'नोव्हेंबर म्हणजे स्थलांतर' - मूळ लेखक - हाँसदा सौभेन्द्र शेखर, अनुवाद - सुजाता देशमुख

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
<1’

हाँसदा सौभेन्द्र शेखर हा संथाळी आदिवासी तरुण लेखक आणि झारखंडच्या पाकुर इथल्या सरकारी इस्पितळात काम करणारा डॉक्टर. त्याच्या ‘द मिस्टिरियस एलमेन्ट ऑफ् रूपी बास्की’ या पुस्तकाला २०१५ चा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे. हाँसदाच्या ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या कथासंग्रहातल्या एका कथेमुळे ‘संथाळी स्त्रियांचं विकृत चित्रण होतं आहे’ अशा आरोपावरून त्याला झारखंड राज्य सरकारनं कोणत्याही खुलाशाविना तात्पुरतं बडतर्फ केलं आहे. त्याच्या पुस्तकावरही अर्थातच बंदी घातली आहे.

‘मेनका प्रकाशना’तर्फे प्रकाशित करण्यात येणार्‍या ‘माहेर’च्या अंकात गेल्या दिवाळीपासून या कथासंग्रहातल्या अनुवादित कथा क्रमशः प्रकाशित होत आहेत. सुजाता देशमुख यांनी हे अनुवाद केले आहेत. ज्या कथेमुळे झारखंड सरकार आणि विरोधक आपापले राजकीय मतभेद बाजूला ठेवून हाँसदाविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत, ती कथा 'माहेर'च्या या वर्षीच्या जानेवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती. कथासंग्रहावर बंदी आल्यानंतर या महिन्याच्या, म्हणजे सप्टेंबरच्या अंकात ती पुन्हा प्रकाशित करण्यात आली आहे. या महिन्याचं संपादकीयही हाँसदाच्या कथासंग्रहावर आलेल्या बंदीबद्दल आहे.

सुजाता देशमुख यांचं संपादकीय आणि हाँसदाच्या कथेचा अनुवाद इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

***

संपादकीय
हाँसदाचा लढा - सुजाता देशमुख

डॉ. हाँसदा सौभेन्द्र शेखर या संथाळी आदिवासी तरुण लेखकाला त्याच्या झारखंडमधल्या पाकूर इथल्या सरकारी नोकरीतून तात्पुरतं बडतर्फ करण्यात आलं आहे. त्याचा गुन्हा? ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ (‘नाही नाचणार आदिवासी आता’) या त्याच्या पुस्तकातल्या कथांमधून त्यानं म्हणे संथाळी स्त्रियांचं विकृत चित्रण केलंय. हा आरोप करून त्याच्यावर कारवाईची तत्परता दाखवण्यात पुढाकार आहे तो झारखंड राज्य सरकारचा. भरीत भर म्हणजे आपापले राजकीय मतभेद बाजूला ठेवून विरोधकांनीही सरकारशी हातमिळवणी केलीय. विशेष असं की, हा लेखक ‘साहित्य अकादमी’चा ‘युवा पुरस्कार’विजेता आहे.

हाँसदाच्या सर्व अनुवादित कथा २०१६च्या ‘दिवाळी माहेर’च्या अंकापासून क्रमशः प्रकाशित होत आहेत. ‘ ‘अन्नाच्या बदल्यात कुणाचीही शेज करायला एक संथाळी बाई पुढे होते’ या कथेतनं आमच्या सर्व स्त्रियांचा घोर अवमान होतो आहे’, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण टुडू यांनी विधानसभेत करून हाँसदाविरुद्ध रणशिंग फुंकलं आहे. सगळ्यांनीच मग अहमहमिकेनं हाँसदाच्या ‘भीषण गुन्ह्या’चा पाढा वाचत पाकूरच्या उपायुक्तांना तातडीनं त्याच्याविरुद्ध कारवाई करायला भाग पाडलं. ही कथा आम्ही मुद्दाम या अंकात पुनर्प्रकाशित करतो आहोत. सरकार आणि सर्व पक्षांचा दावा किती दांभिक, पोकळ आहे हे कथा वाचल्यावर कोणत्याही सुज्ञ वाचकाच्या लक्षात येईल. मग अचानक हे असं काय झालं असावं? यामागे फार मोठं राजकारण आहे.

