थँक्यू बायको !

Submitted by विद्या भुतकर on 11 September, 2017 - 23:12

या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात जायचं होतं. नुकतीच नवी नोकरी लागल्याने मला जास्त रजा मिळणार नव्हतीच. पण मुलं कंटाळली होती आणि त्यांना केव्हा एकदा भारतात जाऊ असं झालं होतं. असेच एक दिवस नवऱ्याला म्हटले तुम्ही तिघे पुढे गेला आणि मी १५ दिवसांनी आले तर? गंमत म्हणून बोललेला हा विचार पुढे प्रत्यक्षात आला. मुलं आणि संदीप पुढे जाणार आणि मी नंतर जाणार असं ठरलं. अर्थात हे सोप्पं नव्हतंच.

मुळात दोन मुलांना घेऊन ३०-३२ तास एकट्याने प्रवास करणे अतिशय कंटाळवाणं आणि त्रासदायक काम आहे. त्यात एअरपोर्टच्या सिक्युरिटी, सामान, विचित्र वेळा, बेचव जेवण वगैरे सर्व आलंच. मी एका चांगल्या बायकोचं कर्तव्य करत नवऱ्याच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला, त्याला ढिगाने सूचना दिल्या आणि पोरांना बाय करताना ढसाढसा रडलेही. सर्वजण नीट घरी पोचले, आठवडाभर राहिलेही पुण्यात. मीही न राहवून १५ ऐवजी ७च दिवसात पळून गेले.

आता या सात दिवसांत मी इकडे दुःखात सतत टीव्ही बघत, अजिबात स्वयंपाक वगैरे न करता दिवस काढत होते तर तिकडे नवऱ्याला ढिगाने मदत होती. सासू-सासरे, दीर-जाऊ, घरी कामाला येणाऱ्या मावशी, एकदा तर माझ्या मैत्रिणीही त्यांच्यासाठी डबा घेऊन गेल्या होत्या. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मला असा अनुभव येण्याची. याआधीही मी एक दोनदा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले असताना नवऱ्याची काळजी करणारे लोक पाहिले आहेत. शिवाय सासूबाईंना वाटणारे मुलाचे कौतुक आहेच. त्याच ठिकाणी मी असते तर? आणि इथेच आजच्या पोस्टचा मुद्दा आहे.

लाखो-करोडो नवरे नोकऱ्यांसाठी परगावी असताना अनेकींना घर, नोकरी आणि मुलं सर्व सांभाळावं लागतं. खरंतर कुणासाठीही हे अतिशय अवघड काम आहे. पण नवऱ्याने एकट्याने मुलांना सांभाळणे, घर पाहणे या सर्वांचा इतका बाऊ अजूनही का केला जातो? उलट त्याला जी सहानभूती आणि मदत मिळते ती बाईला मिळाली तर बिचारी अजून काम करेल. खरं सांगायचं तर मी तर म्हणते,"Its not rocket science". ऑफिसमध्ये अनेक मोठं मोठी कामे करणाऱ्या नवऱ्याला पोरांच्या जेवायच्या वेळा पाळणं, झोपवणे वगैरे काही अवघड नाहीये. तरीही अशी परिस्थिती इतक्या कमी वेळा का पाहायला मिळते. असो.

बरं, नुसते बाकीचे लोक मदत करतात असे नाही, बायकांनाही आपल्या नवऱ्याचे कोण कौतुक वाटते. (अर्थात मलाही वाटले कारण मला एकटीला पोरांना सांभाळणे झेपणार नाही. लै ताप देतात. असो.) अनेकदा मी फेसबुक वगैरे वर मुलींचे पोस्ट पाहते, 'मी नसताना मुलांचे सर्व नीट करणाऱ्या' नवऱ्याचे कौतुक करणारे, Thank you for holding fort वगैरे. थँक्यू काय? तुमचाच नवरा आहे ना? आणि मुलं त्याचीही आहेत ना? मग थँक्यू कशाला? आणि तेही पब्लिकसमोर? हे कौतुक का? अर्थात अगदी 'नवऱ्याने आज मॅगी बनवून दिली' म्हणूनही कौतुक करणारे कमी नाहीत. माझं काय म्हणणं की असे किती पोस्ट्स आपण नवऱ्याचे पाहतो? बायकोने मॅगी बनवली म्हणून? उलट 'बघा नवऱ्याला मॅगी करून घालते' म्हणून बोलणारे कमी मिळणार नाहीत. असो.

