'इंडिया मार्च फॉर सायन्स' - निवेदन

Submitted by विज्ञानवादी on 6 August, 2017 - 00:16

नमस्कार,

येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये या देशातले शास्त्रज्ञ, विज्ञानशाखेचे विद्यार्थी, शिक्षक आणि वैज्ञानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र येऊन संचलन करणार आहेत. ’इंडिया मार्च फॉर सायन्स’ असं या संचलनाचं नाव आहे.

मुंबईतला कार्यक्रम दुपारी ४ वाजता ऑगस्ट क्रांती मैदानावर जमून तेथून विल्सन कॉलेजपर्यंत जायचं, असा आहे; तर पुण्यात दुपारी ५ वाजता रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गांधी पुत़ळ्यापाशी जमून तेथून कलेक्टर कचेरीजवळील आंबेडकर पुत़ळ्यापर्यंत चालत जायचं, असा कार्यक्रम आहे. याविषयी अधिक माहिती - http://breakthrough-india.org/imfs2017/index.html - या दुव्यावर मिळू शकेल.

या संचलनाला आणि चळवळीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

हे संचलन आम्ही ज्या मागण्यांसाठी करणार आहोत, त्या आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत -

(१) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या, म्हणजे जीडीपीच्या, कमीत कमी ३% इतका निधी वैज्ञानिक व तांत्रिक संशोधनास, तर कमीत कमी १०% इतका निधी शिक्षणक्षेत्रास देण्यात यावा.

(२) अवैज्ञानिक आणि प्रतिगामी विचारांच्या, तसंच धार्मिक असहिष्णुतेच्या समाजातल्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यात यावा. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी मूल्यं आणि शोधक वृत्ती ही संवैधानिक मूल्यं आचरणात आणण्यावर भर देण्यात यावा.

(३) शिक्षणपद्धतीत फक्त वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या विचारांचा अंतर्भाव असावा.

(४) सरकारची धोरणं ही पुराव्यांनी शाबित विज्ञानावर आधारित असावीत.

या मागण्यांमागची आमची भूमिका अशी -

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. पण ते तितकंसं खरं नाही. आज आपल्याला जी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांतली प्रगती दिसते आहे, ती झाली आहे कुतूहलामुळे. का, कसं आणि कशामुळे हे प्रश्न अत्यंत मूलभूत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे मूलभूत संशोधन! ज्ञानप्राप्ती हा मूलभूत संशोधनामागचा मूळ हेतू असतो. आपल्या अवतीभवती जे घडतं, त्याचा अर्थ लावण्याचं काम मूलभूत विज्ञान करतं. नव्यानं समोर येणार्‍या घटना आणि त्या घटनांमागचा कार्यकारणभाव शोधण्याचं कुतूहल यांतून विज्ञानाची प्रगती होते. ही प्रगती देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असते.

सफरचंद झाडावरून खाली का पडलं, असा विचार करताना न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला; एका पेट्रिडिशमध्ये सूक्ष्मजंतू वाढत असताना त्या डिशवर चुकून आलेल्या बुरशीनं त्या सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली आणि या निरीक्षणामागचं कारण शोधताना अलेक्झांडर फ्लेमिंगना प्रतिजैविकांचा शोध लागला; या आणि अशा अनेक सुरस कथा आपण ऐकतो. मात्र नीट विचार करता हे शोध असे एका ओळीत मावतील इतके सोपे नसतात, हे आपल्याला जाणवतं. कारण विज्ञानाच्या मूलभूत शाखांमधलं संशोधन हे पूर्वसुरींच्या संशोधनाचा आधार घेत पुढे जाणारं असतं. आज मूर्त स्वरूपात दिसणारा एखादा शोध हा कित्येक दशकांच्या संशोधनामुळे आपल्यासमोर आलेला असतो. उदाहरणार्थ, फ्लेमिंग यांना पेनिसिलीन हे काही गोळीच्या रूपात हाती लागलं नाही. फ्लेमिंग यांना पेनिसिलीन नैसर्गिकरीत्या तयार करणारी बुरशी सापडली. त्या शोधानंतर त्या बुरशीपासून पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात वेगळं करणं, पेनिसिलीनची रासायनिक रचना शोधून काढणं आणि प्रत्यक्ष माणसांवर प्रयोग, हे सारं एका माणसाचं काम नव्हतं. १९२८ साली फ्लेमिंग यांनी पेनिसिलीयम या बुरशीचा शोध लावला आणि १९४१ साली पेनिसिलीन हे द्रवरूपात रुग्णाला इंजेक्शन म्हणून उपलब्ध झालं. त्यावर आजही भरपूर संशोधन सुरू आहे.

म्हणजे मूलभूत संशोधनाची मुख्य वैशिष्ट्यं अशी सांगता येतील -

१. ज्ञानप्राप्ती / कुतूहल हा मूळ हेतू. त्यामुळे एखाद्या शोधाचा तत्काळ उपयोग असेलच, असं नाही.

२. अज्ञाताचा शोध घेताना अनेक प्रयोग अयशस्वी होणं – यशाचं अत्यल्प प्रमाण.

३. अनेको वर्षं, किंबहुना निरंतर चालणारं काम.

४. अनेकांच्या सहकार्यानं चालणारं काम.

मूलभूत संशोधनाला भरपूर पैसा लागतो. ही त्या देशाची दीर्घकालीन गुंतवणूक असते. मूलभूत संशोधनाचे फायदे लगेच दिसत नसले, तरी प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यपूर्ण आणि सुखकर, संपन्न जगण्यासाठी संशोधन व त्यावर होणारा खर्च टाळणं शहाणपणाचं नसतं. अमेरिका त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा २.७४२% वाटा विज्ञान-संशोधनासाठी राखून ठेवते. चीन आपल्या उत्पन्नाचा २.०४६% भाग संशोधनावर खर्च करतो. जगात संशोधनासाठी सर्वाधिक खर्च करणारा देश दक्षिण कोरिया असून तिथे या खर्चाचं प्रमाण ४.२९२% इतकं आहे. विकसनशील देशांमध्ये ब्राझील त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.१५% वाटा संशोधनासाठी राखून ठेवतो. भारतात हे प्रमाण ०.८% इतकं आहे.

भारतानं संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ३% भाग राखून ठेवावा, अशी मागणी गेली अनेक दशकं शास्त्रज्ञ करत आहेत. आजवरच्या एकाही सरकारनं ही मागणी पूर्ण केलेली नाही. गेल्या दोन दशकांत हा खर्च वाढवण्याची आश्वासनं तीनदा दिली गेली, मात्र मूलभूत संशोधनाचं महत्त्व आणि त्यासाठी उपलब्ध असणारा निधी यांचं आपल्या देशातलं व्यस्त प्रमाण वारंवार सत्ताधार्‍यांच्या लक्षात आणून देऊनही हा खर्च वाढवण्याच्या दृष्टीनं कार्यवाही झाली नाही. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं पूर्ण होत असताना विज्ञानासाठी भरीव आर्थिक तरतूद नसणं, हे खेदकारक आहे.

त्यातच भारतातल्या प्रमुख संशोधनसंस्थांना मिळणारा निधी कमी होत जातो आहे. संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या निधीत वाढ करण्याऐवजी देशभरातल्या संशोधनसंस्थांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं आणि संशोधनासाठी लागणारा काही निधी स्वत: उभारावा, असं सरकारचं मत आहे. त्या दिशेनं निधिकपातही लगेच सुरू झाली आहे. सीएसआयआर, म्हणजे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, त्यामुळे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संस्थेकडे संशोधनप्रकल्पांसाठी पुरेसा पैसा नाही. हीच कथा अणुऊर्जा आयोग, विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, आयआयटी, आयसर, टीआयएफआर यांचीही आहे. या संस्थांमधले अनेक संशोधनप्रकल्प सध्या आर्थिक चणचणीमुळे खोळंबले आहेत. निधिकपातीमुळे आयआयटी, आयसर अशा संस्थांमधली विविध शुल्कही वाढली आहेत.

