वर्षा विहार २०१७: फक्त १७ जणच का ?

Submitted by केदार जाधव on 31 July, 2017 - 01:05

मित्रानो ,

काल मायबोलीचा २०१७ चा ववि पार पडला . माझी ३.२ वर्षाची ओवी धरून ( तिचा हा तिसरा ववि) अवघे १७ लोक होते. मुंबईहून ८ अन पुण्याहून ९.
अर्थात या १७ जणानी धमाल केली , नवे जुने मित्र भेटले , ओवीने अगदी दंगा घातलाही.
पण मला पडलेला प्रश्न होता की १७ च का ? संयोजक सोडून तर फक्त ६ लोक ?

१. गेल्यावेळी साधारण १२० लोक होते
२. गेल्या वविला काही मोठे प्रॉब्लेम झाल्याचही आठवत नाही
३. संयोजक अन त्यांचे प्रयत्नही तितकेच .

मग नक्की झाल तरी काय ? काही संयोजकांशी मी चर्चा केली , पण त्यांची उत्तरे फारशी पटली नाहीत .
सगळ्यांचे स्वतःचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतीलही , ते नेहमी भेटत असतीलही , पण वविचा युएसपी नविन लोकाना भेटणे हा होता , ते वविला कसे रिप्लेस करू शकेल ?
आणि २०११ मधले ७०० अन २०१७ मधले ११०० रू एकच ना ?
अन गेल्या वेळच्या सगळ्या १२० लोकाना असे Unavoidable Issues असतील की Priorities बदलल्या आहेत ? नवीन कुणीच नाही ?

मनात आल तस लिहित गेलोय . कदाचित थोड्या वेळाने वेगळे विचार येतीलही , पण थोड अस्वस्थ वाटल इतकच .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजूनही कोणीच जुने जाणते काही म्हणाले नाही ह्यावरून असच वाटतंय कि केवळ वाचक असलेल्यांसाठी व वि नसावा ...
नवीन Submitted by सच६४८६ on 1 August, 2017 - 16:53

<<

जुने जाणते म्हणतील तेंव्हा म्हणतील, मात्र तुम्हाला स्वत:ला वविला जायची आवड/इच्छा असेल तर नावनोंदणी करुन तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला कोणीही नाही म्हणणार नाही. आता यावर्षीचा ववि तुमचा चुकलाय, पुढील वर्षाचा ववि चुकवू नका.

अजूनही कोणीच जुने जाणते काही म्हणाले नाही ह्यावरून असच वाटतंय कि केवळ वाचक असलेल्यांसाठी व वि नसावा ...>>

अस काहीही नाहीये . प्रत्येक सभासद वविला येऊ शकतो अन त्याच स्वागतच असत Happy

अजूनही कोणीच जुने जाणते काही म्हणाले नाही ह्यावरून असच वाटतंय कि केवळ वाचक असलेल्यांसाठी व वि नसावा ...>> जुने जाणते म्ह णजे नक्की कोणी लिहावे अशी अपेक्षा आहे?
मागच्या वर्षी मी लोकांच्या मनात वर्षाविहाराची नक्की काय कल्पना आहे ते जाणून घेण्यासाठी एक मुक्त संवादाचा धागा उघडला होता, त्यानुसार अनेक नविन लोक आले ही होते. धमाल केली. त्या वर्षी माझ्यावर आडून आडून घरचं कार्य असल्यासारखी बोलावणी करतेय वगैरे पण शेरे झाले. या वर्षी पुन्हा तसाच धागा काढणं मला उचित वाटलं नाही (जरी या वर्षभरात अनेक नविन सदस्य झाले असले तरिही) कारण दरवर्षी काय लोकांच्या भावनेला हात घालायचा? Uhoh
आम्ही काही मोजके लोक आहोत आणि आमचं मायबोलीवर निस्सिम प्रेम आहे ( हे मी सतत टच मध्ये असल्याने बोलते आहे याचा अर्थ बाकिच्यांचे मायबोलीवर प्रेम नाही असे नाही.) पण मला सगळेच अत्यंत प्रिय असल्याने मुंबईकरांनाही भेटायला मिळावे म्हणून मी आवर्जुन वविला जातेच, शिवाय अनेक वर्ष संयोजनात सुद्धा आहे.
उलट नव्या लोकांनी मागे राहू नये, पुढे यावे, संयोजनात यावे, नव्या कल्पना सुचवाव्यात इ. गोष्टींना प्रोत्साहनच मिळेल याची खात्री आहे. यावर्षी मुग्धा केदार ही प्रथमच वविला आली होती तिची प्रतिक्रिया आपण वाचलीच असेल. अत्यंत कमी लोक असोत अथवा जास्त, थोडं आपण किती मिक्स होतो यावर ही आहे.
फक्त वाचकांना वविला प्रवेश नाही, किंवा जुने जाणतेच संयोजन करू शकतात असं काहीही नाहीये.
सर्वांनी चर्चा करून नवे काही करता येते का ते ही पाहू शकतोच.

