त्या फुलांच्या गंधकोषी

Submitted by मनीमोहोर on 20 August, 2017 - 13:03

भरपूर जागा, पाण्याची मुबलकता आणि जात्याच असणारी आवड यामुळे आगरात फुलझाडं नाहीत असं घर कोकणात शोधुन ही सापडणार नाही . कोकणातल आमचं घर ही याला अपवाद नाही आमच्याकडे ही भरपुर फुलझाडं आहेत .

उन्हाळ्यातल्या भर दुपारी ही खळ्यात गार सावली देणारं हे आहे नागचाफ्याचं झाड. हे असेल सहज साठ सत्तर वर्ष जुनं. चांगला वृक्ष झाला आहे याचा. हे सदा हरित झाड आहे . साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात याला मोठे मोठे कळे येतात आणि मग त्यातुन चार पसरट पाकळ्या असणारी पांढर्‍या रंगाची मध्ये पिवळेजर्द केसर असलेली फुलं उमलतात. याला मंद सुवास असतो त्यामुळे ह्या फुलांवर भरपूर मधमाशा ही येतात नवीन लालसर रंगाची कोवळी पालवी, हिरवी पानं, कळे आणि फुलं असं सगळ वैभव एकाच वेळी मिरवत हे झाड अंगावर. खळ्यात त्यांचा रोज सडा पडू लागतो . त्या फुलातलं केशर काढणं हे एक मोठच काम असतं ह्या दिवसात. कळ्यांमधलं केशर गोळा करणार्‍याला गमतीनं " कळेकाका " असं संबोधल जातं आमच्याकडे. हेच ते नागकेशर . . खळ्यात कापडावर पसरुन उन्हात चांगलं वाळवलं जातं . ते वाळत घातलेलं केशर अगदी पिवळजर्द दिसतं. नागकेशराचे आयुर्वेदात खूप उपयोग सांगितले आहेत. त्यामुळे अशाच एका आयुर्वेदिक रसशाळेला दिलं जात हे केशर.
नागचाफा
IMG_20170315_070442292.jpg

खाली पडलेले कळे

IMG_20170315_065536134_0.jpg

वाळत घातलेलं केशर

IMG_20160424_114019557.jpg

खळ्यात आम्ही एक कृत्रिम धबधबा तयार केला आहे मोटरवर चालणारा. ह्याचा खळखळाट ऐकायला फार छान वाटतं . धबधब्यामुळे निर्माण झालेल्या पाण्यात चंद्रविकसीनी कमळांचे कंद सोडले आहेत. रात्री ती गुलाबी कमळ उमलतात आणि त्यांचा मंद सुगंध खळ्यात भरुन रहातो त्या कमळांच्या सान्निध्यात चांदण्या रात्री कधी कधी मस्त गप्पा रंगतात आमच्या. सकाळी उन्हं वर आली कि मात्र ही मिटुन जातात. आमच्या परसदारी एक मोठी दगडाची डोण आहे, आता पंपाचं पाणी आल्याने तशी पडुनच आहे . त्यात आम्ही निळ्या कमळांचे कंद सोडले आहेत. उन्हं वर आली की पुढल्या खळ्यातील कुमुदिनी मिटतात तर ही उमलातात त्यांचा निळा रंग उन्हात अगदी चमकुन उठतो. तात्पर्य काय तर आमच्याकडे दिवसाचे चोवीस ही तास कमळं डुलत असतात.

DSC03194_0.JPG

ही निळी कमळं

DSCN1412 (1)-001.jpg

जो अतिशय उंच वाढलेला वृक्ष दिसतोय तो आहे सोनचाफा . आजूबाजुच्या माडापोफळींशी स्पर्धा करत हा इतका उंच वाढला आहे की टोपी पडण्या एवढी आपली मान मागे करावी लागते ह्याची भेट घेण्यासाठी . ताड माड वाढलेल्या ह्या चाफ्यावर घारी, गरुड असे मोठे मोठे पक्षी असतात वास्तव्यास. ह्याची फुलं काढणं तर अशक्य प्राय गोष्ट आहे. कोकणातल्या माणसांना चाफ्याची फार आवड म्हणुन मग अलीकडे दोन कलम लावली आहेत चाफ्याची ज्याची फुलं हातानी ही तोडता येतात. एक कवठी चाफ्याच झाड ही आहे. ह्याच फुल अगदी कवठा सारख दिसतं म्हणून हा कवठी चाफा . ह्याचा ही थोडासा उग्र सुगंध मला फार आवडतो.

