पुस्तक परिचय थिओडोर बून (स्कँडल)

Submitted by अनया on 29 August, 2017 - 19:41

पुस्तकाचे नाव - थिओडोर बून (स्कँडल) लेखक - जॉन ग्रीशाम

ह्या पुस्तकाचा नायक, थिओडोर बून हा तेरा वर्षांचा, आठव्या इयत्तेत शिकणारा अमेरिकन मुलगा आहे. बाकीच्या ह्या वयाच्या मुलाचं जसं जग असतं, तसंच थिओचही आहे. शाळा, शाळेचा अभ्यास, तिथला डिबेट ग्रुप, स्काउट्स बरोबर अधूनमधून कँपिंग ट्रीप इत्यादी. त्याचे आई - वडील दोघेही वकील आहेत. दोघेही आपल्या कामात अगदी गर्क आहेत. थिओवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि आईवडीलांच असायला हवं, तसं त्याच्यावर बारीक लक्षही आहे. आपण फार वेडेवाकडे उद्योग केले, तर आपले आईवडील आपले कान उपटतील हे थिओला अगदी पक्कं ठाऊक आहे. थिओचा एक दारूचं व्यसन असलेला एक काका, त्याची एप्रिल नावाची एक मैत्रीण,त्याचा लाडका कुत्रा 'जज' आणि इतरही काहीजण ह्या पुस्तकात आपल्याला भेटतात.

जेव्हा पुस्तकातले मुख्य पात्र एखादं लहान मूल असतं, तेव्हा बऱ्याचदा अशी मुलं 'आदर्श अपत्य' कॅटॅगरीवाली असतात. अभ्यासात एकदम हुशार, स्मार्ट, समाजसेवा करणारी, गोडगोड खोड्या करणारी, लगे हाथ एखादा चोर-बीर पकडून देणारी आणि वयस्कर लोकांची सेवासुद्धा करणारी.

थिओ मात्र असा नाहीये. तो खरा वाटतो, कादंबरीतील पात्र नाही. त्याच्यासारखी खूप मुलं आपण आपल्या आसपास पाहतो. अंघोळीचा कंटाळा करणारी, आजारपणाच नाटक करून शाळा बुडवता येते का? ह्याची चाचपणी करणारी, शाळेत आपला वेळ वाया जातोय. आपण खरं म्हणजे डायरेक्ट कॉलेजमध्येच जायला पाहिजे, अशी ठाम समजूत असणारी!!

थिओ स्वतःला बाल-वकील मानतो. त्याच्या आई-बाबांच्या वकिली ऑफिसमध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र अशी एक छोटी खोली आहे. शाळा सुटल्यावर तो तिथे येतो. त्याचा गृहपाठ वगैरे करतो. त्या खोलीला थिओ त्याच 'ऑफिस' असं म्हणतो आणि बाकीच्यांना म्हणायलाही लावतो. त्याच्या लहान गावातल्या बहुतेक सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना, वकिलांना, न्यायाधीशांना, न्यायालयातल्या कर्मचाऱ्यांना तो नावानिशी ओळखतो. पाळीव प्राण्यांसाठीच्या कोर्टात बाजू मांडण्यासाठी वकील असण्याची गरज नसते, तिथे तो आपली वकिलीपणाची हौस भागवून घेतो. शाळेतल्या मुलांनाही जमेल तसे कायद्यासंबंधी सल्लेही देतो.

मोठेपणी वकील किंवा न्यायाधीश व्हायचं, हे थिओने मनाशी अगदी पक्कं ठरवलं आहे. आठव्या इयत्तेतील गणितबिणीत शिकण्यापेक्षा विधी महाविद्यालयात जाऊन कायद्याचं शिक्षण घ्यायला त्याला मनापासून आवडेल. पण ही दुष्ट शिक्षण व्यवस्था त्याला त्याची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे रटाळ विषय शिकायला लावते आहे!

अमेरिकेतील शिक्षणपद्धतीत हायस्कूलच्या वर्षांना फार महत्त्व आहे. तिथे निवडलेले विषय पुढच्या वाटचालीसाठी कळीचे असतात. त्यासाठी मुलांची प्रतवारी ठरवता यावी, म्हणून एक चाचणी परीक्षा घ्यायची, असा शिक्षण मंडळाचा निर्णय होतो. परीक्षा होते. निकाल लागतो. नेहमीप्रमाणे कोणाला अपेक्षेपेक्षा जास्त, तर कोणाला कमी गुण मिळतात.

पण ह्या परीक्षा आणि निकालासंदर्भातील एक धक्कादायक माहिती थिओ आणि त्याच्या मैत्रिणीला, एप्रिलला कळते आणि ही मुले एका झंझावातात अडकतात. काही गैरप्रकार झाले असल्याने हे सर्व प्रकरण न्यायालयात जातं. पुस्तकातली एक एक करून सर्वच पात्र त्यात गुंतत जातात. शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा होतो, हे सांगायला नकोच! सगळ्या घटनांचा विलक्षण असा वेग, गुंतागुंत आणि प्रवाही भाषेमुळे आपल्याला पुस्तक खाली ठेवताच येत नाही.

ह्या आणि ह्या मालिकेतल्या इतर पुस्तकांचे लेखक, जॉन ग्रीशाम पेश्याने वकील. ह्या लेखकाची बरीच पुस्तके न्यायालये, वकील,ज्यूरी अशा विषयांशी संबंधीत आहेत. अपरिहार्यपणे खून, अत्याचार ह्याबद्दलची चर्चा पुस्तकांमधून असते. पण त्याची 'थिओडोर बून' ही मालिका मात्र वेगळी आहे. साधारण बारा-पंधरा वयोगटातल्या मुलांना योग्य असे विषय भाषा आणि मांडणी इथे वाचायला मिळते.

