घटस्फोट

Submitted by मोहना on 28 August, 2017 - 07:36

हल्लीच मी ठरवलं घटस्फोट घ्यायचा. इतरांनी काही केलं की मला पण तसंच करावंसं वाटतं. वाटलं घेऊन पाहू आपणही. बाकीच्यांना जमतं मग मला का नाही हा प्रश्न मी स्वत:ला विचारते आणि लागते कामाला. वरातीमागून घोडं होतं दरवेळेस. पण ठीक आहे नं, वरातीत शिरल्याशी कारण. तसंच हे घटस्फोटाचं. बाकीच्यांचे झाले पण माझा का होत नाही हे काही कळेना. खरं तर मी येता जाता म्हणतंही होते की मला घटस्फोट घ्यायचाय. नवराही तत्परतेने ’घे’ म्हणायचा. आता त्याने एखादी गोष्ट कर म्हटली तर त्याचा छुपा हेतू साध्य होईल असं मला वाटतं त्यामुळे त्याने सांगितलेलं कुठलंच काम मी लगेच करत नाही. पण माझ्या खूप मित्रमैत्रिणींनी घटस्फोट घेतल्यावर मला वाटायला लागलं की त्यासाठी फार गंभीर काही घडायलाच हवं असं नाही. आता मला हे कसं कळलं? आमचेच मित्रमैत्रिणी ते. प्रत्येकाने आपापली बाजू मांडलीच. बाजू ऐकल्यानंतर मला प्रत्येक पक्षाचंच बरोबर आहे हे पटलं. सगळी लक्षणं आमच्याच घरातली. फक्त या कारणासाठी घटस्फोट घ्यायचा असतो हेच मला ठाऊक नव्हतं याचं मला फार दु:ख झालं. सगळीकडे हे असं. सर्वात शेवटी राहते मी दरवेळेस.

अखेर मी पण ठरवलं, घटस्फोट घ्यायचा आणि आजच. येताजाता म्हटल्यासारखं न म्हणता मी अतिशय गंभीर चेहर्‍याने घरातला एक नवरा आणि दोन मुलं, एकूण तिनजणांसमोर उभी राहिले. माझा चेहरा पाहून तिघांनी मला खुर्चीत बसवलं आणि सगळे इकडे - तिकडे सटकले. मी काही बोलणार अशी शंका मनाला चाटून गेली की पळच काढतात ते. मी तशीच बसून राहिले. मग हळूहळू पुन्हा सगळे जमले.
"बरं बोल." मुलगा अगदी जीवावर आल्यासारखा म्हणाला. मी घटस्फोट घेऊन तिघांच्या आयुष्यातील हिरवळ नष्ट करुन त्याचं वाळवंट करणार आहे याची मला कल्पना होती. आता वाटा वेगळ्या, दिशा वेगळ्या, रस्ते वेगळे त्यावर किती चालायचं ते आपण चालूच. कदाचित मी पुढे जाईन, तू मागे राहशील, दुसरीकडे जाशील, वाट चुकशील, परत येशील मला शोधत... काय होईल ते आताच कसं सांगता येईल? पण या वाटेवर मुलं जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा ती आपलीच हे लक्षात ठेवायचं. असं संवेदनशील भाषण मी तयार केलं होतं ते म्हणायचं होतं. पण त्या ऐवजी मी पुटपुटले,
"मला घटस्फोट हवाय." नजर चुकवायची होती. पण अपराधी डोळे सर्वांवरुन फिरलेच. धक्क्याने नवरा कोसळला तर ही भिती सर्वात जास्त. पण कुणाच्याच चेहर्‍यावरचे भाव वाचता आले नाहीत कारण तिघांनी इतकी घट्ट मिठी मारली मला. त्या मिठीत विश्वाची आर्तता भासत होती. जीव तिळतीळ तुटायला लागला माझा. कुठून तो साडेचार अक्षरी शब्द उच्चारला असं झालं. तितक्यात तिघांनी एकदम म्हटलं.
"मला दे."
"मलापण."
"मी पहिला." नवरा कसा कोसळेल ते दृश्य मी बर्‍यांचदा चितारलं होतं मनासमोर पण मी कसं कोसळायचं? बरं झालं बाई, सर्वांच्या मिठीचा आधार होता. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आतापर्यंत माझ्या कुठल्याच कल्पनेला मिळालेला नव्हता. उपाशी माणसाला खायला मिळाल्यासारखं झालं की हे. मराठीशी काही संबंधच उरलेला नाही कुणाचा हे माझ्या लक्षात आलं. divorce न मागता मी जुनापुराणा ’घटस्फोट’ शब्द वापरल्यामुळे हा इतका गोंधळ? मी गडबडीने म्हटलं
"अरे बाळांनो, मी divorce म्हणतेय."
"कळलं की ते. divorce म्हणजे घटस्फोट. ठाऊक आहे." लेकीने मला समजावलं.
"मग तिघंही काय मागताय तेच? मी फक्त तुमच्या बाबाला देऊ शकते घटस्फोट." दोघा मुलांचे चेहरे एकदम पडले. त्यांचे केविलवाणे चेहरे पाहिले की मला राहवत नाही. मागतील ते देऊन टाकते मी.
"बरं, दिला तुम्हालाही घटस्फोट. खूष?" मुलांनी एकमेकांना टाळ्या दिल्या. मुलगी म्हणाली,
"मी तुला तेच सांगणार होते. तडजोडीने झालेलं बरं. हल्ली मुलं देतात अगं आई - बाबांना घटस्फोट. नाहीतर सरळ न्यायालयात जातात."
"न्यायालयात?" मला कळेचना.
"कोर्ट गं." पुन्हा लेकीने समजावलं. एकंदर लेक माझ्यापुढे जाणार अशी लक्षणं होती. वरातीमागून घोडं नव्हतं तिचं. कारण ती पुढे म्हणाली,
"अनायसे तू आम्हाला देते आहेस घटस्फोट. कसं वाटतं ते बघू. मग बाबाला पण द्यायचा का ते ठरवू आम्ही."