अगदी परगावी जायचे राहू दे, मुलं आजारी असतानाही बायकोनेच कशाला सुट्टी घेतली पाहिजे? पोराला किती औषध द्यायचंय, काय खायला द्यायचं वगैरे बेसिक गोष्टी माहित असल्या म्हणजे झालं. महिन्या-दोन महिन्यात पोरं आजारी पडतात, सर्दी-खोकला ताप वगैरे. त्यासाठी 'त्याला आईच लागते' म्हणून आपणच का काम सोडून घरी बसायचे? करियर बद्दल मी बोलत नाहीयेच. माझं म्हणणं इतकंच की वडीलही मुलाची तितकीच काळजी घेऊ शकतात आणि प्रेम देऊ शकतात.

अर्थात आपण इतकाही विश्वास का दाखवू शकत नाही? समजा त्याने नाही दिलं पोटभर जेवायला किंवा मागे लागून नाही भरवलं तरी काय बिघडणारेय? भूक लागल्यावर येतीलच ना मागे,'खायला द्या' म्हणून? का मग आया मुलांना वडिलांकडे सोडत नाहीत? प्रत्येकवेळी आपलं आईपण सिद्ध करायची काय गरज आहे? मी जेव्हा एक आठवडा आधी निघून गेले तेंव्हा अनेकांनीआश्चर्य व्यक्त केलं. जणू मुलांना असं पुढे पाठवणारी आई म्हणजे इतकी इमोशनल कशी काय म्हणून. अशा लोकांना किंवा विचारांना घाबरून कुणी राहात असेल तर चूकच ते. कारण आई म्हणून तुम्ही मुलांसाठी काय करता ते चूक का बरोबर हे बाकी लोक कोण ठरवणारे?

मला वाटतं की अशा अनेक परिस्थितींमध्ये, कौतुकच करायचं असेल तर दोघांचं करा, मदत करायची तर दोघांची करा आणि दोघांनी करा. आजपर्यंत मी कुणा नवऱ्याचे पोस्ट पाहिले नाहीयेत,'थँक्यू बायको' वाले. यायचेच तर तेही दिसावेत अशी अपेक्षा. असो. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, नेहमीप्रमाणे खुप छान.

तुमचे लिखाणं नेहमीच आवडते

मला वाटतं की अशा अनेक परिस्थितींमध्ये, कौतुकच करायचं असेल तर दोघांचं करा, मदत करायची तर दोघांची करा आणि दोघांनी करा. आजपर्यंत मी कुणा नवऱ्याचे पोस्ट पाहिले नाहीयेत,'थँक्यू बायको' वाले. यायचेच तर तेही दिसावेत अशी अपेक्षा. + १११११११११११

थँक्यू काय? तुमचाच नवरा आहे ना? आणि मुलं त्याचीही आहेत ना? मग थँक्यू कशाला? आणि तेही पब्लिकसमोर?
>>> लोकांना दाखवायला की आमचा नवरा किती चांगला आहे. असेच नवऱ्याने बायकोला एखादे गिफ्ट दिले तरी त्याचे फोटो फेबु वॉर टाकून thank यौ म्हणणारे लोक पण डोक्यात जातात..

छान विद्याजी.
इथे आता तिसरे महायुद्ध होणार बहूतेक.

च्रप्स,
सुखाचे प्रदर्शन मांडणे वाईट असेल तर दुसरयाचे सुख बघून कोणाच्या पोटात दुखत असेल आणि म्हणत असेल की ह्यां उगाच फालतू गोष्टींचे फोटो टाकतात.. तर हे ही चुकीचेच.
हे तुम्हाला वैयक्तिक उद्देशून नाही. मनुष्य स्वभाव आहे हा...

मला वाटते फेसबूक हे आपल्याला होणारा आनंद शेअर करून द्विगुणित करायचे माध्यम आहे. जर एखाद्या बायकोला तिच्या नवरयाने मॅगी केल्याचा खरेच आनंद होत असेल तर आपण कोण तिच्या पर्सनल आनंदाला कमी जास्त लेखणारे.

