त्या फुलांच्या गंधकोषी

Submitted by मनीमोहोर on 20 August, 2017 - 13:03

भरपूर जागा, पाण्याची मुबलकता आणि जात्याच असणारी आवड यामुळे आगरात फुलझाडं नाहीत असं घर कोकणात शोधुन ही सापडणार नाही . कोकणातल आमचं घर ही याला अपवाद नाही आमच्याकडे ही भरपुर फुलझाडं आहेत .

उन्हाळ्यातल्या भर दुपारी ही खळ्यात गार सावली देणारं हे आहे नागचाफ्याचं झाड. हे असेल सहज साठ सत्तर वर्ष जुनं. चांगला वृक्ष झाला आहे याचा. हे सदा हरित झाड आहे . साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात याला मोठे मोठे कळे येतात आणि मग त्यातुन चार पसरट पाकळ्या असणारी पांढर्‍या रंगाची मध्ये पिवळेजर्द केसर असलेली फुलं उमलतात. याला मंद सुवास असतो त्यामुळे ह्या फुलांवर भरपूर मधमाशा ही येतात नवीन लालसर रंगाची कोवळी पालवी, हिरवी पानं, कळे आणि फुलं असं सगळ वैभव एकाच वेळी मिरवत हे झाड अंगावर. खळ्यात त्यांचा रोज सडा पडू लागतो . त्या फुलातलं केशर काढणं हे एक मोठच काम असतं ह्या दिवसात. कळ्यांमधलं केशर गोळा करणार्‍याला गमतीनं " कळेकाका " असं संबोधल जातं आमच्याकडे. हेच ते नागकेशर . . खळ्यात कापडावर पसरुन उन्हात चांगलं वाळवलं जातं . ते वाळत घातलेलं केशर अगदी पिवळजर्द दिसतं. नागकेशराचे आयुर्वेदात खूप उपयोग सांगितले आहेत. त्यामुळे अशाच एका आयुर्वेदिक रसशाळेला दिलं जात हे केशर.
नागचाफा
IMG_20170315_070442292.jpg

खाली पडलेले कळे

IMG_20170315_065536134_0.jpg

वाळत घातलेलं केशर

IMG_20160424_114019557.jpg

खळ्यात आम्ही एक कृत्रिम धबधबा तयार केला आहे मोटरवर चालणारा. ह्याचा खळखळाट ऐकायला फार छान वाटतं . धबधब्यामुळे निर्माण झालेल्या पाण्यात चंद्रविकसीनी कमळांचे कंद सोडले आहेत. रात्री ती गुलाबी कमळ उमलतात आणि त्यांचा मंद सुगंध खळ्यात भरुन रहातो त्या कमळांच्या सान्निध्यात चांदण्या रात्री कधी कधी मस्त गप्पा रंगतात आमच्या. सकाळी उन्हं वर आली कि मात्र ही मिटुन जातात. आमच्या परसदारी एक मोठी दगडाची डोण आहे, आता पंपाचं पाणी आल्याने तशी पडुनच आहे . त्यात आम्ही निळ्या कमळांचे कंद सोडले आहेत. उन्हं वर आली की पुढल्या खळ्यातील कुमुदिनी मिटतात तर ही उमलातात त्यांचा निळा रंग उन्हात अगदी चमकुन उठतो. तात्पर्य काय तर आमच्याकडे दिवसाचे चोवीस ही तास कमळं डुलत असतात.

DSC03194_0.JPG

ही निळी कमळं

DSCN1412 (1)-001.jpg

जो अतिशय उंच वाढलेला वृक्ष दिसतोय तो आहे सोनचाफा . आजूबाजुच्या माडापोफळींशी स्पर्धा करत हा इतका उंच वाढला आहे की टोपी पडण्या एवढी आपली मान मागे करावी लागते ह्याची भेट घेण्यासाठी . ताड माड वाढलेल्या ह्या चाफ्यावर घारी, गरुड असे मोठे मोठे पक्षी असतात वास्तव्यास. ह्याची फुलं काढणं तर अशक्य प्राय गोष्ट आहे. कोकणातल्या माणसांना चाफ्याची फार आवड म्हणुन मग अलीकडे दोन कलम लावली आहेत चाफ्याची ज्याची फुलं हातानी ही तोडता येतात. एक कवठी चाफ्याच झाड ही आहे. ह्याच फुल अगदी कवठा सारख दिसतं म्हणून हा कवठी चाफा . ह्याचा ही थोडासा उग्र सुगंध मला फार आवडतो.