हाँसदाच्या लेखनात आदिवाश्यांच्या नागवल्या जाण्याचं, परवडीचं विदारक चित्रण आहे. त्यानं झारखंडमधल्या प्रत्यक्ष घटना कथेत बांधल्या आहेत. म्हणजे, तिथल्या औष्णिक विद्युत निर्मितिकेंद्राच्या प्रकल्पातून घडणारं राजकारण, तिथल्या दगडखाणी- कोळसाखाणी यांतून निर्माण होणारी खाण कंपन्यांची साम्राज्यं, आदिवासींच्या जमिनी लुटून त्यांचं होणारं विस्थापन, राजकारणी- उद्योजक- नोकरशाही यांनी त्यातून मिळवलेला अमाप व्यभिचारी पैसा आणि मग त्या-त्या अनुषंगानं होणारं आदिवाश्यांचं- स्त्रियांचं- मुलांचं शोषण हे मांडलं आहे. त्यामध्ये कधी भिन्न जातिधर्मीयांकडून, कधी गुंडांकडून, कधी पारंपरिकतेच्या नावाखाली, कधी आपसांतल्या वैरांतून, कधी मानवी स्वभावांतून, कधी अशिक्षिततेतून... अशा नानाविध कंगोर्यातनं होणारी पिळवणूक फार खरेपणानं येते.

सहजपणे नजरेला पडणारी गरिबी, सामाजिक शोषण, अत्याचार जिथपर्यंत मांडला जातो, तिथपर्यंत समाजातला सत्ताधारी वर्ग सहिष्णु असतो. परंतु याच शोषणाची नाळ आर्थिक व्यवहारांशी, जातिधर्माशी, स्थानिक राजकारणापासून जागतिक राजकारणाशी कशी जोडलेली असते, याची बारकाव्यासहित कुणी हाँसदा उकल करायला लागला, त्यामागची गणितं सोडवायला लागला आणि त्याउप्पर ती लोकांपुढे मांडायला लागला, तर आपलं आसन डळमळू नये म्हणून सत्ताधारी हाँसदासारख्या ‘महापातक्या’विरुद्ध ताकद एकवटून उभे राहतात.

हाँसदाच्या कथांमधला आणखी एक कमालीच्या धारिष्ट्याचा भाग म्हणजे, त्यानं हिंदू उच्चवर्णीयांच्या मुजोरीबरोबरीनं धर्मादाय कामांच्या नावाखाली मिशनर्‍यांनी उभं केलेलं जाळं, त्यांची तथाकथित मूल्यशिक्षण व्यवस्था आणि त्यात फसलेला आदिवासी यांबरोबरीनं ‘जोल्हे’ म्हणजेच मुसलमानांनी केलेली घुसखोरी आणि त्यांचं मूलवासी आदिवासींना अल्पसंख्याक करत नेण्याचं शिस्तबद्ध धोरण, हेही अधोरेखित केलं आहे. शिवाय माध्यमांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निवाड्यांचाही लेखाजोखा आहेच. म्हणजे थोडक्यात, आपल्या लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष देशाचे चार आधारस्तंभ (विधिमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमं) यांची लक्तरं एकीकडे वेशीवर टांगताना त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचं जाळं आहे, अशा मिशनर्यांचे आणि मुसलमानी विस्तारवादी मानसिकतेचेही वाभाडे काढले आहेत. हिंदूंमधल्या ‘आहे रे’ वर्गाचं दांडगेपण आहेच.

प्रत्येक मुसलमान अतिरेकी नसतो, प्रत्येक ख्रिश्चन मिशनरी सेवाभावाच्या नावाखाली धर्मांतरं घडवून आणत नाही, प्रत्येक हिंदू जातिपातीच्या नावाखाली शोषण करत नाही, हे कितीही खरं असलं, तरी धर्मांध विचारसरणी असणार्‍यांची जगात या घटकेला तरी निरंकुश सत्ता आहे. त्यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू तसंच इतर प्रत्येक धर्मातले शहाणे आवाज आज दबलेले आहेत, हेही तितकंच खरं. त्यामुळे भाजपसारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीची सत्ता आल्यामुळे हाँसदाच्या बाबतीत असं घडतंय हे म्हणणं फसवं आहे, कारण झारखंडमधले मिशनरी आणि विरोधक हेही सरकारशी याबाबतीत मिळालेले आहेत. आदिवाश्यांमधली अन्यायाबाबतची जागृती म्हणजे अर्थसत्तेला आणि पर्यायानं अवैध साम्राज्याला आव्हान या जाणिवेतनं ही कारवाई घडली आहे. महाराष्ट्रापुढे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं ज्वलंत उदाहरण आहेच.

