बायकांचा घोळका आणि घोळक्यातल्या बायका......

Submitted by विद्या भुतकर on 6 September, 2017 - 22:19

आज एक मिटिंग होती ऑफिसमध्ये आणि मध्यभागी एक डिरेक्टर बसलेला होता. मी पोचले तोवर बाकी बऱ्याच खुर्च्यांवर लोक बसले होते पण त्याच्या शेजारची एक खुर्ची रिकामी होती आणि दुसऱ्या बाजूला एक पुरुष बसलेला होता. मी जाऊन त्याच्याशेजारच्या खुर्चीत बसले. हे सांगण्याचं कारण म्हणजे ही काही पहिली वेळ नाही मी असं काहीतरी पाहण्याची. अर्थात शाळेत असताना, कॉलेजमध्ये दंगा करण्यासाठी पुढच्या खुर्च्या सोडून मागे बसून मजा केली आहे. पण त्याला वेगळं कारण असायचं. पुढे पुढे ऑफिसमध्येही हे पाहिलंय आणि वाटलं, का? का आपल्याला अशा मीटिंगमध्ये मोठ्या कुणा शेजारी तरी बसायची भीती असते किंवा तिथे बसताना क्षणभर विचार केला जातो.

नुसतं मीटिंगमध्येच नाही तर एखादी मोठी कॉन्फरन्स म्हणा. थोड्या दिवसांपूर्वी मी अशाच एका कॉन्फरंसला गेले होते. तिथं फारसं कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. आजूबाजूला पाहिलं आणि एक मधली रिकामी खुर्ची पाहून बसून घेतलं. ओळखीचं कुणी असेल, मित्र-मैत्रीण असेल तरी समजू शकतो. पण मी अनेकवेळा असं पाहिलंय की अनेक जणी बाजूला कुणी स्त्री असेल तर तिच्याजवळ जाऊन बसतात, ती ओळखीची असायलाच पाहिजे असं नाही. किंवा असंही असतं की दोन चार जणी एक कोपरा धरून बसतात. यात मी फक्त ऑफिसमधला संदर्भ देत आहे. मला प्रश्न पडतो की का प्रत्येक स्रीला असं घोळका करून बसायची गरज वाटत असेल? कितीही मोठ्या पदावर ती असू देत, मॅनेजर असो की अजून कुणी, अशा जमावामध्ये स्त्रियांची ठराविक वागणूक मी पाहिली आहे. बरं ती केवळ भारतीयच स्त्री नाही, अगदी इथे अमेरिकनही.

हे झालं फक्त बसण्याबद्दल. अशा एखाद्या ठिकाणी मीटिंगमध्ये, कॉन्फरन्स तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे किंवा एखादा वादाचा मुद्दा पुढे आणायचा आहे, अशा वेळी तर हा सहभाग अजून कमी दिसतो. अशा किती मिटिंग किंवा जमाव असतील जिथे पहिला प्रश्न एका स्त्रीने विचारला आहे. कदाचित पत्रकार वगैरे असेल एखादी पण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा अगदी पालक सभेमध्येही एखादी स्त्री उभी राहून पहिला प्रश्न विचारताना पाहिली नाहीये. ऑफिसमध्ये अनेक मुली, मैत्रिणी मोठ्या पदांवर पाहते. त्या आपलं काम उत्तमरीतीने करतात पण अशा कार्यक्रम, मिटिंग मध्ये त्यांचा सहभाग खूपच कमी जाणवतो.

ऑफिसच्या कामात वगैरे तरी ठीक आहे, पुढे जाऊन एखाद्या ऑफिसच्या पार्टीला जायचं असेल तर अनेक जणी नकार देतात किंवा जाण्याचं टाळतात. त्यातली कारणं, 'अरे कुणी ओळखीचं नाहीये तिथे', 'संध्याकाळी आहे, घरी स्वयंपाक करायचा आहे', 'रात्री घरी सोडायला कुणी नाहीये', 'मी ड्रिंक्स घेत नाही',.... अशी एक ना अनेक कारणं. त्या पार्टीमध्ये माझ्या कुणी ओळखीचं नाहीये म्हणून काय झालं? नवरा गेलाच असता ना? मग स्त्री म्हणून अशा ठिकाणी माघार का घेतात? मध्ये अशाच एका पार्टीमध्ये गेले होते, कुणीच ओळखीचं नव्हतं. आधी वाटलं उगाच आले. पण मग स्वतःच ओळख करून घेतली लोकांशी. अगदी २-४ मिनिट बोलले असेलएकेकाशी, पण ऑफिसमध्ये सर्व कामांत पुढे असताना अशा पार्टीमध्ये मागे का राहायचे? काय होतंय स्वतः ओळख करून घेतली तर? एखादा विषय काढून विश्वासाने लोकांशी बोललं तर?

या सर्व गोष्टी झाल्या ऑफिसमधल्या. भारतात किंवा अमेरिकेतही अनेक भारतीय ग्रुपमधील पार्ट्याना अनेक अनुभव आले ते अगदी एकसारखे होते. उदा: एखाद्या घरी कार्यक्रम आहे. एक जोडपं घरात येतं. पुढच्या पाच मिनिटांत त्यातून बाई वेगळी होऊन बायकांच्या घोळक्यात गेलेली असते. अगदी बाकीचे तिचे मित्र तिथे असले तरीही. मी अशाही ग्रुपमध्ये गेलेले आहे जिथे फक्त मी आणि नवराच सोबत आहे, बाकी सर्व अनोळखी तरीही नवऱ्याचा हात सोडून बायकांच्या घोळक्यात जायला होतं कारण सर्व जणी एकत्र बसलेल्या आहेत. कितीतरी वेळा विचार करते सर्वच जण एकत्र का बसत नाहीयेत. स्वयंपाकघरात सगळ्याजणी आणि बाहेर पुरुष. भारतात तर हे अगदीच सर्वत्र बघायला मिळेल. पण अमेरिकेत समवयस्क मित्र-मैत्रिणी असूनही हे असे घोळके बघते.