शास्त्रज्ञांनी दरवर्षी अमूक इतकी उत्पादनं / तंत्रज्ञानं बाजारात आणावी, त्यांनी सरकारी ध्येयधोरणांशी सुसंगत असं संशोधन करावं, असंही शास्त्रज्ञांना सांगण्यात आलं आहे. मुळात उपयोजित संशोधन हे मूलभूत संशोधनाच्या खांद्यावर उभं असतं. क्वांटम भौतिकीच्या सखोल अभ्यासाअभावी आपण लहानांत लहान सेमिकंडक्टर तयार करू शकलो नसतो. पुण्यात डॉ. मुरली शास्त्री यांनी चांदीचे नॅनोकण तयार करून त्यांचा अभ्यास केला नसता, तर ’टाटा स्वच्छ’सारखं कमी खर्चातलं पाणी शुद्ध करणारं यंत्र तयार होऊ शकलं नसतं. पण बाजारपेठेसाठी केवळ काही उत्पादनं निर्माण करणं, हे प्रत्येक शास्त्रज्ञाचं काम नाही. केवळ तंत्रज्ञान-विकास हा मूलभूत संशोधनाचा उद्देश नसतो. शास्त्रज्ञांनी सरकारी धोरणं आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या आवडीचे राजकीय-सामाजिक कार्यक्रम पूर्ण करण्यासाठीच काम करणं, हे अन्यायकारक आहे. त्याच्या आवडीच्या विषयात मूलभूत संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञाला अमूकच विषयात संशोधन करायला सांगणं, किंवा त्याला तसं संशोधन करावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण करणं, हे घातक आहे.

सरकारनं दिलेल्या आर्थिक मदतीवर चालणार्‍या संशोधनसंस्थांमधल्या संशोधनामुळे देशातल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात, ही अपेक्षा योग्य आहे आणि देशातल्या अनेक संस्था त्या दिशेनं काम करतही आहेत. मात्र नवी ’स्टार्टअप्स’ सुरू होणं म्हणजे वैज्ञानिक प्रगती नव्हे. शिवाय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा किंवा टीआयएफआर अशा मूलभूत संशोधनासाठी नावाजल्या गेलेल्या संस्थांकडूनही असंच आणि इतकंच संशोधन व्हावं, ही अपेक्षा गैर आहे. या संस्थांमधल्या संशोधनावर किती पैसा खर्च झाला आणि त्यातून ’परतावा’ किती मिळाला, असा हिशेबही चुकीचा आहे. मूलभूत संशोधनावर होणारा खर्च आणि त्यातून होणारा ’फायदा’ हा एखाद्या आर्थिक वर्षातल्या नफ्यातोट्याच्या परिमाणात मोजायचा नसतो. त्या संशोधनाचे परिणाम दिसायला बराच कालावधी लागू शकतो, शिवाय त्याचं तत्काळ, ढोबळ मूल्यमापनही शक्य नसतं. कारखान्यांना आणि उद्योजकांना लावले जाणारे निकष मूलभूत संशोधनासाठी वापरणं हे नक्कीच योग्य नाही. या देशासमोर असलेले अन्नधान्याचे, आरोग्याचे प्रश्न किंवा नद्यांची आणि रस्त्यांची स्वच्छता यांसाठी तंत्रज्ञान विकसित करताना मूलभूत विज्ञानाचा बळी जाणं हितावह नाही.

देश स्वयंपूर्ण व्हावा, नवी तंत्रज्ञानं विकसित व्हावी या अपेक्षापूर्तीसाठी संशोधनाला पाठिंबा देऊन शास्त्रज्ञांना मोकळीक मिळायला हवी. विज्ञान - कला - संगीत - चित्रपट - खेळ अशा कुठल्याच क्षेत्रांतलं ’इनोव्हेशन’ आचार-विचारस्वातंत्र्याअभावी घडू शकत नाही. या बाबतीत रामानुजनचं उदाहरण बोलकं आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणित करणार्‍या रामानुजनला प्रचलित पद्धत शिकवायचा प्रयत्न हार्डीनं केला. परंतु ते मानवत नाही, हे ध्यानात येताच त्यानं पूर्ववत पद्धतीवर भर दिला. अशा परिपक्वतेची व लवचिकतेची आज गरज आहे.

विज्ञाननिष्ठ समाज हा नेहमी प्रगतिशील समाज असतो. ज्या देशांनी मूलभूत संशोधनात गुंतवणूक केली ते देश नेहमीच प्रगत झाले आहेत. अर्थात आपल्याला प्रगत व्हायचे असेल तर मूलभूत विज्ञानांतील गुंतवणुकीला पर्याय नाही.

मूलभूत संशोधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमागे निधीचा अभाव हे महत्त्वाचं कारण असलं, तरी त्या अभावामागे असलेलं वैज्ञानिक दृष्टीचा अभाव हे कारण अधिक गंभीर आहे. मूलभूत संशोधन महत्त्वाचं का, याचं उत्तर जर सामान्य जनतेला माहीत असेल, तर शास्त्रज्ञांना समाजातून आपोआप प्रोत्साहन मिळेल, शिवाय सरकारदेखील त्याकडे अधिक गांभीर्यानं बघेल. यासाठी मूलभूत संशोधनाला लोकाश्रय मिळायला हवा. विज्ञानाविषयी भारतीयांचा अत्यंत उदासीन असा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. अर्थात याचं काही अपश्रेय शासनाच्या आणि खुद्द संशोधकांच्या माथी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन आपलं संशोधन लोकांपर्यंत नेलं पाहिजे.

एकीकडे मूलभूत विज्ञानाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना छद्मविज्ञानाला राजाश्रय मिळणं ही गंभीर बाब आहे. या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची धोरणं आखणार्‍या, निर्णय घेणार्‍या आणि निधिवाटप करणार्‍या संस्था आणि संस्थाचालक छद्मविज्ञानाचा पुरस्कार करताना दिसून येतात. विज्ञानाशी संबंध नसलेल्या बिगरसरकारी संस्थाही सरकारी संशोधनसंस्थांच्या कामकाजात ढवळाढवळ करून छद्मविज्ञानाचा प्रचार करताना, त्यासाठी निधी मिळवताना दिसतात. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणं हे जागृत आणि सक्षम समाजाच्या जडणघडणीसाठी एक अत्यावश्यक बाब आहे. हे घडण्यासाठी सामान्य नागरिकांना विज्ञान म्हणजे नेमकं काय, हे समजणं जसं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे त्यांना कुठले दावे केवळ शास्त्राचा देखावा करीत आहेत, हे ओळखता येणंही गरजेचं आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांतील कालबाह्य, अतार्किक आणि प्रसंगी क्रूर अशा प्रथांना वैज्ञानिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न सतत होतो आहे. त्याचबरोबर वेद-पुराण आणि महाकाव्यं यांतला प्रत्येक संदर्भ हा शास्त्रीय आधारावरच उभा आहे, हे ठसवण्याचा जोरकस प्रयासही चालू आहे.

छद्मविज्ञानी संस्था आणि त्यांचे दावे यांचं सर्वांत महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्यांच्या राजकीय, धार्मिक अथवा सांस्कृतिक मतांचा त्यांच्या निष्कर्षांवर असलेला जबरदस्त पगडा. या मतांप्रमाणे संशोधनाचे निष्कर्ष आले नाहीत, तर त्यांच्यात अक्षम्य फेरफार केले जातात किंवा अस्तित्वात असलेल्या सिद्धांतालाच नाकारलं जातं. संशोधन करताना त्याचा निकाल आधीच ठरवून मग सुरुवात करण्याचा हा उरफाटा उद्योग आहे. आधीच ठरलेल्या निष्कर्षांना पूरक असलेली निरीक्षणं घेऊन केलेल्या वैज्ञानिक तपासणीमुळे झालेल्या नुकसानाची कितीतरी उदाहरणं आहेत.

