थँक्यू बायको !

Submitted by विद्या भुतकर on 11 September, 2017 - 23:12

या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात जायचं होतं. नुकतीच नवी नोकरी लागल्याने मला जास्त रजा मिळणार नव्हतीच. पण मुलं कंटाळली होती आणि त्यांना केव्हा एकदा भारतात जाऊ असं झालं होतं. असेच एक दिवस नवऱ्याला म्हटले तुम्ही तिघे पुढे गेला आणि मी १५ दिवसांनी आले तर? गंमत म्हणून बोललेला हा विचार पुढे प्रत्यक्षात आला. मुलं आणि संदीप पुढे जाणार आणि मी नंतर जाणार असं ठरलं. अर्थात हे सोप्पं नव्हतंच.

मुळात दोन मुलांना घेऊन ३०-३२ तास एकट्याने प्रवास करणे अतिशय कंटाळवाणं आणि त्रासदायक काम आहे. त्यात एअरपोर्टच्या सिक्युरिटी, सामान, विचित्र वेळा, बेचव जेवण वगैरे सर्व आलंच. मी एका चांगल्या बायकोचं कर्तव्य करत नवऱ्याच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला, त्याला ढिगाने सूचना दिल्या आणि पोरांना बाय करताना ढसाढसा रडलेही. सर्वजण नीट घरी पोचले, आठवडाभर राहिलेही पुण्यात. मीही न राहवून १५ ऐवजी ७च दिवसात पळून गेले.

आता या सात दिवसांत मी इकडे दुःखात सतत टीव्ही बघत, अजिबात स्वयंपाक वगैरे न करता दिवस काढत होते तर तिकडे नवऱ्याला ढिगाने मदत होती. सासू-सासरे, दीर-जाऊ, घरी कामाला येणाऱ्या मावशी, एकदा तर माझ्या मैत्रिणीही त्यांच्यासाठी डबा घेऊन गेल्या होत्या. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मला असा अनुभव येण्याची. याआधीही मी एक दोनदा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले असताना नवऱ्याची काळजी करणारे लोक पाहिले आहेत. शिवाय सासूबाईंना वाटणारे मुलाचे कौतुक आहेच. त्याच ठिकाणी मी असते तर? आणि इथेच आजच्या पोस्टचा मुद्दा आहे.

लाखो-करोडो नवरे नोकऱ्यांसाठी परगावी असताना अनेकींना घर, नोकरी आणि मुलं सर्व सांभाळावं लागतं. खरंतर कुणासाठीही हे अतिशय अवघड काम आहे. पण नवऱ्याने एकट्याने मुलांना सांभाळणे, घर पाहणे या सर्वांचा इतका बाऊ अजूनही का केला जातो? उलट त्याला जी सहानभूती आणि मदत मिळते ती बाईला मिळाली तर बिचारी अजून काम करेल. खरं सांगायचं तर मी तर म्हणते,"Its not rocket science". ऑफिसमध्ये अनेक मोठं मोठी कामे करणाऱ्या नवऱ्याला पोरांच्या जेवायच्या वेळा पाळणं, झोपवणे वगैरे काही अवघड नाहीये. तरीही अशी परिस्थिती इतक्या कमी वेळा का पाहायला मिळते. असो.

बरं, नुसते बाकीचे लोक मदत करतात असे नाही, बायकांनाही आपल्या नवऱ्याचे कोण कौतुक वाटते. (अर्थात मलाही वाटले कारण मला एकटीला पोरांना सांभाळणे झेपणार नाही. लै ताप देतात. असो.) अनेकदा मी फेसबुक वगैरे वर मुलींचे पोस्ट पाहते, 'मी नसताना मुलांचे सर्व नीट करणाऱ्या' नवऱ्याचे कौतुक करणारे, Thank you for holding fort वगैरे. थँक्यू काय? तुमचाच नवरा आहे ना? आणि मुलं त्याचीही आहेत ना? मग थँक्यू कशाला? आणि तेही पब्लिकसमोर? हे कौतुक का? अर्थात अगदी 'नवऱ्याने आज मॅगी बनवून दिली' म्हणूनही कौतुक करणारे कमी नाहीत. माझं काय म्हणणं की असे किती पोस्ट्स आपण नवऱ्याचे पाहतो? बायकोने मॅगी बनवली म्हणून? उलट 'बघा नवऱ्याला मॅगी करून घालते' म्हणून बोलणारे कमी मिळणार नाहीत. असो.