मग हळूहळू मी त्या घोळक्यात थोडा वेळ काढून पुन्हा दुसऱ्या घोळक्यात सहभाग घेऊ लागले. कारण अनेक वेळा सोफ्यावर बसून सर्व पुरुष एखाद्या विषयावर चर्चा करत आहेत आणि त्यात स्त्रिया काहीच भाग घेत नाहीयेत असं पाहिलंय. सर्व विषयांमध्ये ज्ञान असूनही अशा ठिकाणी वाद घालणं किंवा चर्चेत सहभाग घेणं बायका टाळतात. का? आपलं मत सर्वांसमोर ठामपणे मांडता आलं पाहिजे. अर्थात हे सोप्प नाहीये. अनेक वेळा मी 'mansplaning' पाहिलं आहे. म्हणजे काय? तर मला माहित असलेली गोष्टी एखाद्या पुरुषाने विस्ताराने समजवणे अगदी सोप्या भाषेत. का? तर हिला तेही माहित नसेल म्हणून. किंवा 'आम्ही काय बोलतोय आणि ही काय बोलतेय' अशा नजराही पाहिल्या आहेत मी. माझं म्हणणं काय आहे? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहित नसतेच. म्हणून आपण त्या चर्चेत सहभाग का नाही घ्यायचा? विचारायचा एखादा प्रश्न, काय बिघडलं? हसणारे हसतील, त्यांचे दात दिसतील.

एखादा कार्यक्रम किंवा लग्न घेऊ, रात्री सर्वजण गप्पा मारत बसलेत. बायका एक एक करून निघून गेल्यात झोपायला. अशा किती स्त्रिया असतील ज्या 'मला नाही झोप येत' म्हणून बाहेर येऊन गप्पा मारतात? 'पाहुणे काय म्हणतील' हा विचार केला जातोच. बिचारी ती मागे राहिलेलीही जाऊन झोपून जाते. का नाही बसत बाहेर येऊन? आपलेच नातेवाईक आणि पाहुणे असूनही? या अशा गोष्टींची सुरुवात शाळेतच झालेली असते खरंतर. मैत्रीण नाही म्हणून मी हा क्लास घेत नाही, पिक्चर पाहायचा आहे पण मैत्रीण नाहीये एकही. बाकी सर्व मुलेच आहेत, इ. अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मी माझ्या पहिल्या नोकरीत असताना सर्वांसोबत सिंहगडला गेले होते. त्यात एकही मुलगी आली नव्हती. त्यावर नंतर चर्चा झाल्याचं मला कळलंच होतं. पण मला कळत नाही की बाकीच्या येत नाहीयेत म्हणून मी का मन मारायचं?

सहभाग घेण्याबद्दल अजून एक निरीक्षण. सर्वजण एकत्र बसलेत, कुठेही पार्टी असेल किंवा ऑफिसचा ग्रुप असेल किंवा अजून काही. कुणी म्हणालं,'तू गाणं म्हण ना?'. हा आग्रह एका मुलाला केला आणि मुलीला केला तर कुणी ते म्हणण्याची शक्यता जास्त वाटते? एखादीचा आवाज सुंदर असूनही का ती नकार देते? परवा गणपती विसर्जनाला बिल्डींगभोवतीच मिरवणूक काढली होती. लहान मुले मुली, मोठी माणसे नाचत होती. मला तर गणपती डान्सच येतो फक्त. पण अशा अनेक ठिकाणी मी पाहिलं आहे की नाचायची इच्छा असूनही कुठली स्त्री स्वतः पुढाकार घेत नाही. कुणीतरी तिला ओढून आणायचं, किंवा एखादी सुरुवात करणार, मग हळूहळू सगळ्याजणी येणार, तेही वेगवेगळं नाही, एका घोळक्यात नाचायचं? का? कसली भीती असते, लाज असते? इच्छा आहे ना नाचायची, मग घ्यायचं नाचून? अगदी अमेरिकेत अनेक भारतीय लहान मुलांच्या वाढदिवसाला शेवटी असणाऱ्या डीजेच्या गाण्यांवरही कुणी नाचायला तयार होत नाही.

एखाद्या कार्यक्रमात पंगत बसणार म्हटलं तरी सर्वात पहिलं ताट घ्यायला बाई धजावत नाही. काय होतंय? म्हणेल कुणी काहीही, भूक लागलीय ना? ताट घ्यायचं आणि जेवायला बसायचं! कुणी ना कुणी घेणार असतंच ना? आपण व्हायचं पहिलं. या अशा अनेक गोष्टी मी अनेक वेळा वर्षानुवर्षं पाहात आले आहे. अनेक ठिकाणी मी आता पुढाकार घेते, कधी नाचायला, कधी ताट वाढून घ्यायला, बाहेर बसलेल्या पुरुषांच्या घोळक्यात वाद घालायला. किंवा ऑफिसमध्ये एखादा अगदी बावळट प्रश्न का होईना विचारायला.