बारा-पंधरा वयोगटातील मुले परिकथा वाचायला मोठी झालेली असतात, पण अजून मोठ्यांची पुस्तके वाचायला लहान असतात. शिवाय ह्या मुलांना पुस्तकातून आपल्यावर संस्कार करायचा किंवा काही डोस पाजण्याचा प्रयत्न होतोय की काय? अशी शंका जरी आली, तरी मुले तातडीने त्या पुस्तकापासून लांब पळून जातात! थिओ बूनच्या सहा पुस्तकांची ही मालिका ह्या वयाच्या मुलांसाठी अगदी योग्य आहे. निरनिराळ्या पेश्यांबद्दल, त्यातल्या अधिक-उण्या बाबींबद्दल मुलांना माहिती व्हावी, निदान त्याबद्दल उत्सुकता वाटावी, असं आपल्याला वाटत असत. ही पुस्तके वाचून मुलांचा वकिली पेश्याबद्दलची उत्सुकता नक्की वाढेल.

आपणही कधीकधी आपल्या मोठेपणाला कंटाळलेलो असतो. घर, घरकाम, आणि घर ते ऑफिस प्रवासाच्या ताणांना अगदी कावलेले असतो. अशा एखाद्या दिवशी हे पुस्तक मोठ्यांनी नक्की वाचावं. गंभीर, टोचणाऱ्या, त्रासदायक विषयांवरची पुस्तकं वाचून कंटाळा आला असेल, तर आपल्या भूतकाळात गेलेल्या रम्य, सरळसोप्या, निरागस दिवसांची आठवण ही पुस्तके वाचताना नक्की येईल.

Group content visibility: 
Use group defaults

छान ओळख करून दिली आहे.

मी आतापर्यंत ग्रीशमच एकच पुस्तक वाचलंय. 'द फर्म'. फारसे आवडले नव्हते.

ग्रीशम आवडते लेखक आहेत. थिओला त्यांनी खास लहान मुलांना ओळख घडवून यावी म्हणून तयार केले आहे. मी पण एक वाचले होते या सिरीजचे पुस्तक, मस्त होते.

अरे वा! छान ओळख. बघतो लायब्ररीत मिळताहेत का.
हा स्कँडलचा धागा आहे म्हणून विचारतोय, सगळी सिरिज क्रमाने वाचली नाही तर चालणारे का? मुलाला आवडली तर गोल्ड माईन सापडली ही तर!

खूप दिवसांनी अचानक धागा वर आल्यामुळे अगदी 'आज अचानक गाठ पडे' फिलींग आलं!!
अमितव, क्रमाने वाचायची काही गरज नाही. मुख्य पात्र प्रत्येक पुस्तकात तीच आहेत. बाकी कथानक बदलतं.

<<<ह्या मुलांना पुस्तकातून आपल्यावर संस्कार करायचा किंवा काही डोस पाजण्याचा प्रयत्न होतोय की काय? अशी शंका जरी आली, तरी मुले तातडीने त्या पुस्तकापासून लांब पळून जातात! >>>>
एकदम सहमत. ..

ह्या मुलांना पुस्तकातून आपल्यावर संस्कार करायचा किंवा काही डोस पाजण्याचा प्रयत्न होतोय की काय? अशी शंका जरी आली, तरी मुले तातडीने त्या पुस्तकापासून लांब पळून जातात! >>>>
एकदम सहमत. ..

Submitted by धनवन्ती on 6 May, 2021 - 08:18

एकदम सहमत !
पण मुलांना काय हवं आहे हे अनेक संपादकांना मुळातच कळत नाही !
बराच अनुभव घेतलाय -
प्रत्येक गोष्टीतून मुलांना काहीतरी बोध हा मिळायलाच पाहिजे असा हट्ट असतो . जर या संपादकांनी त्यांच्या लहानपणी अशा बोधप्रद गोष्टी वाचल्या असतील तर त्यांना हा बोध नक्कीच झालेला नसणार की मुलांना ते नको असत म्हणून .
बिच्चारे ! मोठ्यांच्या चष्म्यातून मुलांच्या गोष्टी बघतात !

अनया
जॉन हा आवडता लेखक आहे . हि मालिका माहिती नव्हती . तुम्ही छान उत्सुकता वाढवणारा परिचय करून दिला आहे .
आभार

या पुस्तकाच्या माहिती बद्दल धन्यवाद.
मध्यंतरी माझ्या लेकासाठी नवी पुस्तकं शोधत असताना या सिरीज बद्दल कळलं. ग्रीशम ची पुस्तकं मला आवडतात. ही सिरीज ऑर्डर करताना बरेच negative review वाचले म्हणून आम्ही अजून पुस्तकं घेतलं नव्हतं. पण आता घेतेच सगळी पुस्तकं.

जॉन ग्रीशम माझे पण आवडते लेखक आहेत. खूप दिवसांनी त्यांचं काही वाचायला मिळालं.
अनया, पुस्तकाची छान ओळख करून दिली आहे.

आम्ही स्कँडल घेतलं विकत. घराजवळच्या दुकानात हे एक सापडलं आणि दुसऱ्याच दिवशी ट्रेन चा प्रवास घडणार होता. आवडलं लेकाला पण artemist fowl series जास्त आवडली आहे.
आता बाकीचा सेट लवकरच मागवू.