'इंडिया मार्च फॉर सायन्स' - निवेदन

Submitted by विज्ञानवादी on 6 August, 2017 - 00:16

नमस्कार,

येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये या देशातले शास्त्रज्ञ, विज्ञानशाखेचे विद्यार्थी, शिक्षक आणि वैज्ञानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र येऊन संचलन करणार आहेत. ’इंडिया मार्च फॉर सायन्स’ असं या संचलनाचं नाव आहे.

मुंबईतला कार्यक्रम दुपारी ४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर जमून तेथून विल्सन कॉलेजपर्यंत जायचं, असा आहे; तर पुण्यात दुपारी ५ वाजता रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गांधी पुत़ळ्यापाशी जमून तेथून कलेक्टर कचेरीजवळील आंबेडकर पुत़ळ्यापर्यंत चालत जायचं, असा कार्यक्रम आहे. याविषयी अधिक माहिती - http://breakthrough-india.org/imfs2017/index.html - या दुव्यावर मिळू शकेल.

या संचलनाला आणि चळवळीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

हे संचलन आम्ही ज्या मागण्यांसाठी करणार आहोत, त्या आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत -

(१) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या, म्हणजे जीडीपीच्या, कमीत कमी ३% इतका निधी वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनास, तर कमीत कमी १०% इतका निधी शिक्षणक्षेत्रास देण्यात यावा.

(२) अवैज्ञानिक आणि प्रतिगामी विचारांच्या, तसंच धार्मिक असहिष्णुतेच्या समाजातल्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यात यावा. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी मूल्यं आणि शोधक वृत्ती ही संवैधानिक मूल्यं आचरणात आणण्यावर भर देण्यात यावा.

(३) शिक्षणपद्धतीत फक्त वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या विचारांचा अंतर्भाव असावा.

(४) सरकारची धोरणं ही पुराव्यांनी शाबित विज्ञानावर आधारित असावीत.

या मागण्यांमागची आमची भूमिका अशी -

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. पण ते तितकंसं खरं नाही. आज आपल्याला जी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतली प्रगती दिसते आहे, ती झाली आहे कुतूहलामुळे. का, कसं आणि कशामुळे हे प्रश्न अत्यंत मूलभूत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे मूलभूत संशोधन! ज्ञानप्राप्ती हा मूलभूत संशोधनामागचा मूळ हेतू असतो. आपल्या अवतीभवती जे घडतं, त्याचा अर्थ लावण्याचं काम मूलभूत विज्ञान करतं. नव्यानं समोर येणार्‍या घटना आणि त्या घटनांमागचा कार्यकारणभाव शोधण्याचं कुतूहल यांतून विज्ञानाची प्रगती होते. ही प्रगती देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते.

सफरचंद झाडावरून खाली का पडलं, असा विचार करताना न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला; एका पेट्रिडिशमध्ये सूक्ष्मजंतू वाढत असताना त्या डिशवर चुकून आलेल्या बुरशीनं त्या सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली आणि या निरीक्षणामागचं कारण शोधताना अलेक्झांडर फ्लेमिंगना प्रतिजैविकांचा शोध लागला; या आणि अशा अनेक सुरस कथा आपण ऐकतो. मात्र नीट विचार करता हे शोध असे एका ओळीत मावतील इतके सोपे नसतात, हे आपल्याला जाणवतं. कारण विज्ञानाच्या मूलभूत शाखांमधलं संशोधन हे पूर्वसुरींच्या संशोधनाचा आधार घेत पुढे जाणारं असतं. आज मूर्त स्वरूपात दिसणारा एखादा शोध हा कित्येक दशकांच्या संशोधनामुळे आपल्यासमोर आलेला असतो. उदाहरणार्थ, फ्लेमिंग यांना पेनिसिलीन हे काही गोळीच्या रूपात हाती लागलं नाही. फ्लेमिंग यांना पेनिसिलीन नैसर्गिकरीत्या तयार करणारी बुरशी सापडली. त्या शोधानंतर त्या बुरशीपासून पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात वेगळं करणं, पेनिसिलीनची रासायनिक रचना शोधून काढणं आणि प्रत्यक्ष माणसांवर प्रयोग, हे सारं एका माणसाचं काम नव्हतं. १९२८ साली फ्लेमिंग यांनी पेनिसिलीयम या बुरशीचा शोध लावला आणि १९४१ साली पेनिसिलीन हे द्रवरूपात रुग्णाला इंजेक्शन म्हणून उपलब्ध झालं. त्यावर आजही भरपूर संशोधन सुरू आहे.

म्हणजे मूलभूत संशोधनाची मुख्य वैशिष्ट्यं अशी सांगता येतील -

१. ज्ञानप्राप्ती / कुतूहल हा मूळ हेतू. त्यामुळे एखाद्या शोधाचा तत्काळ उपयोग असेलच, असं नाही.

२. अज्ञाताचा शोध घेताना अनेक प्रयोग अयशस्वी होणं – यशाचं अत्यल्प प्रमाण.

३. अनेको वर्षं, किंबहुना निरंतर चालणारं काम.

४. अनेकांच्या सहकार्यानं चालणारं काम.

मूलभूत संशोधनाला भरपूर पैसा लागतो. ही त्या देशाची दीर्घकालीन गुंतवणूक असते. मूलभूत संशोधनाचे फायदे लगेच दिसत नसले, तरी प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यपूर्ण आणि सुखकर, संपन्न जगण्यासाठी संशोधन व त्यावर होणारा खर्च टाळणं शहाणपणाचं नसतं. अमेरिका त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा २.७४२% वाटा विज्ञान-संशोधनासाठी राखून ठेवते. चीन आपल्या उत्पन्नाचा २.०४६% भाग संशोधनावर खर्च करतो. जगात संशोधनासाठी सर्वाधिक खर्च करणारा देश दक्षिण कोरिया असून तिथे या खर्चाचं प्रमाण ४.२९२% इतकं आहे. विकसनशील देशांमध्ये ब्राझील त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.१५% वाटा संशोधनासाठी राखून ठेवतो. भारतात हे प्रमाण ०.८% इतकं आहे.

भारतानं संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ३% भाग राखून ठेवावा, अशी मागणी गेली अनेक दशकं शास्त्रज्ञ करत आहेत. आजवरच्या एकाही सरकारनं ही मागणी पूर्ण केलेली नाही. गेल्या दोन दशकांत हा खर्च वाढवण्याची आश्वासनं तीनदा दिली गेली, मात्र मूलभूत संशोधनाचं महत्त्व आणि त्यासाठी उपलब्ध असणारा निधी यांचं आपल्या देशातलं व्यस्त प्रमाण वारंवार सत्ताधार्‍यांच्या लक्षात आणून देऊनही हा खर्च वाढवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही झाली नाही. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं पूर्ण होत असताना विज्ञानासाठी भरीव आर्थिक तरतूद नसणं, हे खेदकारक आहे.