वाटतं, का मागं राहायचं? कशाची भीती बाळगायची? का लोकांचा विचार करायचा? आपल्याला बरोबरी हवी आहे ना? मग हे असं बारीक सारीक गोष्टींमध्ये मागे राहणं सोडून दिलं पाहिजे. मग ती एखादी गृहिणी असो किंवा मोठी मॅनेजर. आणि हो, समजा नसेल आपल्याला पडायचं घोळक्यातून बाहेर, निदान जी पडतेय तिला नावं ठेवणं तरी बंद केलं पाहिजे. पुरुषांनाही या अशा ठिकाणी कसं वागावं, त्या पुढे येणाऱ्या स्त्रीला सामावून कसं घ्यावं याची समज आली पाहिजे. तिला नावं ठेवण्यामध्ये आपण पुढाकार घेत नाहीये ना हे पाहिलं पाहिजे.

अनेक वेळा या विषयावर लिहायचं मनात यायचं पण राहून जात होतं. यातून कुणाच्या भावना दुखवायच्या नसून, स्वतःचं निरीक्षण करण्याचा विचार मांडायचा आहे. उलट कुणी असा विचार करून मागे राहत असेल तर तिला पुढे जाण्याचा सल्ला देण्याचा आहे. आपलं शिक्षण, आपली प्रतिभा आणि शक्ती सर्व असतानाही केवळ आत्मविश्वास कमी असल्याने किंवा लोक काय म्हणतील याचा विचार केल्याने अनेकजणी घोळक्यात अडकून राहतात. मग तो घरातला एखाद्या कार्यक्रमाचा असो किंवा ऑफिसमध्ये एखाद्या कॉन्फरन्सचा. मी काही खूप बंड वगैरे करायचं म्हणत नाहीये, पण या छोट्या गोष्टीतून बदल जरूर घडवू शकतो स्वतःमधे. तुमचं मत जरूर सांगा या विषयावर.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या एक मत,

>>>>हे. मला प्रश्न पडतो की का प्रत्येक स्रीला असं घोळका करून बसायची गरज वाटत असेल? <<<<
नाही. मला स्त्रीया मैत्रीणी म्हणून ऑफीसमध्ये कमीच अथवा नाहीच आहेत ऑफीसमध्ये. आणि व्यक्तिगत जीवनात मोजून जवळच्या मैत्रीणी आहेत तेव्हा तिथे अर्थातच बाजूला बसतो भेटल्यावर .

>>>>ऑफिसमध्ये अनेक मुली, मैत्रिणी मोठ्या पदांवर पाहते. त्या आपलं काम उत्तमरीतीने करतात पण अशा कार्यक्रम, मिटिंग मध्ये त्यांचा सहभाग खूपच कमी जाणवतो.<<<<<<
असे काही नाही. प्रत्येकाचे आवड असते तेव्हा सरसकट समीकरण नाही असु शकत.

बॉसच्या शेजारी किंवा दिसेल असे बसणे नको वाटते जेव्हा नुसते एकायचे काम असते मीटींग मध्ये. कारण झोपायला अथबा टाईमपास कमी करायला मिळतो ; भिती म्हणून नाही.

बॉस च्या शेजारी बसून बड़बड़ करता येत नाही .चालू असलेल्या मुद्द्याची चीरफाड़ करता येत नाही म्हणून फक्त बाकि भीती वगैरे आजीबात नाही
हेमावैम

स्वयंपाकघरात सगळ्याजणी आणि बाहेर पुरुष.

मला पण हे सर्वात भिकार वाटतं.
पण हॉटेलात जास्त वेळ बसता येत नाही, मुलं नीट साम्भाळता येत नाहीत, ती कुठे बागडतात यावर लक्ष ठेवावं लागतं, आणि हे सर्व करताना डिनर एन्जॉय करता येत नाही म्हणून घरीच पार्ट्या करा ही कारणं माझ्या मैत्रिणींकडून ऐकली आहेत.प्लस जास्त पाहुणे असल्यास घरी डिनर बनवल्यास खर्च बराच कमी येतो.
मग घरी खाणं म्हटलं की बाकी बायकांना बाहेरच्या खोलीत आयतं बसून खायला कसंतरी वाटतं.म्हणून मदत करायला आत जातात.नंतर आपोआप बायका आत आणि पुरुष बाहेर सोफ्यावर असा ट्रेंड पडत जातो.

मी स्वतः अशी झालेली बायका आत पुरुष बाहेर वाली गेट टुगेदर एन्जॉय केलेली नाहीत.माझे क्लासमेट पुरुष असले आणि बायका त्यांच्या मैत्रिणी तरी हे वेगळ्या खोल्यांचे क्लासिफिकेशन आहे तसेच राहते.मला अश्या कार्यक्रमात माझे मित्र मैत्रिणी भेटत नाहीत. 'अमका आला आणि भेट झाली' इतका एक टिकमार्क होतो.पण याला इलाज नाही.बाहेर जाउ प्रपोज केल्यास 'घरी खाणं बनवायचा आळस' वगैरे अर्थ निघतात.

बाकी पार्ट्यात मोकळेपणी कमेंटस करायला जवळ समविचारी मैत्रिणी आणि एकदोनच डोक्यात न जाणारे मित्र असले की पुरे!!! बायकाच हव्या असा आग्रह नाही.

