बायकांचा घोळका आणि घोळक्यातल्या बायका......

Submitted by विद्या भुतकर on 6 September, 2017 - 22:19

आज एक मिटिंग होती ऑफिसमध्ये आणि मध्यभागी एक डिरेक्टर बसलेला होता. मी पोचले तोवर बाकी बऱ्याच खुर्च्यांवर लोक बसले होते पण त्याच्या शेजारची एक खुर्ची रिकामी होती आणि दुसऱ्या बाजूला एक पुरुष बसलेला होता. मी जाऊन त्याच्याशेजारच्या खुर्चीत बसले. हे सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मी असं काहीतरी पाहण्याची. अर्थात शाळेत असताना, कॉलेजमध्ये दंगा करण्यासाठी पुढच्या खुर्च्या सोडून मागे बसून मजा केली आहे. पण त्याला वेगळं कारण असायचं. पुढे पुढे ऑफिसमध्येही हे पाहिलंय आणि वाटलं, का? का आपल्याला अशा मीटिंगमध्ये मोठ्या कुणा शेजारी तरी बसायची भीती असते किंवा तिथे बसताना क्षणभर विचार केला जातो.

नुसतं मीटिंगमध्येच नाही तर एखादी मोठी कॉन्फरन्स म्हणा. थोड्या दिवसांपूर्वी मी अशाच एका कॉन्फरंसला गेले होते. तिथं फारसं कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. आजूबाजूला पाहिलं आणि एक मधली रिकामी खुर्ची पाहून बसून घेतलं. ओळखीचं कुणी असेल, मित्र-मैत्रीण असेल तरी समजू शकतो. पण मी अनेकवेळा असं पाहिलंय की अनेक जणी बाजूला कुणी स्त्री असेल तर तिच्याजवळ जाऊन बसतात, ती ओळखीची असायलाच पाहिजे असं नाही. किंवा असंही असतं की दोन चार जणी एक कोपरा धरून बसतात. यात मी फक्त ऑफिसमधला संदर्भ देत आहे. मला प्रश्न पडतो की का प्रत्येक स्रीला असं घोळका करून बसायची गरज वाटत असेल? कितीही मोठ्या पदावर ती असू देत, मॅनेजर असो की अजून कुणी, अशा जमावामध्ये स्त्रियांची ठराविक वागणूक मी पाहिली आहे. बरं ती केवळ भारतीयच स्त्री नाही, अगदी इथे अमेरिकनही.

हे झालं फक्त बसण्याबद्दल. अशा एखाद्या ठिकाणी मीटिंगमध्ये, कॉन्फरन्स तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे किंवा एखादा वादाचा मुद्दा पुढे आणायचा आहे, अशा वेळी तर हा सहभाग अजून कमी दिसतो. अशा किती मिटिंग किंवा जमाव असतील जिथे पहिला प्रश्न एका स्त्रीने विचारला आहे. कदाचित पत्रकार वगैरे असेल एखादी पण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा अगदी पालक सभेमध्येही एखादी स्त्री उभी राहून पहिला प्रश्न विचारताना पाहिली नाहीये. ऑफिसमध्ये अनेक मुली, मैत्रिणी मोठ्या पदांवर पाहते. त्या आपलं काम उत्तमरीतीने करतात पण अशा कार्यक्रम, मिटिंग मध्ये त्यांचा सहभाग खूपच कमी जाणवतो.

ऑफिसच्या कामात वगैरे तरी ठीक आहे, पुढे जाऊन एखाद्या ऑफिसच्या पार्टीला जायचं असेल तर अनेक जणी नकार देतात किंवा जाण्याचं टाळतात. त्यातली कारणं, 'अरे कुणी ओळखीचं नाहीये तिथे', 'संध्याकाळी आहे, घरी स्वयंपाक करायचा आहे', 'रात्री घरी सोडायला कुणी नाहीये', 'मी ड्रिंक्स घेत नाही',.... अशी एक ना अनेक कारणं. त्या पार्टीमध्ये माझ्या कुणी ओळखीचं नाहीये म्हणून काय झालं? नवरा गेलाच असता ना? मग स्त्री म्हणून अशा ठिकाणी माघार का घेतात? मध्ये अशाच एका पार्टीमध्ये गेले होते, कुणीच ओळखीचं नव्हतं. आधी वाटलं उगाच आले. पण मग स्वतःच ओळख करून घेतली लोकांशी. अगदी २-४ मिनिट बोलले असेलएकेकाशी, पण ऑफिसमध्ये सर्व कामांत पुढे असताना अशा पार्टीमध्ये मागे का राहायचे? काय होतंय स्वतः ओळख करून घेतली तर? एखादा विषय काढून विश्वासाने लोकांशी बोललं तर?