त्यातच भारतातल्या प्रमुख संशोधनसंस्थांना मिळणारा निधी कमी होत जातो आहे. संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या निधीत वाढ करण्याऐवजी देशभरातल्या संशोधनसंस्थांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं आणि संशोधनासाठी लागणारा काही निधी स्वत: उभारावा, असं सरकारचं मत आहे. त्या दिशेनं निधिकपातही लगेच सुरू झाली आहे. सीएसआयआर, म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, त्यामुळे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संस्थेकडे संशोधनप्रकल्पांसाठी पुरेसा पैसा नाही. हीच कथा अणुऊर्जा आयोग, विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, आयआयटी, आयसर, टीआयएफआर यांचीही आहे. या संस्थांमधले अनेक संशोधनप्रकल्प सध्या आर्थिक चणचणीमुळे खोळंबले आहेत. निधिकपातीमुळे आयआयटी, आयसर अशा संस्थांमधली विविध शुल्कही वाढली आहेत.

शास्त्रज्ञांनी दरवर्षी अमूक इतकी उत्पादनं / तंत्रज्ञानं बाजारात आणावी, त्यांनी सरकारी ध्येयधोरणांशी सुसंगत असं संशोधन करावं, असंही शास्त्रज्ञांना सांगण्यात आलं आहे. मुळात उपयोजित संशोधन हे मूलभूत संशोधनाच्या खांद्यावर उभं असतं. क्वांटम भौतिकीच्या सखोल अभ्यासाअभावी आपण लहानांत लहान सेमिकंडक्टर तयार करू शकलो नसतो. पुण्यात डॉ. मुरली शास्त्री यांनी चांदीचे नॅनोकण तयार करून त्यांचा अभ्यास केला नसता, तर ’टाटा स्वच्छ’सारखं कमी खर्चातलं पाणी शुद्ध करणारं यंत्र तयार होऊ शकलं नसतं. पण बाजारपेठेसाठी केवळ काही उत्पादनं निर्माण करणं, हे प्रत्येक शास्त्रज्ञाचं काम नाही. केवळ तंत्रज्ञान-विकास हा मूलभूत संशोधनाचा उद्देश नसतो. शास्त्रज्ञांनी सरकारी धोरणं आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या आवडीचे राजकीय-सामाजिक कार्यक्रम पूर्ण करण्यासाठीच काम करणं, हे अन्यायकारक आहे. त्याच्या आवडीच्या विषयात मूलभूत संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञाला अमूकच विषयात संशोधन करायला सांगणं, किंवा त्याला तसं संशोधन करावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण करणं, हे घातक आहे.

सरकारनं दिलेल्या आर्थिक मदतीवर चालणार्‍या संशोधनसंस्थांमधल्या संशोधनामुळे देशातल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात, ही अपेक्षा योग्य आहे आणि देशातल्या अनेक संस्था त्या दिशेनं काम करतही आहेत. मात्र नवी ’स्टार्टअप्स’ सुरू होणं म्हणजे वैज्ञानिक प्रगती नव्हे. शिवाय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा किंवा टीआयएफआर अशा मूलभूत संशोधनासाठी नावाजल्या गेलेल्या संस्थांकडूनही असंच आणि इतकंच संशोधन व्हावं, ही अपेक्षा गैर आहे. या संस्थांमधल्या संशोधनावर किती पैसा खर्च झाला आणि त्यातून ’परतावा’ किती मिळाला, असा हिशेबही चुकीचा आहे. मूलभूत संशोधनावर होणारा खर्च आणि त्यातून होणारा ’फायदा’ हा एखाद्या आर्थिक वर्षातल्या नफ्यातोट्याच्या परिमाणात मोजायचा नसतो. त्या संशोधनाचे परिणाम दिसायला बराच कालावधी लागू शकतो, शिवाय त्याचं तत्काळ, ढोबळ मूल्यमापनही शक्य नसतं. कारखान्यांना आणि उद्योजकांना लावले जाणारे निकष मूलभूत संशोधनासाठी वापरणं हे नक्कीच योग्य नाही. या देशासमोर असलेले अन्नधान्याचे, आरोग्याचे प्रश्न किंवा नद्यांची आणि रस्त्यांची स्वच्छता यांसाठी तंत्रज्ञान विकसित करताना मूलभूत विज्ञानाचा बळी जाणं हितावह नाही.

देश स्वयंपूर्ण व्हावा, नवी तंत्रज्ञानं विकसित व्हावी या अपेक्षापूर्तीसाठी संशोधनाला पाठिंबा देऊन शास्त्रज्ञांना मोकळीक मिळायला हवी. विज्ञान - कला - संगीत - चित्रपट - खेळ अशा कुठल्याच क्षेत्रांतलं ’इनोव्हेशन’ आचार-विचारस्वातंत्र्याअभावी घडू शकत नाही. या बाबतीत रामानुजनचं उदाहरण बोलकं आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणित करणार्‍या रामानुजनला प्रचलित पद्धत शिकवायचा प्रयत्न हार्डीनं केला. परंतु ते मानवत नाही, हे ध्यानात येताच त्यानं पूर्ववत पद्धतीवर भर दिला. अशा परिपक्वतेची व लवचिकतेची आज गरज आहे.

विज्ञाननिष्ठ समाज हा नेहमी प्रगतिशील समाज असतो. ज्या देशांनी मूलभूत संशोधनात गुंतवणूक केली ते देश नेहमीच प्रगत झाले आहेत. अर्थात आपल्याला प्रगत व्हायचे असेल तर मूलभूत विज्ञानांतील गुंतवणुकीला पर्याय नाही.

मूलभूत संशोधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमागे निधीचा अभाव हे महत्त्वाचं कारण असलं, तरी त्या अभावामागे असलेलं वैज्ञानिक दृष्टीचा अभाव हे कारण अधिक गंभीर आहे. मूलभूत संशोधन महत्त्वाचं का, याचं उत्तर जर सामान्य जनतेला माहीत असेल, तर शास्त्रज्ञांना समाजातून आपोआप प्रोत्साहन मिळेल, शिवाय सरकारदेखील त्याकडे अधिक गांभीर्यानं बघेल. यासाठी मूलभूत संशोधनाला लोकाश्रय मिळायला हवा. विज्ञानाविषयी भारतीयांचा अत्यंत उदासीन असा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. अर्थात याचं काही अपश्रेय शासनाच्या आणि खुद्द संशोधकांच्या माथी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन आपलं संशोधन लोकांपर्यंत नेलं पाहिजे.

एकीकडे मूलभूत विज्ञानाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना छद्मविज्ञानाला राजाश्रय मिळणं ही गंभीर बाब आहे. या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची धोरणं आखणार्‍या, निर्णय घेणार्‍या आणि निधिवाटप करणार्‍या संस्था आणि संस्थाचालक छद्मविज्ञानाचा पुरस्कार करताना दिसून येतात. विज्ञानाशी संबंध नसलेल्या बिगरसरकारी संस्थाही सरकारी संशोधनसंस्थांच्या कामकाजात ढवळाढवळ करून छद्मविज्ञानाचा प्रचार करताना, त्यासाठी निधी मिळवताना दिसतात. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणं हे जागृत आणि सक्षम समाजाच्या जडणघडणीसाठी एक अत्यावश्यक बाब आहे. हे घडण्यासाठी सामान्य नागरिकांना विज्ञान म्हणजे नेमकं काय, हे समजणं जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे त्यांना कुठले दावे केवळ शास्त्राचा देखावा करीत आहेत, हे ओळखता येणंही गरजेचं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांतील कालबाह्य, अतार्किक आणि प्रसंगी क्रूर अशा प्रथांना वैज्ञानिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न सतत होतो आहे. त्याचबरोबर वेद-पुराण आणि महाकाव्यं यांतला प्रत्येक संदर्भ हा शास्त्रीय आधारावरच उभा आहे, हे ठसवण्याचा जोरकस प्रयासही चालू आहे.