छान लेख आहे. आवडला. पटला.
घरकुटुंबाबाबत टिपिकल गोष्टी आहेत या, पण ऑफिसेसमध्येही असे होते का अजून?
म्हणजे मला जास्त अनुभव नाही. त्यात आधीच्या जॉबला 80 टक्के महिलाशक्तीच असल्याने परिस्थितीच वेगळी होती. पण सध्याच्या एमेनसीत 30-35 टक्के फार तर मुली असतील तरी तुम्ही म्हणता त्यापेक्षा वेगळेच चित्र आहे. जर हे खरे असेल तर आमच्या ऑफिसच्या बायका आगाऊ म्हणायला हव्यात Happy
म्हणजे लंच टेबल असो वा ऑफिस मीटींग त्या बायकांना प्रत्येक ठिकाणी हिरीरीनेच बोलायचे असते.

माझी स्वत:ची बेस्ट कलीग एक विवाहीत महिला आहे. म्हणजे वॉशरूमला जाताना फक्त आमचे रस्ते वेगळे होतात अन्यथा ऑफिस पार्टी असो वा मीटींग वा कुठल्या लाईनीत उभे राहायचे असो, एकत्रच जाणार आणि एकमेकांसाठी जागा अडवणार. संध्याकाळी तिचा नवरा तिला घ्यायला येतो, त्याला लेट झाल्यास आम्ही एका प्लेटमध्ये शेअर करत पाणीपुरी आणि दहीपुरी खातो. कोणी काही बघेल किंवा तिचा नवराच येईल असेही काही तिला कधी वाटत नाही. आणि असेही नाही की आमची जोडी विजोड असल्याने याची भिती नाही. उलट खूप अनुरूप आहोत. आणि तरीही आजवर यात कोणालाही काहीही कुजबुजण्यासारखे वाटले नाही. म्हणजे ओवरऑलच सर्वांचीच मेंटेलिटी ईटस ओके टाईप्स आहे. ईनफॅक्ट आता हा लेख वाचला म्हणून हे लिहिले अन्यथा यात काही विशेष मलाही वाटले नाही.
आणि हो, विशेष म्हणजे ती माझी बेस्ट कलीग आहे, बेस्ट फ्रेंड नाही. मित्रांमध्ये एकमेकांच्या पर्सनल आयुष्याबाबत जी स्पेस आपण देतो घेतो ते आम्ही त्या लेव्हलला करत नाही.

असो, एकूणच ओवरऑल त्या ऑफिसमुद्द्याबाबत माझ्या अनुभवांच्या आधारे असहमत.

छान लेख आहे. अगदी मनातलं लिहीलय. मलातर खुप वैताग येतो. आपण लेडीज आहोत महणुन खुप बंधने घालुन घयावी लागतात.खुप गोष्टी करायच्या असतात मला ...बेधुंदपणे दारु प्यायची असते,,नाचायचय गणपतीमध्ये तस मी हे सगलं केलय पण मुले एहेन करतात ना बिंधास्त तस नाही...आणि हेच सलतं.खुप आहे अस.आता हे मलाच वाटत का आजुन आहे कोणी? पण असाव्यात...

विद्या...:-) कुठे होतीस इतके दिवस?
चांगला विषय.
मला एस्पेशिअली, संध्याकाळच्या काँफरंसेस मधे फार ऑकवर्ड वाटतं. सगळे अनोळखी पुरुष. काही रुमाल झाकून दारु पिणारे, काही नुसतेच शांत पणे उभे. काय विषय काढायचा कळत नाही. बिझीनेस टॉक्स जास्त करता येत नाहीत, नेटवर्किंग सेशन असतं... तेव्हा तर एकमेकांशी ओळख करुन घेणेच अपेक्षित असते. मोजक्या स्त्रिया...त्यातही काही स्कर्ट टॉप - लाल चुटूक लिपस्टीक मधल्या सेक्रेटरी लेव्हलच्या.... त्यांच्याशी संवाद तर त्याहूनही कठीण..
मला फार जाचतं खरं! कधी तिथून बाहेर पडते असं होतं.

नो सच इशूज. तुमच्या पिढीतल्या बायकांचे जेंडर इशूज सॉर्ट आउट झालेले दिसत नाहीत. मी तर परवा एअर्पोर्ट वर खुर्ची रिकामी होती म म्हनून एका एल्डरली जेंट च्या शेजारी बसलेहोते. ते ही नीटच बोलत होते त्यांच्या सहकार्‍यांशी. मला वाटले असे ल कोणी चेअर मन टाइप. पण ते एक मंत्री आहेत केंद्रातले. मग काही फॅन क्लब टाइप लोकांनी फोटो व्गैरे काढोन घेतले. मी बिनधास्त वावरते सर्व ठिकाणी आणि लोकांच्या पर्सनल स्पेस चा आदर पण करते. भोचक वागत नाही. ही सर्व स्किल्स यायला लागतात. नेट वर्किंग करत नाहीत बायका नीट. मग ग्लास सीलिन्ग ला धडकून खालीच राहतात.

खरं तर मिसमॅच ग्रुप आणि अती बोअरिन्ग ऑफिस पार्टीज असतील तर मी बाई, माणूस ,दगड,भिंत कोणाशेजारीही न बसता ती पार्टी स्किप मारणं पसंत करते.
कधीकधी पुरुषच स्त्रियांपेक्षा जास्त हेल्ड बॅक असतात.
वाढदिवसाला स्वीट घ्यायला शेक हँड केल्यावर आधी प्रचंड भूत पाहिल्याचे एक्स्प्रेशन्स देतात.