चाफ्याची कळी

IMG_20170419_214124.jpg

चाफा
IMG_20170418_192326.jpg

कवठी चाफा
kavathii chafa.jpg

आमचं आगर खूप मोठ आहे. मध्ये मध्ये वाटा केल्या आहेत चालण्यासाठी आणि उतारावर असल्याने मध्ये मध्ये पायर्‍या ही आहेत. माडा पोफळीनी जरी आगराचा बहुतांश भाग व्यापला असला तरी फुलझाडांसाठी भरपूर जागा आहे. आगराच्या वईला संरक्षक म्हणुन काटेरी कोरांटी लावली आहे. निळी आणि पिवळी दोन्ही रंगांची . कामवाल्या बायका ह्याचे वळेसर करुन डोक्यात माळतात. उन्हळ्यात जर कधी फुलांची कमतरता असेल तर देवपूजेला ही मिळतात ही फुल. अगदी " देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशीतरी" ह्या कवितेची आठवण करुन देणारी. लहान मुलं कोरांटीच्या फुलातला मधा चोखत असतात टाइम पास म्हणून . वईला आम्ही कृष्णकमळाचा वेल ही सोडला आहे . हा ही श्रावण महिन्यातच बहरतो. शंभर कौरव , पाच पांडव आणि त्यावर श्रीकृष्ण अशी पा़कळ्या, स्त्रीकेसर आणि पुंकेसर यांची रचना असलेलं निळ्या रंगाचं हे फुलं माझं खूप आवडतं आहे . ह्याला मंद सुवास ही असतो. वरती श्रावण महिन्यातलं ढगाळलेलं आकाश आणि खालती हिरव्या गर्द वेलीला लागलेली ही निळी फुलं झाडावर फारच छान दिसतात. दुसरी एक निळ्या फुलांची वेल म्हणजे गोकर्ण. गोकर्णाला वर्षभर फुलं असतात आणि आपल्याकडे निळ्या रंगाची फुलं जास्त नसल्याने देव्हार्‍यात शोभुन ही दिसतात.

ही कोरांटी फोटो खूप छान नाहिये पण आयडिया येईल .

DSC05284.JPG

गुलबाक्षीच अक्ष्ररशः बनच झालं आहे आमच्याकडे. गुलबाक्षी रंगाची , पिवळी, पांढरी आणि मिक्स रंगाची ही. . संध्याकाळी फुलणारी ही गुलबक्षी पावसळ्यात बहरते.... अगदी वेड्यासारखी बहरते...... गुलबक्षीच रंगीबेरंगी बन खूप आकर्षक दिसत. ही फुलं एकमेकात गुंफुन वेणी करतात. गणपतीत सायंपूजेला गणपतीच्या गळ्यात रोज गुलबाक्षीचा हार / वेणी असतेच. मात्र पावसाने फुलं पाणेरली झाली तर वेणी नाही करता येत, तुटते ती मधेच. त्यात श्रावण महिन्यात पावसाचा काही भरवसा नसतो. दोन मिनिटं पडुन फुलं पाणेरुन जातो फक्त .म्हणुन काढण्याची घाईच करावी लागते . हीच्या चवळीएवढ्या छोट्या काळ्याबिया असतात आणि त्या खाली जमीनीत रुजुन नवीन झाडं आपोआपच उगवत असतात . तुम्हाला माहित नसेल पण ह्या गुलबक्षीच्या पानांची भजी अतिशय कुरकुरीत होतात आणि मस्तच लागतात. करुन बघा एकदा पानं असली तर. ..... आगरात आम्ही घराच्या कवाडी जवळच एक कामट्यांची कमान उभारली आहे आणि त्यावर मधुमालतीचा वेल सोडला आहे. त्याची लाल, गुलाबी आणि पांढरी फुले आणि मन मोहुन टाकणारा गोड वास घरत शिरताना मन प्रसन्न करुन टाकतो.