छद्मविज्ञान हे ज्ञान आणि सत्य यांच्या मूलभूत संकल्पनेवरच हल्ला चढवत असतं. त्याचप्रमाणे खऱ्या शास्त्रीय संशोधनांवर जो पैसा आणि मनुष्यबळ खर्च होणं अपेक्षित आहे, त्याचा अपव्यय अशा निरर्थक ’शोधां’मुळे केला जातो. 'आपल्या महान, पुरातन परंपरेला सगळंच ठाऊक होतं, आपल्या पूर्वजांनी सगळेच शोध लावले होते', अशी भ्रामक अहंगंड जपणारी आणि स्वकष्टानं नवी ज्ञाननिर्मिती करण्यापासून परावृत्त करणारी घातक वृत्ती समाजात बोकाळणं, हा छद्मविज्ञानाचा सगळ्यांत मोठा धोका आहे.

भारतीय वैज्ञानिक परंपरेत अभिमान बाळगावा, अशा अनेक गोष्टी आहेत हे सत्य कुणीच नाकारणार नाही. परंतु त्या गोष्टींबद्दल न बोलता भलत्याच गोष्टींचा अभिमान बाळगावा, असा अभिनिवेश समाजात बोकाळला आहे. उदाहरणार्थ, डायोफंटाईन इक्वेशन्स सोडवण्यामध्ये ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांसारखे भारतीय गणिती पाश्चात्य गणितज्ञांपेक्षा काही शतकं आघाडीवर होते. परंतु ब्रह्मगुप्ताची 'कुट्टक' किंवा भास्कराचार्यांची 'चक्रवाल' पद्धत यांविषयी भारतीयांना किंवा आपल्या नवीन पिढीला काहीच माहिती नाही. याउलट 'वैदिक'ही नसलेल्या व 'गणित'ही नसलेल्या काही क्लृप्त्या 'वैदिक गणित' मानून त्यालाच आपला वारसा मानण्याचं खूळ समाजात वेगानं पसरतं आहे. चरकसंहितेचा आधार घेऊन सूक्ष्मकणांवर आणि भस्मांवर संशोधन करणार्‍या नॅनोशास्त्रज्ञांचं, किंवा आवळ्याच्या रसामुळे गॅमा किरणांपासून होणारी हानी कमी होऊ शकते, असं संशोधन करणार्‍या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांचं काम बघण्या-वाचण्यापेक्षा आपण ’गणपती आणि प्लास्टिक सर्जरी’ यांबद्दल बोलतो. याची परिणती आपल्या खर्‍याखुर्‍या ठेव्यावर प्रेम करणारी संयत राष्ट्रभक्ती सोडून एक भलताच आक्रमक व अनिष्ट राष्ट्रवाद वेगानं मूळ धरू लागण्यात होत आहे.

छद्मविज्ञानाला नाकारणं म्हणजे धर्माला नाकारणं आणि तसं करणं म्हणजे देशद्रोह अशीही विचारधारा मूळ धरू पाहत आहे. विज्ञानाची सांगड सातत्यानं धर्म आणि अध्यात्म यांच्याशी घातली जात आहे. धार्मिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन समांतर धारा आहेत, आणि त्या तशाच असाव्यात. धार्मिक ग्रंथांमधल्या साहित्यांत विज्ञान शोधण्याच्या प्रयत्न सगळ्याच धर्मांमध्ये केला जातो. पण विज्ञान आणि धर्म यांच्या आपल्या आयुष्यातल्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. विज्ञानाचा परीघ मोठा आणि सर्वसमावेशक आहे. त्याची तुलना कोणत्याही धर्माशी करून आपण विज्ञानाचं कार्य आणि व्याप्ती या दोहोंवर अन्याय करतो. पण विज्ञान आणि धर्म या दोहोंसाठी हानिकारक असा एक मानवी दुर्गुण आहे - असहिष्णुता.

अ‍ॅरिस्टोटल म्हणाला होता - एखादी गोष्ट पटत नसली तरी तिचा सगळ्या बाजूंनी विचार करणं, हे सुविद्य मनाचं लक्षण आहे. असहिष्णुता ही जशी सगळ्या धर्मांच्या मूलभूत शिकवणींवरच घाला घालते, तशीच ती वैज्ञानिक तपासाच्या पायावरही आघात करते. धार्मिक असहिष्णुतेमुळे हिंसाचार होतो, शांतता भंग होते. बौद्धिक असहिष्णुतेमुळे विज्ञानाचं नुकसान होतं. विज्ञानाची व्याप्ती मोठी असली तरी वैज्ञानिक होण्याआधी बरेचदा माणसाच्या मनावर धार्मिक संस्कार झालेले असतात. त्यातूनच विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालायचा मोह निर्माण होतो. पण धार्मिक शिकवणीनं मन खुलं झालं असेल, तरच ते विज्ञानाला पोषक बनू शकतं. धार्मिक शिकवणीनं बंद झालेलं असहिष्णू मन हे विज्ञानासाठी धोकादायक आहेच, शिवाय धार्मिक संस्कारांच्या अंतिम ध्येयाला, म्हणजे वैयक्तिक मनःशांती आणि समाधान यांनासुद्धा असं मन पोषक नाही.

सहिष्णुतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वत:च्या श्रद्धेला असलेली संशयाची किनार. ही संशयाची किनार आपण स्वत:च द्यायची असते. स्वत:च्याच श्रद्धेकडे किंचित संशयानं, कणभर अविश्वासानं पाहणं म्हणजे तारेवरची कसरत. पण ही कसरत कशी करायची, हे विद्न्यानाकडून शिकता येतं. अशी धार्मिक श्रद्धा आपोआप सहिष्णुतेचा कित्ता गिरवते.

सारासार आणि तारतम्यानं विचार करणं या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा होत. आपल्या आसपास होणार्‍या घटनांचे अर्थ लावताना त्यात हा सारासार विचार करता आला पाहिजे. हा अर्थ लावताना आपले पूर्वग्रह व आपल्या श्रद्धा खुलेपणानं मान्य करणं आवश्यक आहे. एखादं अनुमान काढताना आपली गृहितकं कोणती, ही बाबतर सतत तपासून पाहावी लागेल. त्या गृहितकांवर कोणी आक्षेप घेतला, तर त्या आक्षेपांना उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर देणं व प्रतिक्रिया देणं यांत महदंतर आहे. प्रतिक्रिया देण्यात केवळ स्वतःच्या मतांच्या कातडीचा बचाव आहे. उत्तर देण्यात इतरांनी मांडलेल्या मुद्द्यांवर मनन अपेक्षित आहे. या मननात ’आपण ज्या गोष्टींना पुरावा समजतोय त्यांना पुरावा का मानले जावे?’, ’आपली गृहितकं कोणती?’, ’आपण जो निष्कर्ष काढला आहे, त्याच्या मर्यादा कोणत्या?’ या प्रश्नांची उत्तरं शोधणं अंतर्भूत आहे... हे खरं संशोधन होय. या गोष्टी विज्ञानजगतात कराव्या लागतात, त्यामुळे आपण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आणि या खंडनमंडनातून निघतं त्याला (आणि त्यालाच) संशोधनाचा दर्जा प्राप्त होतो.

जोपर्यंत समाजमानसिकतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात स्वीकारला जात नाही, तोपर्यंत समाजशास्त्र, मानव्यशास्त्रे इत्यादी विद्वत्‌शाखांमध्येही मूलगामी, समाजोपयोगी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन व त्याचे उपयोजित फायदे निर्माण होणं अशक्य आहे. विज्ञानसंशोधनाला पाठिंबा देताना त्यात सामाजिक व मानव्यशास्त्रेही अंतर्भूत आहेत, हे विसरता कामा नये. कारण वर्ण्य-विषय वेगळे असले, तरी संशोधन व ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया यांचे निकष व घटक समानच असतात.