विद्या ,
लेख छान आहे आणी तुमचे ओबझरवेशन सुद्धा बरोबर आहे.
पण हाच प्रकार ज्या gathering मध्ये स्त्रिया जास्त असतात तिकडे पुरुषांच्या बाबतीत सुद्धा दिसतो.
१) शाळेतील parent मीटिंग, जास्त करून स्त्रिया असतात , जे काही पुरुष आलेले असतात ते असेच सोबत शोधून बसतात Happy
२) क्लास/ दे केअर चे gathering,
३) कुठल्याही छंद वर्गाची / ट्रीप संबंधी मीटिंग, बहुतेक वेळा पुरुष गप्प असतात.
४) स्वयाम्पाकाबद्दल बोलणे चालले असेल, आणि एखाद्या पुरुषाने काही टिप्स शेअर केल्या तर त्याला हि विचित्र नजरांना समोर जावे लागते,

सो हे घोळका करणे वगैरे इस something more than "आपलं शिक्षण, आपली प्रतिभा आणि शक्ती सर्व असतानाही केवळ आत्मविश्वास कमी असल्याने किंवा लोक काय म्हणतील याचा विचार " असे मला वाटते.

आपलं शिक्षण, आपली प्रतिभा आणि शक्ती सर्व असतानाही केवळ आत्मविश्वास कमी असल्याने किंवा लोक काय म्हणतील याचा विचार केल्याने अनेकजणी घोळक्यात अडकून राहतात.
हे अगदी खरं आहे. मी ही आधी अशीच होते. पण आता 'लोक काय म्हणतील' हा विचार करण सोडून दिल आहे. कारण लोक दोन्ही कडून बोलतात. आपल्याला जे करावस वाटत तेच करायच.
पण प्रत्येकीचा स्वभाव सारखा नसतो. काही जणी मुळातच बुजर्‍या स्वभावाच्या असतात. त्या कधीच चारचौघात समोर येत नाहीत. मग कामात कितीही हुशार असूदेत, पुढे होऊन हे काम मी केल आहे हे सुध्दा सांगत नाहीत. ते कोणाच्या मार्फत पोहोचवल जात. जर यात बदल करायचा असेल तर मुळ स्वभावच बदलायला हवा.
पण असही म्हणतात 'स्वभावाला औषध नाही....'

छान लेख आहे. विषय खूप छान आहे. लिहिण्यासारखे खूप आहे.

समजा नसेल आपल्याला पडायचं घोळक्यातून बाहेर, निदान जी पडतेय तिला नावं ठेवणं तरी बंद केलं पाहिजे.>> हे सर्वात महत्वाचे आहे. अनेक ठीकाणी पुरुष काहीच बोलत नाही. त्यांच्या मनातही काहीही येत नाही. पण बायकाच बायकांवर टीका करताना दिसताना

स्वयंपाकघरात सगळ्याजणी आणि बाहेर पुरुष. >>> हा भयंकर प्रकार आहे. मला ह्याचा प्रचंड संताप आहे. पण अजूनही मॉडर्न म्हणविणारे स्त्रीपुरुष ही प्रथा पाळताना दिसतात.

ऑफीसच्या पार्ट्यांना जात नाही कारण मला मनापासून आवडत नाही हल्ली. पूर्वी आवडायचे तेव्हा जायचे.

मी बर्‍याच वेळा सर्व मुले आणि मी एकटी मुलगी अशा प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. कधीही ऑड वाटले नाही. एकदा आम्ही सगळे मिळून धूम बघायला गेलो होतो. सुरुवातीला मी नको म्हटले (तेव्हा खरेच ऑड वाटले होते) पण कलीग्जनी आग्रह केला म्हणून गेले आणि एंजॉय केले होते. नंतर कधी ऑड नाही वाटले. अगदी स्थानिक मराठी मंडळातसुद्धा सर्व पुरुष आणि मी एकटी स्त्री असे काम केले आहे.

कॉलेजमधल्या आमच्या ग्रूपमध्येसुद्धा २-३ मैत्रिणी आणि बाकी सगळे मित्रच आहेत. मैत्रिणी परदेशी सेट्ल झाल्यात. मित्र भारतात आहेत. २ वर्षापूर्वी सर्व मित्रांना भेटायला गेले होते तेव्हा साबा/साबूंकडून पुष्कळ टीका झाली होती. मी दुर्लक्ष केले.

माझा पी.एच.डी थिसीस मी लिहिला तेव्हा सर्व ठीकाणी I च्या ऐवजी We लिहिले होते. थिसीस एक्झामिनर स्त्री होती. तिने मला आयुष्याभरासाठी मोलाचा सल्ला दिला आणि सांगितले की "हे काम माझे आहे. असे confidently म्हणायला शिक. आपण बायका ह्यात कमी पडतो. स्वतःच्या कामाचे क्रेडीट स्वतःकडे घेता आलेच पाहिजे." नंतर मी थिसीस रिवाइज केला हे सांगायला नकोच.

लहानपणापासूनचे कंडीशनिंग आहे. इतक्या सहजासहजी बदल होणार नाही. पुढची पिढी घडविणे हे मात्र आपल्या हातात आहे.