मधुमालती
madhumaalati 1.jpg

रातराणी

IMG_20170315_072016436.jpg

आमच्याकडे आगरात वाटेच्या कडेला ओळीने एकाच प्रकारची झाड लावलेली आवडतात सगळ्यांना. शेवंतीचे , मोगर्‍याचे, अबोलीचे , लिलीचे , सदाफुलीचे, सोनटक्क्याचे, अगदी छोट्या एकेरी तगरीचे असे ताटवे बघताना खूप प्रसन्न वाटते. सांडपाणी जिथे सोडल जातं तिथे कर्दळीचे बनच झाले आहे. लाल, पिवळ्या करदळी हळदी कूंकवाप्रमाणे दिसतात अगदी. अनेक प्रकारच्या जास्वंदी आणि विविध प्रकारच्या तगरी, अनंत, पांढरा कांचन अशी अनेक प्रकारची फुलं आमच्या आगराची शोभा वाढवत आहेत. मी घरी गेले की पहाटे एक फेरी असतेच माझी हे सगळ बघण्यासाठी . दिवसभराची उर्जा मिळते ह्या प्रभात फेरी मधुन मला.

जास्वंद
IMG_20170612_120908222~2_0.jpg

सदाफुली
_20160426_233107~2.JPG

डबल तगर
RSCN1517.jpg

नवरात्रात झेंडुची फुलं लागतातच देवीला. गच्चीवर मोठ मोठ्या काळ्या प्लॅस्टिकच्या बॅगेत लाल, पिवळा, केशरी, एकेरी, गेंदेदार असा सगळ्या प्रकारचा झेंडु डिझाईन ची काहीतरी थीम घेऊन लावला जातो. फुलं फुलायला लागली की गच्ची रेंगीबेरंगी होऊन दिमाखदार दिसायला लागते. विशेषतः अश्विनातल्या सकाळच्या कोवळ्या उन्हात तर त्यांची शोभा अवर्णनीय दिसते. एवढी जागा असून ही फुलांची खूप आवड असल्याने कमीच पडते म्हणून मग कुंडीत अडेनियम, जरबेरा, गुलाब, मरवा , डेलिया अशी फुलं आलटुन पालटुन हौसेने लावली जातात.