छद्मविज्ञानी संस्था आणि त्यांचे दावे यांचं सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांच्या राजकीय, धार्मिक अथवा सांस्कृतिक मतांचा त्यांच्या निष्कर्षांवर असलेला जबरदस्त पगडा. या मतांप्रमाणे संशोधनाचे निष्कर्ष आले नाहीत, तर त्यांच्यात अक्षम्य फेरफार केले जातात किंवा अस्तित्वात असलेल्या सिद्धांतालाच नाकारलं जातं. संशोधन करताना त्याचा निकाल आधीच ठरवून मग सुरुवात करण्याचा हा उरफाटा उद्योग आहे. आधीच ठरलेल्या निष्कर्षांना पूरक असलेली निरीक्षणं घेऊन केलेल्या वैज्ञानिक तपासणीमुळे झालेल्या नुकसानाची कितीतरी उदाहरणं आहेत.

छद्मविज्ञान हे ज्ञान आणि सत्य यांच्या मूलभूत संकल्पनेवरच हल्ला चढवत असतं. त्याचप्रमाणे खऱ्या शास्त्रीय संशोधनांवर जो पैसा आणि मनुष्यबळ खर्च होणं अपेक्षित आहे, त्याचा अपव्यय अशा निरर्थक ’शोधां’मुळे केला जातो. 'आपल्या महान, पुरातन परंपरेला सगळंच ठाऊक होतं, आपल्या पूर्वजांनी सगळेच शोध लावले होते', अशी भ्रामक अहंगंड जपणारी आणि स्वकष्टानं नवी ज्ञाननिर्मिती करण्यापासून परावृत्त करणारी घातक वृत्ती समाजात बोकाळणं, हा छद्मविज्ञानाचा सगळ्यांत मोठा धोका आहे.

भारतीय वैज्ञानिक परंपरेत अभिमान बाळगावा, अशा अनेक गोष्टी आहेत हे सत्य कुणीच नाकारणार नाही. परंतु त्या गोष्टींबद्दल न बोलता भलत्याच गोष्टींचा अभिमान बाळगावा, असा अभिनिवेश समाजात बोकाळला आहे. उदाहरणार्थ, डायोफंटाईन इक्वेशन्स सोडवण्यामध्ये ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांसारखे भारतीय गणिती पाश्चात्य गणितज्ञांपेक्षा काही शतकं आघाडीवर होते. परंतु ब्रह्मगुप्ताची 'कुट्टक' किंवा भास्कराचार्यांची 'चक्रवाल' पद्धत यांविषयी भारतीयांना किंवा आपल्या नवीन पिढीला काहीच माहिती नाही. याउलट 'वैदिक'ही नसलेल्या व 'गणित'ही नसलेल्या काही क्लृप्त्या 'वैदिक गणित' मानून त्यालाच आपला वारसा मानण्याचं खूळ समाजात वेगानं पसरतं आहे. चरकसंहितेचा आधार घेऊन सूक्ष्मकणांवर आणि भस्मांवर संशोधन करणार्‍या नॅनोशास्त्रज्ञांचं, किंवा आवळ्याच्या रसामुळे गॅमा किरणांपासून होणारी हानी कमी होऊ शकते, असं संशोधन करणार्‍या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचं काम बघण्या-वाचण्यापेक्षा आपण ’गणपती आणि प्लास्टिक सर्जरी’ यांबद्दल बोलतो. याची परिणती आपल्या खर्‍याखुर्‍या ठेव्यावर प्रेम करणारी संयत राष्ट्रभक्ती सोडून एक भलताच आक्रमक व अनिष्ट राष्ट्रवाद वेगानं मूळ धरू लागण्यात होत आहे.

छद्मविज्ञानाला नाकारणं म्हणजे धर्माला नाकारणं आणि तसं करणं म्हणजे देशद्रोह अशीही विचारधारा मूळ धरू पाहत आहे. विज्ञानाची सांगड सातत्यानं धर्म आणि अध्यात्म यांच्याशी घातली जात आहे. धार्मिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन समांतर धारा आहेत, आणि त्या तशाच असाव्यात. धार्मिक ग्रंथांमधल्या साहित्यांत विज्ञान शोधण्याच्या प्रयत्न सगळ्याच धर्मांमध्ये केला जातो. पण विज्ञान आणि धर्म यांच्या आपल्या आयुष्यातल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. विज्ञानाचा परीघ मोठा आणि सर्वसमावेशक आहे. त्याची तुलना कोणत्याही धर्माशी करून आपण विज्ञानाचं कार्य आणि व्याप्ती या दोहोंवर अन्याय करतो. पण विज्ञान आणि धर्म या दोहोंसाठी हानिकारक असा एक मानवी दुर्गुण आहे - असहिष्णुता.

अ‍ॅरिस्टोटल म्हणाला होता - एखादी गोष्ट पटत नसली तरी तिचा सगळ्या बाजूंनी विचार करणं, हे सुविद्य मनाचं लक्षण आहे. असहिष्णुता ही जशी सगळ्या धर्मांच्या मूलभूत शिकवणींवरच घाला घालते, तशीच ती वैज्ञानिक तपासाच्या पायावरही आघात करते. धार्मिक असहिष्णुतेमुळे हिंसाचार होतो, शांतता भंग होते. बौद्धिक असहिष्णुतेमुळे विज्ञानाचं नुकसान होतं. विज्ञानाची व्याप्ती मोठी असली तरी वैज्ञानिक होण्याआधी बरेचदा माणसाच्या मनावर धार्मिक संस्कार झालेले असतात. त्यातूनच विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालायचा मोह निर्माण होतो. पण धार्मिक शिकवणीनं मन खुलं झालं असेल, तरच ते विज्ञानाला पोषक बनू शकतं. धार्मिक शिकवणीनं बंद झालेलं असहिष्णू मन हे विज्ञानासाठी धोकादायक आहेच, शिवाय धार्मिक संस्कारांच्या अंतिम ध्येयाला, म्हणजे वैयक्तिक मनःशांती आणि समाधान यांनासुद्धा असं मन पोषक नाही.

सहिष्णुतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वत:च्या श्रद्धेला असलेली संशयाची किनार. ही संशयाची किनार आपण स्वत:च द्यायची असते. स्वत:च्याच श्रद्धेकडे किंचित संशयानं, कणभर अविश्वासानं पाहणं म्हणजे तारेवरची कसरत. पण ही कसरत कशी करायची, हे विद्न्यानाकडून शिकता येतं. अशी धार्मिक श्रद्धा आपोआप सहिष्णुतेचा कित्ता गिरवते.