@ धागा,
राहिला प्रश्न नवरयाने बायकोला थॅन्क्यू बोलायचा...
तर आपले आईवडील जे आपल्याला लहानाचा मोठा करतात त्यांना आपण कधी फेसबूकवर थॅन्क्यू बोलत फिरतो का..
जसे कधीतरी वॅलेंटाईन वा एनिवर्सरीला बायकोवरचे प्रेम व्यक्त करतो तसेच कधीतरी मातृपित्रुदिनाला त्यांच्यावरचे करतो.
याचा अर्थ असा नाही होत की आपल्याला आईवडीलांच्या प्रेमाची आणि कष्टाची जाण नसते. तेच बायकोलाही लागू.

फेसबूकवर कौतुक हे छोट्यामोठ्या हौशी कामांचे केले जाते. ज्या घरी नवरा कधीतरी जेवण करतो त्याचे फेसबूकवर कौतुक होते. जिथे रोजच मदत करतो तिथे ती कृतज्ञता मनात जपली जाते.

मी तर ईथे सर्व बायका मुलींना सांगू ईच्छितो की तुमच्या पार्टनरने तुमचे खाजगीत वा चारचौघात कौतुक करावे अशी तुम्हा सर्वांची ईच्छा असतेच. पण प्रत्येक पुरुषाचा तो पिंड नसतो. नाही जमत एखाद्याला. पान त्याला जाण आहे की नाही हे पुरेसे नाही का..
आणि मला वाटते आपले आईवडील आणि आपला जोडीदार हे आपल्या आयुष्यात बरेच काही करत असतात ज्याची कित्येकांना जाण असतेच फक्त ते फेसबूकवर मांडण्याच्या पलीकडे असते ईतकेच.

लाख बात की एक बात -
मी जेव्हा ईथे माझे गर्लफ्रेंडपुराण लावत, तिचे माझ्या आयुष्यातील स्थान विषद करत, तिला वेळोवेळी थॅन्क्यू बोलत असतो त्याने काही लोकं वैतागतातच. कारण पुरुषाने आपल्या जोडीदाराचे कौतुक करावे हे आपल्या समाजाच्या सहजी पचनी पडत नाही Happy

मस्त लेख, मनातल्या भावना उतरल्यात अस वाटलं.
मला वाटतं की अशा अनेक परिस्थितींमध्ये, कौतुकच करायचं असेल तर दोघांचं करा, मदत करायची तर दोघांची करा आणि दोघांनी करा. आजपर्यंत मी कुणा नवऱ्याचे पोस्ट पाहिले नाहीयेत,'थँक्यू बायको' वाले. यायचेच तर तेही दिसावेत अशी अपेक्षा. + १११११११११११

छान आहे लेख आणि पटलासुद्धा. आयांचा वडिलांवर विश्वास नसतो हे खरे आहे. तसा विश्वास नसणे अगदी चूक आहे. इमोशनली दाखवित नसले तरीही वडिलांनासुद्धा मुलांची तेवढीच काळजी असते.

मुलं आजारी असतानाही बायकोनेच कशाला सुट्टी घेतली पाहिजे? >>>ह्याचं कारण मुल लहान असेल तर त्याला आईचा आधार जास्त वाटतो.

मला वाटतं की अशा अनेक परिस्थितींमध्ये, कौतुकच करायचं असेल तर दोघांचं करा, मदत करायची तर दोघांची करा आणि दोघांनी करा. >>> +१

हे बघा, पुरुष मंडळी मल्टीटास्कर नसतात. एकाच प्रकारच्या कामात असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी ते हाताळू शकतात, पण अतिशय वेगळी जबाबदारी नाही. गोंधळ घालतात ते.

स्त्रिया मल्टीटास्कर आणि ऑर्गनाइज्ड असतात. त्यांची क्षमता पुरुषांपेक्षा कैक पटीने जास्त असते.

बाकी, हजारो वर्षांच्या संस्कृतीने स्त्रियांना त्यांच्या नैसर्गिक शक्तीची जाणीव राहिली नाही. माहूत जसा हाकतो बलदंड हत्तीला तसे स्त्रियांचे झाले आहे. आय विश, कधीतरी स्त्रियांना आपल्या मॅमथ-साइज शक्तीची जाणीव होवो.