हा झेंडू

DSC05275_0.JPG

डेलिया

IMG_20170402_180151992_0.jpg

अडेनियम

adenium.jpg

जरबेरा

IMG_20170315_072801.jpg

गुलाब

IMG_20170318_184842723.jpg

हा लाल गुलाब

IMG_20170531_150317 (1).jpg

हा आहे पारिजात . आमचा हा पारिजात आता खूपच जुना झालाय . हा ही सहज असेल सत्तर ऐशी वर्ष जुना. नवीन लावलाय दुसरा, पण पारिजात म्हटला की हाच येतो मनात. दरवर्षी असं वाटत की ह्या वर्षी नाही बहरणार पण श्रावण आला की आपली संपत्ती उधळायला हा आपला तयारच . तुळशीवर रोज वर्षाव होतो फुलांचा आणि खळ्यात रोज रांगोळी घातली जाते ह्याची. संध्याकाळी ह्याच्या कळ्या उमलतात. गणपतीत सायंपूजेला असतातच ह्या कळ्या आणि सकाळी रोज प्राजक्ताच्या फुलांचा हार असतो गणपतीच्या गळ्यात. पूजेच निर्माल्य रोज प्राजक्ताच्या मूळातच टाकलं जात हे ही असेल कदाचित ह्याच्या दीर्घायुष्याच गुपित. तसेच आमच्या देवांचा ही अधिवास आहे ह्या झाडाच्या मूळात . एकदा काय झालं सकाळी पुजा करायला घेतली तर देव्हार्‍यात देव नाहीत... त्या काळी सगळा कंदिलांचाच कारभार. त्यामुळे उंदरानी वैगेरे कुठे प्रताप केले की काय आणि आता कुठे म्हणून शोधायचं ह्या विचाराने सगळेच हवालदिल झाले . मात्र काही वेळाने घरातल्या एका तीन चार वर्षाच्या मुलाने आपल्य आईला ओढत ओढत प्राजक्ताकडे नेले आणि दाखवले तर आमचे सगळे देव तिथे विश्रांती घेत होते . ह्यानेच खेळता खेळता निर्माल्यासरखे देवही प्राजक्ताच्या मूळात विसर्जित केले होते. मग यथासांग पूजा करुन गार्‍हाणं वैगेरे घालुन ते परत देव्हार्‍यात अधिस्थापित केले गेले . अशा तर्हेने देवांचाच अधिवास तिथे झाल्याने ही ह्याला दीर्घायुष्य लाभले असेल.

मी घरी गेले की पहटे उठुन देवपूजेसाठी फुलं गोळा करण्याचं काम मी आवडीने अंगावर घेते . झाडाना आंजारत गोंजारत फुलं काढताना, झाडावरची सगळी न फुलं काढल्याने नंतर ही त्या फुलांकडे, झाडाकडे मायेनी निरखून बघताना मला उगीचच मी फार श्रीमंत असल्यासारखं वाटत......

Group content visibility: 
Use group defaults

गंधकोषी
लेख खुप आवडला पण फोटो दिसत नाहित.लेख अगदी कोकणातल्या वातावरणाप्रमाणे प्रफुल्लित व सदाबहार वाटला.खळिचा हेवा वाटला
मलाही बागकामाची आवड आहे. घराला मोठे अंगण आहे.अंगणात औषधी वनस्पती जास्त आहेत फुलझाडे कमी पण तुमचा लेख वाचल्यामुळे फुलझाडे ही लावावीशी वाटत आहेत
एक प्रश्न खळी हे गावाचे नाव आहे कि आणखी काही

छान लेख. फोटो हवेतच.
'गंधकोषी.'
मला वाटतं 'कोश' हिंदीत लिहीतात.
>> हिरवी पानं, कळे आणि फुलं<<
कळे म्हणजे कळ्या का?

धन्यवाद सर्वाना .
फोटो दाखवायचे आहेत. पण जरा कठीण जातयं
पंडित, तो शब्द खळं असा आहे. कोकणात खळं म्हणजे अंगण .

Manimohor khRech bhagywan ahat ani shrimant hi....nisrg aahe tumchya sobat..mast lekh..avdla...

मनीमोहोर, खूप छान लिहीलं आहेस. तुझा कोकणातील घराबद्दलचा लेख नेहमीच मन प्रसन्न करुन जातो.
आता फोटो पाहिले की डोळे निवतील.

सुंदर...

स्वप्नातले कोंकण

साधेच घर माझे , छोटेसे अंगण
त्यात अवतरले, सारे वृक्षगण
अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन
माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन

अंगणात माझ्या, कर्दळीचे पान
घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण
नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान
नैवेद्याला सजते, केळीचे पान

परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण
शंकरास वाहते, बेलाचे पान
स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण
त्यात असावे घरकुल माझे छान

राजेंद्र देवी

झाडाना आंजारत गोंजारत फुलं काढताना, फुलं काढताना ही झाड नि:पुष्प होणार नाही याची काळजी घेतल्याने नंतर ही ते सपुष्प झाड निरखून बघताना मला उगीचच मी फार श्रीमंत असल्यासारखं वाटत..... >>>> या श्रीमंतीत आम्हा सर्वांना सामील केल्याबद्दल अनेक हार्दिक धन्यवाद...