सारासार आणि तारतम्यानं विचार करणं या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा होत. आपल्या आसपास होणार्‍या घटनांचे अर्थ लावताना त्यात हा सारासार विचार करता आला पाहिजे. हा अर्थ लावताना आपले पूर्वग्रह व आपल्या श्रद्धा खुलेपणानं मान्य करणं आवश्यक आहे. एखादं अनुमान काढताना आपली गृहितकं कोणती, ही बाबतर सतत तपासून पाहावी लागेल. त्या गृहितकांवर कोणी आक्षेप घेतला, तर त्या आक्षेपांना उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर देणं व प्रतिक्रिया देणं यांत महदंतर आहे. प्रतिक्रिया देण्यात केवळ स्वतःच्या मतांच्या कातडीचा बचाव आहे. उत्तर देण्यात इतरांनी मांडलेल्या मुद्द्यांवर मनन अपेक्षित आहे. या मननात ’आपण ज्या गोष्टींना पुरावा समजतोय त्यांना पुरावा का मानले जावे?’, ’आपली गृहितकं कोणती?’, ’आपण जो निष्कर्ष काढला आहे, त्याच्या मर्यादा कोणत्या?’ या प्रश्नांची उत्तरं शोधणं अंतर्भूत आहे... हे खरं संशोधन होय. या गोष्टी विज्ञानजगतात कराव्या लागतात, त्यामुळे आपण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आणि या खंडनमंडनातून निघतं त्याला (आणि त्यालाच) संशोधनाचा दर्जा प्राप्त होतो.

जोपर्यंत समाजमानसिकतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात स्वीकारला जात नाही, तोपर्यंत समाजशास्त्र, मानव्यशास्त्रे इत्यादी विद्वत्‌शाखांमध्येही मूलगामी, समाजोपयोगी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन व त्याचे उपयोजित फायदे निर्माण होणं अशक्य आहे. विज्ञानसंशोधनाला पाठिंबा देताना त्यात सामाजिक व मानव्यशास्त्रेही अंतर्भूत आहेत, हे विसरता कामा नये. कारण वर्ण्य-विषय वेगळे असले, तरी संशोधन व ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया यांचे निकष व घटक समानच असतात.

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे सर्वसामान्य नागरिकाला नक्कीच जमू शकतं. किंबहुना, असा दृष्टिकोन बाळगून सारासार विश्लेषण करता येणं, ही आपल्या हितासाठी आवश्यक गोष्ट ठरते. शास्त्रीय दृष्टिकोनाअभावी तरतमभाव येत नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला सर्वच शास्त्रांचं ज्ञान नसतं, ते आवश्यकही नाही. आवश्यक आहे ती शास्त्रीय विचार करण्याची क्षमता आणि त्याहीपुढे जाऊन तसा विचार सातत्यानं करण्याची सवय. ज्या समाजाच्या नागरिकांना अशा पद्धतीच्या सारासारबुद्धीचं महत्त्व पटत नाही, त्या समाजाला अज्ञानामध्ये जखडून ठेवणं सोपं असतं, कारण अशा समाजाला वि-ज्ञान व छद्मज्ञान यांत फरक करता येत नाही. शास्त्रीय दृष्टिकोन न बाळगणारं राष्ट्र भावनिकतेच्या आहारी जाण्यात सुख मानतं. अशा राष्ट्राच्या अस्मितांची जपणूक न होता त्या अस्मितांचं रूपांतर दुराग्रहांमध्ये होतं. विज्ञान वापरणं म्हणजेच वैज्ञानिक विचारपद्धतीतून येणारी सारासारबुद्धी वापरणं नव्हे. केवळ विज्ञान वापरणारा समाज ज्ञानाधिष्ठित राहतो, पण ज्ञानोपासक बनत नाही. आपल्या संशोधनाचं, आपल्या मतांचं साक्षेपी खंडन होणं, हा आपल्या बुद्धीवर घेतला गेलेला संशय नसून सत्यान्वेषणाची ती अतिशय सशक्त पद्धत आहे. हे कळलं नाही तर ज्ञान / सत्य ’असं असतं’ आणि ’असं असायला पाहिजे’ यांतला फरकसुद्धा कळत नाही. हा भेद जेव्हा एखाद्या नागरिकसमूहाला कळेनासा होतो, त्या नागरिकसमूहात, पर्यायानं त्या राष्ट्रात 'सत्य काय' हे उचित व यथायोग्य अन्वेषणाआधीच ठरवलं जातं. अशा सत्यासाठी 'सत्यमेव जयते'चा घोष करणं ही त्या राष्ट्रानं स्वतःचीच केलेली घोर फसवणूक ठरते.

आपल्या राज्यघटनेतलं ५१अ हे कलम आपल्याला ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांचा आदर्श बाळगायला, आपल्या देशातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं जतन करायला, पर्यावरणाचं संवर्धन करायला, धर्म-जात-भाषा-प्रांत यांत भेद न करता बंधुभाव वृद्धिंगत करायला सांगतं. घटनेचं हेच कलम वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोधक वृत्ती विकसित करणं, हे आपलं मूलभूत कर्तव्य असल्याचं आपल्याला सांगतं.

भारतीय राज्यघटनेत सांगितल्याप्रमाणे या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जावे, प्रश्न विचारण्याची, शंका घेण्याची प्रत्येकाला मुभा असावी, धर्म-जात-वंश-भाषा-लिंग यां भेदांपलीकडे जाऊन आचार-विचारस्वातंत्र्य असावं, अशी आमची इच्छा आहे.

आमच्या या मागण्यांसाठी आम्ही व आमच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ - शिक्षक - विद्यार्थी - वैज्ञानिक मूल्यांचा आदर राखणारे नागरिक येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी देशभरात संचलनात सहभागी होणार आहेत.

आमचा हा लढा कोणत्याही एका सरकारविरुद्ध किंवा राजकीय पक्षाविरुद्ध नाही. आमची बांधिलकी वैज्ञानिक दृष्टिकोनाशी, लोकशाहीशी आणि सहिष्णुतेशी आहे. आम्हांला ज्यांबद्दल मनस्वी आदर आणि प्रेम आहे, अशा वैज्ञानिक मूल्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.

आपला पाठिंबा आम्हांला मिळाल्यास व आपणही या संचलनात सहभागी झाल्यास आमच्या लढ्यास बळकटी येईल.

धन्यवाद.

डॉ. आदित्य कर्नाटकी (भास्कराचार्य)
डॉ. आरती रानडे (रार)
केतन दंडारे (अरभाट)
डॉ. चिन्मय दामले (चिनूक्स)
डॉ. जिज्ञासा मुळेकर (जिज्ञासा)
वरदा खळदकर (वरदा)
डॉ. सई केसकर (सई केसकर)
सत्यजित सलगरकर (आगाऊ)

***

या मसुद्यातल्या डॉ. चिन्मय दामले यांच्या मतांशी मायबोली.कॉमचा संबंध नाही. ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खनिज तेलाच्या अट्टहासापाई मध्यपुर्वेतील अनेक देशांना अक्षरशः मध्ययुगात लोटलेल आहे !!!
Submitted by मिलिंद जाधव on 11 August, 2017 - 04:41>>>>>हे तुम्हाला कुणी सांगितले ? की काही बाही ठोकून द्यायचे.
ज्या मध्यपुर्वेत खनीज तेलाला " सैतानाचे मुत्र" असे समजले जायचे त्या खनीज तेलाची किंमत काय आहे हे विज्ञानानेच त्यांना पटवून दिले आहे.आज मध्यपुर्वेत शिस्तीत राहणारे देश प्रचंड श्रीमंत आहेत हे विज्ञानाने दिलेली देणगीच आहे.पेट्रोडॉलर ही संकल्पना ठाउक नाही काय???

