कथा एका मुलाखतीची

Submitted by _तृप्ती_ on 31 July, 2017 - 00:30

ताराबाई आज सकाळपासून भलत्याच खुश होत्या. स्वतःशीच हसत होत्या. कालचा फोन आठवून आणि त्यानंतर आलेले पत्र, कमीत कमी २० वेळा तरी वाचून झाले असेल. त्यांना कधी एकदा ही बातमी गावातल्या सगळ्या बायकांना सांगते आहे असं झालं होतं. ताराबाई ह्या जरी वावडी नावाच्या छोट्या गावात राहत असल्या तरी स्थळ काळाने फरक न पडणारं व्यक्तिमत्व आहे त्यांचं. त्यांचा स्वतःचा शेणाच्या गोवऱ्या विकण्याचा मोठाच व्यवसाय आहे. आणि त्यावर त्यांचा संपूर्ण एकाधिकार आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे गावातल्या रिकामटेकड्या बायकांना एकत्र आणून, त्यांना छोटे मोठे उद्योग करण्यास मदत करण्यात यांचा पुढाकार आहे. त्याबरोबर त्यांची फक्त एवढीच अपेक्षा असते कि गावातल्या बायकांनी त्यांना घोडनवरी आहे म्हणून हे सगळं जमतं,असं म्हणू नये. म्हणजे त्यांना तसं तोलामोलाचं माणूसच मिळालं नाही त्यात त्यांचा तरी काय दोष?
तर आज त्यांची फार दिवसाची इच्छा पूर्ण व्हायच्या मार्गावर होती. बरेच दिवस पेपरमध्ये, टीव्हीवर ते स्त्री व्यावसायिक लोकांचं फारच कौतुक होत होतं. ताराबाईंची इच्छा होती, असंच कधीतरी त्यांना पण टिव्हीवर जायला मिळावं. त्यांना कितीतरीवेळा हे स्वप्न सुद्धा पडलं आहे की, टीव्हीवर जाऊन आल्यावर गावात त्यांची मिरवणूक काढली, त्यांचा सत्कार केला वगैरे वगैरे. पण आजपर्यंत ही वेळ काही आली नव्हती. पण आता तो दिवस काही फार लांब नव्हता. त्या पत्रामध्ये ताराबाईंना टीव्हीवर मुलाखतीसाठी बोलावणं आलं होतं. कुठल्यातरी नव्यानेच सुरु झालेल्या, बित्तम बातमी, नावाच्या चॅनेलकडून हे आमंत्रण होतं. त्यामुळे त्या भलत्याच खुश होत्या. त्यांनी लगेचच गावातल्या मंजुळेच्या कानावर ही बातमी घातली आणि कोणाला न सांगण्यासाठी बजावलं सुद्धा. मग मंजुळाने पण गावातल्या जवळजवळ सर्वच लोकांना सांगितलं आणि कोणालाही न सांगण्याची शपथच घातली. बाबू किराणावाला म्हणालासुद्धा आता अजून कोणाला सांगायला गावात हे माहित नसलेलं कोणी शिल्लकच नाहीये. असो. तर हस्ते परहस्ते ही बातमी सर्व वावडीकर रहिवास्यांना समजली. आता गावातल्या काही जेष्ठ नागरिकांना ताराबाईच्या कर्तृत्वाची खरी किमंत कळाली होती. त्यामुळे त्यांनी गावातल्या सर्वानी ताराबाईंना मदत केलीच पाहिजे यासाठी चंगच बांधला. काही झालं तरी, वावडी गावाचं नाव आता टीव्हीवर झळकणार होतं. ही एक मोठीच गोष्ट होती. मग ताराबाई स्वतः, गावातील काही बुजुर्ग, ताराबाईच्या मदतीने छोटे मोठे उद्योग सुरु ठेवणाऱ्या महिला, काही इच्छुक तरुण मंडळी आणि गावातला होतकरू कार्यकर्ता नाम्या असे सगळे जमले. नाम्याने सवयीने भाषणाला सुरुवात केली. "आपल्या सगळयांच्या लाडक्या, आदरणीय ताराबाई यांच्या कामाचे खरे चीज होते आहे. त्यांना हा जो बहुमान मिळाला आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आता त्यांच्या कर्तृत्वामुळे, वावडी गावाचे नाव सगळ्या जगासमोर येणार आहे. " तरी गणप्याने शंका काढलीच ," अरं बाप्पा, हे चॅनेल जगात कुठं दिसतं का रं ?" पण नाम्या जोशात होता. तो अजूनही बरंच काही बोलला असता. पण तात्यारावांनी त्याला आवरत घेतलं, " ए नाम्या, तुझं भाषण पुरे. ताराबाईना