वर्षा विहार २०१७: फक्त १७ जणच का ?

Submitted by केदार जाधव on 31 July, 2017 - 01:05

मित्रानो ,

काल मायबोलीचा २०१७ चा ववि पार पडला . माझी ३.२ वर्षाची ओवी धरून ( तिचा हा तिसरा ववि) अवघे १७ लोक होते. मुंबईहून ८ अन पुण्याहून ९.
अर्थात या १७ जणानी धमाल केली , नवे जुने मित्र भेटले , ओवीने अगदी दंगा घातलाही.
पण मला पडलेला प्रश्न होता की १७ च का ? संयोजक सोडून तर फक्त ६ लोक ?

१. गेल्यावेळी साधारण १२० लोक होते
२. गेल्या वविला काही मोठे प्रॉब्लेम झाल्याचही आठवत नाही
३. संयोजक अन त्यांचे प्रयत्नही तितकेच .

मग नक्की झाल तरी काय ? काही संयोजकांशी मी चर्चा केली , पण त्यांची उत्तरे फारशी पटली नाहीत .
सगळ्यांचे स्वतःचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतीलही , ते नेहमी भेटत असतीलही , पण वविचा युएसपी नविन लोकाना भेटणे हा होता , ते वविला कसे रिप्लेस करू शकेल ?
आणि २०११ मधले ७०० अन २०१७ मधले ११०० रू एकच ना ?
अन गेल्या वेळच्या सगळ्या १२० लोकाना असे Unavoidable Issues असतील की Priorities बदलल्या आहेत ? नवीन कुणीच नाही ?

मनात आल तस लिहित गेलोय . कदाचित थोड्या वेळाने वेगळे विचार येतीलही , पण थोड अस्वस्थ वाटल इतकच .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही कारणे-
१) आपापले वय/आवड/राहाण्याचे ठिकाण/नोकरीचा प्रकार याप्रमाणे गट /वाटसप गट वाढत आहेत. माबोवर ओळखी झाल्यावर ते परस्पर मजा करत असतील.
२)माबोवरचे आवडते लेखक दिसतात बोलतात कसे हे प्रत्यक्ष जाणून घेण्याची ओढ कमी झाली असेल.
३)लेखनातून प्रतिसादांतून एकमेकास ओळखू लागलेले भेटण्याची अपेक्षा ठेवत नसतील.
४)याच वविला संख्या का रोडावली ?- बरेचजणांचे लागोपाठ गटग ठरले असतील त्यामुळे इकडे दांडी.

>>>एक सुचना करावीशी वाटते की माबो ने एखादे स्नेह संमेलन दर वर्षी घ्यावे.>>>हेच लिहावे अश्या विचारात होतो!
सर्वांना वेळ देणे शक्य होणेही नसेल बहुधा,पण हा परिवार,त्याचे विविध उपक्रम तांत्रिकदृष्ट्या सांभाळणारे,आयोजक,तसेच आपल्या दर्जेदार लेखन सहभागातून (यात प्रतिसादकही!)माबो समृद्ध करणाऱ्या लेखकांशी छोटेखानी प्रत्यक्ष मुलाखती/बातचित ई.

प्रतिसादांतून आपण जेवढा हल्ला करू शकतो, टोकाची भाषा वापरू शकतो ती धार त्या आइडीला प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोथट होते. संयमित गुळुमुळू लिहावे लागते. त्यामुळे काही गुप्त राहात असतील.
जुने लोक कंटाळले असतील.
मला स्वत:ला रिजॅाटचा बंदिस्तपणा आवडत नाही म्हणून घरूनही कधी कोणत्या रिजॅाटला गेलेलो नाही. परंतू एकदा (२०१२) डोंबिवलीत दहा माबोकर भेटलो होतो. भेटायला बोलायला नक्कीच आवडते॥ एकदा राणीबागेतल्या गटगला गेलेलो तिथे जागू,साधना,जिप्सी,उजू , नि३,इंद्रा अ से पंधराजणांची भेट झाली होती.
प्रश्न हा असतो की ठरवलेल्या कार्यक्रमात संयोजकांची गोची होते.
रिजॅाटवालेसुद्धा आपल्या एका विवक्षित गटाला रिजॅाट आंदण देत नाहीत,जो गेटवर येतो त्याला पैसे घेऊन आत घेतात. एकूण तारेवरची कसरत करत आयोजक कार्यक्रम संपन्न करतात.
काही कटु अनुभव विसरून सर्वजण पुन्हा उत्साहात एक होतीलच.

