लय आणि लयबद्धता: एक नवीनच प्रकरण

Submitted by डॉ अशोक on 11 September, 2017 - 02:17

आंतरजालावर साहित्याला वाहिलेल्या एका समूहावर मी एक कविता टाकली. शीर्षक होतं “हल्ली”
*
तळे आसवांचे राखतो मी हल्ली
राखतो म्हणूनी चाखतो मी हल्ली
*
पाहिली जी स्वप्ने मिळूनी दोघांनी
राख ही त्यांचीच फासतो मी हल्ली
*
प्रेतयात्रा मीच काढली माझीच
फुले समाधीवर वाहतो मी हल्ली
*
संवय बैठकीची , फक्त आहे तरी
भेटण्या मैल्भर चालतो मी हल्ली
*
दु:ख असते सदा एकट्याचेच पण
गझलेतूनी ते वाटतो मी हल्ली

"ही लयीत नाही." त्या गटातील एक जण म्हणाला. सोईसाठी आपण त्याला क्ष म्हणू या. "शिवाय यातला खयाल पण भावला नाही. काही तरी चीजवस्तू असते; ज्याला लोक गझलियत म्ह्णतात. ती दिसली नाही."

यावर मी म्हणालो: "मला वाटतं की ही कविता लयीत आहे. मात्रावृत्तात आहे. २० मात्रांची. दहा मात्रा नंतर यती आहे. माझ्या मित्रानं याचं गीत केलंय, चांगलं रागदारीत आहे." कवितेचं गीत झालं की ती लयीत आहे आणि मात्रांचं बंधन पाळलं की लयीत असते हा माझा आपला समज. गझलेत दोन मिसऱ्यात कॉन्ट्रास्ट असला म्हणजे गझलियत हे मत मला मान्य नसल्याचंही मी सांगून टाकलं.

यावर क्ष म्हणाला: " मात्रा बरोबर असतील ही. मी त्या मोजत नाही. तुम्ही म्ह्णताय की ती लयीत वाचता येते तर ती लय अक्षरछंदाची असण्याची शक्यता आहे ." च्यामारी ! आता अक्षरछंद नावाचा आणखी काही प्रकार असतो, ह्या विचारानं मी हादरून गेलो. त्याचवेळी आपल्याला माहित नसलेल्या अक्षरछंदात आपण कविता करून बसलो यामुळे काळजीतही भर पडली. शिवाय अक्षरछंदालाही लय असते ही नवीनच भानगड कळाली. क्ष आणखी पुढे म्हणाला: " दु:ख असते सदा एकट्याचेच पण ही ओळ छान लयीत आहे. गालगा गालगा गालगा गालगा." आता ही ल आणि गा ची काय भानगड म्ह्णून मी जरा गुगललं आणि कळालं ते असं की गा म्हणजे दीर्घ अक्षर आणि ल म्हणजे लघु अक्षर. आणि हा क्रम ल आणि गा च्या भाषेत लिहून दाखवला की ती झाली लगावली. हा क्रम कवितेतल्या प्रत्येक ओळीत राखला की ते झालं गणवृत्त!

या वादात आणखी एकानं उडी घेतली. त्याला आपण ब म्हणू या. त्याचं म्हणणं असं की: "कविला कवितेत लय जाणवून उपयोग नाही. ती इतरांनाही जाणवली पाहिजे!" च्यायला, म्ह्णजे माझ्या कवितेत लय आहे की नाही हे क्ष आणि ब ठरवणार. त्यांना वाटलं लय आहे, तर ती आहे. ते म्हणाले नाही, तर नाही! आता यात दोघांपैकी एकाला लय नाही असं वाटलं तर काय हा प्रश्न उरतोच! ह्यानंतर क्ष ने माझ्या त्या कवितेत काही फेरफार केले आणि ती पेश केली ती अशी.

आसवांचे तळे राखतो आज मी
संचिताची फळे चाखतो आज मी

दु:ख असते सदा, ए्कट्याचेच पण
गझल मांडून ते, वाटतो आज मी

पाहिले स्वप्न काल तुझियासवे
राख त्याचीच ही , फासतो आज मी

बैठकीची सवय फक्त आहे जरी
भेट तू... मैलभर चालतो आज मी

मीच माझा जनाजा इथे काढला
फूल कबरीवरी वाहतो आज मी

बारकाईनं पाहिलं तर ही कविता मात्रावृत्तातच आहे. उदाहरणार्थ: पहिल्या ओळीत लगावली गालगागा लगा गालगा गालगा अशी आहे, तर " गझल मांडून ते..." ह्या ओळीत ललल गागागा गा, गालगा गाल गा अशी आहे. तरीही आत क्ष च्या मते ती लयीत आहे! दुसरं म्हणजे माझ्या कवितेतली समाधी इथं कबर झाली आहे, आणि प्रेतयात्रेचा जनाजा झाला हे. पण हे चालतं.

क्ष ने नंतर एक षटकार हाणला. तो असा: "लोकांना वाटतं लय पाळणे म्हणजे मात्रा मोजून त्यांचा हिशोब बरोबर बसवणे वगैरे. पण गझल म्ह्णजे गणितीय अंगाने कमी आणि सांगितीक अंगाने अधिक जाणारे शास्त्र आहे" असं आहे तर. म्हणजे आम्ही आपले मात्रांचा हिशोब बसणे ही गझल ची पहिली अट समजत होतो, ते चुकलंच म्हणायचं.

यानंतर वादात उडी घेतलेले ब म्हणाले: "काका तुमचा एक घोर (गोड) गैरसमज झालेला दिसतो की चाल लागत आहे किंवा लावली आहे म्हणजे कवितेला लय आहे. चाल तर "मेरा कुछ सामान..." लासुद्धा लावली होती आरडीने. (आणि काय लावली होती.. अफलातून) पण म्हणून ती लयीत आहे, असं होत नाही. ". बापरे! म्हणजे कवितेचं गाणं झालं तरी ती लयीत असतेच असं नाही. स्वत: कविला ओळीतल्या मात्रांच्या समान संख्येमुळं वाटलं की ती लयीत आहे तर ते क्ष आणि ब च्या मते चूक, कारण काय तर त्यांना ती लयीत नाही असं त्यांना वाटतं. क्षनं तर "इतर चांगल्या गझला पडलेल्या असतांना ह्या कवितेला चाल लावणारा संगीतकार भेटला याबद्दल अचरज ( आश्चर्य नव्हे!) व्यक्त केलं. म्हणजे बघा समाधीच्या जागी कबर आणि प्रेत यात्रेच्या जागी जनाजा केला की मग अचरज वाटायचा प्रश्नच येत नाही. शिवाय बनं आणखी एक मुद्दा मांडला: "अंगभूत लय असणे आणि लयबद्धता असणे ह्यात फरक आहे. गुणगुणणे आणि गाणे यात आहे तसा! प्रेम म्ह्णजे प्रेम म्ह्णजे प्रेम असतं. ते तुमचं आमचं अगदी सेम असतं. ह्या पाडगावकरांच्या ओळी लयीत आहेत, पण लयबद्ध नाहीत!" यंव रे पठ्ठे ! म्हणजे आता आपण आपली कविता लयीत आहे की लयबद्ध आहे हा शोध घ्यायला हवा हा आणखी एक नवीन शोध लागला.

एकुण काय तर तुमची कविता आंतरजालावर टाका, तुम्हाला वाचकांकडून हे असे द्न्यानाचे कण मिळत रहातात आणि तुम्ही संपन्न होत जाता.

Group content visibility: 
Use group defaults

Thanx

Thanx