पुळण - भाग १३

Submitted by मॅगी on 26 July, 2017 - 22:15

भाग १२

समिपा दिसेनाशी झाल्यावर सगळे मजूर आणि राजुभाईची बोबडीच वळली होती. नलिनलाही घाम फुटला होता, पण एकच क्षण इकडे तिकडे पाहून त्याने मनात काहीतरी ठरवले आणि समीपामागोमाग स्वतः त्या काळोख्या विवरात उडी घेतली!

लगेचच त्याचे पाय जमिनीला टेकले आणि तो बेशुद्ध समिपाच्या बाजूला पडला. जमिनीचा ओलसर थंडावा हाडापर्यंत पोहोचत होता. आजूबाजूला प्रचंड कुबट, आंबट भयाण वास भरून राहिला होता. काजळासारख्या गडद काळोखात डोळे वासूनसुद्धा कणभरही दिसत नव्हते. दुखरा चवडा दाबत त्याने उठून उभा राहायचा प्रयत्न करताच डोके वर आपटून दगड मातीच्या डिखळांचा वर्षाव झाला.

जर सरकत इकडे तिकडे चाचपडल्यावर हाताला मातीचे ढिगारे आणि धातूच्या वस्तू लागत होत्या. अचानक कोपऱ्यात त्याला बारीक उजेडाचा किरण दिसला आणि दबक्या पावलांचा आवाज झाला. कंबरेत वाकुनच त्याने त्या दिशेला धाव घेतली. समोर जी कोणी व्यक्ती होती तिने तीन फुटी दार उघडून घाईघाईने स्वतःला बाहेर झोकून दिले. नलिनने त्याला जराही अवधी न देता मागोमाग बाहेर उडी मारली.
एकदम डोळ्यांवर उजेड आल्यामुळे डोळे किलकिले करत जोरात राजुभाईना हाका मारल्या आणि त्याचवेळी मागून झडप घालत पाळणाऱ्या व्यक्तीची कॉलर पकडली. वाड्याच्या मागच्या बाजूला ते बाहेर निघाले होते. हा लहानसा दरवाजा पाचोळ्याखाली लपवला होता. धरलेल्या माणसाला त्याने स्वतःकडे वळवून विचारले, "कोण तू? तिथे आत काय करत होतास?"

तो लहान दिसणारा पंचवीसएक वर्षांचा युवक होता. अंगात लाल टीशर्ट आणि खाली लो वेस्ट, चुण्याचुण्या असलेली रंग गेलेली स्वस्तातली जीन्स आणि स्लीपर्स घातल्या होत्या. डोक्यावर बारीक केस ठेऊन कॉलरपाशी बारीकशी पिगटेल ठेवली होती. अंगाने अगदीच सुकडा होता. कपड्यांवर सगळीकडे मातीचे डाग होते. भीतीने थरथर कापतच त्याने बोलायला सुरुवात केली.

"ओ दादा, मारू नका. मारू नका प्लीज. आपन सांगतो ना सगळा. मी सनी. इतच जेधेवाडीला ऱ्हातो. सखुबाई मावशी माझी. तिचा मुलगा मयादादा. त्याने हितं हातभट्टी लावलेलीय. हा एवढा भुयार खणून त्यात समदीकडं दारूची पिपं पुरलेली हेत. मी दिवसभर तिथे राखन बसतो. संदयाकाळी मयादा येऊन रोजचा कोटा काढून त्याच्या दुकानात नेतो. दुकानावर पोलिसची धाड पडली तरी हिते जुना वाडा म्हून ते लक्ष नाय देत. आमचा माल सेफ ऱ्हातोय न्हेमी."

मान हलवत नलीनने त्याला राजुभाईकडे सोपवले. एका मजूर बाईला बरोबर घेऊन समिपाला उचलून बाहेर आणून एका खोलीत झोपवले. सखुबाईला वाड्यावर बोलवून घेतले.
सखुबाई धावत पळत 'वनराजी'च्या गेटसमोर आल्यावर तिथेच एका मजूर बाईने तिला धरून आत आणले. भिंतीला टेकून बसलेल्या सन्याला पाहून तिचे डोकेच फिरले.
"सन्या.. मेल्याss डुचक्या! तुला एक काम करता येत न्हाय व्हय धड.." म्हणून ती थडाथडा त्याच्या पाठीत रट्टे हाणू लागली.