चाफ्याची कळी

IMG_20170419_214124.jpg

चाफा
IMG_20170418_192326.jpg

कवठी चाफा
kavathii chafa.jpg

आमचं आगर खूप मोठ आहे. मध्ये मध्ये वाटा केल्या आहेत चालण्यासाठी आणि उतारावर असल्याने मध्ये मध्ये पायर्‍या ही आहेत. माडा पोफळीनी जरी आगराचा बहुतांश भाग व्यापला असला तरी फुलझाडांसाठी भरपूर जागा आहे. आगराच्या वईला संरक्षक म्हणुन काटेरी कोरांटी लावली आहे. निळी आणि पिवळी दोन्ही रंगांची . कामवाल्या बायका ह्याचे वळेसर करुन डोक्यात माळतात. उन्हळ्यात जर कधी फुलांची कमतरता असेल तर देवपूजेला ही मिळतात ही फुल. अगदी " देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशीतरी" ह्या कवितेची आठवण करुन देणारी. लहान मुलं कोरांटीच्या फुलातला मधा चोखत असतात टाइम पास म्हणून . वईला आम्ही कृष्णकमळाचा वेल ही सोडला आहे . हा ही श्रावण महिन्यातच बहरतो. शंभर कौरव , पाच पांडव आणि त्यावर श्रीकृष्ण अशी पा़कळ्या, स्त्रीकेसर आणि पुंकेसर यांची रचना असलेलं निळ्या रंगाचं हे फुलं माझं खूप आवडतं आहे . ह्याला मंद सुवास ही असतो. वरती श्रावण महिन्यातलं ढगाळलेलं आकाश आणि खालती हिरव्या गर्द वेलीला लागलेली ही निळी फुलं झाडावर फारच छान दिसतात. दुसरी एक निळ्या फुलांची वेल म्हणजे गोकर्ण. गोकर्णाला वर्षभर फुलं असतात आणि आपल्याकडे निळ्या रंगाची फुलं जास्त नसल्याने देव्हार्‍यात शोभुन ही दिसतात.

ही कोरांटी फोटो खूप छान नाहिये पण आयडिया येईल .

DSC05284.JPG

गुलबाक्षीच अक्ष्ररशः बनच झालं आहे आमच्याकडे. गुलबाक्षी रंगाची , पिवळी, पांढरी आणि मिक्स रंगाची ही. . संध्याकाळी फुलणारी ही गुलबक्षी पावसळ्यात बहरते.... अगदी वेड्यासारखी बहरते...... गुलबक्षीच रंगीबेरंगी बन खूप आकर्षक दिसत. ही फुलं एकमेकात गुंफुन वेणी करतात. गणपतीत सायंपूजेला गणपतीच्या गळ्यात रोज गुलबाक्षीचा हार / वेणी असतेच. मात्र पावसाने फुलं पाणेरली झाली तर वेणी नाही करता येत, तुटते ती मधेच. त्यात श्रावण महिन्यात पावसाचा काही भरवसा नसतो. दोन मिनिटं पडुन फुलं पाणेरुन जातो फक्त .म्हणुन काढण्याची घाईच करावी लागते . हीच्या चवळीएवढ्या छोट्या काळ्याबिया असतात आणि त्या खाली जमीनीत रुजुन नवीन झाडं आपोआपच उगवत असतात . तुम्हाला माहित नसेल पण ह्या गुलबक्षीच्या पानांची भजी अतिशय कुरकुरीत होतात आणि मस्तच लागतात. करुन बघा एकदा पानं असली तर. ..... आगरात आम्ही घराच्या कवाडी जवळच एक कामट्यांची कमान उभारली आहे आणि त्यावर मधुमालतीचा वेल सोडला आहे. त्याची लाल, गुलाबी आणि पांढरी फुले आणि मन मोहुन टाकणारा गोड वास घरत शिरताना मन प्रसन्न करुन टाकतो.

