार = मोठेपणा, बडेजाव
घाला पडणे = हल्ला होणे
आराणुक = सुख
लागवेगी = त्वरित
लवलाही = ताबडतोब
ह्रदंतरी = ह्रदयात
आळी = हट्ट
साच करी = पूर्ण कर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक एक शब्द |
मौतिक अवघे |
कौतिक तयाचे |
करु किती |

अप्रतिम !