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे सर्वसामान्य नागरिकाला नक्कीच जमू शकतं. किंबहुना, असा दृष्टिकोन बाळगून सारासार विश्लेषण करता येणं, ही आपल्या हितासाठी आवश्यक गोष्ट ठरते. शास्त्रीय दृष्टिकोनाअभावी तरतमभाव येत नाही. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला सर्वच शास्त्रांचं ज्ञान नसतं, ते आवश्यकही नाही. आवश्यक आहे ती शास्त्रीय विचार करण्याची क्षमता आणि त्याहीपुढे जाऊन तसा विचार सातत्यानं करण्याची सवय. ज्या समाजाच्या नागरिकांना अशा पद्धतीच्या सारासारबुद्धीचं महत्त्व पटत नाही, त्या समाजाला अज्ञानामध्ये जखडून ठेवणं सोपं असतं, कारण अशा समाजाला वि-ज्ञान व छद्मज्ञान यांत फरक करता येत नाही. शास्त्रीय दृष्टिकोन न बाळगणारं राष्ट्र भावनिकतेच्या आहारी जाण्यात सुख मानतं. अशा राष्ट्राच्या अस्मितांची जपणूक न होता त्या अस्मितांचं रूपांतर दुराग्रहांमध्ये होतं. विज्ञान वापरणं म्हणजेच वैज्ञानिक विचारपद्धतीतून येणारी सारासारबुद्धी वापरणं नव्हे. केवळ विज्ञान वापरणारा समाज ज्ञानाधिष्ठित राहतो, पण ज्ञानोपासक बनत नाही. आपल्या संशोधनाचं, आपल्या मतांचं साक्षेपी खंडन होणं, हा आपल्या बुद्धीवर घेतला गेलेला संशय नसून सत्यान्वेषणाची ती अतिशय सशक्त पद्धत आहे. हे कळलं नाही तर ज्ञान / सत्य ’असं असतं’ आणि ’असं असायला पाहिजे’ यांतला फरकसुद्धा कळत नाही. हा भेद जेव्हा एखाद्या नागरिकसमूहाला कळेनासा होतो, त्या नागरिकसमूहात, पर्यायानं त्या राष्ट्रात 'सत्य काय' हे उचित व यथायोग्य अन्वेषणाआधीच ठरवलं जातं. अशा सत्यासाठी 'सत्यमेव जयते'चा घोष करणं ही त्या राष्ट्रानं स्वतःचीच केलेली घोर फसवणूक ठरते.

आपल्या राज्यघटनेतलं ५१अ हे कलम आपल्याला ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्यांचा आदर्श बाळगायला, आपल्या देशातल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं जतन करायला, पर्यावरणाचं संवर्धन करायला, धर्म-जात-भाषा-प्रांत यांत भेद न करता बंधुभाव वृद्धिंगत करायला सांगतं. घटनेचं हेच कलम वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोधक वृत्ती विकसित करणं, हे आपलं मूलभूत कर्तव्य असल्याचं आपल्याला सांगतं.

भारतीय राज्यघटनेत सांगितल्याप्रमाणे या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जावे, प्रश्न विचारण्याची, शंका घेण्याची प्रत्येकाला मुभा असावी, धर्म-जात-वंश-भाषा-लिंग यां भेदांपलीकडे जाऊन आचार-विचारस्वातंत्र्य असावं, अशी आमची इच्छा आहे.

आमच्या या मागण्यांसाठी आम्ही व आमच्यासारखे अनेक शास्त्रज्ञ - शिक्षक - विद्यार्थी - वैज्ञानिक मूल्यांचा आदर राखणारे नागरिक येत्या बुधवारी, म्हणजे ९ ऑगस्ट, २०१७ रोजी देशभरात संचलनात सहभागी होणार आहेत.

आमचा हा लढा कोणत्याही एका सरकारविरुद्ध किंवा राजकीय पक्षाविरुद्ध नाही. आमची बांधिलकी वैज्ञानिक दृष्टिकोनाशी, लोकशाहीशी आणि सहिष्णुतेशी आहे. आम्हांला ज्यांबद्दल मनस्वी आदर आणि प्रेम आहे, अशा वैज्ञानिक मूल्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.

आपला पाठिंबा आम्हांला मिळाल्यास व आपणही या संचलनात सहभागी झाल्यास आमच्या लढ्यास बळकटी येईल.

धन्यवाद.

डॉ. आदित्य कर्नाटकी (भास्कराचार्य)
डॉ. आरती रानडे (रार)
केतन दंडारे (अरभाट)
डॉ. चिन्मय दामले (चिनूक्स)
डॉ. जिज्ञासा मुळेकर (जिज्ञासा)
वरदा खळदकर (वरदा)
डॉ. सई केसकर (सई केसकर)
सत्यजित सलगरकर (आगाऊ)

***

या मसुद्यातल्या डॉ. चिन्मय दामले यांच्या मतांशी मायबोली.कॉमचा संबंध नाही. ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएन्ड यांचा शेवटचा पॅरा, पेशवा व अमितव यांचा प्रतिसाद पुर्ण सहमत.

हे असले प्रश्न विचारायचे प्रयोजन काय?
>>
हे असले मोर्चे व धागे काढण्याचे जे प्रयोजन आहे अगदी तेच.
विज्ञानवादी व्हा सांगणा-या धाग्यावर मला "तुम्ही प्रश्न विचारुच कसे शकता" असे प्रश्न येतात हेच फार गमतीशीर आहे.

हे प्रकार घडले तेंव्हा त्यात राजकारण, समा़जकारण करणार्‍या सगळ्यांचा संबंध होता, फक्त शास्त्रज्ञांना का दोष? इतरांना विचारले का? इतरांनी तरी काय केले?
>>
हा धागा "इतरंबद्दल" आहे की शास्त्रज्ञांबद्दल? मग या धाग्यावर शास्त्रज्ञांना प्रश्न विचारायचे की इतरांना? त्या वेळी शास्त्रज्ञ म्हणुन तुम्ही व तुमच्या क्षेत्राने काय योगदान दिले हे विचाण्यात काय चुक आहे? कि फक्त तुम्हीच विचारणार व आम्ही विचारले तर का विचारता म्हणुन फटकारणार?

हे सगळे आत्ताच का सुचत आहे' ह्या प्रश्नाला 'आत्ता तरी सुचते आहे हे काय वाईट आहे का' हे उत्तर आहे. 'ह्यात मोदी सरकारला छुपा विरोध आहे' ह्या मुद्यावर 'असला तरी काय बिघडले, विज्ञानवादाची कास धरण्याचे काम कोणत्या नेत्याच्या कारकीर्दीत होते आहे ह्यावर आक्षेप कशाला' असा मुद्दा मांडता येईल.
>>
यात तेव्हा चुकीचे वाटले नसते जेव्हा त्यांनी, "आम्ही हा मोर्चा मोदी सरकारतर्फे होणा-या शास्त्रज्ञांच्या गळचेपी विरुद्ध किंवा भाजपासरकारतर्फे होत असलेल्या विज्ञानवादी विचारसरणीची गळचेपी या विरुद्ध काढलेला आहे. सगळ्यांनी आमच्यासोबत या मुद्द्यांवर सद्ध्याच्या सरकारविरोधी एकत्र या" असे उघड उघड सांगीतले असते. आत्ता यात चुकीचे आहे कारण सायन्स वगैरे बिगर राजकीय चांगले क्षेत्र हे लोक यांच्या वयक्तीत अजेंडासाठी वापरुन घेत आहेत. यांना सायन्स वगैरेची काहीही पडलेली नाही.

मोर्च्याच्या नुसत्या मागण्या मांडणेच बहुधा योग्य ठरेल. मागण्यांमागची भूमिका काहीशी स्वतः गंडलेली आणि दुसर्‍यांना गंडवणारीही वाटली.
>>
अगदी. भारतातील विज्ञानवादी दृष्टीकोन व त्याअनुषंगाने जागृती, लॅब्स उपकरणांची मागणी, फंडींग वगैरे "ख-या" मागण्या असत्या तर त्यांना पाठिंबा दिला असता.

>>>>काहीही? मानवांतर्गत हिंसाचारात धार्मिकांचा किती सहभाग होता-आहे ह्याला इतिहास साक्षी आहे. बाकी या ठिकाणी तो वादाचा विषय होईल म्हणुन इथेच थांबतो.<<<<

खरे तर हे अजिबात विषयांतर नाही किंवा वाद होण्याचे कारण नाही. धाग्यातील मूळ मुद्यामागची भूमिकाच धार्मिकतेपासून दूर जाणारी आहे. माझे म्हणणे इतकेच की ती भूमिका स्तुत्य असली तरी ती निव्वळ स्वतःच्या जोरावर अस्तित्वात राहू शकत नाही.

