खड्डा

Submitted by अतुलअस्मिता on 19 August, 2017 - 09:38

खड्डा

लवता लवत नाही
पापणीही मिटत नाही
भाळी आभाळभर चिंतापरी
आभाळालाच पाझर नाही
खिशात दमडी नाही
घरात भाकर नाही
लाज बाजारात विकूनही
नशिबाला ठिगळ नाही

ढगात पाणी नाही
घरात नाणी नाही
फुलांत मकरंद नाही
फुलपाखरू दिसत नाही
सूर्याच्या दाहापायी आतडी
काही जळत नाही
घोटघोट हुंदका गिळून
खड्डा काही भरत नाही

हल्ली म्हणे निसर्ग बदललाय
खोटंय ते देवा
कंबरड मोडून घामाचा
दुसरंच खातय मेवा
खड्डयांमधल्या पोटात सुद्धा
उरलाय एक खड्डा
बोचऱ्या थंडीत शहारलेला
थरथरतोय पिकला ओरखडा

डोळ्यांना पूर येतो
पर नदीला नाही
पालवी फक्त मनातच
शेतीपत्ता ठाऊक नाही
झरे काळजीचे काळजाला
पाषाणाला फरक नाहीं
देव्हाऱ्यात जणू आता
देवच उरला नाही

Group content visibility: 
Use group defaults