प्रिय संयोजकहो,
कुठल्याही मेळाव्याचे संयोजन करणे हे आव्हानात्मक असते आणि इथे बसून निव्वळ सूचना करणे खूप सोपे असते, याची मला कल्पना आहे. तरीही वरील सर्व मजकूर वाचल्यानंतर एका वेगळ्या धर्तीवरच्या गटगची कल्पना सुचवतो. बघूयात का त्यावर विचार करून? तर ते असे आहे :

१. एकाच गावातल्या लोकांचे गटग. वेळ फक्त तीन तास.
२. स्थळ : एखादी बाग, शाळेचा वर्ग किंवा कोणी आपल्या घराची गच्ची वगैरे देत असल्यास ती ( थोडक्यात शून्य वा नाममात्र खर्चाची)
३. खाणे: फक्त अल्पोपहार ( प्रती माणशी रु. ५० ही मर्यादा)
४. माबोवारील आवाहनातून लोक जमतात. प्रत्येक जण आपला परिचय करून देईल पण, तो/ती त्याचे खरेखुरे पहिले नाव (आडनाव सुद्धा नकोच) सांगेल आणि स्वताचे उद्योग, छंद इ. १० ते १२ मिनिटात.(संख्येनुसार वेळ)
५. कोणीही आपले माबोवारील नाव सांगणार नाही !!! (अर्थात संयोजक एकमेकाला माहित असतील एवढेच). येतोय याचा फायदा लक्षात? इथे बराच काळ वावरल्यानंतर एकमेकांबद्दलचे पूर्वग्रह पक्के झालेले असतात. तेव्हा त्याचा बिलकूल अडसर नको.
६. त्यामुळे सर्व उपस्थित (संयोजक, लिहिणारे सभासद आणि नुसते वाचनमात्र) हे सम पातळीवर असतील. थोडक्यात एका गावातले 'काही माबोकर' एकमेकाला भेटले आणि गप्पा.
७. वेळ असल्यास एखाद्याचे मनोरंजक भाषण वा एकपात्री प्रयोग ठेवायचा.

व्यावहारिक जगातले आपले आडनाव आणि इथला “आयडी” या दोन गोष्टी माणसाना एकमेकांजवळ येण्यापासून रोखतात (हेमावैम). तेव्हा या दोन प्रतिबंधांचाच त्याग करून एकत्र यायचा प्रयोग कसा वाटतो?

रिजॅाटवालेसुद्धा आपल्या एका विवक्षित गटाला रिजॅाट आंदण देत नाहीत,जो गेटवर येतो त्याला पैसे घेऊन आत घेतात. एकूण तारेवरची कसरत करत आयोजक कार्यक्रम संपन्न करतात. >>
संयोजक नेहेमीच असा प्रयत्न करतात की शक्यतो आपल्या माबोच्या मोठ्या गटाबरोबर दुसरा कुठला मोठा गट नसावा. तसे रिसॉर्ट्वाल्यांशी बोलून ठरवलेलं असतं. अनुभवानी सांगतोय की बहुतेक* रिसॉर्ट हे पाळतात. (त्यांचे फायदे - जेवण्/फॅसिलिटीज सगळ्यांना नीट वापरता येतात. गर्दी होत नाही आणि सगळं सुरळीत होतंच) (आपला फायदा - सेफ राहातं. आजूबाजूला मोस्ट्ली आपलेच लोक्स राहातात)
* मागच्या एका वविच्या वेळेला असं झालेलं नव्हतं.