तसे करण्यात उलट अधिक आनंद आहे.

थोडे विषयांतर आहे, पण बर्‍याच नविन लोकांना सहभागी कसे व्हावे असा प्रश्न पडताना दिसतो आहे.

त्या नव्या लोकांना गणेशोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण. या आणि समिती मध्ये काम करा. गणेशोत्सव आपल्या सर्वांचा आहे त्यामुळे मी नविन कसे जावू वगैरे विचार करू नका Happy

इथे अजून माहिती मिळेल :
https://www.maayboli.com/node/63105

मी येत नाही वविला पण वृत्तान्त नेहमी वाचतो. पुढच्या वेळेस दुप्ट उत्साहाने माबोकर येतील ही खात्री आहे.

मी येत नाही वविला पण वृत्तान्त नेहमी वाचतो. पुढच्या वेळेस दुप्ट उत्साहाने माबोकर येतील ही खात्री आहे.
>> आमेन Happy

टुकार लोकांकडेही फोरव्हिलर्स आल्या आहेत,त्यांचे पावसाळी पर्यटन जूनमध्येच होते.प्लस व्हॉट्सापमुळे लोक अगदी तासात ट्रीप ठरवतात.व जातात ही.
मायबोली ही एक ब्राह्मणी तोंडवळा असलेली साईट आहे हे कीतीही नाकारले तरी सत्य आहे.इतरेत्तर जनांना जरा हा प्र्कार फारच कल्चरल शॉक वाटतो.
गाडीत गाण्याच्या भेंड्या खेळणे ,चिल्लीपिल्ली घेऊन खेळत बसणे इज नॉट् टुडेज फन.
मी तर म्हणतो पुरुषांसाठी व स्त्रीयांसाठी वेगळे ववि ठेवा.पुरुष वविमध्ये दारु,चकण्याला तंदूरी,स्मोकींगची परवानगी वगैरे आकर्षण ठेवा.बघा कशी गर्दी होते ते.मी पण येईन पुढल्यावेळेला.
maayboli should come out of this brahmin marathi madhyamvargiy mansikata

टुकार लोकांकडेही फोरव्हिलर्स आल्या आहेत,त्यांचे पावसाळी पर्यटन जूनमध्येच होते.प्लस व्हॉट्सापमुळे लोक अगदी तासात ट्रीप ठरवतात.व जातात ही.
मायबोली ही एक ब्राह्मणी तोंडवळा असलेली साईट आहे हे कीतीही नाकारले तरी सत्य आहे.इतरेत्तर जनांना जरा हा प्र्कार फारच कल्चरल शॉक वाटतो.
गाडीत गाण्याच्या भेंड्या खेळणे ,चिल्लीपिल्ली घेऊन खेळत बसणे इज नॉट् टुडेज फन.
मी तर म्हणतो पुरुषांसाठी व स्त्रीयांसाठी वेगळे ववि ठेवा.पुरुष वविमध्ये दारु,चकण्याला तंदूरी,स्मोकींगची परवानगी वगैरे आकर्षण ठेवा.बघा कशी गर्दी होते ते.मी पण येईन पुढल्यावेळेला.
maayboli should come out of this brahmin marathi madhyamvargiy mansikata

>> उगाच आपल काहीही लिहायच म्हणून लिहायच Sad
मी अगदी कोल्हापूरचा मराठा आहे , पण आमच्यात ही फॅमिली ट्रीप असतात .

गाडीत गाण्याच्या भेंड्या खेळणे ,चिल्लीपिल्ली घेऊन खेळत बसणे इज नॉट् टुडेज फन. >>
बर दादा Happy