अगदी परगावी जायचे राहू दे, मुलं आजारी असतानाही बायकोनेच कशाला सुट्टी घेतली पाहिजे? पोराला किती औषध द्यायचंय, काय खायला द्यायचं वगैरे बेसिक गोष्टी माहित असल्या म्हणजे झालं. महिन्या-दोन महिन्यात पोरं आजारी पडतात, सर्दी-खोकला ताप वगैरे. त्यासाठी 'त्याला आईच लागते' म्हणून आपणच का काम सोडून घरी बसायचे? करियर बद्दल मी बोलत नाहीयेच. माझं म्हणणं इतकंच की वडीलही मुलाची तितकीच काळजी घेऊ शकतात आणि प्रेम देऊ शकतात.

अर्थात आपण इतकाही विश्वास का दाखवू शकत नाही? समजा त्याने नाही दिलं पोटभर जेवायला किंवा मागे लागून नाही भरवलं तरी काय बिघडणारेय? भूक लागल्यावर येतीलच ना मागे,'खायला द्या' म्हणून? का मग आया मुलांना वडिलांकडे सोडत नाहीत? प्रत्येकवेळी आपलं आईपण सिद्ध करायची काय गरज आहे? मी जेव्हा एक आठवडा आधी निघून गेले तेंव्हा अनेकांनीआश्चर्य व्यक्त केलं. जणू मुलांना असं पुढे पाठवणारी आई म्हणजे इतकी इमोशनल कशी काय म्हणून. अशा लोकांना किंवा विचारांना घाबरून कुणी राहात असेल तर चूकच ते. कारण आई म्हणून तुम्ही मुलांसाठी काय करता ते चूक का बरोबर हे बाकी लोक कोण ठरवणारे?

मला वाटतं की अशा अनेक परिस्थितींमध्ये, कौतुकच करायचं असेल तर दोघांचं करा, मदत करायची तर दोघांची करा आणि दोघांनी करा. आजपर्यंत मी कुणा नवऱ्याचे पोस्ट पाहिले नाहीयेत,'थँक्यू बायको' वाले. यायचेच तर तेही दिसावेत अशी अपेक्षा. असो. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सात दिवस मुले बरोबर नाहीत ही गोष्ट अपार दु:खाची आहे असे त्यांना वाटले नसते. तसे ते अनेक स्त्रीयांना देखील वाटत नाही. पण कंडिशनिंग मुळे तसे वाटणार्‍या स्त्रीयांची संख्या जास्त असेल असे माझा अंदाज आहे. तेच कंडिशनिंग नवर्‍याचे 'अगं बाई, एकटा मुलं सांभाळतो' असे कौतुक करवते.>> अगदी बरोबर. ह्या कंडिशनिंगमधून बाहेर पडण्याची धडपड पुरूष आणि स्त्रिया दोघांनी करायला हवी.
बाई मुलांपासून ४ दिवस दूर राहिली तर तिने (आणि तिच्या मुलांनी) ढसाढसा रडलंच पाहिजे. नाहीतर तिचं मुलांवर प्रेमच नाही. ही व्याख्या बदलायला हवी.

