माझे मुंबईतील मोठ्ठे घर !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 July, 2017 - 17:06

आजोबांचे बालपण दहा बाय बाराच्या चाळीतल्या खोलीत गेले. स्वत:च्या हिंमतीवर त्यांनी चाळीत एकाच्या दोन खोल्या केल्या. पण सोबत फॅमिली प्लानिंग न जमल्याने त्या दोन खोल्यात एकूण आठ जणांचे बिर्‍हाड थाटावे लागले. माझ्या वडिलांच्या नशिबी फिरून पुन्हा खांद्यावर टॉवेल घेऊन मोरीबाहेर ताटकळणे आले. अश्याच एका सकाळी कडूलिंबाची काठी चघळताना त्यांनी ठरवले, हे घर जेवढ्या स्क्वेअरफीटचे आहे तितक्याच स्क्वेअरमीटरचे आपल्या मुलाचे स्वत:चे प्रायव्हेट बाथरूम बनवायचे. त्या नशीबवान मुलाला जन्म देणारी बाई, म्हणजे माझी आई त्यांना भेटलीही नव्हती तेव्हाची ही गोष्ट. जेव्हा भेटली तेव्हा त्यांनी छोटेसे का होईना स्वत:चे एक वेगळे घर घेतले आणि आपला स्वतंत्र संसार थाटला. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ते आपला संकल्प पुर्ण करण्यास उत्पन्नातील एक मोठी रक्कम बाजूला काढून ठेवत होते. आणि जेव्हा मी एकवीस वर्षांचा झालो, तेव्हा त्यांनी एका आलिशान घराच्या चाव्या माझ्या हाती ठेवल्या!

वाडवडिलांची पुण्याई म्हणा किंवा आणखी काही, दक्षिण मुंबईच्या मध्यवर्ती भागात, शेजारपाजारच्या मध्यमवर्गीय लोकांच्या केवळ स्वप्नातच असावे ईतके मोठे घर, आजच्या तारखेला मी माझे म्हणू शकतो. एक दूरवर नजर जाईल ईतकी जागा आज माझा हक्काचा निवारा आहे. म्हणजे बघा हं, सकाळी उठल्यावर ड्रेसिंग टेबलला खोचलेला ब्रश मी माझ्या दातात खुपसतो आणि तसाच अर्धवट झोपेत चालायला सुरुवात करतो. सवयीने लेफ्ट राईट वळले जाते. चांगला बत्तीस वेळा चावून चावून ब्रश करतो. होईहोईस्तोवर माझे फिरते शौचालय येते. तिथे माझा धावता कमोड असतो. त्यावर बसून कळ दाबतो. पोटातली नाही हां, ती निसर्गाने आधीच दाबली असते. तर, कमोडची कळ दाबतो. ते स्वत:भोवताली एक गिरकी घेत वार्‍याच्या वेगाने पळू लागते. मी त्यावर बसून मोबाईलवर व्हॉटसप कम फेसबूक चेक करत आपला कार्यभाग उरकून घेतो. होईहोईस्तोवर बाथरूम आले असते. मी कमोडवरून टुणकन ऊडी मारतो ते थेट बाथटबमध्ये पडतो. बाथरूम तसे फार काही मोठे नाही. पण कधी मूड आलाच तर तिथे कोपर्‍यात एक नाचण्यासाठी छोटासा स्टेज उभारला आहे. थोडीशी म्युजिक सिस्टमही आहे. कारण जसे बाथरूम सिंगर असतात, तसा मी बाथरूम डान्सर आहे. बाथरूममधून बाहेर पडल्यावर मी अंग पुसत पुसत कपाटात शिरतो...