जीएस - सात ओगस्ट विससतरा शून्य शून्य एकवीस - एवोर्ड वपसिचि दारु अन परशासकिय आयडी - +++९९९९९९९९ आनुमोदक

<<<"तुम्ही प्रश्न विचारुच कसे शकता" >>>
कसे शकता? कसे हा काय प्रश्न आहे? विचारलेच आहे काहीतरी करून.
फक्त मला वाटले की हा प्रश्न विचारण्यात काही छुपा विरोध असेल, विशेषतः सरकारने जनतेच्या पैशातून शास्त्रज्ञांना एव्हढे पैसे देऊ नयेत असेजतुम्हाला वाटत असेल, म्हणून मी रागावून लिहीले. चूक सर्वस्वी माझीच, क्षमा मागतो.
मला वाटते त्या शास्त्रज्ञांनी मोर्चा काढला तर काही बिघडत नाही - त्यांना एव्हढी नावे ठेवायला नकोत.

नानाकळा,
तुमच्या आजच्या सकाळी १०:२० ला लिहिलेल्या लेखातील सर्व मते मला पटली.

>>we will reply to all the relevant queries as and when we could<<

पण त्यामुळे चर्चेचा फ्लो बिघडतो असं नाहि वाटंत? सुमुक्ताने विचारलेल्या प्रश्नानंतर एव्हढे प्रतिसाद आलेले आहेत कि त्यामुळे मूळ चर्चेचा रोख बदलु शकतो. तुमच्या ७-८ जणांपैकि कोणिहि उत्तर देऊ शकलं असतं, (अन्लेस तुम्हि आपापसात ठरवलंय कि प्रत्येक उत्तर कोरॅबोरॅट करुनच द्यायचं). तुम्ही सगळे विज्ञानवादि असल्याने मतांत एकवाक्यता असायला हवि, मग उत्तर एकाने दिलं काय किंवा सगळ्यांनी मिळुन दिलं काय, काय फरक पडतो? बघा पटतं का?.. Happy

राज, या फोरम वर "विज्ञानवादी " या id ला सायन्स मार्च चा ऑफिशियल प्रतिनिधी मानले जाते आहे, (जरी त्यांनी क्लिअर केले आहे कि ते नाहीयेत)
मार्च एप्रिल मध्ये का नाही केला पासून बरेच असंबद्ध प्रश्न त्यांना विचारले जात आहेत.
आशा परिस्थितीत एकाने दिलेले उत्तर त्या सगळ्यांच्या विरुद्ध वापरले जाईल याची सार्थ भीती आहे,
त्यामुळे विज्ञानवादी id ने दिलेली उत्तरे पूर्ण विचार करून देण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे असे मला वाटते.

जे प्रश्न गाभ्याशी तितके सुसंबद्ध नव्हते त्याची वेग वेगळी उत्तरे सई किंवा चिनुक्स ने दिलीच आहेत,
Core प्रश्नांना त्यांनी एकत्र उत्तरे द्यावीत हेच योग्य

>>मार्च एप्रिल मध्ये का नाही केला पासून बरेच असंबद्ध प्रश्न त्यांना विचारले जात आहेत.
आशा परिस्थितीत एकाने दिलेले उत्तर त्या सगळ्यांच्या विरुद्ध वापरले जाईल याची सार्थ भीती आहे,<<

मला नाहि वाटत तसं; आणि असंबद्ध प्रश्नांना इंडिविज्युली बगल देणं कठिण आहे का? एनीवे, उत्तरं वेळेवर मिळत नसल्यानं प्रश्नांचं महत्व्/गांभिर्य डायलुट होतंय असं मला वाटलं; वंडर इफ आयॅम दि ओन्ली वन कंसर्ड...

आता ज्या मुद्द्यांबद्दल काही शंका आहेत त्याबद्दलः

(३) शिक्षणपद्धतीत फक्त वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या विचारांचा अंतर्भाव असावा.

(४) सरकारची धोरणं ही पुराव्यांनी शाबित विज्ञानावर आधारित असावीत.

>>> मूळ लेखात हे दोन मुद्दे आहेत. जरा संदर्भाने वाचले तर असे जाणवते की फक्त "Relevant" गोष्टींबद्दल हे आहे. म्हणजे "एखादे औषध एखाद्या आजाराला उपाय म्हणून वापरता येते","भारतात प्लॅस्टिक सर्जरी पुरातन काळात होत होती", "भारतात अमुक वर्षांपासून लोखंडाचा वापर होत आहे" - यासारखी संशोधनावर अवलंबून असणारी विधाने ही पुराव्याशिवाय नसावीत - असा उद्देश आहे.

पण तो शब्दशः घेतला, तर गोंधळ उडतो. आपले प्राचीन ग्रंथ, जुन्या चालीरीती, पुराणातील गोष्टी यांचे उल्लेख शाळेत शास्त्र/गणिताच्या नाही पण इतर पुस्तकांत अनेकदा वापरले जात असतील. ते सगळे काढून टाकायचे का? या लेखाचा उद्देश नक्कीच तो नसेल. पण हे मुद्दे जसे लिहीले गेले आहेत ते संदिग्ध आहे.

#४ बद्दलही तसेच. उदया जर सरकारने ठरवले की आपल्याकडे प्रचलित जुनी औषधे, वैदू वगैरे लोकांची त्या त्या ठिकाणी अनेक लोक वापरत असलेली औषधे शास्त्रीय कसोटीवर पारखून प्रमाणित करून घ्यायची, (हे सरकारने खरेच करावे), तर ते धोरण #४ मधे कोठे बसते? हे धोरण ठरवायला कोणताच पुरावा उपलब्ध नसेल. पण तरीही हे करणे योग्य आहे.

>>>>४ बद्दलही तसेच<<<<

धार्मिक स्थळे अस्तित्वात ठेवायची की नाही ह्याबद्दल निर्णय घेता येईल का एखाद्या सरकारला भारतात? जर मानवी समस्या देव सोडवू शकतो हे विज्ञानाने सिद्धच करता येत नाही तर तमाम धार्मिक स्थळे जमीनदोस्त करावी लागतील. त्यानंतर होईल तो उद्रेक विज्ञानाच्या सहाय्याने शांत करता येणार नाही.

आपल्याकडे प्रचलित जुनी औषधे, वैदू वगैरे लोकांची त्या त्या ठिकाणी अनेक लोक वापरत असलेली औषधे शास्त्रीय कसोटीवर पारखून प्रमाणित करून घ्यायची,

>> डॉ. रवी बापट यांचे यासंदर्भात काम चालू आहे असे वाचलंय.. त्यांच्या पुस्तकात.