१. वविला आजवर कधीच गेलो नाही. माझे कारण स्पष्टपणे सांगतो. मायबोलीला माझ्या आयुष्यात व मनात मी फार प्रचंड जागा घेऊ दिली आहे. माझी जवळपास संपूर्ण लेखन कारकीर्द येथेच झाली असे म्हणावे लागेल. आज मी प्रत्यक्ष जगात साहित्यक्षेत्रात जे काही सहजरीत्या कमवू शकतो त्याचा बेस मी मायबोलीवर केलेले लेखन आणि त्याला मिळालेली बेसुमार लोकप्रियता ह्यात आहे हे नक्कीच! पण ह्याच मायबोलीवर मला सातत्याने असे अनुभवही आले आहेत की होत असलेली टीका वाचून बीपी वाढावे, प्रत्यक्ष आयुष्यातील लक्षच कमी व्हावे वगैरे! प्रत्यक्ष आयुष्यावर त्याचा प्रभाव पडू देऊ नये ह्या गोष्टीचा सराव व्हायला मला जो वेळ लागला तो ह्यामुळे की मायबोलीआधी मुळातच मी इन्टरनेटवर फार तर वर्ष दिड वर्ष इतर साईट्सवर होतो. त्यामुळे येथील प्रत्येक गोष्ट अतिशय सिरियसली घेणे ते अजिबात लावून न घेणे हा प्रवास माझ्यासाठी दीर्घ व त्रासदायक ठरला. ह्या दरम्यान ज्यांच्याशी वाजले त्या लोकांना ववि आणि गटगला प्रत्यक्ष भेटल्यावरही त्यांच्या माझ्याप्रती असलेल्या वर्तनात काडीचा फरक आढळला नाही, काही अपवाद नक्कीच आहेत. मला स्पेशल वागणूक नकोच होती पण प्रत्यक्ष आयुष्यातही तेच कॅरी होत असेल असे वाटले नव्हते. तेथेही दुर्लक्ष, तुटकपणा, जाणीवपूर्वक एकटे पाडणे, सामील करून न घेणे हे गटगचे अनुभव वविलाही येणार हे मला माहीत होते. त्यामुळे मी एकदाही वविला आलेलो नाही. बाकी वैयक्तीक आयुष्यात मी अनेक सहली करत राहिलो. हे सगळे लिहिताना खरोखरच मला कोणालाही दोष द्यायचा नसून माझ्यापुरती कारणमीमांसा नोंदवायची आहे. नुकत्याच पुण्यात हार्वेस्टला झालेले गटग मात्र सुरेख झाले पण त्यातले बरेचजण हे आता माबोवर दिसतच नाहीत.

२. क्लास व मास ही रानपाखरु ह्यांची मीमांसा मला पटली नाही किंवा कदाचित समजलीच नसेल. पण मला तसे काही वाटत नाही.

३. वेमांचा प्रतिसाद इन्टरेस्टिंग आहेच.

४. ब्राह्मणी तोंडावळा आहे असे मलाही आधी वाटायचे (मी त्यातलाच असूनही) पण म्हणून एकांगी कधीच नाही वाटायचे. पण आता ब्राह्मणी तोंडावळा वगैरेही वाटत नाही, आता म्हणजे गेल्या तीन चार वर्षांत! (ह्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही). म्हणजे आधी मला फक्त असे वाटायचे की संख्येने ब्राह्मण सदस्य अधिक आहेत इतकेच, त्यात कोणताही छुपा अजेंडा वगैरे तर अजिबातच वाटायचा नाही.

५. 'आता इथले वातावरण' ह्या स्वरुपाची विधाने मला पटत नाहीत. मी आधीही लिहिले आहे व आताही लिहितो की ज्यांना चांगले लिहायचे, वाचायचे आहे त्यांच्यासाठी 'राजकीय हाणामारी' अजिबात नसलेले कित्येक धागे येतच आहेत की?

चु भु द्या घ्या

सिंजींची पोस्ट इग्नोर करा,
पण त्यांनी मांडलेला मुद्दा व्हॅलीड आहे,

हल्ली प्रत्येक सर्कल चा एक ग्रुप झालेला असतो, आणि त्या त्या सर्कल चे प्रोग्रॅम्स चालू असतात, जून-जुलै चे 8 रविवार भरायला वेळ लागत नाही,
मे ववीला येण्याचा सेरिअसली विचार करत होतो, पण आधीचे आणि पुढचे वीक एन्ड दुसऱ्या गृप बरोबर कार्यक्रम ठरला(एक कॉलेज गृप अँड दुसरा फॅमिली) ओळीत 3 वीक एन्ड उनाडायला नको म्हणून माबो ववी चा बळी गेला Sad

अर्थात सगळ्यांचे प्रोग्रॅम्स याच वर्षी आले का? गेल्या वर्षी का नव्हते , याचे माझ्या थिअरी मध्ये उत्तर नाही, कदाचित एक वर्षात सोशल मीडिया/ दुसरे सर्कल जास्त पेनिट्रेट झाले असेल.

हल्ली प्रत्येक सर्कल चा एक ग्रुप झालेला असतो, आणि त्या त्या सर्कल चे प्रोग्रॅम्स चालू असतात, जून-जुलै चे 8 रविवार भरायला वेळ लागत नाही,
मे ववीला येण्याचा सेरिअसली विचार करत होतो, पण आधीचे आणि पुढचे वीक एन्ड दुसऱ्या गृप बरोबर कार्यक्रम ठरला(एक कॉलेज गृप अँड दुसरा फॅमिली) ओळीत 3 वीक एन्ड उनाडायला नको म्हणून माबो ववी चा बळी गेला Sad
अर्थात सगळ्यांचे प्रोग्रॅम्स याच वर्षी आले का? गेल्या वर्षी का नव्हते , याचे माझ्या थिअरी मध्ये उत्तर नाही, कदाचित एक वर्षात सोशल मीडिया/ दुसरे सर्कल जास्त पेनिट्रेट झाले असेल.