धार्मिक भूमिका घेणार्‍यांनी हिंसाचार केले हे सत्यच आहे. पण ते धार्मिकतेचे तोटे आहेत. ते विज्ञानाने व विज्ञानवादी भूमिकेच्या सक्षम प्रसाराने हळूहळू नष्ट व्हायला हवेत. पण निव्वळ विज्ञानवादी माणूस झाला तर शुशृषा, सेवाभाव, आपुलकी, त्याग ह्या मूल्यांचा र्‍हास होऊ लागेल व माणसे तडफडू लागतील मनातच. पशूवत जिणेसुद्धा होऊ शकेल. एखाद्याने देवाचे नामस्मरण केले तर अतीविज्ञानवादी त्याला मारेल. ही सगळी अतिरेकी उदाहरणे असली तरी त्याचे लहान प्रमाणातील परिणाम लगेचच जाणवू लागतील. धर्म आणि विज्ञान ह्या दोन्हीमधील निव्वळ चांगल्या व मानवतावादी बाबी अनुसरून समाज घडवण्याची भूमिका असायला हवी. कोणतीतरी एकच भूमिका अस्तित्वात असणे कधीच योग्य ठरणार नाही. कालवर फक्त धार्मिकता होती, कदाचित काही दशकांनी फक्त विज्ञानवाद असेल. दोन्हींचे 'एकट्याने अस्तित्वात असणे' घातक आहे.

एखाद्याने देवाचे नामस्मरण केले तर अतीविज्ञानवादी त्याला मारेल. ही सगळी अतिरेकी उदाहरणे असली तरी त्याचे लहान प्रमाणातील परिणाम लगेचच जाणवू लागतील.
>>
माझा एक परिचित नवनास्तीक झाला होत तेव्हा तो म्हणाला होता की, त्याच्याकडे अधिकार दिले तर तो जगातील सर्व धार्मीक लोकांना (धर्मावर कोणत्याही पातळीची श्रद्धा असणा-यांना) मारुन टाकेल.

धार्मिक भूमिका घेणार्‍यांनी हिंसाचार केले हे सत्यच आहे. पण ते धार्मिकतेचे तोटे आहेत. ते विज्ञानाने व विज्ञानवादी भूमिकेच्या सक्षम प्रसाराने हळूहळू नष्ट व्हायला हवेत.
>>> एक लक्षात घ्या. माणसांत चांगुलपणा किंवा वाईटपणा यासाठी धर्म किंवा विज्ञान या दोहोंपैकी कशाचीही गरज नाही किंवा त्यामुळे तो वाढेल कमी होइल असे काही नसते. जी मूळ नैसर्गिक वृत्ती आहे ती असतेच. ती कोणत्याही काळात बदलत नाही. बदलते फक्त व्यवहाराची पद्धत, प्रेरणा नव्हे. तेव्हा जे काय फायदे तोटे आहेत ते धर्मामुळे नाहीत. धर्माच्या नावाखाली नैसर्गिक प्रेरणांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणारांमुळे आहे. विज्ञानवादी विचारांच्या प्रसाराने हे 'आपल्या नैसर्गिक प्रेरणांचा वापर दुसरा कुणी त्याच्या फायदयासाठी करत आहे' ही जाणीव येते.

पण निव्वळ विज्ञानवादी माणूस झाला तर शुशृषा, सेवाभाव, आपुलकी, त्याग ह्या मूल्यांचा र्‍हास होऊ लागेल व माणसे तडफडू लागतील मनातच. पशूवत जिणेसुद्धा होऊ शकेल.
>> असे काहीही होत नसते. किंवा झालेले नाहीये. हा फक्त बिनबुडाचा बागुलबुवा आहे.असे होईल तसे होईल म्हणून धर्माच्या कर्मकांडांना चिकटून बसा ही विचारपद्धती गडबड आहे. सेवाभाव, आपुलकी, त्याग वगैरे ह्या नैसर्गिक प्रेरणा आहेत, कोण्या धर्माने रोपीत केल्या नसतात. ज्या प्राण्यांना बोलताही येत नाही त्यांच्यातही ह्या भावना दिसतात, त्यांना कोणता धर्म शिकवायला गेला आहे? तेव्हा पशुवत जिणेसुद्धा होऊ शकेल हे बेसलेस आहे.

एखाद्याने देवाचे नामस्मरण केले तर अतीविज्ञानवादी त्याला मारेल. ही सगळी अतिरेकी उदाहरणे असली तरी त्याचे लहान प्रमाणातील परिणाम लगेचच जाणवू लागतील.
>>> दुसर्‍याच्या देवाचे नामस्मरण केले, किंवा कुणाच्या देवाची निंदानालस्ती केली म्हणून हिंसेची उदाहरणे बक्कळ आहेत. विज्ञानवादी हे अमानुष, राक्षसी, दयामाया, वगैरे नसलेले असतात असा काहीसा प्रचंड घाणेरडा आरोप इथे आपण करत आहात. हिंसा, अतिरेक हा मूलभूत संस्कारांचा, विचारांचा, मानसिकतेचा, सभोवतालच्या वातावरणाचा भाग आहे त्याला माणूस विज्ञानवादी आहे की कट्टर धार्मिक याने फरक पडत नसतो. हिंदुस्थानात गाजलेले ठग स्वतःला कालीमातेचे उपासक समजत व माणसे मारणे हे आपल्याला कालीने दीलेले कर्तव्यच आहे असे मानत.

धर्म आणि विज्ञान ह्या दोन्हीमधील निव्वळ चांगल्या व मानवतावादी बाबी अनुसरून समाज घडवण्याची भूमिका असायला हवी. कोणतीतरी एकच भूमिका अस्तित्वात असणे कधीच योग्य ठरणार नाही.
>> धर्म हा प्रकार क्राफ्टेड आहे. विज्ञान क्राफ्टेड नसते. उद्या मी माझा 'घुबडधर्म' स्थापन करुन त्याचे नियम वगैरे बनवून दहा पाच हजार अनुयायी मिळवू शकतो. पण विज्ञान तयार करु शकत नाही. ते मी असलो काय किंवा नसलो काय, ते असतंच. त्याला माझ्या असल्यानसल्याने फरक पडत नाही. मात्र धर्म संपतो, त्याचे अस्तित्व संपते. म्हणून धार्मिक लोक अधीर होऊन धर्म वाचवण्याचा जीवापाड प्रयत्न करत असतात.

जगातल्या सर्व धर्मांमध्ये निव्वळ चांगल्या बाबी म्हटल्या तर एकसारख्याच आहेत. तरी इतके सारे धर्म आहेतच, आणि त्यातले एकमेकांशी हिंसाचार करुन लढणारेही आहेतच. विज्ञानवादी लोकांत तर असे काही युद्ध कधी बघितलेले नाही. मतमतांतरे असतातच, पण ती कट्टर नसतात. त्यामुळे विज्ञानवादी भूमिका हीच अस्तित्वात असणे योग्य ठरते. विज्ञानवादी भूमिकेने जगाचे जितके भले केले आहे त्या ग्राफवर धर्म हा मायनसमध्ये आहे. जे आहे ते आहे.

कालवर फक्त धार्मिकता होती, कदाचित काही दशकांनी फक्त विज्ञानवाद असेल. दोन्हींचे 'एकट्याने अस्तित्वात असणे' घातक आहे.
>>> विज्ञानवाद नव्हता म्हणून धार्मिकता होती. विज्ञानाने धार्मिकतेची शकले उडवणे सुरु केले.... जे अतिशय योग्य आहे. धर्माच्या पारंब्यांना लटकून राहून कुठल्याही समाजाचा विकास होत नसतो. धार्मिकतेला उराशी कवटाळून बसणार्‍यांना विज्ञानवादी भूमिकांमुळे लाभणारी फळे तर हवी असतात, पण ती भूमिका मात्र नको असते.