‘नाही नाचणार आदिवासी आता’ म्हणून हाँसदानं नारा पुकारला आहे. झारखंडसारख्या ठिकाणी हा युवक आपल्याविरुद्धच्या अन्यायाला तोंड देताना, ‘लेखणी खाली ठेवणार नाही’ असं वाचकांना आश्वस्त करतोय. प्रत्येक लढ्यात प्रत्येकाला उतरता येत नाही.

***

नोव्हेंबर म्हणजे स्थलांतर

मूळ संथाळी लेखक - हाँसदा सौभेन्द्र शेखर

अनुवाद - सुजाता देशमुख

(याच कथेवरून हाँसदाला संथाळी स्त्रियांची बदनामी केल्याची शिक्षा म्हणून सरकारी नोकरीतून तात्पुरतं बडतर्फ करण्यात आलं आहे. तसंच कथासंग्रहावरही बंदी घालण्यात आली आहे. यामागच्या घडामोडींचा परामर्श संपादकीयात घेण्यात आला आहे.)

संथाळ परगण्यातल्या डोंगरदर्‍यांत अन् कानाकोपर्‍यांत वसलेली खेडी. नोव्हेंबर सुरू होताच तिथल्या बायाबापड्या आणि मुलं जिल्ह्याच्या ठिकाणच्या मुख्य रेल्वेस्थानकाकडे चालू लागतात. खेड्यातले सगळे आदिवासी आपापली भूमी, शेतजमिनी टाकून नामालला जाणार्‍या आगीनगाडीसाठी जत्थ्यानं निघतात. भल्यामोठ्या अजगरासारखी ही माणसांची रांग वाटते. पश्चिम बंगालमधल्या बर्धमान जिल्ह्यातलं नामाल हे गाव. तिथल्या भातशेतीच्या कामासाठी ही माणसं महिनाभर जातात. बर्धमानमधल्या जमीनदारांच्या शेतांवर भातलावणी आणि इतर पीकपेरणी त्या काळात ती करतात.

आजच्या रात्रीच्या या प्रवासात त्रेचाळीस संथाळींच्या जत्थ्यामध्ये बावीस वर्षांची तलामाई किस्कू आहे. आईवडील आणि दोन धाकल्या बहिणी यांच्यासह ती निघाली आहे. तिच्या खेड्यातले इतर आधीच बर्धमानला गेले आहेत. त्यांच्याबरोबर तिचे तीन भाऊ आणि एक वहिनीसुद्धा गेले आहेत.

तीन मुलगे आणि तीन मुली यांच्या कुटुंबातली तलामाई दुसरी. तिच्या नावातनंही कल्पनाशक्तीचा अभावच दिसतो. ‘तला’ म्हणजे मधली आणि ‘माई’ म्हणजे मुलगी. थोडक्यात, तलामाई म्हणजे मधली मुलगी. तिचं कुटुंब किरीस्ताव आहे. आपल्या मुलीचं किमान नाव तरी छानसं, कल्पक ठेवण्याइतपत तलामाईचे आईबाप शिक्षित असतील, असं कुणालाही वाटावं. परंतु मिशनर्यांच्या शिक्षणाच्या मोठमोठ्या वचनांतूनही तलामाईचे आईबाप आणि ती स्वतः शाळेचं तोंडसुद्धा बघू शकलेले नाहीत. कोळसा गोळा करायचा, किंवा बर्धमानच्या शेतांत काम करायचं इतकंच काय ते त्यांना ठाऊक.

तलामाई तिच्या गटापासून थोडी फारकत घेऊन चालू लागते. एक पुरुष तिला खुणावतोय. तो उच्चवर्णीय आहे. गोरा, तरुण आणि रेल्वे सुरक्षा दलातला जवान. हातातली ब्रेडची भजी दाखवत त्यानं तिला इशारा केलाय आणि कोपर्‍यावरच्या वळणावर दिसेनासा झालाय.

जावं की न जावं अशा दुविधेतच तलामाई जाण्याचा निर्णय घेते. तो खायला देणार आहे आणि तिला भूक लागलीये. रात्रीचे साडेदहा वाजले आहेत. आगगाडी यायला दोन तास अवकाश आहे.
‘‘तुला भूक लागलीये?’’ कोपर्यावर ती वळताक्षणी तो जवान तिला विचारतो, ‘‘तुला खायला हवंय?’’ पोलिसांच्या वस्तीसमोर तो उभा आहे.
‘‘हो.’’ तलामाई.
‘‘तुला पैसे हवे आहेत?’’
‘‘हो.’’
‘‘माझं छोटं काम करशील?’’