पारंपरिक ज्ञानात औषधी म्हणून जे वापरलं जातं त्याचे विझिबल रिझल्ट्स सातत्याने दिसल्यास फार्मा कंपन्याच त्यावर रिसर्च करायला सुरुवात करतात, नेमका परिणाम देणारा घटक किंवा फॉर्मुला शोधून वेगळा करुन त्याचे आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर घासून पुसून क्लिनिकल टेस्ट होतात. प्रमाणित होऊन ते औषध सामान्य वापरासाठी बाजारात येते. हळदीच्या पेटंटसाठीची लढाई आठवत असेल. आणखी अनेक वनौषधी आहेत.

पण गोमुत्राबद्दल तसे काहीही नाहीये. केवळ हो ला हो करुन एखाद्या गोष्टीविषयक प्रेम आदर श्रद्धा वाढल्या की काय होतं याचं गोमुत्र हे उदाहरण आहे. एखाद्या बाबाबुवाचे पाय धुवून तेही पाणी पिणारे लोक आहेत. त्यामुळे आजार बरे होतात अशीही श्रद्धा असते लोकांची. मग श्रद्धा आहे म्हणून त्या पाण्याचेही रिसर्च करायचे का?

पारंपरिक ज्ञान व पारंपारिक मान्यता/श्रद्धा ह्या भिन्न बाबी आहेत. त्यात गल्लत करणे सर्वथा महागात पडू शकते. केवळ पारंपरिक हे बिरुद लावून ज्ञानाला मिळालेल्या अधिष्ठानाचा गैरफायदा श्रद्धा/मान्यता घ्यायला लागल्या तर हे विचित्र होइल. त्यासाठी ज्ञान की मान्यता ह्याचे पृथक्करण होऊन मग त्यावर संशोधन झाले तर हरकत नसते. तसे पृथक्करण करायला कोणाचीही हरकत नाहीये. त्याबद्दल -गोमुत्राचे संशोधन योग्य त्या संस्थेत करावे- इथे अनेकांनी सहमती दर्शवली आहे

मुद्दा क्र ४ बद्दल :
शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारवर पॅकेज जाहीर करायचा दबाव आला तर सरकार विज्ञानाच्या आधारावर काय निर्णय घेईल ? शेतकर्यांबद्दल सरकार बांधील असेल तर समाजातल्यां ईतरांच काय ?

बेफि,

जर मानवी समस्या देव सोडवू शकतो हे विज्ञानाने सिद्धच करता येत नाही तर तमाम धार्मिक स्थळे जमीनदोस्त करावी लागतील.
>>> असले तिरपागडं लॉजिक केवळं कट्टर धार्मिकच लावू शकतात.... परत तुम्ही इथे 'विज्ञानवादी कसे क्रूर आणि अमानुष असतात' असेच पालुपद आळवत आहात.

विज्ञानवादी विचारांचा प्रसार झाल्यास 'देव अस्तित्वात नाही मग कशाला मंदिरात जा, पुजा करा, देणग्या द्या' असे प्रश्न उपस्थित होऊन लोक मंदिरे त्यागतील. त्यांना जाणून बुजून जमीनदोस्त करायची गरजही येणार नाही. ते संयुक्तिक राहणार नसतील तर पडले काय कि बुडले काय कोण त्रास करुन घेईन...?

विज्ञानवादी म्हणजे धार्मिक लोकांचे शत्रु असा जो सूर तुम्ही लावलाय तो प्रचंड चुकीचा आहे, हे तुम्हीही जाणत असालच तरी हा पवित्रा घेऊन इथे परत परत तेच मांडत आहात हे जरा संशयास्पद होत आहे.

पण फार्मा कंपन्यांनी अजून हात लावलेला नाही म्हणून पारंपारिक औषधांची माहिती नष्ट होणेही बरोबर नाही. कंपन्यांना कमर्शियल इण्टरेस्ट पासून ते इतर अनेक फॅक्टर्स असतात. दुसरे म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल असे ही नाही. त्याहीपेक्षा एखाद्या वैदूचे औषध त्यांच्या सर्वात जास्त फायदा देणार्‍या औषधाची विक्री गोत्यात आणणारे असेल तर ते हात सुद्धा लावणार नाहीत. अशा बाबतीत सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा.

पुण्यात सदाशिव पेठेतील ते काविळीवरचे औषध, संभाजी पार्क जवळ एक कोणीतरी वैदू की वैद्य आणखी कशावर तरी औषध देतो असे ऐकले आहे, ते बेळगाव जवळ डायबेटिस चा इलाज करणारे, हैदराबादचा तो मासा, म्हैसूर का कोठेतरी ब्लॉकेज काढच्याचा इलाज असलेले - या सर्वांबद्दल लोकांकडून ऐकलेली anecdotal उदाहरणे आहेत. ती नक्कीच संशोधन करण्याएवढी सबळ आहेत. यातली काही थेट ओळखीच्यांकडून पाहिलेली आहेत. आणि नाहीतरी लोक हे उपाय करतच राहणार आहेत, मग त्यापेक्षा एकदा संशोधन झालेलेच चांगले.

ज्या गोष्टी पारंपारिक औषधे म्हणून एनीवे वापरली जात आहेत त्याबद्दल हे.

>>>>असले तिरपागडं लॉजिक केवळं कट्टर धार्मिकच लावू शकतात.... परत तुम्ही इथे 'विज्ञानवादी कसे क्रूर आणि अमानुष असतात' असेच पालुपद आळवत आहात.<<<<

मी विज्ञानवादी ह्या संयुक्तपणे चालवल्या जाणार्‍या आय डी ला उद्देशून ते विचारलेले आहे. तुम्ही त्याचे उत्तर द्यायची जबाबदारी ओढून घेता आहात. तसे करताना आदळ आपटही करू पाहता आहात. पण ते असो!

विज्ञानवादी क्रूर असतात असे मी कुठेही म्हणालेलो नाही.

लॉजिक तिरपागडं नाही. शासनाने जर विज्ञानाधारीत धोरणेच अंगिकारायची असे ठरवले तर कोणत्याही धर्माचा देव ही संकल्पना हद्दपार करावी लागेल. लोकं स्वतःहून देवदर्शन त्यागतील हा भाबडा आशावाद झाला.

>>>>विज्ञानवादी म्हणजे धार्मिक लोकांचे शत्रु असा जो सूर तुम्ही लावलाय तो प्रचंड चुकीचा आहे, हे तुम्हीही जाणत असालच तरी हा पवित्रा घेऊन इथे परत परत तेच मांडत आहात हे जरा संशयास्पद होत आहे.<<<<

विज्ञानवादी म्हणजे धार्मिक लोकांचे शत्रू हा सूर मी लावलेलाच नाही. 'कट्टर विज्ञानवाद' हा 'कट्टर धार्मिकतेसारखाच' असेल असे मी म्हणत आहे.

दोन्ही विचारप्रणालींनी आपापल्या चांगल्या गोष्टींमध्ये बॅलन्स आणावा इतकेच म्हणणे आहे.

बेफि, मिलिंद जाधव - ते सगळे विज्ञानाच्या कक्षेबाहेरचे आहे. #३ आणि #४ हे त्याबद्दल नाही. ते या लेखात क्लिअरली आलेले नाही. मात्र शेताची पूजा करणार्‍या शेतकर्‍यांना जर एक टक्का कमी व्याज लावायचे ठरवले तर ते विज्ञानाशी फारकत घेणारे असेल Happy

धर्म/श्रद्धा आणि विज्ञान कोठे स्वतंत्र असू द्यावे याचे एक उदाहरण नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप वर पाहिले.
घरातील मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करावा असे ज्यांना वाटते त्यांनी नक्कीच तो करावा. मी ही करतो. मला वाटते म्हणून करतो.