नानाकळा, उत्तम पोस्ट! एक विनंती - ठळक अक्षरात लिहु नका, मी लिंबुटिंबु पुनरुज्जिवित झाले असं समजुन पोस्ट ओलांडुन पुढे जाणार होतो Wink

<<संपूर्ण विज्ञानवादी झालेला समाज भावनिकदृष्ट्या कोरडा राहील.>>
------ असे मला तरी वाटत नाही. मी विज्ञान क्षेत्रात २०+ वर्षे असा काळ घालवला आहे, आज या क्षेत्रापासुन दुर जातो आहे. हे क्षेत्र थोडे जवळुन बघण्याची सन्धी मिळाली आहे आणि अनेक देश, विविध स्तरावर विविध लोकान्शी सम्बन्ध आला आहे.

(अ) पुण्यात असताना किल्लारीचा भुकम्प झाला होता... ५ शास्त्राचे अभ्यासक (आजही सर्वान्च्या सम्पर्कात आहे) दुसर्‍या दिवशी मदत कार्यासाठी स्वखर्चाने गेले... सर्व मित्र हे आर्थिक दृष्टीने कमजोर होते, प्रत्येकाला पुढच्या आठवड्यात फेलोशिप मिळाली नाही तर जेवाणाचे वान्धे अशी स्थिती. कुठल्याही पक्षाच्या (किव्वा सन्स्थेच्या वतीने) झेन्ड्याखाली गेलो नव्हते.... त्यान्ना ते त्यान्चे कर्तव्य वाटले. परत आल्यावरही विविध स्तरावर त्यान्नी तसेच अनेक विज्ञान अभ्यासकान्नी इतराना (आर्थिक, पुनर्वसन कार्य) मदतीसाठी प्रेत्साहित केले. आर्थिक मदत गरजू व्यक्ती पर्यन्त पोहोचण्यासाठी सकाळची मदत घेतली. आवाज आतला होता, केलेल्या कार्याचे त्या लोकान्नी मार्केटिन्ग केले नाही.

(ब) १९९९ मधे कारगिलच्या वेळी आमच्या ग्रुपने (जागृत सामान्य नागरिक) परिने जे काही करता येणे शक्य असते ते करायचा प्रयत्न केला.
(क) अभ्यासात मागे असणार्‍यान्ना, कुठलीही आर्थिक मदत न स्विकारता, ज्ञान दानाचे कार्य करणारे अनेक अनेक लोक मी बघितले आहेत. खरा विज्ञावादी आनन्दाने मदत करतो...

जगात कुठेही नैसर्गिक आपत्ती (हैती भूकम्प, महापुर) आल्यावर, मानवता वादी दृष्टी समोर ठेवत मदतीचा हात पुढे केलेला अनेक वेळा मी पहिला आहे. कामाच्या वेळा ८ ते ४ नसतात, त्यामुळे सर्व लोक, सर्व काळात initiative घेण्यास समर्थ नसतात...

विज्ञानवादी हा पण मनुष्य असतो... त्याला राग, लोभ, प्रेम, मत्सर, करुणा, दया, निष्ठुरता या भावना पण आहेत आणि त्या व्यक्तीसापेक्ष आहेत. काही कोरडे आहेत पण ते सर्व ठिकाणी आहेतच.

मला वाटते इकडे बऱ्याच मुद्द्यांची मिसळ होते आहे,

विज्ञानवाद म्हणजे काय हे ठरवताना प्रत्येक जण आपल्या आवडत्या मुद्द्यावर येतो आहे,
1) . पण निव्वळ विज्ञानवादी माणूस झाला तर शुशृषा, सेवाभाव, आपुलकी, त्याग ह्या मूल्यांचा र्‍हास होऊ लागेल व माणसे तडफडू लागतील मनातच
विज्ञान वादीना भावना नसतात/नसतील हे गृहीतक चूक आहे,

2)विज्ञानवादी नास्तिक"च" असतो हे कुणी सांगितले?

विज्ञानवादी सांगितलेली गोष्ट पुरावे आणि तर्काच्या निकषावर पारखून घेईल

मोबाईल स्क्रीन वर दिसणारी इमेज किंवा विधान तसेच्या तसे स्वीकार न करता, एखादा माणूस त्या गोष्टीची सत्यासत्यता तपासण्यासाठी गुगल सर्च करत असेल, नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार आपले मत गरज पडल्यास बदलण्यास तयार असेल, तर त्याचा दृष्टिकोन विज्ञानवादी आहे (भले अतिशय मर्यादित प्रमाणात) असे मी म्हणींन,
आणी जर हाच पुराव्याने शाबीत दृष्टिकोन त्याने जीवनाच्या इतर क्षेत्रात लावला तर मला वाटत नाही त्याचे भावनिक किंवा श्रद्धा पातळीवर काही नुकसान आहे,

विज्ञानवादी व्हा सांगणा-या धाग्यावर मला "तुम्ही प्रश्न विचारुच कसे शकता" असे प्रश्न येतात हेच फार गमतीशीर आहे>>>> थोडे अवांतर . प्रश्न विचारण्याचा attitude वरून मला विज्ञान शिक्षिकांची आठवण झाली .त्यांनाही प्रश्न विचारले की असाच attitude दाखवत.

पण हा attitude सगळ्याच क्षेत्रात पाहायला मिळतो. नो सरप्राईज इन दॅट . Attitude depends upon person to person Happy

बाकी फारएन्ड , अमित पोस्ट आवडल्या

<<>विज्ञानवाद नव्हता म्हणून धार्मिकता होती. विज्ञानाने धार्मिकतेची शकले उडवणे सुरु केले.... जे अतिशय योग्य आहे. धर्माच्या पारंब्यांना लटकून राहून कुठल्याही समाजाचा विकास होत नसतो. धार्मिकतेला उराशी कवटाळून बसणार्‍यांना विज्ञानवादी भूमिकांमुळे लाभणारी फळे तर हवी असतात, पण ती भूमिका मात्र नको असते.>>
--------- नानाकळा छान प्रतिसाद, सहमत.

विज्ञानवाद नव्हता म्हणून धार्मिकता होती. विज्ञानाने धार्मिकतेची शकले उडवणे सुरु केले....

<<

आज इराक व सिरिया मध्ये इस्लामिक दहशतवादी संघटना 'ISIS'चे जे उद्योग सुरू आहेत ते पाहून तरी, विज्ञान "धार्मिक"तेची शकले उडवतोय असे अजिबात वाटत नाही.

विज्ञान क्राफ्टेड नसते, धर्म क्राफ्टेड असतो हे बरोबरच!

माझा मुद्दा थोडा अधिक व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करतो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकजण वेगळा असतो व भावना उपजत असतात. श्रेष्ठत्व मिळवण्याची इच्छाही उपजत असते. जेव्हा विज्ञान नव्हते तेव्हा ह्या प्रकारच्या माणसाला 'कसे वागावे' हे धर्माने शिकवले. त्यात मग अनिष्ट गोष्टी घुसल्या आणि अराजक माजले.

विज्ञानवादाने अश्या गोष्टींचे समुळ उच्चाटन होईल व व्हावेही! पण विज्ञान दोन गोष्टी करणार नाही.

१. एखाद्या परिस्थितीत योग्य वागणूक काय ते विज्ञान सांगणार नाही. विज्ञानवादानुसार वागणूक काय असावी इतकेच सांगेल. विज्ञानवादी वागणूक ही नेहमीच मानवतावादी वागणूक असेल असे नव्हे. उदाहरणार्थ, धार्मिकतेचा समूळ नाश व्हायच्या आधी जर एक धार्मिक समुह अस्तित्वात असला तर विद्यानवादाच्या स्थापनेसाठी त्या समुहाची मानसिकता बदलण्याचा सकारात्मक प्रयत्न न करता कट्टर विद्यानवाद त्या समुहाचा नाशही करेल. थोडक्यात, विज्ञानवाद हा एक कट्टर धर्म म्हणून स्थापन होऊ शकेल.