मधुमालती
madhumaalati 1.jpg

रातराणी

IMG_20170315_072016436.jpg

आमच्याकडे आगरात वाटेच्या कडेला ओळीने एकाच प्रकारची झाड लावलेली आवडतात सगळ्यांना. शेवंतीचे , मोगर्‍याचे, अबोलीचे , लिलीचे , सदाफुलीचे, सोनटक्क्याचे, अगदी छोट्या एकेरी तगरीचे असे ताटवे बघताना खूप प्रसन्न वाटते. सांडपाणी जिथे सोडल जातं तिथे कर्दळीचे बनच झाले आहे. लाल, पिवळ्या करदळी हळदी कूंकवाप्रमाणे दिसतात अगदी. अनेक प्रकारच्या जास्वंदी आणि विविध प्रकारच्या तगरी, अनंत, पांढरा कांचन अशी अनेक प्रकारची फुलं आमच्या आगराची शोभा वाढवत आहेत. मी घरी गेले की पहाटे एक फेरी असतेच माझी हे सगळ बघण्यासाठी . दिवसभराची उर्जा मिळते ह्या प्रभात फेरी मधुन मला.

जास्वंद
IMG_20170612_120908222~2_0.jpg

सदाफुली
_20160426_233107~2.JPG

डबल तगर
RSCN1517.jpg

नवरात्रात झेंडुची फुलं लागतातच देवीला. गच्चीवर मोठ मोठ्या काळ्या प्लॅस्टिकच्या बॅगेत लाल, पिवळा, केशरी, एकेरी, गेंदेदार असा सगळ्या प्रकारचा झेंडु डिझाईन ची काहीतरी थीम घेऊन लावला जातो. फुलं फुलायला लागली की गच्ची रेंगीबेरंगी होऊन दिमाखदार दिसायला लागते. विशेषतः अश्विनातल्या सकाळच्या कोवळ्या उन्हात तर त्यांची शोभा अवर्णनीय दिसते. एवढी जागा असून ही फुलांची खूप आवड असल्याने कमीच पडते म्हणून मग कुंडीत अडेनियम, जरबेरा, गुलाब, मरवा , डेलिया अशी फुलं आलटुन पालटुन हौसेने लावली जातात.

हा झेंडू

DSC05275_0.JPG

डेलिया

IMG_20170402_180151992_0.jpg

अडेनियम

adenium.jpg

जरबेरा

IMG_20170315_072801.jpg

गुलाब

IMG_20170318_184842723.jpg

हा लाल गुलाब

IMG_20170531_150317 (1).jpg

हा आहे पारिजात . आमचा हा पारिजात आता खूपच जुना झालाय . हा ही सहज असेल सत्तर ऐशी वर्ष जुना. नवीन लावलाय दुसरा, पण पारिजात म्हटला की हाच येतो मनात. दरवर्षी असं वाटत की ह्या वर्षी नाही बहरणार पण श्रावण आला की आपली संपत्ती उधळायला हा आपला तयारच . तुळशीवर रोज वर्षाव होतो फुलांचा आणि खळ्यात रोज रांगोळी घातली जाते ह्याची. संध्याकाळी ह्याच्या कळ्या उमलतात. गणपतीत सायंपूजेला असतातच ह्या कळ्या आणि सकाळी रोज प्राजक्ताच्या फुलांचा हार असतो गणपतीच्या गळ्यात. पूजेच निर्माल्य रोज प्राजक्ताच्या मूळातच टाकलं जात हे ही असेल कदाचित ह्याच्या दीर्घायुष्याच गुपित. तसेच आमच्या देवांचा ही अधिवास आहे ह्या झाडाच्या मूळात . एकदा काय झालं सकाळी पुजा करायला घेतली तर देव्हार्‍यात देव नाहीत... त्या काळी सगळा कंदिलांचाच कारभार. त्यामुळे उंदरानी वैगेरे कुठे प्रताप केले की काय आणि आता कुठे म्हणून शोधायचं ह्या विचाराने सगळेच हवालदिल झाले . मात्र काही वेळाने घरातल्या एका तीन चार वर्षाच्या मुलाने आपल्य आईला ओढत ओढत प्राजक्ताकडे नेले आणि दाखवले तर आमचे सगळे देव तिथे विश्रांती घेत होते . ह्यानेच खेळता खेळता निर्माल्यासरखे देवही प्राजक्ताच्या मूळात विसर्जित केले होते. मग यथासांग पूजा करुन गार्‍हाणं वैगेरे घालुन ते परत देव्हार्‍यात अधिस्थापित केले गेले . अशा तर्हेने देवांचाच अधिवास तिथे झाल्याने ही ह्याला दीर्घायुष्य लाभले असेल.