>> सिंबा , व्हॅलिड मुद्दा , पण माझ्या मते याच उत्तर प्रायोरिटीज मधे आहे .
जुलै शेवटचा आठवडा रविवार ववि हे एक वर्ष आधी माहित असत . तरीही जर त्यात प्रोग्रॅम ठरत असेल तर (मी यात अनपेक्षित अडचणी धरत नाही ) तर मग प्रायोरिटीज वेगळ्या आहेत कदाचित .

यावेळेस जाहिराती चांगल्या होत्या. त्यामुळे इतके कमी लोक आले हे वाचून आश्चर्य वाटले. मलाही ते क्लास-मास चा संबंध वाटला नाही. मुळात क्लास वाले असे कोण भारी लोक आहेत असे काही नाही, पण एक मिनीट ते आर्ग्युमेण्ट खरे धरले, तरी ते क्लास वाले ववि ला मुळातच फारसे जात नसावेत. त्यामुळे त्याने असे काही होईल ही शक्यता कमीच आहे.

काही स्टार लोक असतात. क्राउडपुलर्स. ते गळाले तर इतरही गळतात. तसे काही झाले काय? आमच्या ११ वी च्या वर्गात एक मुलगी होती. वर्गाच्या ट्रिप ला ती नाही म्हंटल्यावर सुमारे ४० जण गळाले असे ऐकले होते Happy तसे काही झाले असल्यास माहीत नाही. हे कोणाच्या रोमॅण्टिक इण्टरेस्ट च्या अर्थाने नाही, पिकनिक्/पार्टीज मधे लोक स्टार असतात त्या अर्थाने घ्या.

फा, मला नाही तसं जाणवलं. सगळं अगदी नेहेमीप्रमाणेच झालं यावेळीही. पायलट, जाहीराती फिरवणं (यात बाफंवर जाहीराती कमी कारण नेहेमीचे बाफं सोडता बाकी बाफं पाहीलेसुद्धा जातनाहीत; याकरता वेमा साईट्वरच अ‍ॅड्स देतात. ते केलंच...) आणि बाकी पुढल्या गोष्टीही.
इथे लिहितोय पण अगदी पर्सनल फोनकॉल्सही केलेत ओळखींमध्ये. पण बुकिंग्जच आली नाहीत हे (च) ही खरंय...

>> सिंबा , व्हॅलिड मुद्दा , पण माझ्या मते याच उत्तर प्रायोरिटीज मधे आहे .>>>>>

आणि मुद्दा हा जुलै चा शेवटचा रविवार फ्री ठेवण्याचा नाहीये, सामान्य माणसाला वेळेचे बजेट सुद्धा सांभाळावे लागते, जर एक पावसाळ्यात 5 ट्रिप्स ठरत असतील तर त्यातल्या कुठल्यातरी 2-3 ट्रिप्स ना कात्री लागणारच,
(हे फर्स्ट टायमर्स साठी म्हणतोय) माबो चा ववी हे unknown अँजेल आहे, आणि 20 वर्षे बरोबर असणारा कॉलेज गृप/ 5 वर्ष बरोबर असणारा ऑफिस गृप, अजून काही गृप हे नोन devil,
त्यामुळे आपोआप प्रायोरीटी ठरून जातात,
असो..
पुढच्यावेळीचा दिवस मार्क करून ठेवतो, Happy

वेमा छान प्रतिसाद,
आणि हे खालचे फार ईंटरेस्टींग तसेच आशादायक वाटले.
>>>>>
खरं तर हा जुलै २०१७ महिना मायबोलीवर आजपर्यंत सगळ्यात जास्त वाचकसंख्या असलेला महिना ठरला. यात फक्त रोमातच (वाचनमात्र) असणारे वाचकच नाही तर लॉगीन करून येणार्‍या सभासदांचीही संख्याही विक्रमी आहे. आणि जर तो ट्रेंड पाहिला (आणी ट्रेंडचा वाढ्ता आलेख) तर तो नक्कीच आशादायी आहे.
>>>>>

एक बाकी आहे, या धाग्यामुळे पुढच्या वविचा आकडा वाढणार हे नक्की!