२. बळी तो कान पिळी ह्या निसर्गात (मानवासकट) सर्वत्र अस्तित्वात असणार्‍या तत्वावर विज्ञानवाद अंकुश आणू शकणार नाही. आज मानवतावादी मूल्यांवर आधारीत प्रणालींवर देश उभे राहतात व चालतात. त्यामुळे मोठा देश लहान देशावर येताजाता आक्रमण करत नाही. ह्या प्रणाली कुठे ना कुठे धार्मिक विचारसरणीतून आलेल्या असतात. त्या विचारसरणीचे भीषण धोके जगाने अनुभवलेले आहेत हे खरेच आहे. पण तरीही मोठ्या प्रमाणावर जग टिकून आहे आणि चाललेले आहे तेही ह्या विचारसरणींमधील चांगुलपणामुळेच! विज्ञानवाद ह्या विचारसरणींऐवजी वेगळी विचारसरणी अस्तित्वात आणेल. त्या विचारसरणीनुसार एक्झिस्टन्ससाठी सर्वतोपरी लढा देणे ही मूळ प्रवृत्ती बनेल. अधिक चांगले जगता यावे ह्यासाठी दुसर्‍याचा नाश करताना कोणतीही विचारसरणी त्याला विरोध करणार नाही. 'को-एक्झिस्ट' होण्याला आज जे अधिष्ठान आहे ते तेव्हा नसेल. अज्ञाताच्या भयामुळे का होईना माणसांमध्ये आज मानवतेने वागण्याचा जो अंश राहिलेला आहे तो असण्याचे कारण उरणार नाही.

हे सगळे आजही होत आहे असे म्हणता येईलच. पण ते विज्ञानवाद नसल्यामुळे होत नाहीये. ते धार्मिकतेचा चुकीचा अर्थ घेतल्याने होत आहे.

विज्ञानवादाचे अतिरेकी हल्ल्यांवर काय मत असेल? हे हल्ले होऊच नयेत म्हणून विज्ञान काय करेल?

बाफ काढल्याचा फायदा नाही पेक्षा प्रश्न निर्माण होत आहे, विचारले जात आहेत... छान प्रगती आहे. प्रश्नाची उत्तरे यथावकाश मिळतील अशी अपेक्षा... नकळत सर्व मायबोलीकर विज्ञानवादी होत आहेत.... Happy

नवीन Submitted by बेफ़िकीर on 11 August, 2017 - 10:57
>>
+१

हे सगळे आजही होत आहे असे म्हणता येईलच. पण ते विज्ञानवाद नसल्यामुळे होत नाहीये. ते धार्मिकतेचा चुकीचा अर्थ घेतल्याने होत आहे.
>>
सहमत. हिंदुधर्माच्या बाबतीत, नुसता चुकीचा अर्थ व एखादी गोष्ट अति करणे हेच झालेले नसुन मुळात यातल्या किती % गोष्टी हिंदु "धर्मा"त सांगीतल्या म्हणुन वाईट आहेत व किती % वाईट गोष्ती या स्थानीक "संस्कॄती"चा भाग आहेत यातील फरक न कळल्यामुळेही झालेल्या आहेत.

विज्ञानवादाचे अतिरेकी हल्ल्यांवर काय मत असेल? हे हल्ले होऊच नयेत म्हणून विज्ञान काय करेल?
>>> प्रश्न येण्याआधीच उत्तर दिले आहे.

धर्माच्या नावाखाली नैसर्गिक प्रेरणांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणारांमुळे आहे. विज्ञानवादी विचारांच्या प्रसाराने हे 'आपल्या नैसर्गिक प्रेरणांचा वापर दुसरा कुणी त्याच्या फायदयासाठी करत आहे' ही जाणीव येते.

बेफिकीर काहीतरी मेजर गोंधळ होतोय तुमचा असं मला वाटतंय.
१. एखाद्या परिस्थितीत योग्य वागणूक काय ते विज्ञान सांगणार नाही. विज्ञानवादानुसार वागणूक काय असावी इतकेच सांगेल. >> विज्ञान यातलं दोन्ही सांगणार नाही. विज्ञान शक्य असेल तर काहीच परिस्थितीत facts सांगेल त्याचं इंटरप्रिटेशन काय आणि कसं करावं, एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर त्यातला कुठल्या परिस्थितीत कोणता निवडावा याचा आणि विज्ञानाचा काहीही संबंध असणार नाही.

>>२. विज्ञानवाद ह्या विचारसरणींऐवजी वेगळी विचारसरणी अस्तित्वात आणेल. त्या विचारसरणीनुसार एक्झिस्टन्ससाठी सर्वतोपरी लढा देणे ही मूळ प्रवृत्ती बनेल. अधिक चांगले जगता यावे ह्यासाठी दुसर्‍याचा नाश करताना कोणतीही विचारसरणी त्याला विरोध करणार नाही. 'को-एक्झिस्ट' होण्याला आज जे अधिष्ठान आहे ते तेव्हा नसेल. अज्ञाताच्या भयामुळे का होईना माणसांमध्ये आज मानवतेने वागण्याचा जो अंश राहिलेला आहे तो असण्याचे कारण उरणार नाही.>> तुमचा विज्ञान आणि artificial intelligence (AI) रोबोट्स यात गोंधळ होतोय का? सारासार विचार, एथिक्स आणि विज्ञान ह्या काही विरुद्ध (किंवा समान) गोष्टी नाहीत तर संपूर्णपणे ओर्थोगोनल आहेत.

विज्ञानवादाचे अतिरेकी हल्ल्यांवर काय मत असेल? हे हल्ले होऊच नयेत म्हणून विज्ञान काय करेल? >> काहीही करणार नाही. हल्ले होऊ नये म्हणून विज्ञान काय करणार? तंत्रज्ञान फार तर जग आणखी सुरक्षित होण्यासाठी प्रयत्न करू शकेल.

>>>बरं मग? हे असं तत्व असल्याने किंवा नसल्याने भारताला आणि ते तत्व नसलेल्या इतर देशांना नक्की काय फायदा/ नुकसान झालं? एक तत्व अगदी संविधानात लिहिलं तरी त्याचा अर्थ न्यायव्यवस्थेने तसाच काढला का?

अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात धर्माचा हस्तक्षेप होतो. तसा तो आयर्लंड सारख्या कॅथलिक देशांमध्ये सुद्धा होतो. महिलांच्या आरोग्याबद्दल घेण्यात येणारे कित्येक निर्णय हे धर्माला अनुसरून असतात, इतकंच काय, वैद्यकीय इन्शुरन्स या सारखी खाजगी गोष्ट सुद्धा काही काही वेळेस धार्मिक बाजूंमुळे निवडणुकीचा अजेंडा होते. भारतामध्ये, भारत गरीब (आणि कित्येक धर्मांचे उगमस्थान) असूनही असा हस्तक्षेप होत नाही. एड्स सारखा आजार आटोक्यात आणायला भारतीय पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये सामान्य लोकांना आजारांबद्दल सगळ्या प्रसार माध्यमांमधून शिकवले गेले होते. भारतात पब्लिक हेल्थ साठी, मग ते लसीकरण असो किंवा परिवार नियोजन, कुठल्याही धर्माचा मुलाहिजा न बाळगता सरकार कडूनच जाहिराती केल्या जातात. या बद्दल आतापर्यंतच्या सगळ्या सरकारांचे अभिनंदन केले पाहिजे. आणि या बाबतीत येणारे प्रत्येक नवीन उपकरण/लसीकरण हे सगळ्यांना परवडेल अशा दरात लोकांना उपलब्ध करून दिले जाते. कधी कधी विनामूल्यदेखील दिले जाते.
तसेच जिथे जिथे समाज धार्मिक बायस मुळे वैद्यकीय गोष्टींमध्ये हस्तक्षेप करतो (जसे की स्त्रीभ्रूणहत्या) तिथे सगळ्याच सरकारांनी अतिशय कडक धोरण घेतले आहे. आणि तसे धोरण वैद्यकीय विज्ञानाच्या बाहेरही असेल तर अजून चांगले होईल.
हा झाला वैद्यकीय शास्त्रात (न) होणारा धर्माचा हस्तक्षेप.

>>>वैज्ञानिक मुल्य समाज असहिष्णु असला तर रुजणार नाहीत असा जो अर्थ ह्या वाक्यातून निघतोय तो विज्ञानाचा इतिहास बघता संपुर्ण चुकीचा आहे. त्यातुनही वैज्ञानिक मुल्य रुजलेला समाज सहिष्णु असेल असेही नाही. कारण विज्ञान हे ए-मॉरल आहे, विज्ञानाला सौंदर्यद्रूष्टी नाही आणि विज्ञानाने मिळालेले ज्ञान कसे वापरावे हे सुधा विज्ञान सांगत नाही.