खूप मस्तं लिहिलंय. अगदी खरंय.
यावरून मला आठवतं. आमचा एक मित्र आणि त्याची बायको. त्याची बायको नोकरीच्या निमित्ताने फ्लोरिडामधे मूव्ह झाली. तेव्हा मी, माझ्या मैत्रिणी फार हळहळलो. बिच्चारा आता एकटा राहणार. मग काय, आम्ही त्याचा फ्रीज भाज्या, पोळ्या, परठ्यान्नी भरायला सुरूवात केली. तेव्हाच फ्लोरिडा मधे कुठलं हरिकेन आलं होतं तेव्हा तर आमच्या हळहळण्याला महापूर आलेला की या याला आता कीती काळजी वाटत असेल ( काळजी होतीच त्याला पण तोही जाउ शकत नव्हता तेव्हा फ्लाइट्स कॅन्सल झाल्या होत्या ) बायको तिथे हरिकेन मधे अडकलीय म्हणून.
जेव्हा ती सुट्टीत परत आली तेव्हा एकदा तिने मला बोलून दाखवलं, म्हणाली मी नोकरीसाठी बाहेरगावी गेले हा फक्त माझा नव्हे तर आमच्या दोघांचा निर्णय होता. हा या छान लहानशा गावात, स्वत:च्या घरात, तुम्हा सर्व लोकांमधे आरामात राहतोय. मी एकटी पर राज्यात राहते, नोकरी करते, स्वयंपाक करते आणि एकटीच खाते, हरिकेन मधे मी हिमतीने निभावून नेलं...तेव्हा लाइट्स गेलेले, शेजारी पाजार अनोळखी. अनोळखी लोकांमधे, रेंटेड घरात, घरापासून दूर मी राह्तेय आणि तुम्हा लोकांचा जीव माझ्या नवर्‍यासाठी तुटतो?....रियली???? तेव्हा मात्र माझे डोळे खाडकन उघडले. किती एकांगी विचार करतो आपण Sad

चांगलं लिहिलं आहे . आवडलं आणि पटलं. नवर्याने ( विशेषतः मुलांची) जरा काही कामं केली की केवढं कौतुक! आणि नवरे जाहिरात पण करतात आल्यागेल्याकडे आपण केलेल्या कामाची!

सर्वांचे आभार. Happy
इथे आता तिसरे महायुद्ध होणार बहूतेक.>> पा.फा. अनेक दिवस झाले पाहत होते की लिखानापेक्षा पुढे लोक त्यावर काय म्हणतील यावरच कमेन्ट येत होते. त्यावरुन कळत होते की किती प्रभाव पडत आहे त्याचा लोकांच्या मनावर. मी माझया पेजवर लिहीत असुन्ही इथे बरेच दिवस न लिहिण्याचे तेच प्रमुख कारण आहे.
शेवटी वाटले न लिहून आपणही त्याला बळी पडत आहे. म्हणून पुनहा सुरु केले. असो. काहीनी 'बरेच दिवसांनी इथे' असे विचारले हे पाहून बरे वाटले.):)
Its nice to be missed. Happy

VIdya.

विद्या, बरेच दिवसांनी तुझे २ लेख वाचनात आले.दोन्ही सुरेख आहेत.

.तेव्हा लाइट्स गेलेले, शेजारी पाजार अनोळखी. अनोळखी लोकांमधे, रेंटेड घरात, घरापासून दूर मी राह्तेय आणि तुम्हा लोकांचा जीव माझ्या नवर्‍यासाठी तुटतो?.... पद्मावती, खरेच आहे.

@विद्या, माबोवर तुमचे लेखन दिसल्यावर माझी वाचनात प्रथम पसंती तुमच्या लेखास असते. गेले काही दिवस मी ते मिस करत होतो. पुनश्र्च आगमनाच्या शुभेच्छा. गेल्या काही काळात वाद हे टीआरपी वाढवायचे साधन झाले आहे ( Lol ) असो. पुलेशु

पोरगा आजारी पडला की बायकोला जॉबच्या स्वरूपामुळे रिमोट काम शक्य होत नाही प्रत्येक वेळी रजा घेणेही शक्य नाही आणि मला घरून काम, वेळ मिळेल तसे काम शक्य आहे. त्यामुळे मीच अनेकदा सांभाळतो.
आय लव्ह डॅड ओन्ली टाईम. Happy