सिंबा, आपला पावसाळ्यातल्या ५ सहली आणि unknown अँजेल, नोन devil हा मुद्दा पटण्यासारखा आहे.
बाकी ईथे १२० चा १७ आकडा झाला असेल तर नेहमीचे वविवीरच मोठ्यासंख्येने गळाले आहेत.
वेमानी दिलेले आकडे बघून वविला जाणार्‍यांची संख्या कमीजास्त होणे आणि मायबोलीचा वाचकवर्ग कमीजास्त होणे याचा आपसात काही संबंध नाही हे बघून बरेही वाटले.
म्हणजेच गणपती वा दिवाळी अंकाबाबत घटलेल्या प्रतिसादाशीही याचा काही संबंध नाही. मायबोली थंड पडलीय वगैरे बोलू शकत नाही.
बहुतेक काहीतरी वेगळा उपक्रम राबवायची गरज आहे. नेहमीसारखे सर्टीफिकेट वाटपाऐवजी बक्षीसवाटप स्पर्धा. माफक एंट्री फी ठेवून वगैरे. वर्षासहलीच्या ऐवजी किंवा त्याचबरोबर एखादा साधासोपा महिलांनाही जमेल असा हिवाळी ट्रेक.. किंवा आणखी काही.. आयड्या मागवायला सुरुवात केली तर बरेच येतील.

तुमचे गोल आणि स्ट्रॅटेजी काय आहे हे मजला कल्पना नाही पण

तुम्ही दिलेला सदस्यसंख्या, सेशन्स संख्या आणि पेज व्हूचा डेटा ववित पडलेल्याल्या दुष्काळाची ऊत्तरं शोधण्यास पुरेसा नाहीच तर फसवा आहे.

अ‍ॅवरेज युजर मायबोलीशी कनेक्ट होत आहे की नाही त्यासाठी
पर युजर प्रत्येक पानावर घालवेला वेळ (क्वालिटी),
पर युजर सरासरी प्रतिसादसंख्या (क्वालिटी),
पर युजर सरासरी धागा संख्या (वॅल्यू),
पर युजर सरासरी विपू संख्या (वॅल्यू)

क्वालिटी - अ‍ॅवरेज मायबोलीकरांना त्याला मायबोलीवर पुन्हा पुन्हा खेचून आणणार्‍या साहित्याचा दर्जा
वॅल्यू - अ‍ॅवरेज मायबोलीकराला ईतर मायबोलीकरांच्या प्रतिसाद आणि व्यक्तीगत मताचे महत्व

ह्या सगळ्यांचे टाईमलाईन चार्ट्स अपवर्ड स्लोपिंग आहेत की डाऊनवर्ड ते कळेल का? माझ्यामते त डाऊनवर्ड स्लोपिंग असतील.

तुम्ही दाखवलेला हा फक्तं मोमेंटम फॅक्टर चार्ट आहे. क्वालिटी आणि वॅल्यू कंपॉझिट फॅक्टर चार्ट्स वरती लिहिलेले रेशो अ‍ॅनालिसिस करून मिळू शकतील. हाय मोमेंटम आहे म्हणून हाय क्वालिटी (हायपोथेटिकली - ह्युंडाई गाडी जास्तं विकली गेली म्हणून तिला होंडाची क्वालिटी येत नाही) आणि हाय वॅल्यू ( हायपोथेटिकली - ह्युंडाई स्वस्तं आहे म्हणून होंडापेक्षा जास्तं विकली जात नाही) असेलच असे नाही.

क्लास साठी ऑडी ही नको आहे आणि मास साठी ह्युंडाई ही नको आहे .. मोमेंटम, क्वालिटी आणि वॅल्यू तीनही अल्फा फॅक्टर्स एकत्रं असल्याशिवाय होंडासारखे अपील आणि अ‍ॅक्सेप्ट्न्स मिळून येत नाही.

अर्थात तुमचे गोल आणि स्ट्रॅटेजी काय आहे हे मजला कल्पना नाही त्यामुळे मी लिहिलेले हे सगळे निरर्थक वाटू शकेल.

ते वेमांच अ‍ॅनालिटिक्स मध्ये गडबड वाटली.

नुसता ग्राफ बघून काय कामाचा? आता तुमच्या गरजा (सेल्स आणि मार्केटींगच्या नजरेने) वेगळ्या असतील आणि म्हणून हि परीणामं असतील तर माहीत नाही पण वरती जे पॅरामीटर्स आहेत ना , हुप्याहुप्याने लिहिलेले विचारात घ्यायला हवे.
नाहितर नुसते लॉगिन करून लोकं पळतात...