या वर्षीच्या वेळेचं सांगायचं झालं तर - युनायटेड २१ चे आभारच मानायला हवेत. आपलं बुकिंग अपेक्षेप्रमाणे नाहीय हे त्यांना माहीत होतं तरीही केवळ शब्द पाळायचा म्हणून त्यांनी दुसरं मोठं बुकिंग घेतलं नाही (मे मी मिळालंही नसेल, पण शक्यता कमी कारण पावसाळ्यात लोणावळा हे हॉट डेस्टिनेशन पैकी आहे). सॉर्ट ऑफ आक्खा एरीया माबो वापराकरता असल्यासारखा होता (ठरवलेल्या हॉलसकट).

मोहन की मीरा तुमच्या पूर्ण प्रतिसादाला अनुमोदन तुम्ही अगदी माझ्याच मनातले लिहिलेत.
आठ-नऊ वर्षांपासून मायबोलीवर आहे. मायबोलीवर नवीन असतांना लिहायला, प्रतिसाद द्यायला भिती वाटायची कारण ईथे लिहिणारे खूप सुंदर लिहायचे आणि आपण काही लिहिले तर ते फार बाळबोध वाटेल असे सतत वाटत रहायचे. पण वाचायचा ऊत्साह खूप दांडगा असायचा जो अजूनही आहे पण दुर्दैवाने मायबोलीवर मुद्दाम वाचावे असे आता काही ऊरले नाही.
मायबोलीवर येण्याआधी मी पुस्तकं, सिनेमे, चांगले साहित्यं ह्या सर्वांबाबत खूप ऊदासीन होते पण मायबोलीने ह्या सर्वांची अशी गोडी लावली की हे सगळे आता आयुष्याचा भाग बनून राहिले आहेत.
पुण्यात असल्याने वर्षाविहार आणि ईतर भेटीगाठींना ऊपस्थिती लावायची खूप ईच्छा होत असे पण तेव्हा भीड चेपली नाही आणि आता ज्यांना भेटावे वाटेल असे कोणी मायबोलीवर येत नाहीत आणि लिहित नाहीत. Sad
वाचलेले नवीन पुस्तक धागा तर महिनोन महिने हलतंच नाही कोणी काही वाचतंच नाही की काय असे वाटते. पूर्वी अनेक जण रंगीबेरेंगी वर लिहायचे तेही लिहिणे बंद झाले. सध्या फक्तं राजकीय चर्चा, सिनेमे आणि आगापिच्छा नसलेले भारंभार धागे आणि त्याच त्याच लोकांचे सगळ्या धाग्यांवर प्रतिसाद.
माझ्या मायबोली प्रवासातला हा सर्वात लो पॉईंट आहे कारण मायबोलीवर न फिरकण्याचे दिवस एवढे वाढू लागले आहेत की आता पासवर्डही लक्षात रहात नाही. यावेसे, छान वाचावेसे खूप वाटते पण आले की दुसर्‍याच मिनिटाला भ्रमनिरास होतो. Sad
अ‍ॅडमिन साहेबांनी लक्ष घालून चांगल्या लोकांना लिहिते केले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे. काळ वेगाने बदलत आहेत म्हणून आपण चांगल्या साहचर्चेच्या, चर्चेच्या व्याख्या बदलू नयेत असे वाटते.
रेनी टाईम मध्ये वर्षाविहार वगैरे ठीक आहे पण ऊलट लोक ज्यावेळी कमी बिझी असतात ऊदा. रणरणत्या मे महिन्यातली एखादी शनिवार संध्याकाळ लॉनवर मायबोलीकरांशी छान गप्पा मारत ओळखी करून घ्यायला नक्कीच आवडेल.

हे 'वेडात माबो वीर दौडले १७' पुराण भलतच रंगलय.

>>आपण चांगल्या साहचर्चेच्या, चर्चेच्या व्याख्या बदलू नयेत असे वाटते.
>>. रणरणत्या मे महिन्यातली एखादी शनिवार संध्याकाळ लॉनवर मायबोलीकरांशी छान गप्पा मारत ओळखी करून घ्यायला नक्कीच आवडेल.
चर्चेची व्याख्या पुरतीच बदलून टाकलीत की... Happy
हलके घ्या. Wink

वाचलेले नवीन पुस्तक धागा तर महिनोन महिने हलतंच नाही कोणी काही वाचतंच नाही की काय असे वाटते. पूर्वी अनेक जण रंगीबेरेंगी वर लिहायचे तेही लिहिणे बंद झाले. सध्या फक्तं राजकीय चर्चा, सिनेमे आणि आगापिच्छा नसलेले भारंभार धागे आणि त्याच त्याच लोकांचे सगळ्या धाग्यांवर प्रतिसाद.
माझ्या मायबोली प्रवासातला हा सर्वात लो पॉईंट आहे कारण मायबोलीवर न फिरकण्याचे दिवस एवढे वाढू लागले आहे>>>> अनुमोदन....