मला पण आवड तात तुमचे लेख. तुम्ही स्त्रीवादाच्या उंबर ठ्यावर अनिस्चित मानसिकतेत फेर्‍या घालता आहे असे कायम जाणवते. एका क्षणी तुम्ही ती लीप ऑफ फेथ घेणार व तुमचा पूर्ण अ‍ॅटिट्यूड चेंज होईल. आपल्याला मेल व्हॅलि डेशनची गरज का भासते? त्यांना स्पेशल ट्रीट करावे असे का भासते? कसली ही आतली गरज? देअर इज जस्ट नो नीड.

मला पण आवड तात तुमचे लेख. >> Thank you. Happy
आपल्याला मेल व्हॅलि डेशनची गरज का भासते? >> या लेखात उलता मुद्दा माण्डला आहे .
बायकाच अगदी छोट्या छोट्या गोष्टित कोउतुक करतात असे माझे निरिक्षन आहे. असो.

तुम्ही स्त्रीवादाच्या उंबर ठ्यावर अनिस्चित मानसिकतेत फेर्‍या घालता आहे असे कायम जाणवते. एका क्षणी तुम्ही ती लीप ऑफ फेथ घेणार व तुमचा पूर्ण अ‍ॅटिट्यूड चेंज होईल. >> हे काय माहीत नाही. जे समोर दिसते, विचार मनात येतात ते तसे मांडते.
बाकी मानसिकता एका दिअवसात आणि अचानक बदलत नाही, त्याला अनुभवातून्च जावे लागते असा अनुभव आहे. Happy

देवकी, अमितव, पा.फा. धन्यवाद. Happy नियमित लिहीण्याचा प्रयत्न करत राहीन्च.
विद्या.

लेखन आवडले विद्या. मुद्दाही पटला.
तरी नवरेमंडळी करत असतील घरकाम तर कौतुक होऊ द्या त्यांचे (असे अलिकडे वाटायला लागले आहे). निदान थोडा सकारात्मक संदेश तरी जातो. काय करायची ती कौतुक करा, आणि अजून दोन-तिन कामं सरकवा तिकडे.

उलट आमचे नवरे (आणि आमची मुलं) कसे एक काडी इकडची तिकडे करत नाही, याची लाडिक कौतुकवजा तक्रार करणार्‍या बायका पाहिल्या की काय म्हणावे कळत नाही. (एखाद्या दिवशी मी चुकून ' मग तुम्ही राहता कशाला त्यांच्या सोबत' असे न राहवून विचारेन अशी भीती वाटते.) Uhoh

एखाद्या दिवशी मी चुकून ' मग तुम्ही राहता कशाला त्यांच्या सोबत' असे न राहवून विचारेन अशी भीती वाटते. >> आईग्ग.. Lol

छान लेख. आवडला.

का मग आया मुलांना वडिलांकडे सोडत नाहीत? प्रत्येकवेळी आपलं आईपण सिद्ध करायची काय गरज आहे? >> तुम्हाला हा आरोप वाटेल पण बहुतांश स्त्रियांना आपल्या मुलांवरचा मानसिक ताबा सोडायला अजिबात आवडत नाही. कमी आत्म्विश्वासामुळे असेल. मग मुलांच्या लग्नानंतर मुलाच्या किंवा मुलीच्या संसारात लुड्बूड करणे आलेच. :). सासूरवास, सुनेला आणि जावयाला पण. (आमच्या कडे दोन्ही प्रॉब्लेम आधी आम्हाला नव्हते व आताही मुलांना नाहीत. Happy )

कामाबद्दल म्हणाल तर मी लग्नाआधी १५ वर्षे एकटा रहात होतो. त्यामुळे सगळ स्वतः करायची सवय होती. पण लग्नानंतर मी घरात काम करण म्हणजे स्वतःचा अपमान अस मंडळी समजतात, तू कशाला , तू कशाला अस करून. बाई आली नाही तर मी कित्येक वेळा भांडी घासायची ऑफर केली आहे. पण पटत नाही त्यांना. काय करणार. आता कधी नाही तर एखादे फुटकळ काम केले की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कौतुक मात्र होते. Happy

पण मी अगदी मनापासून म्हणेन. "थँक यू बायको".