जसे घराला पुढचा आणि मागचा असे दोन दरवाजे असतात, तसेच आमच्या कपाटालाही दोन दरवाजे आहेत. मी ईथून शिरतो आणि कपडे करत करत तिथून बाहेर पडतो. एक छानसे ड्रेसिंग टेबल कपाटातच मध्यभागी बनवून घेतले आहे. त्यामुळे केस विंचरणे, शर्ट ईन करणे ईत्यादी प्रकार मी कपाटातच ऊरकून बाहेर पडतो. बाहेर पडायची वेळ साधारण ठरलेली आहे. पण तरीही मला नाश्ता गरमागरम लागत असल्याने कपाटाचा मागचा दरवाजा उघडताच एक अलार्म किचनमध्ये वाजतो आणि पाचच मिनिटांत माझा ब्रेकफास्ट डायनिंग रूममध्ये रेडी असतो. डायनिंग रूमचा घेर आजवर कधी मोजायचा प्रयत्न केला नाही. पण सभोवताली एक जॉगिंग ट्रॅक आखला आहे. नाश्ता हजर व्हायला जो पाच मिनिटांचा वेळ वर नमूद केला आहे, त्यावेळेत मी एक फेरी मारून घेतो. तेवढाच व्यायाम होतो. परीणामी सडकून भूक लागते आणि न्याहारीवर तुटून पडतो. स्विमिंग पूलजवळ असलेल्या बेसिनवर चूळ मारतो आणि ऑफिसला निघतो. कितीही मोह झाला तरी स्विमिंग पूलचा वापर फक्त सुट्टीच्या दिवशीच पोहायला करायचा हा घरचा नियम मोडायला मन धजावत नाही.

थोडेसे अवांतर होईल, पण एखादे मायबोलीचे वर्षाविहार आमच्या घरच्या स्विमिंगपूल मध्ये डुंबून केले तरी माझी हरकत नाही. जमल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी माझी स्टडी रूम वापरू शकता. तसेही मी तिथे शेवटचा अभ्यास कधी केला आठवत नाही, निदान ती रूम माबोकरांच्या तरी कामात येईल. आशा करतो की तिथे तुम्ही अगदीच मॅरेथॉन, ट्रायथलॉन वगैरे स्पर्धा घेणार नाहीत. पण शंभर मीटर धावणे आणि चमचागोटी जमून जाईल ईतपत जागा आहे.

लोकांकडे होम थिएटर असते. आमच्याकडे होम स्टेडियम आहे. लाईव्ह क्रिकेट बघताना अगदी तसाच फील यावा म्हणून खुर्च्यांची अरेंजमेंट स्टेडियम सारखी केली आहे. अर्थात खुर्च्यांची संख्या फार नाही. तरी पन्नासेक जण एकाच वेळेस आपापल्या गर्लफ्रेंड सोबत सामना बघू शकतात ईतकी बैठक आहे. पण तेवढ्या खुर्च्या पुरतात. कारण माझे मित्र मोजकेच आहेत.

घरात नैऋत्य की आग्नेय अश्या एका तिरकस दिशेला एक पूजा रूम आहे. एकेकाळी तिथे गेल्याचे आठवतेय. मात्र ज्या दिवशी मी माझ्यातले नास्तिकत्व ओळखले, तेव्हापासून जिथवर अगरबत्तीचा धूर पोहोचतो, त्या हद्दीत जाणे टाळतो.

एक क्रिडारूम आहे. ईनडोअर गेम्स म्हणजेच कॅरम, बुद्धीबळ, सापशिडी ते ब्रिटीशांचा ल्युडो ईत्यादी गेम्स तिथे खेळले जातात. जेव्हा काका-मामा-आत्यांची पोरे म्हणजेच माझ्या भावंडांनी घर गजबजून जाते, तेव्हा खरी त्या रूमला शोभा येते. मी देखील तेव्हाच फक्त त्या क्रिडारूम मध्ये जातो. अन्यथा मला माझी किडारूमच जास्त आवडते. किडारूम म्हणजे त्या रूममध्ये किडे नाहीत. तर ते माझ्यात आहेत. तिथे ते बाहेर येतात ईतकेच.