बाकी, ववि बाबतीत.. मी गर्दी फारशी पसंत न करणारी व्यक्ती आहे. मोजक्या जवळच्या लोकां मध्ये रमणारी व्य्कती आहे.
तश्या ऑफीसच्या बर्‍याच बळजबरी पिकनिका होतात मे ते जुन- जुलै मध्ये. त्या काळात, बळजबरी पिकनिका आणि बळजबरीची नातेवाईकांची लग्न लावून( म्हणजे अटेंड करून) नकोसं होतं. आजकाल वन डे पिकनिका थीम्स पण कोणते ना कोणते चालूच असते आणि कस्काय वर सतत ते मेसेजेस. आज अमक्उद्या, उद्या तमक्याने . मग ह्याला नाही कसे म्हणॉऑ , त्याला हो म्हणू. मुलांचे प्लॅन्स, थोरांचे प्लॅन्स.
एकंदरीत, सतत वर्षाव असतो ह्या फेबु, कस्काय वगैरे. माझाच वावर कमी झालाय इथला (मायबोलीचा) ह्या मार्‍यामुळे.

एकदा मनात आले होते( गेल्या वर्षी) पण नेमकी आजारी झाले अ‍ॅलर्जीने.
तर आहे हे आसॅ आहे.

हुप्पाहुय्या आपल्या क्वालिटी वॅल्यु वगैरे मतांशी सहमत आहे. मी दगडी ईंजिनीअर असल्याने असे चार्ट वार्ट मला कळत नाही. पण एक गोष्ट तर नक्की आहे की बरेच जण आजही मूकवाचकरुपात मायबोलीवर फिरकत आहेत. किंबहुना आकडे पाहता त्यांची संख्या वाढलीच आहे. आता ईथे दर्जेदार लेखन करणारे जे अचानक थंडावले आहेत, जे काही कारण असेल त्यांना सध्या असे वाटत असेल की हल्ली कोणी माबो वाचतच नाही तर आपण का आणि कोणासाठी लिहायचे. असा विचार करता कोणीच लिहित नाहीये आणि त्यामुळे थंड झालेले वातावरण पाहता आणखी कोणीही लिहित नाहीये. पण आता या आकड्यांमुळे त्यांना समजेल की फारसे लिखाण येत नसल्याने तितके प्रतिसाद येत नाहीयेत. पण वाचक अजूनही माबोवर घिरट्या घालत आहेत. हे जर त्यांनी सकारात्मकपणे घेतले तर ते लिहायला सुरुवात करतील. आपसूक प्रतिसाद यायला लागतील. एकाचे बघून दोन, दोनाचे चार असे वाढत जातील. म्हणतात ना, पैसा पैश्याला खेचतो, तसे तेजी आली की ती आणखी तेजी घेऊन येईल.. आता त्या दृष्टीकोणातून पाहता ईथे सकारात्मक वातावरण करायचे आहे की नकारात्मक हे आपले आपणच ठरवयाचे आहे Happy

तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देतो . पण आपण जास्त विषयांतर नको म्हणून इथेच थांबवू यात. हा धागा ववी ला इतकी नाव नोंदणी कमी का झाली या साठी आहे. ववी ची माहीती अनेकांना पोहोचली हे सांगण्यासाठी मी ते स्टॅट्स दिले होते.
पर युजर प्रत्येक पानावर घालवेला वेळ (क्वालिटी),
पर युजर सरासरी प्रतिसादसंख्या (क्वालिटी),
पर युजर सरासरी धागा संख्या (वॅल्यू),
पर युजर सरासरी विपू संख्या (वॅल्यू)
ही माहिती उपलब्ध नाही (काढता येईल किंवा आमच्या समाधानासाठी नक्की काढूच) . युजर लेवला ही माहिती नसली तरी सेशन लेवला (भेट) काही माहिती उपलब्ध आहे.
दर भेटीत वाचलेले धागे आणि दर भेटीत मायबोलीवर काढलेला वेळ हे नक्कीच डाऊनवर्ड आहेत. पण त्याच बरोबर मायबोलीकर/वाचनमात्र सभासद मायबोलीवर कसे येतात हे झपाट्याने बदलत आहे. एक उदा. २००७ मधे एकाच वेळ डेस्क्टॉपवर १५-२० मिनिटे बसून २०-२५ पाने बघणारे मायबोलीकर कमी होत आता दर तासाला मोबाईलवर ५-१०मिनिटे काढून दर भेटीत ५-६ पाने पाहणारे अनेक जण आहेत. त्यामुळे एका भेटीत सरासरी वेळ कमी झाला म्हणून वॅल्यू कमी झाली की हवे तेंव्हा येणे सोपे झाल्याने एकूण भेटी वाढ्ल्या म्हणजे वॅल्यू वाढली याबद्दल चर्चा करता येईल. पण ती इथे नको.
तुम्हाला कशाची वॅल्यू वाटते, कशाची क्वालीटी वाटते ती इतरांना वाटेल असे नाही. त्यातही विपू सुविधा गेले ४-५ महिने तांत्रिक कारणामुळे नीट सुरु नाही (ईमेल नोटीफिकेशन चालते पण पानावर दिसत नाही) त्यामुळे त्याची वॅल्यू कमी झाली आहे हे अगदी उघड आहे आहे.