>>शनिवार संध्याकाळ लॉनवर मायबोलीकरांशी छान गप्पा मारत ओळखी करून घ्यायला नक्कीच आवडेल.>>

उदा०
बोरिवलीतले एखादे उद्यान/ठाणे गडकरी रंगायतन/डॅाकयार्ड रोड - ब़प्टिस्टा गार्डन ?

सलग २ ते ३ वर्षे आल्यानंतर फक्त या आणी मागच्या वर्षी नाही आलो, (जॉब चेंज आणी रीलोकेशन)
१००% आलोच असतो जर वरील कारण नसते तर.

वेगवेगळ्या गृप्सवरच्या घमासान चर्चेमुळे यंदाच्या वविबद्दल आणि मग ह्या धाग्यावरच्या चर्वितचरणाबद्दल कळलं ... वाईट वाटलंच.
मी काही अगदी खूप जुनी-जाणती वगैरे नाही. पण गेली किमान ७ वर्षे माबोशी जोडले गेले आहे..
२०१२/२०१३ च्या दोन ववि ना हजेरीही लावली आहे! २०१२ चा १० वा ववि!! तो मी, रीया, तुमचा अभिषेक असे अनेक आणि मला वाटतं ह्या धागाकर्त्याचा पण पहिलाच ववि होता! खूप धमाल आली होती. अजय पण खास आले होते त्या वविला.. त्यांच्या हस्ते केक कापणे... त्यांना 'दिवा' भेट देणे... 'संगीत वस्त्रहरण' अशा अनेक कारणांनी तो गाजला. अनेक जाने-माने जु.जा. मायबोलीकर 'सदेह' भेटले.. या भेटी नंतर जुने 'जुने' राहात नाहीत.. नवे 'नवे' राहात नाहीत - सगळे मिळून एकाच एक अजब रसायन बनतं!! याचा पुरेपूर अनुभव तेव्हा घेतला होता!!
२०१३ चा तर 'चारोळीयुक्त' आणि एकदम 'एडव्हेंचरस' ववि होता!!
ववि आधीच्या धाग्यावर जेवढा दंगा चालायचा तेवढाच नंतर वृत्तांताच्या धाग्यावर चालायचा. नवीन लोकांना लिहिण्यासाठी भरीला घातलं जायचं.. हळूहळू सगळेच अहमहमिकेने सविस्तर वृत्तांत लिहायचे. आशुडी, मंजात्या यांच्या खुसखुशीत वृ ची सगळेच वाट बघायचे! न आलेल्याना पश्चात्ताप होऊन ते जळून कोळसे होतील ह्याची पुरेपूर काळजी घेतली जायची!! सगळ्यात दीर्घ प्रतीक्षा फोटोंची असायची - सगळ्यांचे 'विना हरकत प्रमाणपत्र' मिळाल्यावर आठवड्याच्या मुदतीनंतर फोटो प्रकाशित व्हायचे! परत दंगा !! पुढच्या वविला नक्कीनक्की जमवायचं ही मनाशी खूणगाठ बांधल्यावरच ते प्रकरण एकदाचं शांत व्हायचं! छे, शांत कसलं?! त्याचं कवित्व गप्पांच्या धाग्यांवर नवनवीन धुमारे फुटून बहरतच राहायचं - थेट पुढच्या ववि पर्यंत!!
हा सगळाच माहोल यंदा - किंबहुना गेल्या काही वर्षात 'मिसिंग' वाटला. प्रतिक्रियांमधे आलेली कारणं बरीचशी पटली.
माझंच वैयक्तिक सांगायचं तर दुसऱ्या ववि नंतर मात्र 'परत परत तेच तेच' असं वाटून नको वाटलं. उत्सुकतेने कोणाला नव्याने भेटावं असे लोकंही कमी झाले - असते आवड एकेकाची.
आणि एकूणच इथली प्रत्येक पिढी हेच म्हणत असली तरी हे परत म्हणावंसं वाटतंच, की माबोवरही आवर्जून यावं हे वाटणं कमी झालं. आयुष्याचा वेग अजूनच वाढला/ प्रायोरिटी बदलल्या/ लोकांशी कनेक्ट होण्याची साधनं बदलली - मुख्य म्हणजे माबोवरचं वातावरणही बदललं...
तरी त्याच उत्साहाने ववि, किंबहुना सगळेच उपक्रम आखणाऱ्या संयोजकांचं खरंच कौतुक!! मोकळं/ घरगुती वातावरण, बहरलेले गप्पाधागे असं माबोचं जुनं रुपडं परत मिळवायला ववि कायमच महत्वाचा असेल हे नक्की!!
यानिमित्ताने बोलावसं वाटलं म्हणून इथे आले तर पूर्वी 'मैत्रदिना'निमित्त आजच्याच दिवशी माबोबद्दल लिहिलेलं सापडलं - त्याची रिक्षा - https://www.maayboli.com/node/36937
यंदाचाही 'मैत्रीदिन' आहेच दोन दिवसांत! सगळ्यांना शुभेच्छा!!!