मी घरी गेले की पहटे उठुन देवपूजेसाठी फुलं गोळा करण्याचं काम मी आवडीने अंगावर घेते . झाडाना आंजारत गोंजारत फुलं काढताना, झाडावरची सगळी न फुलं काढल्याने नंतर ही त्या फुलांकडे, झाडाकडे मायेनी निरखून बघताना मला उगीचच मी फार श्रीमंत असल्यासारखं वाटत......

Group content visibility: 
Use group defaults

खरंतर मी आभार मानतो आपले,मधुमालतीच्या प्रचीबद्दल विशेष! मला सर्वाधिक आवडलेलाच तो फोटो,मात्र तो पाहून 'अर्रे,तीच तर ही!!' अशी फिलींग अनुभवली! बऱ्याचवेळा फुलं/वेली आवडलेल्या असूनही त्यांचं नेमकं नाव माहित नसतं,तर कधी काही फुलांची नावेच तेवढी ऐकलेली असतात! तगर,जास्वंदाचे फोटोही अप्रतिम! कमळ तर कःमळच!

मनिमोहोर... खुप छान अन धन्यवाद यातली बरीच माझी आवडती फुले आहेत ज्यांची नावे माहीत नव्हती

व्वा! मस्त फोटो. अगदी रंगीत-सुगंधीत झाला धागा.
नागचाफा सुंदर.
अग, लहानपणी माझ्या शाळेत जाण्याच्या वाटेवर एक नागचाफ्याच झाड होतं. वडील आणि मी दोघेही फुल प्रेमी. मग काय, वडील फुलं काढून द्यायचे आणि मी साठवायचे. आम्ही शाळेत गेल्यावर, मोठ्या मुलांबरोबर फुलं घरी पोहोचायची.
रम्य त्या आठवणी. Happy

ममो, शब्द व सुमनाने मन मोहवून गेले. तु तुझ्या कोकणातल्या घरा बद्दल इतकं भरभरून लिहीते की तुझ्या इतकाच आमचाही जीव जडलाय तुझ्या घरावर!

गेलो ममोच्या घरी
गंध दरवळला उरी
चाफ्या गुलाबाच्या सुगंधाने रे Happy

मी तीन सहलीसाठी ( तीन ऋतुतल्या तीन) दोन , एका , अर्ध्या पायावर तयार >>>>>>>>दोन ठीक आहे, पण एका, अर्ध्यावर नक्को रे बाबा. Happy

तुझ्या कोकणातल्या घरा बद्दल इतकं भरभरून लिहीते की तुझ्या इतकाच आमचाही जीव जडलाय तुझ्या घरावर! >> ++ १
मी तीन सहलीसाठी ( तीन ऋतुतल्या तीन) दोन , एका , अर्ध्या पायावर तयार >> जाल तेव्हा मला हाक मारा आठवणीने

मनीमोहोर ,
गंधाचा, रंगाचा निसर्गाचा उत्सव तुम्हाला, तुमच्या घरच्यांना रोज पाहायला मिळतोय ...... नशीबवान आहात !
हे वैभव निर्माण करणाऱ्यांचे , जोपासणाऱ्यांचे खूप कौतुक वाटतंय. तुम्ही सगळं लिहिलंय पण छान.

वा ! किती सुंदर सगळे प्रतिसाद . खूप छान ! धन्यवाद सर्वाना .
तुम्हाला सगळ्याना घरी न्यायला मी ही एका पायावर तयार ..
खरंच सिरियसली ठरवा एकदा .