शब्दकळेची श्रीमंती दृष्ट लागण्याासारखी....

___/\___

या श्रीमंतीत आम्हा सर्वांना सामील केल्याबद्दल अनेक हार्दिक धन्यवाद...
शब्दकळेची श्रीमंती दृष्ट लागण्याासारखी....*)))))) +१

हेमा ताई, तुझे लिखाण म्हणजे मनातली एक- एक सुगंधी कुप्पी उघडत जाणारे.. तुझ्या ही आणि वाचकांच्या ही..
खुप म्हणजे खुप अप्रतिम लेख!! सगळ्या फुलांचा भरगच्च गंध पसरलेला लेख........ Happy

शशांक जीं चा प्रतिसाद आवडला..
राजेन्द्र, कविता छानच.

हेमाताई सगळ दृष्य डोळ्यासमोर उभ राहून अगदी फ्रेश वाटल. फार सुंदर लिहील आहात.

मने, सुंदर लेख. सगळं आगर डोळ्यापुढे उभं राहिलं. तुझ्या आगरातली सगळी फुलं माझी आवडती. Happy
आगरात फुल्झाडं नाहीत असं घर कोकणात शोधुन ही सापडणार नाही . >>>>>.अगदी खरं!
असं वाटतय, परडी घेऊन त्वरीत तुझ्या आगरात यावं फुलं काढायला.
देवपूजेसाठी फुलं गोळा करण्याच काम मी आवडीने अंगावर घेते .>>>>>>>>माझंही आवडतं काम. बालपण आठवलं बघ!
तुमच्याकडे रंगीत पानांची झाड आहेत का ग? हिरव्यावर पिवळे ठिपके, किंवा हिरवी-लाल वगैरे. आम्ही ती पानं, हारात घालायचो.( शाळेत हार घेऊन जावे लागे.) फुलं नाहीच मिळाली तर फक्त त्या पानांचेसुद्धा हार केलेले आठवले.
तुझ्या कोकण लेखांनी, मनाच्या तळ कप्प्यात जपून ठेवलेल्या आठवणी वर येऊन नाचू लागतात. Happy

इतक्या सुंदर आणि मन उत्साहित करणाऱ्या सर्व प्रतिसादांसाठी सगळ्यांचे खूप खूप आभार .
राजेंद्र देवी कविता सुंदर आहे . खूप आवडलीय .
राहुल, नागचाफ्याचे कळे खूप मोठे असतात म्हणून त्याना कळी न म्हणता कळा म्हणतात .
शोभा , तू म्हणतेस ती पानं मी बघितली आहेत पण आमच्या कडे नाहीयेत ती . कधी कधी कातऱ्या कातऱ्या असलेली झिप्रि असते आमच्या कडे .
फोटो अजून आहेत . पण पिकासा बंद झाल्या पासून फोटोच तंत्र नाही अजून नीट जमलंय . टप्प्या टप्प्याने करतेय अपलोड.

@मनीमोहोर...
प्रतीक्रियेबद्द्ल धन्यवाद...

वा! मस्त फ़ोटो.
कमळाचा रंग कीत लाल आहे.
१ नागचाफ़्याचा फ़ोटो येउ दे! Happy

वाह् व्वा...
केवढा रंगीत धागा नि हिरवेगार प्रतिसाद!
आज चित्रांनी हजेरी लावली नि रंग-रंगात नाहून गेलाय धागा-धागा! आपल्या शब्दांचा मोहर कोकणच्या मधु-सुगंधाची उधळण करतो आहेच!

सुरेख!

लाल गुलाब, रातराणी, सोनचाफा, पांढरी जास्वंद हे फोटो विशेष आवडले.

सर्वाना खूप खूप धन्यवाद इतक्या सुंदर प्रतिसादांसाठी. सत्यजित किती सुंदर लिहिलंय तुम्ही .

इतके फोटो अपलोड करणं खूप कठीण गेलं पण अखेर साधलं .

शोभा , नागचाफ्याचे फोटो बघ प्लिज .

Pages