अर्थात! आतापर्यंतची सगळी वैज्ञानिक प्रगती ही धर्माविरुद्ध झगडून झाली आहे. मग ती पाश्चात्य देशात असो किंवा भारतात. हिंदू धर्मात पूर्वी सागरोलंघन निषिद्ध होते, पण आज किती हिंदू लोक त्यावर विश्वास ठेवतात? पण त्या काळी शिक्षणासाठी बाहेरच्या देशात गेलेल्या लोकांना आप्तजनांशी संघर्ष करावा लागला. ज्यांनी हिंदू धर्मात कुटुंब नियोजनाचा प्रसार केला, त्या कर्वेंना हिंदूच नव्हे तर त्या काळी असलेल्या ख्रिश्चन लोकांकडूनही विरोध झाला. पण म्हणून सतत धार्मिक विरोधातूनच विज्ञान पुढे गेले पाहिजे असे का असावे? आणि आज हिंदू धर्माचा विज्ञानाला फारसा विरोध नाही हा फक्त हिंदू धर्माचा मोठेपणा आहे का? त्यामध्ये असे समाजसुधारक आणि त्यांचे ऐकणारी सरकारं यांचाही सहभाग आहे. अशा इंटरव्हेन्शनमुळे कित्येक धार्मिक रूढी कालबाह्य झालेल्या आहेत. आणि समाजाचे स्वास्थ्य खऱ्या अर्थाने सुधारले आहे.

विज्ञान आहे म्हणून धर्म नसावा असे गृहीत योग्य नाही. पण धर्माचा विज्ञानात हस्तक्षेप होऊ नये. आणि जर पुरातन संस्कृतीचा आणि वैद्यकीय उपचारांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तर तो विज्ञानाने दिलेल्या ठोकताळ्यांतून व्हावा. जसे की आयुर्वेदिक औषधांच्या यथासांग क्लिनिकल ट्रायल्स, जशा पाश्चात्य औषधांच्या होतात. आणि त्यांच्यावर एफडीए सारख्या मानकाचा शिक्का.
धर्म आणि विज्ञान या दोन समांतर धारा आहेत असे आपण कितीही म्हंटले तरी काही काही बाबतीत त्या एकमेकांमध्ये गुंफल्या जातात. यात वैद्यकीय शाश्त्र जसे येते, तसेच आहारशास्त्र येते. आणि जिथे जिथे सरकारचा या शास्त्रांशी संबंध येतो तिथे तिथे सरकारने विज्ञानाची कास धारावी हे मागणे अयोग्य नाही. जेव्हा जेव्हा सामान्य लोकांना याबद्दल माहिती हवी असेल तेव्हा तेव्हा त्यांना शास्त्रीय माहिती देणे आणि नंतर त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांना वयक्तिक पातळीवर निर्णय घेऊ देणे अशी सहिष्णुता अपेक्षित आहे.

abortion राईटस आणि लसीकरण चांगली उदाहरणे आहेत.
एलजीबीटीएक्यू राईटस इज बॅड वन.

काहीही करणार नाही. हल्ले होऊ नये म्हणून विज्ञान काय करणार? तंत्रज्ञान फार तर जग आणखी सुरक्षित होण्यासाठी प्रयत्न करू शकेल.<<<<

विज्ञान काही करणार नाही म्हंटल्यावर विज्ञान धार्मिकतेला पर्याय ठरू शकणार नाही. अतिरेकी हल्ले कट्टर धार्मिकतेतून होतात. त्यावर उत्तर 'धार्मिकतेतील कट्टरता कमी करण्यासाठी सर्वंकष व प्रबोधनात्मक प्रयत्न करणे' हे आहे. तसे केल्यास मानवतावाद प्रस्थापित होईल व अतिरेकी हल्ले कमी होतील. जर विज्ञान अतिरेकी हल्ले होणे टाळू शकत नसेल तर ते धार्मिकतेला पर्याय असावा अश्या पद्धतीने का सादर करण्यात येत आहे? धार्मिकतेतील जाचक थोतांडे विज्ञानाने नष्ट करावीत व उर्वरीत मानवतावादी मूल्ये राहू द्यावीत. 'धर्म नकोच, फक्त विज्ञान हवे' ही अपेक्षा घातक आहे (जशी 'विज्ञान नको, धर्मच हवा जितकी घातक आहे तितकीच) इतकेच म्हणणे आहे.

>>>>धर्माच्या नावाखाली नैसर्गिक प्रेरणांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणारांमुळे आहे. विज्ञानवादी विचारांच्या प्रसाराने हे 'आपल्या नैसर्गिक प्रेरणांचा वापर दुसरा कुणी त्याच्या फायदयासाठी करत आहे' ही जाणीव येते.<<<<

हो पण त्यावरचा उपाय मिळत नाही ना? जाणीव होणे फारच महत्वाचे आहे. उपाय कसा करणार?

विज्ञान आणि धार्मिकता या शिवाय या जगात बरंच काही आहे जे या बाबत काही करू शकेल.
नॉर्थ कोरिआ ग्वाम वर हल्ला करणार म्हणतंय आणि ट्रंप फायर अ‍ॅन्ड फ्युरी जी जगाने कधी बघितली नाही असं काही करणार म्हणतोय. यातला कुठलाही हल्ला धार्मिकतेतून होत नाहीये आणि यात धार्मिकता आणि विज्ञान कुणीही काही करू शकत नाही.
असो. विषय भरकटतोय. माझं शेवटच पोस्ट.

ज्या देशाचा पंतप्रधान गणपतीला हत्तीचे शीर हे प्लास्टीक सर्जरीत भारत प्रगत होता असे मानतो.कुणाच्या तरी रक्त्तापासून शंभरजण तयार होत होते म्हणजे क्लोनिंगमध्ये आपण पारंगत होतो असे मानतो.अश्या पंतप्रधानाच्या देशात विज्ञानिक संस्थांचा वापर धार्मिक धारणा बळकट व्हाव्या म्हणून करण्यत येईल हे साहजिकच आहे.
बाकी या मार्चमुळे फार काही वेगळे घडेल असे न्हवे.

कट्टर विज्ञानवाल्यांनी आता पर्यंत किती हत्या केल्या आहे?
आणि कट्टर धर्मवाल्यांनी किती हत्या केल्या आहे?
याचा तपशील अभिनव यांनी द्यावा

अमितव पोस्ट्स आवडल्या

बाकी 'मोर्चा काढून काय होणार' ह्या प्रश्नाला आणि मी विचारलेल्या 'पुढे काय?' ह्या प्रश्नाला उत्तर अजूनही मिळालेले नाही. Beating around the bush च चालू आहे Happy

धार्मिकतेला उराशी कवटाळून बसणार्‍यांना विज्ञानवादी भूमिकांमुळे लाभणारी फळे तर हवी असतात, पण ती भूमिका मात्र नको असते.

नानाकळा, जबरी प्रतिसाद!

भारतीय जनतेचा ह्या विज्ञान मोर्च्याला किती सपोर्ट आहे हे जमलेल्या अडीचशे लोकांच्या 'प्रचंड गर्दी' ने दाखवून दिले.

"वेपन्स अॉफ मास डीस्ट्रक्शन" हा विज्ञानाचा भाग आहे . त्या खोट्या आरोपाच्या आड इराकवर अत्याधुनीक शस्रास्तांच्या सहाय्याने हल्ला करणे सुद्धा विज्ञानाच्या आधारावरच झाले !!
ह्यात धर्म, नैतिकता वैगेरेचा लवलेशही नव्हता !!

खनिज तेलाच्या अट्टहासापाई मध्यपुर्वेतील अनेक देशांना अक्षरशः मध्ययुगात लोटलेल आहे !!!

Sumukta, most of us are travelling at the moment and we will reply to all the relevant queries as and when we could. Also, this was not a protest March. It was a March . We have used the word 'sanchalan'. Not morcha.

We have not asked anyone to refrain from asking questions.

Pages