विद्या एक अन एक निरिक्षण पटलंय आणि अनुभवलंय.
फारच अगदी अगदी झालं वाचताना.
मत विचारशील तर ही एक मनोवृत्ती आहे, आणि ती बदलायला खूप वर्ष लागतील.

चालयचेच.ही कळप प्रवृत्ती आहे.
पुण्यात एका टपरी बाहेर सिगारेट ओढत होतो तेव्हा दोन फुकाडे तिथे आले व आजुबाजुला जागा असतानाही माझ्याशेजारी येउन कोण कुठले असल्या गप्पा मारायला लागले.मी सिगरेट फुंकतो म्हणजे त्यांच्यात्लाच आहे अशी मानसिकता होति त्यांची.
सिगारेट सारखी फाल्तु गोष्ट कळप बनवत असेल तर जेंडर इज मच बिगर थिंग.
पुढाकाराच्या बाबतीत मी म्हणेन की बायका पुरुषांसमोर बोलायला लाजतात.तेच एका कीटी पार्टीला जाऊन बघा ,याच बायका कीती बडबड करत असतात.
बायका पुरुषांना एव्हढ्या घाबरुन का असतात हे मला अजूनही कळलेले नाही.

विद्या पट्लंच.
स्वयंपाक घारतल्या घोळक्यांच तर नेहमीचंच.

Thank you all for your comments and opinions.
लहानपणापासूनचे कंडीशनिंग आहे. इतक्या सहजासहजी बदल होणार नाही.>> +1
पण हाच प्रकार ज्या gathering मध्ये स्त्रिया जास्त असतात तिकडे पुरुषांच्या बाबतीत सुद्धा दिसतो.>> सिम्बा बरोबर आहे. Happy पुढची पोस्ट त्यावरच लिहिली पाहिजे. Happy
तुमच्या पिढीतल्या बायकांचे जेंडर इशूज सॉर्ट आउट झालेले दिसत नाहीत.>> अमा 'तुमच्या' म्हणजे कुणाच्या विचारलं पाहिजे. कारण याआधीही काही वेगळं होतं असं वाटत नाही. तुम्ही पुढाकार घेत असाल किंवा या गोष्टींचा विचार करत नसाल तर उत्तमच आहे. पण तुमच्या वयाच्या सर्वच जणी अशा आहेत का? असो.
खूप दिवसानि इथे लिहिले, छान वाटलं.

विद्या.

मुद्दे छान मांडले आहेत विद्याजी..

सिंजी - दोन सिगरेट पिणारे नेहमी मित्रच असतात.. सिगरेट हे फेबु, LinkedIn यांच्यापेकशा चांगले साधन आहे नेटवर्किंग चे.. हापिसात बॉस सिगरेट पिट असेल, तर चमचे लोक दिसतील बरोबर सिगरेट पिताना.. आणि प्रोमोशन पण घेतात ते..

च्रप्स >> सौ टका सच.
ओव्हर सिगरेट इन्फो ची देवाणघेवाण बरीच चालते.

तू नेहेमीच्या जीवनातल्या गोष्टींवर लिहितेस खूप रिलेट होतं ..... हे घोळका प्रकरण तर नित्याचेच आहे इकडे पॉटलक्स, बर्थडे पार्टीला हमखास दिसणारा प्रकार.
मलाही आवडत नाही आणि नशिबाने आमच्या १-२ ग्रुपमधल्या पुरुषांनाच हा जनाना-मर्दाना (त्यांचा शब्द) Proud प्रकार आवडत नाही. ते स्वतःच आम्हाला त्यांच्यात यायाला सांगतात मग मिळून काही गेम, गप्पाटप्पा होतात. मजा येते.