चांगली चर्चा ....... बरेच मुद्दे पटले, बरेचसे नाही पटले. संयोजकांनी मेहनत तर केलीच, बर्‍याच जणांनी त्याची जाणही ठेवलेली वाचून बरं वाटलं

वेमांचा प्रतिसाद आवडला, त्याआधी त्यांनी प्रतिसाद दिला हे जास्ती आवडलं Wink

दोन गोष्टी सांगायच्या होत्याच.......

१. मला खरच नाही फरक पडला १७ की ७० ह्याचा, कदाचित मी संख्येशी संबधित जबाबदार्‍या सांभाळत नव्हतो म्हणून असेल, पण फरक पडला नाहे हे खरय.

२. हे म्हणणं अरेरावीचं वाटलं असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. पण न येणार्‍यांविषयी मनापासून काहीच वाईट वाटलं नाही, त्यांना त्यांची कारणं असतील, ती त्यांच्यापुरती, येणार्‍यांच्या येण्यासाठीच्या कारणाइतकी,, खरीही असतील, ह्याची जाणीव आहे. कोणाविषयी कटुता नाही, आलेल्यांविषयी आत्मीयता मात्र नक्कीच आहे.

आणि हो, नवीन मेम्ब्रांसाठी ... मी ही नवीन होतो, अनेकांशी दुश्मनीही केली होती, भांडणंही झाली आणि वादही झाले. पण जे वाईट इथे घडलं ते इथेच सरलं, कॅरी फॉर्वर्ड केलं नाही, मी ही नाही आणि ज्यांच्याशी भांडलो त्यांनीही नाही. जे भेटले ते सगळे मनापासून भेटले. खर्‍या किंवा कृत्रिम पावसात मनातली सगळी किल्मिषं वाहून गेली बहुधा. पण वविनंतर मोकळं वाटतं हे मात्र खरं.

त्यामुळे कसलाही किंतु मनात न बाळगता नक्की या, कितीही कंपू असले तरी ववि सगळ्यांना एकत्र आणतो हे नक्की. एकदा अनुभव घेऊन पहायला काय हरकत आहे नाही का ?

त्यामुळे कसलाही किंतु मनात न बाळगता नक्की या, कितीही कंपू असले तरी ववि सगळ्यांना एकत्र आणतो हे नक्की. एकदा अनुभव घेऊन पहायला काय हरकत आहे नाही का ?
>> +१००

"मायबोली ही एक ब्राह्मणी तोंडवळा असलेली साईट आहे हे कीतीही नाकारले तरी सत्य आहे.इतरेत्तर जनांना जरा हा प्र्कार फारच कल्चरल शॉक वाटतो.
गाडीत गाण्याच्या भेंड्या खेळणे ,चिल्लीपिल्ली घेऊन खेळत बसणे इज नॉट् टुडेज फन."