या सर्व गोष्टी झाल्या ऑफिसमधल्या. भारतात किंवा अमेरिकेतही अनेक भारतीय ग्रुपमधील पार्ट्याना अनेक अनुभव आले ते अगदी एकसारखे होते. उदा: एखाद्या घरी कार्यक्रम आहे. एक जोडपं घरात येतं. पुढच्या पाच मिनिटांत त्यातून बाई वेगळी होऊन बायकांच्या घोळक्यात गेलेली असते. अगदी बाकीचे तिचे मित्र तिथे असले तरीही. मी अशाही ग्रुपमध्ये गेलेले आहे जिथे फक्त मी आणि नवराच सोबत आहे, बाकी सर्व अनोळखी तरीही नवऱ्याचा हात सोडून बायकांच्या घोळक्यात जायला होतं कारण सर्व जणी एकत्र बसलेल्या आहेत. कितीतरी वेळा विचार करते सर्वच जण एकत्र का बसत नाहीयेत. स्वयंपाकघरात सगळ्याजणी आणि बाहेर पुरुष. भारतात तर हे अगदीच सर्वत्र बघायला मिळेल. पण अमेरिकेत समवयस्क मित्र-मैत्रिणी असूनही हे असे घोळके बघते.

मग हळूहळू मी त्या घोळक्यात थोडा वेळ काढून पुन्हा दुसऱ्या घोळक्यात सहभाग घेऊ लागले. कारण अनेक वेळा सोफ्यावर बसून सर्व पुरुष एखाद्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यात स्त्रिया काहीच भाग घेत नाहीयेत असं पाहिलंय. सर्व विषयांमध्ये ज्ञान असूनही अशा ठिकाणी वाद घालणं किंवा चर्चेत सहभाग घेणं बायका टाळतात. का? आपलं मत सर्वांसमोर ठामपणे मांडता आलं पाहिजे. अर्थात हे सोप्प नाहीये. अनेक वेळा मी 'mansplaning' पाहिलं आहे. म्हणजे काय? तर मला माहित असलेली गोष्टी एखाद्या पुरुषाने विस्ताराने समजवणे अगदी सोप्या भाषेत. का? तर हिला तेही माहित नसेल म्हणून. किंवा 'आम्ही काय बोलतोय आणि ही काय बोलतेय' अशा नजराही पाहिल्या आहेत मी. माझं म्हणणं काय आहे? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहित नसतेच. म्हणून आपण त्या चर्चेत सहभाग का नाही घ्यायचा? विचारायचा एखादा प्रश्न, काय बिघडलं? हसणारे हसतील, त्यांचे दात दिसतील.

एखादा कार्यक्रम किंवा लग्न घेऊ, रात्री सर्वजण गप्पा मारत बसलेत. बायका एक एक करून निघून गेल्यात झोपायला. अशा किती स्त्रिया असतील ज्या 'मला नाही झोप येत' म्हणून बाहेर येऊन गप्पा मारतात? 'पाहुणे काय म्हणतील' हा विचार केला जातोच. बिचारी ती मागे राहिलेलीही जाऊन झोपून जाते. का नाही बसत बाहेर येऊन? आपलेच नातेवाईक आणि पाहुणे असूनही? या अशा गोष्टींची सुरुवात शाळेतच झालेली असते खरंतर. मैत्रीण नाही म्हणून मी हा क्लास घेत नाही, पिक्चर पाहायचा आहे पण मैत्रीण नाहीये एकही. बाकी सर्व मुलेच आहेत, इ. अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मी माझ्या पहिल्या नोकरीत असताना सर्वांसोबत सिंहगडला गेले होते. त्यात एकही मुलगी आली नव्हती. त्यावर नंतर चर्चा झाल्याचं मला कळलंच होतं. पण मला कळत नाही की बाकीच्या येत नाहीयेत म्हणून मी का मन मारायचं?

सहभाग घेण्याबद्दल अजून एक निरीक्षण. सर्वजण एकत्र बसलेत, कुठेही पार्टी असेल किंवा ऑफिसचा ग्रुप असेल किंवा अजून काही. कुणी म्हणालं,'तू गाणं म्हण ना?'. हा आग्रह एका मुलाला केला आणि मुलीला केला तर कुणी ते म्हणण्याची शक्यता जास्त वाटते? एखादीचा आवाज सुंदर असूनही का ती नकार देते? परवा गणपती विसर्जनाला बिल्डींगभोवतीच मिरवणूक काढली होती. लहान मुले मुली, मोठी माणसे नाचत होती. मला तर गणपती डान्सच येतो फक्त. पण अशा अनेक ठिकाणी मी पाहिलं आहे की नाचायची इच्छा असूनही कुठली स्त्री स्वतः पुढाकार घेत नाही. कुणीतरी तिला ओढून आणायचं, किंवा एखादी सुरुवात करणार, मग हळूहळू सगळ्याजणी येणार, तेही वेगवेगळं नाही, एका घोळक्यात नाचायचं? का? कसली भीती असते, लाज असते? इच्छा आहे ना नाचायची, मग घ्यायचं नाचून? अगदी अमेरिकेत अनेक भारतीय लहान मुलांच्या वाढदिवसाला शेवटी असणाऱ्या डीजेच्या गाण्यांवरही कुणी नाचायला तयार होत नाही.