विद्याताई, तुम्ही मांडलेल्या सर्व अनुभवांशी सहमत. पुरुष म्हणून असेच अनुभव येतात हे वरच्या एका प्रतिसादाप्रमाणेच नमूद करू ईच्छितो. पुरुष आणि स्त्रीया सार्वजानिक किंवा घरगुती कार्यक्रमांना एकत्र न बसण्यामागे मला काही कारणे जाणवतात -
१. बहुतांशी स्त्रीया आणि पुरुषांच्या गप्पांचे विषयच वेगवेगळे असतात. (बहुतांशी म्हणालो सर्व नाही). घरी पाहुणे आल्यावर पुरुष राजकारण, खेळ इ विषयांवर अनोळखी पुरुषाशी सुद्धा गप्पा मारताना दिसतात तर स्त्रीया पटकन रेसिपी, मुलं, कपडे, अशा विषयांवर बोलत रहातात. अगदी उदाहरण द्यायचे तर मी राजकारणाबद्दल सतत वाचत असतो त्यामुळे बाहेर गेलो कि त्या विषयावर मला बोलता येतं पण माझी बायको राजकारण, खेळ ह्याबद्दल अगदी जुजबी माहिती ठेवून असते आणि तिला त्यात रसही नाही. त्यामुळे ती जरा वेळाने त्या गप्पांना कंटाळते. कोणत्यातरी रेसिपी बद्दल बोलणार्‍या चार बायकां मधे मी बसलो तर माझीही तीच गत होईल.
२. वरच्या मुद्द्यालाच जोडून असं बघितलं आहे कि चार अनोळखी (कधी कधी ज्यांच्याबरोबर आपले फारसे जमत नाही पण चार चौघात एकत्र आल्यावर बोलावे लागते असे लोक सुद्धा त्यात आले) लोक एकत्र आले कि बोलायला न्युट्रल विषय लागतात. नाहीतर कोणाच्या भावना दुखावतील सांगता येत नाही किंवा कोणीतरी उगाच आपल्याबद्दल मत बनवून टाकू नये म्हणून पुरुषांना खेळ, हवामान असले विषय बरे पडतात. स्त्रीया पण मग वर म्हटल्याप्रमाणे रेसिपी, आपापल्या मुलांच्या तर्‍हा वगैरे विषयांवर बोलतात. मात्र, स्त्रीया अनोळखी स्त्रीशी सुद्धा जास्त पर्सनल विषयावर पटकन बोलू शकतात असे बघितले आहे. हा पुरुष व स्त्रीयां मधला फरक दोन वेगळे ग्रुप तयार करतो.
३. खूप काळ एकमेकांना ओळखणारे चार पुरुष मित्र एकत्र आले कि तो बॉईज क्लब होतो. त्यांचे एकमेकांना चिडवण्याचे विषय, बोलावण्याच्या पद्धती बर्‍याचदा मुलींना आवडत नाहीत. उदाहरण देतो - पुरुष मित्र एकमेकांना नेहमी टोपण नावानेच बोलावतात, ते कितीही फालतू असले तरी. मुली मात्र नेहमी एकमेकिंना पुर्ण नावानेच बोलावतात. अगदी मुला मुलींच्या एकत्र ग्रुप मधे सुद्धा मुलं एखाद्याला टोपण नावाने हाक मारतात पण मुली तशी हाक मारत नाहीत. त्यात एखाद्याच्या गर्लफ्रेंड, पत्नीला ते टोपण नाव आवडले नाही कि त्यावरुन ती त्याला बोलते आणि एकूणच बाकि मित्र मग तिच्या समोर नमते घेतात. अशा वेळी मग मुलगी बॉईज क्लब मधे येऊन बसली कि सगळेच जरा गप्प होतात आणि अवघडलेपणा येतो जो सर्वांनाच जाणवतो. तो टाळण्यासाठी अशा प्रसंगी मुलं मुली वेगवेगळी टोळकी करतात.
४. मुद्दा ३ थोड्या प्रमाणात कलीग्जना पण लागू होतो. बाहेर गेल्यावर स्त्री कलीगशी कसे वागावे ह्याबद्दल बरेच पुरुष गोंधळात असतात (बरेच म्हणालो सर्व नाही.. कु. ऋन्मेऽऽष सारखे सन्माननीय अपवाद वगळता). ऑफीसात कामाचे बोलून काम होते पण सोशल फंक्शन मधे आपण काय बोलल्याने स्त्री कलीगला वाईट वाटेल सांगता येत नाही आणि उगाच पर्सनल काही बोलायला नको म्हणून बरेच पुरुष बिचकून जरा वेगळेच रहातात असं मी बघितलं आहे. पिक्चरला गेल्यावर शेजारच्या खुर्चीत स्त्री कलीग असेल तर कितिही नाही म्हटलं तरी जरा अवघडलेपणा येतो. ट्रेकला गेल्यावर पण साधारण तेच. कॉलेजमधला मुलामुलींचा ग्रुप वेगळाच असतो. तसा मोकळेपणा कामाच्या ग्रुप मधे येत नाही.
५. अजून एक गोष्ट. रोज जिच्याबरोबर / ज्याच्याबरोबर एकाच घरात रहायचे, बोलायचे (काही केसेस मधे ऐकून घ्यायचे) तिच्या / त्याच्या पासून घराबाहेर गेल्यावर जरा वेळ वेगळे रहायला लोकांना आवडते. वाईट अर्थी घेऊ नका पण म्हणूनच आपण मित्रांना भेटतो ना? त्यामुळे नवरा / बायको ज्या घोळक्यात असेल त्यापेक्षा जरा वेगळा घोळका पकडतात लोक. पण असे घोळके बर्‍याचदा पुरुष - स्त्रीया असे वेगवेगळे असतात.

हल्ली मात्र असे "घोळके" काही विशिष्ट लोकांबरोबर किंवा फॉर्मल प्रसंगी होतात असं जाणवतं. माझ्या मित्रमंडळीं मधे तरी आम्ही सगळे बर्‍याचदा एकत्र असतो. आमच्या घरी लोक येतात तेव्हा माझी बायको कधी कधी मुलाबरोबर आधी जेवून घेते तर कधी कधी थांबते. आम्ही बाहेर जातो तेव्हा ती कधी कधी फक्त यजमान स्त्रीला सोबत म्हणून नंतर तिच्याबरोबर जेवायला थांबते. जवळच्या मित्रांबरोबर तर नेहमी आम्ही सगळे जेवणं झाल्यावर एकत्र बसून गप्पा मारत बसतो. तेव्हा हे "घोळके" आणि त्यांचे "नॉर्मस" हळुहळु कमी होत आहेत असं वाटतय.

खुप मस्त विषय आणि चर्चा ही..
मी ऑफिस मधल्या बैठकीत/ कॉन्फरन्स मध्ये स्वतः चा किती सहभाग असणार आहे त्यावर च बसायची जागा ठरवते. मधेच उठून जायची वेळ येणार असेल तर मागे बसते पण बर्याच वेळा मोठ्य हॉल मध्ये खुर्च्या मांडलेल्या असतील आणि मुलं/मुली already sort होउन बसलेली असतील तर आपसुकच मुलींच्या घोळक्यात सामिल होते..