हे खरे आहे - आणि हे मी असे भीडभाड ना ठेवता लिहू शकलो नसतो . पण सांस्कृतिक धक्का हा बसतोच !

"मी तर म्हणतो पुरुषांसाठी व स्त्रीयांसाठी वेगळे ववि ठेवा.पुरुष वविमध्ये दारु,चकण्याला तंदूरी,स्मोकींगची परवानगी वगैरे आकर्षण ठेवा.बघा कशी गर्दी होते ते.मी पण येईन पुढल्यावेळेला"

नाही - आणि तसेही पुरुरुषांच्या दारू आणि मांसाहार पार्ट्या होत असतातच . आणि मला आणि अनेक जणांना अनोळखी लोकांबरोबर पिणे आवडत नाही .
-----------------------

अनेकजणांनी इथे भावनिक आवाहन केले आहे कि नाही सर्व काही ठीक होईल . पण प्रतिसाद भावनांवर चालत नसतो ...
मी गेल्या ४-५ वर्षांचे मायबोली चे धागे वाचले तर तिचा कल हा माहितीपूर्ण आणि मैत्रीपूर्ण धाग्याकडून राजकीय आणि चावणाऱ्या धाग्यांकडे जाताना दिसला . त्यामळे ती मायबोली राहिली नाही यात तथ्य असावे असे वाटते .

तसेच एकूणच तरुण मराठी वाचकांचे प्रमाण कमी होत आहे यात आश्चर्य नाही . मराठी लोकांचे राहणीमान बरेच सुधारत आहे आणि त्याचबरोबर मराठी शाळेत ना घालण्याची वृत्ती हि वाढत आहे . मी ८९ मध्ये दहावी झालो त्यावेळी मराठी माध्यमात बरीच चांगली मुले होती . पुढच्या १० वर्षात ते प्रमाण कमी होत गेले . बरोबरीच्या कोणीही आपल्या मुलांना मराठी माध्यमात घातले नाही .. आणि यात मला वावगे काही वाटत नाही . त्यामुळे मायबोलीचे वय आता वाढतच जाणार आहे .. तसेच तिचा आधार हा अधिक अधिक ग्रामीण महाराष्ट्राकडे सरकत राहील . माझ्या आसपासच्या वयाचे सुद्धा ( ४०-४५ वर्षे ) मुंबईच्या पॉश भागात ( कफ परेड , मलबार हिल ,वरळी समुद्र किनारा , जुहू , पश्चिम वांद्रे ) कोणी म्हणजे कोणीही मराठी माध्यमात नव्हते . तोच प्रकार पुढच्या १० वर्षात पश्चिम उपनगरात झाला आणि नंतर जवळपास सर्व मुंबईत झाला . आताही मला खरेतर ऋन्मेऽऽष सारखा तरुण मुंबईकर ( असा माझा कयास आहे) मायबोलीवर त्याचे अत्यंत आश्चर्य वाटते ....

तर सांगायचे गोष्ट हीच कि मायबोली चा वाचकवर्ग बदलत आहे - आणि त्यांना आवडेल असे काही केले नाही तर वर्षाविहाराच नाही तर असाच प्रतिसाद मायबोलीला मिळू लागेल !

विचारजंत छान पोस्ट. शब्द न शब्द मला ही पटला.
माझ्या पुरते काही कयास...
१. जेव्हा मी माबोवर नविन होते तेव्हा जो ग्रुप अ‍ॅक्टिव्ह होता त्यात (दिनेश, आरती, बॉम्बे वायकिंग, अंतुबर्वा, सत्या, डॅफो आणि इतर अनेक लोक होते. तेव्हा व्हॉटसप किंवा फेसबूक नव्हते, माबो हा एकच प्लॅटफॉर्म होता सर्वांना एकत्र यायला.