काय मदत हवी ते विचार." आणि मग सगळयांच्या नजरा ताराबाईकडे वळल्या. ताराबाई या अचानक मिळालेल्या प्रसिद्धीने हुरळून गेल्या होत्या. तरी त्यांनी ठरवलं होतं, कोणाचीही मदत घ्यायची नाही. त्या म्हणाल्या, " माझी मी तयारी करेन. आपण सगळ्यांनी मदत करायची तयारी दाखवली मला आनंद वाटला. पण मी काही माझं काम टीव्हीवर जाण्यासाठी करत नाही. आणि या पुढे सुद्धा करत राहेन" आता मात्र तात्यांना राहवेना. त्यांनी ताराबाईना खडसावून सांगितले की गावाच्या नावाचा प्रश्न आहे आणि आम्ही सगळे मुलाखतीला येणारच. मग आता चर्चा सुरु झाली की ताराबाईना कोणते प्रश्न विचारतील आणि त्यांनी काय उत्तरं द्यावीत. एक शंका पुढे आली. जर मुलाखत इंग्लिश किंवा हिंदीमध्ये झाली आणि ताराबाईना प्रश्नच कळला नाही तर? ताराबाईना आपल्या इंग्लिशची अशी गावात चर्चा केलेली अजिबात आवडलं नाही. आणि चॅनेल मराठीच होतं पण तरीही "आपली इंग्लिश, हिंदीची तयारी हवी" असा एक मुद्दा पुढे आला. ताराबाईना शिकवायला अनेक जण पुढे आले पण आपल्या बायकांच्या रोखलेल्या नजरा पाहून बरेच जण मागे वळले. गावात नव्याने आलेल्या आणि लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या, एका शाळा मास्तरची या कामावर नेमणूक झाली. ताराबाईना हे बाकी एकदम आवडून गेलं. तसं त्यांनी दाखवलं नाही आणि मास्तरांना त्रास नको वैगरे असं पण म्हणाल्या. पण कोणी लक्षच दिलं नाही. आता महिला गटाने पुढाकार घेतला. ताराबाईनी मुलाखतीच्या दिवशी तरी निदान जरा बरे कपडे घालावेत आणि नीट दिसावं असं सर्व बायकांचं म्हणणं होतं. आता आपल्या भाषेच्या प्रभुत्वानंतर, आपल्या दिसण्यावर अशी चर्चा गावातल्या तरुण मुलांसमोर आणि विशेष करून मास्तरांसमोर, म्हणजे ताराबाईना एकेकीला हत्तीच्या पायाखाली द्यावं असं वाटतं होतं. पण वरकरणी त्या म्हणाल्या, " तशी माझी नेहमीची साडीच चांगली आहे. आणि मी काही सौदर्यस्पर्धेत भाग घेत नाहीये.' ह्या वाक्याला त्या एक कटाक्ष मास्तरांकडे टाकायला विसरल्या नाहीत. यावर आलेल्या काही प्रतिक्रिया.
" माझी साडी नेस. ते तुझे मळके कपडे टीव्हीवर कशाला दिसायला हवे ?' इति मंजुळा.
" मी मेकअप करून देते की फुकट. तेवढीच माझी पण जाहिरात होईल की टीव्हीवर." उदयोन्मुख ब्युटी पार्लरवाली. त्यावर तरी एक जण म्हणालीच, "अग तारीला नटवून काय तुझी जाहिरात होणार? तुझं पार्लर बंद पाडायचं आहे का?"
" तारे, अग जरा बरी दिसलीस तर काय बिघडणार आहे का? मी तर म्हणते, तिथेच एखादा मुलगा बघ आणि लग्नाचं बघ आता. अजून काय तसा उशीर नाही. आईबापाविना वाढलेली पोरं तू. मुलाखतीच्या शेवटी सांगूनच टाक की तू लग्नासाठी पोरं बघते आहेस म्हंणून. तुझ कामच होईल बघ" इति एक काळजीवाहू आजी.
बायकांच्या चर्चेला काही ठोस वळण मिळेना. त्यामुळे ही चर्चा बायकांनी स्वतंत्रपणे करावी असं ठरलं.
अश्या रीतीने ताराबाईना मुलाखतीसाठी तयार करण्याचं शिवधनुष्य मास्तरांनी उचलायचं ठरवलं आणि जनता आपापल्या घरी पांगली.

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

भारीच!
लवकर लवकर आणा पुढचा भाग....

वा, वा, झकास !
मुलाखतीची फर्मास गोष्ट !
भारी सुरुवात झालीय !
उत्सुकता चाळवली गेलीय !
गावा कडच्या एकेक इरसाल कहाण्या आठवायला लागल्या.
येव्वुं द्या पुढचा भाग लवकर !