त्या रूममध्ये फक्त एक बेड, एक टेबल आणि माझा लॅपटॉप आहे. पण मी तिथे का बोलतोय, ईथे बोलायला हवे ना. कारण आताचा लेखही मी या रूममधूनच लिहितोय. माझी वेगळी अशी बेडरूम आहे. पण बरेचदा मी किडे करता करता ईथेच झोपून जातो. सकाळी डोळा उघडतो तेव्हा जाणीव होते, घर मोठे झाले की माणसं लांब जातात. एकेकाळी मी छोट्याश्या हॉलमध्ये जेमतेम सोफ्यात, मांडीवर लॅपटॉप घेऊन बसलेलो असायचो. आई जवळच किचनमध्ये काम करत असायची. तिथूनच बसल्याबसल्या तिच्याशी दिवसभराच्या गप्पा मारायचो. तळलेल्या म्हावरयाचा वास तिथूनच थेट नाकात शिरायचा. त्याने ठसका लागला की दुसरयाच क्षणाला पाठीवर आईचा हात फिरायचा. ते छोटं घर तेवढं., तो मायेचा हात तेवढा., आजही मिस करतो..

पण या सर्वात एक गोष्ट मात्र समजली. जेव्हा आईवडिल आपल्या मुलांसाठी घर बनवतात, तेव्हा ते त्यांच्यासाठी 'मन्नत' असते. पण जेव्हा ते स्वत: मुलांबरोबर त्या घरात राहतात, तेव्हा ते मुलांसाठी 'जन्नत' होते !

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडे राहीलय. सर्व्हंट क्वार्टरचा उल्लेख नाही. मला अशी उडत उडत माहीती मिळाली आहे की अनंत अंबानी रोज सकाळी दंतधावन करताना तुमचे घर बघतो आणि मनाशी ठरवतो कमीत कमी तुमच्या सर्व्हंट क्वार्टरच्या 1/10 तरी घर बांधायचे.

घर मोठे झाले की माणसं लांब जातात. एकेकाळी मी छोट्याश्या हॉलमध्ये जेमतेम सोफ्यात, मांडीवर लॅपटॉप घेऊन बसलेलो असायचो. आई जवळच किचनमध्ये काम करत असायची. तिथून>>>>>>>> जग्गूदादाच्या चला हवा येऊ द्या मधल्या संवादाची आठवण झाली.वाईज मेन थिंक अलाईक.

ऋ तुमच्याकडे फोटोची मागणी या धाग्यावर कोणीही केलेली नाही आणि कोणी मागेल असे वाटतही नाही . तुम्हाला धागा वाढवायला आवश्यक असेल तर जरूर फोटो टाका. पण वरील वर्णनास समर्पक फोटो टाकाल ही माफक अपेक्षा. धन्यवाद. Lol

आपल्या 'अफाट' घराच्या कहाणीला, Rofl

पण शेवटचं काही जन्नत मन्नत वालं वाचून मला काही आठवलं..

'प्रासाद नको येथे मज भव्य भारी...
आईची झोपडी प्यारी.."

पाथफाईण्डर , हो मला कल्पना आहे. माझ्या फ्रीजच्या धाग्यावर फोटोंची मागणी तसा पुरवठा करून मी तमाम मायबोलीकरांची मने आणि विश्वास जिंकला आहे. तरीही कोणी असे असल्यास, ज्यांना छोट्या छोट्या गोष्टीवरही अविश्वास वाटतो, म्हणून म्हटलं ईतकेच Happy

थोडेसे अवांतर होईल, पण एखादे मायबोलीचे वर्षाविहार आमच्या घरच्या स्विमिंगपूल मध्ये डुंबून केले तरी माझी हरकत नाही

>>>>>
सूचना चांगली आहे.

ऋन्मेऽऽष सर, दक्षिण मुंबईच्या मध्यवर्ती भागातल्या तुमच्या घराबद्दल वाचून तुम्ही किती लकी आहात ते कळले. पण तुम्ही घरातल्या गाडीतळाबद्दल (म्हणजे गराजबद्दल) आणि गाड्यांबद्दल काहीच लिहिले नाही. त्याची उत्सुकता आहे. त्याबद्दल काही लिहू शकाल का?