एखादी बिझिनेस ट्रिपवर गेली असल्यास तिच्या नवर्‍याला, मुलांना डबे देणे, जेवायला बोलावणे प्रकार मी पण बघितले आहेत. इथलेच एक काका इतकं मस्त मॅनेज करतात बायको नसताना. मुलासाठी घरून डबा पाठवणे, वेळच्या वेळी ने-आण, प्ले-डेट्स, शिवाय ४ पोरांना जमा करून जादू-बिदू शिकवतात. त्यांना पण बाया ड्बे पोचवतात Uhoh मला स्वतःला भयंकर वैताग येतो याचा. नवरा-बायको कुणीही बाहेरगावी असेल तर 'काही मदत लागली तर कळवा.' एवढा निरोप देउन गप पडते.

इथे कुणीतरी बायांनाच वर्थ सिद्ध करायची पडलेली असते असं काही लिहिलं आहे. माझं पण तेच निरिक्षण आहे. स्वतःला फेमिनिस्ट म्हणवणार्‍या भल्याभल्या बाया मी नसताना कस्स बाई पोरांचे मार्क्स कमी झाले अन चांगल्या सवयी कमी झाल्या असा शंख करताना बघितल्या आहेत.

अगदी अगदी सिंडरेला.
स्वतःला फेमिनिस्ट म्हणवणार्‍या भल्याभल्या बाया मी नसताना कस्स बाई पोरांचे मार्क्स कमी झाले अन चांगल्या सवयी कमी झाल्या असा शंख करताना बघितल्या आहेत. >> फक्त एवढंच नाही. मी नसताना मुलं कशी दु:खी होती. माझ्या आठवणीने कशी कासावीस झाली होती ह्याची वर्णन बायका जेवढी रंगवून करतात तेवढे पुरूष क्वचितच करतात.
मुलांना नवर्‍याच्या बरोबर ठेवून कुठे बाहेर जायचं ठरवल एखाद्या बाईने तर, मुलं रहातील का तुला सोडून? हा प्रश्न हमखास तिला विचारला जातो. पण नवरा जेव्हा मुलांना बायको बरोबर ठेवून ४ दिवस बाहेर जातो तेव्हा त्याला हाच प्रश्न लोकं अजीबात विचारत नाहीत.

एखाद्या दिवशी मी चुकून ' मग तुम्ही राहता कशाला त्यांच्या सोबत' असे न राहवून विचारेन अशी भीती वाटते.
>>>
Proud

हे अ‍ॅक्चुअली माझे एकीला बोलून झालेय. नशीब मैत्रीणच होती म्हणून वाचलो.
लंच टेबलवर ग्रूपमधल्या दोनचार बायका नवरा कसे काम करत नाही आणि आपल्यालाच सारे काम कसे पडते वगैरे तक्रार करत होत्या. त्यातील एकीने पाढाच चालू केला. तिचा पाढा संपताच उत्स्फुर्तपणे मी तिला म्हणालो, सोडून दे त्याला.

अ‍ॅक्चुअली त्या क्षणाला सिरीअसली मला वाटले की तिला खरेच फार त्रास होत आहे आणि एवढा त्रास सहन करून एकत्र नांदण्यापेक्षा तिने वेगळे व्हावे.
मग ईतर बायकांचे तापलेले चेहरे बघून मला समजले की असे नवर्‍याच्या नावाने खडे फोडायची पद्धत असते पण खरेच काही टोकाचा निर्णय उचलायचा नसतो.
तेव्हा मात्र मी वाद वाढवला नाही, पण पुन्हा कधीतरी शांत डोक्याने विचार करता मला जाणवले की खरेच बायकांनी आपल्या नवर्‍याला मनात हे ठेवले पाहिजे की कधीतरी मी तुला सोडूनही देऊ शकते. बरेच नवरे लोकं आपल्या बायकांच्या डोक्यात हे ठेवत असतील की जास्त वाद झाला तर मी तुला सोडूनही देऊ शकतो. तर मग बायकांनी का घर संसार कुटुंब सांभाळण्याची आणि बांधून ठेवण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे असे वागावे?