त्याच्या कामाच्या स्वरूपाची तलामाईला कल्पना आहे. कोयला रस्त्यावर तिनं पुष्कळदा ते काम केलंय. या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकांमधून कोळसा चोरायला संथाळी बायकामुली जातात. ट्रक ड्रायव्हरांचं आणि तिथल्या पुरुषांचं ते काम इतरांनी करतानाही तिनं पाहिलंय. नामालला जाताना रेल्वेस्थानकावरही पैशांसाठी, अन्नासाठी संथाळी बायका ती कामं करतात, याचीही तिला जाणीव आहे.
‘‘हो,’’ तलामाई उत्तरते. पोलिस वसाहतीमागच्या अंधार्‍या, खोलशा आडोशाला ती त्याच्यामागोमाग जाते.

कामासाठी फारसा वेळ जात नाही. तो जवान तयारीतच आहे. तो पटकूर अंथरतो आणि आपली पाटलूण काढतो. कंडोमही चढवतो. तलामाईला काय करायचं ते ठाऊक आहे. सगळे कपडे काढायची गरज नसते. तो तिला अंगाखाली घेतो. त्याच्या लयबद्ध हालचालींकडे आणि बदलत्या चेहर्‍याकडे त्या अंधारात तलामाई बघत राहते. कधी तो कण्हतो, कधी हसतो. मग म्हणतो, ‘‘साली, तुम्ही संथाळी बायका याचसाठी आहात. मस्त आहेस!’’ तलामाई काहीच बोलत नाही, काहीच करत नाही. मग एका क्षणी तो तिच्या वक्षस्थळाला हात घालतो, कचकन् चावतो. तिला वेदना होते.
‘‘बोंबलू नकोस. चूप, एक शब्द नको. काही दुखणार नाही’’, तो धापा टाकत सांगतो.

तलामाई आकसत नाही, तोंडातून वेदनेचा चीत्कारही काढत नाही. तिला काय करायचं ते माहीत आहे. आडवं पडायचं, पाय फाकायचे आणि गुपचूप पडून राहायचं. पुढचं सगळं पुरुषच करतात, हे तिला माहिती आहे. त्या जमिनीच्या खळग्याचा विचार न करता, पापणी लवू न देता, निष्क्रीयपणे ती पडून राहते. खळग्याच्या बशीत काळा ढग स्वतःला रिकामा करत राहतो.

दहा मिनिटांत सगळा कारभार उरकला जातो.

तो दीर्घश्वास टाकून उठतो आणि तलामाईला उठायला मदत करतो. कंडोम फेकून देऊन कपडे चढवतो. मग दोन गारढोण ब्रेडची भजी आणि पन्नास रुपयांची नोट तिच्या हाती कोंबून निघून जातो. तीही आपली लुंगी नेसते, नेसूचा पदर घेते, पन्नासची नोट चोळीत ठेवून दोन्ही भजी खाते अन् आपल्या जत्थ्याकडे चालू लागते.

***

मूळ संथाळी लेखक - हाँसदा सौभेन्द्र शेखर, मो. ९९३९१४०८०४, hansdass@gmail.com

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (जानेवारी, २०१७ व सप्टेंबर, २०१७)

***

'नोव्हेंबर म्हणजे स्थलांतर' ही कथा व संपादकीय मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास अनुमती दिल्याबद्दल हाँसदा सौभेन्द्र शेखर, सुजाता देशमुख व मेनका प्रकाशन यांचे आभार.

***
विषय: 
प्रकार: 

माहेर मध्ये वाचलेली ही कथा. संपादकीय बहुतेक वाचले नव्हते त्यामुळे लेखकाविषयी माहिती नव्हती. संथाळीच काय, अजून किती जण असे घासभर अन्नासाठी स्वतःलाच विकतात देव जाणे. भयाण वास्तव. Sad :(. ही परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे पण ती सुधारण्याचे प्रयत्न करण्या ऐवजी ती तशी नाहीच म्हणून दाखवण्याची धडपड करणाऱ्यांना काय म्हणणार?

धन्यवाद इथे दिल्याबद्दल.

भयाण!
ह्या कथेमुळे बंदी/ बडतर्फ केलं, वास्तव किती भयाण असू शकेल कल्पना करवत नाही. सत्ताधारी कुठलाही असो, कायद्याचा आणि कोर्टाचा धाक नसेल तर माणूसाचा समूह जगात कुठेही असो असाच वागेल. शिक्षण घेऊन तरी काय फरक पडतोय का!
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

भयंकर ! Sad
बाकी काही लिहायलाही सुचत नाहीये

अन्गावर येणार्‍या प्रखर वास्तवाची थेट जाणीव करून देणारी कथा , इथे दिल्याबद्दल धन्यवाद!