सिम्बा +१

थोडेसे अवांतर होईल, पण एखादे मायबोलीचे वर्षाविहार आमच्या घरच्या स्विमिंगपूल मध्ये डुंबून केले तरी माझी हरकत नाही. जमल्यास सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी माझी स्टडी रूम वापरू शकता. तसेही मी तिथे शेवटचा अभ्यास कधी केला आठवत नाही, निदान ती रूम माबोकरांच्या तरी कामात येईल. आशा करतो की तिथे तुम्ही अगदीच मॅरेथॉन, ट्रायथलॉन वगैरे स्पर्धा घेणार नाहीत. पण शंभर मीटर धावणे आणि चमचागोटी जमून जाईल ईतपत जागा आहे. >>> हे वाचून तर हसाव कि रडाव तेच कळेना............ Lol

निबंध स्पर्धा असती तर १० पैकि साडेनऊ मार्क्स नक्की मिळाले असते... Happy

पण तुम्ही घरातल्या गाडीतळाबद्दल (म्हणजे गराजबद्दल) आणि गाड्यांबद्दल काहीच लिहिले नाही. 
>>><<<<<
तुम्हाला हेलिपॅड आणि प्रायव्हेट जेट बोलायचे आहे का?
ते गाडी आणि गराजचे कौतुक करणे सो मिडलक्लास..

सिम्बा हो, लिहिताना कुठेतरी सतत वाटत होते की आपण आपला मोठेपणा तर नाही ना मिरवत आहे.. त्यामुळे लिखाण नेहमीसारखे आतून येत नव्हते.

ऋन्मेऽऽष हा आय डी अंबानींच्या मुलाचा आहे की काय अशी एक शंका आली ...असोच...
होईहोईस्तोवर माझे फिरते शौचालय येते. तिथे माझा धावता कमोड असतो >> फिरते शौचालय गणपती च्या वेळी पुण्यात बर्याच ठीकाणी ठेवलेले पाहिले आहे हे यावरुन आठवले ईतकेच...

हो, पण ते सार्वजनिक असते. हे माझे पर्सनल आहे. जिथे मला प्रेशर येते तिथे हजर होते. आणि कलरही माझा फेव्हरेट पिंक आहे.

अंबानीचा उल्लेख दोन ठिकाणी वाचला. मोठ्ठे घर अंबानीनेच बनवावे आणि मध्यमवर्गीयांनी चाळीतच रहावे असे वाटून गेले..

अजुन पुर्ण वाचलं नाही पण चांगला बत्तीस वेळा चावून चावून ब्रश करतो Uhoh बत्तीस वेळा चावून जेवतात ना हे ब्रश करणं पहिल्यांदाच ऐकतिये. नक्की काय चावायच?

ब्रश चावायचा..
आणि काम झाल्यावर फेकून द्यायचा.. यूज एण्ड थ्रो ..
मला तो एकच उष्ट्याचा ब्रश पुन्हा पुन्हा दुसरया दिवशी तोण्डात घालायला कसेसेच होते.. हे म्हणजे एकच च्युईण्गम रोज धुवून खाण्यासारखे आहे..

कुठे फेडणार हे पाप असे विचारावे वाटते पण विचारत नाहि Proud

पाप काय त्यात? ब्रश फेकतो, पण पेस्ट गिळतो. अन्नाची नासाडी नाही करत ! काही लोकं पचापचा चूळा मारत आहे नाही तेवढी सारी पेस्ट तिचा फेस बनवून बेसिनला स्वाहा करतात..

पाप काय त्यात? ब्रश फेकतो, पण पेस्ट गिळतो. अन्नाची नासाडी नाही करत ! काही लोकं पचापचा चूळा मारत आहे नाही तेवढी सारी पेस्ट तिचा फेस बनवून बेसिनला स्वाहा करतात..
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 1 August, 2017 - 21:06

वाचुनच तोंडाला फेस आला. पेस्ट गिळुन मग काय दिवसभर बुडबुडे काढत फिरता का?

Pages