पण त्रास तेंव्हा होतो जेंव्हा जिकडे तिकडे quick lobbies बनतात...मुलांचा/मुलीचा ग्रुप, मग भाषावार ग्रुप, मग seniority प्रमाणे ग्रुप, असं करत करत कुठेही मोकळ्या गप्पा होतील अशी खात्री बाळगता येत नाही.

एक अनुभव सांगते, ऑफिस मधल्या कलिग नी घरी सणा-निमित्त फराळाला बोलावले निमित्त् तिथे कलिग्ची ग्रुहिणी बायको एकटी पडली होती, बाकी मुली/त्यांचे नवरे, मित्र/त्यांच्या बायका, यजमान सगळे ऑफिस वा तत्सम विषयावर च बोलत होते, जरा वेळाने हे लक्षात आल्यावर मी आणि इतर मैत्रीणी किचन मध्ये गेलो....त्या पूर्ण ग्रुप मध्ये ती यजमान एकटीच ग्रुहिणी होती म्हणून बहुधा ती आधी फार काही बोलली नाही, किचन मधल्या गप्पा मात्र खूप रंगल्या होत्या
मला वाटतं प्रत्येकजण स्वतःला त्या त्या वेळेसाठी relatable company शोधत असतो

कधीकधी पुरुषच स्त्रियांपेक्षा जास्त हेल्ड बॅक असतात.
वाढदिवसाला स्वीट घ्यायला शेक हँड केल्यावर आधी प्रचंड भूत पाहिल्याचे एक्स्प्रेशन्स देतात. >> अगदी स्स्सेम अनुभव मी ही घेतलाय !

लेखातल्या सर्व मुद्द्यांना चौकट राजा चा प्रतिसाद उत्तर आहे..
खूप उत्तम प्रतिसाद चौकट राजा... निवडक 10 मध्ये प्रतिसाद सेव करायची सोय नाही अन्यता हा नक्कीच केला असता...

चौकट राजा +1000
तुम्ही सर्वसमावेशक असा उत्तम प्रतिसाद दिलाय. अभिनंदन.

@विद्याजी खुप दिवस तुमच्या लेखनाची वाट बघत होतो. ऊत्तम विषय घेऊन आलात या वेळेस. नवीन लेखन येऊ द्या लवकर.

चौकट राजा, छान प्रतिसाद.
आणि माझा विशेष उल्लेख केल्याबद्दल विशेष धन्यवाद Happy

मध्यंतरी काहीतरी डोक्यात भरल्याने उगाचच एकदोन महिला कर्मचार्‍यांशी बोलताना मानसिक अवघडलेपण आले होते ते या धाग्याच्या निमित्ताने आठवले. त्यावर जमल्यास एका स्वतंत्र लेखात लिहेन. ईतर स्त्री-पुरुषांचे त्यावर विचार जाणून घ्यायचे आहेत.

अगदी बरोबर निरीक्षण . असं कायमच होत. कदाचित आपल्या मनात असूनही बाकी बायका काय म्हणतील . ? असा विचार मनात येत असावा . बाकी बायका म्हणतील अरे आम्ही इथे वेगळ्या बसलेल्या दिसताहेत ना हिला . मग ती तिथे पुरुषांमध्ये जाऊन कशाला बसलेय. काय विचार करतील आपल्या वागण्याचा ? काहीतरी चुकीचा अर्थ तर घेणार नाहीत ना इतर बायका ? आपली टर तर उडवणार नाहीत ना ? आपल्या बदल खुसूखुसू बोलणार तर नाहीत ना ? आपल्याला एकट तर पडणार नाहीत ना ? माणूस हा लोक काय म्हणतील इतर काय म्हणतील याला खूप घाबरतो त्यात बायका पण आल्याचं . त्यात आणखीन बायकांवर पुरुषांपेक्षा जास्त रिस्ट्रिक्शन्स पण असतात. उद्या तिचा नवरा किंवा भाऊच म्हणेल तुला इतर बायका वेगळ्या बसलेल्या दिसत होत्या ना ? मग तुला त्याच्यात जाऊन बसायला काय झालं होत? तू पुरुषांमध्ये कशाला येऊन बसतील?. एका ना दोन सतराशे साठ प्रश्न . ते सगळे टाळायचे असले तर बायकांमध्ये जाऊन बसणं कधीही सेफ

बाकी खरेदीला /चित्रपटाला जायला /हॉटेल मध्ये जायला पण बायकांना बायकाच का लागतात हे मात्र कोडंच आहे . मी या सगळ्या गोष्टी एकटी करू शकते. माझ्या मैत्रिणींना आश्चर्य वाटत. खरेदीला त्यांचं इतर मैत्रिणींशिवाय पान हलत नाही . चित्रपटाला एकटी ? काय हे विचित्र किव्वा कशी काय जातेस तू . पण मी मात्र जाऊ शकते /जाते नाहीतर कोणीतरी माझ्या बरोबर येईल आणि मगच मी चित्रपट बघेन असं ठरवलं तर मला कधीच काहीच बघायला नको Happy

सॉरी इथे कमेन्ट द्याय्ची राहून गेली होती.
चोउकट राजा, खूप छान कमेन्ट आणि अतिशय योग्यपणे मांडलेले विचार. पोस्ट नुसती वाचून सोडुन न देता त्यावर आपले
मत इतके छान लिहीणे प्रशंसनीय्च.

Pages