अम्म्म्माअम्म्म्माम्म्म्मम्म्म्, मला लेख आवडला, पटला आणि तुला नेमकं काय म्हणायचंय ते कळालं पण मला आवडतं असं आपल्या जोडीदाराचं कौतुक करायला.
मी त्याचं करावं, त्याने माझं करावं... समोरच्यासाठी ती गोष्ट लहान असली तरी मला फरक नाही पडत, माझ्यासाठी मोठी आहे ती गोष्ट..

नवर्‍याने स्वयंपाक केला याचं कौतुक कशाला वाटायला हवं हे म्हणणार्यांना मी विचारते नेहमी की कदाचित ही गोष्ट आपल्यासाठी फार मोठी नाहीये पण आपल्याकडे मेल डॉमिनन्स असताना आणी सगळ्या जगाची 'आपण तो पाळावा' ही इच्छा असताना तो सगळ्यांना फाट्यावर मारुन तुम्हाला मदत करतोय किंवा तो स्वतः असले सडके विचार करत नाहीये ही कौतुक करण्यासारखी गोष्ट नाहीये का?? मग केलं कौतुक तर काय बिघडलं?

बायकोला घर्दार आणि मुल सांभाळण्याबद्दल थँक्स म्हणायला हवं हे खरं आहे पण कधीतरी नवर्याने ती गोष्ट व्यवथीत फार पाडली म्हणून कौतुकाने त्याला प्रोत्साहन द्यायला काय हरकत आहे? "आम्ही करतोच की , त्यात काय विशेष" असं म्हणायला/ वाटायलाच हवं का? Uhoh

जगातल्या प्रत्येक जीवाला चांगल्या वर्तवणुकीबद्दल ट्रिट हवी असते, ती द्यायला काय हरकत आहे?

ऋन्मेष, माझ्या आई बाबांनी आम्हाला एवढं छान वाढवलंय आणी घडवलंय म्हणून आम्ही दोघीही बहिणी त्यांचं सगळ्यांसमोर जाहीर कौतुक करतोच आणि त्यांनाही स्वतःहुन सांगतो की थँक्स तुम्ही जे काही केलं आमच्यासाठी, तुमचं ते कदाचित कर्तव्य असेलही पण कर्तव्य इतकं सुंदर फार पाडलंत म्हणून आम्ही सुखी आहोत त्याबद्दल हजारदा थँक्स! काय हरकत आहे असं सर्टिफिकेट दिलं आपण आपल्या आवडत्या व्यक्तिला तर?

बिच्चारा आता एकटा राहणार. मग काय, आम्ही त्याचा फ्रीज भाज्या, पोळ्या, परठ्यान्नी भरायला सुरूवात केली.
>>
खरं सांगू? मी आता इथे एकटीच रहातेय आणि माझंही फ्रिज माझ्या मित्र मैत्रिणींच्या डब्याने भरतंय. कदाचित ती अशी तुमच्यापाशी रहायला आली असती तर तुम्ही तिला मदत केलीच असती आमच्या एका मित्राची बायको आता भारतात गेली तेंव्हा तोच स्वयंपाक करत होता. आत्ताच्या पिढीत समहाऊ हे प्रकार कमी झालेत असं मला वाटतं.

बाकी रैना अबाऊट काही येत नसल्याचं कौतुक = इरिटेटींग थिंग याला + ११११
मी पण म्हणाले होते एकीला की आय फिल सॉरी फॉर यू म्हणुन Proud

नवर्‍याने स्वयंपाक केला याचं कौतुक कशाला वाटायला हवं हे म्हणणार्यांना मी विचारते नेहमी की कदाचित ही गोष्ट आपल्यासाठी फार मोठी नाहीये पण आपल्याकडे मेल डॉमिनन्स असताना आणी सगळ्या जगाची 'आपण तो पाळावा' ही इच्छा असताना तो सगळ्यांना फाट्यावर मारुन तुम्हाला मदत करतोय किंवा तो स्वतः असले सडके विचार करत नाहीये ही कौतुक करण्यासारखी गोष्ट नाहीये का?? मग केलं कौतुक तर काय बिघडलं?>>>>>>>>>>>> जे एकदम नॉर्मलच आहे आणि that's how it should be असं आहे त्यात कौतूक कसलं, हा मुद्दा आहे. इतर पुरुष डॉमिनन्स विसरत नाही आणि एखादा पुरुष जर तसं करत नाही तर तो फार भारी होत नाही. कारण त्यात स्पेशल काही नाही.