मंजू तुझं बरोबर आहे कमीत कमी तीन वेळा तरी जायलाच पाहिजे कारण प्रत्येक ऋतुत कोकणचं सौंदर्य वेगळे असते.

गेलो ममोच्या घरी
गंध दरवळला उरी
चाफा फुललेला
चाफा फुललेला
@ हार्पेंन मस्तच हं

शोभा सुंदर आठवण . जगात सगळ्यानाच आपल्या गावची ओढ असते पण कोकणवासीयांना ती जरा अंमळ जास्तच असते नाही ग !

सत्यजित , फुलं अशी अचानक नावगावा निशी भेटली की किती आनंद होतो याचा अनुभव मी ही घेतलाय बरेचदा . शहरात आता मधुमालती कुठे बघायला मिळते ? पण आमच्या कडे एका लेन मध्ये ही वेल . ती बघण्या साठी मी मुद्दाम वाकडी वाट करून जाते तिकडे.

हे वैभव निर्माण करणाऱ्यांचे , जोपासणाऱ्यांचे खूप कौतुक वाटतंय. >> दीपा जोशी अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते . आम्ही मनाने तिकडे असलो कायम तरी शरीराने नसतो तिथे . त्यामुळे खरच त्यांचं मी ही कौतुकच करते .

निळी कमळं आणि निळी कोरंटी अजून दाखवायची आहे तुम्हाला . प्रयत्न चालू आहेत . तेच करताना धागा वर आला .

@ममो.
नेहमी प्रमाणे छान सफर घडवून आणली तुमच्या घराची.

छान लेख Happy
भरपूर जागा, पाण्याची मुबलकता आणि जात्याच असणारी आवड यामुळे आगरात फुलझाडं नाहीत असं घर कोकणात शोधुन ही सापडणार नाही>>>+१११

किती सुंदर!! Happy
फक्त प्राजक्ताचा फोटो दिसत नाहीये मला.

मसाल्यातलं नागकेशर म्हणजे नागचाफ्याचे केसर असतात हे माहीत नव्हतं.

धन्यवाद सर्वाना .
स्वाती, त्या प्राजक्ताचा फोटो नाहीयेच माझ्याकडे .
नागचाफ्या बद्दल मला ही खूप कुतूहल होतं . ह्या वर्षी त्याच्या बहराच्या काळात तिकडे होते म्हणून अनुभवता आलं सगळं .
ते फुललेलं झाड दुरून खूप छान दिसत पण त्याचा फोटो नीट काढता नाही आला दुरून म्हणून फुलांचा काढला फक्त.

कोकणवासीयांना ती जरा अंमळ जास्तच असते नाही ग ! >>>>>>>>.अगदी खरं ! आपण कोकणं सोडून येतो ती एक तडजोड असते. त्यामुळे शरीराने कुठेही असलो तरी मनाने कोकणातच असतो. प्रत्येक सण, प्रत्येक ऋतू, आपण मनात अनुभवत असतो तो कोकणातलाच.

३-४-५-६ सप्टेंबर सुट्टी आहे. मन अगदी ओढ घेतय कोकणात. बघु जमतय का. Happy
तुम्ही पोहोचलात का कोकणात. उद्या गणपती येणार. चाकरमानी आज रात्री पर्यंत तरी पोहोचायला हवेत. Happy

सुंदर लेख ! वाचताना मन सुगंधीत झाले . असे घर असायला नशीबवान असावे लागते .

पन्नास हुन अधिक प्रतिसाद ... थँक यू सगळ्यांना .
शोभा मी नाही जाऊ शकलेय गणपती साठी गावाला .
तिकिटं काढलेली कॅन्सल केली .. इतकं वाईट वाटलं.

पांढरा जास्वंद तर किती सुंदर दिसतोय.>>>>>>>>>.अंकू, तुझी चूक काढत नाही . फ़क्त एक दुरुस्ती. "ती" जास्वंद किंवा "ते" जास्वंदीचं फ़ुल. असं मला वाटतय. (रागवली नाहीस ना? )

Pages