२. त्याच दरम्यान नविन फळी तयार झाली ज्यात मी, अनेक कट्टेकर, गगोकर, पु पु कर इ. होते. गजाली किंवा कोल्हापूर गृप वरचे लोक ही अ‍ॅक्टिव्ह होतेच पण त्या त्या गृप पुरते. कुणी देशात आले किंवा गावाबाहेरून आले तर धागे उघडून गटग ठरवली जात. या काळात ही फेसबूक व्हॉटसप (सुरुवातीला) नव्हतेच. अलिकडे २-३ वर्षापुर्वी जेव्हा व्हॉट्सअप फार इफेक्टिव्हली वापरले जाऊ लागले तेव्हाही अनेक लोक दिवसभर माबो आणि जिथे अ‍ॅक्सेस नसेल तिथे मोबाईल वर आपापल्या गृपात गप्पा मारू लागले.

३. दरम्यान संयुक्ता बंद झाले आणि जवळ जवळ ५०% पेक्षा जास्त स्त्री वाचक वर्ग माबो पासून दुर गेला. याच वेळी वाहत्या पानावरच्या लोकांनी आपापली गप्पांची पाने व्हॉटसप वर हलवली होती. इथवर लोकांना जेन्युइनली नव्या ओळखी करून घ्याव्यात, त्यांच्यात मिसळावे असे वाटत होते हे नक्की. कारण कित्येक नव्या फळितले लोक ववि संयोजनात उतरले होते (फक्त ववि पुरतं बोलतेय)

४. कित्येक वर्षापासून निव्वळ वाचक असलेले लोक हळू हळू नव्याने लिहू लागले. आधी विविध विषयावर होणार्‍या चर्चा आता राजकारण आणि एकमेकांची उणिदुणी या पुढे जायला तयार होईनात. त्यातूनही माझ्यासारखे लोक अजुनही माबोवर येतात (प्रतिसाद, लिखाण) भले ही कमी झालं असेल पण भेट चुकत नाही.
त्याशिवाय एक अत्यंत महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे जेव्हा मी माबोवर रुळले तेव्हाचं मैत्री आणि खेळिमेळिचे वातावरण, जिथे असं वाटायचं की माबोवरची ओळख म्हणजे १००% जेन्युइन आणि खरी. लगेच अरे तुरे किंवा आन्द्या, मने अशा प्रकारची संबोधनेच व्हायची आणि तिथे जो विश्वास होता आणि तो तेव्हाच्या लोकांनी सार्थ ठरवला तो विश्वास किंवा ती निखळता सध्या दिसत नाही. कित्येक लोक लिहितात भरभरून पण माबो त्यांना फक्त प्रतिसाद द्यायला/घ्यायला आणि लाथाळी करायला वापराविशी वाटते. त्यामुळे माबो व्यतिरिक्त जो 'टच' आहे तो आता उरला नाही.
मी गर्वाने सांगेन की वेळकाढू अपर्णा असो, किंवा जागु असो या दोघी मी काळ्या की गोर्‍या ते ही पाहिलेल्या नाहीत पण त्या दोघी अत्यंत जवळच्या आहेत मला. वेका बरोबर तर मी अमेरिकेला फोन करून तासन तास गप्पा मारल्या आहेत. वर्षुनील बरोबर जी मैत्री २००९ च्या आसपास कधी तरी झाली ती आजही टिकून आहे मी तिला शेवटचं केव्हा भेटले होते ते आठवत नाही, बहुधा २०१२ साली पण आज ही आम्ही एकमेकिंच्या टच मध्ये आहोत आणि वेळोवेळी सुखदुख वाटून घेतली आहेत. विशाल कुलकर्णी ने पण इथे येणं बंद करून बराच काळ लोटला पण आम्ही टच मध्ये आहोत.
वेळ बदलते, वय वाढते तशा प्रायॉरिटिज ही बदलतात ही गोष्ट सत्य आहे पण त्यातूनही ज्यांना खरंच मराठी आणि मायबोली बद्दल प्रेम होते ते प्रेम अजूनही आहेच. शिवाय माबो ने जो गोतावळा जमवून दिला तो सगळे जतन करत आहेत.
मायबोली ने मला काय दिलं ते शब्दात व्यक्त करणं कठिण आहे.
आपण आपलं बालपण एका वाड्यात घालवतो, वेळे नुसार काही जण मोठ्या घरात जातात, काही बाहेरगावी जातात, वास्तव्या आभावी वाडा पडका होतो, आपण नियमित जातो अथवा कधी मधी भेट देतो पण मायेचा ओलावा मनात असतोच कायम. वाडा सोडून गेलेले लोक सुध्दा वाड्याच्या आठवणी मनात राखून असतात भले ही ते वाड्याला नियमित भेट देवोत अथवा न देवोत. तसंच काहीसं आहे माबोच्या बाबतीत.