तो सगळ्यांना फाट्यावर मारुन>>>>>> तो सगळयांना फाट्यावर मारत आहे असं तुम्हाला वाटतय त्यातच जरा गडबड आहे. खरं तर फक्त फेअर काय आहे हे बघितलं तर असं वागणं एकदम नॉर्मल वाटतं. पण फक्त इतर लोकं अजून सुधारत आहेत म्हणून हे वासरु शहाणं वाटायला लागतं येवढच आहे.
बाकी तुम्हाला कौतूक वाटत असेल त्या बद्दल काही म्हणणं नाही, आक्षेप वगैरे घ्यायची तर माझी जागा सुद्धा नाही. फक्त आपण नेमकं कशाचं कौतूक करतो हे जरा नीट विचार करुन बघितलेलं बरं म्हणून लिहिलं. Happy

सहज उदाहरण म्हणून ही लिंक बघा.
http://www.telegraph.co.uk/women/life/dear-nice-guys-dating-curvy-woman-...

अपॅरंटली ह्या मिस्टर नाईस गाय ला वाटलं की तो जगातला सरवात भारी पुरुष आहे. त्याची बायको कर्वी आहे आणि त्याचं त्याला फार कौतूक आहे आणि म्हणून तो स्पेशल आहे (हे तो डायरेक्ट नाही म्हणाला पण त्याच्या लिखाणातून ते लगेच जाणवतं, की तो स्वतःला स्पेशल समजत आहे).
बेसिकली तो, खरं तर कर्वी असणं तितकंसं चांगलं समजलं जात नाही, आणि त्याचं इतर पुरुषांना कौतूकच नसतं पण मला आहे! ह्या विचारांच्या हवेवर पार ढगात पोहोचलाय. हे नंतर त्याला इंटरनेटनी लक्षात आणून दिलं Lol

विद्या भुतकर, तुम्हाला हा प्रतिसाद अवांतर वाटत असल्यास डिलिट करतो.

जनरल रुल आहे, कौतुक केले की अजून काम करवून घेता येते..

जोपर्यंत घराबाहेर पडत नाही तोपर्यंत मेल डोमीनंत कारभार बदलत नाही. हे माझे ओबसर्वेशन आहे, भारतात चहाचा कप पण उचलून न ठेवणारे घराबाहेर पडले, अमेरिकेला आले की सुरुवातीला बायकोला भाजी चिरणे, कांदा कापणे अशी मदत करू लागतात.. आणि नंतर बायको प्रेग्नन्ट असेल तेंव्हा तर अक्खा स्वयंपाक करायला लागतात..

कौतुक महत्वाचे आहे, कौतुक केले म्हणजे करणाऱ्याला पण आनंद मिळतो, हुरूप चढतो.. नाहीतर टेकन फार ग्रंटेड होतो कारभार..

या पोस्टचे उत्तर खरे तर पहिल्या एक दोन परिच्छेदातच आहे.

>>
रांना बाय करताना ढसाढसा रडलेही. सर्वजण नीट घरी पोचले, आठवडाभर राहिलेही पुण्यात. मीही न राहवून १५ ऐवजी ७च दिवसात पळून गेले.
आता या सात दिवसांत मी इकडे दुःखात सतत टीव्ही बघत, अजिबात स्वयंपाक वगैरे न करता दिवस काढत होते तर तिकडे नवऱ्याला ढिगाने मदत होती. >>>
तुमच्या नवर्‍याने वा जगातल्या बहुसंख्य नवरे ७ दिवसात पळून आले असते का? सतत दु:खात, स्वयंपाक वगैरे न करता राहिले असते का? नसते राहिले कारण सात दिवस मुले बरोबर नाहीत ही गोष्ट अपार दु:खाची आहे असे त्यांना वाटले नसते. तससेते अनेक स्त्रीयांना देखील वाटत नाही. पण कंडिशनिंग मुळे तसे वाटणार्‍या स्त्रीयांची संख्या जास्त असेल असे माझा अंदाज आहे. तेच कंडिशनिंग नवर्‍याचे 'अगं बाई, एकटा मुलं सांभाळतो' असे कौतुक करवते.

Pages