थॅक्युअ म्हणायची खरतरं दोघानाही गरज नाही. एकमेकांना मदत करण हे इतक नैसर्गीक असाव कि त्यासाठी स्पेशल शब्दांची गरजही पडू नये. जस बाळ रडायला लागलय , आई वडीला पैकी कुणीतरी पटकन उचलून घेणे हा जसा पहिला इन्स्टिंक्ट असतो तसच ना हे.
समोर काम आहे. ते काम करण गरजेच आहे. जो कुणी समोर आहे, वेळ आहे, इच्छा आहे तो ते करील. बाळंतपणा खेरीज प्र्त्यक काम दोघ शक्ती नुसार इंटरचेंजेबली करू शकतात.
ते केलच पाहिजे, नाही केले तर तुम्ही फेमिनिस्ट नाही असले फालतू विचार करू नये. केले तरी लक्ष देवू नये.

आता या सात दिवसांत मी इकडे दुःखात सतत टीव्ही बघत, अजिबात स्वयंपाक वगैरे न करता दिवस काढत होते तर तिकडे नवऱ्याला ढिगाने मदत होती. >>हे उपहासाने लिहीले आहे. काहीही कामे न करता आरामत सात दिव्सात २९ तासान्चे टिव्ही एपिसोद्स पाहात बसले ना म्हणून. Happy पण पोरांची आठवण येत होती आणि ते सर्व अमजा करत आहेत एकटेच भारतात, या विचाराने जास्त त्रास होत होता. Happy असो.

मला आवडतं असं आपल्या जोडीदाराचं कौतुक करायला.
मी त्याचं करावं, त्याने माझं करावं... >> +१
इतकंच म्हणणं आहे. Happy

काय हरकत आहे असं सर्टिफिकेट दिलं आपण आपल्या आवडत्या व्यक्तिला तर?
>>>>>>>>

मी कुठे त्यावर हरकत घेतोय. माझा मुद्दा ईतकाच आहे की जे कौतुक करत नाही पण जाण ठेवतात आणि त्यानुसार वागतातही त्यांच्यावरही हरकत घेतली जाऊ नये. नाही जमत हे प्रत्येकाला, खास करून पुरुषांना.

<<<पण नवऱ्याने एकट्याने मुलांना सांभाळणे, घर पाहणे या सर्वांचा इतका बाऊ अजूनही का केला जातो? "Its not rocket science". ऑफिसमध्ये अनेक मोठं मोठी कामे करणाऱ्या नवऱ्याला पोरांच्या जेवायच्या वेळा पाळणं, झोपवणे वगैरे काही अवघड नाहीये. >>>

कारण अजूनहि नवर्‍याला एकट्याने ही कामे सांभाळता येत नाहीत. बाहेर रॉकेट सायन्स सांभाळू शकणारा नवरा दोन वर्षाच्या मुलीचा हट्ट, किंवा एक वर्षाच्या मुलाचे रडणे थांबवू शकत नाहीत. पोळ्या तर दूरच पण भाजी हि धड जमेल याची शाश्वति नाही.

आता बाकीच्या बायका का मदत करतात? कारण बायकोने त्यांच्याशी चांगले संबंध जोडून ठेवले आहेत. आपल्या मैत्रिणीच्या मागे आपल्या मैत्रिणीच्या घरी काही कमी पडू नये असे त्यांना वाटण्याचे कारण बायकोने निर्माण केलेले चांगले संबंध. जर कधी बायको आजारी असेल तर सुद्धा मदतीला येतात.

असे इथे चाळीस वर्षांहून अधिक राहिलेल्या कुटुंबांचे मत आहे. ते अनेकदा बायकोचे हे उपकार उघड मानतात.

अशी परिस्थिती का? हे भारतातल्याच कायम ९५ सालानंतर भारतातून इथे आलेल्यांना सुद्धा कद्धीहि समजणारच नाही.

"अ‍ॅक्चुअली त्या क्षणाला सिरीअसली मला वाटले की तिला खरेच फार त्रास होत आहे आणि एवढा त्रास सहन करून एकत्र नांदण्यापेक्षा तिने वेगळे व्हावे."
जाम हसले या वाक्यला. अगदी खर लिहलय.
बाकी लेख खुप छान.