पण कोणीतरी एक "शास्त्रीय" लेख लिहीला की हे कसे शास्त्राने योग्य म्हणून सांगितलेले आहे. सगळा गोंधळ इथे आहे. कारण असे लेख लिहीणारे त्यांच्या डोक्यातील कल्पना वापरून ते लिहीतात, त्याचा विज्ञानाशी अजिबात संबंध नसतो. ते शास्त्र म्हणून जे लिहीतात त्याकरताच बहुधा मूळ लेखातील "छद्मविज्ञान" शब्द वापरलेला आहे.

पण फार्मा कंपन्यांनी अजून हात लावलेला नाही म्हणून पारंपारिक औषधांची माहिती नष्ट होणेही बरोबर नाही. कंपन्यांना कमर्शियल इण्टरेस्ट पासून ते इतर अनेक फॅक्टर्स असतात. दुसरे म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल असे ही नाही. त्याहीपेक्षा एखाद्या वैदूचे औषध त्यांच्या सर्वात जास्त फायदा देणार्‍या औषधाची विक्री गोत्यात आणणारे असेल तर ते हात सुद्धा लावणार नाहीत. अशा बाबतीत सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा.
>> तुमचा मुद्दा रास्त आहे. पण यावर वकीली पद्धतीने बरीच चर्चा होऊ शकेल. उदा. टॅमीफ्लु नामक गोळी. या एकाच उदाहरणात तुम्ही उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांची उत्तरे आहेत.

पुण्यात सदाशिव पेठेतील ते काविळीवरचे औषध, संभाजी पार्क जवळ एक कोणीतरी वैदू की वैद्य आणखी कशावर तरी औषध देतो असे ऐकले आहे, ते बेळगाव जवळ डायबेटिस चा इलाज करणारे, हैदराबादचा तो मासा, म्हैसूर का कोठेतरी ब्लॉकेज काढच्याचा इलाज असलेले - या सर्वांबद्दल लोकांकडून ऐकलेली anecdotal उदाहरणे आहेत. ती नक्कीच संशोधन करण्याएवढी सबळ आहेत. यातली काही थेट ओळखीच्यांकडून पाहिलेली आहेत. आणि नाहीतरी लोक हे उपाय करतच राहणार आहेत, मग त्यापेक्षा एकदा संशोधन झालेलेच चांगले.
>> नक्कीच व्हावे की. यावरही कोणा विज्ञानवादीला आक्षेप नसावा. पण त्याचे असे आहे की विद्यमान सरकार ह्या गोष्टींना प्राधान्य न देता पंचगव्य वगैरे बनचुकेपणा करत पोलरायझेशन करत आहे.

जस्ट एक नोट - हे वरचे तुम्हाला उत्तर किंवा विरोध म्हणून लिहीलेले नाही. या मोर्चाला व यातील काही मुद्द्यांना सपोर्ट करणारे लोक धर्मविरोधी, श्रद्धाविरोधी आहेत किंवा आपल्या जुन्या चांगल्या गोष्टींना तुच्छ लेखणारे आहेत असा समज होउ नये म्हणून ती उदाहरणे दिली.

>>>>पण कोणीतरी एक "शास्त्रीय" लेख लिहीला की हे कसे शास्त्राने योग्य म्हणून सांगितलेले आहे. सगळा गोंधळ इथे आहे. कारण असे लेख लिहीणारे त्यांच्या डोक्यातील कल्पना वापरून ते लिहीतात, त्याचा विज्ञानाशी अजिबात संबंध नसतो. ते शास्त्र म्हणून जे लिहीतात त्याकरताच बहुधा मूळ लेखातील "छद्मविज्ञान" शब्द वापरलेला आहे.<<<<

म्हणूनच मागण्यांना पाठिंबा दर्शवला.

पण ह्या भोंगळ, भोंदू आणि स्वार्थाने बरबटलेल्या कल्पनांना विज्ञानवादाने नामशेष करण्याची व्याप्ती वाढत वाढत 'देव आणि देवस्थाने हवीत कशाला' ह्या मागणीपर्यंत जाऊ शकतात असे म्हणायला स्वातंत्र्य असावे की?

ईंग्लिश कॅलेंडर सारखी बेसिक, जगन्मान्य गोष्टंही अजून भारतीय समाजाने पूर्णपणे आत्मसात केलेली नाही. तर बाकी धर्म, श्रद्धा बाजुला सारून सगळ्या गोष्टीत विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवणे वगैरे तर फारच मोठी अपेक्षा आहे.
बहुसंख्य सुशिक्षित जनतेची अजूनही तिथी, देवाचे वार, मुहुर्त, जन्मवेळ, पंचांग, पत्रिका, ग्रहस्थिती, ग्रहण, शुभवेळ, ऊपवास वगैरे ईलॉजिकल गोष्टी सोडायची तयारी नाही. नुसते घड्याळ आणि ईंग्लिश कॅलेंडर एनफोर्स करूनही अनेक ईलॉजिकल गोष्टींना तिलांजली देता येईल.
ग्रास रूट लेवलवरच्या अश्या छोट्या चेंजेसचे मोठे पॉझिटिव ईफेक्ट बघायला मिळतात.

घराघरातले कालनिर्णय जाऊन फक्तं तारीख आणि वार दाखवणारे (माल्या साहेबांनी अजूनही बरेच काही दाखवत ह्यात पुढाकार घेतला होता तर बिचार्‍यांना तडीपार व्हावे लागले.) कॅलेंडर्स यायला हवेत. पंचांग वगैरे थोतांड गोष्टी ड्रग्ज साठी टाकतात तश्या धाडी टाकून जप्तं केल्या पाहिजेत आणि त्यांची होळी केली पाहिजे.

मी विज्ञानवादी ह्या संयुक्तपणे चालवल्या जाणार्‍या आय डी ला उद्देशून ते विचारलेले आहे. तुम्ही त्याचे उत्तर द्यायची जबाबदारी ओढून घेता आहात. तसे करताना आदळ आपटही करू पाहता आहात. पण ते असो!
>> १. ज्या आयडीला विचारायचे त्याचे नावाने लिहिले नसेल तर ते त्याला उद्देशून आहे हे समजले जात नाही
२. ओपन धाग्यावर आलेल्या कोणत्याही मतावर माझे मत द्यायचा अधिकाराला ओढवून घेतलेली जबाबदारी असे उल्लेखून अपमानित करत आहात
३. आदळआपट करु पाहता म्हणजे काय? कुणाची होते आहे इथे आदळआपट? तुमची?

विज्ञानवादी क्रूर असतात असे मी कुठेही म्हणालेलो नाही.
>> विज्ञानवादी काय करतील याबद्दल च्या तुमच्या संकल्पना हेच सूचित करत आहेत.

