आषाढ तळ ना आई

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 August, 2017 - 04:10

आखाड तळ ना आई

आषाढ अमावसेला
तळणाचा खमंग वास आला
तोंडातनं लाळेचा थेंब टपकला
तसा तो आईला म्हणाला

कणकीचा दिवा, वात वळ ना
देवी कटाळली खाऊन कळणा
कुर्डय , पापाड, भजी तळ ना
ए आय आखाड तळ ना

आय पदर लावती डोळयाला
थांब जरा पावणं ईउ दे घरला
डबल, डबल खर्च कशाला
मंग तळील आखाडाला

प्वार काय ऐकतय व्हय
दिवा लावाय त्याल नाय
तळणाला वतायचं काय
काळजावर दगड ठेवते माय

शेजाऱ्यापाजाऱ्याला माय विचारी
देता का कोण त्याल उधारी
हात हालवत आली घरी
प्वार आता भॉकाड पसरी

तिला गरीबीची चीड आली
प्वारावर धाऊन गेली
मुडद्या इक खायाला पैका नाय
आन तुझं राधा राहुदे, रेडकु नाचू दे व्हय

धू , धू धुतला तेला
जाऊन बसली वळचणीला
रात जशी डोळ्यात खुपली
निजवून मांडीवर तेला, रड, रड रडली

गरीब ती होती तरी
म्हणायची नको फुकाची श्रीखंड पूरी
सायकलवर फिरणारा नवशिक्या पुढारी
पाच वर्षात होतो करोडोचा मानकरी

लक्तर जगण्याचे ईमान पांघरी
रजईत मऊ, नग्न श्रीमंती लाचारी
लोकशाहीची अशी दिवाळखोरी
अन दंडूकेशाहीची बेमुर्वतखोरी

दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खरच डोळे पाणावले. कवितेचे शीर्षक वाचुन थोडा अंदाज आला, मग आज वाचली. हृदयाला भिडते.

सायकलवर फिरणारा नवशिक्या पुढारी
पाच वर्षात होतो करोडोचा मानकरी
लक्तर जगण्याचे ईमान पांघरी
रजईत मऊ, नग्न श्रीमंती लाचारी
लोकशाहीची अशी दिवाळखोरी
अन दंडूकेशाहीची बेमुर्वतखोरी>>>>>>हेच भयाण वास्तव आहे.