"ओ बाई, चला बसा तुम्हीपण आणि तोंड उघडा आता" रागाने नलिन ओरडलाच.

"आवो सायेब चूक झाली आमची.. एक डाव माफी द्या. परत नाय व्हनार. पोलिसला बोलवू नका. आमी सांगटो सगळं" सखुबाई विनवण्या करत म्हणाली. "ह्या वाड्याचे मालक दादासाहेब म्हनजे आमच्या मालकांचं चुलतं. त्यांची पोरं सगळी असतात फारीनला. म्हून त्यांनी त्या मारवाड्याला हा वाडा इकला. लै वर्स झाली. आम्ही पिकवत रायलो शेती. त्यात आमचं मालक मयत झाले. मग पोराला वाढवला. तसा तर ह्यो वाडा आमचाच, मग आमी का वापरू नको. आमी गपचूप हा खालचा काम सुरू केला. धंदा चांगला चालला हुता, तोच ह्या दोन पुरी आल्या ना हिकडं" कपाळावर हात मारत सखुबाईने तोंड वाकडं केलं.

"मंग आमीपण ठरवलं, असा कसा आमचा धंदा बंद पाडतात तेच बगूया. ह्या शेरातल्या पुरी लै घाबराट असतात म्हून ह्यांना घाबरून हाकलून दिऊ म्हटलं. ती दुसरी लिष्टीपवाली पुरगी झोपाळ्यावर बसली तर माजा नातू झोपाळा हलवून पळाला. मी त्या म्याडमला खिडकीतून भीती दावली. झाडावर भावलीला फास लावला. गुलाल भाताचा उतारा ठिवला. हितं चौकात सापबी टाकला. पर कायबी झालं नाही बगा." वैतागून सखुबाई आता शांत बसली.

नलिन हि सगळी गोष्ट ऐकून आता गालातल्या गालात हसू लागला होता. त्याने दोघांवर मजुरांचा पहारा बसवून लगेच पोलिसांना फोन केला, बेकायदेशीर दारू साठा, विक्री आणि मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल या लोकांना पोलीस घेऊन जाणार होते.

ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नलीनने मेहतांना दिली आणि पंचनामा वगैरे होऊन ते भुयार बुजवायला अजून पंधरा वीस दिवस लागतील याची कल्पना दिली.

बाहेर हा सगळा गोंधळ सुरू असताना समिपा धड झोपेत नाही धड जाग नाही अश्या सीमारेषेवर होती. तिच्या पापण्या जडावल्या होत्या. डोळ्यात वाळूचे कण टोचत होते. खिडकीबाहेर पावसाची झड लागली होती. पागोळ्यांचा आवाज तिला समुद्रासारखा वाटू लागला. ती एकाकी केतकीच्या काटेरी निबिड बनात बसली होती. केवडा फुलायला लागला होता. त्या धुंद गंधाला भुलून एक काळा नाग त्याच्या मुळाशी वेटोळे घालून बसला होता.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालली आहे,
पटापट भाग येतायत म्हणून अजून उत्सुकता वाटत आहे.
समिपा स्किझोफ्रेनियाची शिकार आहे का?

"मंग आमीपण ठरवलं, असा कसा आमचा धंदा बंद पाडतात तेच बगूया. ह्या शेरातल्या पुरी लै घाबराट असतात म्हून ह्यांना घाबरून हाकलून दिऊ म्हटलं. ती दुसरी लिष्टीपवाली पुरगी झोपाळ्यावर बसली तर माजा नातू झोपाळा हलवून पळाला. मी त्या म्याडमला खिडकीतून भीती दावली. झाडावर भावलीला फास लावला. गुलाल भाताचा उतारा ठिवला. हितं चौकात सापबी टाकला. पर कायबी झालं नाही बगा."
भारीच.