थँकू आणि सॉरी म्हणणे हे आपल्य भारतीय मनाला आणि तब्येतीला अजून जमतच नाही....

रहाता राहिला प्रश्ण, नवर्‍याने बायकोला वा बायकोने थँकू म्हणावे का नाही... हे प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. कामं काय मिळूनच करायची असतात.
एकमेकांना सांगून सवरून, अर्धी कामं तू, अर्धी मी अशी करा ना आणि थँकू म्हणा ना. बाहेरची दुनिया काय म्हणते गेली उडत...
जे काही कौतुक करायचे ते काम उत्तम केले म्हणून केले तर छानच व करावेच , तो पुरुष असून वा स्त्री असून केले ह्यातले कौतुक म्हणजे सोशल कंडीशनिंगच आहे.

तो पुरुष असून वा स्त्री असून केले ह्यातले कौतुक म्हणजे सोशल कंडीशनिंगच आहे.>> बरुबर झंपाक्का. पाच वर्शे वयाच्या पुढे कौतूक करूच नये चांगल्या संसारी अ‍ॅडल्ट लोकांना स्वतःचा निर्माण केलेला संसार संभाळताना कौतूक कसले लागते? तुमची जबाब दारीच आहे ती. ते संभाळून आणि सोशल वर्क करणारे पण व्यक्ती असतात. ते ही विदाउट एनी कौतूक. ही कौतुक होण्याची गरज एक प्रकारे ग्रोथ हॅम्पर करते हे मी शिकले आहे. आपले ते भगवान पण म्हटले आहेत ना कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका. कौतूक तो भले दूर की बात.

विद्या, आज सलग तुमचं बरंचसं लिखाण वाचून काढलं आणि इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू? किती नेमक्या शब्दात अगदी सहजपणे मला जे वाटतंय ते तुम्ही मांडलंय. माझ्या अगदी ह्याच विचारांमुळे मला अविचारी, नवऱ्याचं कौतुक ना पाहवणारी ई . शेरे मिळाले आहेत. सगळ्यात डोक्यात गेलेली गोष्ट म्हणजे मी आणि नवरा आम्ही दोघेही ऑफिस मध्ये राबून त्याच्या कडच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेलो कि निदान दहा वेळा तरी "अरे किती दमलेला दिसतोयस तू?" आणि माझ्या कडून अपेक्षा मात्र कि मी काम करावं आणि वर तो दमला म्हणून त्याची सरबराई करावी.. पण आज मला कुणीतरी समविचारी भेटल्याचा आनंद झाला आहे आणि मी एकटीच नाही आणि वाईटही नाही हि खात्री पटली आहे. त्या बद्दल धन्यवाद.

विद्या, आज सलग तुमचं बरंचसं लिखाण वाचून काढलं आणि इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू? किती नेमक्या शब्दात अगदी सहजपणे मला जे वाटतंय ते तुम्ही मांडलंय. माझ्या अगदी ह्याच विचारांमुळे मला अविचारी, नवऱ्याचं कौतुक ना पाहवणारी ई . शेरे मिळाले आहेत. सगळ्यात डोक्यात गेलेली गोष्ट म्हणजे मी आणि नवरा आम्ही दोघेही ऑफिस मध्ये राबून त्याच्या कडच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेलो कि निदान दहा वेळा तरी "अरे किती दमलेला दिसतोयस तू?" आणि माझ्या कडून अपेक्षा मात्र कि मी काम करावं आणि वर तो दमला म्हणून त्याची सरबराई करावी.. पण आज मला कुणीतरी समविचारी भेटल्याचा आनंद झाला आहे आणि मी एकटीच नाही आणि वाईटही नाही हि खात्री पटली आहे. त्या बद्दल धन्यवाद.

Pages