तिचा बाबा लगेच कागद, पेन घेऊन सरसावला. त्याचे डोळे भरुन आले आहेत असं मला वाटलं पण त्याच्या अंगात उत्साह संचारला होता. त्याने इतक्या भराभर घटस्फोटाची रुपरेषा माझ्यासमोर ठेवली की तो वर्षानुवर्ष तयारीतच असावा.
"अगं गरज पडलीच तर म्हणून गूगल करुन ठेवलं होतं. आणि आपले मित्रमैत्रिणी. तशी भरपूर माहिती जमवली आहे. घे. तुला उपयोगी पडेल."
"मला का?"
"घटस्फोट तुला घ्यायचाय ना?"
"पण तू दे ना मला घटस्फोट." ती रुपरेषा बघूनच माझं घोडं परत मी मागेच ठेवलं.
"छे. मी नाही. तूच दे." जेवायला वाढताना आग्रह करतात तसा आम्ही एकमेकांना करत होतो. मग त्यावर एक जंगी चर्चा झाली. मी माझा नूर आता किंचित बदलला.
"इतक्याजणांना एकाचवेळी घटस्फोट देणं म्हणजे खूप काम पडेल मला. एकाही कामात तुमची कुणाची मदत नसते मला. जर तुमच्या तिघांपैकी कुणी मदत करणार असेल तरच हे काम मी करेन. नाहीतर बसा नेहमीप्रमाणे पंचवार्षिक योजना राबवत." मला माझ्या अंगावर पडलेलं काम टाळायचं असेल तर जो पवित्रा मी घेते तोच पुन्हा घेतला आणि आमच्या घरातलं आणखी एक काम लांबणीवर पडलं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol भारी लिहिलयं.
"मग तिघंही काय मागताय तेच? मी फक्त तुमच्या बाबाला देऊ शकते घटस्फोट." >>> हा सॉलीड होता.

प्रत्येकाला धन्यवाद!
नानाकळा - ताजा माल आहे :-). काल लिहिलं, पण फेसबुकवर प्रसिद्ध केल्यावर whatsapp वर चकरा मारतोय हा घटस्फोट निनावी. तिथे कुठेतरी वाचलं असेल तुम्ही.