या सगळ्याचा एक सर्वव्यापी निकष आहे. तो म्हणजे जर एखाद्याला मायबोलीकडून काही वॅल्यू मिळत असेल (ती काहीही ,कुठल्याही पातळीवर असो) तर तो परत परत मायबोलीवर येईल. वॅल्यू मिळत नसेल तर परत येणार्‍यांची संख्या आणि नवीन वाचकांशी असलेले त्या संख्येचे गुणोत्तर कमी होत जाईल.
अशा पुन्हा पुन्हा मायबोलीवर येणार्‍यांच्या संख्येचा आलेख वाढता आहे. विपु सुविधा सुधारली किंवा आणखी इतर सुविधा दिल्या तर आणखी वाढेल हे माहिती आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील आहोत. मायबोलीवरती (कुठल्याही सोशल साईटवर) गळती असणारच. सभासदांची लग्ने होतात, मुले होतात, त्यांना मुले होतात त्यामुळे वॅल्यू काय मिळेल आणि किती वेळ देणार याचे निकष ही बदलत जाणार.
आता पूर्वीसारखे लोक इथे लिहत नाहीत, लेखनाची क्वालीटी जात चालली आहेच, जुने लोक सोडून चालले आहेत हे आपण गेल्या २० वर्षात अनेकदा ऐकतो. ते त्या त्या वयात (मायबोलीवरच्या वयात) असलेल्या ग्रूपपुरते खरेही असते.
इथे इतकेच पुरे.

वेमा, आय अ‍ॅम विथ यू थ्रू धिस. माझ्या भावनिक गरजेच्या काळात माबो व माबोकरांनी मला मदत केलेली मी विसरू शकत नाही. राजकीय चर्चा, डंबिंग डाउन वगैरेला एकच उत्तर म्हणजे पूर्वीसारखे क्वालिटी ़ कंटेंट निर्माण करत राहायचे. वाहत्या बाफांवर पन काही मस्त विनोद होत असतात. ते मी वाचत असते. पूर्वी पुपु वर पण असे घरगुती वातावरण होते.

स्वतःपुरते म्हणायचे तर गृप मध्ये फिझिकली मिसळायाची सवय व गरज जात चालली आहे. गरजे पुरते बोलले मग स्वतःच्याच विश्वात मग्न आणि सुखी असे झाले आहे. पावसात मुद्दाम भिजायची एनर्जी पण नाही. पण तरुणाईच्या आनंदात मला आनंद असतो. माझा कोणता च गृप नाही सर्व माबो हाच एक कम्युनिकेशन पॉइंट आहे ह्या वीकांताला तर हैद्राबाद ला गेले होते त्यामुळे जमले नाहे. माबोकरांचा फोन या म्हणून आला होता. सो स्वीट. धन्यवाद त्या बद्दल. और भी मौके आएंगे मिलने के. शरद रुतूत एखादे आनंद मेळावा टाइप घेता आले पूर्वीचे दिवाळी गटग असायचे तसे तर जमवता येइल.

इथ बर्याच जणानी ग्रुप नसल्याचा , एकट पडल्याचा मुद्दा मांडलाय म्हणून मी हे लिहितोय .
गेले ६ ७ वर्ष मी वविला येतो आहे . प्रत्येक वेळी कितीतरी नवीन लोक भेटायचे . यावेळीही मुग्धा , महेंद्रची आई वगैरे होतेच .
ववि बाहेर मी या कुणाला कधी भेटलोही नाही , ना मी कुठल्या गप्पांच्या पानावर वा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आहे .
किमान मी मायबोलीवर रोज येत तरी असतो , माझी बायको तर अगदी कधीतरी . पण तिचाही ५ वा ववि असून तिला कधीही हे एकट पडल्याच जाणवल नाही .

यावेळी जे झाल ते झाल . पण पुढच्या वेळी तरी मोठया संख्येने या , अन कसलेही पूर्वग्रह न बाळगता ( मी एकटा पडेन , सगळे आपल्या सर्कल मधे असतील ) या Happy

वाचनमात्र असणार्‍यांना किंवा `आम्ही आलेलं चालणार आहे का?' असा विचार करणार्‍यांना त्यातून बाहेर काढायला हवं असं एकंदर दिसतंय.

दक्षिणा, तू सांगितलेली कारणं पटली. (जीएसटी, रिसॉर्ट बदलावं लागलं, इ.)