बागुलबुवा प्रमाणेच मला ही वर्षाविहाराला किती लोक आले हे महत्वाचं वाटत नाही. जे आले त्यांना आनंद मिळाला हे महत्वाचं. नव्याने आलेल्या लोकांना ही तिथे सामावून घेतले जाते हे नक्की पण ते अनुभवावेच लागेल फक्त शाब्दिक हमी पुरेशी नाही.
अजून काय लिहू? भरपूर गोष्टी आहेत मनात, पण अस्थायी ठरू नयेत म्हणून थांबतेय.

दरम्यान संयुक्ता बंद झाले आणि जवळ जवळ ५०% पेक्षा जास्त स्त्री वाचक वर्ग माबो पासून दुर गेला. >> अगदी अगदी . इतर कुठलेही धागे पटले नाहीत तरी संयुक्ता मध्ये खूप रमायला होत होत . संयुक्ता बंद पडल्यापासून सगळी मजाच गेली
आधी विविध विषयावर होणार्‍या चर्चा आता राजकारण आणि एकमेकांची उणिदुणी या पुढे जायला तयार होईनात. >> +१११

संयुक्ता हा मायबोलीचाच एक भाग होता जो फक्त स्त्रियांसाठी होता तिथल्या प्रवेशाला सुद्धा काटेतोल नियम होते आणि तिथे खूप चर्चा चालायच्या अतिशय हेल्दी. आणि त्यातून अनेकांना फायदाही झाला होता. "संयुक्ता" हा एकूणच इथल्या सर्व स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. कित्येक स्त्रिया तर फक्त संयुक्ताच वापरीत.
ते का बंद झाले त्याचे कारण वेमांनी दिले होते पण आता माझ्या लक्षात नाहिये.

दक्षिणा खूप सुंदर लिहिलेयस. माझेही मायबोलीबाबत असेच झालेय. पण मायबोली अजूनही खूप आवडती आहे, जवळची आहे. माबो सोडून इतर कुठल्याही मराठी साईट वर जाणे होत नाही, जरी आयडी असला तरीही.

संयुक्तामधले लेख फक्त सदस्य स्त्रियांना वाचता येत होते, त्यामुळे इतर स्त्रिया ज्या मायबोलीवर वाचन मात्र आहेत त्यांना त्या लेखांचा लाभ होत नव्हता. सदस्य स्त्रियाची संख्या 500 च्याही आत होती. म्हणून संयुक्तावर फक्त स्त्री सभासदांसाठी हे बंधन काढून टाकण्यात आले. बाकी संयुक्त बंद वगैरे काही झाली नाहीय.

माबो सोडून इतर कुठल्याही मराठी साईट वर जाणे होत नाही, जरी आयडी असला तरीही. >> सेम पिंच. माझा मिसळ्पाव वर आहे आयडी. पण मी जात नाही.

माबो सोडून इतर कुठल्याही मराठी साईट वर जाणे होत नाही, जरी आयडी असला तरीही. >> सेम पिंच. माझा मिसळ्पाव वर आहे आयडी. पण मी जात नाही.>>दोघींनाही चिमटे..माझपन तसच आहे.. पण हे ही एक खरय कि आजकाल इथे लिहीणं नकोस वाटत मला.. कंटाळा येतो इथल्या त्याच त्याच चर्चेचा, चिखलफेकीचा..

दक्षिणा, टीना +1.
अगदी अगदी... मी पण फक्त रूनमेश आणि सिंथेटिक जिनियस च्या धाग्यांमुळे माबो वर येतो...तेवढेच घटकाभर करमणूक... कंटाळा आलाय बाकी राजकारणी चिखलफेकीचा...

Pages