मस्त. पुढील भागात सामानाची वाटावाटी, कस्टडी बॅटल, अ‍ॅलिमनी किती मिळा ला, वकिलांचे अनुभव ह्याव र नक्की लिहा. वेलकम टू हॅपी सिंगल्स क्लब मुलांच्या प्रतिक्रिया लै भारी.

पुणेरी घटस्फोटाची पाटी
ऍडव्होकेट स. दा. आगलावे,
आमच्या कडे स्वस्तात घटस्फोट मिळवून दिले जातील.
दोनीही बाजूंसाठी स्वस्तात वकील मिळेल.
भेटण्याच्या वेळा :
सकाळी ९ ते १२
संध्याकाळी ४ ते ८

तुम्ही नेहमी चांगलं लिहिता , आवर्जून वाचते मी तुमचे लेख.
पण खरं सांगायचं तर मला हा विषय नाही आवडला. अडचणीत सापडलेल्या लोकांची काहीशी टर उडवल्यासारखं वाटलं हे वाचताना.
घटस्फोट कुणासाठीच सुखद प्रक्रिया नसते, माणसं नाईलाजाने तो निर्णय घेतात - खूप भोगून झाल्यावर घेतात. त्याच्या गुंतागुंतीत अडकलेले अनेकजण जवळून पाहिलेत - कदाचित म्हणून मला हा लेख वाचून काही हसू आलं नाही- ही माझी मर्यादा अर्थातच.

नाही आवडलं.
का कॉणास ठावूक घटस्पोट आता सहज वाटु शकेल असे होत जरी असली तरी आत तुटल्या सारखे पाहिले आहे लोकांना. ती/तो जीवनात पुढे गेले तरी गुंतागुत तशीच रहाते जेव्हा मुलं असतात तेव्हा.
असो. मी तुमचे लेख शोधून वाचते. कारण आजकाल निखळ विनोदी लेख नसतातच मुळी , सगळे ओढून ताणून.

हिमालया, तुम्हाला हा लेख वाचून जो त्रास झाला असेल त्याबद्दल आधी तुमची माफी मागते. पण कुणालाही दुखावण्याचा हेतू या लेखामागे नाही. घटस्फोटाचे मुलांवर काय परिणाम होतात त्याबद्दल ’सावट’ ही माझी कथा आहे ’मायबोलीवर’ .

हा विषय घेऊन लिहावंसं वाटलं ते काही ’कारणं’ ऐकल्यामुळे. पण त्यामुळे कुणी दुखावलं गेलं असल्यास मी दिलगीर आहे.

मोहना, मला वाटतं तुम्हाला दिलगीर व्हायची काहीच आवश्यकता नाहीये. तुम्ही कुणाचे नाव घेऊन किंवा कोण्या धाग्यावर कोणाचे मनोगत , अनुभव वाचून खिल्ली उडवण्यासाठी हा लेख लिहिलाय असे वाटत नाही.

जगात सात अब्ज लोक आहे. त्यांचे सातशे अब्ज प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येकाचा विचार करत बसलात तर कुणीही काही लिहूच नये असे होइल.

त्यापेक्षा ज्यांना दुखावलं जातंय त्यांनीच विचार करावा की हे दुखावलं जाणं कीतपत योग्य आहे. तसेच घटस्फोट ही अगदी कॉमन घटना आहे. त्यात काही विशेष असं नाही. म्हणजे घटस्फोट घेणारी माणसे काही विशिष्ट प्रवृत्तीची असतात, काही वेगळी असतात असे काही नसते. सर्वसाधारण माणसे असतात. जसे कुणाला सर्दीपडसे होते, तितकेच महत्त्व दिले पाहिजे. मनाला लावूनच घ्यायचे ठरवलेच तर काहीही पुरते त्यासाठी. सो मूव्ह ऑन. तोच एक पर्याय असतो सुखी-आनंदी होण्यासाठी.

@ मोहना
खरतर मीच दिलगीर आहे कारण एक काल्पनिक कथा वाचून मी जरा जास्तच रिअॅॅक्ट झाले ,माझ्याकडून हे भावनेच्या भरात घडल आणि नकळतपणे मीही तुम्हाला दुखावल
i am really sorry

Pages