ववि-स्पिरीट पूर्ववत होण्यासाठी गप्पांची पानं पुन्हा बहरायला हवीत असं मला राहून राहून वाटतंय.

इथे किमान एकदातरी ववीला गेलेल्यांनी ते का येऊ शकले नाहीत लिहिले तर ते जास्त सयुक्तिक होईल.

<<<यावेळी जे झाल ते झाल . पण पुढच्या वेळी तरी मोठया संख्येने या , अन कसलेही पूर्वग्रह न बाळगता ( मी एकटा पडेन , सगळे आपल्या सर्कल मधे असतील ) या >>>
नक्कीच केदार ...

व वी ला इतक्या वर्षात आले नाही आणि ह्या वर्षी मुग्धा ने खास बोलावुन ही जमले नाही ह्याचे एकमेव कारण म्हणजे "जुलै" महिना!!! माझा व्यवसायिक वर्ष भरातील सगळ्यात महत्वाचा महिना. ह्याच महिन्यात सगळ्यान्ची रीटर्न्स भरायची असतात, व इतर ठिकाणची ऑडिट्स सुध्धा चालु असतात. त्यामुळे वर्षभर बीझी असेन नसेन, ह्या महिन्यात सगळ्यात जास्त बीझी असते. त्यातच तारीख पण ३० होती. म्हणजे अगदीच क्रीटिकल. साधारण जे माबोकर अकाउन्टस/ फायनान्स / ऑडिट वगैरे शी संबंधीत आहेत त्यान्ना कदाचीत हा प्रॉब्लेम होवु शकतो.

दुसरे कारण माझ्या मते म्हणजे माबो वर असलेला ग्रुपीझम!! मागे एक दोन गटग ना गेले होते तेन्व्हाही हा जाणवला होता. बाकी जातपात वगैरे काही जाणवले नाही. पण ग्रुपीझम मात्र खुप जाणवतो.

वरचे काही प्रतिसाद खुप विचार करायला लावणारे आहेत. त्यातुन एक सुचना करावीशी वाटते की माबो ने एखादे स्नेह संमेलन दर वर्षी घ्यावे. त्यात तिकडे हजर असणार्‍या नव्या सभासदांची जाहीर ओळख असा कार्येक्रम असावा. चांगलासा हॉल शोधुन मुंबई व पुणे असे दोन वेगवेगळे कार्येक्रम करावेत. त्यात सुरुवातीला प्रत्येक आय डी ने आपली वर्च्युअल ओळख द्यावी. फक्त ऑळख. मग ज्या नव्या आय. डी. ना बोलायचे आहे ते बोलु शकतात. मग जेवण व इतर सांस्क्रुतिक कार्येक्रम घ्यावेत.

व वी हा एक उपक्रम असावा, एकमेव नव्हे. वरच्या अनेक प्रतिसादात भिजायला आवडत नाही, आता लहान आहोत का वगैरे..वगैरे मुद्दे आहेत. अश्या लोकांसाठी असे बंदिस्त कार्येक्रम उपयोगी पडतिल.

आर्थात हल्ली इथला लेखनाचा दर्जा खुपच खाली गेला आहे हे वेब्मास्तर सुध्धा मान्य करतात. पुर्वी कधी एकदा लंच टाइम होतो आणि कधी एकदा माबो वर जाते असे व्हायचे. आता, दोन दोन महिने रोमातही यावे असे वाटत नाही. राजकिय चर्चा मुद्दाम्हुन घडवल्या जातात असे वाटते. उगाचच चर्चा आणि बीन बुडाच्या धाग्यान्नी उत आणला आहे. त्या लोकांचे वर कौतुक ही केले जाते. अनेक माबोकर जे इकडे लिहुन खुप प्रसिध्ध झाले, ते आता नवे काही लिहित नाहीत, किन्वा लिहितात, पण इकडे प्रकाशित करत नाहीत.

अनेक जाणकार माबोकर आपले आय डी बंद करुन बसले आहेत. पुर्वी अनेक प्रवास वर्णने लिहायचे ( अनया , केदार, सेनापती, दिनेश, अशुचँप), हल्ली तो भाग बंदच झाला आहे.

माबो ने ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. आर्थात पटलं तर.

अजुन एक मुद्दा वर लिहायचा राहिला

हल्लीची तरुण पिढी जी माबो वर असणे अपेक्षीत आहे, तिला मुळात प्रत्यक्ष संपर्कापेक्षा वर्च्युअल रहाण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणुनच आज काल एकमेकांना फोन करण्या पेक्षा "चॅट" करण्याकडे कल वाढलेला आहे. कारण प्रत्यक्षात भेटलो आणि अपेक्षा भंग झाला तर? ह्या भितीने संपर्क कमी होत चालला आहे.

Pages