एखाद्या कार्यक्रमात पंगत बसणार म्हटलं तरी सर्वात पहिलं ताट घ्यायला बाई धजावत नाही. काय होतंय? म्हणेल कुणी काहीही, भूक लागलीय ना? ताट घ्यायचं आणि जेवायला बसायचं! कुणी ना कुणी घेणार असतंच ना? आपण व्हायचं पहिलं. या अशा अनेक गोष्टी मी अनेक वेळा वर्षानुवर्षं पाहात आले आहे. अनेक ठिकाणी मी आता पुढाकार घेते, कधी नाचायला, कधी ताट वाढून घ्यायला, बाहेर बसलेल्या पुरुषांच्या घोळक्यात वाद घालायला. किंवा ऑफिसमध्ये एखादा अगदी बावळट प्रश्न का होईना विचारायला.

वाटतं, का मागं राहायचं? कशाची भीती बाळगायची? का लोकांचा विचार करायचा? आपल्याला बरोबरी हवी आहे ना? मग हे असं बारीक सारीक गोष्टींमध्ये मागे राहणं सोडून दिलं पाहिजे. मग ती एखादी गृहिणी असो किंवा मोठी मॅनेजर. आणि हो, समजा नसेल आपल्याला पडायचं घोळक्यातून बाहेर, निदान जी पडतेय तिला नावं ठेवणं तरी बंद केलं पाहिजे. पुरुषांनाही या अशा ठिकाणी कसं वागावं, त्या पुढे येणाऱ्या स्त्रीला सामावून कसं घ्यावं याची समज आली पाहिजे. तिला नावं ठेवण्यामध्ये आपण पुढाकार घेत नाहीये ना हे पाहिलं पाहिजे.

अनेक वेळा या विषयावर लिहायचं मनात यायचं पण राहून जात होतं. यातून कुणाच्या भावना दुखवायच्या नसून, स्वतःचं निरीक्षण करण्याचा विचार मांडायचा आहे. उलट कुणी असा विचार करून मागे राहत असेल तर तिला पुढे जाण्याचा सल्ला देण्याचा आहे. आपलं शिक्षण, आपली प्रतिभा आणि शक्ती सर्व असतानाही केवळ आत्मविश्वास कमी असल्याने किंवा लोक काय म्हणतील याचा विचार केल्याने अनेकजणी घोळक्यात अडकून राहतात. मग तो घरातला एखाद्या कार्यक्रमाचा असो किंवा ऑफिसमध्ये एखाद्या कॉन्फरन्सचा. मी काही खूप बंड वगैरे करायचं म्हणत नाहीये, पण या छोट्या गोष्टीतून बदल जरूर घडवू शकतो स्वतःमधे. तुमचं मत जरूर सांगा या विषयावर.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा तरी लोकांत बोलायचा आत्मविश्वास वाढण्याऐवजी वयानुरुप कमी झालाय. त्यात चतुरस्र वाचन नाही, स्वतःची ठाम मते नाहीत. असे काही ट्रेटस पाचवीला पूजलेले आहेत. बरं आवडी म्हणाल तर मोजक्याच आणि अनवट. त्याही कविता अन ज्योतिष. पण वाचलेल्या कवितांच्याच्या ओळी लक्षात रहात ना कविंची नावं. सेन्स ऑफ ह्युमरची वानवा.
या सर्वाचा परिपाक म्हणजे, सेफ वाटेल असे म्हणजे बायकांत जाउन बसणेच होते. पूर्वी जरा होता आत्मविश्वास. कारण वाचन जबरदस्त होतं. म्हणजे रिलेव्हंट वाचन, चालू घडामोडी.
हे कळतय पण वळत नाही अशातली गत झालीये. लेख तर जबरीच आहे. फार फार उत्तम मुद्दा मांडलेला आहे. अगदी सहमत आहे.

अगदी सहमत. सामो शी सुद्धा सहमत.
मी आधी पॅरेंट्स मी टींग मधे हिरीरीने प्रश्न विचारायची... तर टीचर च मुलीला म्हणाल्या म्हणे की 'युअर मदर हॅज मेनी क्वेरीज'.!! ...आणि 'तू नको ना विचारत जाऊस काही' ...असे ती म्हणाली...!! मग मी सो डून दिलं व गप्प बसायला लागले...अर्थात ते प्रश्न फार मोठे नसायचे आणि कालांतराने आपोआपच त्याची उत्तरे मिळायचीही...!!
पण ऑफीस च्या संध्याकाळाच्या पार्टीत मात्र मला फारच ऑकवर्ड व्हायचे..... उगीचच इन्फिरीअर वाटायचे.... आणि कुणा पुरुषांच्या ग्रुप मधे बोलायला गेले तरी ते ऑकवर्ड होउन गप्पच व्हायचे.... पुन्हा सेल्स टार्गेट्स, शेअर्स आदि विषयांवर मला शून्य माहिती... त्यामुळे विषयां ची वानवा!
पण असे होते खरे.......

Pages