लॉजिक तिरपागडं नाही. शासनाने जर विज्ञानाधारीत धोरणेच अंगिकारायची असे ठरवले तर कोणत्याही धर्माचा देव ही संकल्पना हद्दपार करावी लागेल. लोकं स्वतःहून देवदर्शन त्यागतील हा भाबडा आशावाद झाला.
>> आपल्या राज्यघटनेत वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार, प्रचार, प्रसार केला पाहिजे असे तत्त्व आहे, नवीन नाय काही! कोणत्याही देवाची संकल्पना ही सरकारने स्थापित केली नाहीये तेव्हा त्यांनी हद्दपार वगैरे बिनकामाच्या गोष्टी करण्याचा प्रश्नच नाही. बाकी चालुद्या!

>>>>विज्ञानवादी म्हणजे धार्मिक लोकांचे शत्रु असा जो सूर तुम्ही लावलाय तो प्रचंड चुकीचा आहे, हे तुम्हीही जाणत असालच तरी हा पवित्रा घेऊन इथे परत परत तेच मांडत आहात हे जरा संशयास्पद होत आहे.<<<<

विज्ञानवादी म्हणजे धार्मिक लोकांचे शत्रू हा सूर मी लावलेलाच नाही. 'कट्टर विज्ञानवाद' हा 'कट्टर धार्मिकतेसारखाच' असेल असे मी म्हणत आहे.
>>> कट्टर विज्ञानवाद असे काही नसते. असेल तर पुरावे द्या. कट्टर धार्मिकेतेचे ढिगभर पुरावे मिळतील....

दोन्ही विचारप्रणालींनी आपापल्या चांगल्या गोष्टींमध्ये बॅलन्स आणावा इतकेच म्हणणे आहे.
>> बॅलन्स हा माणसाने स्वतःमध्ये आणावा, त्याला धर्म किंवा विज्ञानवाद काही करु शकत नाही. धर्म असो की विज्ञान हे सुरीसारखे आहे. डॉक्टर रुग्णाला बरे करायला वापरेन तर गुंड वाईट करायला.... त्यामुळे माणूस कसाय त्यावर अवलंबून आहे बॅलन्स..

बाकी. असो.

तुम्हाला उत्तरे देणे थांबवत आहे. धन्यवाद!

>>शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारवर पॅकेज जाहीर करायचा दबाव आला तर सरकार विज्ञानाच्या आधारावर काय निर्णय घेईल ? शेतकर्यांबद्दल सरकार बांधील असेल तर समाजातल्यां ईतरांच काय ?>> जाधव, माफ करा पण विज्ञान म्हणजे काय हे तुम्हाला समजलेले नाही. विज्ञान म्हणजे प्रयोग आणि निरिक्षणे करुन विश्वातील भौतिक आणि जैविक वस्तू आणि घटनांचा पध्तशीरपणे केलेला अभ्यास. विज्ञानवादी किंवा इतर कोणीही 'विज्ञान यच्चयावत प्रश्न सोडवेल' असा दावा कधीही केलेला मी वाचलेला नाही.

शासनाने जर विज्ञानाधारीत धोरणेच अंगिकारायची असे ठरवले तर कोणत्याही धर्माचा देव ही संकल्पना हद्दपार करावी लागेल. >> का बरं?

'कट्टर विज्ञानवाद' हा 'कट्टर धार्मिकतेसारखाच' असेल >> मला याच्या पुर्ण विरोधात वाटतं. कट्टर विज्ञानवादी हा जसे 'खरे संत' असतात तसा सोशिक, सगळे तावून सुलाखुन घेणारा .. कदाचित हायझेनबर्ग यांच्या गोष्टीतल्या डॉ करीं सारखा असेल. अगेन हे सिमिली म्हणून म्हटलय, शब्दशः घेऊ नका. कट्टर धार्मिकता ही माथेफिरुला प्रतिशब्द आहे. जी इतके दिवस वहाबी इ. पंथात होती, पण हल्ली गोरक्षक इ. प्रकार वाचल्या पासुन माझ्या धर्मातही शिरते आहे असं वाटतय.

या मोर्चाला व यातील काही मुद्द्यांना सपोर्ट करणारे लोक धर्मविरोधी, श्रद्धाविरोधी आहेत किंवा आपल्या जुन्या चांगल्या गोष्टींना तुच्छ लेखणारे आहेत असा समज होउ नये म्हणून

>>> नक्कीच! मी स्वतः पारंपारिक ज्ञानाचा (मान्यता/अंधश्रद्धांचा नव्हे) पुरस्कर्ता आहे. त्याबद्दल अधिक संशोधन व्हायलाच हवे या मताचा आहे.

अमितव,

मी विज्ञानवाद ह्यावर बोलत आहे आणि तुम्ही विज्ञान ह्यावर! विज्ञान न्युट्रल असतं पण विज्ञानवाद ही एक विचारसरणी आहे. तिला स्वभावप्रवृत्ती असणार.

ओके. मी त्या न्युट्रल विज्ञानालाच सपोर्ट करतोय. हा मार्चही त्यासाठीच होता असा माझा समज आहे.
मला तुम्हाला विज्ञानवाद म्हणजे काय म्हणायचय माहित नाही. मी तो शब्द रॅशनलला प्रतिशब्द म्हणून वापरतो. पण तुमचा विज्ञानवाद भलताच कर्मठ दिसतोय. ह्या विज्ञानवादा बद्दल कुठे वाचायला मिळेल?

विज्ञानवाद प्रस्थापित व्हावा ह्यासाठी आंदोलन आहे. मागण्या स्तुत्य ठरतातच.. विज्ञानवाद प्रस्थापित होण्याच्या प्रक्रियेत विज्ञानवादींचा समुह कडवा होऊ शकेल असे म्हणायचे आहे कारण ती एक विचारसरणीच आहे. विज्ञानवाद कडवा होणेही कदाचित अभिप्रेत असेल व रास्तही असेल. पण तो कडवा विज्ञानवाद कडवेपणाने स्थापित केला जायला लागणे हे घातक आहे.

आज तो कडवा नाही म्हणून आज त्याच्याबद्दल वाचायला मिळत नाही.

कट्टर धर्मवाद घातक आहेच.

विज्ञानवादी विचारांचा प्रसार झाल्यास 'देव अस्तित्वात नाही मग कशाला मंदिरात जा, पुजा करा, देणग्या द्या' असे प्रश्न उपस्थित होऊन लोक मंदिरे त्यागतील. >>> विज्ञानवादी हा नास्तिक असलाच पाहिजे किंवा आस्तिक हा विज्ञानवादी नसतोच.... असं काही आहे का? पूजा, मंदिराला देणग्या वगैरे सोडा. अगदी मंदिरही सोडा. पण विज्ञानवाद्याने देवाचे अस्तित्व नाकारलेच पाहिजे असं आहे का? एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?

एखाद्या संशोधकाने, वैज्ञानिकाने त्याच्या अनुभवावरून (घरातल्या conditioning मुळे नव्हे) देवाचे अस्तित्व मान्य केले तर तो संशोधक किंवा वैज्ञानिक म्हणवून घ्यायला लायक नाही का?

>>> खूप चांगला प्रश्न आहे. याचे उत्तर नक्की देईन. पण इथे नाही. वेगळा धागा काढतो जरा सवडीने...

Pages